प्रकाशक

वास्तविक हा लेख मला काल - दिनांक २१ सप्टेंबर रोजी इथे प्रकाशित व्हावा असे वाटत होते, पण इथल्या [किंवा कदाचित माझ्या मशिनमधील] तांत्रिक अडचणीमुळे मी इथे 'मराठी' टंकन करू शकत नव्हतो. असो, ती अडचण इथल्याच एका सदस्याच्या मार्गदर्शखाली सोडविली आणि आता २१ ऐवजी २२ सप्टेंबर या तारखेला 'सदानंद रेगे' यांच्याविषयी लिहित आहे. [२१ सप्टेंबर १९८२ रोजी त्यांचे निधन झाले होते].

सत्यकथा परंपरेतील 'लघुकथा' कार म्हणून त्याना त्या काळातील बिनीच्या चार शिलेदारांबरोबर जरी प्रवास करता आला नव्हता तरी त्यांचे नाव सातत्याने खटाववाडी दुनियेतील अंगणात अग्रभागी राहिले होते. कथा आणि कविता या दोन्ही प्रांतातील त्यांची वाटचाल चांगलीच होती. चित्रकार होते पण या सार्‍या गोष्टी अर्धवट राहण्याचे कारण म्हणजे त्यांच्या वयाच्या तेराव्या वर्षीच त्यांच्यावर विधवा आई आणि चार भावंडे यांच्या पालणपोषणाची पडलेली जबाबदारी. मॅट्रीक चांगल्या मार्क्सनी उत्तीर्णं होऊनही आर्थिक हलाखीमुळे एका स्क्रीन प्रिन्टिंगवाल्याकडे महिना पंचवीस रुपयाची नोकरी. रेल्वेत नोकरी करीत करीत मॅट्रिक नंतर तब्बल १७ वर्षांनी ते एम.ए. झाले.

पुढील वाटचालीवरही लिहिता येईल, पण आज या क्षणी मला त्यांची काही वर्षापूर्वी एक असंग्रहीत कविता माझ्या समानधर्मीय मित्राच्या डायरीत मिळाली होती, जी त्याने 'अभिरूची' मधून उतरून घेतली होती; ती इथल्या वाचनप्रेमी सदस्यांसाठी द्यावी असे वाटले, म्हणून हा लेख प्रपंच. काल त्या मित्राकडेच 'सदानंद रेगे' स्मृतीदिनानिमित्य बोलत बसलो असताना त्या कवितेची आठवण झाली. ती इथे एवढ्यासाठीच देत आहे की मराठी पुस्तकांच्या दुनियेत 'प्रकाशक' या नावाचा प्राणी काय चीज आहे हे तमाम मुरलेल्या लेखकांना माहीत असते, पण होतकरूना ही जमात काय आहे हे त्या गावाला गेल्यावरच उमजते. जो लेखक प्रकाशकाकडे बंडखोर वृत्तीने पाहण्याचा प्रयत्न करतो त्याची प्रकाशक कशी 'वाट' लावतो याबद्दलच्या खूप खाजगी कहाण्या प्रसिद्ध आहेत. सदानंद रेगे यांच्याबाबतीतही काहीसे असेच घटीत झाले असणार त्याला ही 'प्रकाशक' नावाची कविता साक्षीदार आहे.

२१ सप्टेंबर १९८२ ला त्यांचा मृत्यु झाल्यानंतर दिलीप चित्रे यानी 'अभिरुची' च्या जानेवारी १९८३ च्या अंकात प्रकाशित केली होती. [रेग्यांच्या कोणत्याही संग्रहात ही कविता आलेली नाही.]

"प्रकाशक"

प्रकाशक हा मदारी असतो
लिहिता ना येणार्‍यांना तो लिहिते करतो.
पाणीपुरीला जसे जिर्‍याचे पाणी
तसा तो लेखकांना अटळ असतो.
त्याच्याकडे एक भली मोठी बॅटरी असते.
काळोखातल्यांना तो प्रकाशात आणतो.
प्रकाशक हा पेटीतल्या मिठाईसारखा सुसंकृत असतो.
कशासाठी तरी तो सारखी झीज सोशीत असतो.
लेखकाप्रमाणेच तोही वरचेवर सेमिनारला वगैरे जातो.
लेखकातले जे गाणारे असतात त्यांचे गाणे करतो.
सटीसहामासी लेखकाना घरी बोलावून
तो त्याना रॉयल टी देतो.
प्रत्येक प्रकाशकाच्या देवघरात शॉयलॉकचा फोटो असतो.
या चित्रातला शॉयलॉक साईबाबांसारखा दिसतो.
दिवसाचे तेवीस तास तो वात्सल्यरसाने ओथंबलेला असतो.
पण केव्हा केव्हा तो खणखणीत परखडपणाही दाखवतो.
'कोळशाच्या दुकानातले कोळसे' तशी तुमची पुस्तकं
ही त्याची गर्जना ऐकून् भले भले लेखक शब्दगळीत होतात.
प्रकाशकाचे गणित रँग्लर परांजप्यांसारखे असते.
पै पैच्या हिशोबागणिक तो नाथांसारख्या टाळ्या वाजवतो.
प्रत्येक प्रकाशक हा मॉमपेक्षाही अधिक पैसे लेखकाला वाटतो.
देवळाच्या पायर्‍या उतरीत तो खाली येऊ लागला
की धट्टेकट्टे लेखकही लुळ्यापांगळ्याचं सोंग घेऊन उभे राहतात.
ज्या लेखकाना आयुष्यात एकदा तरी मोटरीत बसायचे असते,
त्याना प्रकाशकावरच मदार ठेवावी लागते.
प्रकाशकाचा स्वतःचा असा दरबार असतो.
या दरबारात बसून प्रकाशक लेखकाना शहाणे करूनी सोडतो.
या दरबारात येताना लेखकाना मानेला स्प्रिंगा लावून घ्याव्या लागतात.
टाळ्यांचे टेपरेकॉर्डिंग त्याने खास अमेरिकेहून आणलेले असते.
लेखक म्हणजे कारकून या सत्याचे प्रूफ प्रकाशक प्रत्यही देत असतो.
पुस्तके बांधून घेण्यापलीकडे कसलंच बायंडिंग प्रकाशकावर नसते.
लठ्ठ् लेखकांना तो नित्य नेमे डायेटवर ठेवतो.
मठ्ठ लेखकांना तो फटकन् बोलतो.
हा़डकुळ्या लेखकांच्या बेडकुळ्या काढून दाखवतो.
भांडकुळ्या लेखकांच्या तोंडाला लागायला याला लाज वाटते.
अशा या परमदयाधन प्राण्याला,
परमेश्वरा, जन्मोजन्मी प्रकाशकाचाच जन्म दे.
त्याला कुत्रं, मांजर् वगैरे करून आम्हा लेखकांची कुचंबणा करू नकोस.
तो कुत्रं झाला तर आम्हाला मांजर व्हावं लागेल.
तो मांजर झाला तर आम्ही उंदीर होऊ.
पुस्तकं खाणार्‍या झुरळांना कधीकधी
प्रकाशकाचा चेहरा फुटलेला वाटतो
म्हणून ही प्रार्थना एवढंच.
सहस्त्रयोन्या वगैरे आम्हा कर्मदरिद्रांना.
त्याला एवढी एकच ठेव,
पुस्तके छापण्याची...."

[सदर कविता ज्या उद्वेगाने - वा आलेल्या प्रकाशक-अनुभवातून - लिहिली गेली, तिचा प्रत्यक्ष काळ कोणता यावर ना 'अभिरूची' मध्ये टिपण सापडते ना त्यांच्या अन्यत्र प्रकाशित/अप्रकाशित साहित्यात. मात्र ढोबळमानाने १९७० च्या दशकातील ही कविता असावी असा (माझा) तर्क आहे.]

Comments

सदानंद रेगे आणि नॉर्वेजियन भाषा

मला कोठेतरी असे वाचल्याचे आठवते की इब्सेनमुळे प्रभावित होऊन सदानंद रेग्यांनी नॉर्वेजियन भाषा शिकून घेतली होती आणि ती भाषा येणारे त्या काळात ते जवळजवळ एकुलते भारतीय होते. ही आठवण बरोबर आहे का?

आता ही स्थिति नसावी. सॉफ्टवेअरवाले अनेक जण आता नॉर्वेच्या वार्‍या करीत असतील.

नॉर्वेजिअन भाषा

तसे [बहुतेक] नसावे. त्याला कारण असे की रेग्यांना १९६४-६५ मध्ये [ते रुईया कॉलेज मुंबई इथे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम करीत असताना] नॉर्वेजीयन स्कॉलरशिप मिळाली होती आणि ती मिळाली होती 'नॉर्वेजियन' भाषा शिकण्यासाठीच. याचाच अर्थ असा की त्यानी तत्पूर्वी इब्सेनच नव्हे तर सॉफक्लिज, मायकॉव्हस्की, लोर्का, नेरुदा, जिब्रान आणि विविध देशांचे प्रतिनिधित्व करणार्‍या लेखकाच्या निवडक साहित्यांचा मराठीत अनुवाद केला होता. पण असा जो अनुवाद झाला तो 'इंग्रजी' मध्ये अगोदरच अनुवादित झालेल्या त्यांच्या पुस्तकांच्या आधारे. याचा आधार घेऊनच नॉर्वेच्या कल्चरल युनिटने त्याना आपल्या देशात येऊन मूळ नॉर्वेजिअन भाषा शिकावी आणि तेथील साहित्याचा थेट अभ्यास करावा यासाठी ती शिष्यवृत्ती दिली, जी त्यानी आनंदाने स्वीकारली.

ही १९६० नंतरच्या काळातील घटना असल्याने, आणि दुसर्‍या महायुद्धानंतर युरोपीअन देशात शिक्षण आणि व्यापार वा तत्सम कारणाने जाणार्‍यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याने 'नॉर्वेजिअन' भाषा येणारे श्री.सदानंद रेगे हे एकुलते भारतीय असतील असे वाटत नाही.

थोडक्यात त्यांच्याबद्दलचा तसा उल्लेख माझ्या त्रोटक वाचनात मला कुठे आढळला नाही.

नवी माहिती मिळाली

नवी माहिती मिळाली! आभार!
कविता मस्तच!
मागे श्री. प्रकाश घाटपांडे यांनी या विषयावर लिहिलेला लेख आठवला.
(अवांतर: हल्ली दिसत नाहित घाटपांडे काका कुठे)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

वेड्या कविता

वेड्या कविता

धन्यवाद अशोकरावजी. एक जुनी आठवण जागृत केलीत. तरूणपणी वाचलेल्या कविता आताच्या पिढीला दाखवाव्यात या नादात जे काही कवी घ्यावयाचे ठरविले होते त्यातले एक सदानंद रेगे. आता वसंत बापट, पु.शि., मर्ढेकर, बोरकर, असे काही शालेय पुस्तकांमुळे मुलांना जरा तरी ओळखीचे वाटतात पण सदानंद रेगे त्यातले नक्कीच नव्हेत. ग्रेस सारखेच. त्यांच्या कविता एकदा वाचून संपल्या असे कधी झालेच नाही. ती एक मारामारीच असावयाची. प्रतिमांचा वापर, घाट, विषय, बांधणी या बद्दल त्यांचा चौफेर वापर खरे म्हणजे "डोक्यावरून जावयाचा". अक्षरवेलमधील कविता जरा समजल्या असे वाटावयाचे तरी पण "ब्रांकुशीचा पक्षी "बद्दल काय लिहणार ? पण आपण एक कोणालाही भावेल अशी कविता शोधून काढलीत(म्हणून तर ती अप्रकाशित नाही ना ?) आनंद झाला. आज त्यांच्या "वेड्या कविता " या संग्रहातील एक कविता देत आहे.

बेमालूम

खरा प्रार्थनेत असणारा
कधी सावध नसतो.
पण त्या दिवशी आमचं तसं नव्हतं.
नाही म्हटलं तरी आम्हाला चाहूल होतीच.
आम्हांला करायची होती पारध.
तुझी उभी काठी कोसळली
अन् आम्ही त्याच्यावर झडप घातली.
बोटं दाखवायला कुणीतरी
हवाच होता आम्हाला
तो अनायासे सापडला.
खरं तर केव्हाचे आम्ही सारे
गोळी होऊन दडून बसलो होतो
त्याच्या पिस्तुलात ....
पण कसे दोघेही फसलात !

शरद

कलाकार

(बाहेरगावी गेलो असल्याने इथे तीन दिवस गैरहजर होतो, त्यामुळे श्री.शरद यांच्या या सुंदर प्रतिसादास लागलीच प्रतिसाद देता आला नाही - जो त्याचवेळी देणे गरजेचे होते - पण असो. आता ती कसर काहीशा प्रमाणात भरून काढीत आहे.)

~ तुम्ही म्हणता तसे सदानंद रेगे नावाचे रसायन पचायला तसे जडच गेले आहे, हे आपल्या साहित्य-चळवळीचे दुर्दैव. ग्रेसचा उल्लेख केला गेला आहे, पण गोडघाटे निदान काही प्रमाणात नशिबवान की त्यांच्या काही कविता अभ्यासक्रमात लावल्या गेल्या, त्यांच्या कवितांना [आणि चिं.त्र्यं.च्याही] हृदयनाथांमुळे गीतरूपी न्याय देऊन ते नाव तबकडीरूपाने काही प्रमाणात का असेना, आपल्या घरात आले. पण सदानंद रेगे यांच्या कपाळावर तेवढेही भाग्य सटवाईने लिहिले नाही.

'बेमालूम' तर भन्नाटच आहे आणि किती अर्थपूर्ण. नेमका हाच थेट भाव या क्षेत्रातील बड्या धेंडांना नको असतो. सुबक नटव्याच्या आहारी गेलेले कवी प्रकाशकांच्या गाजराकडे पाहात हरघडी कविता प्रसवायला तयार असताना रेगे यांच्यासारखा अवलिया त्याना अप्रियच वाटणार हे नक्कीच आणि त्यामुळेच काय आज कोणत्याही शहरातील 'नगर वाचन मंदिरात' जाऊन 'सदानंद रेगे' यांचे साहित्य मागितले तर अटेन्डंट, काहीशी शोधाशोध केल्यासारखे करून्, म्हणतो, 'पु.शि.रेगे आहेत, देऊ काय ?" असेच विचारणार हे नक्की. एकदा 'चंद्र सावली कोरतो' मागितले तर दहा मिनिटानंतर काऊंटरवर "ते नाही. हे आहे बघा, घ्या.' असे शुष्क आवाजात म्हणून समोर नारायण धारपांची 'चंद्राची सावली' कादंबरी ठेवलेली मी अनुभवले आहे. नगाला नग. बस्स.

नेमकी अशीच उपेक्षा सातत्याने या प्रतिभावान शिलेदाराला त्याच्या जिवंतपणीच आली होती; म्हणूनच की काय 'निरवानिरव' कवितेत सदानंद रेगे म्हणतात :

"बायकोस म्हटलं :
हा ऍरिस्टॉटल तुला;
आठबारा आणे का होईनात,
पण कायमचे येत रहातील.

फाऊस्ट करून टाकलाय
किंग लिअरच्या नावे;
वेडालागला येडबंबू तो
सुपारीपुरती रॉयल्टी
त्याला रग्गड झाली.

धाकटा म्हणतो :
फ्लॅट दिलात
कविता डोक्यावरून गेली.

थोरल्याला विचारायला हवं :
तुला अमृतानुभव चालेल काय ?
न चालून सांगतो कुणास ?

आता ज्ञानेश्वरी
मराठीत आणली की
सुनेच्या दवाखान्याची सोय झाली.

यापुढे ज्या कविता
लिहिणार नाही
त्या ठेवायच्या ताईच्या बॅन्केत

काव्यवाचनाचे पैसे
मला म्हातारपणात पुरेत.

(व्हिस्की-ब्रँडी काय असलं तर काढ गड्या !)"

~ सदानंद रेगे काय किंवा चित्रकार प्रभाकर गोरे काय ~ स्वतःच्या टर्म्सवर जगलेले कलाकार. म्हणूनच त्याना 'कलाकार' म्हणावेसे वाटते.

कविता आवडली

कविता आवडली. त्याच्या आदली कवीविषयी माहितीही आवडली.
उपक्रमाच्या पिंडाला अनुसरून अधिक रसग्रहण किंवा चर्चा आली असती तर अधिक आवडले आसते.
(आता आहे ते प्रास्ताविकही माहिती देणारे आहे. पण ते कवितेविषयी नसून कवीविषयी आहे.)

सहमत

अधिक रसग्रहण किंवा चर्चा आली असती तर अधिक आवडले आसते.

+१. दोन्ही कविता आवडल्या. शरद यांनी दिलेली डोक्यातून जातच नाहीय. रेग्यांच्या कवितांबद्दल अधिक चर्चा वाचायला आवडेल.

अधिकचे लेखन

श्री. धनंजय आणि रोचना ~

तुम्हा दोघांच्याही सूचना या क्षणी डोक्यात ठेवल्या आहेत्, इतपतच म्हणू शकतो.

.......असे म्हणायचं कारण दुसरंतिसरं काही नसून या वेगळ्या प्रवृत्तीच्या लेखक-कविविषयी अभ्यासासाठी उपलब्ध असलेले अत्यल्प साहित्य. मुंबईमध्ये विविध विकल्प उपलब्ध असतात [ग्रंथालयासंदर्भात], पण छोट्या-छोट्या शहरात अशा माहितीसूत्रांची फार वानवा असते हे मी स्वानुभवावरून सांगतो. अर्थात हा जरा वेगळाच विषय होईल, त्यामुळे या क्षणी तरी इतकेच म्हणू शकतो की, बर्‍यापैकी संदर्भ उपलब्ध झाले तर मी जरूर या माझ्या आवडत्या लेखकाविषयी सविस्तर आणि स्वतंत्र लेख लिहिण्याचा प्रयत्न करेन.

संदर्भ साहित्य

खरंय. मोठ्या शहरातल्या वाचनालयातही परिस्थिती चांगलीच आहे असे नाही. (दादरचे मुमगंसं याला गोड अपवाद आहे). मी काही वर्षांपूर्वी गेले असताना पुण्याच्या शासकीय ग्रंथालयाच्या नियतकालिका विभागाची स्थिती फारच दयनीय होती.

"सत्यकथा" मासिकाचे सगळे अंक कोणी सज्जनाने स्कॅन करून जालावर उपलब्ध करून दिले तर साहित्याच्या अभ्यासक आणि रसिक दोघांचे फार उपकार होतील! पण त्याला प्रताधिकार कायदा वगैरे आड येत असावा?

थोडेसे अवांतर: साहित्य-साहित्यिकांबद्दल अगदी साध्या माहितीपर, "सिंहावलोकन" शैलीच्या लेखांची खूप गरज आहे. (विकिपीडियावर असतात तसले, पण साधन आणि स्थळ-काळसंदर्भासहित) अनेकदा एका कवी, कादंबरीकाराबद्दल वाचावयास मिळते, पण या विश्वात नवीन आलेल्या माणसाला (उ. मला) अनेक संदर्भांचा अर्थ लागत नाही. "त्या काळी काय झाले हे सर्वश्रुतच आहे" "त्यांना किती टीका सहन करावी लागली हे वेगळे सांगायला नको", "डाव्या समीक्षकांनी त्यांना कमी लेखले होते, पण..."

पण हे सर्वश्रुत नसते. आणि एकेकाळी लहानशा वर्तुळात जरी हे सर्वश्रुत असले, तरी आता अनेक चर्चांची, वादांची जाणीव नियतकालिकांच्या अंकांसारखीच दुर्मिळ होत चालली आहे. स्वतःच माहिती काढून एका लेखकाच्या विचारांवर काय प्रतिसाद आले, कुठले वाद उठले हे अभ्यासायचे झाले (उ. कोलटकर, मर्ढेकर, नेमाडे, ढसाळ) तर दुय्यम साधनांमध्ये प्राथमिक साधनांचे तपशील (लेखाचे शीर्षक, लेखक, नियतकालिकाचे नाव, अंक, वर्ष, पृ.क्र) बहुतेक नसतातच. पुढे जाऊन कुठेतरी "अमुक अमुकः विचार आणि विश्व" असे पुस्तक नजरेस आले तरच.

जुन्या पुस्तकांबरोबर जुन्या नियतकालिकांनाही ई-जपणे फार गरजेचे आहे!

सदानंद् रेगे

विनीता देशपांडे
http://vineetaadeshpande.blogspot.com
अरविंद सर त्यांनी भाषाच् नाही अवगत केली तर इब्सन लिखित "ब्रांद्" या नाटकाचा अनुवादही केला. त्यांची अनुवादित नाटके- जयकेतू ( १९५९-सोफोक्लीझ् लिखित ईडीपसरेक्स चा अनुवाद), बादशाह ( १९६६- युनेझ ओनील लिखित द एम्परर जोन्स चा अनुवाद),गोची( १९७४-हडीउश लिखित गॉन् आउट चा अनुवाद्),

 
^ वर