चकवणारी नावे

पाटील साहेब,
आपल्याकडेही पूर्वी कमल, किरण, बकुल, कांचन अशी गोंधळात पाडणारी काही नावे होती. रजनी पटेल ही स्त्री नसून पुरुष होते. मराठीतले एक लेखक सविता भावे. त्यांचे नाव खरे पाहता बरोबर आहे. कारण सविता हे सूर्याचे
नाव आहे. प्रातःकाळी पूर्वक्षितिजावर अर्धवट दिसणार्‍या बिंबाला 'सविता' असे म्हणतात, तर माध्यान्ही व सायंकाळी त्याला 'सूर्य' असे म्हणतात. वास्तवात 'तो सविता' असताना आपल्याकडे हे मुलीचे नाव ठेवले जाते. तेच 'गायत्री' नावाबाबत. गायत्री हा मंत्र आहे आणि तेही सूर्याचेच नाव आहे. तरीही हे नाव मुलीचेच असते. काही पुस्तकांत तर गायत्री ही देवी/माता मानून स्त्री आकृती रेखाटलेली असते. ते पाहून गंमत वाटते.

काही नावे अपभ्रंशातून नवीच रुढ होतात. उदा : अहिल्या. येथे अहिल्या नसून अहल्या हा बरोबर शब्द आहे, पण आता 'अहिल्या' हेच लोकांच्या तोंडी रुळले आहे. 'अनुसया' हे दुसरे नाव. ते वास्तवात 'अनसूया' (जिला असूया नाही ती) असे आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री 'येडीयुरप्पा' यांचे नाव वाचून मजा वाटते, पण थोडा विचार केला तर हे मूळ नाव 'यदुवीरप्पा' असल्याचे लक्षात येते.

नावात काय आहे, असे विचारतानाही नावांच्या बर्‍याच गंमतीजमती आहेत. 'अनिकेत' हे नाव अनेकजण मुलाला ठेवतात, पण त्याचा खरा अर्थ 'ज्याला घर नाही असा तो' होतो. आता आपल्याच मुलाला जन्मापासून आपण बेघर करावे का? पण हौस दांडगी. मला 'शेफाली' या नावाचा अर्थ अद्याप ठाऊक नाही. हे मुलीचे नाव का ठेवत असावेत?

लेखनविषय: दुवे:

Comments

शेफाली

मला 'शेफाली' या नावाचा अर्थ अद्याप ठाऊक नाही. हे मुलीचे नाव का ठेवत असावेत?

शेफाली म्हणजे बहुधा पारिजातक (किंवा दुसरे कुठलेतरी पांढरे, लहान फूल असेल. जसे, जाई. मला आता पटकन आठवत नाही पण सुवासिक पांढरे फूल) शेफाली हे पार्वतीचे नाव आहे असेही ऐकले आहे. तरी मला हे नाव आवडत नाही. शेफा(र)ली असे वाटते पण असो.

अनिकेत हे नाव बहुधा ज्याला स्वतःचे घर नाही पण विश्वच ज्याचे घर अशा अर्थी देवासाठी (बहुधा कृष्ण किंवा विष्णू??) वापरले जाते. अनिकेत हे नाव मला आवडते. शेवटी नाव हे फक्त संबोधन आहे.

शीतल आणि रश्मी ही नावेही लिंगनिरपेक्ष आहेत.

शेफारलेली

'शेफाली' नांवाच्या मुलींना लहानपणी माझ्या माहितीप्रमाणे 'शेफारलेली' असेच चिडवले जायचे.

'शीतल' हे माझं पाळण्यातलं नांव! आठवीपर्यंत तेच होतं, पण शाळेतील मुले चिडवायला लागली तेंव्हा मीच वडिलांकडे माझ्या नांवा वीशयी तक्रार केली. त्यानंतर माझं नांव बदलण्याचे ठरले. माझे नांव काय ठेवायचे? असा पर्याय मला मिळाल्यावर मला आमच्या चाळीतील एका नव्या बालकाचे नांव आवडले होते तेच ठेवायला सांगितले ते म्हणजे - 'सतीश'.

नाव आणि अर्थ

होय योगप्रभु ~ तुम्ही दिलेल्या उदाहरणातील सर्वात फसवे कुठले असेल तर ते आहे 'किरण'. कांचनही तसेच असल्यामुळे की काय देवलांनी 'शारदे'त त्या नावापुढे भटाचे संबोधन जोडले असावे. सविता आणि गायत्री यांचे तुम्ही सांगितलेले अर्थ माहीत आहेत पण कदाचित एकारान्त् आणि इकारान्ताच्या उपस्थितीमुळे ही नावे 'स्त्रीवर्गीय' झाली आणि मग सवयीने ती आपल्यालाही खटकेनाशी झाली आहेत हेच खरे.

'अनिकेत' बद्दल सहमत. खरे तर त्याचा रोखठोक अर्थ आहे 'भटक्या'. [निकेतन म्हणजे निवास असे मानले तर 'अ' च्या नकारघंटेमुळे त्या नावाचा थेट अर्थ 'घर नसलेलाच' असा होतो. माधव आचवलांनी जी.ए.कुलकर्णींविषयी लिहिताना 'पण या अनिकेताला ते मंजूर नसावे....' अशा अर्थाचे एक वाक्य 'जास्वंद' मध्ये लिहिल्याचे अस्पष्ट स्मरते. तसा जीएंचा उल्लेख नेमका कोणत्या संदर्भात केला आहे ते पाहावे लागेल.]

या 'अ' मुळेही मी कित्येकदा 'अनीता' या नावानेही गोंधळतो. 'नीता' 'सुनीता' वनीता' 'परिणीता' ही नावे ऐकायलाही ठीक आणि अर्थबोधही होतोच पण मग 'अनीता' कशासाठी ? लिखाणात आपण नेहमीच वाचतो की 'अमुक एका नेत्याने अनीतीने धनदौलत गोळा केली आहे'. इथे 'अनीती' समजते. पण आपल्याकडील घरांत 'अनीता' नेही चांगलेच बस्तान बसविल्याचे शालेय दप्तरांवरून दिसते.

(शेफाली = सुगंध, शेफालिका = एक फुल, जे निळीच्या पिकासोबत लावले जाते [कारण माहीत नाही]. या फुलाला बहुतेक 'निर्गुंडी' असेही नाव आहे.

[अवांतर : वर श्री.निनाद यानी दिलेल्या 'दलजीत' संदर्भात शिखांच्या नावांची चर्चा झाली आहे. आत्ताच आकाशवाणीवर "पंतप्रधान मनमोहन सिंग यानी दिल्ली हायकोर्ट बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांची इस्पितळात भेट घेतली" अशी बातमी सांगितली गेली. पुढे निवेदक म्हणाले 'त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी गुरुशरण होत्या'. एरव्ही 'गुरुशरण' हे नाव ऐकले असते तर आपल्या मराठी मनाला ते चटकन पुरुषाचेच असल्याते प्रतीत झाले असते. इथे तसा गोंधळ होऊ नये म्हणून बातमीपत्र तयार करणार्‍याने 'कौर' असा त्या नावाबाबत उल्लेख करणे अत्यंत गरजेचे होते. पण शेवटी आकाशवाणी ~ 'व्हू केअर्स्"?

अवांतर

>>या 'अ' मुळेही मी कित्येकदा 'अनीता' या नावानेही गोंधळतो. 'नीता' 'सुनीता' वनीता' 'परिणीता' ही नावे ऐकायलाही ठीक आणि अर्थबोधही होतोच पण मग 'अनीता' कशासाठी ?
अनिता हे नाव भारतीय (संस्कृत अर्थ = अशी स्त्री जी स्वतःहून (इतर कोणी न नेता) पुढे गेलेली आहे), युरोपियन आणि हिब्रू अनेक अश्या भाषांत असावे असे वाटते. तसेच वनिता (Juanita) हे ही नाव स्पॅनिश आहे.

अतिअवांतर

वनिता (Juanita) हे ही नाव स्पॅनिश आहे.

+१. अमेरिकेत उच्चार वॉनिटा!

अतिअवांतरः माझ्या एका प्रोजेक्टवर काम करणार्‍या डेवलपरचे नाव सू नील होते. मला प्रथमतः कोणी भारतीय पुरुष असेल असे वाटले. प्रत्यक्ष भेटीत ती Sue Neal निघाली. ;-)

अतिअतिअवांतर

रोचक!

जे पासून व

ही नवीनच माहिती मिळाली. विशेषत 'वनिता' चा उगम स्पॅनिश असेल असे कधीच वाटले नसते. धन्यवाद.

'J' चे रुपांतर 'व' मध्ये यात नवल नाही. कारण खुद्द आपल्याच देशात 'ज्ञ' ला 'ग' का आणि कशासाठी केले गेले हेही अनाकलनीयच आहे. माझ्या परिचयातील एका गृहस्थाच्या मुलीने दिल्लीतील एका उत्तर-भारतीय युवकाशी विवाह केला. लग्नापूर्वीची ही 'प्रज्ञा सबनीस' दिल्लीत गेल्यावर मात्र चक्क 'प्रग्या दिक्षित' बनली. हा तेथील वातावरणाचा आणि उच्चाराचा परिणाम असावा. अर्थात आम्हालाही 'ज्ञानी झैलसिंग' हे 'ग्यानी' नावानेच ओळखले जात होते हे माहीत असल्याने काही विशेष वाटले नाही, पण सबनीस कुटुंबातील स्त्रियांना मात्र 'प्रग्या' पसंत पडले नाही.

[अतिअवांतराबद्दल श्री.निनाद यानी राग मानू नये ही विनंती.]

य ला ज आणि ज ला ह

याचप्रमाणे शीखांमध्ये आणि उत्तर भारतीयांत "य" ला "ज" म्हटले जाते. जसप्रीत, जसराज ही नावे यशप्रीत, यशराज अशी असावीत. युगोस्लावियाला जुगोस्लाविया म्हटल्याचेही वाचले आहे.

स्पॅनिशमध्ये "ज" चा उच्चार "ह" असा होतो. माझ्या मुलीच्या एका स्पॅनिश वर्ग मित्राचे नाव होरहे (जॉर्ज) आहे. भारतातील जाहीरातींत जोजोबा या वनस्पतीचे गुणगाण फार गायले जाते पण त्याचा मूळ उच्चार होहोबा आहे.

अवांतर: फहिता

स्पॅनिशमध्ये "ज" चा उच्चार "ह" असा होतो

फहिता चा उच्चार 'फजिता' करून एका (सुंदर) मेक्सिकन वेट्रेसपुढे स्वतःची फजिता-- आपलं फजिती केल्याचे आठवले :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

नो आब्लो इस्पान्योल

हेहेहे! सोबत टॉर्टिला चिप्स नाही का मिळाले?

फजितीवर ती हसली असती तर तुम्ही तिला "No hablo español" अधोरेखिताचा उच्चार ह असा न करता हल्का ह् आणि अ सदृश करायचा. ल्-)

फजिती

टॉर्टिला चिप्स नाही का मिळाले?

आणि 'फजिता' मधे 'पोलो' घातले होते का :)

मस्त

फाहिता-फजिता वाचून हहपुवा!!

प्रग्या

"पण सबनीस कुटुंबातील स्त्रियांना मात्र 'प्रग्या' पसंत पडले नाही."
याउलट माझ्या माहितीतील एका मराठी जोडप्याने त्यांच्या मुलीचे नाव प्रग्या ठेवले आहे. आम्ही त्यांना विचारले की 'प्रज्ञा' ना ?
ते म्हणाले, "नाही, प्रग्या" !

[अतिअवांतराबद्दल श्री.निनाद यानी राग मानू नये ही विनंती.]

असेच!

आपका कर्लसवर एक मराठी कुटुंबावर आधारित हिंदी सिरिअल येत असे. त्यात फोडणीसाठी वारंवार मराठी संवाद असत पण घरातील सुनेला सर्व ज्येष्ठ-कनिष्ठ मराठी कलाकार हटकून "प्रग्या" म्हणत. (अर्थात, सिरिअलचा डायरेक्टर वगैरे कोण होता ते मी लक्षात घेतलेले नाही.)

यज्ञा

माझ्या एका विद्यार्थिनीचे नाव यज्ञा आहे. ती बंगाली कुटुंबातली आहे, पण जन्म आणि शाळाशिक्षण वगैरे दिल्लीत झाले. बंगाली लोकांत तिच्या नावाचा उच्चार "जोग्गा" असा होतो (बंगालीमध्ये बहुतेक जोडाक्षरांचे पहिलेच अक्षर उच्चरले जाते). दिल्लीत तिला सगळे "यग्या" म्हणत. का कुणास ठाउक शाळेत तिचे रोमन अक्षरातले स्पेलिंग "यग्ना" लिहीले गेले. ती महाराष्ट्रात कामाकरता नेहमी जात असते, तेव्हा तिला सगळे "यज्ञा" (द्न्य चा उच्चार) म्हणतात.

मी प्रथम तिला नावाच्या उच्चाराबाबत विचारले तेव्हा तिच्या चेहर्‍यावर "पुन्हा तेच...." असा भाव उमटला!

चोप्रा

"यज्ञ" "यग्गा" वरून आठवले ते दिग्दर्शक यश चोप्रा. ही 'चोप्रा' मंडळी इंग्रजी टायटल्समध्ये आपल्या आडनावाचे स्पेलिंग 'Chopra' असे न चुकता करतात पण देवनागरीमध्ये लिहिण्याचा प्रसंग आला की मग चोप्रा चे चक्क 'चोपडा' असे होते. 'आर' चे 'ड' मधील रुपांतराचे प्रयोजन समजत नाही.

'यग्ना' प्रमाणेच 'जिज्ञासा' चाही हिंदीत 'जिग्यासा' असाच उच्चार केला जातो.

र, ड, ड़

चोपडा ह्याचे हिंदीत बरोबर स्पेलिंग चोपड़ा असायला हवे.
मराठीत आणि ड़ यात आपण फरक करत नाही, पण हिंदीत याचे स्वतंत्र उच्चार आहेत. इंग्रजीत ही नावे लिहायला सुरुवात झाली तेव्हा दोन्ही अक्षरांच्या उच्चारात फरक करण्यासाठी ड़ चा r अक्षर वापरण्यात आले. उ. पटपड़गंज - patparganj.

तसेच ढ़ च्या बाबतीतही आहे. उ. वाचन = पढ़ना. साध्या पेक्षा उच्चार भिन्न आहे. रोमन अक्षरात rh असे लिहिले जाते. काही नामवाचक शब्द ऐतिहासिक दृष्ट्या या उच्चाराचे/स्पेलिंगचे झाले आहेत, पण हिंदी व्याकरणात आणि ड़ शब्दात कधी वापरावेत याबद्दल नियमही आहेत असे वाचल्याचे स्मरते (अनुनासिक/चंद्रबिंदू असला तर एक, नसला तर दुसरा, असे काहीतरी, पुन्हा शोध लावायला हवा)

बंगालीतही ड़ आणि ढ़ आहेत - ड़ अक्षर वापरणारे शब्द जास्त आहेत (उ. पाड़ा = मोहल्ला, रोमन लिपीत नेहमी पी-ए-आर-ए, अथवा पी-ए-आर-एच्-ए लिहीला जातो, कॉड़ा - कडक, आड़ाले - आडोशात)

र, ड इ.

आपण चोप्रा,बिर्ला, अरोरा म्हणत असलो तरी ती नावे खरी चोपडा,बिडला,अरोडा(सर्व नुक्तायुक्त) अशी आहेत.पुरी सुद्धा पूडी असते. देवगढ(बिहार),पचमढी,मढी(पाकिस्तान),उडी(कश्मीर-पाकव्याप्त?) या सर्वांच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये आर् एच् असतो. मढीच्या बाबतीत मात्र डबल् आर् आहे.
आपले टाटा हे गुजरातीत ताता आहेत आणि त्याचा अर्थ वडीलधारा म्हणजे संस्कृत तात सारखा आहे.
आपले गोयंका हे हिंदीत गोइन्का आहे.

टाटा

अतिअवांतर : टाटा वरुन आठवले, निरोप घेण्यासाठी 'टाटा' हा शब्द इंग्रजीत कसा आला ह्याचे कुतुहल वाटते. भारतात सर्रास वापरात असलेला हा शब्द भारता बाहेर कुठेही ऐकलेला नाही. अमेरिकन लोकांना माहितही नाही. इंग्लडात कितपत वापरतात कल्पना नाही.

मला वाटतं वापरतात

मला वाटतं अमेरिकेत आणि इंग्लंडमध्येही "टाटा" हा शब्द वापरतात पण तो रोजच्या व्यवहारात वापरत नाहीत पण उगीच एखाद्या वेळी फॅन्सी शब्द म्हणून वापरला जातो. बहुधा टाटा हे बाळांचे बोबडे बोल असावे म्हणून मोठ्यांच्या व्यवहारात वापरले जात नसावे.

मी भुर्र जाते असे आपण तरी कुठे म्हणतो. ;-)

ऋता-रीटा

बंगाली स्त्रियांत आढळणारे एक सर्वसामान्य नाव म्हणजे ऋता. पण इंग्रजी स्पेलिंग Rita, म्हणून रीटा झाले. तोच प्रकार ऋचा आणि रिचाचा.---वाचक्नवी

अनीता आणि वनिता

मला वाटते अनीता म्हणजे स्वतःहून पुढे गेलेली असे नसून 'जी कोणाकडूनही(पक्षी: वराकडून) नेली गेलेली नाही अशी' म्हणजे थोडक्यात 'लग्न न झालेली मुलगी' असे असावे. पूर्वी नवरीला खांद्यांवरून किंवा पालखीतून नेत असत. अनीता हे 'नी'नयति' ह्या धातूचे कर्म.भू.धा.वि. स्त्रीलिंगी रूप आहे. त्याचप्रमाणे नीता=नेलेली, सुनीता==चांगल्याप्रकारे नेलेली,परिणीता= परिणय झालेली=लग्न झालेली(गुजरातीत 'परणेली').
'वनिता'शी ध्वनिसाधर्म्य असलेले नाव स्पॅनिशमध्ये असले तरी संस्कृतमध्ये 'वनिता' म्हणजे स्त्री.इथे 'नी' धातूचा संबंध नाही. शाळेत असताना एक सुभाषित ऐकले होते, त्यात लता आणि वनिता यातील साम्य दाखवले होते.त्याचा साधारण अर्थ असा होता की लता आणि वनिता या एका बाबतीत समान आहेत.त्यांना जो आधार द्यायला जाईल,त्यालाच त्या घट्ट पकडून/जखडून ठेवतात!

"गायत्री"बाबत

"गायत्री"बाबत : हा शब्द (संस्कृतात) स्त्रीलिंगी आहे, "गायत्र" या पुंल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. स्त्रीप्रत्यय लावल्यानंतर हा पुंल्लिंगी शब्द म्हणून प्रचलित नाही. गायत्री एका छंदाचे नाव आहे. त्या छंदात बांधलेल्या एका प्रसिद्ध ऋचेला "गायत्रीमंत्र" म्हणतात. (ती प्रसिद्ध ऋचा सवितृ=सविता [प्रथमा एकवचन] देवाच्या प्रशंसेत आहे, म्हणून त्या मंत्राला "सावित्री"मंत्रही म्हणतात. "सावित्री" हा शब्द सुद्धा स्त्रीलिंगीच वापरतात.)

अमरकोश लिहिला तेव्हा तरी "गायत्री" हे सूर्याचे नाव म्हणून प्रसिद्ध नव्हते (कमीतकमी कोशकाराला ते ठाऊक नव्हते). मोनिएर विल्यम्सने सुद्धा या नावाचा "सूर्य" असा पर्यायी अर्थ दिलेला नाही.

गायत्रीला स्त्रीरूप देवी मानण्याची प्रथा जुनी आहे. बहुधा पुराणकालीन आहे. ब्रह्मदेवाची यज्ञकर्मात बायको, देवांनी कुठल्यातरी कामासाठी पृथ्वीवर धाडलेली कार्यकर्ती, वगैरे गमतीदार कथा आहेत, त्या प्राचीनच असाव्यात.

(गायत्रिन् [संस्कृतात प्रथमा एकवचन "गायत्री"] हा पुंल्लिंगी शब्द आहे, याचे पर्यायी अर्थ (१) वैदिक मंत्र गाणारा, किंवा (२) खैरासारखे कुठलेसे झाड.)

अगदी बरोबर आहे... धनंजयजी

(गायत्रिन् [संस्कृतात प्रथमा एकवचन "गायत्री"] हा पुंल्लिंगी शब्द आहे, याचे पर्यायी अर्थ (१) वैदिक मंत्र गाणारा, किंवा (२) खैरासारखे कुठलेसे झाड.)

... गायत्री म्हणजे 'गायत्री मंत्र' आणि मंत्र हा 'तो' असल्याने पुल्लिंगी. जुना संदर्भ द्यायचा तर एक सुभाषित नमूद करता येईल. (अर्थात त्याचा कालावधी मला माहीत नाही त्यामुळे अमरकोशापेक्षा जुने किंवा गायत्री = सूर्य असे म्हणत नाही, पण मी तर्काने धागा असा जुळवला की )

नान्नोदकंसमं दानं न तिथिर्द्वादशीसमा
न गायत्र्या: परो मंत्रोर्नमातुर्दैवतं परं

(अन्न व पाणी देण्यासारखे दुसरे दान नाही. द्वादशीसारखी तिथी नाही. गायत्री मंत्रापेक्षा श्रेष्ठ मंत्र दुसरा कोणताही नाही आणि आईपेक्षा श्रेष्ठ दैवत कोणतेही नाही.)

आता असा हा गायत्री मंत्र काय म्हणतो?
ओम् भुर्भूव स्वा:, ओम् तत्सवितुर्वरेण्यं, भर्गो देवस्य धीमहि, धियो यो नः प्रचोदयात्

(सूर्याचे (सवितृ) जे श्रेष्ठ तेज, त्याचे आम्ही ध्यान करतो. आमच्या बुद्धीला ते प्रेरणा देत राहो.)

म्हणून गायत्री मंत्र = सूर्याच्या ध्यानाचा मंत्र यावरुन गायत्री =सूर्य असा समज झाला.
अर्थात आपण योग्य तो भेद करुन दाखवला आहातच.

गायत्र्या: परो...

'गायत्र्या:' हे रूप संस्कृतमध्ये कोणत्या शब्दाचे असावे बरे? ते 'गायत्री' या स्त्रीलिंगी शब्दाचे पंचमी एकवचन असावे का?

होय पञ्चमी/षष्ठी एकवचन

'गायत्र्या:' हे रूप संस्कृतमध्ये 'गायत्री' या स्त्रीलिंगी शब्दाचे पंचमी तसेच षष्ठी विभक्तीतले एकवचन आहे.

गायत्री

वरील श्लोकात गायत्री हा स्त्रीलिंगी वापरला आहे हे अधोरेखित व्हावे हा हेतू विभक्ती विचारण्यामागे होता, तो आपल्या दुजोर्‍यामुळे साध्य झाला आहे.

सुहास

कमल, किरण, बकुल, कांचन अशी गोंधळात पाडणारी काही नावे

सुहास हे असेच नाव.

बाकी दलजीतताईंचा आदर वाटतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कौर आणि सिंग

"(पतीनिधनानंतरही कौर लावण्यास हरकत नसावी असा माझा समज आहे)"

~ "लोक चालिरीती" विषयाचे वाचन आणि अभ्यास असलेल्या एका परिचिताबरोबर या संदर्भातील चर्चा आठवते. पंजाबमध्ये गुरू गोविंद सिंग यांच्या शिकवणीवरून पंजाबी मुलाला 'सिंग' आणि मुलीला 'कौर' संबोधण्यास सुरुवात झाली जी आजतागायत कायम आहे. 'कौर' चा सर्वसाधारण अर्थ 'राजकुमारी' असा तिथे घेतला जातो. शिखधर्मीयातील नावातील साम्यामुळे परक्याला चटकन 'जेन्डर डिटेक्शन' होत नाही, कारण जवळपास सर्वच नावे दोन्ही प्रकृतीसाठी वापरण्याचा प्रघात आहे. उदा. 'जसप्रीत, मनप्रीत, कुलजीत, हरजीत, मनजीत, सुरजीत....तसेच वर श्री.निनाद यानी लिहिलेल्या घटनेतील दलजीत' इ. इ. ~ त्यामुळेही मग 'मेल' साठी 'सिंग' आणि 'फीमेल' साठी 'कौर' अस्तित्वात आले. मी तर त्या परिचिताकडे एक लग्नपत्रिका [रिसेप्शन म्हणू या] पाहिली आहे, ज्यात वराचे नावही 'जसप्रीत' आणि वधूचेही 'जसप्रीत'. फक्त ओळखीसाठी फरक "सिंग" आणि "कौर".

[मला वाटते हल्लीहल्ली आपल्याकडील काही नावामुळेही चटकन सेक्सचा बोध होत नाही. उदा. 'स्नेहल, नेहल, शशी, ज्योती'.]

सिंग आणि कौर

आपण जरी 'सिंग' असे लिहीत आणि उच्चारीत असलो तरी मुळात ते 'सिंह' असे आहे. हिंदीमध्ये 'मनमोहन सिंह,विश्वनाथ प्रताप सिंह,मुलायम सिंह असेच लिहिले जाते. आपण 'सिंह' शब्द उच्चारताना तो 'सिम्व्ह' असा उच्चारतो तर उत्तरेकडे तो'सिन्(ङ्)ह' असा उच्चारला जातो म्हणून इग्लिश् स्पेलिंग् ही एस् आय् एन् जी एच् असे करतात. (आता शेवटचा एच् गेला आहे.) काही लोक त्याचे स्पेलिंग् एस् आय् एन् एच् ए असे करतात व आपण त्याचा उच्चार सिन्हा असा करतो.उदा. यशवंत सिन्हा, माला सिन्हा इ. तसेच कौर हा शब्द 'कुमारी-कुंवारी-कुंवर-कौर असा आला आहे. अर्थात 'कुमार' या शब्दाचेही रूपांतर 'कुंवर' असेच झाले आहे.
ता.क. - कोरफड किंवा काटेकुवर या वनस्पतीपासून कुमारी आसव बनत असे/बनते.
आणखी ता.क.-सिंगपोर हे सिंहपुर या शब्दावरून पडलेले नाव आहे.

मनमोहन सिंग/सिंह

"आपण जरी 'सिंग' असे लिहीत आणि उच्चारीत असलो तरी मुळात ते 'सिंह' असे आहे."

मान्य.
मात्र श्री. मनमोहन सिंह हे आर.बी.आय. चे गव्हर्नर होते त्यावेळी चलनात असलेल्या नोटांवर त्यांची एका बाजूला देवनागरीतील सही 'मनमोहन सिंह' अशी असायची मात्र त्याचवेळी दुसरीकडे इंग्रजीत 'Manmohan Singh' अशी स्पष्ट दिसणारी सही असे. महाराष्ट्रात स्पेलिंगनुसारच उच्चार करण्याची शिकवण असल्याने कुठलेही शिख नाव हे 'सिंग' असेच उच्चारले जाते.

उत्तर भारत

महाराष्ट्रात स्पेलिंगनुसारच उच्चार करण्याची शिकवण असल्याने कुठलेही शिख नाव हे 'सिंग' असेच उच्चारले जाते.

उत्तर भारतातही (किंबहुना उर्वरित भारत) असेच असावे. उदा. 'सिंग इज किंग' ह्या चित्रपटाचे नाव असेच उच्चारले जायचे.

+१

कौर हा शब्द 'कुमारी-कुंवारी-कुंवर-कौर असा आला आहे.

मी ही हेच ऐकले आहे म्हणूनच विधवा स्रील कौर लावतात की नाहि अशी शंका वर विचारली होती.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सिंग आणि कौर

आपण जरी 'सिंग' असे लिहीत आणि उच्चारीत असलो तरी मुळात ते 'सिंह' असे आहे. हिंदीमध्ये 'मनमोहन सिंह,विश्वनाथ प्रताप सिंह,मुलायम सिंह असेच लिहिले जाते. आपण 'सिंह' शब्द उच्चारताना तो 'सिम्व्ह' असा उच्चारतो तर उत्तरेकडे तो'सिन्(ङ्)ह' असा उच्चारला जातो म्हणून इग्लिश् स्पेलिंग् ही एस् आय् एन् जी एच् असे करतात. (आता शेवटचा एच् गेला आहे.) काही लोक त्याचे स्पेलिंग् एस् आय् एन् एच् ए असे करतात व आपण त्याचा उच्चार सिन्हा असा करतो.उदा. यशवंत सिन्हा, माला सिन्हा इ. तसेच कौर हा शब्द 'कुमारी-कुंवारी-कुंवर-कौर असा आला आहे. अर्थात 'कुमार' या शब्दाचेही रूपांतर 'कुंवर' असेच झाले आहे.
ता.क. - कोरफड किंवा काटेकुवर या वनस्पतीपासून कुमारी आसव बनत असे/बनते.
आणखी ता.क.-सिंगपोर् हे सिंहपुर या शब्दावरून पडलेले नाव आहे.

चकवणारी नावे पूर्वीही होतीच...

This comment has been moved here.

नवीन धाग्याची गरज

संपादक मंडळास विनंती ~

श्री.योगप्रभू यांच्या 'चकवणारी नावे पूर्वीही होतीच...' या प्रतिसादानंतर त्याच अनुषंगाने त्या विषयाची रोचक अशी व्याप्ती वाढत गेल्याचे वरील प्रतिसादावरून सुस्पष्ट होत आहेच. त्यामुळे श्री.निनाद यांच्या मूळ धाग्याच्या प्रयोजनाकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे की काय अशी [रास्त] शंकाही मनी उत्पन्न झाली आहे.

तरी आपण आपल्या संपादकीय अधिकारात 'चकवणारी नावे' या शीर्षकाने वेगळा धागा सुरू करून संबंधित चर्चा नवीन ठिकाणी हलविल्यास ते या विषयावर चर्चा करू इच्छिणार्‍यांना सोयीचे होईल असे वाटते. धागाकर्ते म्हणून श्री.योगप्रभू यानाच श्रेय द्यावे अशीही पुढील विनंती आहे. [त्यांचीही हरकत नसेल अशी आशा आहे.]

स्पेलिंग

"कौर हा शब्द 'कुमारी-कुंवारी-कुंवर-कौर असा आला आहे."

~ हे मी वर मान्य केलेच आहे. खुद्द शिख समाज सर्वच मुलींसाठी 'कौर' वापरतात आणि त्याचा सर्वमान्य अर्थ 'राजकुमारी' असाच आहे. तिथे 'कुमारी' हेच फक्त अभिप्रेत नसल्याने सर्वच स्तरावरील/सर्वत पातळीवरील वयाच्या स्त्रीला सरसकट 'कौर' असेच बोलविले जाते. पंजाबच्या पहिल्यावहिल्या स्त्री मुख्यमंत्री म्हणून राजिन्दर भट्टल यानी सूत्रे हाती घेतली तेव्हा सर्वत्र त्यांचे नाव 'राजिन्दर कौर भट्टल्' असेच प्रकाशित झाले होते.

स्पेलिंगचे वैचित्र्य पाहायचे झाल्यास बंगाली नावे पाहावीत. उदा. एक जुना हिंदी अभिनेता 'विश्वजीत'. देवनागरीमध्ये या नावानेच तो प्रसिद्ध होता, पण पडद्यावर [विशेषतः बंगाली भाषेतील चित्रपट] त्याचे नाव हमखास 'Biswajeet' असेच झळकायचे. 'व' चे 'ब्' तर् 'श' साठी फक्त 'एस'.

अर्थात इंग्रजी नावातही काही कमी विविधता नाही. भरपूर दिसते. 'केट' हे प्रसिद्ध नाव Kate व Cate अशा दोन्ही रितीने तर कॅथरिन Katherine आणि Catherine असेही आढळते. Bjorn Borg या सुप्रसिद्ध टेनिसपटूच्या नावाचा उल्लेख चक्क 'योर्न' असा केला जातो.

बंगाली अक्षर-उच्चार

स्पेलिंगचे वैचित्र्य पाहायचे झाल्यास बंगाली नावे पाहावीत. उदा. एक जुना हिंदी अभिनेता 'विश्वजीत'. देवनागरीमध्ये या नावानेच तो प्रसिद्ध होता, पण पडद्यावर [विशेषतः बंगाली भाषेतील चित्रपट] त्याचे नाव हमखास 'Biswajeet' असेच झळकायचे. 'व' चे 'ब्' तर् 'श' साठी फक्त 'एस'.

बंगालीत हे अक्षर/उच्चार नाही. तीन प्रकारचे अक्षर/उच्चार आहेत. त्यातील एक (दंत स) मराठीतल्या सारखा आहे (सुहास, सुकन्या, सत्यजीत, इ.) दुसरा (तालव्य श) आपला शरदातला (विश्च, शरद, शालिनी, इ), आणि तिसरा (मूर्धन्य ष) षटकोणातला (आषाढ, विशेष).

हे अक्षर/उच्चारही नाही. उच्चाराचे शब्द (विश्वजीत चे बिश्शोजीत) उइ (विलियम चे उइलीयम) या अक्षराने लिहीले व उच्चारले जातात. हेच शब्द एकेकाळी रोमन लिपीत लिहीताना मूळ संस्कृत उच्चाराप्रमाणे लिहीली जात. काही अक्षरांचे ठराविक रोमनीकरण होते - श साठी फक्त s लिहीले जाते. (म्हणूनच Biswajit) पण आजकाल अस्सल बंगाली उच्चाराप्रमाणेच अनेक स्पेलिंग करतात. अर्नव चे ऑर्नोब (Ornob), देवलीना /देबोलीना चे Debolina, इ. हे बंगाली अक्षर/उच्चार रोमन लिपीत V अक्षराने ओळखले जाते. त्यामुळे अमिताभ चे रोमन लिपीत Amitav लिहीले जाते.

दोन अक्षर आहेत. यात एक (वर्गीय ज) मराठीतल्या ज सारखाच आहे. दुसरा (अंतस्थ ज) मराठीतल्या य अक्षराची जागा घेतो. सूर्य - शूर्ज्यो; मौर्य - मौर्ज्यो, इ. आमच्या ग्रॅज्युएट प्रोग्रॅम मध्ये शूर्ज्योप्रोतिम मुखर्जी होता. रोमन लिपीत Surya लिहायचा. त्याला सगळे बिगरबंगाली भारतीय सूर्यप्रतिम् म्हणायचे. फक्त स्पेन च्या दोन मुली बरोबर त्याचे नाव ज उच्चाराने करायच्या!

हे सगळे प्रथमदर्शनी विचित्र वाटते खरे, पण फक्त नियम लक्षात येईपर्यंत...

नियमांची महती

+ सुंदर विवेचन तितकेच ज्ञानवर्धकही. नियमांची महतीही समजली. धन्यवाद रोचना.

आमच्या कॉलनीमध्ये स्थानिक एनसीसी युनिटचे ऑफिसर कमांडिंग असणारे ले.कर्नल पी.बॅनर्जी होते. त्यांच्या दारावर अशाच नावाची देवनागरी पाटी होती [इंग्रजीमध्ये मात्र "बॅनर्जी = Banurjee" असे करत]. पुढे त्यांच्या घरातील लोकांचा परिचय झाल्यावर कळाले की ते पी. म्हणजे 'प्रोतीप'. मराठी मनाला 'प्रताप', 'प्रदीप' यांची माहिती, पण प्रोतीप समजले नाही. नंतर त्यानीच ते 'प्रताप' याच अर्थाने असल्याचा खुलासा केला. एक छोटी गुड्डीसम मुलगी तिथे बागडायची तिला तिची आई 'वितू' असे पुकारायची. ती प्रत्यक्षात वैजयन्ती नव्हे तर 'बैजयंती' निघाली.

डाक-नाम

हो, बोइजोयोंती चे बितू होणे स्वाभाविक आहे. बंगाल्यांमध्ये सहसा दोन नावे ठेवण्याची प्रथा आहे. एक "भालोनाम" (गुड् नेम) - शाळेत लावायचे, बाहेरच्या जगाला माहित असलेले. आणि एक घरचे, हाक मारण्याचे (डाक-नाम). कधी कधी भालोनामावरूनच तयार होते, पण अनेकदा स्वतंत्र दिलेले असते. मित्रमंडळींमध्येही बहुतेक लोकांचे एक स्वतंत्र डाकनाम असते. भालोनाम संस्कृतोत्पन्न किंवा अरबी/फारसी असते, पण डाकनाम बहुतेक करून अस्सल बंगाली असतात - पिकलू, झुंपा, जोनाकी, झिनुक, ताताय, निताइ, तोपशे, इ. मला ही फार मधुर आणि सुंदर वाटतात. भालोनामाबद्दल बारशाच्या वेळाला चर्चा होते, तेवढीच डाकनामाबद्दलही होते - आधी डाकनामच ठेवले जात, आणि ४-५ वर्षाच्या आसपास भालोनाम. पण आता दोन्ही एकाच वेळी जन्मानंतर दिली जातात. माझ्या मुलाचे डाकनाम आम्ही लगेच निश्चित केले नाही म्हणून घरची बरीच मंडळी नाराज झाली होती, मग शेवटी एक ठरल्यावर सगळ्यांना हायसे वाटले!

टुटुल

व्वा ! "बोइजोयोंती" हे तर वैजयन्ती आणि बैजयन्तीपेक्षाही सुमधुर वाटते. ऐकण्यास आणि लिहिण्यासही.

"भालोनाम" वरून आठवले ते "भीषण भालो". मराठी शिकवणीप्रमाणे 'भीषण' म्हणजे अक्राळविक्राळ; पण तिकडे बंगालीत मात्र 'अतिसुंदर'. इकडे कुणी आपल्या मुलाचे नाव 'अघोर' ठेवीत असेल वाटत नाही, पण अघोर हे शीवाचे रूप असल्याने बंगालमध्ये हेही नाव फार प्रचलित असल्याचे आढळेल.

झुंपा, खोका आणि झिनुक [आणखीन काही....'मिश्टी' हे एक] ही डाकनामे कानावर पडली आहेत. त्यातही मला 'टुटुल' हे नाव फार गोड वाटते. सत्यजीत रे यांच्या 'महानगर' चित्रपटात माधवी [माधबी] मुखर्जीचे हे 'डाकनाम' असते. [चू.भू.द्या.घ्या.]

प्रतीप

प्रतीप हे संस्कृत नाव आहे. रघूंच्या वंशात एक राजा प्रतीप नावाचा होता.

भाषांतील उच्चारवैशिष्ट्ये/उच्चारांचा लिपीशी संबंध, वगैरे

भाषांतील उच्चारवैशिष्ट्ये/उच्चारांचा लिपीशी संबंध वेगवेगळा असतो. त्याबाबत अन्यभाषिक लोकांबाबत "काय हा विचित्रपणा" असे म्हणणे कित्येकदा अनाठायी असू शकते.

"ज्ञ"बाबत
"ज्ञ" घटक असलेले बहुतेक शब्द संस्कृतातील ज्+न् = ज्+ञ् = (लिपिचिन्ह) "ज्ञ", संस्कृत धातू ज्ञा/जानाति, अर्थवलय "जाणणे" यांच्यापासून आलेले आहेत. संस्कृतात त्या शब्दांत "ज्" आणि "ञ्" हे स्पष्टपणे ऐकू येत, असे संस्कृतातील व्याकरणकारांची नोंद आपल्यापाशी आहे.

मराठीत या व्युत्पत्तीच्या शब्दांमध्ये आपल्या प्रादेशिक प्राकृत परंपरेतून "द्" उच्चार कधीतरी उद्भवला आणि तो चिकटलाच. म्हणून द्+न्+य असा उच्चार मराठीमध्ये शिष्टसंमत आहे. मराठी बोलताना "ज्+ञ" उच्चार केला, तर ती व्यक्ती मराठीमधील प्रतिष्ठित समाजात वावरलेली नाही, अशी श्रोत्यांची धारणा होते. त्या उच्चारात "द्" येणे म्हणजे मराठी लोकांचे हास्यास्पद वैचित्र्य आहे, असे म्हणण्यात काहीच हशील नाही.

एकुणातच प्राकृतांत "ज्ञ" हा जोडध्वनी मानवला नाही. पण प्रत्येक प्राकृताने आपलेच काही वैशिष्ट्य जपले. शतकानुशतके प्राकृतांना संस्कृतातलेच ते शुद्ध असे मानण्याची दबेल प्रवृत्ती होती. त्यातही पाली-अर्धमागधी ही श्रीमंत-अभिजन-सुशिक्षित-भिक्षुकांची प्राकृते होती, त्यातील लेखकांना स्वतंत्र स्वत्व अधिक जाणवे. म्हणून पालीमध्ये "ज्ञ"ऐवजी थेट उच्चारानुसारी "ञ्ञ" (उदा : विञ्ञानं) लिहितात.

मराठीमधील प्राकृत परंपरेने द्-न्-य, गुजरातीमध्ये ग्-न, हिंदी-बंगालीमध्ये ग्-यँ किंवा ग्-य, हे आलेले आहेत त्यात त्या-त्या भाषेचे वैशिष्ट्य आणि प्रादिशिक प्राकृतांची परंपरा आहे.

लिपीचा ध्वनीशी परस्परसंबंध हा औपचारिक (कन्वेन्शन-डिफाइन्ड) आहे, स्वाभाविक नव्हे. त्यामुळे "ज्ञ" चिन्हाचा काय उच्चार व्हावा, त्याबाबत भारतातील वेगवेगळ्या भाषांतचे औपचारिक संबंध वेगवेगळे आहे. त्यात कुठलेही हास्यास्पद वैचित्र्य नाही.

अन्य लिपिवैशिष्ट्ये
आता वरील धाग्याच्या प्रतिसादकर्त्यांपैकी काही नावे अशी आहेत, की त्यांच्या देवनागरीत लिहिलेल्या नावांचा मराठीमध्ये उच्चार संस्कृतात करतात त्यापेक्षा वेगळा होतो, पण लेखन मात्र संस्कृतासारखेच होते : अशोक (मराठी उच्चार : अशोक्), सतीश (उच्चार : सतीश्), सुनील (उच्चार : सुनील्), धनंजय (उच्चार : धनंजय्), ऋषिकेश (उच्चार : ऋषिकेश्)... मात्र "हे मराठी लोक अशा विचित्र प्रकारे उच्चार तोडून काय बोलतात, हे हास्यास्पद आहे" अशी तक्रार करणेच मुळी हास्यास्पद आहे. मराठीत अंत्य चिन्हांचे पाय मोडले नाहीत तरी स्वराविना उच्चार करावा. हा लिखित चिन्हाबाबत औपचारिक संबंध मराठी लेखकांनी ठरवला आहे. संस्कृतात चिन्हांसंबंधात काय उपचार आहे, किंवा उडियामध्ये काय उपचार आहे (या दोन्ही भाषांत शेवटच्या अक्षराचा पाय मोडला नसेल तर 'अ' स्वरासह उच्चारतात), ते मराठीच्या बाबतीत नि:संदर्भ आहे. हा हक्क आपण मराठीभाषक लोक स्वतःकडे घेतो, तर तोच हक्क आपण अन्यभाषकांचाही आहे, हे मान्य केले पाहिजे.

- - -
रोमन लिपी आणि वेगवेगळ्या युरोपीय भाषा
रोमन लिपीबाबत बिगर-इंग्रजी चिन्हसंकेतांबाबत आश्चर्य व्यक्त करणे म्हणजे रोमन लिपीच्या इतिहासाबाबत अंधत्व होय. रोमन लिपी ही २२-२६ चिन्हे असलेली लॅटिन भाषेकरिता उपयुक्त प्राचीन चिन्हावली आहे. पैकी i/I आणि j/J ही एकाच अक्षराची वेगवेगळ्या सुलेखनशैलीतली रूपे आहेत. म्हणजेच साध्या लेखनात iesus असे लिहिता येते, तोच अक्षरांखाली वळणदार फराटा काढणारा लेखनिक jesus अशी चिन्हे लिहू शके. अर्थातच मूळ लॅटिनमध्ये i आणि j यांचा उच्चार इ (शब्दाच्या सुरुवातीला किंवा अन्य स्वराच्या सान्निद्यात "य्") असाच होता. पुढे मध्य जर्मन लेखनिकांनी j हे वळणदार सुलेखनातले चिन्ह "य्" व्यंजनासाठी राखायचे ठरवले, आणि i हे इ-स्वराकरिता राखून ठेवले. रोमान्स भाषांमध्ये "ज्" हे व्यंजन वापरण्यासाठी या नवीन चिन्हाचा वापर होऊ लागला, आणि फ्रेंचांकडून ही प्रथा इंग्रजांनी उधार घेतली. स्पॅनिश भाषाप्रदेशात "ज्"व्यंजनाच्या थिकाणी "ह्/ख़" व्यंजन प्रचारात आले, तर व्युत्पत्तिजन्य साम्य ठेवणार्‍या शब्दांसाठी "ह्" उच्चारासाठी j हे चिन्ह राखण्यात आले.
हा सर्व भाषांमध्ये चिन्ह आणि ध्वनी यांतील औपचारिक संबंध इतिहासानुसार वेगवेगळे आहेत. त्या मानाने नवीन इंग्रजी भाषेतल्यासारखे उच्चार युरोपियन भाषांत नाहीत हे इंग्रजीच्या नाविन्यामुळे आहे, त्या भाषांतील लेखनिकांच्या मठ्ठपणामुळे नव्हे.

मुख्य म्हणजे कित्येक भाषांमध्ये उपलब्ध वर्णांच्या (फोनीमांच्या) संख्येकरिता रोमन लिपीत उपलब्ध असलेली २२-२६ चिन्हे पुरेशी नाहीत. अगदी इंग्रजीकरितासुद्धा नाहीत. त्यामुळे कित्येक ध्वनींच्या उच्चाराकरिता जोड-चिन्हांचे संकेत उपचारानेच बनवलेले आहेत. इंग्रजीतच ch म्हणजे क्ह् नसून च् उच्चारण्यासाठी आहे; sh म्हणजे स्ह् नसून श् उच्चारण्यासाठी आहे, ate म्हणजे आटे नसून एट् उच्चारण्याकरिता आहे, वगैरे.

रोमन लिपी आणि वेगवेगळ्या भारतीय भाषा
तीच २६ चिन्हे भारतीय भाषांसाठी वापरण्यास घेतली, तर त्या-त्या भाषेतले लोक स्वतःच्या सोयीसाठी ध्वनी-चिन्ह संबंध बनवतील, नाही तर काय? मराठी लोक त् आणि ट् दोहोंकरिता "t" वापरतात; द् आणि ड् दोहोंकरिता "d" वापरतात. मराठीत थ्, ठ् यांच्याकरिता th हे जोडचिन्ह निवडले आहे, आणि ध्, ढ् यांच्याकरिता dh हे जोडचिन्ह निवडलेले आहे, ते बघून इंग्रज देशांतील इंग्रजीभाषकांना काहीही उच्चार कळून येत नाही. तरी मराठीभाषकांनी ती जोडचिन्हे स्वतःच्या सोयीसाठी निवडलेली आहेत. तमिळभाषकांना थ्, ठ्, ध्, ढ् हे ध्वनी वापरायचेच नसतात. त्यांनी ट् आणि त् यांच्या भेद करण्यासाठी t आणि th वेगळे करायचे ठरवले, तसेच ड् आणि द् वेगळे करण्याकरिता d आणि dh वेगळे करायचे ठरवले. याबाबत मराठीभाषक तमिळभाषकांना वेड्यात काढत असतील, तर तेच तमिळभाषक त्/ट् साठी एकच रोमन चिन्ह वापरणार्‍या मराठीभाषकांना वेड्यात का न काढणार? मुळात कोणीच कोणाला वेड्यात काढायला नको, कारण त्या-त्या भाषेतील उच्चारांना सोयीस्कररीत्या २६ रोमन चिन्हांत बसवण्याचे ते स्वतंत्र प्रयत्न आहेत.

- - -
विशेषनामे आणि अप्राणी-नामे यांची व्याकरणातली लिंगे
स्त्री-इंद्रिये आणि पुरुष-इंद्रिये असलेली पिंडे सोडली, तर बाकी सर्व व्याकरण-लिंगभेद हे केवळ औपचारिक आहेत. कमल-सुहास-शिरीष-शरद हे स्त्रीलिंगी की पुंलिंगी की नपुंसकलिंगी हा केवळ रूढीचा उपचार आहे.
वरील उदाहरणांत "शरद"हे खरे तर संस्कृताप्रमाणे स्त्रीचे नाव असायला हवे होते, पण मराठीभाषक पुरुषांमध्ये अधिक आढळते, असे उदाहरण आपल्याला दिसत नाही. कारण परिचयामुळे तो शरद ऋतू असे मराठीत आपल्याला परिचित झालेले आहे, आणि शरद नाव असलेले सुप्रसिद्ध लोक आपल्यला कित्येक दशके माहीत आहेत. त्यामुळे लिंगाबाबत चकवणे आणि चकणे हे केवळ परिचयाचे खेळ आहेत. मूलभूत असे काहीच नाही.

- - -
मराठमोळे, कन्नडिग वगैरे शब्दांचे बळेच संस्कृतीकरण
कर्नाटकामधील मंत्र्याचे नाव यडियुरप्प असे कन्निडिग असेल तर यडियुरप्प असेच ठेवणे ठीक - उगाच कन्नड नावाचे सम्स्कृतीकरण करून यदुवीरप्पा करण्यात काही हशील नाही, आणि ते त्या व्यक्ती आणि भाषेबाबत तुच्छताच दाखवते. उद्या कोणी अन्यभाषक "जिजाबाई"चे काहीतरी संस्कृतीकरण करून तेच वापरू लागेल, तर मराठी माणसाला ते रुचेल काय? किंवा कोणी "बबनराव" या मराठमोळ्या नावाचे संस्कृत रूप "वपनराज/पवनराज" असे काहीतरी असल्याचे सांगून त्या बबनरावाला "पवनराज" म्हणू लागले, तर ते मराठी भाषेविषयी आणि त्या व्यक्तीविषयी तुच्छताच दाखवते.

- - -
विरंगुळ्याला उगाच भारदस्तपणा असणे
वेगवेगळ्या भाषांच्या आणि विशेषनामांच्या वैचित्र्यास हास्यास्पद मानणे हे फक्त विरंगुळ्यासाठीच ठीक आहे. गंमत तर वाततेच. विरंगुळ्याकरिता आपण लांडगा लबाड आणि कासव कामसू असल्याची कल्पना करतो, आणि त्या विनोदांना हसतो, तसेच. प्राण्यांबाबत असल्या विनोदांची जीवशास्त्रीय चर्चा करणे जितपत अनाठायी, तितपतच वेगवेगळ्या भाषांच्या आणि विशेषनामांच्या बाबत असल्या विनोदांची भाषावैज्ञानिक चर्चा करणे अनाठायी आहे.

सहमत

अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल आभार. मी नियम व अक्षरभेदाने जे सांगू पाहत होते ते तुम्ही खूप विस्तृतपणे सांगितले. वैचित्र्य नाही, फक्त विविधता, हे अर्थात पटतेच.

खासकरून -

विशेषनामे आणि अप्राणी-नामे यांची व्याकरणातली लिंगे स्त्री-इंद्रिये आणि पुरुष-इंद्रिये असलेली पिंडे सोडली, तर बाकी सर्व व्याकरण-लिंगभेद हे केवळ औपचारिक आहेत. कमल-सुहास-शिरीष-शरद हे स्त्रीलिंगी की पुंलिंगी की नपुंसकलिंगी हा केवळ रूढीचा उपचार आहे.
वरील उदाहरणांत "शरद"हे खरे तर संस्कृताप्रमाणे स्त्रीचे नाव असायला हवे होते, पण मराठीभाषक पुरुषांमध्ये अधिक आढळते, असे उदाहरण आपल्याला दिसत नाही. कारण परिचयामुळे तो शरद ऋतू असे मराठीत आपल्याला परिचित झालेले आहे, आणि शरद नाव असलेले सुप्रसिद्ध लोक आपल्यला कित्येक दशके माहीत आहेत. त्यामुळे लिंगाबाबत चकवणे आणि चकणे हे केवळ परिचयाचे खेळ आहेत. मूलभूत असे काहीच नाही.

याबाबत आमच्या अखंड बहुभाषिक कुटुंबात नेहमी चर्चा-वाद उठतात. संस्कृतातून आपल्याच भाषेत आलेले नियम व परंपरा कशी बरोबर आणि अस्सल आहे हे दाखविण्याचा अनेकांचा हमखास अट्टाहास असतो. यात "ज्ञ", "क्ष" चे उच्चार आलेच, पण शब्दांचे लिंगभेद ही नेहमी येतात. मराठी आणि बंगाली मधल्या नावांमध्ये हा फरक खूप आढळतो. एकाच शब्दाच्या र्‍हस्व-दीर्घ स्पेलिंग मध्येही. त्यात कोणता मूलभूत आणि कोणता चुकीचा हे ठरवण्यापेक्षा ह्या वेगवेगळ्या रूढी आणि निराळ्या प्रादेशिक प्राकृत परंपरा कशा रूप घेत गेल्या, याचा इतिहास (अर्थात, यालाच एका दृष्टीने संस्कृतच्या प्राकृतिकरणाचा दैनंदिन इतिहास म्हणता येईल) शोधणे अधिक रोचक वाटते.

सहमती

प्रतिसादाला सहमती तर आहेच.
मी पहिल्यांदा माझ्या दाक्षिणात्य मित्रांना भेटलो, तेव्हा संथोष, निथीश, थमीझ ही असली कसली नावे असे मला झालेले! तमिळ भाषकांचे 'द'ला 'dh' लिहिणे विचित्रपणाचे वाटलेले. पण लक्षात आले की असला विचित्रपणा आपणपण खूप करतो. 'च' आणि 'च़' साठी एक 'ch', 'ज' आणि 'ज़' साठी 'j', 'झ़' आणि 'झ(झ्य)' साठी 'z' असले प्रकार आपण करतोच की. दुसरे कोण झेंडेचे स्पेलिंग jhende सोडून zende करेल? ;) याच न्यायाने zende जसे झेंडे (तालव्य) तसे मी आधी zebra तालव्य झे उच्चारत असे. :)

मिहिर कुलकर्णी

पाठिंबा

धनंजय ह्यांच्या प्रतिसादाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. अमुक एक देवनागरी अक्षर हे मुळात कसे उच्चारले जात होते वा त्याचा 'खरा' उच्चार काय ह्या प्रश्नाचे उत्तर आपण सहजत: असे देतो की आमच्या भाषेतला उच्चार तेवढा खरा, बाकीचे सगळे चुकीचे. मग 'षट् शास्त्राणि' असे म्हणण्याऐवजी मिथिलेच्या पंडिताने 'खट् शास्त्राणि' म्हणले की आपण हसतो पण आपल्या 'ष' चा उच्चार मुळात तसाच होता की वेगळा हे सांगण्याचा काहीच पुरावा उरलेला नाही. शक्यता अशीहि आहे की तो कोणत्याच काळात सर्वत्र एक नव्हता आणि 'ष' आणि 'ख' हे दोन्ही उच्चार सारखेच प्राचीन आहेत.

इंग्रजी स्पेलिंगांमुळे आणखीनच गमती निर्माण झाल्या आहेत. भारतीय 'योग' हा अमेरिकेत सर्रास 'योगा' होतो. (I am doing yoga for health!). भारतीय 'राम' इंग्लिशमध्ये Rama होतो आणि रशियनमध्येहि. त्या भाषेत विभक्तिप्रत्यय शेवटच्या अक्षरानुसार लागतात, जसे संस्कृतमध्येहि लागतात. अशा रशियन भाषेतला 'रामा' मग 'सीता' प्रमाणेच स्त्रीलिंगी विभक्तिप्रत्यय घेऊ लागतो.

ब्रिजवासीच्या मिठाया आपण सगळे खातो. हा कोण पुलावर राहणारा ब्रिजवासी? मूळचा व्रजदेश 'वबयोरभेद:' ह्या सवलतीमुळे 'ब्रजदेश होतो. उच्चारसाम्यामुळे त्याचा 'बृजदेश' बनतो. भारतीय शब्दांचे रोमनीकरण्याच्या हंटेरियन पद्धतीनुसार त्याचे रोमनीकरण 'Brijadesha' असे होते. इंग्रजीतूनच ह्या शब्दाची ओळख झालेले लोक मग त्याच देशी उच्चारहि 'ब्रिजदेश' असाच करू लागतात.

अक्षरांचे उच्चार हे स्वयंपाकातल्या तेलाप्रमाणे सवयीचा भाग असतात. महाराष्ट्रातल्या लोकांना शेंगदाण्याच्या गोड्या तेलाची सवय असते आणि ते पंजाब वा बंगालमधल्या मोहरीच्या तेलाला नाके मुरडतात. बंगाली लोकांची गोड्या तेलाबाबत हीच तक्रार असते आणि दोघांनाहि केरळातले नारळाचे तेल म्हणजे बायकोचे केस तोंडात गेल्यासारखे वाटते. सगळा सवयीचा परिणाम.

ब्रिजवासी आणि ब्रिजदेश

'ब्रिज' हा उच्चार हिंदी शब्दाच्या रोमन स्पेलिंगमुळे आलेला नाही.उत्तर भारतात सर्वत्रच जोडाक्षरयुक्त शब्दामध्ये जोडाक्षर सुरुवातीला असेल तर तर ते उच्चारताना 'इ' जोडून सुरुवात करण्याचा कल आहे. जसे, स्त्री-इस्तरी,स्कूल्-इस्कूल्,स्टेशन्-इस्टेशन् वगैरे. त्यामुळे 'व्रज' शब्दाचा उच्चार तिकडे विरज-बिरज असाच होतो. त्यातला वि/बि हलकेच किंवा अर्धाच असतो. उदा. आया विरज का बांका, सम्हाल तेरी गगरी रे. पर्ताप(प्रताप), सूरज(सूर्य),कार्य-मराठी काज हे एकप्रकारचे तद्भवीकरणच आहे.माळवा,राजस्थानात पूर्ण हा शब्द पुण्ण् असा उच्चारतात. र णमध्ये विलीन होतो. तर इतर अनेक शब्दांत ण चा न होतो. तद्भवीकरण होताना ते ठराविक नियमांनुसार झालेले नाही तर वर धनंजय यांनी म्हटल्यानुसार प्रांतीय विशेषतेनुसार, खासियतीनुसार झालेले आहे. गुजरातीमध्ये वृंदावनचे वन्रावण होते-वागे छे रे वागे छे, वनरावण मोरली वागे छे! द्रौपदीचे धुर्पती किंवा दुर्पती आपल्यालाही माहित आहे. इथे दूर पती असे उलटे संस्कृतीकरण विनोदासाठी केले जाऊ शकेल.
य चे ज व उलट होणे तर अगदी सर्वसाधारण(कॉमन्) आहे. योहान्-जॉन्, ईसॉप्-युसुफ्-जो(ज्यो)जेफ्, जीझस्-येशू,यशोदा-जसोदा, यात्रा-जत्रा,जाति-याति,यव-जव,राजा-राया,राजी-राई वगैरे. ज्ञान-ग्नान(गुजराती) ग्यान(हिंदी) द्न्यान(मराठी)तसेच क्नो-नो इंग्लिश.(हे अर्थात् संस्कृतवरून नव्हे तर कुठल्यातरी प्रोटो भाषेवरून.)

इस्किलार

"उत्तर भारतात सर्वत्रच जोडाक्षरयुक्त शब्दामध्ये जोडाक्षर सुरुवातीला असेल तर तर ते उच्चारताना 'इ' जोडून सुरुवात करण्याचा कल आहे."

~ या माहितीवरुन प्रकर्षाने नजरेसमोर आली ती जी.ए.कुलकर्णी यांची 'इस्किलार' ही एक जबरदस्त दीर्घ कथा.

ग्रीकसम वाटू शकणार्‍या एका राज्यातील समुद्रकिनार्‍यावरील टेकडीवर वसलेल्या मंदिरामधील सेविका भविष्य वर्तविताना कथानायकापुढे 'सेरिपी इस्कहार एली' असे पुटपुटते. पुढे या अर्थहीन वाटणार्‍या तीन शब्दांमागील रहस्य शोधण्यासाठी फिरत असताना नायक एका मदिरागृहात येतो त्यावेळी तेथील चर्चेत 'मंदिरातील स्कहार रत्न' असे वर्णन ऐकताच चमकून उद्गारतो, "इस्कहार रत्न ?". यावर आजुबाजूचे सैलपणे हसतात. गटप्रमुख क्रिसस त्याला म्हणतो, "इस्कहार नव्हे - स्कहार. तू पूर्वेकडचा माणूस आहेस की काय ? तिकडच्या माणसांना सुरुवातीला 'स'चे जोडाक्षर असले की आधी 'इ' म्हटल्याखेरीज ते उच्चारताच येत नाही."

राही यांच्या या संदर्भातील उदाहरणातही [स्त्री - स्कूल - स्टेशन] असा 'इ' चा प्रत्यय लावणारी माणसे उत्तर भारतात आहेतच.

इस्कूल

आमच्या वर्गातील उत्तर भारतीय मुले 'हम इस्कूल मे ऐसा करते थे' वगैरे म्हणू लागली की मी कधी कधी चेष्टेने म्हणतो, तुम्ही तर फारच प्रगत! इलेक्ट्रॉनिक स्कूलमध्ये गेलात. आम्ही आपल्या साध्या शाळेत गेलो'. :P
मिहिर कुलकर्णी

मौखिक परंपरा

धनंजय यांचा प्रतिसाद पटला, आवडला वगैरे! उच्चार ते दर्शवणारी चिन्हे आणि लिप्यंतराने होणार्‍या गमती वाचनीय मात्र नक्कीच आहेत.

हा प्रतिसाद वाचुन एक विचार मनात आला तो असा, की भारतीय प्राचीन स्तोस्त्रे, ऋचा, पुजाविधी वगैरे अनेक संस्कृत काव्ये तोंडीच शिकवले - घोकविले गेली (पिढ्यान् पिढ्या ती त्याच लयीत, त्याच उच्चारात म्हटली गेली) या मागे लिपीच्या अभावापेक्षा किंवा लिहिण्याच्या/छापण्याच्या साधनांच्या अभावापेक्षा सर्वत्र त्याचा उच्चार समान व्हावा हे कारण असु शकेल का?
अजूनही तिबेटी संस्कृतीतील बरेचसे मंत्रोच्चार लिखित स्वरूपात उपलब्ध नाहीत, मात्र मौखिक परंपरेने ज्ञानदान-ग्रहण चालु आहे. (विविध तिबेटी संस्कृती जोपासलेल्या देशांत स्वतःची अशी लिपी आहे)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

 
^ वर