चकवणारी नावे

पाटील साहेब,
आपल्याकडेही पूर्वी कमल, किरण, बकुल, कांचन अशी गोंधळात पाडणारी काही नावे होती. रजनी पटेल ही स्त्री नसून पुरुष होते. मराठीतले एक लेखक सविता भावे. त्यांचे नाव खरे पाहता बरोबर आहे. कारण सविता हे सूर्याचे
नाव आहे. प्रातःकाळी पूर्वक्षितिजावर अर्धवट दिसणार्‍या बिंबाला 'सविता' असे म्हणतात, तर माध्यान्ही व सायंकाळी त्याला 'सूर्य' असे म्हणतात. वास्तवात 'तो सविता' असताना आपल्याकडे हे मुलीचे नाव ठेवले जाते. तेच 'गायत्री' नावाबाबत. गायत्री हा मंत्र आहे आणि तेही सूर्याचेच नाव आहे. तरीही हे नाव मुलीचेच असते. काही पुस्तकांत तर गायत्री ही देवी/माता मानून स्त्री आकृती रेखाटलेली असते. ते पाहून गंमत वाटते.

काही नावे अपभ्रंशातून नवीच रुढ होतात. उदा : अहिल्या. येथे अहिल्या नसून अहल्या हा बरोबर शब्द आहे, पण आता 'अहिल्या' हेच लोकांच्या तोंडी रुळले आहे. 'अनुसया' हे दुसरे नाव. ते वास्तवात 'अनसूया' (जिला असूया नाही ती) असे आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री 'येडीयुरप्पा' यांचे नाव वाचून मजा वाटते, पण थोडा विचार केला तर हे मूळ नाव 'यदुवीरप्पा' असल्याचे लक्षात येते.

नावात काय आहे, असे विचारतानाही नावांच्या बर्‍याच गंमतीजमती आहेत. 'अनिकेत' हे नाव अनेकजण मुलाला ठेवतात, पण त्याचा खरा अर्थ 'ज्याला घर नाही असा तो' होतो. आता आपल्याच मुलाला जन्मापासून आपण बेघर करावे का? पण हौस दांडगी. मला 'शेफाली' या नावाचा अर्थ अद्याप ठाऊक नाही. हे मुलीचे नाव का ठेवत असावेत?

लेखनविषय: दुवे:

Comments

ज्ञ

>>भारतीय प्राचीन स्तोस्त्रे, ऋचा, पुजाविधी वगैरे अनेक संस्कृत काव्ये तोंडीच शिकवले - घोकविले गेली (पिढ्यान् पिढ्या ती त्याच लयीत, त्याच उच्चारात म्हटली गेली) या मागे लिपीच्या अभावापेक्षा किंवा लिहिण्याच्या/छापण्याच्या साधनांच्या अभावापेक्षा सर्वत्र त्याचा उच्चार समान व्हावा हे कारण असु शकेल का?

सर्वत्र सारखा उच्चार आहे असे वाटत नाही. ओबामाच्या दिवाळीत मंत्रपठण करणार्‍याचे उच्चार (माझ्या दृष्टिने) भयानक होते.

------
ज्ञ च्या उच्चाराविषयी

मराठीत द्न्य असा उच्चार केला जात असला तरी वारकरी लोक 'ग्यानबा' तुकाराम असा उच्चार करतात. पण पुंडलीक वरदे..... मध्ये मात्र श्री ज्ञानदेव तुकाराम असाच उच्चार करतात. उच्चार (किंवा उच्चाराची चिह्ने) परंपरेनेच ठरतात हे खरे.

अवांतर : मिसळपाववर द् + न् + य किंवा ज् + न दोन्हीपैकी काहीही टंकल्यावर ज्ञ उमटतो. उपक्रमावर मात्र ज् + न असेच टंकावे लागते.

नितिन थत्ते

अभ्यास

श्री.धनंजय आणि श्री.कोल्हटकर या दोघांनीही भाषांतील उच्चारवैशिष्ट्ये/उच्चारांसंदर्भात जी मते मांडली आहेत, सविस्तर सोदाहरणासह विवेचन केले आहे, ते मान्य करीत असताना सहजरित्या [वा चर्चेच्या ओघात] सुरू झालेल्या या विषयाला स्वतंत्र धाग्याचे अस्तित्व यावे यातच या विषयाची महती आहे हे सांगणे आवश्यक आहे. यात अन्य भाषांतील उच्चारांची 'गंमत', 'हेटाळणी', 'टवाळी', 'तुच्छता' आदी रस येथील प्रतिसादकांना अपेक्षित नाहीत हेही त्याबरोबर आवर्जुन सांगणे गरजेचे आहे.

उच्चाराविषयी तुच्छता दाखविण्याचा - तसेच त्यामुळेच जाती-श्रेष्ठत्वाचा गंडही बाळगण्याचा - अश्लाघ्य प्रकार खास महाराष्ट्राच्या मातीतच पाहायला मिळेल. 'अभ्यंकर' आडनावाची शेजारीण स्वयंपाकघरात काम करताकरता स्वतःच्या मुलीचे काव्यवाचन ऐकताना मध्येच खेकसून म्हणते, "पल्लवी, पुन्हा म्हण ती ओळ आणि नीट म्हण. मराठ्यांसारखे बोलू नको." ~ हा प्रकार मी स्वतः कानाने ऐकला असल्याने यावर दुमत नकोय. 'श्रावणमासी..." मधील "ण" चा उच्चार 'न' सम त्या मुलीने केला असेल तर तो अन्य पद्धतीने दुरुस्त करताही आला असता, पण 'मराठ्यां'च्या उच्चारांना फटका देण्याची निसर्गदत्त देणगी जर इथलेच लोक सोडत नसतील तर मग अन्य प्रांतियांच्या गजाली कशाला ? तेव्हा उच्चारांविषयी/लिप्यांतरांविषयीची ही चर्चा एक 'अभ्यास' या अंतर्गतच घेत आहे, हे स्पष्ट करणे गरजेचे आहे.

त्यामुळेच श्री.धनंजय यांच्या या विषयातील अभ्यासाविषयी आदर मनी बाळगूनच त्यांच्या प्रतिसादातील "वेगवेगळ्या भाषांच्या आणि विशेषनामांच्या वैचित्र्यास हास्यास्पद मानणे हे फक्त विरंगुळ्यासाठीच ठीक आहे." या मताविषयी स्पष्ट करू इच्छितो की, कुणाच्याही प्रतिसादातील लिखाणातून नामवैचित्र्यास 'हास्यास्पद' समजली जाणारी टिपणी प्रतीत होत नाही.

काही शिकायचे झाल्यास प्रथम कुठूनतरी सुरुवात तर केलीच पाहिजे ना ? 'कौर' पासून सुरू झालेली ही चर्चा स्वतंत्र धाग्यापर्यंत आली म्हणजेच तीत काहीतरी चांगले 'इलेमेन्ट' आहे म्हणूनच. भाषेतील कंगोरे शिकण्यासाठी हे उपयुक्त आहेच आहे, अन्यथा उद्या 'पोहणे आल्याशिवाय तुला पाण्यात उतरायला मिळणार नाही' असे सांगण्यासारखाच प्रकार होईल्.

उच्चारांवरून श्रेष्ठत्व

उच्चाराविषयी तुच्छता दाखविण्याचा - तसेच त्यामुळेच जाती-श्रेष्ठत्वाचा गंडही बाळगण्याचा - अश्लाघ्य प्रकार खास महाराष्ट्राच्या मातीतच पाहायला मिळेल. 'अभ्यंकर' आडनावाची शेजारीण स्वयंपाकघरात काम करताकरता स्वतःच्या मुलीचे काव्यवाचन ऐकताना मध्येच खेकसून म्हणते, "पल्लवी, पुन्हा म्हण ती ओळ आणि नीट म्हण. मराठ्यांसारखे बोलू नको."

उच्चारांवरून श्रेष्ठत्व ठरविण्याचा प्रकार सगळीकडेच आहे आणि जुना आहे. एखाद्याच्या उच्चारावरून जातीबद्दल निष्कर्ष काढणे हा प्रकारही त्यातलाच. अगदी एखाद्याचे उच्चार 'आनिपानी' असेही म्हणणे योग्य नाही. ह्यातून बहुधा अज्ञान आणि असहिष्णुता दिसते. असो. माझ्यामते तर ही उच्चारवैशिष्ट्ये, ही विविधता जपायला हवी. 'ब्राह्मणी' किंवा 'शहरी' उच्चार शिकता शिकता आपण जिवंत, जोमदार लहजे हरवून बसतो आहोत. (माझा पोरगा बामणासारखा बोलतो ह्याचा अभिमान बाळगणारे माझ्या मराठा मित्राचे वडील येथे आठवले. शहरीकरण न झालेल्या आणि अद्याप शेती करणाऱ्या ब्राह्मण कुटुंबांतही असे उच्चार मी ऐकलेले आहेत.)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

असहमती

वरील काही प्रतिसादांच्या रोखाशी मी असहमत आहे. प्रत्येक विषयाला अनेक कंगोरे असतात ते तपासल्याखेरीज आपण मत बनवू नये किंवा चटकन् रिऍक्ट होऊ नये, असे मला व्यक्तीशः वाटते. प्रत्येकाला आपली पाळेमुळे शोधण्यात/त्याची माहिती मिळवण्यात कुतुहल असतेच. ऍलेक्स हॅलीचे 'द रुट्स' वाचल्यावर ते नक्कीच जाणवते. ही नैसर्गिक अंतःप्रेरणा नसती तर 'मानववंशशास्त्र' ही शाखा विकसित झाली नसती. भाषा, उच्चार, देहबोली, राहणीमान, आहार सवयी, नावे/आडनावे, शरीराची ठेवण अशा अनेक लक्षणांवरुन 'मी कोण आहे' याची शोधयात्रा सुरु असतेच. असो.

येडीयुरप्पा नाव ऐकल्यावर कुणालाही त्याचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे. असे कुतुहल असण्यात काहीच गैर नाही. आता हे नाव पूर्वीचे यदुवीरप्पा असावे एवढ्यावर हे कुतुहल शमते. त्यानंतर मूळ नावच रुढ झाले पाहिजे/वापरले गेले पाहिजे, असा आग्रह कोण धरते? त्यामुळे श्री. धनंजय यांनी 'मराठमोळे, कन्नडिग वगैरे शब्दांचे बळेच संस्कृतीकरण' या शीर्षकाखाली लिहिलेला मजकूर मला अनावश्यक वाटतो. त्यातून परभाषेविषयी तुच्छता दाखवणे, ही मते फारच दूर गेली. एखादाच विद्वान सोडता बहुतेक लोकांना शुद्ध नामाचा आग्रह धरण्यात काडीचाही रस नसतो. सिंगापूरचे मूळ नाव सिंहपूर होते किंवा काम्पुचियाला पूर्वी कांभोज प्रदेश म्हणत असत, एवढ्यावर लोक थांबतात. 'तुमचे नाव शुद्ध रुपात अमके-तमके होते तेव्हा ते बदलून घ्या', असा फुकट सल्ला कुणी देत बसत नाहीत आणि ऐकणारी व्यक्तीही ते स्वीकारेल, असे नाही. नोरोदाम सिहानुज या थाई व्यक्तीला आपण सांगू लागलो, की 'बाबा तुझे मूळ नाव नरोत्तम श्रीअनुज होते, ते तेवढे बदलून घे.' तर तो ते ऐकेल का? आपल्याकडे बंगाली ब्राह्मणांची मुखर्जी, बॅनर्जी, चॅटर्जी ही आडनावे अनुक्रमे मुखोपाध्याय, बंदोपाध्याय, चटोपाध्याय या लांब नावाचे संक्षिप्तीकरण आहे. त्यातील 'जी ' हा प्रत्यय आदरार्थी आहे. टागोर हे आडनाव ठाकूर शब्दाचे बंगाली उच्चारण. आज कुणीही त्यांना 'तुम्ही तुमचे मूळ नाव लावा' असे सांगायला जात नाही. अर्थात ज्यांना तशी इच्छा असते ते मूळ नाव कायम राखतातच. (ज्यांना आवडते ते स्वतःला गंगोपाध्याय म्हणवतात. उरलेले गांगुली हे आडनाव अभिमानाने मिरवतात). आपल्याकडेही हगवणे, हगरंगे, मुतवल्ली, झांट्ये, दाबके, नागवेकर, लचके, किरकिरे, शौचे, गांडलीवार अशी सकृतदर्शनी विचित्र वाटणारी (किंवा हसू येणारी) आडनावे आढळतात. व्यवहारात त्यांबद्दल मिश्किलता जरुर असू शकेल, पण तुच्छता दिसत नाही. त्यांना कुणी सांगायला जाते का, 'तुमची नावे बदलून घ्या' म्हणून.

एखाद्या भाषेतील नावे/उच्चार/ खुणा/ संकेत दुसर्‍या भाषेत विनोदी/अश्लील ठरु शकणे स्वाभाविक असते. इंग्रजीत 'थम्स अप' (मूठ मिटून केवळ अंगठा उंचावणे) हे एखाद्याला प्रोत्साहन देण्याची खूण ठरते, पण जर्मनीत तीच खूण अश्लील मानली जाते आणि एखाद्या पुरुषाने आपल्या लिंगसामर्थ्याचा केलेला उद्दाम निर्देश मानला जातो. गुजराथमध्ये मोठ्या भावाला आदराने 'गांडाभाई' म्हणतात. आपल्याकडे त्याला मिश्किलतेची छटा येते. बंगाली लोक वसुंधरा हे नाव 'बसुंधरा' असे उच्चारतात. त्यावर आमचा मित्र पांचटपणे टिप्पणी करायचा, 'बसून काय धरा, हे तर सांगा ना.' मराठी माणसासमोर 'कुंडी' हा शब्द उच्चारला तर त्याला त्याचे विशेष वाटणार नाही, पण कानडी व्यक्ती तोच उच्चार ऐकल्यास ओशाळण्याची शक्यता असते. कारण 'कुंडी'चा त्या भाषेतील अर्थ आहे 'पार्श्वभाग'. पण मला वाटते, की अशा गंमती असल्या तरीही त्याला कधी भाषिक तुच्छतेची छटा येत नाही.

संस्कृत उच्चारांतील शुद्धतेचा मुद्दा आपल्याजागी महत्त्वाचा आहेच. जिथे अशुद्ध उच्चाराने फारसा फरक पडत नाही, तेथे वाद येऊ नये, पण जिथे विपरित अर्थ होऊ शकतो तेथे काळजी घेणे अगत्याचे असते. गणपतीच्या आरतीत 'संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना' ही ओळ आजही अनेकजण 'संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे' अशी म्हणतात. चला. गणपतीने संकष्टीला पावावे, इतकाच बदल होईल. पण श्रीसूक्त म्हणताना जेव्हा लोक 'क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मींनाशयाम्यहं' असे म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ भलताच होतो. उच्चार करताना तो 'अलक्ष्मी' असा आहे. म्हणजे अलक्ष्मी (दारिद्र्याचा) नाश होवो, असे म्हणण्याऐवजी आपण 'लक्ष्मींनाशयाम्यहं' (लक्ष्मीचा नाश होवो) असे म्हणू लागल्यास त्या आवाहनाला काय अर्थ राहिला?

आनी-पानी वरुन कुणाला दुय्यम ठरवू नये,हे योग्यच आहे. पण आनी-पानी ग्राह्य नाही. विशेषतः आपण उच्चशिक्षण घेतो आणि शुद्ध उच्चार/प्रमाणभाषा काय असते, व्याकरणाचे नियम कसे चालतात, हे जेव्हा उमगते तेव्हा त्याने मुद्दामहून अशुद्ध उच्चारांचे समर्थन करणे खटकते. पाटील साहेबांनी त्यांचा अनुभव मांडला. एक दुसरा अनुभव मी सकाळ पेपरचे व्यवस्थापकीय संचालक/संपादक श्री. प्रतापराव पवार यांच्या 'वाटचाल' या आत्मनिवेदनात वाचला आहे. प्रतापरावांच्या मातोश्री कै. शारदाबाई या त्यांना लहानपणापासून सांगत 'तुझे मित्र सर्व जातींचे असू देत, परंतु अधिककरुन ब्राह्मण मित्रांची संगत जोड. एकतर त्यांच्या सहवासात तुझे उच्चार शुद्ध होतील व पुढे त्यांच्याशीच तुला स्पर्धा करायची असल्याने तुझ्यात स्पर्धात्मकता वाढेल.'

तुच्छतेचा अनुभव केवळ ब्राह्मणेतरांनाच येतो असे नाही. प्रत्येक जातीतच असे लोक असतात. माझा अनुभव वेगळा आहे. आम्ही मिश्र समाजात वाढलो. तरीही लहानपणापासून शेजारचे सुशिक्षित मराठा लोक मला 'ए बामना' म्हणून हाक मारायचे. त्यांचे ऐकून इतर समाजाचेही लोक तसेच म्हणायचे. 'बारा मण जेवणारे ते ब्रामण' असे विनोद माझ्यासारख्या गरीबीत वाढलेल्यालाही ऐकून घ्यावे लागले आहेत. मुद्दा तो नाही. मी जेव्हा त्यांना विचारायचो, की तुम्ही लोक शिकलेले आहात तरी 'बामन' 'आनी-पानी-लोनी-दगूड' असे शब्द का वापरता? त्यावर ते म्हणायचे, 'भटा-बामणांची आणि आमची संस्कृती वेगळी आहे. आम्ही तुमच्यावानी बोलायला लागलो तर आमाला आमचेच जातवाले 'भटाळलेले' म्हणतील.' आता हा ऍप्रोच असेल तर बदल कसा घडणार?

पूर्वीपासून आपण देव/निसर्गशक्ती किंवा 'निर्मिक' (जो कोणी असेल तो) मागणे मागत आलोच आहोत.
ओम् असतो मा सद् गमय/ तमसो मा ज्योतिर्गमय/ मृत्योर्मामृतंगमय/ ओम् शांती शांती शांती
(आम्हाला वाईटाकडून चांगल्याकडे ने. अंधाराकडून प्रकाशाकडे ने. मृत्यूकडून अमरत्वाकडे ने. विश्वात शांती असो.)

पण 'आम्हाला अशुद्धाकडून शुद्धाकडे ने' असे मागणे मागण्यासाठी मात्र आपली जीभ रेटत नाही. ही एक गंमतच आहे.

(प्रतिक्रिया कुणीही वैयक्तिक घेऊ नये अशी विनंती)

बानर्जी वगैरे

बानर्जी,मुखर्जी,भट्टाचार्जी मधला जी हा नेहमी आदरार्थीच नसावा बहुधा. भट्टाचार्य मधल्या य चा ज झाला असावा. वंद्योपाध्याय,मुख्योपाध्याय चे लघुरूप होताना त्यातल्या एक य चे जे-जी झाले असावे. भट्टाचार्जी मधल्या जी चे इंग्रजी स्पेलिंग् जे ई ए असे केलेले वाचले आहे.(मला वाटते मोहन बागान् चा एक गोलरक्षक आपल्या नावाचे स्पेलिंग् असे करीत असे.)आपल्याकडेसुद्धा पाध्ये,राजोपाध्ये,उपाध्ये मध्ये य चा ये झालेला आहे.)

बॅनर्जी वगैरे

हो, हे बरोबर आहे - बॅनर्जी वगैरेतील "जी" हे आदरार्थी नाहीत. ब्रिटिशकालापूर्वी बंदोपाध्याय हे आडनाव असलेल्या लोकांना बोलीभाषेत बॉंड़ुर्ज्जे, मुखोपाध्याय ला मुखुर्ज्जे, इ.

यात ड हा मराठी नव्हे, तर खाली नुक्ता असलेला ड आहे. त्यामुळे रोमन लिपीत ते Banrujje झाले, आणि नंतर आंग्ल धाटीत उच्चार बॅनर्जे, अथवा बॅनर्जी. याचे रोमन स्पेलिंग विविध आहेत - banerjea, banerjay, काही बाँदोपाध्याय वरून थेट bonnerjee ही करायला लागले. काँग्रेस चे पहिले अध्यक्ष व्योमेशजंद्र बॉनर्जी होते.

मुखुर्ज्जे मुखर्जींचे तेच आहे - Mookerjee, Mukherjee, Mookerjea, Mookherjee, Mukherji, Mukerji..... कलकत्ता टेलीफोन डिरेक्टरीत अनेक रूप सापडतात!

आणि वर एका प्रतिसादात सांगितल्या प्रमाणे भट्टाचार्य मधला हा बंगालीत होतो. (खरेतर ज्य, पण फक्त ज उच्चारला जातो. म्हणून ते भॉट्टाचार्जो होते. - मग रोमन मध्ये - Bhattacharjo, Bhattacharjee, Bhattacharya, Bhattacharjya, Bhattacharjyo, Bhattacharjea...

उत्तम प्रतिसाद

योगप्रभू ह्यांचा उत्तम प्रतिसाद. धनंजय ह्यांचा प्रतिसाद देखील उत्तमच आहे.

भाषेच्या प्रमाणीकरणाचा मुद्दा मागे बऱ्याच वेळा चर्चिला गेला आहे, (त्यावरील धनंजय ह्यांचाशी झालेल्या चर्चेतून ही गोष्ट मला पटली) - 'आनी पानी' हे/तत्सम उच्चार योग्य किंवा अयोग्य हे संदर्भ चौकट ठरवते, तशीच ठरणे योग्य आहे.

बाकी नावांच्या बद्दल बोलायचे तर - कनिमोळी इंग्रजीत लिहिताना Kanimozhi असे लिहितात, बहुदा तमिळ, इंग्रजी लिपीत लिहिताना 'ळ' साठी zh वापरायचे निश्चित केले असावे.

कनीमोळी / कनिमोझी

तमिळ भाषेतही ळ चा उच्चार हा वादाचा विषय आहे, काहीसा आणि-आनि सारखाच.

मी एकेकाळी थोडे तमिळ शिकायचा प्रयत्न करत असताना माझ्या ऐयर मैत्रिणीने zh साठी चा उच्चार चुकीचा आहे असे म्हटले होते. तिच्या मते zh चा "खरा" उच्चार हून भिन्न आहे - तो आणि च्या मधे कुठेतरी पडतो. (जीभ ळ उच्चारण्याच्या उद्देशाने उचलायची पण तोंडाच्या वरच्या भागाला लागू न देताच उच्चारायचे) फक्त तमिळ ब्राह्मणांत तो असा उच्चारण्याची प्रथा असून, त्या उच्चारावरून एखादा माणूस ब्राह्मण आहे, की ब्राह्मणेतर, हे लगेच ओळखता येते, असे तिने सांगितले होते.

पुढे जाऊन मी मद्रास इथे कामाला असताना एकदा केळफुलाच्या भा़जीबद्दल विचारताना vazhapazham म्हटले, तेव्हा माझा सहकारी हसला, आणि म्हणाला- कुठल्या अमेरिकेतल्या तामिळ ब्राह्मणाने हे शिकवले तुम्हाला? खरा, बहुजन तामिळ समाजातला उच्चार "वाळपळम्" आहे!

बहुजनात उच्चार जरी ळ सारखाच असला तरी, तमिळ लिपीत हे अक्षर भिन्न असल्यामुळे, त्याचे रोमनीकीकरण करताना सगळेच ते अक्षर zh असे लिहीतात. फक्त त्याचा उच्चार हे तमिळ समाजात वादग्रस्त स्थान आहे हे नक्की!

असो. काही महिन्यांपूर्वी हिंदी चॅनलवाले "कनी मोझी" असे लिहीत होते.

दोन प्रकारचे उच्चारी 'ळ'

माझ्या माहितीनूसार तमिळमधे दोन प्रकारचे उच्चारी 'ळ' आहेत. अर्थातच त्याच्या तमिळ लिपीमधे वेगवेगळ्या खुणा आहेत. मात्र इंग्रजीतच काय पण स्ंस्कृत, हिंदीतही दोन्ही ळ नाहीत

तमिळमधे ऴ ळ असे दोन ळ आहेत (त्यापैकी ऴ ழ तर मराठीशी जवळचा ळ ள असा लिहितात )
ழ हे खास तमिळ चिन्ह आहे. अन्य भाषांत त्या उच्चाराचे चिन्ह नाही. उच्चार सांगण्यासाठी मराठी शब्द नाही तो खास तमिळ लोकांकडूनच ऐकावा :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

ते दोन 'ळ'

ते दोन 'ळ' मलयाळम मध्येही वेगळे आहेत. अर्थात दोन्हीही आपल्या मराठी 'ळ' पेक्षा थोडे वेगळे आहेत. मराठी 'ळ' मध्ये 'ड़'ची झाक दिसते असे माझ्या तमिळ, मलयाळी व तेलुगु मित्रांचे म्हणणे आहे. तर मलयाळम भाषकांचा 'ऴ' जितका स्पष्टपणे वेगळा कळतो तितका तमिळ भाषकांचा कळत नाही. माझे अनेक मलयाळी मित्र म्हणतात की तमिळ लोक तो नीट उच्चारत नाहीत.
माझा तमिळ रूममेट तर ल, ळ आणि ऴ या सर्वांचा उच्चार 'ळ' असाच करतो. उदा. हॅळो, माळेगाव, अळेपुळा, तमिळ, मळयाळम इ. :)

मिहिर कुलकर्णी

आणि मला माझेच नाव उच्चारता येऊ लागले.

वा! वरील उच्चार, लिपी, व्याकरण, जातपात, शुद्ध अशुद्धेच्या मार्गांनी वाहणारी फ्री फ्लोइंग चर्चा वाचून डोळे पाणावले. लिपीमु़ळे उच्चारांवर प्रभाव पडतो हे धनंजय यांचे म्हणणे खरे आहे. परंतु ते तेवढेच मर्यादित आहे का? भाषा ही प्रमाण आणि अप्रमाण असावी. शुद्धाशुद्ध असू नये. प्रमाण भाषा ही शक्यतो सत्ताधारी गट प्रमाणित करतो असे वाटते.

मराठीने (हे उमटलेले अक्षर काय आहे असे कोणी विचारू नये.) आणि ऑ या स्वरांची भर घातल्याने काही इंग्लीश उच्चार सुधारले आहेत पण म्हणून प्रत्येक इंग्लीश उच्चार मराठीत लिहिता येतो असे वाटत नाही.

थ हा मराठीत दंतव्य असला तरी जीभ दाताच्या वरच्या बाजूस टेकवली जाते. इंग्रजीत थ चा उच्चार दाताच्या टोकाशी लावून जीभ किंचित बाहेर काढून होतो. थँक यू! चा उच्चार मला अतिशय प्रयत्नपूर्वक जमला आहे.

----------

माझ्या मुलीला या आठवड्यात ५०० स्पेलिंग वर्डस करायचे होते. मी विचारायचे आणि तिने लिहून काढायचे असे ठरले. हा प्रकार अतिशय त्रासदायक होता कारण तिला माझे उच्चार समजत नाहीत. तिचे आणि माझे ऍक्सेंट वेगळे आहेत. माझे स्पष्ट मराठी+इंग्रजी उच्चार तिचे स्पेलिंग बिघडवून जातात.

असाच अनुभव वॉइस कमांड वापरताना अनेकांना येत असेल. :-)

------------

मराठीतील ओष्ठव्य प आणि इंग्लीशमधील ओष्ठव्य पी ही मूळाक्षरे वेगळी वाटत नाहीत पण अद्यापावेतो प्रिया असे म्हटल्यावर "ब्रिया" असा पुनरुच्चार करणारे अमेरिकन १००% आहेत. परंतु ओठांचा हलकासा चंबू करून प्रिया (प्रुइया) असा उच्चार केला तर तो त्यांना स्पष्ट समजतो. आणि हे असे आहे हे समजायला मला सुमारे ५-६ वर्षे लागली पण त्यानंतर मला माझेच नाव उच्चारता येऊ लागले.

मराठी घ्या, संस्कृत घ्या किंवा इंग्लीश घ्या. कोणतीही लिपी उच्चारांसाठी फुलप्रूफ आहे असे वाटत नाही. असो.

त,थ,द

खूप जुने इंग्लिश् सिनेमे बघताना 'मदर्' चा उच्चार जीभ थोडीशी दातांवर आपटल्यासारखी करून शेंडा बाहेर काढून केलेला दिसून येई.(तेव्हा मॉम्,मॉमी चा सुळसुळाट झालेला नसावा बहुधा-चू.भू.दे.घे.) तेच थँक् यू, देअर्,देम् बाबत.
इंग्लिशमध्ये शब्दाच्या सुरुवातीच्या पी चा उच्चार फ होतो. पेकिंग् च्या जुन्या स्पेलिंग् चा उच्चार फीकिंग् व्हायला लागला,म्हणून त्याचे स्पेलिंग् चीनने बीजिंग् अशा उच्चाराचे केले असे ऐकले आहे.
आजही वेस्ट् इंडिअन् समालोचक सचिन चा उच्चार ससिन,त्सचिन्,च(चरख्यातला)चिन् असा करताना आपण ऐकतो.

चकवणारी नावे

सुमन हे नावही चकवणारे आहे. माझ्या बहिणीचे नाव 'सुमन' आणि माझ्या गुजराथी मित्राचे नाव पण 'सुमन'.
गावरान

चकवणारी इंग्रजी नावे

काही इंग्लीश नावे मला चकवणारी वाटतात. son या अक्षरसमूहाने संपणारी नावे मुलींची का असावीत असा प्रश्नही पडतो. ;-)

ऍलिसन, मॅडिसन, ऍडीसन, पार्सन, मॉरिसन, एमरसन ही नावे मुलींची असतात तर जॅकसन हे नाव (लास्टनेम नाही) मुलांचे असते.

आणखी एक चकवणारे नाव

अमेरिकेत 'विकी' हे नाव मुलीचे असते. आपल्याकडे विक्रम/विक्रांत ह्या नावांचे लाडाने विकी केल्याने, विकी म्हंटले की माझ्यासमोर मुलगाच उभा राहतो.

विकी, रिकी आणि जॅकीही

हाहाहा! अमेरिकेत विकीसोबत, रिकी आणि जॅकी ही देखील बायकांची नावे असतात. जॅकी (Jacque) नावाची एक जवळची मैत्रिण आहे.

असंच आणखी एक नाव - ऍबिगेल. हे नाव बाईचं आहे हे माझ्या मनाला अद्याप पटलेलं नाही. आणि एक नाव लेस्ली पण लेस्ली हे नाव बायका आणि पुरुष दोघांचे असते असे वाटते.

रिकी आणि जॅकी

रिकी हे मुलाचे असते असे वाटते. रिचर्ड -रिक- रिकी असे ऐकले आहे. रिकी नाव घेतले की (मला) पटकन आठवणारे रिकी जर्वेस आणि रिकी मार्टीन हे दोघेही पुरूषच आहेत.

जॅकी मात्र मुलींचेच असते. बर्‍याचदा 'जॅकलीन'चे ते लघुरुप असते. भारतात जॅकी श्रॉफ नावाचा 'अभिनेता' आहे हे अमेरिकन लोकांना विचित्र वाटेल. :)

रिकी

रिकी हे पुरुषाचे नाव आहे असे मलाही वाटे पण बाईचेही नाव असते. माझ्या ऑफिसात दोन रिकी आहेत. एक बाई, एक पुरुष. त्यामुळे बराच गोंधळ होई. पैकी पुरुषाने मला "प्लीज रिकी न म्हणता रिक म्हणायला सुरुवात करा." अशी विनंती केली होती. :-)

पुरुष त्याचे स्पेलिंग Ricky तर बाई तिचे स्पेलिंग Rickie असे करते.

याचप्रमाणे जॉर्डन, टायलर, केली, रायली, कोरी ही नावे लिंगनिरपेक्ष आहे. (त्यांची स्पेलिंग वेगळी करत असतील तर माहित नाही.)

पुरुषनांवात ईकारांत "डिम्युनिटिव्ह"

दोहोंपैकी पुरुषानेच "रिकी->रिक्" बदल करण्यास सांगितले, हे परंपरेत पटण्यासारखे आहे.

इंग्रजीत पुरुषनावांत (प्रेमळपणे) पाठीमागून "ई" जोडले तर त्यात "क्यूट लिटल" अशी काहीतरी भावना येते.

रिकी, मायकी, जॉनी, जोई, चार्ली, एडी, बिली... वगैरे नांवे जितक्या प्रमाणात लहान मुलांना हाका मारण्याकरिता वापरतात, तितक्या प्रमाणात प्रौढांना हाका मारताना वापरत नाहीत. (घट्ट १००% वगैरे नियम नाही. फक्त बाहुल्याची नोंद.)
लहानपणी ही नावे असलेल्या लोकांना प्रौढ झाल्यावर अनुक्रमे रिक्, माइक्, जॉन्/जॅक्, जो, चक्, एड्, बिल्... अशा प्रकारे हाका मारलेले अधिक दिसते.

बहुतेक देशांतल्या समाजात प्रौढ पुरुषांना "लहानगा" असा भावनिक निर्देशसुद्धा आवडत नाही.

स्त्रियांच्या बाबतीत मात्र "ई"कारांत हाका मारण्याची नावे प्रौढ वयातही टिकण्याचे प्रमाण जास्त असते. त्यात "लहानगी" बरोबर फेमिनिन्-सफिक्स हा अर्थसुद्धा असावा. (जेनी [जेनिफर], जिनी [व्हर्जिनिया], विकी [विक्टोरिया]... मात्र अपवाद [एलिझाबेथ] लिझी->लिझ्)

विरंगुळा गमतीदार आणि हवाच

विरंगुळा म्हणून असले बहुभाषिक गोंधळाचे विनोद गमतीदार आहेत, आणि छानच आहेत.

म्हणून मीच ऐकलेली गमतीदार उदाहरणे सांगतो.
कोंकणीमध्ये एखादा व्यक्ती सौजन्यपूर्ण विनंती करू शकेल "कुलेर-लात दी." (अर्थ : चमचा-डबा दे..)
कन्नडिग शेजारीण येऊन विचारते : "आमचं आज पूजा आहे, जरा बत्तीस हत्ति देता का?" (अर्थ : बत्ती/वातीकरिता हत्ति/कापूस)

एम्.ए.

"कन्नडिग शेजारीण येऊन विचारते : "आमचं आज पूजा आहे, जरा बत्तीस हत्ति देता का?"

~ यावरून आठवले. माझी मावसबहीण धारवाडमध्ये दिली असून ती एम्.ए. झाली आहे. पण तिथे लग्नाच्या गोष्टीच्यावेळी सासरकडील मंडळीसमोर तिच्याकडून 'मी एमे आहे' असे म्हटले गेल्यावर उपस्थितात चांगलीच खसखस पिकली. कारण कानडीत एमे म्हणजे 'म्हैस'.

कानडी-मराठी

बत्तीस हत्ती वाचून :-) "आमच्या दारात हसू (कानडी त हसू: गाय) आलंय! हो का, मग खुदुखुदु हस की!!" असे लहानपणी आम्ही म्हणायचो.

पण एकदा आम्ही अनेक भाऊबहिणी सुटीला पुणेमुंबईहून धारवाडला गेलो होतो. आम्हाला घरगुती कानडी बर्‍यापैकी येत होते, पण बोलण्याचा ढंग मराठी होता. सायकली भाड्याने घेऊन पिक्निकला जायचे असे ठरले. दुकानात जाताच माझ्या लहान आतेबहीणीने सायकलवाल्याला उत्साहाने, निरागसपणे "भाड्यानी सायकल कोडती?" असे विचारले. तो चांगलाच भडकला, कारण कानडीत वाक्याच्या पहिल्या भ-कारान्त शब्दाचा अर्थ भलताच लागतो! आमच्या धारवाडकर दादाने त्याला समजावून सांगे पर्यंत त्याचा चेहरा बघण्यासारखा होता.

वनिता, वामा, ललना वगैरे

वनिता हा शब्द स्पॅनिश जोनितावरून आला हे पटणे जरा अवघड आहे. मराठीत आणि संस्कृतमध्येही वनिता म्हणजे जिला नवर्‍याचे प्रेम मिळते अशी स्त्री. वनात राहणारी स्त्री असाही अर्थ ऐकला होता.
स्त्रीसाठी वेगवेगळ्या अर्थच्छटा दाखवणारे बरेच शब्द मराठीत आहेत.
वामा=सुंदर स्त्री
ललना=खेळकर स्त्री
प्रमदा, मोहिनी=मोहक स्त्री
प्रेमला=प्रेमळ स्त्री
प्रमिला=जिच्या अंगाला सुगंध येतो अशी स्त्री
वयानुसार, बाला->मुग्धा->तरुणी->महिला->प्रौढा(पुरंध्री)->वृद्धा
महिला या शब्दाचा झिंगलेली किंवा झिंगल्यासारखी वाटणारी स्त्री असाही केवळ संस्कृत कोशात असलेला(कोशमात्र) अर्थ आहे, पण एरवी महिला म्हणजे जी लहान मुलगी नाही अशी वयाने मोठी स्त्री.
वगैरे वगैरे.---वाचक्नवी

वनिता

मला वाटतं वनिता स्पॅनिशवरून आले असे सांगायचा हेतू नसावा. वनिता सदृश नाव स्पॅनिशमध्ये आहे एवढेच सांगायचे असावे.

गुफ्तगु चलता रहे..

ही चर्चा रंजक आहे. पुढे सुरु राहावी, अशी इच्छा.

स्रियांबद्दलची आदरार्थी संबोधने प्रत्येक भाषेत असतात. धाग्याच्या सुरवातीला आपल्याकडील कुमारी-कुंवर-कौर याचा उल्लेख झाला. संस्कृतमध्ये प्रत्येक स्त्रीला पूर्वी आदराने 'देवी' म्हटले जात असे. संस्कृत नाटकांतील संवादात ते संबोधन दिसून येते. उर्दूत स्त्रीप्रती आदर दाखवण्यासाठी 'मोहतर्मा' म्हणतात. इंग्रजीत 'मॅडम' म्हणतात. (ही फ्रेंचांची सभ्यता इंग्रजांनी घेतली. कारण मॅडमचा फ्रेंच उच्चार 'मदाम्' आणि पूर्ण शब्द 'मद्म्वाझेल') स्पॅनिशमधील 'सिनोरिता' हेही ऐकायला गोड वाटते. तर अशी आणखी काही संबोधने नमूद करावीत. इंग्रजीत अविवाहित स्त्रीच्या नावाआधी 'मिस' आणि विवाहित स्त्रीच्या नावापूर्वी 'मिसेस' लावतात. ही दोन्ही संबोधने 'मिस्ट्रेस' या शब्दावरुन आली आहेत.

मराठीत मला स्त्रीला आदरार्थी स्वतंत्र संबोधन चटकन् आठवत नाही. सध्या तरी आपण 'मॅडम' म्हणतो किंवा 'ताई' म्हणून काम चालवून नेतो. हिंदीत 'श्रीमतीजी, सुश्री, महोदया' असे काही शब्द आहेत. मराठीत 'श्रीमती ' शब्द सहजपणे वापरत नाहीत कारण त्याला वेगळी छटा आहे. आपल्याकडे विवाहित स्त्री 'सौभाग्यकांक्षिणी' (सौ) असते, तर 'श्रीमती' म्हणजे विधवा स्त्री. जुन्या काळात विधवा स्त्रीला 'गंगाभागीरथी' असे स्वतंत्र संबोधन होते. पत्रव्यवहारात लिहिताना 'गं.भा. ---बाई' असे लिहित असत. आता तसे काही न म्हणता श्रीमती म्हणतात. मुद्दा हा, की मराठी भाषेत मला ही किंचित कमतरता जाणवते.

(राही यांचे आभार - बंगालीतील बंदोपाध्याय मुखोपाध्याय ही नावे काय असावीत, हे मला नीटसे माहीत नव्हते. ती मूळ वंदोपाध्याय, मुख्योपाध्याय आहेत, हे वाचून जिज्ञासापूर्ती झाली. चटोपाध्याय हे कसे आले? त्याचा आणि चटाचा काही संबंध आहे का? आपल्याकडे 'चटावरचे श्राद्ध' असा शब्दप्रयोग आहेच. चटोपाध्याय म्हणजे श्राद्धविधी करणारे ब्राह्मण, असे काही आहे का? कृपया अधिक माहिती द्यावी.)

पालुपदे

मराठीत मला स्त्रीला आदरार्थी स्वतंत्र संबोधन चटकन् आठवत नाही

मुळात असे पालुपद असणे ही भारतीय परंपरा आहे का याविषयी मी साशंक आहे. युरोपिय भाषांमधे अश्या प्रकारच्या संबोधनाला सहज प्रतिशब्द आहेत कारण तिथे कोणतेही नाते नसलेल्या, नावही माहित नसलेल्या स्त्रीशी सहज बोलणे स्वाभाविक होते.
आपल्याकडे मात्र जाहिरपणे, मोठ्याने अनोळखी/परस्त्रीशी बोलणे असभ्य समजले जाई त्यामुळे हे संबोधन येईलच कसे? असा प्रश्न मला पडतो. जाणकारांनी खुलासा करावा.

हिंदीत/उर्दुत जे संबोधनाशी जवळचे शब्द दिसतात ते बहुदा इंग्रजांच्या आगमनानंतर प्रचलित झाले असावेत. इंग्रजांशी बोलताना, इंग्रजी मडमांना संबोधताना गरज म्हणून ही संबोधने तयार झाली असावीत का?

बाकी फॉर्मल मराठीत कुमारी, सौभाग्यवती, सौभाग्यकांक्षिणी, गंभा ही पुर्वपदे तर बाई, ताई, भगिनी, देवी ही पालुपदे वापरली जातातच. (आताच्या काळात स्त्रीयांशी जाहिरपणे बोलणे करताना पालुपदे सर्रास वापरली जातात)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

स्वतंत्र संबोधने का नसावीत?

मराठीत स्त्रीला हाका मारण्यासाठी अगं मुली, ए बाई, अहो बाई-ताई-अक्का-काकू-आजी-आजीबाई ही संबोधने(पूर्वपदे किंवा पालुपदे नाहीत)वापरली जातातच.
बाईला जेव्हा एकवचनी संबोधतात तेव्हा ती अगदी अनोळखी आणि सामान्य असते, मोलकरीण असते किंवा ठेवलेली असते. या बाईचे अनेकवचन 'बाया` होते. जेव्हा मुळातच बाई ही आदरार्थी बहुवचनी असते तेव्हा ती शिक्षिका, कार्यालयातली सहकारिणी किंवा वरिष्ठ, आदरणीय व्यक्ती अथवा अनोळखी असली तरी प्रतिष्ठित वाटते, अशी असते. ---वाचक्नवी

इंग्रज आल्यानंतर?

शंका हीच आहे की ही संबोधने इंग्रज (व इंग्रजी संस्कार) आल्यानंतर वापरली जाऊ लागली का?
तत्पुर्वी अनोळखी / नाव माहित नसलेल्या स्त्रीला थेट संबोधन कसे करत?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

डॅमसेल्

इंग्रजीत फ्रेन्चमधून आलेले damsel हे नाम तरूणीला उद्देश्यून वापरले जाते [किंवा जात होते]. याची व्युत्पत्ती 'डेम' पासून असण्याची शक्यता आहे. लग्न न झालेल्या मुलीसाठीदेखील 'मेडन' म्हटले जात असे पण पुढे ते नोकरी/सेवाविषयक बाबीसाठी चिकटले गेल्याने त्याचा वापर सर्वत्र होत नसल्याचे दिसते. 'spinster' : प्रौढ कुमारीकेसाठी अस्तित्वात असलेल्या या नामासाठीही मराठीत चपखल प्रती शब्द नाही. 'घोडनवरी' म्हटले जाते पण त्याचा जास्त करून 'टोमण्या' साठी वापर होतो असेच दिसते.

'सिनोरिता' प्रमाणेच जर्मन भाषेतील "फ्राऊलीन" हेही मधुर वाटते. स्पॅनिशमधील 'डोना' हे मला वाटते आपल्याकडील 'श्रीमती' ला जास्त जवळचे आहे.

श्री.योगप्रभू यानी म्हटले आहे : "मराठीत 'श्रीमती ' शब्द सहजपणे वापरत नाहीत कारण त्याला वेगळी छटा आहे."

~ खरे आहे. पण आता शासन आणि अनेक विद्यापीठे यानी या संदर्भात स्वतंत्र परिपत्रके काढून त्या त्या संस्थातून मराठीतून पाठविण्यात येणार्‍या अहवालात स्टाफची माहीती देताना सरसकट पुरुष कर्मचार्‍यांसाठी 'श्री.' आणि स्त्री कर्मचार्‍यांसाठी "श्रीमती" असा उल्लेख करावा असे आदेश दिले आहेत. फक्त पीएच.डी. होल्डरच्या नावामागे 'डॉ.' लावून तसा उल्लेख चालू शकतो. [सीनेट निवडणुकीत उमेदवारांचा आता असाच उल्लेख करून मतपत्रिका छापल्या जातात.]

आदरार्थी संबोधने

संस्कृतमध्ये आणि प्राचीन मराठीमध्येही आर्या आणि अंबा ही संबोधने वापरलेली आढळतात. नावाला आक्का जोडण्याचीही प्रथा आहे. दक्षिण महाराष्ट्रात(कदाचित तेलुगुच्या प्रभावाने)अव्वा हे संबोधनही प्रचलित आहे. कार्ल्याच्या एकवीरा देवीच्या नावाची व्युत्पत्ती राजवाड्यांनी अक्कवीरा,अक्कव्वा, अशी काहीशी शोधली असल्याचे वाचल्याचे आठवते.अर्थात राजवाड्यांच्या काळातली कित्येक अनुमाने आणि निष्कर्ष नंतरच्या काळात अद्ययावत संसाधने उपलब्ध झाल्याने खोडली गेली आहेत.

बाई अथवा बाईसाहेब

मराठीत मला स्त्रीला आदरार्थी स्वतंत्र संबोधन चटकन् आठवत नाही. सध्या तरी आपण 'मॅडम' म्हणतो किंवा 'ताई' म्हणून काम चालवून नेतो.

मराठीत बाई अथवा बाईसाहेब आहेच की. अर्थात्, थोडी खेदाची बाब आहे की महाराष्ट्रात देखील 'बाई' हयामागील आदरदर्शकता हळूहळू मागे पडू लागली आहे. गुजराथी वा अन्य समाज महाराष्ट्रात देखील बाई म्हणजे केवळ कामवाली मोलकरीण समजतात. काही वर्षांपूर्वी एका गुजराथी बाईंना मराठीत मी 'बाई' म्हटले तर त्यांना त्याचा राग आलासे दिसले, मला असे का म्हणता असे त्यांनी मला विचारले. त्यांना त्या शब्दाचा खरा अर्थ सांगितल्यावर आणि जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई अशी उदाहरणे दिल्यावर त्यांचा राग निवळला आणि नंतर त्याच माझ्याशी बोलतांना स्वत:चा उल्लेख विनोदाने बाई असा करू लागल्या.

असे आठवते की जुन्या लग्नपत्रिकांमध्ये स्त्रियांचे निमन्त्रण डाव्या बाजूस वेगळे छापलेले असे आणि त्याची सुरुवात 'सौ. बाईसाहेब ह्यांस' अशी असे.

आम्ही शाळा-कॉलेजमध्ये आमच्या स्त्री-शिक्षिकांना सर्रास बाई म्हणत होतो आणि पुरूष शिक्षकांना सर. मधुमालती आपटे आम्हाला फर्गसन कॉलेजात Co-ordinate Geometry आणि विद्यापीठात Algebraic Projective Geometry शिकवत असत. वर्गाबाहेर मराठी बोलतांना आम्ही त्यांना बाई असेच म्हणत असू. आताच्या काळात सर्व स्त्री-शिक्षिका मॅडम अथवा मिस् झाल्याचे दिसते.

गुरुजी आणि प्रोफेसर

"बाई" हे चकावणारे नाव झाले आहे ते आपल्याकडील 'आज कामवाली बाई आली नाही' अशा आता प्रघात पडलेल्या प्रथेमुळेच. फक्त 'कामवाली आली नाही' असे या राज्यातील कुटुंबात सहसा म्हटले जात नाही. तद्वतच गटारात फेकून द्यायच्या लायकीच्या हिंदी चित्रपटातूनही श्रीमंत कुटुंबात घरकाम करणार्‍या स्त्री पात्राला 'बाई' अशा नावाने नखरेल नटीची ती सुस्तावलेली 'मम्मी' हाक मारताना दाखवितात. [ही बाई देखील मुद्दाम महाराष्ट्रीयनच दाखविली जाते.]

पण हल्ली एरव्ही पवित्र वाटणारे 'गुरुजी' हे संबोधनदेखील चकवणारे होऊ लागले आहे. कोल्हापुरातील एका प्रसिद्ध कॉलेजमधील प्राध्यापकाने संस्थेच्या सचिवाने 'आपल्याला गुरुजी अशी हाक मारून अपमान केला' असा लेखा अर्ज सोसायटीकडे केला होता. २० वर्षापेक्षाही जास्त सेवा झालेल्या या प्रोफेसरमजकुरांचे दाखल्याचे काहीतरी काम संस्थेच्या ऑफिसमध्ये होते. त्याना तिथे आल्याचे पाहिल्यावर तेथील सेक्रेटरीनी काहीशा खेळकरपणाने, "या गुरुजी. थोडा वेळ थांबा, तुमचे काम आत सहीला दिले आहेच" असे म्हणताच प्रो. ना का कोण जाणे राग आला आणि झटकन् ते उदगारले, "गायकवाड, तुम्हाला ताकीद देतो. मी 'गुरुजी' नसून् 'प्रोफेसर' आहे. तेव्हा पुन्हा मला गुरुजी म्हणायचे नाही. सॉरी म्हणा." या सरबत्तीवर गोंधळून गेलेल्या सेक्रेटरीनीही मग "सर, अगोदर मला 'गुरुजी' हा उल्लेख अपमानस्पद आहे हे पटवून द्या. मग त्या सॉरी चे पाहू." असे उत्तर दिले.

यावर तिथून तणतणत बाहेर पडलेल्या प्रो.नी तडकाफडकी वरील संवादाचा संदर्भ देवून कॉलेज व्यवस्थानाकडे लेखी अर्ज देवून संबंधित सचिवास ताकीद देण्यात यावी अशी मागणी केली. त्या महिन्याच्या 'कॉलेज कमिटी' पुढे हा अर्ज घ्यावा की नको याबाबत चेअरमन यानी संस्थेच्या वकिलाकडे तसेच शहरातील एक ज्येष्ठ नागरिक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तितकेच ज्येष्ठ कार्यकर्ते [जे संस्था कार्यकारिणीचेही सदस्य आहेत] यांच्याकडे सल्ला मागितला. [या कार्यकर्त्यांच्या ऑफिसमध्ये मी अन्य कारणासाठी बसलो असता त्यानीच हसतहसत माझ्यापुढे ते पत्र व त्याची अटॅचमेन्ट म्हणजे प्रोफेसराचा अर्ज वाचायला दिले आणि म्हणाले, 'बघा पाटील, सार्‍या जिल्ह्यात रात्रदिवस ऑडिट काढीत हिंडता, आता ह्या अतिसुशिक्षिताने काढलेल्या ऑडिटला काही उत्तर आहे का, तुमच्या नियमावलीत?' काय बोलणार?]

जरी त्यातून पुढे काही निष्पण्ण् झाले नसले [अन्य दोनतीन दिपोटीनी त्या 'प्रोफेसर' महोदयाना 'गुरुजी' चे महत्व पटवून दिले असे समजले] तरी हे प्रकरण पुढे सार्‍या कॉलेजभर झाले आणि मग जवळपास सगळ्याच स्टाफकडून "मी गुरुजी का प्रोफेसर ?" यावर स्टाफरूममध्ये फुलझड्या तडतडू लागल्या, बराच काळ.

कालौघात अनेक शब्द मागे पडतात...

कोल्हटकर म्हणाले तसे 'बाई' व 'बाईसाहेब' ही संबोधने पूर्वी वापरात होती. मस्तानीची दासी तिला 'बाईजी' म्हणत असे. आपल्या मागच्या पिढीत पती व पत्नी एकमेकांना आदरार्थीच 'अहो' या संबोधनाने हाक मारत. आता बायका नवर्‍याला 'अहो' म्हणत नाहीत. अगदी 'ए बाबा' ही मुलांची हाकही नवीन पिढीला खटकत नाही. (दूरदेशी गेला बाबा, कामातून गेली आई) बदल हे होतच असतात. पण मराठीत स्त्रियांना 'बाई' म्हणायचे नाही, 'ताई' म्हटलेले विचित्र वाटते, मग म्हणायचे काय? 'मॅडम' हा इंग्रजी शब्द चालतो, पण 'अहो बाई' हा आदरार्थी शब्द खटकतो, ही गंमतच आहे.

यात मला वाटते कालौघात अनेक शब्द जुन्या धाटणीचे म्हणून मागे पडतात किंवा नवेच रुढ होतात.
पूर्वीच्या पत्रिकांत 'अमक्याचा मुलगा व तमक्याची मुलगी यांचा शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे' असा उल्लेख असे. नंतर शरीरसंबंध शब्दाची जागा 'शुभविवाह' शब्दाने घेतली. जुन्या काळात नवर्‍याला 'इकडची स्वारी' 'इकडून' असे म्हणण्याची किंवा थेट नावही न घेण्याची पद्धत होती (आहेत का टिळक? या प्रश्नाला 'पागोटे खुंटीवर दिसत नाही' असे उत्तर येत असे.) त्यानंतर 'यजमान' 'मालक' 'धनी' 'कारभारी' असे शब्द रुढ झाले. आता थेट 'ए सुनील' 'अगं नेहा' असे म्हणायची पद्धत असल्याने 'पंत, राव' वगैरे शब्दही विरळ होत आहेत. एखाद्याच्या पत्नीला संबोधताना पूर्वी 'अमक्याचे कुटुंब' 'तमक्याची मंडळी' असे म्हणत असत. अर्धांग, कलत्र, अस्तुरी, कारभारीण असेही शब्द नवरा आपल्या बायकोबाबत वापरु शकत असे.

कधी कधी सभ्यतेच्या आग्रहापोटी बरेच शब्द अशिष्ट ठरवले जाऊन बाद ठरतात. त्यांचा सार्वजनिक उच्चार करणेही ओशाळवाणे ठरते. मराठी व इंग्रजीत हा कल समांतरच दिसून येतो. गंमत पाहा. अगदी २०-२५ वर्षांमागे 'हागणे' 'मुतणे' या शब्दांचे समाजाला फारसे वावगे वाटत नसे. ('पाण्यात हागलं तरी वर तरंगतच ' आणि 'वाळूत मुतलं, ना फेस, ना पाणी' अशा म्हणी मराठीत रुढ होत्या.) आता मात्र हे शब्द उच्चारणे कसेसेच वाटते. संडास, शौचकूप, मुतारी या जागी 'स्वच्छतागृह' हा एकच शब्द रुढ झाला आहे.

इंग्रजीतही पूर्वी लॅट्रिन शब्द होता. त्याची जागा 'टॉयलेट' ने घेतली. मग 'टॉयलेट' ही ओल्ड फॅशन्ड वाटू लागला म्हणून 'वॉटर क्लोसेट (डब्ल्यू. सी.)' हा शब्द आला. आताशा थेट बोलताना हे कोणतेही शब्द न वापरता 'फॅसिलिटी' इतकाच शब्द वापरतात. हॉटेलात किंवा सार्वजनिक ठिकाणी ' आय वुड लाईक टु यूज द फॅसिलिटीज' हे शिष्टसंमत ठरते. सभ्यतेच्या आग्रहातून आपण थेटपेक्षा संदिग्धला जवळ करतो.

मामा

श्री.योगप्रभू यांचे सोदाहरण लिखाण या धाग्याला फारच रुचकर बनवीत आहे.

"पण 'अहो बाई' हा आदरार्थी शब्द खटकतो, ही गंमतच आहे."

~ काही काही गावात/शहरात अन्य नात्याने उल्लेख केला तरा नापसंती दर्शविली जाते याचा अनुभव मी घेतला आहे. उदा. पुण्या/मुंबईत 'अहो मामा' किंवा 'अहो मावशी, हा पत्ता जरा सांगता का ?" असे म्हटले की काही वेळा 'मामा' नाखुशीने का होईना उत्तर देईल, पण 'मावशी' म्हटल्यामुळे समोरील स्त्री ला राग येतो. कदाचित 'मामा करणे' म्हणजे फजिती असे काहीसे चक्र डोक्यात बसलेले असते. मात्र 'काका' वा 'काकी' म्हटले तर का कोण जाणे खटकत नाही.

दुसरीकडे सांगली/सातारा/कोल्हापूर या जिल्ह्यात 'मामा' अतिशय प्रिय नाते मानले जाते. या भागातील मुलांना मामाचे प्रेम मिळणे हे बापाच्या प्रेमापेक्षा मोलाचे मानले जाते [अन्यत्रही असेलच म्हणा]. कोल्हापुरात तर हॉटेलमध्ये दुकानासाठी चहाची ऑर्डर देतानादेखील 'साठेमामाच्या दुकानात चार चहा घेऊन जा रे' असा पुकारा गल्ल्यावरील मालक करतो.

[पु.ल.देशपांडे यानी तर 'व्यक्ती आणि वल्ली' मध्ये लिहिले आहेच : "कोल्हापुरात मामाचा पूर्ण उच्चार न करता आडनावाला फक्त 'मा' लावूनच संबोधिले जाते. जसे 'मानेमा', 'दत्तामा', 'दामलेमा'.]

२. "त्यानंतर 'यजमान' 'मालक' 'धनी' 'कारभारी' असे शब्द रुढ झाले."

~ याच धारेत 'साहेब' हे आणखीन् एक नाम. विशेषतः नवरा सरकारी कर्मचारी असला [बायकोसाठी तो कोणत्या पदावर काम करतो हे महत्वाचे नसते] आणि समजा त्याला घरी भेटायला बाहेरचे कुणी आले व हा गब्रु घरी नसला की, बायको आतूनच 'साहेब, बाहेरगावी गेल्यात' असे रुबाबात फर्माविते. माहेरकडील मंडळीतही ती नवर्‍याचा उल्लेख 'जाते बाई आता लवकर, साहेब येण्याची वेळ झाली' असेच म्हणणार.

:)

>>(दूरदेशी गेला बाबा, कामातून गेली आई)

हे असे नसून "(दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई)" असे आहे, "आई कामातून गेली" हे जरा आक्षेपार्ह वाटू शकते. (ह.घ्या.) :)

चू.भू. दे. घे.

अच्छा! कामावर गेली आई, असे ते शब्द आहेत तर. दुरुस्तीसाठी धन्यवाद :)
पण 'कामातून गेली आई' हे वास्तवार्थाने घेणार्‍याला खटकू शकेल. घरगुती भाषेत बोलताना 'आई कामातून गेली'चा एक अर्थ 'आई इतकी उदास झाली, की कोणत्याही कामात तिचे लक्ष लागेना.' असेही म्हणता येईल की.
असो. हे अवांतर झाले. चुका दाखवणार्‍या माणसांचे कधीही कौतुक.

टॉयलेट, डब्ल्यू. सी. इत्यादि

कॅनडातली Wash-Room सीमा ओलांडून दक्षिणेत अमेरिकेत पाऊल टाकताच Rest-Room होते ही लगेच जाणवणारी बाब आहे.

झाड्याला

गावाकडे शेतकरी वा बहुजन समाजात संडासला जाणे ला झाड्याला जाणे असे म्हणतात. "बाबौ मपल्याला झाड्याला लागलीय" अस मुलगा ईष्ट्यांड ( एस्टी स्टँड) वर सांगतो तेव्हा बाप म्हणतो कि जा वढ्याव पल्याड. ग्रामीण भागात परसाकडे गेला असेही पुढे शब्द संस्कारीत झाले आहे. त्याचे थोडे ब्राह्मणी रुप म्हणजे शौचाला गेला आहे. शहरात आल्यावर लाईट च्या बटनांवर ड्ब्लू सी असे लिहिलेले बटन असले की ते संडासमधील लाईटचे असते असे निरिक्षणांती समजले. (त्याचा लाँग फॉर्म आत्ताशी योगप्रभू मुळे समजला ) त्यानंतर लॅट्रीन शब्दाची ज्ञानात भर पडली. पुढे टॉयलेट शब्द वापरला जाउ लागला हे समजले. पण त्यातुन काहींचा गोंधळ होतो. टॉयलेट कुठे आहे असे विचारल्यास 'मुतारी' असा अर्थ अभिप्रेत आहे कि 'शौचालय' या बाबत संभ्रम होतो. अर्थात आता कमोड दोन्हीची गरज भागवतो.
रेस्ट रुम शब्द कसा झकास वाटतो. स्वच्छतागृह इतके सुंदर व स्वच्छ आहे की चक्क तिथे कमोड वर बसल्यावर डोळाच लागतो असे चित्र डोळ्यासमोर येते.
प्रकाश घाटपांडे

कोण म्हणते आहे यावर अवलंबून

>>पण 'अहो बाई' किंवा 'अहो मावशी' हे आदरार्थी शब्द खटकतात.<< हे कोण म्हणते आहे त्यावर अवलंबून असते. ताई, बाई, अहो बाई, मावशी, काकू, आजी, आजीबाई असे म्हणणारा पुरुष आहे की बाई आहे, त्याचे/तिचे वय, व्यवसाय, जिला म्हणतात तिचे वय आणि समाजातील स्थान यावर, ते वापरलेले संबोधन स्त्रीला खटकते किंवा चालते. यासाठी मराठी संस्कृतीचे थोडेफार ज्ञान असावे लागते.
शिक्षिकांना संबोधताना अजूनही बाई म्हणतात व शिक्षकांना आणि पुरोहितांना गुरुजी. त्यांच्या पश्चातही त्यांचा उल्लेख असाच केला जातो. आणि त्यांना तो खटकत नाही.---वाचक्नवी

 
^ वर