इंटरनेट प्रायव्हसी

इंटरनेटवर लाखो संकेस्थळे आहेत. त्यातील काही संकेतस्थळावर आपण सदस्य होतो. उदा. फेसबुकासारख्या संकेतस्थळावर तर लोक बिंदास आपली खासगी माहिती देताना दिसतात. फोटो टाकतात. मुलगा काय करतो, मुलगी काय करते, काल कुठे जेवलो, परवा कुठे जाणार आहे हे सगळे जाहीर करतो. ह्या माहितीचा काही समाजकंटक गैरवापर करू शकतात हे आपल्या बहुधा ध्यानीमनीही नसते. शेवटी आपण स्वतःदेखील आपली प्रायव्हसी जपायला हवी हे आपण पूर्णपणे विसरतो. हे झाले झुकेरबर्गाच्या फेसबुकाचे.

आता काहीशे नियमित सदस्यांची किरकोळ संकेतस्थळेही असतात. ही संकेतस्थळे तशी घट्ट विणलेली (क्लोज निट) असतात. काही हौशी मंडळी अशी संकेतस्थळे चालवत असतात. तिथले सदस्य तिथल्या खरडवहीचा, खरडफळ्याचा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यक्तिगत निरोप ह्यासारख्या सुविधेचा वापर करतो. हे सगळे करताना आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी संकेतस्थळाची प्रायव्हसी पॉलिसी वाचलेली नसते. किंबहुना संकेतस्थळ चालवणाऱ्यांनाही प्रायव्हसी पॉलिसीचे महत्त्व माहीत नसते. सदस्याच्या प्रायव्हसीचा भंग झाल्यास कुठली कायदेशीर पावले उचलता येतात हे बहुतेकांना माहीत नसते. संकेतस्थळ चालविणाऱ्यांनी सदस्याची खासगी माहिती काढून कुणाला विकली तर काय करावे? सदस्यांचे व्यक्तिगत निरोप वाचून त्याचा भलाबुरा उपयोग केल्यास काय करावे? संकेतस्थळ चालविणाऱ्यांना दोन सदस्यांचे खासगी संवाद वाचण्याचा अधिकार आहे काय? वगैरे वगैरे.

तर असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि ह्या प्रश्नांचे आपल्याकडे सहसा उत्तर असतेच असे नाही. किंवा उत्तर असले तरी शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याची ताकद किंवा ऊर्जा असतेच असे नाही. ह्या धाग्यातून इंटरनेट प्रायव्हसीसंदर्भात पडणारे असे प्रश्न सदस्यांनी मांडून इंटरनेट प्रायव्हसीसंदर्भात आणि, शक्य झाल्यास, कायदेशीर उपायांबाबत चर्चा करावी, ही विनंती.

Comments

इंटरनेट प्रायवसी

ही चर्चा योग्य मार्गाने आणि धोरणांनुसार चालेल अशी आशा करूनच पुढे प्रतिसाद देते.

फेसबुकासारख्या संकेतस्थळावर तर लोक बिंदास आपली खासगी माहिती देताना दिसतात. फोटो टाकतात. मुलगा काय करतो, मुलगी काय करते, काल कुठे जेवलो, परवा कुठे जाणार आहे हे सगळे जाहीर करतो. ह्या माहितीचा काही समाजकंटक गैरवापर करू शकतात हे आपल्या बहुधा ध्यानीमनीही नसते. शेवटी आपण स्वतःदेखील आपली प्रायव्हसी जपायला हवी हे आपण पूर्णपणे विसरतो.

आम्ही आता सी.एन. टावरच्या माथ्यावर आहोत, आम्ही आता सेंट्रल पार्कमध्ये फेरफटका मारत आहोत किंवा सध्या आम्ही फ्लोरिडाला सुट्टीवर आहोत असे फे.बु.वर जाहीर करणार्‍या माझ्या मैत्रिणींची मला गंमत वाटत आली आहे. अशी उठवळ प्रसिद्धी लोकांना का कराविशी वाटते हे कळत नाही. झकेरबर्गच्या फेसबुकावरच अनेक तर्‍हेने आपली प्रायवसी आपल्याला राखता येते याची तर अनेकांना कल्पनाच नसते. आपले फोटो, आपल्या कुटुंबियांचे फोटो कोणाही ऐर्‍या गैर्‍याला दिसतील, आपल्या वॉलवरील संदेश कोणालाही दिसतील, काही संदेश हे "मेसेज" (फे.बु. व्य. नि.) म्हणून पाठवायचे असतात ही साधी समज अनेकांना नसते. फेबुवर ग्रुप्स करता येतात आणि काही निवडक व्यक्तींना त्यात सामील करून त्या ग्रुप्समध्ये जे प्रसिद्ध केले जाते ते त्या ग्रुपचे सदस्य असणार्‍या व्यक्तीच पाहू शकतात वगैरे वगैरे साध्या गोष्टींची माहितीही अनेकांना नसते आणि ज्यांना ही माहिती नसते ते गाफील असल्याने त्यांच्या प्रायवसीवर हल्ले होण्याची शक्यता अधिक असते.

हे सगळे करताना आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी संकेतस्थळाची प्रायव्हसी पॉलिसी वाचलेली नसते.

उपक्रम आणि मिसळपाव या दोन्ही संकेतस्थळांवर अतिशय त्रोटक प्रायवसी पॉलिसी आहे, जी संकेतस्थळ तुमच्या इमेल आणि आयपीची नोंद करते असे म्हणते आणि सेशन राखण्यासाठी कुकीजचा वापर करते. मनोगत आणि मी मराठीवर मला कोणतीही प्रायवसी पॉलिसी आढळली नाही. तुमच्या व्यक्तिगत निरोपांबद्दल ही सर्व संकेतस्थळे काहीच बोलत नाहीत. याचाच अर्थ ज्याच्याकडे साइट ऍडमिनिस्टरचे राइट्स आहेत ती व्यक्ती सहजगत्या तुमचे व्यक्तिगत निरोप वाचू शकेल असे वाटते. अशाच एखाद्या निरोपात तुम्ही एखाद्याकडे तिसर्‍या व्यक्तीची निर्भर्त्सना केली असेल, तुमचा फोन नंबर दुसर्‍याला कळवला असेल, तुमच्या आयुष्यातील सुखद किंवा दु:खद घटना एखाद्याला कळवली असेल किंवा एखाद्याला प्रेमपत्र लिहिले असेल ;-) आणि हे सर्व एखाद्या पोरकट व्यक्तीच्या हातात पडले तर त्याचा गैरवापर होणे सहजशक्य आहे.

संकेतस्थळ चालविणाऱ्यांनी सदस्याची खासगी माहिती काढून कुणाला विकली तर काय करावे? सदस्यांचे व्यक्तिगत निरोप वाचून त्याचा भलाबुरा उपयोग केल्यास काय करावे?

काहीही नाही. आपल्या डोक्याला ताप करून घ्यायचा, वाईट वाटून घ्यायचे आणि मग नंतर कालांतराने असे करणार्‍या व्यक्तीला माफ करायचे. विशेषतः मराठी संकेतस्थळे ही फेबुप्रमाणे मित्र-मित्र, मित्रांचे मित्र आणि मित्रांच्या मित्रांचे मित्र यांतून मोठी झाली आहेत. पैकी अनेक साइट्सवर साइटमालकांनी आपल्या मित्रमंडळाला हवे तसे अधिकार दिले असणेही शक्य आहे. अशा परिस्थितीत आपापसांतील साटेलोटे दूर करून एखाद्या विषयी कठोर निर्णय घेणे, तक्रार नोंदवणे त्यासाठी पुरावे गोळा करणे वगैरे वगैरे पिडीतालाच अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. दुसर्‍या शब्दांत, व्हिसलब्लोअरलाच जास्त शिक्षा होण्याची शक्यता आहे. किंबहुना, "जाऊ द्या, पुन्हा असे नाही होणार" अशी वांझोटी आशा दाखवणारे अधिक मिळतील असे वाटते.

संकेतस्थळ चालविणाऱ्यांना दोन सदस्यांचे खासगी संवाद वाचण्याचा अधिकार आहे काय?

याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे हे सर्वांना माहित आहे परंतु प्रत्यक्षात असे घडत नसेल काय? तर ते घडत असावे याची शक्यता मोठी आहे. याविषयी आपण फारसे काही करू शकतो असे वाटत नाही. घाबरटांनी लपून राहणे किंवा आपला वावर अतिशय कमी ठेवणे हा एक पर्याय आहे किंवा लोकांशी व्यक्तिगत संबंध या मराठी साइट्सवरून न वाढवणे (त्यासाठी जीटॉक, जीमेल, याहू, हॉटमेल अशा पारंपरिक इमेल साइट्सचा वापर करणे योग्य ठरेल.) पैकी दुसरा पर्याय मला अधिक रुचतो. किंबहुना, काही काळापूर्वी हे माझ्या लक्षात आल्यावर मराठी साइट्सवरील निरोपांतर्फे फार खाजगी माहिती देणे मी टाळते पण भूतकाळात अशी माहिती माझ्याकडून नक्कीच दिली गेली असेल आणि त्याचे लॉग्ज अद्यापही शिल्लक असतील.

असो. तर अशा गोष्टींबाबत आपण फारसे काही करू शकत नाही पण आपण ज्या साइट्सवर नांदतो ती साइट एखादी प्रगल्भ व्यक्ती चालवते का हे पाहणे योग्य राहील. अर्थातच, प्रगल्भ व्यक्ती कधीतरी कातावून वेडाचार करू शकत नाहीत असे नाही. असे काही घडले आहे असे जेव्हा कानावर येते तेव्हा परस्पर विश्वास कमी होतो असे वाटते.

"देर आये, दुरुस्त आये" या चालीवर सध्यातरी मराठी साइट्सवरील व्य. नि. सुविधा स्वतःच बंद करून टाकणे आणि ती सुविधा नसेल तर जुने निरोप उडवून टाकणे इतकी काळजी मी घेईन असे वाटते.

अवांतरः हा प्रतिसाद लिहिताना मला किंचित मानसिक त्रास झाला असे म्हणावे लागेल तो कमी करण्यासाठी एक खाजगी गोष्ट प्रसिद्ध करावी म्हणते. माझ्या कुटुंबातील एक सदस्य नुकतेच झकेरबर्गला भेटून आले. ;-) हेहेहे!

+१

प्रतिसादाशी सहमत आहे.

याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे हे सर्वांना माहित आहे परंतु प्रत्यक्षात असे घडत नसेल काय? तर ते घडत असावे याची शक्यता मोठी आहे.

नुकतेच एका संकेतस्थळावरुन एका जेष्ठ सदस्याची हकालपट्टी झाली. सदर सदस्य निरोप चोरुन वाचायचा असे कळते. खरे खोटे देव जाणे पण अशा प्रकारचे वर्तन हे माणुसकिला काळीमा फासणारे आहे. कुणाचेही निरोप चोरून वाचणे हा गंभीर प्रकार आहे. संकेतस्थळ चालकांनी ह्याची जवाबदारी घेऊन सदस्यांना कळवणे आवश्यक आहे, पण तसे झालेले नाही.

काही मजकूर संपादित.

धक्कादायक

सदर सदस्य निरोप चोरुन वाचायचा असे कळते.

हे स्थळ ड्रुपलवर चालणारे आहे काय? तसे असल्यास ड्रुपलमधे प्रोटेक्शन नाही असे आहे का? चोरून व्यनि वाचणे शक्य असेल तर संकेताक्षरे वाचणेही शक्य असावे. कृपया तज्ञांनी मार्गदर्शन करावे. अनेकजण एकच कॉमन संकेताक्षर बर्‍याच ठिकाणी लॉगिनसाठी वापरतात (इमेल, बँक अकाउंट इ.इ.) हा विदा संमतीशिवाय पाहणे ही खरंच गंभीर बाब आहे. ज्या संकेतस्थळावर हा प्रकार घडला त्याच्या चालकांनी घडला प्रकार दाबुन न ठेवता लोकांना योग्य माहिती द्यावी. सदस्यांना ह्याची माहिती मिळणे आवश्यक आहे जेणेकरुन त्यांना योग्य ती काळजी घेता येईल. अन्यथा हा अप्रामाणिकपणा ठरेल.

दोन शक्यता

मला उपलब्ध असलेल्या थोड्याबहुत ड्रूपलज्ञानानुसार, चौकीदाराचीच किंवा त्याच्या मित्राची नियत चोरीची असल्याशिवाय असे चोरून व्य. नि. वाचणे शक्य नाही. (इथे स्क्रिप्टिंग अटॅकची शक्यता लक्षात घेतली गेलेली नाही.) ड्रूपलचा पासवर्ड हा एनक्रिप्टेड (अधिक अचूकपणे हॅश्ड) असतो. त्यामुळे तो दिसत नाही. आता व्यक्तिगत निरोप बघण्यासाठी दोन मार्ग आहेत.

१. असे एखादे ड्रूपल मोड्यूल वापरावे जेणे करून परकायाप्रवेश करणे शक्य व्हावे. त्यासाठी ड्रूपलकडे मॅस्करेड हे मोड्यूल ड्रूपलसाठी उपलब्ध आहे. हे वापरल्यावर कुणाच्याही खात्याववर जाऊन त्याचे निरोप वाचता येऊ शकतात. अर्थात मास्करेड कुणी केले हे लॉगवरून कळू शकते. सहसा मास्करेड मोड्यूल वापरण्याची परवानगी ही ऍडमिनकडेच असते. पण माझ्या माहितीनुसार माहितीनुसार उपक्रमावर असे कुठलेही मोड्यूल उपक्रमावर अगदी कटाक्षाने, धोरण म्हणून, स्थापित करणे टाळलेले आहे.

मॅस्करेड हे मोड्यूल चाचण्या घेण्यासाठी डेवलपमेंट साइटवरही वापरले जाते. मात्र प्रडक्शन साइटवर मॅस्करेड वापरायलाच नको. कारण त्याचा गैरवापर वरीलप्रकार चोरून व्य. नि. वाचण्यासाठी केला जाऊ शकतो.

२. डेटाबेसमध्ये जाऊन तिथून व्यक्तिगत निरोपाच्या टेबलात तोंड मारणे. पीएचपीमायएडमिनमधून ऍडमिन हव्या त्या चौकश्या (क्वेऱ्या) करू शकतो.

असो. बाकी चोरून चोरून व्यनि बघणे हा गंभीर विश्वासघाताचा मामला आहे. त्यावर योग्य ती कारवाई व्हायलाच हवी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हे

पण माझ्या माहितीनुसार माहितीनुसार उपक्रमावर असे कुठलेही मोड्यूल उपक्रमावर अगदी कटाक्षाने, धोरण म्हणून, स्थापित करणे टाळलेले आहे. हे वाक्य वाचून काहीसे बरे वाटले. :)
स्थळाची नीती म्हणून हे आवडले. या प्रकारे विश्वासाचे वातावरण कायम राहण्यास मदत होते.

२. डेटाबेसमध्ये जाऊन तिथून व्यक्तिगत निरोपाच्या टेबलात तोंड मारणे. पीएचपीमायएडमिनमधून ऍडमिन हव्या त्या चौकश्या (क्वेऱ्या) करू शकतो.

आंतरजालावर काहीही खासगी असे नसते हे परत एकदा अधोरेखित करणारा मुद्दा आहे. तरीही खासगी नाही म्हणून कुठेही माहितीच्या चोर्‍या करता कामा नयेत हे ही खरेच.

तरीही आंतरजालावरची कारवाई काय करावी आणि कोणत्या स्वरूपात असावी हे कसे ठरवणार?

-निनाद

तो मी नव्हेच

वरील प्रतिसाद लिहिणारी व्यक्ती "विनायक" म्हणजे मी नाही. मी पूर्वी "विनायक" आयडीने लिहीत असल्याने लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा. हे "विनायक" म्हणजे पूर्वाश्रमीचे "बेसनलाडू".

विनायकरावांशी सहमत

नुकतेच एका संकेतस्थळावरुन एका जेष्ठ सदस्याची हकालपट्टी झाली. सदर सदस्य निरोप चोरुन वाचायचा असे कळते. खरे खोटे देव जाणे पण अशा प्रकारचे वर्तन हे माणुसकिला काळीमा फासणारे आहे. कुणाचेही निरोप चोरून वाचणे हा गंभीर प्रकार आहे

.
सहमत आहे. या ज्येष्ठ सदस्यांनी उठसूट इशारे देणाऱ्या एका सदस्याला उपक्रमावर तर सोडलेले नाही. ह. घ्या. हे. वे. सां. न. ल.

नोटिस

नोटिस

मनोगत आणि मी मराठीवर मला कोणतीही प्रायवसी पॉलिसी आढळली नाही. तुमच्या व्यक्तिगत निरोपांबद्दल ही सर्व संकेतस्थळे काहीच बोलत नाहीत. याचाच अर्थ ज्याच्याकडे साइट ऍडमिनिस्टरचे राइट्स आहेत ती व्यक्ती सहजगत्या तुमचे व्यक्तिगत निरोप वाचू शकेल असे वाटते. अशाच एखाद्या निरोपात तुम्ही एखाद्याकडे तिसर्‍या व्यक्तीची निर्भर्त्सना केली असेल, तुमचा फोन नंबर दुसर्‍याला कळवला असेल, तुमच्या आयुष्यातील सुखद किंवा दु:खद घटना एखाद्याला कळवली असेल किंवा एखाद्याला प्रेमपत्र लिहिले असेल ;-) आणि हे सर्व एखाद्या पोरकट व्यक्तीच्या हातात पडले तर त्याचा गैरवापर होणे सहजशक्य आहे. ही विधाने वस्तुस्थितीचा विपर्यास करुन मी मराठीची बदनामी करण्यासाठी हेतुपुरस्सर लिहिलेली आहेत.

वस्तुतः मी मराठी हे आपली ध्येये, धोरणे, उद्दीष्टे अत्यंत सुस्पष्ट भाषेत मांडणारे, संकेतस्थळ आणि सदस्य यांच्यातील नाते व परस्परविषयक जबाबदार्‍या निसंदिग्ध भाषेत विषद करुन सदस्यत्व निर्माण होण्यापुर्वी तसा करार करणारे मराठी भाषेतील पहिले संकेतस्थळ आहे. मी मराठीची ध्येये, धोरणे, उद्दीष्टे व नियम याबाबतची संपुर्ण माहिती मी मराठीच्या होमपेजवर http://www.mimarathi.net/node/860 येथे शुक्र, 12/03/2010 - 11:44 पासून आहे.

असे असतानाही प्रियाली यांनी सदर विधाने करुन मी मराठीची हेतुपुरस्सर बदनामी केलेली आहे. ही बदनामीकारक खोटी माहिती उपक्रम या संकेतस्थळावरुन प्रसारित करण्यात आलेली असून उपक्रमचे मालक, चालक, संचालक, संपादक, व्यवस्थापक इत्यादींनी देखील ही माहिती प्रसारित करुन मी मराठीची बदनामी केलेली आहे. हा भारतीय दंड संहिता कलम ४९९, ५००, ५०१ व ५०२, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ७१, ७४, ७५ अंतर्गत दंडनीय फौजदारी गुन्हा आहे. याखेरीज ही विधाने केल्यामुळे व ती प्रसारीत केल्यामुळे भारताच्या राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) अन्वये भारताच्या नागरीकांना प्रदान करण्यात आलेल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मी मराठीविरुद्ध हेतुपुरस्सर संकोच करण्यात आलेला आहे. हा देखील सदर सदस्य, उपक्रम, तसेच उपक्रमचे मालक, चालक, संचालक, संपादक, व्यवस्थापक इत्यादींनी केलेला गुन्हाच आहे.

ही खोटी, धादांत असत्य, दिशाभुल करणारी व बदनामीकारक विधाने केल्याबद्दल उपक्रमच्या सदस्या प्रियाली, उपक्रम, तसेच उपक्रमचे मालक, चालक, संचालक, संपादक, व्यवस्थापक इत्यादींविरुद्ध फौजदारी तसेच दिवाणी स्वरुपाची कारवाई करण्याचे सर्व अधिकार मी मराठीला असुन, मी मराठी या वैध अधिकारांचा वापर करुन उपक्रमच्या सदस्या प्रियाली, उपक्रम, तसेच उपक्रमचे मालक, चालक, संचालक, संपादक, व्यवस्थापक यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देत आहे.

राज जैन

http://www.mimarathi.net करिता.
email - admin@mimarathi.net
(+91 - 7798409496 / +91- 9595595195 )

विनोदी प्रतिसाद

प्रतिसाद विनोदी आहे. की पब्लिसिटी स्टंट? पण नक्कीच उगाच राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न दिसतो आहे. प्रियाली ह्यांनी हेतुपुरस्सर मीमराठीची बदनामी केली आहे असे वाटत नाही. तुम्हाला का असे वाटावे कळत नाही. मीमराठी त्यांच्यासाठी एवढी महत्त्वाची किंवा चिल्लर आहे असेही मुळीच वाटत नाही. तेही जाऊ द्या.

प्रायवसी पॉलिसी वेगळी दिलेली असते. त्यात वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग होणार नाही वगैरे वगैरे दिले असते. आयपी, कुकीज़च्या वापराबाबत सांगितले असते. 'मी मराठीची उद्दिष्टे धोरणे व ध्येय' म्हणजे प्रायवसी पॉलिसी नाही. तो नोड नीट तपासा. हे सगळे तुमच्यासारख्या ह्या क्षेत्रातल्या माणसाला सांगावे लागत आहे. असो. शांत व्हा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नीट वाचा

मी म्हटले आहे की अशी नोटीस मला आढळली नाही. मलाखाली अधोरेखाही आहे. याचा अर्थ मी ती शोधू शकले नाही किंवा मला ती दिसली नाही. आता तुम्हाला यापुढे जे काही करायचे ते अवश्य करा. उलट, तुम्ही माझे उद्धृत वापरताना माझ्या मला या शब्दाखालील अधोरेखा काढून आणि मूळ प्रतिसादातील पहिले वाक्य काढून जो घाणेरडा प्रकार केलात तो अयोग्य असल्याने आणि माझी बदनामी तुम्ही केल्याने मीच तुमच्यावर दावा ठोकायला हवा.

बाकी, तुमच्या थोड्याशा माहितीसाठी प्रायव्हसी पॉलिसी आणि मी मराठीची उद्दिष्टे धोरणे व ध्येय या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही जो दुवा दिलात त्यात प्रायवसी पॉलिसी नाही. एक मराठी संकेतस्थळ चालवणार्‍या माणसाला ते माहित नसेल तर हे दुर्दैव आहे. तरीही आपण दावे वगैरे ठोकण्याची भाषा करत असाल तर आपला उद्देश वेगळाच असावा असे वाटते असो.

आणि हे सर्व एखाद्या पोरकट व्यक्तीच्या हातात पडले तर त्याचा गैरवापर होणे सहजशक्य आहे.

आपल्या वरील प्रतिसादाबद्दल आभारी आहे. माझा मुद्दा पटवून देण्यासाठी यापेक्षा अधिक बरा पुरावा कोणाकडून मिळाला असता बरे?

उपक्रमाची बदनामी करून कारण नसताना अशाप्रकारे वातावरण बिघडवण्याच्या या प्रयत्नासाठी हे संकेतस्थळ या मनुष्यावर योग्य ती कार्यवाही करेल अशी आशा बाळगते.

भाषा

तरीही आपण दावे वगैरे ठोकण्याची भाषा करत असाल तर आपला उद्देश वेगळाच असावा असे वाटते असो.

माझ्यामते उपक्रम व्यवस्थापनाला धमक्या देणार्‍या ह्या सदस्याला त्वरीत हाकलून लावावे.

विरामचिन्हांचा वापर

ही विधाने वस्तुस्थितीचा विपर्यास करुन मी मराठीची बदनामी करण्यासाठी हेतुपुरस्सर लिहिलेली आहेत.

चुकून मी हे वाक्य असं वाचलं:

ही विधाने वस्तुस्थितीचा विपर्यास करुन मी, मराठीची बदनामी करण्यासाठी हेतुपुरस्सर लिहिलेली आहेत.
या वाक्यात मी हा कर्ता आहे असा माझा समज झाला. त्यामुळे "मी* हेतुपुरस्सर मराठीची बदनामी करण्यासाठी विधानं का करेन? आणि हे असं उपक्रमासारख्या संस्थळावर जाहीर का लिहेन?" असेही दोन उपप्रश्न डोक्यात तयार झाले. वाचनाचा वेग विचारांच्या वेगापेक्षा कमी पडला की प्रश्न येतो. तस्मात, वाचन वाढवा, विचार कमी करा असा सल्ला मी स्वतःलाच देते आहे.

* मी म्हणजे जी कोण विधान करणारी व्यक्ती असेल ती.

हाहाहाहा

ही विधाने वस्तुस्थितीचा विपर्यास करुन मी, मराठीची बदनामी करण्यासाठी हेतुपुरस्सर लिहिलेली आहेत.

फुटलो!!

अजून एक

... हे सर्व एखाद्या पोरकट व्यक्तीच्या हातात पडले तर त्याचा गैरवापर होणे सहजशक्य आहे. ही विधाने वस्तुस्थितीचा विपर्यास करुन मी मराठीची बदनामी करण्यासाठी हेतुपुरस्सर लिहिलेली आहेत.

ही दोन वाक्य एकापाठोपाठ, एकाच परिच्छेदात येणं हे ही थोडंसं विनोदी वाटलं.

बंडल आणि बोर

हा भारतीय दंड संहिता कलम ४९९, ५००, ५०१ व ५०२, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ७१, ७४, ७५ अंतर्गत दंडनीय फौजदारी गुन्हा आहे. याखेरीज ही विधाने केल्यामुळे व ती प्रसारीत केल्यामुळे भारताच्या राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) अन्वये भारताच्या नागरीकांना प्रदान करण्यात आलेल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मी मराठीविरुद्ध हेतुपुरस्सर संकोच करण्यात आलेला आहे. हा देखील सदर सदस्य, उपक्रम, तसेच उपक्रमचे मालक, चालक, संचालक, संपादक, व्यवस्थापक इत्यादींनी केलेला गुन्हाच आहे.

बंडल

करुन उपक्रमच्या सदस्या प्रियाली, उपक्रम, तसेच उपक्रमचे मालक, चालक, संचालक, संपादक, व्यवस्थापक यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देत आहे.

बोअर

बंडल बोर

http://gappbasaayachekaayghesheel.com करिता

email - bundlebore@gappbasaayachekaayghesheel.com

(+91 20 26695253)

?

ही साइट अजून सुरू आहे?? असो..प्रायवसी पॉलीसी वेगळी आणि ध्येय धोरणे वेगळी हे कळू नये हा शिक्षणाचा अभाव आहे असे वाटते.

राजे

या मागे हेतु आहे असे सकृतदर्शनी वाटत नाही. पण यानिमित्त मी मराठीची काय पॉलिसी आहे हे अधोरेखित करता आले असते. मराठी संकेत स्थळे ही मराठी च्या वृद्धीसाठी आहेत. प्रत्येक संकेतस्थळाची प्रकृती वेगळी आहे. परस्परांचा आदर करीत सहप्रवास करावा हे यानिमित्त आवर्जुन सांगावेसे वाटते. कायदेशीर तांत्रिक बाबींना वेठीस धरु नये! मी म दुखावले गेले असेल हे मान्य पण हेतुपुर्वक केले हे अमान्य!
प्रकाश घाटपांडे

पडदा

योग्य आणि समजुतदार प्रतिसाद +

~ विशेषतः "मराठी संकेत स्थळे ही मराठी च्या वृद्धीसाठी आहेत." या वाक्याला १००% अनुमोदन. बाजूने तसेच विरोधी अशा अनेक कायदेशीर बाबी सायबर लॉच्या कक्षेत येतही असतील पण म्हणून मराठीवर प्रेम करणार्‍या आणि ती भाषा वृद्धींगत होण्यासाठी झटणार्‍या संस्थळ मालकांनी/व्यवस्थापनाने/संपादकांनी त्यांचा वापर एकमेकाविरुद्ध करण्याने तीत 'मराठी भाषेसाठी' काही साध्य होईल असे बिलकुल वाटत नाही. उलटपक्षी श्रम आणि बहुमुल्य असा पैसाच त्यात [व्यर्थ] व्यतीत होत राहिल. [मी तर असे वाचले आहे कुठेतरी की, कित्येक व्यवस्थापकीय मंडळी पदरच्या खिशाला चाट लावून संस्थळाच्या वाढीसाठी वेळ देत असतात.]

मी मराठीचे संस्थापक श्री.राज जैन याना त्यांच्या संस्थळाविषयी इथे प्रसिद्ध झालेला मजकूर त्या संस्थळाविषयी गैरसमज पसरवणारा वाटल्यास त्याना दोष देता येणार नाही. त्याऐवजी प्रियालीताईंनी थेट नावे न घेता संबंधित प्रतिसादातील मजकुरात "मनोगत आणि मी मराठीवर मला कोणतीही प्रायवसी पॉलिसी आढळली नाही" ऐवजी "काही संस्थळांवर मला कोणतीही प्रायवसी पॉलिसी आढळली नाही" असे सुचविले असते तरी अन्य वाचकांना त्यांचा मुद्दा समजलाच असता.

असो. या विषयावर कायमचा पडदा पडला तर ती गोष्ट स्वागतार्हच मानली जाईल.

का बरे?

त्याऐवजी प्रियालीताईंनी थेट नावे न घेता संबंधित प्रतिसादातील मजकुरात "मनोगत आणि मी मराठीवर मला कोणतीही प्रायवसी पॉलिसी आढळली नाही" ऐवजी "काही संस्थळांवर मला कोणतीही प्रायवसी पॉलिसी आढळली नाही" असे सुचविले असते तरी अन्य वाचकांना त्यांचा मुद्दा समजलाच असता.

नावे न घेता मुद्दा समजला असता हे अशोक पाटील कशावरून म्हणतात? मी मराठी, मनोगत, उपक्रम, मिपा, ऐलपैल, मायबोली किंवा पुवि यांच्याशी माझे काहीही शत्रुत्व नाही. साधा ध्येय, धोरणे आणि प्रायवसी पॉलिसी यांतील फरक समजण्याची क्षमता नसणार्‍या सदस्यांना हा मुद्दा नावे न घेता समजेल असे पाटील यांना कोणत्या पूर्वानुभवांवरून वाटते? तसेच, मी ज्या संकेतस्थळांवर जाऊन तपासले त्या संकेतस्थळांची संदर्भांखातर नावे न देता उगीचच गुळमुळीत स्टँड घ्यावा असा सल्ला पाटील मला का देत असावे? असे बोटचेपे धोरण घेणार्‍यांमुळे गुन्हे वाढण्यास वाव मिळण्याची शक्यता असते असे वाक्य मी येथे टाकले तर ते अयोग्य असेल का? प्रत्यक्ष ज्या संकेतस्थळावर हे घडले त्या संकेतस्थळाचे प्रत्यक्ष नाव घेऊन "तेथे असे घडले" असेही मी म्हटलेले नाही यावरून एखाद्याची बदनामी करणे हा हेतूच नाही तर लोकांना सावध करणे हा हेतू आहे हे पाटील आणि घाटपांडे यांच्या लक्षात आले का?

संदर्भ देऊन मुद्दे मांडणे ही उपक्रमाची पद्धत आहे, संकेतस्थळांची प्रायवसी ही जाहीर बाब असते, ती संकेतस्थळांच्या हेडर किंवा फूटरमध्ये स्पष्ट दिलेली असते. तिचा संदर्भासकट उल्लेख करू नये असे पाटील यांना का वाटावे? या उप्पर, राजे (राज जैन) यांनी आमची प्रायवसी पॉलिसी "क्ष" पानावर टिचकी मारून नंतर "य" पानावर गेल्यास दिसेल असे लिहिले असते तरीही मी "ओह! मला हे माहित नव्हते. कृपया, ही पॉलिसी सर्वांना दिसेल अशी दर्शनी ठेवा." अशी विनंती करून पडदाच पाडला असता.

प्रायवसी पॉलिसी नसल्याने संकेतस्थळांवर कोणते गैरप्रकार होऊ शकतात ही शक्यता वर्तवणे आणि एखाद्यावर बेछूट आरोप करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या वरील प्रतिसादात शक्यता वर्तवल्या आहेत. साइट ऍडमिनिस्ट्रेटरला तुमचे व्यक्तिगत निरोप वाचता येतात हे ही खाली चर्चिले गेले आहे त्यामुळे ड्रुपलबेस्ड स्थळांवर काय होऊ शकते हे सांगणे हे कोणत्या अर्थाने केवळ "मी मराठीची" केलेली बदनामी ठरते? जो मुद्दा इतर सदस्यांना समजला तो राज जैन यांना का नाही समजला? त्या प्रतिसादानंतर इतर सदस्यांनी किंवा मी ही "मी मराठी"वर असे होते किंवा असे झाले आहे असे म्हटलेले नाही. माझ्या वरील प्रतिसादात तसे काहीही नसताना आणि राजे यांनी येथे येऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला हे स्पष्ट दिसत असताना पाटील आणि घाटपांडे यांनी त्यांना सहानुभूती का वाटली असावी?

अद्यापही राज जैन हे मी मराठीवर प्रायवसी पॉलिसी आहे हे दाखवू शकलेले नाहीत. संकेतस्थळावर प्रायवसी पॉलिसी नसणे ही बाब कधीतरी त्यांना अडचणीतही आणू शकते ही शक्यता त्यांना आणि त्यांची बाजू उचलणार्‍यांना कळते आहे का? राज जैन येथे येऊन म्हणाले असते की "मी मराठीवर प्रायवसी पॉलिसी नसली तरी तेथे गैरव्यवहार होत नाहीत. आम्ही लवकरच प्रायवसी पॉलिसी टाकू." तर त्यात राज जैन यांचा मोठेपणा आणि प्रगल्भता दिसली असती. प्रश्नही मिटला असता आणि सदस्यांनी त्यांचे हसे केले नसते पण त्यांनी संकेतस्थळाची ध्येयधोरणे दाखवून, हे तेथे आहेत असे सांगून मी बदनामी करते आहे हे सांगण्याचा आणि मग भादविची कलमे देऊन दावा करण्याची घोषणा केली. हे करताना त्यांना एका महत्त्वाच्या गोष्टीची जाण नाही हा मुद्दा पुढे आला त्याविषयी पाटील आणि घाटपांडे यांना चिंता वाटते का?

मूळ प्रतिसादात अनेकजण दुखावले जाण्याची शक्यता होती. त्यात उपक्रमाचे मालकही आले पण त्यांनी येऊन इथे गोंधळ घातला नाही कारण त्या प्रतिसादातून काय सांगायचे आहे ते कळण्याची मॅच्युरिटी त्यांच्याकडे असावी.

मूळ मुद्द्यावरील चर्चेत भाग घेण्याऐवजी पाटील आणि घाटपांडे यांनी राज जैन यांना सहानुभूती दाखवणे अनाकलनीय आहे. व्हिसलब्लोअरलाच आपल्याकडे दाबले जाते याचा पुनर्प्रत्यय आला. असो.

बाजूने तसेच विरोधी अशा अनेक कायदेशीर बाबी सायबर लॉच्या कक्षेत येतही असतील पण म्हणून मराठीवर प्रेम करणार्‍या आणि ती भाषा वृद्धींगत होण्यासाठी झटणार्‍या संस्थळ मालकांनी/व्यवस्थापनाने/संपादकांनी त्यांचा वापर एकमेकाविरुद्ध करण्याने तीत 'मराठी भाषेसाठी' काही साध्य होईल असे बिलकुल वाटत नाही.

याच्याशी सहमत आहे. दावे ठोकण्याची भाषा करणार्‍या जैन यांनी "मी मराठीची" बदनामी करून प्रियाली या व्यक्तीस काही फायदा होतो का? प्रियाली यांचा इतिहास मी मराठीवर नाराज असणारी व्यक्ती असा आहे का? उपक्रम आणि मी मराठी यांची स्पर्धा किंवा शत्रुत्व आहे का? याचा विचार केला असावा असे मानून मी चालत आहे. अन्यथा, खुट्ट झाले की एकमेकांवर दावे ठोकणार्‍यांचे उद्देश निराळे असतात असे मी मानेन.

काही प्रश्न आणि उत्तरे

१. नावे न घेता मुद्दा समजला असता हे अशोक पाटील कशावरून म्हणतात?

~ माझा संस्थळांवरील वावर हा अगदी नवखा म्हणावा असा असल्याने या एक-दोन महिन्याच्या अनुभवाने [वा जालीय भटकंतीमुळे] मला उपक्रम, मायबोली, मी मराठी ही संकेतस्थळे माहीत झाली. 'मी मराठी' वरील एका सदस्यमित्राच्या सूचनेवरून वाचन आवड असल्याने मग नंतर 'पुस्तकविश्व' चाही सदस्य झालो. मनोगत आणि मिसळपाव यांची मी फक्त नावेच इथल्या [उपक्रमच्या] चर्चेत वाचली. बस्स. त्यामुळे या पाचसहा संकेतस्थळांच्या ध्येयधोरणाबद्दल जर - कायद्याच्या बाबीला न आणता - लिहायचे/बोलायचे ठरले तर प्रत्येक वेळी थेट नावे घेण्याची काही गरज आहेच असे माझ्या अल्पमतीला वाटत नसल्याने मी तसे नेमस्त मत मांडले होते.

थोडक्यात "जरतर" च्या भाषेत बोलायचे झाल्यास, प्रियालीताईंनी जो पहिला प्रतिसाद या धाग्यात दिला आहे तो मला द्यायचा असता तर मी संबंधित व्यक्ती वा घटक दुखावला जाणार नाही अशी भाषा वापरून [किंवा रोखठोक भाषेत बोलायचे झाल्यास 'बोटचेपे' पणा स्वीकारून] दिला असता. अर्थात मी ते वाक्य तसे का लिहिले असते वा प्रियालीताईंप्रमाणे थेट संस्थळांची नावेच का घेतली नसती ? असे प्रश्न उपस्थित होत असतील तर या प्रश्नांना परत तेच उत्तर देता येईल ~ स्वभावातील नेमस्तपणा. आणि मला वाटते तशा भाषेनेही ज्याला समजायचे त्याला मुद्दा समजला असताच. इतपत प्रगल्भ इथले [वा अन्य संस्थळावरीलही] सदस्य असणारच.

२. उगीचच गुळमुळीत स्टँड घ्यावा असा सल्ला पाटील मला का देत असावे?

एकतर मी सल्ला दिलेला नाही. फक्त 'असे लिहिले असते तर...." असे म्हटले की ते वैयक्तिक मत होते, सल्ला नव्हे. शिवाय भाषेच्या कोणत्याही व्याख्येत त्याला 'गुळमुळीत् स्टँड' म्हटले जात नाही. वयाने आणि अनुभवाने मी इथल्या अनेकापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिले आहेत, पचविलेही आहेत, कोर्टकचेर्‍यांच्या व्यापात थोबाड फोडूनही घेतले आहे/फोडलीही आहेत. त्यामुळे त्या शिदोरीच्या आधारे मी इतकेच जाणू शकतो की या देशात सर्वच बाबी 'कायद्याच्या कक्षेत' येऊ नयेत वा आणूही नयेत. विशेषतः ज्यावेळी आपण 'भाषावृद्धी' साठी प्रयत्न करत असू त्यावेळी.

३. माझ्या वरील प्रतिसादात तसे काहीही नसताना आणि राजे यांनी येथे येऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला हे स्पष्ट दिसत असताना पाटील आणि घाटपांडे यांनी त्यांना सहानुभूती दर्शवणे अनाकलनीय आहे.

~ [अ] श्री.राजे यांचा प्रतिसाद (त्यांच्या भाषेत नोटीस) मी अर्थातच वाचली. त्यानी तशी भाषा का वापरली याबद्दल त्यानीच स्वतंत्र खुलासा करणे अपेक्षित आहे, कारण असे दिसते की ते इथलेही - उपक्रमचे - सदस्य आहेत. त्याबद्दल तुम्ही स्वतःच पुढील् प्रतिसादात त्याना जाबही विचारला आहे.

[ब] श्री.राजे याना सहानुभूती दाखविली या तुमच्या दाव्याबद्दल मी माझ्यापुरते लिहितो (श्री.घाटपांडे याना वाटले तर तेही स्वतंत्र उत्तर देतील). मुळात सर्वच मराठी संकेतस्थळांवर सदस्यांचे - कित्येक सदस्य अनेक स्थळावर सक्रिय असतात हे मला जाणवले आहे - एकमेकाशी सौहार्दाचे स्नेहसंबंध असावेत, या ना त्या निमित्ताने एकमेकाच्या गावी ये-जा करून गाठीभेटी घ्याव्यात आणि ते स्नेहरज्जू दृढ करावेत असे मानणार्‍यापैकी मी एक आहे. मायबोलीवरील 'गटग' सारखे वृत्तांत वाचून/चित्रे पाहून तर ही संकल्पना माझ्या मनी अधिकच ठसली आहे. अशा परिस्थितीत एखाद्या संकेतस्थळावरील कमीजास्तीच्या काही तांत्रिक बाबीवर चर्चा करताना तीमधून संबंधित व्यक्ती/घटकाचे एखाद्याच्या लिखाणातील भाषेमुळे जर मत प्रतिकूल बनण्याची शक्यता असेल तर त्यातील वाक्यरचनेवर स्वयंम् संपादनाची नजर टाकणे [मलातरी] गरजेचे वाटले असते. इथे कुणाला सहानुभूती दाखविणे वा कुणाविरुद्ध त्याबद्दल टोकाचा प्रतिवाद घालण्याचा प्रश्न उदभवत नाही.

३. संकेतस्थळावर प्रायवसी पॉलिसी नसणे ही बाब कधीतरी त्यांना अडचणीतही आणू शकते ही शक्यता त्यांना आणि त्यांची बाजू उचलणार्‍यांना कळते आहे का?

~ प्रायव्हसी पॉलिसीची बाब श्री.राजे याना अडचणीत आणते की नाही, त्याबद्दल माझ्यासारखी यातील तांत्रिक वा कायदेशीर बाबीशी दूरान्वयेही कधीही संबंध न आलेली व्यक्ती कसे सांगणार ? आणि मुळात मी प्रियालीताईंच्या प्रतिसादातील केवळ त्या एकाच वाक्याबद्दल लिहिले म्हणजे मी श्री.राज जैन यांची बाजू कशी काय उचलली ?

४. मूळ मुद्द्यावरील चर्चेत भाग घेण्याऐवजी पाटील आणि घाटपांडे यांनी राज जैन यांना सहानुभूती दाखवणे अनाकलनीय आहे.

परत तेच ~ शासकीय सेवेतील माझ्या नोकरीचा आतापर्यंतचा पंचवीस वर्षापेक्षाचाही जादाचा कालावधी केवळ ऑडिटच्या फाईल्स उपसण्यात गेला असल्याने अत्याधुनिक आय्.टी. जगताबाबत माझे ज्ञान अत्यंत तोकडे असणार ही तर काळ्या दगडावरील रेघ. काहीसे वाचन आणि टंकलेखनाची सवय, तसेच घरी मुलाने नुकतीच तशी करून दिलेली सोय एवढ्या अल्पशा भांडवलावर मी जालीय दुनियेतील संकेतस्थळावर एक विरंगुळा म्हणून विचारांची देवाणघेवाण काहीशा प्रमाणात करीत असतो. त्यामुळे ज्या विषयाचे [सायबर लॉ] शून्य म्हणावे इतपतही ज्ञान नसताना मी या धाग्यात त्यातील तांत्रिक बाबीवर 'ऍक्टिव्ह' भाग घेण्यास अपात्रच आहे. हा धागा नवखा वाटला म्हणून केवळ वाचनमात्र असताना श्री.घाटपांडे यांचा तो सौम्य प्रतिसाद चांगला वाटला म्हणून प्रत्यक्ष भाग. इथे श्री.जैन याना सहानुभूती दाखविण्याचा प्रश्नच येत नाही.

असो. गैरसमज नसावा.

तसा उद्देश नाही.

वाटते तशा भाषेनेही ज्याला समजायचे त्याला मुद्दा समजला असताच. इतपत प्रगल्भ इथले [वा अन्य संस्थळावरीलही] सदस्य असणारच.

नेमस्तपणे भाषा वापरून प्रतिसाद देणे हा या चर्चेचा उद्देश नाही असे वाटते. लोकांना शहाणे करणे, योग्य माहिती पुरवणे हा नक्कीच आहे तेव्हा नावे न घेता तो साधता येईल याच्याशी मी असहमत आहे. हीच वाक्ये मी जर गूगल आणि याहू! संदर्भात लिहिली असती तर पाटील यांनी अशी सुचवणी केली नसतीही. या संकेतस्थळांच्या जाहीर बाबी आहेत. त्यात याला आणि त्याला दुखावण्याचा प्रश्न येत नाही. नावे न घेता पुढील वाक्य मात्र मी म्हणेन-

चिल्लर लोकांची बाजू घेणे गैर नाही पण थिल्लर लोकांची बाजू घेताना दहादा विचार करावा.

कोर्टकचेर्‍यांच्या व्यापात थोबाड फोडूनही घेतले आहे/फोडलीही आहेत. त्यामुळे त्या शिदोरीच्या आधारे मी इतकेच जाणू शकतो की या देशात सर्वच बाबी 'कायद्याच्या कक्षेत' येऊ नयेत वा आणूही नयेत.

जी गोष्ट (येथे प्रायवसी पॉलिसी) अस्तित्वातच नाही त्यावर कोण कसा दावे ठोकू शकतो? राज जैन यांनी थोडा विचार करून येथे काय चालले आहे हे पडताळून पाहिले असते तर ते त्यांच्याच फायद्याचे ठरले असते.

अशा परिस्थितीत एखाद्या संकेतस्थळावरील कमीजास्तीच्या काही तांत्रिक बाबीवर चर्चा करताना तीमधून संबंधित व्यक्ती/घटकाचे एखाद्याच्या लिखाणातील भाषेमुळे जर मत प्रतिकूल बनण्याची शक्यता असेल तर त्यातील वाक्यरचनेवर स्वयंम् संपादनाची नजर टाकणे [मलातरी] गरजेचे वाटले असते.

जेव्हा एखादे वाक्य लिहिले जाते त्यावर प्रतिक्रिया आता तुमच्यावर केस ठोकतो अशी असेल तर दोष कोणाचा? प्रतिकूल मत बनत असेल तर दावे ठोकण्याची भाषा करण्यापूर्वी चौकशी नको का करायला की हे कशासाठी लिहिले आहे, उद्देश काय आहे?

मुळात मी प्रियालीताईंच्या प्रतिसादातील केवळ त्या एकाच वाक्याबद्दल लिहिले म्हणजे मी श्री.राज जैन यांची बाजू कशी काय उचलली ?

मी मराठीचे संस्थापक श्री.राज जैन याना त्यांच्या संस्थळाविषयी इथे प्रसिद्ध झालेला मजकूर त्या संस्थळाविषयी गैरसमज पसरवणारा वाटल्यास त्याना दोष देता येणार नाही असे आपण लिहिता त्यात नेमका गैरसमज काय आहे? त्यांच्या संकेतस्थळावर प्रायवसी पॉलिसी असल्याचे मला दिसलेले नाही असेच लिहिले आहे ना! ती असती तर त्यांनी दाखवून दिली असती पण प्रायवसी पॉलिसी म्हणजे काय हेच त्यांना माहित नसावे की काय अशी शंका त्यांचा प्रतिसाद पाहून येते. तरीही त्यांचा गैरसमज झाला म्हणून त्यांना दोष देता येत नाही? ज्या संकेतस्थळावर तुम्ही वावरता त्याच्या मालकांना गरजेची माहिती नाही याची तुम्हाला काळजी वाटत नसेलही पण इतरांना ती वाटत असेल. दुसर्‍या शब्दांत आपण राज यांनी जो प्रकार केला त्याविषयी काही न बोलता मला सुधारणा करण्याविषयी सुचवले याचा अर्थ तुम्ही राज यांच्या संकेतस्थळावरील सदस्य असल्याने आणि राज हे तेथील मालक असल्याने तुमचा राज यांना पाठींबा आहे असा घेता येईल. :-) (तसा मी घेतलेला नाही हे स्पष्ट करते. :-))

हा धागा नवखा वाटला म्हणून केवळ वाचनमात्र असताना श्री.घाटपांडे यांचा तो सौम्य प्रतिसाद चांगला वाटला म्हणून प्रत्यक्ष भाग. इथे श्री.जैन याना सहानुभूती दाखविण्याचा प्रश्नच येत नाही.

जसे तुमच्या प्रतिसादाने माझे प्रतिकूल मत झाले आणि त्याविषयी मी तुम्हाला प्रतिप्रश्न केले आणि तुम्ही उत्तर दिल्यावर माझे समाधान झाले किंवा वाद पुढे वाढवण्यात हशील नाही हे समजले त्यात शहाणपणा असतो असे मला वाटते. गैरसमज वाढवायला फार कष्ट लागत नाही. "आज तुम्ही चांगले दिसता." हे वाक्यही गैरसमज वाढवू शकते, तेव्हा असे लिहिल्याने गैरसमज वाढला आणि तसे लिहिल्याने तो वाढला नसता हे पटत नाही. जैन उपक्रमावर फारसे दिसत नाहीत. येथे काय झाले याची चौकशी करून त्यांना मला प्रश्न करता आले असते पण तसे न करता जर ते दावे ठोकत असतील आणि गैरसमज वाढवत असतील आणि जर त्यामुळे मी माझी वाक्ये तपासावी किंवा बोटचेपे धोरण घ्यावे असे जर मला कोणी सुचवले तर मी असहमत आहे असे म्हणेन.

गैरसमज नसावा.

गैरसमज नाहीच पण आपल्या एखाद्या वाक्याने आपण चुकीच्या प्रवृत्तीला खतपाणी तर घालत नाही ना हे पाहणेही योग्य ठरावे.

असो. आता मात्र थांबते.

आश्चर्य वाटले

श्री अशोक पाटील,
आपले प्रतिसाद नेहमीच वाचनीय आणि माहितीपूर्ण असतात. अल्पावधीत आपण येथे बर्‍याच जणांना आपल्या माहितीपूर्ण आणि संयमित लेखनाची चुणुक दाखवली आहे. असे असताना आपला वरील प्रतिसाद काहीसा अनाकलनीय वाटला.

वयाने आणि अनुभवाने मी इथल्या अनेकापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिले आहेत, पचविलेही आहेत, कोर्टकचेर्‍यांच्या व्यापात थोबाड फोडूनही घेतले आहे/फोडलीही आहेत.

हे जे काही आपण लिहिले आहेत ते माझ्या मते श्री.जैन ह्यांना उद्देशुन लिहिल्यास अधिक सयुक्तिक ठरले असते. कोर्टकचेरीची भाषा, कायदेशीर इशारा वगैरे स्टंटबाजी राज जैन ह्यांनी केली आहे. असे असताना तुम्ही ही कान उघडणी प्रियाली ह्यांना देणे हे म्हणजे चोर सोडून सन्याश्याला सुळी ह्यातला प्रकार वाटला.

मीमराठीवर मला अमुक गोष्ट आढळली नाही हे नावाने सांगण्यात काय हरकत आहे समजली नाही. इथे मोघमपण कशासाठी हे लक्षात आले नाही. कुणी माथेफिरू आपल्या वाक्याचा वाट्टेल तो अर्थ काढून काहीबाही बरळेल म्हणून आपणच बॅकफुटवर राहावे हे स्पष्टीकरण तितके पटणारे नाही.

माझ्या मते मीमराठी ही एक क-दर्जाची साइट् आहे. मला नावानिशी हे लिहिण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का?

प्रश्न अधिकाराचा

धन्यवाद आमोद

१. तुम्ही ही कान उघडणी प्रियाली ह्यांना देणे हे म्हणजे चोर सोडून सन्याश्याला सुळी ह्यातला प्रकार वाटला.

~ नाही. कृपया असा गैरसमज करून घेऊ नये. जरी मी वयाने सीनिअर असलो तरी एखाद्याची कानउघडणी करावी इतक्या पातळीपर्यंत जाण्याचा ना मला अधिकार आहे ना माझे तितके ज्ञान [शिवाय स्वभावही नाहीच]. अहो, ऑफिस असिस्टंटने वेळेत शासनाकडे रीपोर्ट डिस्पॅच केला नाही तरी मी त्याला/तिला वरिष्ठपणाचा आव न आणता, 'ठीक आहे, निदान आजच्या टपालाने जाऊ दे' अशी सौम्य सूचना देतो. मग इथेतर जालीय दुनियेत मला कसलाही फुकाचा अधिकार नसताना मी तसे वर्तन करीन याची सुतराम शक्यता नाही.

एक कबूल करायला काहीच अडचण नाही की मला त्या वाक्यात जे अभिप्रेत होते ते मी थेट इथे चर्चेत न मांडता प्रियालीताईंना व्य.नि.नेही कळवू शकलो असतो. पण आता त्याबद्दल विचार करण्यात अर्थ नाही.

३. माझ्या मते मीमराठी ही एक क-दर्जाची साइट् आहे. मला नावानिशी हे लिहिण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का?

~ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्याबाबतीत घटनेनेच ही तरतूद केली असल्याने तुमच्या या मताबाबत/मताला मी विरोध करूच शकत नाही. मात्र 'आपली साईट अमुक एक दर्जाची आहे किंवा नाही' याचे खंडन जर त्या संकेतस्थळाच्या व्यवस्थापनाने केले तर तो त्यांचाही अधिकार आहे, हे तुम्हाला मान्य व्हावे अशी अपेक्षा आहे.

(बाय द वे : ही साईट रेटिंग कल्पना मला नवीनच आहे. म्हणजे संकेतस्थळा-स्थळांतही 'स्टार सिस्टिम' असते ?)

२. आपणच बॅकफुटवर राहावे हे स्पष्टीकरण तितके पटणारे नाही.
~ वेल्. माझ्यातील या प्रवृत्तीबद्दल मी मागील प्रतिसादात 'नेमस्त' स्वभावाचा उल्लेख केलाच आहे, तेच मीटर आपल्या वरील विधानाला, माझ्यापुरते, लावल्यास माझी भूमिका तुम्ही समजू शकाल.

चर्चा भरकटते आहे

मात्र 'आपली साईट अमुक एक दर्जाची आहे किंवा नाही' याचे खंडन जर त्या संकेतस्थळाच्या व्यवस्थापनाने केले तर तो त्यांचाही अधिकार आहे, हे तुम्हाला मान्य व्हावे अशी अपेक्षा आहे.

खंडण करणे आणि उठसूठ इतरांवर दावे ठोकणे यांत प्रचंड फरक आहे हे आपल्याला मान्य असावे.

एक कबूल करायला काहीच अडचण नाही की मला त्या वाक्यात जे अभिप्रेत होते ते मी थेट इथे चर्चेत न मांडता प्रियालीताईंना व्य.नि.नेही कळवू शकलो असतो.

आपण काही गोष्टी राज जैन यांनाही कळवाव्या यामुळे ते मालक असल्याने त्यांच्यासमोर इतरांनी दबून राहावे असा संदेश तुमचे प्रतिसाद देत आहेत तसे दिसणार नाही.

चर्चा भरकटते आहे. मूळ विषयापासून दूर जाते आहे याची काळजी प्रत्येकाने घ्या.

असहमत

पाटीलसाहेब (अशोकराव किंवा अशोकजी असे म्हणणे अप्रशस्त वाटल्याने हे संबोधन),
कित्येक सदस्य अनेक स्थळावर सक्रिय असतात हे मला जाणवले आहे - एकमेकाशी सौहार्दाचे स्नेहसंबंध असावेत, या ना त्या निमित्ताने एकमेकाच्या गावी ये-जा करून गाठीभेटी घ्याव्यात आणि ते स्नेहरज्जू दृढ करावेत असे मानणार्‍यापैकी मी एक आहे.
तुमच्या सौम्य आणि समंजस प्रतिसादांना एरवी माझी सरसकट सहमती असते. वरील प्रतिसाद बाकी याला अपवाद आहे. काही लोकांचा प्रत्यक्ष परिचय, भेटीगाठी तर सोडाच, पण जालीय परिचय,त्यांची जालीय उपस्थितीही असह्य होत असते. संगणकाच्या पटलासमोर बसून आपल्या मतांच्या पिंका टाकत राहणे आणि प्रत्यक्षातील भेटी-मैत्री या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. आपण अनुभवी आहात, पण आपला जालीय अनुभव मर्यादित आहे, असे आपणच मान्य केले आहे. आपल्या मनात अशी कटुता निर्माण होण्याचे प्रसंग येऊ नयेत अशी माझी इच्छा आहे, पण दुसरीकडे ते येणारच अशी मला खात्रीही आहे. तेंव्हा कृपया आपण आपली कातडी तपासून पाहा. ती गेंड्यापेक्षा कोणत्याही खालच्या दर्जाच्या प्राण्याची (विशेषतः मनुष्यप्राण्याची) आहे अशी शंका जरी आली तरी तात्काळ जालनिवृती स्वीकारा. मनस्ताप वाचेल. अनाहूत सल्ला दिल्याबद्दल क्षमस्व.

सन्जोप राव
हरेक बातपे कहते हो तुम के तू क्या है
तुमही कहो के ये अंदाज-ए-गुफ्तगू क्या है

जालीय नाती

सन्जोप राव ~

आमच्या कोल्हापुरात अगदी "अरे पाटला" अशी हाक मारली तरी साधा पाटील तर सोडाच पण अगदी रावसाहेब पाटील यानाही बिलकुल राग येत नाही, किंबहुना त्या पाटलाला झटकन् जाणवतेच की हाकारणारा पेठेतीलच कुणीतरी पठ्ठ्या आहे. त्यामुळे अशोकरावही नको तसेच पाटीलसाहेबही नको. भालजी पेंढारकर पंगतीतील आम्ही 'साधी माणसं' आहोत हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा.

तुमचा मुद्दा :

संगणकाच्या पटलासमोर बसून आपल्या मतांच्या पिंका टाकत राहणे आणि प्रत्यक्षातील भेटी-मैत्री या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत.

~ प्रत्यक्षातील भेटी-मैत्रीविषयी मला औत्सुक्य निर्माण झाले त्याला कारण म्हणजे मी ज्यावेळी उपक्रमचे सदस्यत्व घेतले त्याच्याच आगेमागे माझ्या मुलाने मला 'मायबोली'चेही सदस्यत्व घेण्यास सुचविले कारण तिथे जुन्या चित्रपटांबद्दल/गाण्यांबद्दल आणि भटकंतीबद्दल नित्यनेमाने खूप चर्चा चालू असतात, असे त्याचे म्हणणे. ते मला पटले कारण त्या तिन्ही गोष्टींची मला असलेली आवड. नेमके त्याचवेळी मायबोलीवर 'गटग' [याचा अर्थही मला नंतर कळाला] सदरात अशा स्नेहबंधनाचे फोटो प्रकाशित् झाले ते मला खूपच आवडले. म्हणजे अगदी कालपर्यंत् ज्यांची ओळखदेख नसणारी वेगवेगळ्या गावातील/व्यवसायातील/नोकरीपेशातील डझनभर मंडळी [स्त्री-पुरुष] एका नोटीसीद्वारे पुण्याच्या बालगंधर्व परिसरात एकत्र जमतात, तीनचार तास गप्पा मारतात, आपाआपली खाण्यापिण्याची बिले भागवतात आणि परत भेटू या अशा बोलीवर चारी दिशाला निघून जातात. फार आवडला मला तो आपल्या मैत्रीचे विश्व वाढविण्याचा.

यातून भरीव असे काही निष्पन्न होत असेल वा नसेल, पण असा प्रश्न तशा भेटीत उदभवत नाही. सबब तो एक प्रशंसनीय उपक्रम वाटल्याने मी जालीय संबंधाबद्दल काहीसे सविस्तर त्या प्रतिसादात लिहिले होते.

जी.ए.कुलकर्णी यांच्या एका कथेतील एक पात्र म्हणते : "भविष्यकाळ वर्तमान झालेला काही वेळा माणसाला पाहता येतो; पण वर्तमान भूतकाळ झालेला पाहण्यास तो बहुधा जगत नाही." जीवनाविषयीचे हे रोखठोक तत्वज्ञान मला मान्य असल्याने 'वर्तमाना'तच राहून जितका आनंद घेता/देता येईल तितके शक्यतो करावे असे मी समजतो.

अनाहूत सल्ला दिल्याबद्दल क्षमस्व.

~ छे, छे - अहो यात अनाहूत काय आहे ? उलटपक्षी तुम्ही नदीच्या दुसर्‍या किनार्‍यावरही काय आहे हे पाहण्याची अप्रत्यक्ष [चांगली] सूचना केली तीबद्दल उलट मीच कृतज्ञ राहिले पाहिजे त्या प्रती.

अशोक पाटील

राजे मोठे व्हा ..

वयाने (जालिय् ) नव्हे तर् मनाने ..

मास्करेड

मास्करेडबद्दल धम्मकलाडूंनी सांगितलेली माहिती योग्य आहे. साइट टेस्ट करताना हे मॉड्यूल दुसर्‍या एका साइटवर मी ही वापरल्याचे आठवते परंतु साइट पब्लिश झाल्यावर आणि प्रॉडक्शनमध्ये आल्यावर अशाप्रकारचे अधिकार नाहीत. या अधिकारांचा गैरवापर करण्याची शक्यता लक्षात घेता असे धोकादायक अधिकार देता कामा नयेत याच्याशी सहमत आहे.

मास्करेड

ड्रुपलमध्येही मास्करेड वापरून (ऍडमिन अधिकाराने) एन्क्रिप्टेड संकेताक्षरे वाचता येतील? थोडा साशंक आहे.

||वाछितो विजयी होईबा||

अजिबात नाही

अजिबात वाचता येणार नाही. संकेताक्षरे एन्क्रिप्टेड असल्याने मॅस्करेड वापरूनही दिसणार नाही. अगदी डेटाबेसमध्ये क्वेऱ्या चालवून शोधला पासवर्ड तरी तिथे हॅश्ड पासवर्डच दिसेल. मात्र हॅश्ड पासवर्ड तेवढा सुरक्षित नसल्याचे

मॅस्करेड वापरून कुणी दुसऱ्याच्या नावाने वावरू शकतो. उदा. 'आनंद' नावाच्या सदस्याला 'सुनीत' नावाच्या सदस्याचे निरोप वाचायचे असल्यास तो मॅस्करेड वापरून 'सुनीत'च्या नावाने वावरू लागेल. एकदा मनसोक्त वावरून झाले, व्यक्तिगत निरोप वाचून झाले की 'सुनीत' ह्या नावाने वावरणारा आनंद पुन्हा आपल्या 'आनंद' ह्या नावाकडे 'स्विच बॅक' होऊ शकतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अरेरे!

ज्या संकेतस्थळावर व्यक्तिगत निरोप वाचले गेले आहेत, त्या संकेतस्थळावर माझे खाते आहे. अर्थात मी सर्व निरोप काढून टाकलेले आहेत व यापुढे व्यक्तिगत निरोप या सुविधेचा तेथे वापर करणार नाही. ज्या संकेतस्थळाच्या प्रशासन/व्यवस्थापनात त्रुटी आढळतात तेथे त्या मांडता येत नाहीत. सदस्यांना सावध करणे अवघड होऊन बसते. याचा अनुभव पुर्वीही आलेला आहे. यावर एकच उपाय दिसतो: व्यक्तिगत स्वरुपाच्या संवादासाठी मराठी संकेतस्थळांच्या सुविधा वापरू नयेत.

चांगली चर्चा

चांगली चर्चा. वाचतो आहे.

कोण कुठल्या नावांनी वावरतो

वेबसाइट लॉगवरून कोण कुठल्या नावाने किंवा किती नावांनी वावरतो ह्याची माहिती काढणे आणि ती लोकांना देणे किंवा साइटवर वावरणाऱ्या व्यक्तींशी वेबसाइटला लॉगला जोडण्याचा प्रयत्न करणे देखील प्रायव्हसीचा भंग आहे. संकेतस्थळांनी आणि चालकांनी ते टाळायला हवे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आणखी थोडी प्रायवसी पॉलिसी

मनोगत, उपक्रम, मिसळपाव आणि मी मराठी यांच्या नंतर मी मायबोली, ऐलपैल आणि पुस्तक विश्व या तीन साइटवर फेरी मारली. त्यापैकी मायबोलीची प्रायवसी पॉलिसी उत्तम असून त्याखालोखाल ऐलपैलची पॉलिसी दिसली आणि पुस्तकविश्वावर ती मला सापडली नाही*.

मायबोलीची विस्तृत प्रायवसी पॉलिसी येथे बघा.
ऐलपैलची प्रायवसी पॉलिसी येथे बघा.
पुस्तकविश्वाची प्रायवसी पॉलिसी मिळाली नाही पण असे एक पान मिळाले, जे मोकळे आहे.
गूगलची प्रायवसी पॉलिसी येथे बघा.

Privacy issues are a high priority for us at Maayboli and we follow standard industry practices to maintain your personal information.

वरील वाक्य सदर साइटवर सदस्यत्व घेणार्‍यास विश्वास वाटेल असे आहे. एखाद्या साइटवर जिथे इमेल, चॅट किंवा इतर मार्गांनी संवाद उपलब्ध आहे तिथे खालील गोष्टींत सदस्यांची माहिती सांभाळावी लागते.

१. नोंदणी (रजिस्ट्रेशन)
- सदस्याने घेतलेले टोपणनाव
- नोंदणीच्या वेळेस घेतलेला पासवर्ड
- सदस्याने नोंदणीच्या वेळेस दिलेली आपली इमेल आयडी
- इतर माहिती (उदा. पत्ता, फोन नं)

२. साइटवर सदस्याने कोणत्या पानांवर फेरफटका मारला

३. सदस्याचे चॅट व निरोप

४. सदस्याचा आयपी ऍड्रेस

वरील सर्व माहिती गुप्त ठेवण्याची हमी ही त्या संकेतस्थळाची, त्याच्या चालकांची आणि मालकांची असते. कायद्याने किंवा कायद्याची मदत करण्यासाठी त्यांना ती माहिती बाहेर काढावी लागली तर गोष्ट वेगळी. अन्यथा, या माहितीचा उपयोग विक्रीसाठी, प्रसिद्धीसाठी, जाहिरातदारांबरोबर वाटणे वगैरे करता येत नाही.

ही माहिती हाताळणार्‍यांवर विशेष लक्ष असते. त्यांची निवड करताना त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेणे, ड्रगटेस्ट करणे, त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे (उदा. हे सदस्य कुठली पाने पाहतात, त्यांनी एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाइलला भेट दिली का, हॉस्पिटल असेल तर एखाद्या प्रसिद्ध रुग्णावर कोणते उपचार सुरू आहेत हे नमूद असणार्‍या पानांना भेट दिली का, कंपनीतील कॉन्फिडेन्शिअल डॉक्युमेंट्स हाताळली का वगैरे वगैरेवर लक्ष ठेवले जाते.) त्यामुळे हे काम अतिशय जबाबदारीचे असते. ते पार न पाडणार्‍यांवर त्वरित निलंबन आणि इतर कार्यवाही होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर काही मराठी संकेतस्थळचालक आणि सदस्य अनभिज्ञ असल्याची माहिती आता अनेकांना झाली आहे. या चर्चेतून पुढे आलेली मास्करेडबद्दलची माहिती अनेकांना उपयुक्त ठरेल असे वाटते. याचप्रमाणे ही संकेतस्थळे ड्रुपलची मॉड्युल्स वापरून बनल्याने मास्करेडप्रमाणे इथे अशा काही इतर सुविधा आहेत का की ज्यातून सदस्यांची माहिती फोडली जाऊ शकेल.

यापुढे ज्या संकेतस्थळांनी अशी माहिती जाहीर दिलेली नाही, ते ती जाहीर करतील का किंवा या संकेतस्थळांचे सदस्य अशी माहिती प्रसिद्ध करण्याबाबत संकेतस्थळ चालकांवर दबाव आणतील का हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. उपक्रमाच्या प्रायवसी पॉलिसीतही आवश्यक ते बदल व्हावेत असे माझे मत आहे.

अर्थात, मुख्य प्रश्न असा आहे की प्रायवसी पॉलिसी जाहीर केल्यावरही आपल्या मित्रमंडळात सदस्यांची खाजगी माहिती चर्चिली जात असेल तर काय करावे?

या चर्चेतून ही अशी माहिती पुढे यावी असे वाटते.

* कालच्या अभूतपूर्व बालिश गोंधळानंतर एखादी गोष्ट मला न सापडणे किंवा आढळणे ही माझी त्रुटी असू शकते हे स्पष्ट करावेसे वाटते.

पॉलिसी आहे पण प्रोसिजर...?

वैयक्तिक सर्व माहिती गुप्त ठेवण्याची हमी ही त्या संकेतस्थळाची, त्याच्या चालकांची आणि मालकांची असते. हे सहमत पण ती गुप्तता नीती गोत्यात आणली गेली तर कारवाई करण्याच्या पद्धतीही आखलेल्या हव्यात. वर उल्लेखलेले व्हिसलब्लोअरच गोत्यात आणण्याचे प्रकार घडू नयेत म्हणून काळजी घेतलेली हवी आणि त्याविषयी योग्य ती नीती प्रसिद्ध केलेली असावी.
जसे -
१ . गुप्तता धोक्यात आली असेल तर तक्रार कोणत्या माध्यमातून करावी
२. तक्रार कुणाकडे करावी
३. चौकशीचा कालावधी किती असेल
४. साधारण काय कारवाई होईल त्याचे स्वरूप (फक्त स्थळावरून आयडी काढून टाकणे हे कितपत योग्य आहे या विषयी साशंक आहे.)
५. तक्रार करणार्‍याला काय संरक्षण आहे?
६. खोट्या तक्रारी केल्यास काय कारवाई असेल.

थोडक्यात ही नीती दोन्ही बाजूंना जबाबदारी देणारी असली पाहिजे असे वाटते.

असो, जाता जाता या चर्चेच्या निमित्ताने (पॉझिटिव्हली घेऊन) प्रायव्हसीसाठी उपक्रमावर हे असे होत नसेल ही शंकाही व्यवस्थापनाने काढून टाकावी असे वाटते.
त्यासाठी काही व्यवस्था लावली असेल तर ती इतर स्थळांना मार्गदर्शकही ठरेल.

-निनाद

+१

असो, जाता जाता या चर्चेच्या निमित्ताने (पॉझिटिव्हली घेऊन) प्रायव्हसीसाठी उपक्रमावर हे असे होत नसेल ही शंकाही व्यवस्थापनाने काढून टाकावी असे वाटते.

+१ सहमत!

त्यासाठी काही व्यवस्था लावली असेल तर ती इतर स्थळांना मार्गदर्शकही ठरेल.

+१०० सहमत!!

||वाछितो विजयी होईबा||

छान.

चांगली चर्चा सुरू आहे. नवी माहिती मिळाली.
धन्यवाद.

अशाच रहा

प्रियालींचे प्रतिसाद वाचून त्यांच्या अरेला कारे म्हणण्याच्या गुणाचा पुनःप्रत्यय आला. ---वाचक्नवी

धोरण आणि नियम

उपक्रमावर याच्याशी संबंधित विषयावर एक चर्चा झाली होती. त्यातील दुव्यानुसार, त्या नियमांच्या दस्तावेजातील पान 7 वर खासगी माहिती कोणती हे देण्यात आले आहे. त्यातच असेही म्हटले आहे की, बॉडी कार्पोरेट्सकडे प्रायव्हसी पॉलिसी असली पाहिजे आणि ती जाहीर केली पाहिजे. आता काही ठिकाणी तशी प्रायव्हसी पॉलिसी नाही, असे दिसते. म्हणजे या बॉडी कार्पोर्ट्सनी या नियमांचा भंग केला आहे, असा अर्थ निघतो का? ड्रुपलसारख्या प्रणालींमधल्या मॅस्करेडसारख्या बाबींवर या नियमांचा अंमल कसा होतो?
हेच नियम जर "प्रस्तावित" प्रायव्हसी बिलला जोडून घेतले तर त्यात कम्युनिकेशनचाही समावेश होणार असावा, असे दिसते.
उपक्रमींना काय वाटते?

बॉडी कॉर्पोरेट

म्हणजे या बॉडी कार्पोर्ट्सनी या नियमांचा भंग केला आहे, असा अर्थ निघतो का?

उपक्रमसारख्या संकेतस्थळाला बॉडी कार्पोरेट म्हणता येईल काय माहीत नाही. तज्ज्ञांकडून माहिती घेऊन सांगतो.

ड्रुपलसारख्या प्रणालींमधल्या मॅस्करेडसारख्या बाबींवर या नियमांचा अंमल कसा होतो?

गोपनीय किंवा खासगी माहिती काढायची आहे असे चौकीदारानेच ठरवले तर मग मॅस्करेडचीही गरज आहे असे वाटत नाही. आणि नियम आणले दुसऱ्यांचे खासगी संवाद चोरून वाचायची विकृती कशी काय दूर होणार? फार तर चौकीदार एकमेकांवर नजर ठेवू शकतात. वेबलॉग्ज़ बघून असे काही घडले नाही ना ह्याची ग्वाही देऊ शकतात किंवा शिट्टी फुंकू शकतात. मात्र शिट्टी फुंकणाऱ्याला अभय आणि संरक्षण मिळायला हवे. :)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत

नियम आणले दुसऱ्यांचे खासगी संवाद चोरून वाचायची विकृती कशी काय दूर होणार?

ह्यासाठी शिटी फुंकणार्‍याला अभय मिळणे फार महत्वाचे आहे. अजूनही वरील विकृती कोणत्या स्थळावर घडली आणि सदर सदस्य कोण ह्याची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही, आतल्या आत मामला निपटण्यात आला, ह्यातच सगळे आले.

प्रश्न

पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यालच. दुसऱ्या प्रश्नाचीही फक्त कायदेशीर दृष्टीने काय वासलात लागते ते जाणून घ्यायला आवडेल.
एरवी, तुम्ही केलेले विकृती, चौकीदार वगैरे युक्तिवाद तसे सार्वत्रिक लागू होतातच.
माझे मुद्दे उपक्रमापुरते नाहीत. समग्र संकेतस्थळे. त्यातही पुन्हा सेवा भारतातही उपलब्ध, पण संस्थळ नोंदणी अन्य देशात, सेवादान इतर देशांच्या माध्यमातून वगैरे मुद्देही त्यात असावेत.
सर्वसाधारण मुद्दा - 'व्हिसलब्लोअर'ला जागल्या म्हणावे काय?

कॉपिराईट्

सर्वसाधारण मुद्दा - 'व्हिसलब्लोअर'ला जागल्या म्हणावे काय?
आम्ही आधीच इथे म्हटले आहे. :)

श्रेयअव्हेर

श्रेयअव्हेर करतो आहे. ;)
एरवीही, हा शब्द असाच वाचण्यात आला होता. म्हणून, कुतुहलानं प्रश्न केला. :)

इंटरनेट प्रायव्हसी विषयीचे अज्ञान

प्रश्न जर अज्ञानाचा असेल तर ते ज्ञानी माणसांकडून घ्यावे. पण ज्ञानी माणूस भारोस्याला पात्र नसेल तर.
अणु उर्जेचा वापर योग्य व अयोग्य दोन्ही कामांसाठी होतो. पण हे लोकांवर तेवढेच अवलंबून असते कि तो वापर लोकांनी कसा करावा.
जपानचे उदाहरण घेतल्यावर अणु उर्जेने किती फायदा व नुकसान होते हे कळते.
पण अशा वेळी असे प्रश्न घेऊन बसने तेवढेसे योग्य नाही कि घराघरातील वापाराने किती घातक असू शकते ते.

ज्यावेळी देशाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असते त्यावेळी काही नादुरुस्त जणांचा विचार करणे तितकेसे योग्य नाही.
कॉम्पुटर इन्जिनिअर'स ना मोठ्याप्रमानावर रोजगार उपलब्ध करणाऱ्या सर्व कंपन्या या जेव्हा सर्व माहिती एकाच ठिकाणी दुसर्याच्या हाती देऊन बेफिकारीने फिरत असतात एवढ्यावर सर्व संपत नसून देशातील सरकार हे अशा कंपन्यांच्या मागोमाग चालून आधार (UID) सारख्या प्रोजेक्टमधून आपल्या देशातील सर्व माहिती काही कंपन्यांच्या कॉम्पुतेरवर एकत्रित केली जाणार आहे. देशाती बर्याच संस्था मदत करण्याच्या नावाखाली एका धंद्याची माहिती दुसऱ्याला विकत असतात. अशा वेळी आधार (UID) मधून काय अपेक्षा ठेवावी.

सांगायचे तात्पर्य एवढेच कि इमारतीचा पाया हा कमकुवत असेल तर त्यातील सजावटीवर कितीही खर्च केला असता त्याच्या किमतीत जराही फायदा होणार नाही.
राष्ट्रीय सुरक्षिततेचा व राष्ट्राला चालवणाऱ्या महत्वाच्या कंपन्यांची धोरण जर चुकीची असतील तर राष्ट्रातील सामान्य माणसांपासून आपण काय अपेक्षा ठेवाव्यात हे आपण आपले ठरवावे.

 
^ वर