हे सायबर नियम कितपत पाळाल?

गेल्या ११ एप्रिल २०११ पासून माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्रालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने नवे नियम लागू केले आहेत.

१. इलेक्ट्रॉनिक डिलिवरी सिस्टिम किंवा इलेक्ट्रॉनिक वितरण प्रणाली
२. इंटरमिजियरी किंवा मध्यस्थ1
३. सायबर कॅफे

अशा तीन भागांसाठी वेगवेगळे नियम आहेत. संकेतस्थळांसाठी आणि ब्लॉगवाल्यांसाठी ह्यातले मध्यस्थांसाठीचे नियम महत्त्वाचे आहेत. ह्या नियमांनुसार मध्यस्थांना संकेतस्थळावर, ब्लॉगवर खालील प्रकारची माहिती प्रकाशित, आयोजित (होस्ट), प्रदर्शित, वितरित करता येणार नाही, चढवता (अपलोड) येणार नाही किंवा तीत फेरबदल करता येणार नाही असे स्पष्टपणे सांगावे लागणार आहे:

१. वापरणाराला(यूजर) कुठलाही हक्क नसलेली दुसऱ्याच्या मालकीची माहिती
२. हानिकारक, त्रासदायक, धर्माची विटंबना करणारी (ब्लासफेमस), निंदाजनक, अश्लील, पोर्नोग्राफिक, पीडोफिलिक, बदनामी करणारी, इतरांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करणारी, द्वेषजनक, जातीय किंवा वांशिक आधारावर आधारावल आक्षेपार्ह असलेली, हिणकस, काळ्या पैशाला प्रोत्साहन देणारी किंवा संबंधित, जुगाराशी संबंधित, किंवा कुठल्याही अन्य प्रकारे बेकायदशीर अशी माहिती.
३. अवयस्कांना इजा पोचवणारी माहिती
४. पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट आदी अधिकारांचे उल्लंघन करणारी माहिती
५. लागू असणाऱ्या कुठल्याही कायद्याचे उल्लंघन करणारी माहिती
६. त्या पत्ताधारकाला स्रोताबद्दल चुकीची माहिती सांगणारी किंवा फसवणूक करणारी
७. दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने वावरणे किंवा तोतयेगिरी करणे ह्या संबंधित
८. सॉफ्टवेअर वायरस किंवा मॅलवेअर किंवा तत्सम प्रकारची माहिती किंवा मजकूर
९. भारताची एकता, अखंडता, संरक्षण, सुरक्षा किंवा सार्वभौमत्वाला किंवा परराष्ट्रांशी असलेल्या मित्रत्वाच्या संबंधांना किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला हानिकारक असणारी किंवा गुन्ह्याला चिथावणी देणारी किंवा गुन्ह्याच्या तपासणीत बाधा आणणारी किंवा दुसऱ्या राष्ट्रासाठी अपमानजनक अशी माहिती किंवा मजकूर

विशेषतः ठळक केलेला भाग वाचून ह्या तरतुदींचा वापर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी केला जाऊ शकतो हे कुणाही आंतरजालीय नागरिकाला कळेल. प्रश्न असा आहे की संकेतस्थळावर येणारी माहिती ही हानिकारक, त्रासदायक, ब्लासफेमस, अश्लील वगैरे वगैरे हे ठरवणार कोण? भारताची अखंडता, एकता इत्यादींना धोका पोचतो आहे हे कसे कळेल? हवी ती किंवा नको ती माहिती कुणीही गुगलून काढू शकत नाहीत असे हे नियम बनविणाऱ्यांना का? ह्या अशा नियमांमुळे निर्बंध घालता येईल काय? ह्या नियमांची कितपत गरज आहे? तुम्ही हे नियम कितपत पाळाल?

आंतरजालाचा आत्मा मुक्त अभिव्यक्तीत आहे. त्यामुळे अशा नियमांचा कडाडून विरोध व्हायला. तुम्हाला काय वाटते? तुम्ही हे नियम कितपत पाळाल? चर्चा व्हावी.

1. भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या दुसऱ्या अनुच्छेदात मध्यस्थ ह्या शब्दाची व्याख्या केली आहे. लांबलचक व्याख्या आहे. पण महत्त्वाचा भाग आपल्यासाठी आहे तो असा: any person who on behalf of another person receives, stores or transmits that message. म्हणजे इतरांच्या वतीने संदेश (मजकूर) घेणारा, साठवणारा किंवा वितरित करणारा तो मध्यस्थ.

Comments

नियम

प्रश्न असा आहे की संकेतस्थळावर येणारी माहिती ही हानिकारक, त्रासदायक, ब्लासफेमस, अश्लील वगैरे वगैरे हे ठरवणार कोण?

माझ्यामते जे तक्रार करतील त्यांच्या तक्रारीचा मथितार्थ जाणून कार्यवाही होऊ शकते पण त्यातील सत्यासत्यता, हानी कशी मोजायची हे माहित नाही.

भारताची अखंडता, एकता इत्यादींना धोका पोचतो आहे हे कसे कळेल?

अखंडता वगैरे गोष्टींना धोका पोहोचायचाच झाला तर त्यासाठी कारणांची कमी नाही. तो धोका खराच का हे जाणून घेण्याची जबाबदारी खरेच कोणी उचलणार का?

ह्या नियमांची कितपत गरज आहे?

नियमांची गरज आहे असे वाटते परंतु हे नियम जाचक वाटतात आणि संदिग्धही.

तुम्ही हे नियम कितपत पाळाल?

जमेल तितके पाळत असतोच पण नियमांचे उल्लंघन कधी होते हे कळणे कठीण आहे तेव्हा नियम पाळणे कठीण वाटते. मुद्दा २ आणि ९ ठळक केला आहेच. त्याची तीव्रता लक्षात येत नाही पण मुसक्या बांधून टाकणारे नियम वाटले.

गरज

प्रश्न असा आहे की संकेतस्थळावर येणारी माहिती ही हानिकारक, त्रासदायक, ब्लासफेमस, अश्लील वगैरे वगैरे हे ठरवणार कोण?

हा तर कायमचाच प्रश्न आहे. म्हणूनच पूर्ण अभिव्यक्तीस्वातंत्र्य असणेच योग्य. याचा अर्थ एकाला एक आणि एकाला एक असे न वागायचे बंधन - जनतेवर नाही, तर सरकारवरच... ब्लासफेमस हा शब्द ख्रिस्ती धर्माशी संबंधीत आहे. त्याचा अर्थ इतर धर्मांशी कसा लावणार? कायद्याने ब्लासफेमीची काही व्याख्या केली आहे का?

भारताची अखंडता, एकता इत्यादींना धोका पोचतो आहे हे कसे कळेल?

कदाचीत, "An independent Kashmiri nation may be a flawed entity, but is independent India perfect?’" हे तेहलकाने म्हणणे आणि (भारताच्या एकतेविरुद्ध आणि अखंडतेविरुद्ध) "Kashmir needs freedom from India:" असे अरूंधती रॉय यांचे वक्तव्य आणि ते छापणारे टाईम्स ऑफ इंडीया, "वुई" हा अरुंधतीरॉय यांच्या कार्यावरील माहितीपट ;) , ही या संदर्भात उदाहरणे ठरू शकतील. कारण सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तीने भारताच्या अखंडतेविरुद्ध जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहचवला आहे. त्याचे समर्थन करणारे देखील त्यामुळे आपोआप धोकादायक ठरू शकतील... :-)

ह्या नियमांची कितपत गरज आहे?
मी मुळातून नियम वाचलेले नाहीत. मात्र ते तुम्ही लिहील्याप्रमाणे असले तर ते त्याची गरज नाही असे म्हणेन. मात्र नियम नको असले तर सर्वांनीच जबाबदारीने आणि समजुतीने वागण्याची गरज असते. मात्र, ते कधीच होत नाही. म्हणून नियमांची (सेन्सॉरशिपची नाही) गरज असते असे वाटते पण ते सुस्पष्ट आणि सर्वसमावेशक असले पाहीजेत असे म्हणेन. आत्ताच्या घडीला ते नियम म्हणजे, जेंव्हा हवेत तेंव्हा वापरायला एक शस्त्र आहे. एकाअर्थी दंडूकेशाही आहे आणि ती अयोग्य आहे असेच वाटते.

तुम्ही हे नियम कितपत पाळाल?
कुठल्याही धर्मासंदर्भात, श्रद्धांसंदर्भात ब्लासफेमस, हानीकारक, त्रासदायक, अश्लील वगैरेचा वापर करून न लिहीणे, भारताच्या अखंडतेचा मान राखणे, हे मी नियम नसले तरी पाळतो. कारण ते माझ्या लेखी संस्कार आहेत. तरी देखील ६० माईल्स पर अवरची स्पिड लिमीट असलेल्या रस्त्यावर कधी कधी ८०च्या स्पिडने जावे लागते कारण बॉस्टनचा तो अलिखित नियम आहे, "ऑलवेज ड्राईव्ह विथ स्पिड ऑफ रेस्ट ऑफ दी ट्रॅफिक"! ;) तरी देखील एखादा १२० च्या स्पिडने जाऊ लागला तर जाणार नाही. पक्षी: टिका करेन पण हानीकारक/त्रासदायक लिहीणार नाही...

थोडक्यात माझ्यालेखी या गोष्टींची गरज आहे: स्वयंजबाबदारी, सुस्पष्ट नियम, आणि सुस्पष्ट नियमांचा आणि संदिग्धतेचा गैरवापर असेल तर त्याचा विरोध आणि योग्य बदलाची मागणी...

-----------

अवांतरः साम्यवादी, समाजवादी, निधर्मी, निश्रद्ध वगैरेंना त्यांच्या विचारधारांमुळे काही बोलले तर ब्लासफेमस ठरणार नाही. त्यामुळे असे वाटते की साम्यवाद/समाजवाद/निधर्मीवाद ह्यांना देखील म्हणून धर्म म्हणून जाहीर करावे का? ;)

अनालजी

-तरी देखील ६० माईल्स पर अवरची स्पिड लिमीट असलेल्या रस्त्यावर कधी कधी ८०च्या स्पिडने जावे लागते कारण बॉस्टनचा तो अलिखित नियम आहे, "ऑलवेज ड्राईव्ह विथ स्पिड ऑफ रेस्ट ऑफ दी ट्रॅफिक"! ;) तरी देखील एखादा १२० च्या स्पिडने जाऊ लागला तर जाणार नाही. --

ही अनालजी खूप आवडली

सहमत

तुम्ही हे नियम कितपत पाळाल?
कुठल्याही धर्मासंदर्भात, श्रद्धांसंदर्भात ब्लासफेमस, हानीकारक, त्रासदायक, अश्लील वगैरेचा वापर करून न लिहीणे, भारताच्या अखंडतेचा मान राखणे, हे मी नियम नसले तरी पाळतो. कारण ते माझ्या लेखी संस्कार आहेत.

सहमत आहे. तरीपण भारत अखंड असणे म्हणजे भारताच्या मोठ्यात मोठ्या भूभागावर एकाच व्यक्तीचा(चंद्रगुप्त/मोगल)/संस्थेचा(इंग्रज/भारतीय लोकशाही) अंमल असणे होय असे वैयक्तिक मत आहे. उदा: पाकव्याप्त भारत सोडल्यास उरलेला भारत अखंड टाईप. पूर्वी अनेक राज्ये असत आणि त्यात युद्धे होत् तशी आताही भाषिक राज्ये आहेत फक्त प्रत्येक राज्याचं सैन्य नाही नाहीतर युद्धे व्हायला वेळ लागला नसता.

तरी देखील ६० माईल्स पर अवरची स्पिड लिमीट असलेल्या रस्त्यावर कधी कधी ८०च्या स्पिडने जावे लागते कारण बॉस्टनचा तो अलिखित नियम आहे, "ऑलवेज ड्राईव्ह विथ स्पिड ऑफ रेस्ट ऑफ दी ट्रॅफिक"! ;) तरी देखील एखादा १२० च्या स्पिडने जाऊ लागला तर जाणार नाही. पक्षी: टिका करेन पण हानीकारक/त्रासदायक लिहीणार नाही...

(६० ने जायची इच्छा असेल तर)६० माईल्स पर अवरची स्पिड लिमीट असलेल्या रस्त्यावर रेस्ट ऑफ दी ट्रॅफिक ८० ने जात असेल तर आपण सर्वात उजवीकडच्या(स्लो) लेनमधून ६० च्या स्पीडने का जाऊ नये? की रेस्ट ऑफ दी ट्रॅफिकच्या नावाखाली ८० ने जावे?

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

कारण

पूर्वी अनेक राज्ये असत आणि त्यात युद्धे होत् तशी आताही भाषिक राज्ये आहेत फक्त प्रत्येक राज्याचं सैन्य नाही नाहीतर युद्धे व्हायला वेळ लागला नसता.

आज जी भाषिक राज्ये आहेत ती भारताचा भाग आहेत आणि तेथे असलेले सरकार, सरकारातला पक्ष त्या राज्याचे कायदे आणि भारताची घटना आणि अखंडत्व मान्य करूनच तयार झालेले असते. या संदर्भात कायम भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उदाहरण मी पाश्चात्यांकडूनही ऐकलेले आहे, की कम्युनिझमसारख्या हुकूमशाही विचारसरणीचे लोकशाही मान्य करून सक्रीय राजकारणात राहाणे हे पहील्यांदा भारतात झाले आहे. अर्थात कम्युनिस्टांना देखील भारताचे अखंडत्व आधी मान्य करावे लागले आहे आणि मगच राजकारणात भाग घेता आला. तेच शिवसेनेच्या बाबतीत जेंव्हा निवडणूका लढवण्याची वेळ आली तेंव्हा झाले. पहील्यांदा त्यांना घटना मान्य करून पक्ष देखील भारतीय संविधानातील पद्धतीनेच म्हणजे (किमान वरकरणी/कायद्यापुरता) लोकशाहीपद्धतीने चालवावा लागेल हे जाहीर मान्य करावे लागले आणि मगच निवडणूकात भाग घेता आला. (शिवसेनेचा अर्थातच भारताच्या अखंडत्वाला विरोध नाही, पण लोकशाही म्हणले की पचणे अवघड जाते).

(हेच इतर विशेष करून लोकशाही राष्ट्रांसाठीपण लागू होऊ शकते:) वर्तमानात आपण ज्या भूमीला भारत म्हणत असू आणि जे सार्वभौमराष्ट्र समजले जाते, ज्या राष्ट्राचे आपण नागरीक आहोत आणि नागरी हक्क उपभोगतो आणि त्यासाठी कायदे मानतो, त्या राष्ट्राचे (येथे भारत) आपण देखील सार्वभौमत्व मानले पाहीजे, म्हणजेच अखंडत्व मान्य केले पाहीजे, त्याचा आदर राखला पाहीजे.

(६० ने जायची इच्छा असेल तर)६० माईल्स पर अवरची स्पिड लिमीट असलेल्या रस्त्यावर रेस्ट ऑफ दी ट्रॅफिक ८० ने जात असेल तर आपण सर्वात उजवीकडच्या(स्लो) लेनमधून ६० च्या स्पीडने का जाऊ नये? की रेस्ट ऑफ दी ट्रॅफिकच्या नावाखाली ८० ने जावे?

"रेस्ट ऑफ दी ट्रॅफिक" म्हणले आहे, "रेस्ट ऑफ दी ट्रॅफिक इन दी फास्ट लेन" म्हणलेले नाही! :-)

शंका

नियम लागू केले की मसुदा पक्का केला?
--
संस्थळाने विनंती केली तर नक्कीच नियम पाळेन, संस्थळाला पर्वा नसेल तर पाळणार नाही.
हे नियम न्यायालयात टिकणार नाहीत. आवश्यक वाटेल तेव्हा नियमभंग करणारे संस्थळ सुरू करेन.

साम्यवादी, समाजवादी, निधर्मी, निश्रद्ध वगैरेंना त्यांच्या विचारधारांमुळे काही बोलले तर ब्लासफेमस ठरणार नाही. त्यामुळे असे वाटते की साम्यवाद/समाजवाद/निधर्मीवाद ह्यांना देखील म्हणून धर्म म्हणून जाहीर करावे का? ;)

होय, पर्यायाचा गांभीर्याने विचार करावा लागू शकेल.
--
मध्यस्थाच्या व्याख्येत आंजा जोडणी सेवा पुरविणारे येतील काय?

यावरून...


साम्यवादी, समाजवादी, निधर्मी, निश्रद्ध वगैरेंना त्यांच्या विचारधारांमुळे काही बोलले तर ब्लासफेमस ठरणार नाही. त्यामुळे असे वाटते की साम्यवाद/समाजवाद/निधर्मीवाद ह्यांना देखील म्हणून धर्म म्हणून जाहीर करावे का? ;)

होय, पर्यायाचा गांभीर्याने विचार करावा लागू शकेल.

यावरून व्यंकटेश माडगुळकरांची "एका नव्या देवस्थानाचा जन्म" ही कथा आठवली. :-) बाकी धर्मसंकल्पनेचे भंजकच नव्या धर्मस्थापनेच्या "पर्यायाचा गांभिर्याने विचार करावा लागेल," असे म्हणतात तेंव्हा अंमळ करमणूक होते. ;)

नियम आणि पालन

मला असे वाटते की यातेल बरेचसे नियम एरवी वागण्यालासुद्धा लागू आहेत, पण त्याचे पालन होत नाही. हे पाहून कदाचित अधिक जाचक नियम (दंडाची रक्कम वाढवणे, कैद वगैरे) लावले जातात. काही दिवसांनी असे दिसते की त्यांचेसुद्धा पालन होत नाही. याची कारणे शोधून ती दूर करणे आवश्यक आहे. ते होत नसल्यामुळे "सिंगापूरमध्ये असे करून बघा, दुबईमध्ये हे चालले असते का?" असे उद्गार काही लोक काढतांना दिसतात. ( मी या दोन्ही जागी गेलेलो नाही, त्यामुळे असे बोलतही नाही आणि त्यावर मानही डोलवत नाही.)
प्रस्तुत लेखातले सायबर नियम त्याच पठडीतले आहेत. त्यांचे अक्षरशः पालन करणे कठीण आहे आणि मुख्य म्हणजे यावर कोणत्या प्रकारची यंत्रणा लक्ष ठेवणार आहे आणि नियम मोडणार्‍यावर ती कशा प्रकारची कारवाई करणार आहे यावर हे नियम किती उपयुक्त आहेत आणि त्रासदायक आहेत हे ठरेल.

नियम

संपूर्ण नियमावली वाचण्याचं धार्ष्ट्य झालं नाही. तुम्ही वर दिलेले नियम निश्चितच स्वातंत्र्यावर अतिरेकी बंधन घालणारे वाटतात. हे नियम जर कठोरपणे अंमलात येणार असतील तर त्याचा कडकडून निषेध करणं भाग पडेल.

लिखित नियम व अंमलबजावणीची पद्धती या दोन बाबींनी मिळून न्याय्य वा अन्याय्य व्यवस्था ठरते. कठोर नियम - शिथिल अंमलबजावणी आणि अधिक स्वातंत्र्य देणारे नियम पण कठोर अंमलबजावणी, या दोहोंचा परिणाम साधारणपणे सारखाच असू शकतो. मला व्यक्तिशः दुसरी व्यवस्था अधिक आवडते. कठोर नियम करून हवी तेव्हा अंमलबजावणी करणं हे भ्रष्ट व्यवस्थेला सोयीचं जातं. मला स्वतःला या नियमांच्या मर्यादा तपासून पहाण्याची गरज वाटत नाही. पण इतर अनेक जण असे असतील ज्यांची आंतर्जालीय वक्तव्यं या नियमांबाहेर जातील. अशांवर या नियमांचा बडगा आला तर निषेध करणं भाग पडेल. सध्या तरी माझी 'बघू काय होतंय' अशी भूमिका आहे.

हे नियम भारतातल्या वेबसाइट्ससाठी आहेत का? उपक्रमाला लागू आहेत का? भारतात होस्ट केलेल्या वेबसाइट्सवर परदेशांतून कोणी लिहिलं तर त्यांना लागू आहेत का? याविषयी कोणीतरी प्रकाश पाडावा. कारण जर नियमांना इतकी भोकं असतील, तर मग त्यांना काय अर्थ रहातो असाही प्रश्न उपस्थित होतो.

एखाद्या आयडीने काही नियमबाह्य लिहिल्यास संपादन मंडळ गोत्यात येणार की त्या आयडीविषयी सरकारला माहिती देणं संस्थळाला भाग पडणार?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

ब्लॉगर्सची अनास्था

सुमारे 4 महिन्यांपूर्वी प्रथम हे नियम ड्राफ्ट स्वरूपात प्रसिद्ध झाले होते. त्या वेळेस मी हा प्रश्न माझ्या या लेखात येथे व व माझ्या ब्लॉग्सवर उपस्थित केला होता. याला आलेला एकूण प्रतिसाद बघता भारतातील ब्लॉगर मंडळींना या विषयी असलेली अनास्था जाणवली. त्यामुळे हे नियम बहुतेकांना जाचक वाटत नसावेत असे मला वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अर्थ

विकास आणि घासकडवी ह्यांच्या प्रतिसादाशी सहमत.

कठोर नियम पण शिथील अंमलबजावणी हेच तत्व सरकार पळणार असे दिसते, तसेही ह्या बाबतीत कठोर अंमलबजावणी करणे वस्तुतः शक्य आहे का अशी शंका येते.

तसेच हे नियम करण्यामागचा उद्देश समजून घेण्याचा प्रयत्न केला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपून टाकण्यासाठी नव्हे तर गरज पडल्यास अधिकाराचा वापर(क्वचित गैर) करून कायदा आणि सुव्यवस्था टिकविणे हा असावा, कारण आंतरजालावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपून टाकण्यासाठी चीनने जे केले तेच उपाय फक्त शक्य आहेत, ह्या नियमांची अंमलबजावणी करणे फारच दुस्तर असेल असे वाटते.

पण असे हत्यार तरी सरकारकडे असावे काय? सरकारवर कोणाचे नियंत्रण असणार असा प्रश्न निर्माण होतो, त्याचे उत्तर जनताच हे नियंत्रण करेल असे दिसते. ह्याचे एक उदाहरण असे कि वाहन कायद्याप्रमाणे (कलम १२९) सर्व स्वयंचलित दुचाकी वाहन चालकांना डोक्याचे संरक्षण होईल असे कवच घालणे बंधनकारक आहे(शीख वगैरे अपवाद), म्हणजेच हेल्मेट घालणे गरजेचे आहे, असे असताना देखील बहुतांश लोक हेल्मेट घालत नाहीत, व त्यांचावर कारवाई देखील होत नाही(अभावाने होते).

नियम संदिग्ध असणेच योग्य असे वाटते, नियम सुस्पष्ट करणे अवघड होईल तसेच सुस्पष्ट नियम अभिव्यक्तीला अधिक हानिकारक असतील, वरील नियम अभिव्यक्तीला हानिकारक नसून ह्या नियमांची अंमलबजावणी हानिकारक असेल, पण ती हानिकारक कृती करण्याचे स्वातंत्र्य हे नियम देतील हे मात्र नक्की.

वाईट

कठोर नियम पण शिथील अंमलबजावणी हेच तत्व सरकार पळणार असे दिसते

असे शासकीय धोरण घृणास्पद आहे. खासगी मालकीच्या क्षेत्रात, उदा., संकेतस्थळांवर, अशी मनोवृती, उदा., सम आयडीज आर मोअर इक्वल, इ., दिसते आणि तो हक्क मान्यच आहे परंतु शासनाने असे धोरण राबविल्यास नोकरशाहीच्या हाती अनिर्बंध सत्ता येते. नियम सुस्पष्ट (आणि न्याय्य) असणे अत्यावश्यक आहे.
हेल्मेटसक्ती, सीटबेल्टसक्ती आणि हे सायबर नियम या सार्‍यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे आवश्यक आहे, मदत करण्यात कोणास रस असल्यास कृपया कळवावे.
--
बाकी, या नियमांच्या मदतीने कुराण/जुना करार यांच्या ऑनलाईन अभिव्यक्तीवर बंदी आणण्याची मागणी करावी काय? मनुस्मृती, बौद्ध रामायण, हेही चांगले टार्गेट होतील. भारतरत्न हा शब्द उपाधी म्हणून वापरण्यात आलेले सारे लेखनही "५. लागू असणाऱ्या कुठल्याही कायद्याचे उल्लंघन करणारी माहिती" या तरतुदीखाली उडविण्याची मागणी करता येईल.

+१

शासनाने असे धोरण राबविल्यास नोकरशाहीच्या हाती अनिर्बंध सत्ता येते. नियम सुस्पष्ट (आणि न्याय्य) असणे अत्यावश्यक आहे.

असेच म्हणतो. म्हणून संदिघ्ध नियम असता कामा नयेत. त्याच संदर्भात ॠषिकेशने खाली म्हणल्याप्रमाणे जरी कोर्ट त्याचा अर्थ लावतील, तरी तो पर्यंत अशा गोत्यात आलेल्या व्यक्तीचा हकनाक वेळ आणि पैसा खर्च होऊ शकतो असे वाटते.

हेल्मेटसक्ती, सीटबेल्टसक्ती आणि हे सायबर नियम या सार्‍यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे आवश्यक आहे, मदत करण्यात कोणास रस असल्यास कृपया कळवावे.

हेल्मेट सक्ती, सीटबेल्टसक्ती ची तुलना सायबरनियमांशी करणे पटले नाही. सेफ्टी इश्यू आहे. सक्ती असावी पण कशी करावी हा मुद्दा आहेच. असो. तो वेगळा विषय म्हणून चर्चीता येईल.

या नियमांच्या मदतीने कुराण/जुना करार यांच्या ऑनलाईन अभिव्यक्तीवर बंदी आणण्याची मागणी करावी काय? मनुस्मृती, बौद्ध रामायण, हेही चांगले टार्गेट होतील.

ते सर्व पब्लीक डोमेनमध्ये येते. त्यामुळे जमू शकणार नाही.

?

ते सर्व पब्लीक डोमेनमध्ये येते. त्यामुळे जमू शकणार नाही.

पब्लिक डोमेन की कॉपीरायटेड साहित्य याचा काय संबंध? 'ग्नू जनरल पब्लिक लायसन्स' सोबत प्रसिद्ध साहित्य त्वरितच पब्लिक डोमेनमध्ये जाते.
लीळाचरित्र पब्लिक डोमेनमध्ये आहे, लज्जागौरीही पब्लिक डोमेनमध्ये आहे. र धों कर्व्यांचे लेखन २०२८ साली पब्लिक डोमेनमध्ये येईल. मेन काम्फ २०२० साली पब्लिक डोमेनमध्ये येईल.
पब्लिक डोमेन हा निकषच असू शकत नाही (मेन काम्फ विरुद्ध उर्वरित उदाहरणे). असत्यावर आधारित मानहानी, हिंसेला चिथावणी, इ. मजकूर पब्लिक डोमेनमध्ये असला तरीही त्याच्यावर बंदीच असते, असावी.

बरोबर

असत्यावर आधारित मानहानी, हिंसेला चिथावणी, इ. मजकूर पब्लिक डोमेनमध्ये असला तरीही त्याच्यावर बंदीच असते, असावी.
बरोबरच. सहमत. ते जर कुणाला करायचेच असेल तर भारतिय राज्यघटनेचा वापर करून देखील करू शकतील. म्हणून काय घटनेवरच बंदी आणायची का? ती दुर्घटना ठरेल. ;)

तुमचा मूळ मुद्दा होता: "या नियमांच्या मदतीने कुराण/जुना करार यांच्या ऑनलाईन अभिव्यक्तीवर बंदी आणण्याची मागणी करावी काय? मनुस्मृती, बौद्ध रामायण, हेही चांगले टार्गेट होतील."

यातील बरेच हे श्रद्धा आणि धर्म म्हणून जगन्मान्य आहे. त्यामुळे त्यावर बंदी आणता येणार नाही. त्याचबरोबर त्याचा संदर्भ वापरून इतरांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर सगळे कायदे आहेतच. बौद्ध रामायणाबद्दल वाचलेले नाही त्यामुळे जास्त माहीती नाही. मनुस्मृतीबद्दल विरोधातीलच वाचले आहे जरी मनुस्मृती वाचलेली नाही. दोन्ही संदर्भात इतकेच म्हणेन की ते जर कोणी ऐतिहासीक पुस्तके म्हणून चर्चेत, लेखसंदर्भात आणत असले तर काहीच हरकत नसावी.

शंका

ते जर कुणाला करायचेच असेल तर भारतिय राज्यघटनेचा वापर करून देखील करू शकतील.

कसे?

श्रद्धा आणि धर्म म्हणून जगन्मान्य आहे.

त्यांपैकी कोणत्याही पुस्तकाच्या चाहत्यांच्या (=त्या धर्माचे लोक) संख्येपेक्षा त्या पुस्तकाला अमान्य करणार्‍या व्यक्तींची (=इतर सर्व धर्मांचे लोक+निधर्मी) संख्या अधिक आहे.
'खूप लोकप्रिय' असा जगन्मान्यतेचा अर्थ घेतला तरीही जातीव्यवस्था, गुलामगिरी, स्त्री-पुरुष असमता, सती, पीडोफिलिया/बालविवाह/गर्भाधान, नरबळी, इ. अनेक प्रथा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या कालखंडांमध्ये खूप प्रचलित होत्या. जगन्मान्यता हाही निकष शक्य नाही.

त्याचा संदर्भ वापरून इतरांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर सगळे कायदे आहेतच.

मग कर्ट वाइज, दीपक चोप्रा, इ.ना त्यांच्या श्रद्धा/मतांवरून हिणविणे, तुच्छ लेखून लोकप्रियता घटविणे, इ. कसे शक्य होईल?

ते जर कोणी ऐतिहासीक पुस्तके म्हणून चर्चेत, लेखसंदर्भात आणत असले तर काहीच हरकत नसावी.

मान्य, मेन काम्फचाही तसा उल्लेख चालेलच. परंतु त्या पुस्तकांना 'मानणार्‍या' मेनस्ट्रीम धार्मिक संस्थळांवरच या कायद्याने बंदी आणावी असे मी सुचवितो आहे.

फरक

त्यांपैकी कोणत्याही पुस्तकाच्या चाहत्यांच्या (=त्या धर्माचे लोक) संख्येपेक्षा त्या पुस्तकाला अमान्य करणार्‍या व्यक्तींची (=इतर सर्व धर्मांचे लोक+निधर्मी) संख्या अधिक आहे.
अमुक एक हा धर्म आहे असे मान्य केल्याने त्यातून अमुक एका धर्माचा चाहता आहे असा अर्थ निघत नाही.

'खूप लोकप्रिय' असा जगन्मान्यतेचा अर्थ घेतला तरीही जातीव्यवस्था, गुलामगिरी, स्त्री-पुरुष असमता, सती, पीडोफिलिया/बालविवाह/गर्भाधान, नरबळी, इ. अनेक प्रथा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या कालखंडांमध्ये खूप प्रचलित होत्या.

खरे आहे. मात्र त्यांना धर्म मानले गेले नव्हते तर अनिष्ट प्रथा असेच थोड्याफार फरकाने नंतर संबोधण्यात आले. पण जसजसा समाज सुधारत गेला तस तसे त्या प्रथांना अनिष्ट म्हणत त्यावर बंदी घातली गेली.

मग कर्ट वाइज, दीपक चोप्रा, इ.ना त्यांच्या श्रद्धा/मतांवरून हिणविणे, तुच्छ लेखून लोकप्रियता घटविणे, इ. कसे शक्य होईल?

लोकप्रियता घटवण्यासाठी हिणवण्याची, तुच्छ लेखण्याची गरज असते हे नव्यानेच समजले. माझ्या लेखी ज्यांना स्वतःच्या मतांविषयी आत्मविश्वास नसतो ते इतरांना हिणावत, तुच्छ लेखत लोकप्रियता घटवण्याचा प्रयत्न करतात.

मान्य, मेन काम्फचाही तसा उल्लेख चालेलच.
मला वाटते तो आज चालतही असेल आणि काहीच हरकत नाही.

परंतु त्या पुस्तकांना 'मानणार्‍या' मेनस्ट्रीम धार्मिक संस्थळांवरच या कायद्याने बंदी आणावी असे मी सुचवितो आहे.

तुम्हाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य मान्य आहे का? असल्यास ते निंसंदिग्ध मान्य असले पाहीजे. "ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल" असले धेडगुजरी नाही.

खुलासा

अमुक एक हा धर्म आहे असे मान्य केल्याने त्यातून अमुक एका धर्माचा चाहता आहे असा अर्थ निघत नाही.

'धर्म आहे प्रमाणपत्र'/'श्रद्धा आहे प्रमाणपत्र' म्हणजे काय? 'तो धर्म आहे असे त्यांना वाटते परंतु त्यांची श्रद्धा खुळचट आहे' असेच कोणीही इतरांच्या धर्माविषयी म्हणते/म्हणावे. "ते रानटी/अडाणी लोक धर्माच्या नावाखाली हास्यास्पद/आक्षेपार्ह मते बाळगतात/वागतात" असेही म्हटले जाते. "आमचा देव त्यांना नरकात टाकणार आहे" अशा प्रकारच्या शब्दांत द्वेषही असतो.
धर्माला असे स्पेशल स्टेटस का हो? क्रिकेट/चित्रपट यांच्या वेडापेक्षा तो उच्च का?

त्यांना धर्म मानले गेले नव्हते तर अनिष्ट प्रथा असेच थोड्याफार फरकाने नंतर संबोधण्यात आले.

'नंतर' काय करण्यात आले ते गौण आहे, 'तेव्हा' त्या धर्मातच होत्या (त्या असलेले ग्रंथ अजूनही शिरोधार्य आहेतच). टिळकप्रभृतींनी गर्भादानासाठी संमतीवयाला विरोध केला कारण त्यांच्या मते तो कायदा धर्मात ढवळाढवळ करीत होता.
धर्म धर्म म्हणजे मूलतः असते तरी काय? तर, काहीतरी निराधार/चुकीची मते (ज्यांच्या सत्यतेविषयी ठाम खात्री असते), आणि, त्यांवर आधारित काहीतरी प्रथा, यांचा संग्रह!

तुम्हाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य मान्य आहे का? असल्यास ते निंसंदिग्ध मान्य असले पाहीजे. "ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल" असले धेडगुजरी नाही.

अभिव्यक्तीविरोधी नियम आम्हाला बदलून हवेच आहेत. मात्र, तसे न करता त्यांच्या शस्त्रानेच त्यांना धडा शिकविणेसुद्धा शक्य आहे असे माझे प्रतिपादन आहे.

थोडे वेगळे

मी हेल्मेट सक्तीबाबत अंमलबजावणीचे उदाहरण दिले होते, तुम्ही किंवा विकास दोघांनी अंमलबजावणीवर मत व्यक्त केले नाही, मुद्दा एका बाजूने अंमलबजावणीचा देखील आहे. सुव्यस्था राखण्यासाठी ज्यांचावर सुव्यस्था राखली जाते त्यांचापेक्षा जास्त हक्क असणे किंवा त्यांच्या हक्कांच्या गैरवापरावर गदा आणण्याचा हक्क सरकारला हवा हे माझे मत आहे, त्याशिवाय सुव्यवस्था कशी राखणार?

पण अंमलबजावणी कडक झाल्यास माझ्याकडून तुमच्या जनहितार्थ/ अभिव्यक्तीहितार्थ याचिकेला पूर्णपणे सक्रीय समर्थन असेल.

काही कायदे जाचक आहेत हे मला मान्य आहे, किंवा राजकारण्यांच्या स्वार्थासाठीच बनविले गेले आहेत असे वाटणारे (हेल्मेट सक्ती वगैरे) वाटतात, त्यांना वैयक्तिक पातळीवर माझा विरोध आहे पण कदाचित सामाजिक पातळीवर होणारे अपघाती मृत्यू हेल्मेटमुळे कमी झाल्यास, माझी थोडीफार अभिव्यक्ती मारली गेल्यास मी 'विचार' करेन, तरीदेखील जीवितहानी रोखण्याचा हा मार्ग चुकीचा आहे हे मान्य. हेल्मेट सक्तीचा कायदा करताना, पुरेशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था राबविणे हे सरकारची जबाबदारी आहे, कायद्याचा बडगा दाखविण्याआधी हेल्मेट कमी वापरावी लागेल अशी परिस्थिती निर्माण करणे सरकारची जबाबदारी असेल, पण तसे कायद्यात लिहेलेले नसते त्यामुळे असे कायदे काही प्रमाणात गैर आहेत.

कोर्टात जाऊन केस-बाय-केस निकाल लावणे जास्त योग्य असेल कारण त्यामध्ये शब्दांच्या/अर्थांच्या गुंत्यात अडकून सामान्य माणसाची हानी/वेळ अपव्यय होणार नाही. पण आपल्याकडे ज्याप्रकारात निकाल लावतात त्यामध्ये वेळ जाऊ शकेल हे मान्य, तरीदेखील निकाल योग्य असेल.

असहमत

त्याशिवाय सुव्यवस्था कशी राखणार?

दंगलखोरांना मारून.

पण कदाचित सामाजिक पातळीवर होणारे अपघाती मृत्यू हेल्मेटमुळे कमी झाल्यास, माझी थोडीफार अभिव्यक्ती मारली गेल्यास मी 'विचार' करेन

लोणी/तूप सेवन, मद्य/धूम्रपान, पर्वतारोहण अशा अनेक मनोरंजनाच्या मार्गांमुळे मृत्यूचा धोका असतो. हेल्मेट/सीटबेल्टसक्ती ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याची नव्हे तर, व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी आहे.

उम्म्म्म्....

>>दंगलखोरांना मारून.
दंगल करणारांना मारून दंगलीचे मूळ कारण मिटविता येत नाही, कृतीचे मूळ विचारात असते. विचार बदला, कृती बदलेल. दडपशाही करून दडपशाही मिटविता येत नाही. (एक चीन अपवाद)

>>हेल्मेट/सीटबेल्टसक्ती ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याची नव्हे तर, व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी आहे.
ते मी मान्य केले आहेच.

होय

दंगल करणारांना मारून दंगलीचे मूळ कारण मिटविता येत नाही, कृतीचे मूळ विचारात असते. विचार बदला, कृती बदलेल.

'माझ्या भावना इतरांनी जपाव्या' हाच तो दुष्ट विचार आहे, तेच मूळ कारण आहे.

मग

माझी अभिव्यक्ती दुसऱ्याने जपावी हे हा देखील तसाच एक विचार आहे, माझ्या भावना तेवढ्या तीव्र नाहीत म्हणून समोरच्याच्या तीव्र भावना मी जपणार नाही हा स्वार्थी विचार झाला.

खुलासा

तुम्हा लोकांची अभिव्यक्ती जपण्यास मी तयार आहे. तुम्हा लोकांची श्रद्धा पाहून मला खूप दु:ख होते परंतु त्याचा विरोध म्हणून मी कोणावर शारिरीक हल्ला केलेला नाही.
--
अभिव्यक्ती जपण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत, लक्ष दिले नाही की झाले (ती पॅसिव अपेक्षा आहे). भावना जपणे अशक्य आहे (ती ऍक्टिव अपेक्षा आहे), तुमच्या सर्व भावनांची यादी द्या मग ठरवू.

ठीक

>>तुम्हा लोकांची अभिव्यक्ती जपण्यास मी तयार आहे. तुम्हा लोकांची श्रद्धा पाहून मला खूप दु:ख होते परंतु त्याचा विरोध म्हणून मी कोणावर शारिरीक हल्ला केलेला नाही.

तुमची अभिव्यक्ती तुमच्यापुरती मर्यादित असल्यास ती जपली जाईल/जावी, त्याच प्रमाणे माझी भावना/श्रद्धा माझ्यापुरती मर्यादित असल्यास ती पण जपली जाईल/जावी.

>>परंतु त्याचा विरोध म्हणून मी कोणावर शारिरीक हल्ला केलेला नाही.
माझे वरील विधान गृहीत धरल्यास, कोणतीही शारीरिक इजा गैर आहे/राहील.

>>अभिव्यक्ती जपण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत, लक्ष दिले नाही की झाले (ती पॅसिव अपेक्षा आहे).
वैचारिक पातळीवर मान्य, पण समाज एकाच वैचारिक पातळीवर नसल्याने अशी अपेक्षा करणे काही वेळेस गैर ठरते, त्यामुळे अभिव्यक्तीस मुरड घालणे किंवा योग्य तऱ्हेने व्यक्त करणे उचित.

(You won't kill me out of some misplaced sense of self-righteousness ;))

अमान्य

तुमची अभिव्यक्ती तुमच्यापुरती मर्यादित असल्यास ती जपली जाईल/जावी

अभिव्यक्तीचा अर्थच असा की ती तुम्हाला दिसू शकेल.

त्याच प्रमाणे माझी भावना/श्रद्धा माझ्यापुरती मर्यादित असल्यास ती पण जपली जाईल/जावी.

तुम्ही घराबाहेर पाळलेली सर्वच धार्मिकता माझ्या दृष्टीस पडू शकते आणि मला दु:ख देऊ शकते.

माझे वरील विधान गृहीत धरल्यास, कोणतीही शारीरिक इजा गैर आहे/राहील.

त्या अटीपलिकडेही अभिव्यक्तीचा हक्क आहे.

प्रति:

अभिव्यक्तीचा अर्थच असा की ती तुम्हाला दिसू शकेल.

दिसू शकणे ठीक पण ती दुसऱ्यावर लादणे गैर आहे, तुम्हाला जे वाटते ते तुम्ही तुमच्याबाबतीत व्यक्त करावे, मी जे इतरांना त्रास न देता करतो त्याबाबत तुम्ही तुमचे मत आक्षेपार्ह/अशीष्ठ भाषेत व्यक्त करणे गैर आहे.

त्या अटीपलिकडेही अभिव्यक्तीचा हक्क आहे.

मी वर दिलेल्या विधानात अटीपलीकडच्या हक्काचा समावेश आहे/असावा.

--
ब्लॉकक्वोट लावणे फार कंटाळवाणे वाटते.

सहमत

--दिसू शकणे ठीक पण ती दुसऱ्यावर लादणे गैर आहे, तुम्हाला जे वाटते ते तुम्ही तुमच्याबाबतीत व्यक्त करावे, मी जे इतरांना त्रास न देता करतो त्याबाबत तुम्ही तुमचे मत आक्षेपार्ह/अशीष्ठ भाषेत व्यक्त करणे गैर आहे.

+१ सहमत.

अडचण

ती दुसऱ्यावर लादणे गैर आहे

हुसेनने काय लादले?

मी जे इतरांना त्रास न देता करतो त्याबाबत तुम्ही तुमचे मत आक्षेपार्ह/अशीष्ठ भाषेत व्यक्त करणे गैर आहे.

तुम्ही देत नाही (असे म्हणता) परंतु आम्हाला त्रास होतो (असे आम्ही म्हणतो) ना!

  1. काय आक्षेपार्ह असावे या विषयाचीच तर चर्चा आहे, त्यात पुन्हा 'आक्षेपार्ह' हा शब्द निरर्थक आहे.
  2. मत व्यक्त करणे म्हणजेच तर अभिव्यक्ती! त्यामुळे, आम्हाला त्रास होवो न होवो, आम्ही तुमच्या वागणुकीवर टिपण्णी करू शकतो.

?

हुसेनने काय लादले?

तसे पाहता तुमच्या प्रिय व्यक्तीचे असे चित्र किंवा छायाचित्र देखिल जाहिर व्यक्त करण्यास तुमचा विरोध नसावा?

तुम्ही देत नाही (असे म्हणता) परंतु आम्हाला त्रास होतो (असे आम्ही म्हणतो) ना!

शक्य, पण त्यासाठी तुम्ही शिष्ठ भाषेत तुमचा त्रास व्यक्त करावा, तो कमी करण्यासाठी जमेल ते सर्व प्रयत्न केले जातील.

मत व्यक्त करणे म्हणजेच तर अभिव्यक्ती! त्यामुळे, आम्हाला त्रास होवो न होवो, आम्ही तुमच्या वागणुकीवर टिपण्णी करू शकतो.

मत व्यक्त करण्यामागची सकारात्मक भावना पटल्यास आम्ही अभिव्यक्ती मान्य करूच.

आणि, शारीरिक इजा गैर आहे ह्या विचारामागे शरीराशी संबधित अस्मिता किंवा भावनाच दुखावली जाते ना? :)

नाही

तसे पाहता तुमच्या प्रिय व्यक्तीचे असे चित्र किंवा छायाचित्र देखिल जाहिर व्यक्त करण्यास तुमचा विरोध नसावा?

विरोध नाही.

पण त्यासाठी तुम्ही शिष्ठ भाषेत तुमचा त्रास व्यक्त करावा, तो कमी करण्यासाठी जमेल ते सर्व प्रयत्न केले जातील.

का बरे? आम्ही जाळपोळ/खून का करू नयेत?

मत व्यक्त करण्यामागची सकारात्मक भावना पटल्यास आम्ही अभिव्यक्ती मान्य करूच.

घृणेची भावना व्यक्त करण्याची मुभाही आवश्यक आहे.

शारीरिक इजा गैर आहे ह्या विचारामागे शरीराशी संबधित अस्मिता किंवा भावनाच दुखावली जाते ना? :)

नाही.

नक्की?

विरोध नाही.

केवळ वादासाठी कि खरेच म्हणता आहात? म्हणजे आपणास कोणी आपल्या नात्यातील लोकांचे छायाचित्र ह्या कारणास्तव मागितल्यास, ती मागणी तुम्ही मान्य कराल काय?

का बरे? आम्ही जाळपोळ/खून का करू नयेत?

छे तुम्ही जाळपोळ करूच शकत नाही, तुम्ही फक्त अशिष्ठ भाषेत मत व्यक्त करू नये असे म्हणणे आहे.

घृणेची भावना व्यक्त करण्याची मुभाही आवश्यक आहे.

का सकारात्मक भावनेने तृप्ती होत नाही का?

नाही.

शरीरास इजा झाल्याचे एवढे दुख: का आहे मग?

नाही

ती मागणी तुम्ही मान्य कराल काय?

नाही, तसे काही कर्तव्य अनुस्यूत नाही. ज्यांना छायाचित्र हवे आहे त्यांना ते (घरात न घुसता) घेण्याचा हक्क आहे, इतकेच.
असत्यावर आधारित मानहानी टाळण्यासाठी मॉर्फ केलेल्या चित्रांसोबत 'हे असत्य आहे' अशा आशयाचा मजकूर द्यावा लागेल.

छे तुम्ही जाळपोळ करूच शकत नाही, तुम्ही फक्त अशिष्ठ भाषेत मत व्यक्त करू नये असे म्हणणे आहे.

जाळपोळ/खून करण्याचा हक्क भावना दुखावलेल्यांना मिळतो असे तुमचे मत नसेल तर वादच संपला.

शरीरास इजा झाल्याचे एवढे दुख: का आहे मग?

दु:ख हा मुद्दाच नाही, शरिरास इजा होत नाही अशी कोणतीच व्यक्ती नाही म्हणून शरिराला इजा न करणे हा नियम आहे.

नाही.

असत्यावर आधारित मानहानी टाळण्यासाठी मॉर्फ केलेल्या चित्रांसोबत 'हे असत्य आहे' अशा आशयाचा मजकूर द्यावा लागेल.

हुसेनने तसे करावे, मग चालेल आम्हाला पण, मुळात अशा अटीच भावना दुखावण्याचा संकेत आहे. (किंवा विनोद म्हणून घरातल्यांची अशी चित्रे/वदंता प्रसिद्ध केल्यास चालेल काय? :))

जाळपोळ/खून करण्याचा हक्क भावना दुखावलेल्यांना मिळतो असे तुमचे मत नसेल तर वादच संपला.
दु:ख हा मुद्दाच नाही, शरिरास इजा होत नाही अशी कोणतीच व्यक्ती नाही म्हणून शरिराला इजा न करणे हा नियम आहे.

शारीरिक इजा सगळ्यांनाच दुख:दायक असते त्यामुळे शारीरिक इजा होऊ नये हे मान्य आहे, पण शारीरिक इजा न करता केलेल्या तोडफोडीचे दुख: भावनेशी निगडीत असते, (नुकसान भरून घेता येईल असे कायदे करावेत), पण भावनेला संरक्षण मिळू नये हे तुमचेच मत आहे ना?

ठीक

हुसेनने तसे करावे, मग चालेल आम्हाला

छायाचित्रे मॉर्फ केल्यास तसे करण्याची विशेष आवश्यकता असते, हाताने काढलेल्या चित्रांसाठी 'कल्पना आहे, सत्य नाही' असे लिहिले नाही तरी FAPP 'समजून घेण्याचा' प्रघात आहे. काटेकोर नियम म्हणून तसे लिहिण्याची सक्ती हुसेनवर केली तरीही माझा आक्षेप नाही.

मुळात अशा अटीच भावना दुखावण्याचा संकेत आहे.

आहे.

किंवा विनोद म्हणून घरातल्यांची अशी चित्रे/वदंता प्रसिद्ध केल्यास चालेल काय? :)

चालेल.

शारीरिक इजा न करता केलेल्या तोडफोडीचे दुख: भावनेशी निगडीत असते

मुळीच नाही, रस्त्यात बस जाळल्यामुळे एखाद्या रुग्णवाहिकेला उशीर होऊ शकतो. शिवाय, इतरांच्या मनात दु:खाची भावना निर्माण करणे/भावना दुखावणे यांचे मी समर्थन करीत असलो तरी शारिरीक इजेच्या भीतीची भावना निर्माण करणे (उदा., धमकी देणे) हा मात्र गुन्हाच आहे. केवळ, डोळे वटारणे हाही थ्रेट आहे आणि त्यालाही एखाद्या छोट्या शारिरीक इजेसारखेच गांभीर्य आहे. रस्त्यात टायर जाळले तरीही तो इतरांच्या 'मुक्त संचार' स्वातंत्र्यावर आघात आहे (कारण, आगीपासून दूर चालले नाही तर शारिरीक इजा होते म्हणून रस्त्यावरून जाण्याच्या स्वातंत्र्यावर निर्बंध येतात) आणि तो शारिरीक इजेसारखाच गुन्हा आहे.

ठिक

छायाचित्रे मॉर्फ केल्यास तसे करण्याची विशेष आवश्यकता असते, हाताने काढलेल्या चित्रांसाठी 'कल्पना आहे, सत्य नाही' असे लिहिले नाही तरी FAPP 'समजून घेण्याचा' प्रघात आहे. काटेकोर नियम म्हणून तसे लिहिण्याची सक्ती हुसेनवर केली तरीही माझा आक्षेप नाही.

मग असे नियम असावेत हि किमान मागणी केली जाईल, पण विनोद/मत सांगताना त्याच्या खरे/खोटेपणाची माहिती नसल्यास तो खोटाच समजावा, त्यामुळे अशा अभिव्यक्ती बरोबर 'हे असत्य आहे' असे सांगणे सक्तीचे करावे.

तोडफोडीत असलेली शारीरिक इजेची भीती हि नाण्याची एक बाजू आहे, आणि होणारी नालस्ती किंवा अपमान हि दुसरी बाजू आहे, शिवसेना किंवा मनसे जी तोडफोड करतात त्यामध्ये शारीरिक इजा नगण्य असते, जरी असते असे म्हणाले तरी ज्या ठिकाणी तोडफोड होते (महापालिका/मिडिया, वृत्तपत्र, वयक्तिक कचेरी), अशा स्थावर गोष्टींच्या मालकांना/संचालकांना/ सत्ताधाऱ्याना स्वतःच्या अथवा तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना होणाऱ्या शारिरीक इजेचा त्रास अधिक नसून त्यामधून होणाऱ्या मानसिक इजेचा त्रास(मानहानी, अपमान वगैरे) जास्त असतो. कारण सामान्य लोकांना 'फार' शारिरीक इजा करणे शिवसेना/मनसे सारख्या पक्षांना राजकीय दृष्ट्या महागात पडेल हे सरळ गणित असते.

तरीही

विनोद/मत सांगताना त्याच्या खरे/खोटेपणाची माहिती नसल्यास तो खोटाच समजावा, त्यामुळे अशा अभिव्यक्ती बरोबर 'हे असत्य आहे' असे सांगणे सक्तीचे करावे.

शिवाजीविषयी तसा डिस्क्लेमर लेनने दिलाच होता. लक्ष्मी, सरस्वती, सीता, द्रौपदी, भारतमाता, इ. मुळातच ऐतिहासिक स्त्रिया नाहीत त्यामुळे त्यांच्या गौरवांच्या काल्पनिकांवर सत्यतेचा आरोप करणार्‍यांनी त्यांच्या विटंबनांच्या काल्पनिकांमध्ये 'हे असत्य आहे' या डिस्क्लेमरची अपेक्षाच करू नये.

अशा स्थावर गोष्टींच्या मालकांना/संचालकांना/ सत्ताधाऱ्याना स्वतःच्या अथवा तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना होणाऱ्या शारिरीक इजेचा त्रास अधिक नसून त्यामधून होणाऱ्या मानसिक इजेचा त्रास(मानहानी, अपमान वगैरे) जास्त असतो. कारण सामान्य लोकांना 'फार' शारिरीक इजा करणे शिवसेना/मनसे सारख्या पक्षांना राजकीय दृष्ट्या महागात पडेल हे सरळ गणित असते.

कै च्या कै. शारिरीक इजा, आर्थिक नुकसान, इ. ची भीती नसेल तर अशी प्रसिद्धी त्या लोकांना आवडतेच. किंबहुना, कलाकृतींना प्रसिद्धी देण्यासाठी भाडोत्री संस्कृतीरक्षकांना दिखाऊ निषेध करण्यासाठी बोलाविण्यात येते असा संशय घेण्यास जागा असते. मात्र, हुसेन/रश्दी/लेन यांच्या बाबतीत तसे नाही.

थोडे अधिक

नियम सुस्पष्ट (आणि न्याय्य) असणे अत्यावश्यक आहे.

भारतीय कायद्यातील संपूर्ण सुस्पष्ट नियमांचे उदाहरण देता येईल का? माझ्या अंदाजानुसार प्रत्येक नियमावलीत प्रत्येक व्यक्तीसाठी (कमी अधिक प्रमाणात) संदिग्धता असेलच. त्यातही संदिग्धता ही व्यक्ती/काल/स्थानसापेक्ष आहेच. नियम शक्य तितके स्पष्ट असणे कधीहि चांगले व त्यामुळे वेळ/श्रम/पैसा वाचेल ही नियमांनुसार अंमलबजावणी करताना झापडबंदपणे वागावे असे सांगणारी सोपी पळवाट झाली का? सुस्पष्टता हि प्रत्येकाच्या समजून घेण्याच्या कुवतीवर/प्रसंगावर ठरते असे वाटते. शिवाय सुरवातीला तयार केलेल्या नियमांबरोबरच त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान नियमांना (प्रॅक्टीकली) आकार येतो/यावा असे वाटते. तेव्हा नियम शक्य तितका सामायिक (जेनरीक) असावा व अंमलबजावणी करणार्‍यासाठी एक चौकट आखून देणारा असावा असे वाटते.

शिवाय, एखादा नियम घटनाबाह्य नसेल तर तो सरकारला करण्याचा अधिकार आहेच. त्यावर हरकती मागवल्या जातात तेव्हा त्या देणे हे सायबर युजर्सचे/कंपन्यांचे कर्तव्य होते. ते त्यांनी पाळले नाही आणि आता मागाहून ओरडा करायचा हे कितपत योग्य वाटते?

बाकी राहिलं 'न्याय्य'. न्याय तर इतका सापेक्ष आहे की कुठलाही नियम कोणावर तरी अन्याय करेलच असे वाटते. :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सहमत

-शिवाय, एखादा नियम घटनाबाह्य नसेल तर तो सरकारला करण्याचा अधिकार आहेच. त्यावर हरकती मागवल्या जातात तेव्हा त्या देणे हे सायबर युजर्सचे/कंपन्यांचे कर्तव्य होते. ते त्यांनी पाळले नाही आणि आता मागाहून ओरडा करायचा हे कितपत योग्य वाटते?

+१ सहमत

असहमत

त्यावर हरकती मागवल्या जातात तेव्हा त्या देणे हे सायबर युजर्सचे/कंपन्यांचे कर्तव्य होते. ते त्यांनी पाळले नाही आणि आता मागाहून ओरडा करायचा हे कितपत योग्य वाटते?

पूर्ण योग्य. उदा., अजून न जन्मलेल्यांचे काय?
भारतात जितके सारे कायदे बनविले जातील त्यांचे मसुदे मी मुळीच वाचणार नाही (व्यावहारिकदृष्ट्याही ते शक्य नाही). पण त्यांना काढून टाकण्याची मागणी ही ते कायदे पारित झाल्यानंतर केली इतक्याच कारणाने अवैध ठरणार नाही.

न्याय तर इतका सापेक्ष आहे की कुठलाही नियम कोणावर तरी अन्याय करेलच असे वाटते. :)

नैसर्गिक न्याय असे काहीतरी असते. धर्मांतही 'या न्यायालयाच्या वरचे न्यायालय' ही संकल्पना असते.
--
Prosser: What do you mean, "why"? It’s an expressway. You’ve got to build expressways! You were quite entitled to make any suggestions or protests at the appropriate time, you know.
Arthur: Appropriate time?! The first I knew about it was when a workman arrived at my home yesterday and said he’d come to demolish the house!
Prosser: But Mr. Dent, the plans have been available in the local planning office for the last nine months!
Arthur: Yes, well, as soon as I heard, I went straight round to see them. You hadn’t gone out of your way to call attention to them, had you? I mean, like actually telling anybody.
Prosser: The plans were on display—
Arthur: On display? I had to go down to the cellar to find them!
Prosser: That’s the display department!
Arthur: With a flashlight.
Prosser: The lights had probably gone out.
Arthur: So had the stairs.
Prosser: But you found the notice, didn’t you?
Arthur: Yes, I did. It was "on display" in the bottom of a locked filing cabinet stuck in a disused lavatory with a sign on the door saying, "Beware of the Leopard."
...
Vogon: People of Earth, your attention please. This is Prostetnic Vogon Jeltz of the Galactic Hyperspace Planning Council. As you will no doubt be aware, the plans for development of the outlying regions of the Galaxy require the building of a hyperspatial express route through your star system, and regrettably your planet is one of those scheduled for demolition. The process will take slightly less than two of your Earth minutes. Thank you.
Narrator 1: Uncomprehending terror settled on the watching people of Earth.
Narrator 2: Panic sprouted, desperate fleeing panic, but there was nowhere to flee.
Vogon: There’s no point acting surprised about it. All the planning charts and demolition orders have been on display in your local planning department in Alpha Centauri for fifty of your Earth years! You’ve had plenty of time to lodge any formal complaints. It’s far too late to start making a fuss about it now!

मजेशीर!

विनोद मजेशीर! :)


भारतात जितके सारे कायदे बनविले जातील त्यांचे मसुदे मी मुळीच वाचणार नाही (व्यावहारिकदृष्ट्याही ते शक्य नाही). पण त्यांना काढून टाकण्याची मागणी ही ते कायदे पारित झाल्यानंतर केली इतक्याच कारणाने अवैध ठरणार नाही.

सहमत. अशी मागणी अजिबात अवैध नाही. कोण म्हणतंय अवैध आहे? मी फक्त कितपत योग्य वाटते हा प्रश्न केला आहे. (ज्यात मला फारसे योग्य वाटत नाही हा सूरही आहेच. पण ते माझे मत झाले. वैधता नव्हे)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

ठिकच

हा/एखादा नियम असणे आणि त्याची अंमलबजावणी / वापर करणे - अर्थ लावणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नियम आहे व त्याचा भंग झाला का याचा अर्थ लावायला कोर्ट सक्षम आहेत. आपल्याकडील अनेक कायदे संदिग्ध आहेत. कोर्ट दर प्रसंगानुसार त्याचा अर्थ लावते व निकाल देते.
माझ्यामते इथेही तेच व्हावे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य हा प्राथमिक अधिकार असल्याने जर आरोपी हे सिद्ध करू शकला की त्याच्या कृतीवर या नियमांनी बंदी हा त्याच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला आहे तर कोर्ट योग्य तो निर्णय देईलच.

शिवाय, नियम बनल्यावरही जर तो तुम्हाला घटनाबाह्य वाटत असेल तर कोर्टात दाद मागता यावी.

त्यातही हे नियम (गाईडलाईन्स म्हणून) मला ठिकच वाटतात.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

इंल्पिसीट एक्स्पेक्टेशन

हे नियम संबंधीत संकेतस्थळ, ब्लॉग ह्यांच्या स्टेकहोल्डर्सनी आपापल्यापुरते "योग्य" इंटरप्रीटेशन करुन अंमलबजावणी करणे असा अर्थ त्यातुन मी वाचला. त्यामुळे अशा नियमांचे गव्हर्नन्स कसे करायचे, त्याची जबाबदारी कोणाची (त्या संकेतस्थलाच्या सदस्यांची- कारण त्यांनी "टर्मस् ऑफ युज" साईन केले आहे) हे प्रश्न निकालात लागतील.

घटना जशी राष्ट्र-राज्य-जिल्हा-तालुका-गाव अशी अप्ल्याय होते तशीच ही नियमप्रणाली ब्रेकडाऊन करुन तुम्ही तुमच्या बाबतीत लागू करणे हे त्यातील इंल्पिसीट एक्स्पेक्टेशन आहे. त्यांनी गाईडलाईन दिल्या आहेत - त्या संबंधीतांनी पाळाव्या अशी अपेक्षा आहे.

बाकी जे नियम लिहीले आहेत ते योग्यच आहेत. ते लिहिलेल्या स्वरुपात असले पाहिजेत. लोकांना वेळोवेळी त्याचा रेफरन्स म्हणून वापर करता आला पाहिजे.

सरकार ज्या-ज्या वेळी असे नियम बनवते त्या-त्या वेळी त्यात लोकांचा सहभाग करण्याचा प्रयत्न केलेला असतो. अनेकदा जेव्हा मास पब्लिकचे मत विचारात घ्यायचे असते तेव्हा त्याची जाहीर आवाहन केलेले असते. लोक सहभागी होतात की नाही हे पाहणे तितकेच महत्वाचे.

मास पब्लिक

सरकार ज्या-ज्या वेळी असे नियम बनवते त्या-त्या वेळी त्यात लोकांचा सहभाग करण्याचा प्रयत्न केलेला असतो. अनेकदा जेव्हा मास पब्लिकचे मत विचारात घ्यायचे असते तेव्हा त्याची जाहीर आवाहन केलेले असते. लोक सहभागी होतात की नाही हे पाहणे तितकेच महत्वाचे.

मास पब्लिकचे मत विचारणं म्हणजे लोकप्रतिनिधी त्यांची जबाबदारी नीट पार पाडत नाहीत असं होत नाही का? पुणे मेट्रो/बीआरटी/महापालिका क्षेत्रवाढ वगैरे बाबतीत मास पब्लिकला डायरेक्ट विचारणा केली गेली होती. ही कामे आमदार, नगरसेवक वगैरेंतर्फे पार पाडली पाहीजेत. हजार लोकांची हजार मते लक्षात घेतली तरी उपयोग कसा करणार? वसई महानगरपालिकेच्या बाबतीतही असं का होतं? जनता आणि जनतेचे प्रतिनिधी यांची मते एकच का असत नाहीत?

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

लोकसहभाग

कृपया हे वाचा-

१. पहिली लिंक
२. दुसरी लिंक

जाचक नियम

चंद्रशेखर यांनी पूर्वी याच प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यावेळी ज्या सूचना होत्या त्या नियमबद्ध झालेल्या दिसतात.
मागील धाग्याच्या वेळी जे मत मांडले होते त्यात या नियमावलीने फारसा बदल झालेला नाही.

प्रस्तावात २ आणि ९ वर लक्ष वेधले आहे. (ठळक करून). याशिवाय दुसरा महत्वाचा प्रश्न कुणाला जबाबदार धरायचे हा आहे.

यातील २ मुद्दा नीट वाचला तर 'किंवा कुठल्याही अन्य प्रकारे बेकायदशीर अशी माहिती' असे शेवटी लिहिले आहे. याचा अर्थ असा धरतो प्रसिद्ध झालेली माहिती बेकायदेशीर असणे गरजेचे आहे. नाहीतर 'अन्यप्रकारे बेकायदेशीर माहिती' हा शब्दप्रयोग आला नसता. अर्थात वकिल मंडळींनी या अनुमानाला दुजोरा दिला पाहिजे. (येथे है.है. हे वकिल असल्याचे आठवते. त्यांनी वा अन्य कोणी असल्यास त्यांनी या चर्चेत सहभागी व्हावे.)

९वा मुद्दा तर घटनेतील कलमाच्या शब्दरचनेतला आहे. तेव्हा त्याला प्रतिकार वेगळय पद्धतीने करावा लागेल. (घटनेतील कलम योग्य आहे असे माझे मत नाही.)

कुणाला जबाबदार धरायचे हे मला फारसे कळले नाही. म्हणजे अगदी सायबरे कॅफेच्या मालकालाही जबाबदार धरायचे का? इंटरनेट सर्विस प्रोवायडरला धरायचे का? हे नीटसे कळले नाही. पण नैसर्गिक न्याय पद्धतीत हे फारसे उतरणार नाही असे वाटते.

बहुतेक नियम हे इतर मिडीयाला लागू आहेत त्यापेक्षा वेगळे आणि जास्त नियम लावल्याचे दिसत नाही. तेव्हा अभिव्यक्ति स्वातंत्र्य हे जपायचे असेल तर दोन्हीकडे.

कडक नियम आणी शिथील आचरण हे पूर्णतः थांबले पाहिजे या मताशी सहमत.

प्रमोद

वाचनात आला नव्हता

चंद्रशेखर यांनी पूर्वी याच प्रश्नाला वाचा फोडली होती.

चंद्रशेखर ह्यांनी दुवा देईपर्यंत तो लेख माझ्या वाचनात आला नव्हता.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ओवर अँड अबव

यातील २ मुद्दा नीट वाचला तर 'किंवा कुठल्याही अन्य प्रकारे बेकायदशीर अशी माहिती' असे शेवटी लिहिले आहे. याचा अर्थ असा धरतो प्रसिद्ध झालेली माहिती बेकायदेशीर असणे गरजेचे आहे. नाहीतर 'अन्यप्रकारे बेकायदेशीर माहिती' हा शब्दप्रयोग आला नसता.

मला वाटते की त्या मुद्याचा अर्थ असा आहे की या नियमांमध्ये बसणारे एखादे लेखनही (उदा., भ्रूणलिंगचिकित्सेची जाहिरात) जर इतर कोणत्या कायद्याने निषिद्ध असेल तर त्यावर या नियमांनुसारही कारवाई होईल.

 
^ वर