ललित लेखन आणि विज्ञानाची अवहेलना

आज जालावर हा ललित लेख दृष्टीस पडला. एक ललित लेख म्हणून लेखकाचे कौशल्य नक्कीच वखाणण्याजोगे आहे. चित्रदर्शी वर्णन, खिळवुन ठेवणारी शैली ह्यामुळे लेख मनाला भिडुन जातो. पण भावनेचा भर ओसरल्यावर वैज्ञानिक मन जागे होते आणि लेखातील अनेक कच्चे दुवे दिसू लागतात.

लेख 'स्तनपान' ह्या विषयावर आधारीत आहे. आईपासून दूर, आजी आजोबांजवळ असलेल्या नातीला आईच्या दुधाविना काळे निळे पडताना पाहून लेखक आजीलाच बाळाला पदराखाली घेण्याचा सल्ला देतो ज्यामुळे बाळाला एक सुदिंग सेन्सेशन मिळून बाळाचा जीव वाचतो अशी लेखाची मध्यवर्ती संकल्पना आहे. पण ही गोष्ट सत्यकथा असल्याच्या अविर्भावात लिहिल्याने बरेच वैज्ञानिक प्रश्न निर्माण होतात. सदर कथेतले बाळ हे ९-१२ महिन्याचे आहे. (मऊ चॉकलेट खाण्यापर्यंत बाळाची वाढ झालेली आहे) ह्या वयात बाळांना स्तनपानाची आवश्यकता असते का? वर्ल्ड हेथ ऑर्गनायजेशनचे स्तनपानाविषयी हे मत आहे;

The WHO recommends exclusive breastfeeding for the first six months of life, after which "infants should receive nutritionally adequate and safe complementary foods while breastfeeding continues for up to two years of age or beyond."

असे असताना स्तनपान न मिळाल्याने कुठलेही बाळ हे काळे निळे होईपर्यंत रडणे विज्ञानात बसणारे नाही. बाळाला हवे असलेला वात्सल्याचा स्पर्श स्तनपानातुन मिळणे हे शक्य आहे पण त्याविना बाळ काळे निळे होणे इतक्या टोकाची ही गरज निश्चितच नाही. कितीतरी बाळे स्तनपाना शिवाय मोठी होतात. बाळाला जगण्यासाठी स्तनपान इतके आवश्यक असते तर अनाथश्रमात बाळे वाढूच शकली नसती.

ह्याच लेखातील इतर कच्चे दुवे म्हणजे ३-४ तासाचा प्रवास आहे हे माहित असूनही आजी आजोबांनी सोबत दुधाची बाटली न बाळगणे.

सुरुवातीला लेखक आजीलाच आई समजतो आणि त्यामुळे बाळाशी आईचे लाडे लाडे न बोलणे हे त्याला खटकते. पण केवळ आजी आहे म्हणून ती बाळाशी लाडे लाडे बोलणार नाही हे ही कॉमनसेन्सला पटणारे नाही. अर्थात ही सगळी विसंगती लेखनातील लालित्याशी.

हा लेख लिहिण्याचा खटाटोप इतक्याचसाठी की ललित लेखनाची धार वाढवण्यासाठी सत्य कथेमधे काल्पनिक गोष्टी वापरुन विज्ञानाची तोडमोड करू नये.

लेखनविषय: दुवे:

Comments

विज्ञानाची मोडतोड

विज्ञानाची मोडतोड अनेक ललित लेखक करत असतात. माझ्या अत्यंत आवडत्या सर आर्थर कॉनन डॉइल यांनी शेरलॉक होम्सच्या 'स्पेकल्ड बॅन्ड' या कथेत साप पाळणे, त्याला ट्रेन करणे, दूध पाजणे असे बरेच काही फिल्मी लिहिले आहे. आयझॅक असिमोव्ह यांनी या संदर्भात 'नॉट सो एलेमेंटरी, माय डिअर वॉटसन' अशा काहीशा शीर्षकाचा लेख लिहिला होता.
सन्जोप राव
हरेक बातपे कहते हो तुम के तू क्या है
तुमही कहो के ये अंदाज-ए-गुफ्तगू क्या है

निःशब्द

असे असताना स्तनपान न मिळाल्याने कुठलेही बाळ हे काळे निळे होईपर्यंत रडणे विज्ञानात बसणारे नाही. बाळाला हवे असलेला वात्सल्याचा स्पर्श स्तनपानातुन मिळणे हे शक्य आहे पण त्याविना बाळ काळे निळे होणे इतक्या टोकाची ही गरज निश्चितच नाही. कितीतरी बाळे स्तनपाना शिवाय मोठी होतात. बाळाला जगण्यासाठी स्तनपान इतके आवश्यक असते तर अनाथश्रमात बाळे वाढूच शकली नसती.

काय बोलू? खुळचट समुपदेशनाला प्रतिसाद देणाऱ्यांनी -- त्यात बहुधा काही विज्ञानोपासकही आहेत -- तर्क, बुद्धी आणि गूगल यांचा वापर न करता निःशब्द व्हावे, ह्यातच सर्व काही आले. असो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

समजुतीचा काळ

"शेरलॉक होम्सच्या 'स्पेकल्ड बॅन्ड' या कथेत साप पाळणे".

होम्सच्या लिखाणाचा काळ विचारात घेता (सव्वाशे वर्षापूर्वीचा) त्याने आजच्या काळात चर्चीली जाणारी "वैज्ञानिक दृष्टी" बाळगली नसल्यास त्याला दोष देता येणार नाही. त्यातही स्पेकल्ड बॅन्डमधील खलनायकावर 'भारतातील' तशा समजुतींचा आणि अदभुतरम्यतेचा प्रभाव असल्याचे कथानकात येते. त्यामुळे त्याने (डॉ.रॉयलॉट्) वाड्याच्या आवारात जिप्सीना वस्तीची अनुमती देणे, बागेत भारतातील पशुपक्षी [सापासह] पाळणे आणि त्यापाठोपाठ त्या प्राण्यांचा जोडल्या गेलेल्या 'इंडियन मिथ्स्' वा करामतीवर विश्वास ठेवणे हे क्रमप्राप्त मानले गेले पाहिजे. तिथे लेखकाने [पक्षी : होम्स] आजच्या मीटरमध्ये न बसणारे आणि फिल्मी वाटणारे प्रसंग गुंफले म्हणणे त्याच्या कल्पनाशक्तीवर अन्याय केल्यासारखे होईल. त्या काळात "spontaneous genesis" ची चलती होतीच. उदा. अघोरी शक्तीचा आपल्या घरावर प्रभाव पडू नये म्हणून रात्री झोपण्यापूर्वी अगदी युरोपियन गृहिणी दारात फाटक्या चिंध्या, लाकडाचे छोटे तुकडे आणि त्यासोबत थोडे अन्न ठेवीत. विखारी शक्तीच्या आगमनाच्या चाहुलीने त्या वस्तूंचे रूपांतर उंदीर आणि सरड्यात होते आणि ती भटकणारी शक्ती ते खावून समाधानाने त्या घरापासून दूर जाते, असा समज. काळाच्या ओघात हे मागे पडले असले तरी ज्या काळात ती प्रथा होती ती विज्ञानापासून फटकून जरी असली तरी तिचे अस्तित्व नाकारण्यात अर्थ नाही. आणि मग त्या प्रथा साहित्यात कुठल्यातरी कथानकाच्या रूपात लेखकाने मांडल्या तर त्या लेखकास आधुनिक वैज्ञानिक दृष्टी नाही असे समजण्याचे कारण नसते.

शेक्सपीअरच्या साहित्यात माणसांचा चेटकिणीशी थेट, अगदी समोरासमोर, संवाद घडत असतो. आजही या घडीला लंडनमध्ये 'मॅकबेथ' पाहणार्‍या प्रेक्षकांना त्या चेटकिणींचे मंचावर वावरणे अजिबात खटकत नाही, कारण परत तेच....त्या काळात [आजही कित्येक ठिकाणी आहेच] चेटकिणींचे अस्तित्व आणि त्यांची कार्यप्रणाली यावर सर्रास विश्वास ठेवला जातच असे. तेव्हा आज विज्ञानाचे खुरपे घेऊन शेक्सपीअरच्या शेतीची मशागत करणे तार्किक मानले जाणार नाही.

२. कोब्या यानी दर्शविलेला तो ललित लेख वाचला. त्या लेखकाने रेल्वे स्टेशनवरील ती घटना 'सत्य' आहे असे कुठे म्हटले नसल्याने ते प्रकटन ललित लेखनात येते आणि तसे असेल तर लेखनाच्या उंचीसाठी काही प्रमाणात त्याने 'स्वातंत्र्य' घेणे अटळ आहे.

बाकी WHO ने जे म्हटले आहे ते एकप्रकारचे 'रेकेमेन्डेशन' आहे, ते जसेच्या तसे भारतात लागू होईल याची शक्यता धूसर आहे.

अशोक पाटील

स्वातंत्र्य

कोब्या यानी दर्शविलेला तो ललित लेख वाचला. त्या लेखकाने रेल्वे स्टेशनवरील ती घटना 'सत्य' आहे असे कुठे म्हटले नसल्याने ते प्रकटन ललित लेखनात येते आणि तसे असेल तर लेखनाच्या उंचीसाठी काही प्रमाणात त्याने 'स्वातंत्र्य' घेणे अटळ आहे.

घटना 'सत्य' आहे असे लिहिले नसले तरी, सदर लेखकाचे इतर लेखन वाचल्यास लक्षात येईल की सदर लेखक हे स्वघोषित समुपदेशक असुन त्यांचे लेखन हे अनुभवकथन असते.

वादाकरीता असेही धरले की हे निव्वळ कल्पित लेखन आहे तरीही मुद्दा हाच राहतो की लेखनाच्या उंचीसाठी (मेलोड्रामा आणण्यासाठी) अवैज्ञानिक गोष्टींची कास धरावी का? स्तनपानाविषयी WHO चे रेकमंडेशन दाखवण्याचा हेतू इतकाच की स्तनपान न मिळाल्यास मूल दगावू शकते वगैरे गोष्टींमधे तथ्य नाही. सहा महिन्यांनी स्तनपान करू नये असेही WHO चे म्हंटणे नाही त्यामुळे त्यांचे रेकमंडेशन लागू का होऊ नये ते समजले नाही.

उलट लेखकाने दिलेले स्पष्टीकरण हे दक्षीण भारतातल्या रानटी प्रथेवर आधारीत आहे. नवजात अर्भकाला आजीच्या पदराखाली देऊन त्याच्या भुकेशी खेळणे हे 'घराण्यातल्या मातृत्वाचा सन्मान' वगैरे गोंडस नावांनी संबोधले तरी रानटीच आहे. सारासार विचार करणार्‍या कुठल्याही माणसाच्या हे लक्षात येईल. लेखाला चार प्रतिसाद अधिक यावेर म्हणून अशा विचारांची भलावण करणे हे कितपत योग्य आहे.

हातातील मूल काळे निळे होत असताना, कथेतल्या आजी आजोबांप्रमाणे त्याकडे हताशपणे पाहणे शक्य आहे का? कुठल्याही आजी आजोबांनी आपली नात काळी निळी पडती आहे हे पाहून गाडी साखळी ओढून इमरजन्सी वैद्यकिय मदत मागवली असती हा साधा कॉमन सेन्स आहे.

सहमत, पण...

समतोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद, अशोक पाटील.
होम्सच्या लिखाणाचा काळ विचारात घेता (सव्वाशे वर्षापूर्वीचा) त्याने आजच्या काळात चर्चीली जाणारी "वैज्ञानिक दृष्टी" बाळगली नसल्यास त्याला दोष देता येणार नाही.
हे मान्य आहे. तथापि होम्सच्या इतर कथांमध्ये विज्ञानाचा अत्यंत समर्पक वापर केलेला आढळतो. होम्सची एकूण व्यक्तिरेखा विचारात घेतली तेर तो अत्यंत कठोर विज्ञानवादी, रसायनशास्त्राचा खोल (पण विस्कळित) अभ्यासक, शरीरशास्त्राचा गाढा व्यासंगी असा आहे. स्वतः डॉईल हे नेत्रतज्ञ होते. या पार्श्वभूमीवर मला या कथेतील या अवैज्ञानिक गोष्टी खटकल्या, इतकेच.
सन्जोप राव
हरेक बातपे कहते हो तुम के तू क्या है
तुमही कहो के ये अंदाज-ए-गुफ्तगू क्या है

लेख ठीक वाटला

दुव्यावरील लेख ठीकच वाटला.

बाळे कधीकधी खूप रडतात, आईवडलांना बाळाच्या जिवाची भीती वाटते, असे अनुभव लोक सांगतात. आता रडून-रडून अक्षरशः मेलेली बाळे कुणाच्या अनुभवात नसतील हे खरे. मरायचे वाचले नाही, पण रडायचे थांबले, तरी बाळाच्या पालकांना हायसे वाटले असेल. आजूबाजूच्या लोकांनाही बरे वाटले असेल.

मात्र रडून-रडून चेहर्‍याचा रंग बदलल्याचे वर्णन अवैज्ञानिक वगैरे वाटत नाही. शिवाय येथे बाळ श्वास रोखूनही धरत असल्याचेही वर्णन आहे. ("बाळाचं रडणं थांबून छातीचा भाता घट्ट धरल्यासारखा झाला."... "बाळाचा श्वास सुटला पण क्षणभरच, दुसर्‍या क्षणी परत खक्क् खक्क आवाज आला."...)

या वयाच्या बाळांमध्ये बेशुद्ध होईपर्यंतसुद्धा श्वास रोखण्याचे अनुभव सुपरिचित आहेत. (वैद्यकीय माहितीबाबत विश्वसनीय संकेस्थळाचा दुवा). श्वास धरून बेशुद्ध होण्यापूर्वीही बाळाच्या चेहर्‍याचा जो काय रंग होतो, त्याला "काळेनिळे" हा शब्द प्रचलित आहे.

(मऊ चॉकलेट खाण्यापर्यंत बाळाची वाढ झालेली आहे) ह्या वयात बाळांना स्तनपानाची आवश्यकता असते का?... स्तनपान न मिळाल्याने कुठलेही बाळ हे काळे निळे होईपर्यंत रडणे विज्ञानात बसणारे नाही.

हा त्या लेखाच्या लेखकाचा मुद्दा असल्याचे जाणवले नाही. लेखातील निवेदक खुद्दच आपली भूमिका सांगतो :

बाळाला दूध नको आहे .त्याला झोपेपूर्वीचं आई जवळ असल्याचे युफोरीक फीलींग हवंय. त्याला छान छान वाटायला हवंय.

(तिरका ठसा माझा.)

लेखाच्या लेखकाने हा तपशिलाबाबत काव्यालंकार साधण्याकरिता फार ढिसाळपणा केला आहे, असे मला तरी वाटत नाही.

- - -
(त्याच संकेतस्थळावरील त्या लेखाच्या लेखकाचे आदले लिखाण बघता असे दिसते, की ते शालांत परीक्षेच्या आदल्या-मागल्या वर्षांतील विद्यार्थ्यांना व्यवसायविषयक समुपदेशन करतात. याचा संबंध या कथेशी लागू नये असे वाटते.)

धन्यवाद

धनंजय ह्यांच्या प्रतिसादामुळे शंका मिटल्या आहेत. अगदी छान समजावून सांगितले आहे धन्यवाद. पुन्हा एकदा 'निशःब्द', काय बोलू' :) गहिवरून आले आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

स्पष्टीकरण

आता रडून-रडून अक्षरशः मेलेली बाळे कुणाच्या अनुभवात नसतील हे खरे. मरायचे वाचले नाही, पण रडायचे थांबले, तरी बाळाच्या पालकांना हायसे वाटले असेल.

वरील वाक्यातील ठळक वाक्यखंडाने गोंधळ होऊ शकतो.

त्यामुळे वाक्य असे वाचावे :

आता रडून-रडून अक्षरशः मेलेली बाळे कुणाच्या अनुभवात नसतील हे खरे. बाळाच्या जगण्या-मरण्यावर बेतले नसलेच तरी बाळ रडायचे थांबता बाळाच्या पालकांना हायसे वाटले असेल.

पोटावर पाय :-(

ललित लेखनाची धार वाढवण्यासाठी सत्य कथेमधे काल्पनिक गोष्टी वापरुन विज्ञानाची तोडमोड करू नये.

का राव पोटावर पाय देता आमच्या? :-( ऑक्टोबर जवळ येतो आहे. पानगळीसोबत असंख्य हात पसरून उभी असणारी भुंडी झाडे, लवकर अंधारणारा दिवस, पक्ष्यांच्या स्थलांतरामुळे आसमंतात निर्माण होणारी शांतता आणि थंडीमुळे बाहेर होणारा शुकशुकाट मला एकाच शब्दाची आठवण करून देतो. क्रिऽऽऽऽऽऽपी!!!! आता इतकी वातावरण निर्मिती असताना कुठे विज्ञानाला ललित लेखनात मध्येच आणायचे?

रेकमंडेशन

वर श्री.धनंजय यानी दिलेला संतुलित प्रतिसाद वाचल्यानंतर मग त्या [श्री.प्रभु यांच्या] लेखाबद्दल आणखीन् काही लिहिणे आवश्यक आहे असे वाटत नाही.

मात्र श्री.कोब्या यानी पुढे "WHO चे रेकमंडेशन लागू का होऊ नये ते समजले नाही." अशी पृच्छा केली असल्याने मी त्याबाबत इतकेच सांगू शकतो की, डब्ल्यूएचओच्या त्या व्याख्येत [infants should receive nutritionally adequate and safe complementary foods] भारतातील तमाम एकजात नवजात अर्भके येणे फार अशक्य गोष्ट आहे. हा विषय थोडा वेगळा होईल, पण दहापैकी सात बाळांना जिथे adequate food मिळण्याची मारामार तिथे मग nutritionally चा विचारच करणे मुश्कील. या कारणासाठी मी या देशात WHO चे रेकमंडेशन लागू होण्याची शक्यता धूसर असे म्हटले.

असो.

यावरुन आठवले...

हा लेख लिहिण्याचा खटाटोप इतक्याचसाठी की ललित लेखनाची धार वाढवण्यासाठी सत्य कथेमधे काल्पनिक गोष्टी वापरुन विज्ञानाची तोडमोड करू नये.
नारायण धारपांची 'सैतान' हे कादंबरी वाचल्यानंतर मला ती 'ऑन्ड्री रोज' या कादंबरीवरुन स्फुरलेली / बेतलेली/ उचललेली / ढापलेली आहे असे वाटले. मी तसे पत्राने धारप यांना कळवले. त्यावर त्या (आणखी एका ) कादंबरीतील काही प्रसंग आपण 'सैतान' साठी वापरले आहेत असे कबूल करणारे धारप यांचे पत्र मला आले. 'अपेक्षित परिणाम साधण्यासाठी लेखकाने कोणतेही साहित्य वापरावे या मताचा मी आहे' असे धारप या पत्रात पुढे लिहितात. तथापि धारपांनी आपल्या कथांमध्ये विज्ञानाला कधी वेठीस धरल्याचे माझ्या तरी वाचनात आले नाही. गूढकथा/ भयकथा यांचे लेखक असा लौकिक असलेल्या धारपांनी काही उत्तम विज्ञानकथा/ कादंबर्‍याही लिहिल्या आहेत. ('साठे-फायकस' ही त्रिसूत्री, उदाहरणार्थ).
सन्जोप राव
हरेक बातपे कहते हो तुम के तू क्या है
तुमही कहो के ये अंदाज-ए-गुफ्तगू क्या है

नारायण धारप

या उलट शालेय जीवनात नारायण धारपाची 'ऐसी रत्ने मेळवीन' ही जन्मतःच अतिन्द्रिय शक्ती घेऊन आलेल्या दोन मुलांची आणि ती मुले शोधून काढून {कॅच देम यंग वा 'ऑनलाईन एक्झाम.' या तत्वानुसार} त्याद्वारे पृथ्वीवर आपले वेगळे असे स्थान निर्माण करण्याची मनिषा बाळगणार्‍या शास्त्रज्ञाची कादंबरी वाचली त्यावेळी धारपांनी मांडलेल्या टेलिकायनेसीस, टेलिपथी, टेलिकम्युनिकेशन फार भावल्या होत्या.

पुढे स्टीव्हन स्पीएलबर्गच्या 'क्लोज् एनकाऊन्टर्स वुईथ द थर्ड काईन्ड - १९७७' आणि 'इ.टी. - १९८२' हे अशाच विषयावरील वैज्ञानिक म्हटले गेलेले चित्रपट आले, आणि जगभर गाजल्याचेही पाहिले त्यावेळी नारायण धारपांची प्रकर्षाने आठवण झाली; कारण दोन्ही चित्रपटात लहान मुलांचाच आणि त्यांच्यात वावरत असलेल्या अदृश्य शक्तीं याच संकल्पनेचा स्पीएलबर्गने उपयोग केला होता. त्या पार्श्वभूमीवर त्या चित्रपटांच्या अगोदर किमान १५ वर्षे धारपांनी ती कल्पना [कमीजास्त प्रमाणात आपल्या कादंबरीत] वापरली होती याचा खरे तर आनंदच झाला होता.

कथा - भुतांच्या; कादंबर्‍या वैज्ञानिक

नारायण धारपांच्या कथा भुताखेतांच्या आणि कादंबर्‍या साय-फाय असत असे स्मरते.

नितिन थत्ते

विज्ञान

इसवीसनपूर्व काळात लिहिल्या गेलेल्या ललित लेखाची वैज्ञानिक चिकित्सा वाचून गंमत वाटली.

आम्ही पौगंडावस्थेत असताना 'आपल्याला खूप कळते' अश्या मोडमध्ये असताना असेच शुक्र'तारा' ची थट्टा करत असू ते आठवले.

अवांतर: मूल अंगावर पीत असेपर्यंत गर्भधारणा होणार नाही असा प्रबोधनात्मक संदेश दूरदर्शनच्या राष्ट्रीय कार्यक्रमांमधल्या गॅपफिलर्स मधून (गंभीरपणे) सांगितला जाई.

नितिन थत्ते

नक्की तक्रार कळली नाही

चर्चाप्रस्तावात 'ललित लेख' असं मोघम लिहून ते लालित्यपूर्ण सत्यकथन असल्याचा लेखकाचा अभिनिवेष असल्याचं सूचित केलेलं आहे. प्रत्यक्षात ती सत्यकथा आहे, काल्पनिक कथा आहे की काय याबाबत लेखकाने काहीच टिप्पणी केलेली नाही. कधी कधी 'ही सत्यकथा आहे' असं ठासून सांगणं हेही कथा परिणामकारक करण्याचं तंत्र असू शकतं.

असं असताना, कथाकाराला जे सत्यापासून फारकत घेण्याचं स्वातंत्र्य दिलं जातं ते न देता या लेखनाला लालित्यपूर्ण वैज्ञानिक लेख लिहिणाऱ्यासाठीचे निकष लावलेले आहेत हे पटलं नाही. कथा म्हणून चांगली आहे की नाही हा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण प्रत्येक कथेने विज्ञानाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे असं म्हणणं हा हट्टाग्रह आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सहमत

कथा म्हणून चांगली आहे की नाही हा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण प्रत्येक कथेने विज्ञानाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे असं म्हणणं हा हट्टाग्रह आहे.

सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे

सहमत.

विज्ञानाचा अचूक वापर करून लिहलेल्या कथा मला जास्त आवडत असल्या तरी अवैज्ञानिक कल्पनेच्या भरार्‍या घेऊन लिहलेल्या कथाही आवडतात आणि त्या येत रहाव्यात.

-Nile

जवळजवळ सहमत

जवळजवळ सहमत.

'अज् ल व् ए
न्वे वेवव् अवे
लेवु वौ फ्ज्

या माझ्या मराठी हायकूबाबत मात्र साशंक आहे. (हायकू मराठीत आहे, ही कल्पना संदर्भग्रंथ बघता खोटी वाटू शकेल. पण ललित लेखनाबाबत असे नियम नसतात) त्याच प्रमाणे मिसळपावावर मीच लिहिलेल्या "डांबीस डोंब्या"(च्या स्फूर्तिस्रोता)बाबत साशंक आहे. (दुवा सापडल्यावर देईन.)
- - -

शिवाय, एखाद्या विलक्षण सत्य घटनेचे वर्णन (उदाहरणार्थ उल्लेखलेला विनायक प्रभू यांचा लेख) वाचताना ती घटना सत्यावर आधारित असल्याची बाब नि:संदर्भ नाही.
("तुम्ही चक्षुर्वै म्हणून सांगितलेली घटना आम्ही काल्पनिक म्हणून वाचून आस्वादली. इतकेच काय ती घटना सत्यावर आधारित असल्याची बाब लक्षातही घेऊ नये असे आमचे मत आहे." असे आपण श्री. विनायक प्रभूंना सांगून त्यांना विचारूया : "तुमच्या लेखाचा हाच अपेक्षित परिणाम होता काय?" माझे असे भाकित आहे, की ते म्हणतील की घटना सत्यावर आधारित असल्याची बाब वाचकाने मुद्दामून नि:संदर्भ मानू नये.)
अशा बाबतीत थोडीशी असहमती नोंदवतो.

उगाचच कीस पाडलाय

सदर गोष्टीत वैद्यकीय् दृष्टीकोनातून काहीच चूक नसून धनंजय यांनी केलेले विवेचन योग्य आहे हे नमूद करते.

डॉ. साती. :)

 
^ वर