कथा शेअरबाजाराची, भाग १ ...
बरं का मंडळी,
शेअरबाजाराविषयी नेहमी एक जुनी कथा सांगितली जाते. ती मी आता आपल्याला इथे सांगणार आहे. या कथेवरून कोणते शेअर केव्हा घ्यावेत?, का घ्यावेत?, केवळ दुसरा एखादा म्हणाला म्हणून घ्यावेत का? वगैरे बर्याच प्रश्नांची उत्तरे 'ता' वरून ताकभात ओळखणार्यांना मिळू शकतील.
सवड मिळाल्यास 'कथा शेअरबाजाराची' ही लेखमाला इथे लिहून शेअरबाजाराच्या बाबतीत लेम्यॅन असणार्या पण शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणार्यांकरता आम्ही काही सोपे निकष सांगू. आम्ही अनेक वर्षांपासून बाजार फार जवळून पाहतो आहोत. हर्षद मेहता बघितला, केतन पारेख बघितला. अनेक बघितले. मी मी म्हणत शेअर बाजारात सट्टा करणारे उठलेलेही बघितले आणि शेअरबाजाराचे नियम पाळून मजबूत पैसा कमवलेलेही बघितले. बाजाराचे स्वतःचे असे काही नियम असतात आणि तो त्याप्रमाणेच चालत असतो.
असो, अवांतर गप्पा नंतर मारू. नाहीतर 'माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीचा लॉ' मध्येच आम्हाला पायात पाय घालून पाडायचा! मंडळी, गंमत अशी आहे की आमच्या लेखनातून चाणाक्ष लोकांना योग्य ती माहिती खरं तर मिळत असते, पण बाकी सर्वांना तात्या काहितरी वायफळ बडबड करतोय असंच वाटतं! असो..
आपला,
(शेअरबाजाराचारा अनुभवी!) तात्या.
कथा शेअरबाजाराची, भाग १ ...
कथा शेअरबाजारची. (शब्दांकनः तात्या अभ्यंकर.)
एकदा काय होतं, की एका गावात एक नवखा मनुष्य येतो. कथेच्या सोयीकरता आपण त्याला तात्या म्हणू! ;)
गावात आल्या आल्या तात्या सर्व गावकर्यांना जमवतो आणि सांगतो की मला भरपूर माकडं हवी आहेत. ती पकडून आणा आणि एका माकडाचे माझ्याकडून २० रुपये रोख घेऊन जा!
सर्व गावकरी अत्यंत आनंदित होतात. जो तो आसपासहून, जिथून मिळ्तील तिथून भरपूर माकडं पकडून आणतो आणि तात्याकडून एका माकडाचे वीस, याप्रमाणे भरपूर पैसे कमावतो! तात्या विकत घेतलेली सर्व माकडं घेऊन त्या गावातून निघून जातो.
काही दिवसांनी तात्या पुन्हा त्या गावात येतो. सर्व गावकरी तात्या आला म्हणून खुश होतात. यावेळी तात्या अशी अनाउन्समेन्ट करतो की त्याला आता पुन्हा माकङं हवी आहेत आणि यावेळी तो एका माकडाचे ४० रुपये द्यायला तयार आहे!
आयला! सगळे गावकरी पुन्हा प्रचंड खुश होतात. पुन्हा जो तो कामाला लागतो (आपले कामधंदे सोडून!;) आणि जास्तीत जास्त माकडं मिळतील तिथून, इकडच्या तिकडच्या जंगलातून पकडून आणतो. तात्या प्रत्येक माकडाचे चाळीस रुपये गावकर्यांना देतो आणि म्हणतो,
"बरं का गावकर्यांनो, मी काही दिवसांनी पुन्हा येईन. तेव्हा मात्र मला बरीच माकडं हवी असतील आणि तेव्हा मी प्रत्येक माकडाचे डायरेक्ट दिडशे रुपये देईन!"
असं सांगून तात्या त्या गावातून निघून जातो!
ओहोहो! इकडे सगळे गावकरी खल्लास! प्रत्येक माकडाचे दिडशे रुपये मिळणार!! क्या बात है..
त्यानंतर काही दिवसांनी त्या गावात एक दुसरा मनुष्य येतो. कथेच्या सोयीकरता त्याला आपण शशांक म्हणू! ;)
शशांककडे बरीच माकडं असतात. तो सर्व गावकर्यांना जमवतो आणि म्हणतो,
"मी एक माकडविक्या आहे. मी एक माकड शंभर रुपयाला विकतो. कुणी माकडं विकत घेणार का माझ्याकडून?
गावकरी तर शशांकवर भयंकर खुश होतात. आयतीच माकडं मिळणार आहेत, ती सुद्धा अवघ्या शंभर रुपयात! तात्या पुन्हा काही दिवसांनी येणारच आहे आणि तो एका माकडाचे दिडशे रुपये देणार आहे. वा वा वा! म्हणजे दिडशे वजा शंभर म्हणजे ५० रुपये निव्वळ फायदा!! क्या बात है.....
सगळे गावकरी गर्दी झुंबड करून शशांककडून शंभर रुपयाला एक याप्रमाणे सगळी माकडं विकत घेतात. काही मिनिटातच शशांककडची एकूणएक माकडे संपतात आणि ते सर्व पैसे घेऊन शशांक त्या गावातून निघून जातो!
गावकरी आता तात्याची वाट पाहात बसतात. पण त्यानंतर त्या गावात पुन्हा कधी तात्याही येत नाही आणि शशांकही येत नाही!! ;)
पहिले वीस आणि नंतर तर चाळीस म्हणजे सरासरी तीस रुपयाला विकत घेतलेली माकडं शंभर रुपायाला विकून तात्या आणि शशांक, माकडी सत्तर रुपये फायदा कमावून आनंद साजरा करतात. आता त्यांना मिळालेल्या पैशांतून माकडं विकत घ्यायला पुन्हा दुसर्या एखाद्या गावात जायचं असतं! ;))
कथा संपली!
काय मग मंडळी, थोडाफार तरी अंदाज आला का आमचा शेअरबाजार कसा आहे याचा? ;)
बघा बुवा, या आमच्या लेखमालेतून माहिती आणि विचारांची देवाणघेवाण होणार असेल तर आम्ही ही लेखमाला वेळ मिळेल तशी सुरू ठेवू!
नायतर राहिलं! ;)
--तात्या अभ्यंकर.
Comments
एखादा शेअर केव्हा घ्यायचा आणि का घ्यायचा?
परंतु त्यातून समभाग बाजाराचे फक्त एक अंग दिसते.
कथेतून एखादा शेअर केव्हा घ्यायचा आणि का घ्यायचा, हेही कळते असे आम्हाला वाटते!
असो..
तात्या.
करेक्ट..
उदाहरणार्थ "घाटकोपरचा एक दलाल हा शेअर चढवतोय" म्हणून तो घेण्याचे काही कारण नाही, हे कळते. कारण १५० रुपयांनी माकडे घेणार्या तात्यासारखे हे घाटकोपरवासी नंतर उगवणार नाही, हे स्पष्ट झाले.
करेक्ट!
तात्या.
गूंतवणूक पण आयकर सवलतीसाठी.
तात्या,
कथा आवडली.कथा सांगण्याचे तंत्र उत्तमच यात शंकाच नाही,पण आम्ही शेअरबाजारात आणि त्या पैसे गूंतविण्याच्या भानगडीत पडलो नाही.आम्हाला आयकर जास्त लागू नये.यासाठी ची काही गूंतवणुक आहे,का या बाजारात.
आयकर कायदा..
बिरुटेसाहेब,
आम्हाला आयकर जास्त लागू नये.यासाठी ची काही गूंतवणुक आहे,का या बाजारात.
शेअरबाजारात दीर्घ मुदतीकरता गुंतवलेले शेअर विकून नफा मिळवल्यास त्यावर आयकर भरावा लागत नाही असे काहीसे आम्ही ऐकून आहोत. पण आम्हाला त्याबद्दल विस्तृत माहिती नाही. त्याकरता आयकराची माहिती असलेल्या कुणा तज्ज्ञाकडून अधिक माहिती मिळू शकेल.
कथा आवडली.कथा सांगण्याचे तंत्र उत्तमच यात शंकाच नाही,
धन्यवाद शेठ.
आपला,
(मंदडिया!) तात्या.
शेअर
कुणाच तरी कमा वणं हे कुणाच तरी गमावण असतं
प्रकाश घाटपांडे