निवडणूक सुधारणा - उमेदवारास परत बोलावण्याचा अधिकार

जनलोकपाल विधेयकाच्या गदारोळानंतर अण्णा हजारे यांनी पुढील पावले म्हणून निवडणूक सुधारणांचा मुद्दा बोलून दाखवला आहे.

सध्याची निवडणूक पद्धत निर्दोष नाही यात काही संशय नाही. निवडणुक सुधारणांबाबत काही मुद्दे गेली अनेक वर्षे (म्हणजे कमीत कमी ३०-३५ वर्षे) चर्चेत आहेत. स्टेट फंडिंग ऑफ इलेक्शन, लोकप्रतिनिधीला परत बोलवण्याचा हक्क हे दोन मुद्दे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाच्या काळापासून मी ऐकत आहे. [त्यापूर्वीच्या काळात मी काही समजण्याच्या वयात नव्हतो].

गेल्या काही काळापासून उमेदवार नाकारण्याचा हक्क हाही चर्चेत आहे. त्या अनुषंगाने कलम ४९-ओ संदर्भात काही चर्चा घडत असतात.

उमेदवार नाकारण्याचा हक्क मला फारसा पटत नाही. त्याची कारणे पूर्वीच्या काही धाग्यांमधून चर्चिली गेली आहेत.

प्रतिनिधीला परत बोलावण्याचा हक्क असावा असे मला वाटते. तो कसा बजावावा याविषयी काही विचार मांडत आहे. काही मुद्दे इम्प्रॅक्टिकल वाटू शकतील. त्यावर सदस्यांनी पर्याय सुचवावे.

१. कोणत्या कारणासाठी लोकप्रतिनिधीला परत बोलावू शकतो यावर काहीही निर्बंध नसावेत.

२. प्रतिनिधीला परत बोलावण्याची मागणी मतदारसंघातील किमान १० % मतदारांनी करावी. ती एका अर्जाने करावी की प्रत्येकाने स्वतंत्र अर्जाने करावी हा डिटेलचा प्रश्न आहे तो सध्या बाजूस ठेवू. तत्वत: १०% मतदारांनी मागणी करावी.

३. अर्ज करणार्‍यांनी मागच्या निवडणुकीत मतदान केलेले असावे. हे अर्जदारांनी सिद्ध करायचे नसावे तर निवडणूक अधिकार्‍यांनी तपासून घ्यावे.

४. अर्ज करणार्‍यांनी मागच्या निवडणुकीत विजयी उमेदवाराला मतदान केलेले असावे. ही अट जरा जास्त होत आहे हे मला माहिती आहे. यात गुप्त मतदानाच्या तत्त्वाचा भंग होण्याची शक्यता आहे. परंतु एक-एक अर्ज आणि मत अशी तपासणी मॅन्युअली न करता इलेक्ट्रॉनिकली बल्क स्वरूपात करणे शक्य आहे. जेणेकरून अमुक मतदाराने कोणाला मत दिले होते हे कुठे दिसून येणार नाही. ही अट ठेवण्याचे कारण एका पक्षाचे निष्ठावान मतदार दुसर्‍या पक्षाचा उमेदवार विजयी झाल्यास त्याला परत बोलावण्यास नेहमीच उत्सुक असू शकतील. या अटीचा माझा आग्रह नाही पण ही फेअर अट आहे असे मला वाटते. जर मी त्याला निवडून दिलेले नाही तर त्याला परत बोलावण्याचा अधिकार मला नसावा.

५. १०% व्हॅलिड अर्ज आले की प्रतिनिधीला परत बोलवावे की नाही याविषयी मतदारसंघात मतदान घ्यावे. [याला अल्टरनेट ३०% अर्ज व्हॅलिड आले तर बिना मतदान प्रतिनिधित्व रद्द करावे].

६. सहा महिन्यात पुन्हा निवडणूक घ्यावी. या निवडणुकीत परत बोलावलेल्या उमेदवाराला भाग घेता येऊ नये. पुढच्या रेग्युलर निवडणुकीत त्याला भाग घेता यावा.

७. परत बोलावण्यासाठी निवडणूक घ्यायची असेल तर ती एका टर्ममध्ये एकदाच घेता यावी. जर त्यावेळी परत बोलावण्यात अपयश आले तर उरलेल्या टर्ममध्ये पुन्हा ही प्रक्रिया करता येणार नाही.

सदस्यांनी वर लिहिलेल्या प्रक्रियेतील तत्त्वांबाबत तसेच डिटेल्सबाबत आपली मते सांगावी. प्रस्ताव खुल्या चर्चेसारखा चालवावा अशी अपेक्षा.

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत-असहमत

बरीचशी सहमती.

मुद्दे क्रमांक ३ आणि ४ याबाबत असहमत. उमेदवार एकदा निवडून गेला की तो संपूर्ण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो (निदान तशी अपेक्षा आहे). केवळ त्याला निवडून दिलेल्या मतदारांचे नव्हे. तेव्हा त्याला परत बोक्लावण्याचा अधिकार (मिळालाच तर) तो संपूर्ण मतदारसंघालाच मिळायला हवा.

निवडून येणार्‍या उमेदवाराला किमान ५०% (एकूण मतदानाच्या) मते पडली असलीच पाहिजेत अशी अट व्यवहार्य ठरेल काय? तसे झाले तर परत बोलावण्याचा अधिकार (तूर्तास) नसला तरी चालेल.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

काही मुद्दे पटले नाहीत

वरीलपैकी मुद्दा तीन आणि चार पटत नाही. किंबहुना तीन अजिबात पटला नाही आणि चार आवडला तरी तो प्रॅक्टीकल वाटत नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते.

मुद्दा दोन मध्ये १०%ची लक्ष्मणरेषा थोडी हलकी वाटली. २० ते २५ % इतकी ती असावी का असे वाटले. बाकी मुद्द्याशी (१०% असणार्‍या मुद्द्यांत किंचित बदलासकट) सहमती आहे.

प्रतिनिधीला परत बोलावण्याचा हक्क असावा असे मला वाटते.

इथे पुन्हा निवडणूक करण्यापेक्षा त्याच पार्टीतील दुसर्‍या प्रतिनिधीचे नाव पुढे करावे. फेरनिवडणुकांचा अतिरिक्त खर्च टाळायला हवा असे वाटते.

असेच

असेच. मुद्दे क्रमांक ३ व ४ सोडून.

'वैचारीक पर्यांयामधील निवडणूकीत' देखील सुधारणा हव्यात.

चर्चेत मांडलेल्या विशयानुसार, मला श्री. अण्णा हजारे यांचा 'राईट टू रिजेक्ट' व 'राईट टू रीकॉल' ह्या कल्पना मुर्खपणाच्याच वाटतात.

या देशात अनेकांकडे वेगवेगळ्या कल्पना असतील, आहेत. त्यातील ज्या कल्पना 'संतुलित विचारांवर आधारीत असतील' व 'वापरात आणण्याजोग्या असतील' तरच त्या चर्चेअंती स्विकारल्या जाव्यात. तसे झाले तरच ह्या देशात लोकशाही आहे हे मानता येईल. 'एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त दिवस 'उपोशण' करता येते', हा 'मापदंड' त्या व्यक्तीने पुढे केलेला एखादा विचार स्विकारण्याबाबत असता कामा नये.

आत्ता अण्णांच्या नावाला वजन व वलय प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रसवल्या जाणार्‍या 'अतिरेकी कल्पनांचे' व त्यांचे 'वास्तवात रुपांतर करण्याच्या प्रयत्नांना' विरोध कसा करायचा हा ही पुढील काळातील प्रश्न आहे. अण्णांनी निवडणूक सुधारण्याबाबतीत लक्श घालण्याआधीच त्यांना शह देण्याहेतू (नेंभळट व हतबल) भारत सरकारने किंवा पत गमावलेल्या राजकिय पक्शांनीच जनतेकडूनच 'संतुलित विचार स्विकारण्याबाबतच्या' हालचाली सुरू केल्या पाहिजेत. अण्णांचा मुर्खपणा रोकायचा असेल तर आपल्या 'अकलेचा घोडा' राजकारण्यांनी शहाणपणाने पळवायला हवा. नाहीतर राजकारण्यांना प्रत्येकवेळी 'अडला हरी' बनून अण्णांचे पाय धरावे लागतील.

चांगली सुरुवात

लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा हक्क लोकांना असायला हवा हे मान्य. तो कसा बजावायचा याबद्दल तुम्ही मुद्दे मांडून चांगली सुरुवात केली आहे.

मला शंका एवढीच आहे की यातील बहुसंख्य मुद्दे (१० + टक्के लोकांचा अर्जापासून) व्यापक यंत्रणेशिवाय अशक्य आहेत. सध्यातरी ते इम्प्रॅक्टिकल वाटतात.

अर्जदारांची छाननी करणे हे काम दुरापास्त आहे. निवडणूक आयोग नावाची स्वतंत्र यंत्रणा देशात नाही. निवडणूक आयोग वेळ पडेल तेव्हा सरकारी कर्मचार्‍यांना आदेश देऊन निवडणूकीच्या कामाला लावतो. हे कर्मचारी निवडणूक संपल्यावर आपल्या नियमित पदावर रुजु होतात. लोकसभेत हल्ली मतदार काही(१५-२० लाख?) लाखांच्या घरात असतात. त्यांचे १० टक्के मतदार तपासायचे म्हणजे फार कठीण. नेमके काय तपासायचे? सही? अर्थात विधानसभा वा नगरसेवक यांच्या बाबतीत हे जास्त सोपे आहे.

परत बोलावण्याचा अर्ज उघड असल्याने मतदारांवर असे नाही तर तसे दडपण येऊ शकते. अशा वेळी ते निपक्षपातीपणे निर्णय घेत नाहीत हे उघड असणार. निदान ज्याच्यावर बालंट येणार तो उमेदवार या प्रक्रियेला या कारणाने विरोध करणार. प्रत्येक अर्जदाराची प्रत्यक्ष शहानिशा करणे हे त्यावरचा फारसा चांगला उपाय होणार नाही. (किती दिवसात शहानिशा होऊ शकेल.)

बाकी ३ आणि ४ चा उद्देश हे अर्ज कमी व्हावेत यासाठी केलेला दिसतो. पण अशा पद्धतीचा डेटा असणे (कोणी कुणाला मत दिले आणि दिले की नाही.) हेच मुळात चुकीचे वाटते. अर्थात हे करणे देखिल जिकीरीचे काम राहील.

निवडणूक आयोगाला स्वतंत्र यंत्रणा असावी का? असल्यास केवढी मोठी. त्यानंतर अर्ज देण्याचा पर्याय सोपा करू शकता येईल का? सहीनिशी अर्ज देणे आणि त्याची छाननी होणे या कटकटीतून मार्ग काढण्यासाठी काही सोपी पद्धती हवी. काही जण नागरिकसभेचा (जनसंसद) पर्याय मानतात. पण त्यातही छाननी कठीण. पण अर्जकरण्यापेक्षा जास्त सोपे असणार.

समजा दहा टक्के लोकांनी परत बोलावले. आणि त्याच वेळी १५ टक्के लोकांनी हाच उमेदवार पाहिजे असा अर्ज केला तर काय करायचे?

कदाचित अडीच वर्षांनी (वा निवडकाळातील अर्ध्या कालखंडाने) सरसकट सगळ्यांसाठी परत बोलावण्याची निवडणूक घेणे यापेक्षा जास्त सोपे राहिल. त्यात नेहमीच्या अनेक बटनांऐवजी फक्त दोन बटने असतील. मला तरी हे सर्वात जास्त सोपे वाटते.

प्रमोद

स्पष्टीकरण

अनेकांनी मुद्दा क्र. ३ आणि ४ न पटल्याचे म्हटले आहे त्याबाबत स्पष्टीकरण.

मुद्दा क्र ४ लिहिण्यामागे कारण असे की मला कळू लागल्यापासून एव्हरी नाऊ ऍण्ड देन, "सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे म्हणून त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे" अशी विरोधकांची मागणी मी ऐकत आलो आहे. कोणाचेही सरकार असो आणि कोणीही विरोधक असोत. म्हणजे आपल्या पसंतीचे सरकार नसेल तर त्याने राजीनामा द्यावा असे म्हणायला फारसा विचार करायला लागत नाही. तेच स्थानिक पातळीवर मतदार आणि प्रतिनिधी यांच्याबाबत होईल. जे मतदार त्या प्रतिनिधीच्या विरोधात आहेत ते त्या प्रतिनिधीला परत बोलावण्यास पहिल्या दिवसापासूनच उत्सुक असतील.

ज्यांनी त्या प्रतिनिधीला मते दिली आहेत त्यांनाच "भ्रमनिरास" झाल्याचा दावा करून प्रतिनिधीला परत बोलावण्याची मागणी करता यावी. हा प्राथमिक टप्पा पार केल्यावर अंतिम निर्णयासाठी जे मतदान, रेफरंडम होईल त्यात सर्वांनाच भाग घेता यावा.

म्हणजे क्वालिफाईंग मागणी (१०%) करण्याचा अधिकार मर्यादित पण फायनल निर्णयाचा अधिकार सर्वांना अशी माझी कल्पना आहे. हे बहुधा मूळ लेखात स्पष्ट होत नसावे.

नितिन थत्ते

गुणांकन

मला स्वतःला परत बोलावून घेण्याच्या तरतुदीपेक्षा मतदान करताना सर्वच उमेदवार नाकारण्याची पद्धत अधिक आकर्षक वाटते. कदाचित दोन्हींची गरज आहे.

टक्केवारीच्या बाबतीत थोडी मागेपुढे करायला जागा असावी. ४ मधील 'मी त्याला मत दिलेलं असेल तरच मला त्याला मागे बोलवण्याचा अधिकार आहे' हे बरोबर वाटत असलं तरी तो संपूर्ण मतदारसंघाचा (कोणालाच मत न देणाऱ्यांचाही) प्रतिनिधी असतो, त्यामुळे सर्वांचाच त्याच्यावर अधिकार असायला हवा. तेव्हा १० टक्के ऐवजी २० टक्के सह्यांची आवश्यकता असावी.

मला यापलिकडे जाऊन असं वाटतं की काहीतरी व्यक्तिनिरपेक्ष गुणांकन पद्धत असावी. म्हणजे प्रत्येक मतदारसंघासाठी एक वॉचडॉग ग्रुप तयार करून प्रतिनिधीने काय आश्वासनं दिली ती पूर्ण करण्याचा किमान प्रयत्न केला का? कुठच्या बाजूने कुठच्या विधेयकांवर कसं मत दिलं? भ्रष्टाचाराचे आळ आले का? वगैरे महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून गुणांकन व्हावं. ही यंत्रणा उभी करणं जिकिरीचं आहे. ती सरकारी नसावी. या गुणांकनावरून (सगळ्यात खालचे पाच टक्के) कोणाला मागे घेण्याचा विचार करावा हे ठरवावं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

म्हणजे शॅडो कॅबिनेट्?

म्हणजे shadow cabinet जसं सतत सरकारी खाते/मंत्री ह्यांच्यावर दबाव टाकते तसेच स्थानिक पातळीवर shadow MLA/MP ठेवावेत असं म्हणताय? तुम्ही म्हणता तेच काम (मूल्य-मापन वगैरे) काही अंशी फरकाने सध्या वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमं करताहेत.किंवा चौथ्या स्तंभानं ते करावं अशी अपेक्षा आहे.

--मनोबा

सहमत-असहमत

म्हणजे प्रत्येक मतदारसंघासाठी एक वॉचडॉग ग्रुप तयार करून प्रतिनिधीने काय आश्वासनं दिली ती पूर्ण करण्याचा किमान प्रयत्न केला का?

अश्या प्रकारची साइट आपल्या प्रतिनिधींसाठीही असावी. पण ती लोकजागृती करता असावी, त्यावरुन गुण देऊन प्रतिनिधी माघारी बोलवण्यासाठी नसावी असे वाटते.

यात काही समस्या

मला स्वतःला परत बोलावून घेण्याच्या तरतुदीपेक्षा मतदान करताना सर्वच उमेदवार नाकारण्याची पद्धत अधिक आकर्षक वाटते. कदाचित दोन्हींची गरज आहे.

भारतात विधिमंडळ (लेजिस्लेचर = संसद किंवा विधानसभा/परिषद) आणि शासन (एक्झेक्युटिव्ह = पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आणि त्यांची मंत्रीमंडळे) ही एकमेकांशी जोडलेली आहेत. (शासन हे विधिमंडळाचे सबसेट आहे.)

भारतात शासन चालवण्यासाठी विधिमंडळ असे हवेच. विधिमंडळ बरखास्त असेल, तरी विधिमंडळातील शासन-असलेला-भाग हा पुढचे शासन येईपर्यंत शाबूत राहातो. यामुळे शासनाची अखंडता राहाते. नवीन लोकनियुक्त अधिकार्‍यांचे अधिकारग्रहण (शपथविधी) पूर्ण होईपर्यंत आदले लोकनियुक्त शासकीय अधिकारी शासन चालवतात. इतकेच काय लोकसभा बरखास्त असताना विधिमंडळ असे काहीतरी राहावे, म्हणून पूर्ण राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही. पण राज्यसभा अर्थसंकल्प पसार करू शकत नाही, म्हणजे हे विधिमंडळ थिटेच.

"वरीलपैकी कोणालाच मत नाही" याचे ठोस परिणाम कायकाय? तर या पर्यायाला बहुमत मिळाले, तर त्या मतदारसंघातून कुठलाच उमेदवार स्थानापन्न होणार नाही. पण असे जर झाले, तर पुढची निवडणूक होईस्तोवर शासनाची धुरा कोण सांभाळणार? पूर्वीचे लोकनियुक्त अधिकारी चालवणार काय? म्हणजे "कोणीच नको"चा अर्थ "पूर्वीच्या उमेदवाराला तात्पुरते मत" असा होतो. (पण हे लोकनियुक्त अधिकारी तर कित्येकदा उमेदवारांपैकी असतात. "कोणीच नको" म्हणजे खरे तर यांच्याविरुद्ध मत आहे. परिणाम आणि इच्छा यांत विरोध आहे.)

आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे अर्थसंकल्प पसार करणे. आता समजा, काही थोड्या मतदारसंघांतून निवडणुकीत सर्व उमेदवारांना नकार मिळाला, तर काय? कोणी म्हणेल की काहीकाही मतदारसंघांतून उमेदवार निवडून येतील, त्यांची संख्या विधिमंडळाच्या "क्वोरम"पेक्षा अधिक असेल, तर पुरे. त्या उमेदवारांच्या बहुमताने सरकार बनेल. ते सरकार पोटनिवडणुकी होईस्तोवर शासन चालवेलच. आजही एखादा विधिमंडळ सदस्य मृत्यू पावला, तर विधिमंडळ आणि शासन चालतेच, नाही का?
परंतु मृत्यू आणि नकार-मर यांच्यात फरक आहे. "नकार" दिला तर कोणी नको आहे असा स्पष्ट अनुरोध आहे. परिणाम मात्र आहे, की आपला मतदारसंघ सोडून उर्वरित मतदारसंघातील बहुसंख्य पक्षाने सरकार बनवावे. जोवर "अन्य मतदारसंघातील शासन/अर्थसंकल्प हवा" हाच मतदाराचा अनुरोध असेल, तर काही हरकत नाही. परंतु या बाबतीत बहुतेक चर्चा वाचलेल्या आहेत, त्यात मतदाराला पर्याय नकोत, अशीच चर्चा असते.

अर्थसंकल्प पसार करणारे विधिमंडळ बरखास्त किंवा थिजवल्या स्थितीत ठेवून आणीबाणीची व्यवस्था आपल्या घटनेत आहे. परंतु आणीबाणीत शासन करणारे कोण असते? पूर्वीच्या संसदेतून आलेल्या पंतप्रधानांचे मंत्रीमंडळ. म्हणजे "कोणालाही मत नको" = पूर्वीच्या मंत्रीमंडळाला पुनर्निवडणुकीपर्यंत मत. हाच मतदाराचा अनुरोध असेल, तर काही हरकत नाही. परंतु या बाबतीत बहुतेक चर्चा वाचलेल्या आहेत, त्यात मतदाराला पर्याय नकोत, अशीच चर्चा असते.

खंड न पडता शासन चालवणारे कोणीतरी असावे, ही व्यवस्थापकीय गरज कुठल्यातरी पूर्ण केली, तरच वरील तरतूद व्यवहार्य होऊ शकते.

- - -

ही यंत्रणा उभी करणं जिकिरीचं आहे. ती सरकारी नसावी.

त्या व्यवस्थेचा खर्च कोणी करावा? याचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या अर्थसंकल्पाचा पोटभाग असावा की वेगळा कसा?

कोणी म्हणेल की न्यायव्यवस्थेचा खर्चही सरकारातून येतो. पण त्याबद्दल राज्यशास्त्रीय तरतूद घटनेत आणि कायद्यांत आहे. इतकेच काय न्यायाधीश शेवटी सरकारच नेमते - पण त्यांना पदच्युत करायची प्रक्रिया मोठी किचकट आहे. न्यायव्यवस्थेतल्या नेमणुकी -आडमार्गाने का होईना - मतदात्यांपर्यंत पोचवण्याचा धागा घटनेत सापडतो. कोणी म्हणेल की असेच वॉचडॉगही नेमा. पण वरील प्रतिसादात नेमणूक सरकारकडून नको, असे म्हटले आहे. आता आपण म्हणू शकतो, की या यंत्रणेतील अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र निवडणूक घ्यावी. परंतु मग सध्याच्या निवडणुकीचे सर्व तोटे, भ्रष्टाचार वगैरे, त्या निवडणुकीलाही लागू असतील.

आलेक्सांद्र द्यूमाची "विकोम्त द ब्रागेलोन - वीस वर्षांनंतर" कादंबरी आहे. त्यात मंत्र्यावर भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करू शकणारा "प्रोक्यूरर जनरल" हा वॉचडॉग अधिकारी असतो. मंत्र्याने या अधिकार्‍याचे पद आपल्या अंकित ठेवणे सोयीचे असते... वगैरे पाताळयंत्री राजकारणाचे उपकथानक आहे.

बाजारात तुरी

अपेक्षा अशी आहे की 'कोणीच नको'ला बहुमत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. प्रत्येक निवडणुकीत चार उमेदवार असतील तर कोणीच नको हा पाचवा उमेदवार झाला. अगदी यदृच्छेने मतदान झालं तरी ती शक्यता २०% आहे. प्रत्यक्षात परिस्थिती यापेक्षा खूपच चांगली असेल. त्यामुळे विधीमंडळच नाही, क्वोरमच नाही ही शक्यता फारच दूरची वाटते. त्यामुळे सगळंच मोडून पडेल हे बाजारात तुरी म्हणण्यासारखं आहे.

'फाशीची शिक्षा असल्यास खूपच लोक फासावर जाऊन लोकसंख्या कमी होईल' यासारखा हा युक्तिवाद वाटतो. हे टोकाचं उदाहरण झालं. थोडीजास्त चांगली उपमा म्हणजे 'गुन्हेगारांना तुरुंगात टाकल्यास इतके लोक तुरुंगात जातील की शेती करायला पुरेशी माणसं उपलब्ध रहाणार नाहीत'. शिक्षेच्या शक्यतेमुळे गुन्हे कमी होतात व पर्यायी कमी लोक तुरुंगात जातात. तशीच स्टेडी स्टेट अपेक्षित आहे.

त्या व्यवस्थेचा खर्च कोणी करावा? याचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या अर्थसंकल्पाचा पोटभाग असावा की वेगळा कसा?

आदर्श व्यवस्थेत ही जनतेच्या भल्यासाठी चालवलेल्या हॉस्पिटलप्रमाणे चालवली जावी. त्यासाठी देणगी मिळवता यावी. बिल गेट्सने फाउंडेशन बनवलं त्यावेळी हा पैसा सर्वोत्तम पद्धतीने कसा खर्च करता येईल असा अनेकांनी विचार केला. त्यातला एक लेख मला आठवतो. 'अरे, तुझ्या पन्नास शंभर बिलियनने नक्की काय होणार आहे? तो पैसा जनहितार्थ कामासाठी प्रत्यक्ष खर्च करण्यापेक्षा तू असं का नाही करत? अमेरिकन सरकार शेकडो बिलियन डॉलर जनतेच्या भल्यासाठी खर्च करते. त्यात अनन्वित इनएफिशिएन्सी असते. ती कमी करण्यासाठी वॉचडॉग ऑर्गनायझेशन्स हव्या, वेळोवेळी केसेसचा पाठपुरावा करण्यासाठी वकीलांची फौज हवी. यात जर तू तुझे पन्नास बिलियन घातलेस तर तुला वर्षाला पंचवीस तीस बिलियन सत्कारणी लावता येतील'

अशी गुणांकन करणारी संस्था चालवण्यासाठी त्यामानाने फार खर्च नाही. खरा खर्च तिचं मार्केटिंग करण्यात आहे.

गुणांकनावरूनच हकालपट्टी व्हावी असं म्हणणं नाही. हकालपट्टीची तरतूद करायची असेलच तर त्यासाठी कोणीतरी केव्हातरी कुठेतरी सह्या गोळा करण्याची कल्पना असण्यापेक्षा सतत कार्यवाहीत असणारी व्यक्तिनिरपेक्ष गुणव्यवस्था अधिक उपयोगी ठरेल. ती भ्रष्टाचाररहित कशी ठेवायची हा स्वतंत्र प्रश्न आहे. पण आज अण्णांनी जनतेपुढे असा कार्यक्रम मांडला तर जनता स्वीकारेल असं वाटतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

नाही, तसा युक्तिवाद नाही

नाही, तसा युक्तिवाद नाही.

उलट तुमचा युक्तिवाद असा आहे की फासावर कुणी जाण्याची शक्यताच नगण्य असल्यामुळे फाशीची शिक्षा उपलब्ध असण्याचे सुपरिणाम खूप होतील. नगण्य शक्यता असलेल्या तरतूदीचे कुठलेही गण्य परिणाम होतील असे सकृद्दर्शनी का समजावे? नगण्य शक्यता असलेल्या गोष्टींचे गण्य परिणाम असूही शकतील किंवा नसूही शकतील* - पण त्यासाठी युक्तिवाद अधिक सुदृढ हवा.

(*विमान पडण्याची शक्यता नगण्य असली तरी लोक विमान पडण्याची भिती बाळगतात, त्यानुसार त्यांचे वर्तन बदलते. इमारत कोसळण्याची शक्यता नगण्य असते, आणि लोक त्या शक्यतेबाबत भीती बाळगत नाहीत, वर्तनात फारसा फरकही करत नाहीत. नगण्य शक्यतांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण नीट केल्याशिवाय "लोकांवर बहुतेक गण्य परिणाम होईल" असा युक्तिवाद थेट ग्राह्य नाही.)

मात्र "कोणीच नाही" जिंकण्याची शक्यता गण्य असल्याचे मानल्यास त्याचा गण्य परिणाम असण्याचा युक्तिवाद प्रथमदर्शनी तरी ग्राह्य होतो. तुमच्या युक्तिवादाला थोडेतरी बळ देण्यासाठी मी शक्यता गण्य मानली. "कोणीच नाही" जिंकण्याची शक्यता नगण्य मानल्यास - आणखी युक्तिवाद दिल्याशिवाय - तुमच्या सुचवणीस मी कुठल्याच गांभीर्याने घेत नाही. गांभीर्याने न घेण्याकरिता माझ्यापाशी अनुभवाचे आत्तही आहे : "कोणीच नाही" या अर्थी पेपर-बॅलट-स्पॉइलेज हा प्रकार इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनपूर्वी उपलब्ध होता. यातही खराब केलेल्या मतपत्रिकांची टक्केवारी थोडीच असे, आणि कोणीतरी उमेदवार नेहमीच त्यापेक्षा अधिक मतांनी जिंकून येई. मतपत्रिका खराब करण्याचा पर्याय असल्यामुळे त्या काळात निवडणुका अधिक कार्यक्षम असल्याचे मला ठाऊक नाही.

आदर्श व्यवस्थेत ही जनतेच्या भल्यासाठी चालवलेल्या हॉस्पिटलप्रमाणे चालवली जावी. त्यासाठी देणगी मिळवता यावी.

शुभस्य शिघ्रम् ।
असे होण्यासाठी कुठल्याही नव्या कायद्याची गरज नाही. अशी संस्था लगेच स्थापन करण्यात आपण सर्व मदत करूया. एक नव्हे, अशा अनेक संस्था सुद्धा स्थापता येतील. ("एकच संस्था हवी", असे म्हटल्यास एकाधिकार देणारा कायदा करावा लागेल. म्हणजे पुन्हा सरकारची अनुमतीच.)

- - - (पुढील भाग काही प्रमाणात औपरोधिक आहे) - - -

अशी गुणांकन करणारी संस्था चालवण्यासाठी त्यामानाने फार खर्च नाही. खरा खर्च तिचं मार्केटिंग करण्यात आहे.

सहमत/असहमत.
खर्च कदाचित फारसा नसेल. याबाबत अंदाज करण्यासाठी माझे ज्ञान तोकडे आहे. म्हणून सहमत. पण अशा संस्थेचे मार्केटिंग करणे आणि देणग्या मिळवणे खूपच सोपे आहे : किंवा असे म्हणा, की हे मार्केटिंग "सॉल्व्ह्ड बिझिनेस प्लॅन" आहे.
जनतेला मतदानाकरिता उपयोगी अशी माहिती देणार्‍या, आणि देणग्यांवर चालणार्‍या कित्येक संस्था यू.एस. मध्ये कार्यरत आहेत. (उदाहरणार्थ अमेरिकेतील खासदारांच्या कर-धोरणाबद्दल विशेषत्वाने माहिती देणारी "अमेरिकन्स फॉर टॅक्स रिफॉर्म", खासदारांच्या चारित्र्यविषयक धोरणाबद्दल विशेष माहिती देणारी फॅमिली रिसर्च कौन्सिल, वगैरे.) व्यापारी तत्त्वावर चालणार्‍या निष्पक्षपाती आणि समतोल वार्तासंस्थाही आहेत, पण त्यांचे सोडा.

अशी/अशा संस्था पक्षपाती असण्याची शक्यताच अधिक आहे, असे खुसपट कोणी काढेल. सर्व लोकांच्या हिताला समसमान जपण्याऐवजी देणगीदारांच्या हिताला या संस्था अधिक जपतील, अशी हूल कोणी उठवेल. पण ही सैद्धांतिक शक्यता सुरुवातीला दुर्लक्षिण्यायोग्य आहे. अशी/अशा संस्था स्थापल्यानंतर पुढे कधी काही बारीकसारीक त्रुटी दिसून आल्या, तर त्या तेव्हा सुधारता येतील. कारण बहुतेक देणगीदार हे आदर्श व्यवस्थेतील जनतेच्या भल्याकरिता देणग्या देतात, हे हॉस्पिटलचे उदाहरण पोलिटिकल ऍक्शन कमिटीच्या उदाहरणापेक्षा या ठिकाणी अधिक लागू आहे.

सापेक्ष संकल्पना

गण्य व नगण्य या संकल्पना सापेक्ष असतात. कुठचा परिणाम साधायचा आहे त्यावर त्या अवलंबून असतात. भरलेल्या ग्लासामधले चमचाभर पाणी काढून टाकलं तर ते नगण्य असतं. पण तेच चमचाभर पाणी बाजूची मुंगी बुडवून मारायची असेल तर गण्य होतं (किमान मुंगीसाठी तरी).

मी शक्यता नगण्य म्हटलं ते क्वोरम साधण्याच्या दृष्टीने नगण्य. समजा पाचशे सभासदांच्या विधिमंडळात पाच जागा रिकाम्या राहिल्या तर मंडळाच्या कायदे बनवण्याच्या क्षमतेबाबत तो नगण्य परिणाम असतो. याउलट ज्या पाच ठिकाणी मतदारांनी म्हटलेलं असतं 'तुम्ही उभे केलेले कुठचेही उमेदवार विधिमंडळात जायच्या लायकीचे नव्हते' त्या ठिकाणी ती सर्व उमेदवारांना व पक्षांना चपराक असते. त्या सर्व पक्षांना नवीन उमेदवार उभे करावे लागले तर इतर ठिकाणी उमेदवार उभा करताना खोलवर विचार करावा लागतो. त्यासाठी हे गण्य आहेच.

एक संस्था हवी, एकच संस्था हवी वगैरेवर निश्चित वाद घालता येईल. मूळ मुद्दा असा होता की शासनबाह्य, विश्वासार्ह यंत्रणेकडून, कायम रहाणारे व्यक्तिनिरपेक्ष निकष लावून सतत गुणांकन व्हायला हवं. आणि हे गुणांकन जनतेने विचारात घ्यायला हवं. सर्वात कमी गुण मिळालेल्या प्रतिनिधीला त्याच्या मतदारांनी त्याबद्दल जाब विचारण्याची सवय ठेवली तरी ते परिणामकारक पाऊल ठरेल. मग कदाचित प्रतिनिधींना परत आणण्याची गरज पडणार नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

अशी संस्था असणे शक्यच* नाही

मूळ मुद्दा असा होता की शासनबाह्य, विश्वासार्ह यंत्रणेकडून, कायम रहाणारे व्यक्तिनिरपेक्ष निकष लावून सतत गुणांकन व्हायला हवं.

अशी संस्था असणेच शक्य नाही* इतपत अनुभव आपल्याकडे आहे. मी दिलेल्या संस्थांची संकेतस्थळे तपासून बघितलीत काय?

*"शक्य नाही" मध्ये सापेक्ष/गण्य/नगण्य वगैरे तुमचे वरचे वचन लागू आहे

याउलट ज्या पाच ठिकाणी मतदारांनी म्हटलेलं असतं 'तुम्ही उभे केलेले कुठचेही उमेदवार विधिमंडळात जायच्या लायकीचे नव्हते' त्या ठिकाणी ती सर्व उमेदवारांना व पक्षांना चपराक असते.

"तुम्ही उभे केलेले कुठचेही उमेदवार"च्या ठिकाणी "उभे असलेले तुम्ही सर्व उमेदवार" असे वाचले. कारण "उभे करणारे तुम्ही" कोण ते मूळ वाक्यात मला कळलेले नव्हते.
पण चपराकीचे वाक्य पूर्ण नाहीच.
"अन्य मतदारसंघांतून कोणी का निवडून येऊदेत, उभे राहिलेले तुम्ही सर्व उमेदवार हे त्यांच्यापेक्षा कमी लायकीचे आहात, म्हणून अन्य मतदारसंघांच्या कोणी-का-असेना उमेदवारांनी माझे प्रतिनिधित्व करावे" असे ते मत आहे. कारण क्वोरम् पूर्ण होण्याची शक्यता गृहीत धरण्यालायक असल्याने अन्य मतदारसंघातील उमेदवार सरकार बनवणारच आहेत - हे तुम्हीच सांगितले आहे.
अन्य-मतदारसंघातले-कोणी-का-असेना हे आपल्या मतदारसंघातील उमेदवारांपेक्षा चांगले आहेत, याबाबत मतदाराने परीक्षा कशी करावी?
(ही चपराक म्हणजे "आय विल कट माय नोझ टु स्पाइट माय फेस" प्रकारची बालीश वाटते. "माझा भाऊ मला इतका नावडतो, की शेजारच्या मुलाला मी भाऊ मानणार, मग तो शेजारचा मुलगा कसाही का असेना!")

त्रासदायक

'तुम्ही उभे केलेले उमेदवार' हे पक्षांना उद्देशून आहे हेदेखील उचकटून सांगावं लागलं तर मला प्रचंड मोठे प्रतिसाद लिहावे लागतील. ते त्रासदायक ठरेल. (शेवटच्या वाक्यातला त्रासदायक ठरेल हे 'माझ्यासाठी त्रासदायक ठरेल' किंवा 'मला त्रासदायक ठरेल' अशा अर्थाने लिहिलेलं आहे.) [गोल कंसातल्या वाक्यात नुसतंच 'लिहिलेलं आहे' असं लिहिलेलं असलं तरी ते 'मी लिहिलेलं आहे' असं म्हणायचं आहे.] {...'मला म्हणायचं आहे'}...

ही चपराक म्हणजे "आय विल कट माय नोझ टु स्पाइट माय फेस" प्रकारची बालीश वाटते.

नाही, ती चपराक आहे, तलवारीचा घाव नाही. नाकावर बसलेल्या, रक्त पिणाऱ्या डासाला मारण्यासाठी नाक किंचित काळ दुखावलं तरी हरकत नाही, अशी विचारपूर्वक आहे. [चपराक विचारपूर्वक असण्याविषयी बोलतोय मी]एरवी तुमचा विचार नेहमीच संतुलित असतो, पण याबाबतीत टोकाची विचारसरणी का जाणवते आहे? {...'मला का जाणवते आहे?'...}काही जागा रिकाम्या राहिल्या तर क्वोरम पूर्ण होणार नाही; लांबवरच्या फायद्यासाठी थोडी दुखापत सहन करण्याची तयारी म्हणजे नाक कापून घेणे; वगैरे विचार का आले आहेत? {...'तुमच्या प्रतिसादात का असे विचार आले आहेत? अशा म्हणजे आधीच्या वाक्यात लिहिल्याप्रमाणे टोकाची विचारसरणी दाखवणारे. दाखवणारे विचार म्हणायचंय मला.'...}

अन्य-मतदारसंघातले-कोणी-का-असेना हे आपल्या मतदारसंघातील उमेदवारांपेक्षा चांगले आहेत, याबाबत मतदाराने परीक्षा कशी करावी?

तिथले मतदार तिथली काळजी करतील. मी माझा प्रतिनिधी गलिच्छ नाही याची काळजी करेन.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

अपक्ष

>>तुम्ही उभे केलेले उमेदवार' हे पक्षांना उद्देशून आहे हेदेखील उचकटून सांगावं लागलं तर मला प्रचंड मोठे प्रतिसाद लिहावे लागतील

पक्षांनी उभे केलेल्या उमेदवारांखेरीज पक्षांनी उभे न केलेले उमेदवार पण असतात. त्यामुळे वरील तिरकस प्रतिसाद देण्यामागचे कारण बरेच अनाठायी आहे.

नितिन थत्ते

पक्ष-अपक्ष

निवडून येणाऱ्यांत अपक्षांची संख्या अत्यल्प असते. त्यामुळे पक्षांना हा संदेश पाठवणं महत्त्वाचं आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

पक्षांना तर चपराक मुळीच नाही

"तुम्ही उभे केलेले उमेदवार" हे पक्षांकरिता असेल, तर ही मुळीच चपराक नाही.
"माझे नकार-मत अन्य मतदारसंघातील जिंकलेल्या उमेदवारांच्या बहुसंख्य पक्षाला आहे" यात पक्षांचा काहीही तोटा होत नाही. सगळ्यांचाच अपमान तो कोण्याही एका पक्षाला बदल करण्यास भाग पाडत नाही.

डासाला मारलेच नाही, त्यामुळे नाक दुखावण्याचा तोटा आहे.

टोकाची विचारसरणी जाणवत असेल तर का ते माहीत नाही. लोकशाहीच्या काही प्रक्रियांना मानसशास्त्रीय, अर्थशास्त्रीय आणि व्यवस्थापशास्त्रीय आधार आहेत : यांचा अभ्यासही झालेला आहे, आणि यांच्याबाबत अनुभवाची साधनसामग्रीसुद्धा आहे. प्रत्येक बाबतीत समसमान संतुलित असणे म्हणजे अनुभवाकडे जाणूनबुजून डोळेझाक करणे होय. पृथ्वीच्या आकाराबाबतही अनेक मतमतांतरे असू शकतात. तरी झालेल्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा उपयोग करून त्यातील काहीच आकारांबाबत "संतुलित" विचार करता येतो, काही आकारांबाबत करता येत नाही.

नाही कशी?

तर ही मुळीच चपराक नाही.

एखाद्या हक्काच्या मतदारसंघातून विशिष्ट पक्षाचा - नक्की निवडून येणार अशी खात्री असलेला - उमेदवार पडला तर विधिमंडळातली एक जागा कमी झाली यापलिकडेही त्या पक्षाची नाचक्की होते. तुमचा युक्तिवाद अंकगणितीय आहे, माझा जनमानसातील प्रतिमा या स्वरूपाचा आहे.

इथे संतुलित असण्याबाबतीत पृथ्वीच्या आकाराचं उदाहरण वापरणं अयोग्य आहे. इथे स्पष्ट पुरावे नाहीत. तुमचं विधान सोळाव्या शतकातल्या पोपच्या तोंडी असतं तर?

असो. एकंदरीत तुम्हाला खात्री आहे, मी शक्यता मांडतोय. तेव्हा तुमचंच बरोबर असावं कदाचित.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

काही ठिकाणची साधनसामग्री उपयुक्त राहील

यू.एस मधील नेव्हाडा राज्यात, स्पेन, रशिया, युक्रेन, आणि कोलोंबिया देशांत "कोणीच नको"ची ओळ मतपत्रिकेवर असते. नाचक्की होऊन जनमानसातली प्रतिमा बदलून फरक होतो की नाही, याबाबत अभ्यास करणे उपयुक्त राहील. (दुवा)

या कारणामुळे नेव्हाडा राज्यातील निवडणुका/राजकीय पक्ष अन्य यू. एस राज्यांपेक्षा खूप सुधारलेले नाहीत : वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून तरी स्पष्ट फरक जाणवत नाहीत. यादीतील बाकी देशांबाबतही : या उपलब्धतेमुळे या देशांतील राजकीय पक्ष आजूबाजूच्या देशांतील राजकीय पक्षांपेक्षा लोकाभिमुख असल्याचे फारसे ऐकलेले नाही.

"कोणीच-नकोच्या नाचक्कीने पक्ष सुधारतील" या समाजमनोवैज्ञानिक उपन्यासामध्ये सकृद्दर्शनी मला बळ वाटत नाही, त्यामुळे या राज्या-देशांचा तुलनात्मक अभ्यास तपशीलवार करण्यापासून मी सूट घेतो आहे.

थत्ते साहेब

आपले मुद्दे पटण्या सारखे आहेत

१०% व्हॅलिड अर्ज आले की प्रतिनिधीला परत बोलवावे की नाही याविषयी मतदारसंघात मतदान घ्यावे. [याला अल्टरनेट ३०% अर्ज व्हॅलिड आले तर बिना मतदान प्रतिनिधित्व रद्द करावे].

पण हे टक्के जरा विचार करावयास भाग पाडतात. जर का मतदारसंघातील फक्त ३० टक्के लोकांनी मतदान केले होते व एक लोकप्रतिनिधी त्यातल्या १५ टक्के मताने निवडून आला होता असे धरले तर पुर्ण मतदारसंघातील १० टक्के अर्ज कधीच येऊ शकणार नाहीत असे वाटते. कारण मतदेणारेच इतके कमी होते तर त्याहून कमी लोक अशी मते देणारी असतील.

गैरलागू

लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा हक्क लोकांना असायला हवा हेच मुळात मान्य नसल्याने ही चर्चा माझ्यासाठी गैरलागू ठरते. क्षमस्व.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

+१

पन्नास टक्के लोक आजही मतदान करत नाहीत. जे करतात, त्यापैकी निम्मे तरी रोख पैसे घेऊन करतात. कितीतरी ठिकाणी बोगस मतदान सर्रास केले जाते.
'निवडणूक सुधारणा' करण्याची खरी गरज इथे आहे. ते सोडून असे नवे कायदे निर्माण करणे म्हणजे वेळेचा आणि पैशाचा प्रचंड अपव्यय ठरेल. 'निवडणुका घेत राहणे' हे एक पूर्णवेळ, ३६५ दिवस चालणारे काम होऊन बसेल !

खरेच का?

>>पन्नास टक्के लोक आजही मतदान करत नाहीत. जे करतात, त्यापैकी निम्मे तरी रोख पैसे घेऊन करतात.

असे दर्शवणारा काही विदा उपलब्ध आहे का? की हे ही मध्यमवर्गीयांचे कनिष्ठवर्गाबाबत कन्जेक्चर (गृहीत) आहे.

नितिन थत्ते

गृहीतक नाही, निरीक्षण...

'पैसे खाऊन मतदान' बद्दल मी जे लिहिले आहे, त्यात काही दोष काढायचाच असेल तर 'निम्मे' या प्रमाणाबद्दल अव्याप्तीचाच दोष काढता येईल, इतके प्रकार मी स्वतः पाहिले आहेत. मी स्वतःदेखील लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचाराचे काम केलेले असल्यानेच हे ठामपणे म्हणू शकतो. मतदानाची वेळ सायंकाळी पाच वाजेपर्यंत असेल तर दुपारी तीन वाजेपर्यंत दहा टक्के मतदानही न होणे, मग दबा धरून बसलेल्या वस्त्या आणि मोहल्ल्यांमधे नोटा भरलेल्या इन्नोव्हा आणि स्कॉर्पिओ घुसणे आणि मग शेवटच्या एका तासात रेकॉर्ड मतदान वगैरे वगैरे प्रकार याची देही याची डोळा अनुभवले आहेत ! मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांचे माहित नाही, पण मध्यम आकाराच्या शहरात आणि ग्रामीण भागात तरी दुर्दैवाने हेच वास्तव आहे. अगदी लाल अक्षरात न लिहिताही दिसून येईल, इतके ठळक वास्तव !
'आपली लोकशाही' या प्रकाराचे एखाद्या समाजशास्त्रज्ञाने गांभीर्याने विच्छेदन केल्यास त्याला आयुष्यभर अँटी-डिप्रेसन्ट घ्यावी लागतील, याबद्दल मला तिळमात्रही शंका नाही. त्यापेक्षा अशा साखरपाकातल्या सुधारणा सुचवणे नक्कीच सोपे आहे.

विदा- अर्थातच उपलब्ध नाही. भविष्यातही अशा प्रकारचा विदा उपलब्ध करून देणे मलाच काय- कोणालाही शक्य नाही. पण केवळ विदा नाही म्हणून वस्तुस्थितीकडे सपशेल दुर्लक्ष करायचे ही पळवाट आहे- 'मध्यमवर्गीय' पळवाट किंवा अन्य कुठली ते माहित नाही.
'विदा' नसल्याने कागदोपत्री अर्थातच ते विधान निराधार आहे. त्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावत असल्यास ते विधान बिनशर्त मागे घेण्याची माझी तयारी आहे.

इतके घाऊक नसावे

१९७७ साली जेव्हा इंदिरा गांधींसकट काँग्रेसच्या अनेक दिग्ग्जांना पराभव पत्करावा लागला त्या काय नोटा कमी पडल्या म्हणून? हेच २००४ साली जेव्हा एन डी ए सरकार पडले तेव्हा म्हणता येईल.

पैसे घेऊन मतदान होत असेलही पण ते इतके घाऊक नसावे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गैरलागू

ऋषिकेशजी, मी तुमच्याशी सहमत आहे हे आधी नमूद करतो.

पण नुसते मुळात मान्य नाही इतके म्हणून सोडून का दिले आहे ते समजले नाही. उमेदवारास परत बोलावण्याचा अधिकार का नसावा या विषयी कुणी मते मांडलीत तर मला आवडेल.

अण्णा आहेत ना

खरे तर ह्या चर्चेची अजिबात गरज नाही. अण्णा आहेत ना. टीम अण्णा आहे ना. ते ठरवतील आमच्यासाठी योग्य काय नि अयोग्य काय ते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मतदान

१. कोणत्या कारणासाठी लोकप्रतिनिधीला परत बोलावू शकतो यावर काहीही निर्बंध नसावेत.
~ असे असू नये. कारण मग काळ सोकावेल आणि मग 'प्रतिनिधी दिल्लीत गेल्यावर आम्हाला भेटत नाही' अशा बालिश कारणासाठीही 'बोलवा परत त्याला' असा प्रकार होण्याची शक्यता आहे. किमान ५ सबळ कारणे लोकपालाकडे आल्यानंतरच त्यावर पुढील कारवाई होईल अशी तरतूद असावी.

२. प्रतिनिधीला परत बोलावण्याची मागणी मतदारसंघातील किमान १० % मतदारांनी करावी. ती एका अर्जाने करावी की प्रत्येकाने स्वतंत्र अर्जाने करावी हा डिटेलचा प्रश्न आहे तो सध्या बाजूस ठेवू. तत्वत: १०% मतदारांनी मागणी करावी.
~ इथेही ग्यानबाची मेख अशी उपटते की हे कोण १०% वाले ? आज या घडीला ज्याना नव्याने मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे अशानी मागणी केली तर ?

३. अर्ज करणार्‍यांनी मागच्या निवडणुकीत मतदान केलेले असावे. हे अर्जदारांनी सिद्ध करायचे नसावे तर निवडणूक अधिकार्‍यांनी तपासून घ्यावे.
~ निवडणुक यंत्रणेच्या दिमतीला अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सुविधा उपलब्ध असेल तरच ती मतदान 'सिद्ध' करण्याची अट प्रत्यक्षात उतरेल. अन्यथा त्यासाठी प्रचंड मनुष्यबळ लागेल, शिवाय ६ वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे अगोदरच आर्थिक दरवाजाचे कंबरडे मोडले असल्याने सरकार नव्याने त्यासाठी नोकरभरती करू शकेल याची सुतराम शक्यता नाही.

४. ....जर मी त्याला निवडून दिलेले नाही तर त्याला परत बोलावण्याचा अधिकार मला नसावा.
~ हे पटते.

५. १०% व्हॅलिड अर्ज आले की प्रतिनिधीला परत बोलवावे की नाही याविषयी मतदारसंघात मतदान घ्यावे. [याला अल्टरनेट ३०% अर्ज व्हॅलिड आले तर बिना मतदान प्रतिनिधित्व रद्द करावे].
~ ही प्रक्रियाही फुलप्रूफ वाटत नाही. कारण एकदा अर्जच १०% आल्यानंतर मग त्याच मुद्द्यावर पुनश्च मतदान घेणे वेळखाऊ तर होईल.

६. सहा महिन्यात पुन्हा निवडणूक घ्यावी. या निवडणुकीत परत बोलावलेल्या उमेदवाराला भाग घेता येऊ नये. पुढच्या रेग्युलर निवडणुकीत त्याला भाग घेता यावा.
~ सहमत.

(अर्थात ही चर्चा 'जर-तर' अशा स्वरूपाचीच असल्याने यातून साध्य होईल ते इतकेच की असे झाले तर लोकशाही टिकविण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे किती गरजेचे आहे याची तरी किमान जाणीव त्या सुट्टीदिवशी महाबळेश्वरला पळणार्‍यांना होईल.)

 
^ वर