अण्णा हजारे, आता बास करा !

आदरणीय अण्णा,

गेल्या पंधरा दिवसांमध्ये जनलोकपाल बिल आणि भ्रष्टाचार विरोध हे मुद्दे आधारभूत धरुन तुम्ही जी अभूतपूर्व चळवळ उभी केली आणि त्याला जे जबरदस्त यश मिळाले त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. सुरुवातीला मुजोर वाटणारे सरकार लोकांच्या दबावामुळे अंशतः का होईना पण झुकले हे या चळवळीचे मोठेच यश म्हटले पाहिजे. पण त्याहीपेक्षा मोठी आणि नमूद करण्याजोगी अ‍ॅचिव्हमेंट ही की या निमित्ताने चेकाळलेल्या सरकारपर्यंत एक धोक्याचा मेसेज गेला. आपण आपल्याला हवे तसे उन्मत्तपणे आणि मस्तवालपणे वागू शकतो, आपल्याला कोण विचारणार अशा मस्तीत सरकार वावरत होते. ती धुंदी उतरली. शिवाय, लोकांच्या मनात आपणदेखील सरकारला जाब विचारु शकतो, आंदोलनाच्या माध्यमातून दणके देऊ शकतो असा विश्वास निर्माण झाला तो वेगळाच. नाहीतर आमच्यासारख्या सामान्य नागरिकांचा आणि चळवळींचा संबंध फक्त इतिहासाच्या पुस्तकांपुरताच होता. इतके मोठे यश तुम्हाला तूर्तास तरी पुरेसे वाटत नाही काय ? तुम्ही स्वतःच या लढ्याचा उल्लेख 'स्वातंत्र्याची दुसरी लढाई' असा करता. शिवाय वेळोवेळी स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे दाखलेसुद्धा देता. मग तेच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती वर्षे झगडावे लागले याची वेगळी आठवण तुम्हाला करुन दिली पाहिजे काय? भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई तुम्ही उपोषणाच्या एका फटकार्‍यामध्येच जिंकाल आणि आसुसलेली विजयश्री ताबडतोब तुमच्या गळ्यामध्ये माळ घालेल असे तुम्हाला वाटत नसेल अशी आशा आहे.

तुमच्या उपोषणाच्या वाढणार्‍या एकेका दिवसाच्या समप्रमाणात आणि घटणार्‍या एकेका किलोग्रॅमच्या व्यस्त प्रमाणात आम्हा सामान्य नागरिकांची चिंता वाढत चालली आहे. आणि अनेक दशकांनंतर देशाला राष्ट्रीय पातळीवरचे नेतॄत्व मिळाले ते महिन्या- पंधरा दिवसांपुरतेच टिकणार की काय अशी भीती मनात डोकवायला लागली आहे. 'जनलोकपालच्या निमित्ताने केलेल्या मागण्या पूर्ण होणार नाहीत पण या निमित्ताने झोपलेल्या सरकारला जाग येईल आणि नंतर वेळोवेळी चळवळी करुन सरकारला वठणीवर आणता येईल' हे वास्तव तुम्ही मनामध्ये गॄहीत धरले असेल असे आजपर्यंत वाटत होते. पण तुमचा इरेला पेटल्यासारखा आविर्भाव पाहून वस्तुस्थिती काही वेगळीच असावी असे वाटते. शिवाय काल बाळ ठाकरे यांनी 'आता केजरीवाल,बेदी,भूषण यांना उपोषणाला बसू द्या आणि तुम्ही उपोषण सोडा' अशी जी खोचक सूचना केली त्यामध्येसुद्धा बरेचसे तथ्य असावे अशी शंका येते. आमचे दाढीवाले मामा म्हणतात त्याप्रमाणे या चळवळीमध्ये बॅड एलिमेण्ट्स घुसवण्याचा सरकारी प्रयत्नसुद्धा अंशतः यशस्वी होतो आहे. हे असे आणखीन किती दिवस चालू राहणार? चिघळत गेलेली चळवळ म्हणजे नाद गेलेलं भांडं. लोकं वाट बघून बघून कंटाळतील आणि नंतर आपापल्या मार्गाने चालू पडतील. चुकूनसुद्धा जर असे झाले तर तुम्ही इतक्या मेहनतीने आणि कष्टाने उभा केलेला हा सगळा डोलारा बघता बघता जमीनदोस्त होईल आणि जर का दुर्दैवाने तुमच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर नंतर जनतेमध्ये इतके नैराश्य पसरेल की पुढची आणखीन काही दशके दुसरा कोणताही अण्णा असे आंदोलन करण्याची हिंमत करु शकणार नाही. तुम्ही घोड्यावर बसून लढताहात, तुमचे सहकारी आरामशीरपणे अंबारीत बसून गगनभेदी आरोळ्या ठोकताहेत पण सत्य जमिनीवर आहे असे राहून राहून वाटते. तेंव्हा फक्त तुमच्या स्वतःसाठीच नाही तर तुमच्याकडे आशेने डोळे लावून बसलेल्या आमच्यासारख्या सामान्य माणसांकडे आणि तुमच्या लाडक्या राळेगण वासीयांकडे बघून तरी हे उपोषण तुम्ही सोडावे असे कळकळीने सांगावेसे वाटते.

तुमचा निस्सीम चाहता,
सौरभ जोगळेकर

लेखनविषय: दुवे:

Comments

नाही !

प्रथम , संपादकांना मी विनंती करतो की ह्या लेखाचे शिर्षक बदलावे. " आता बास करा " ह्या वाक्याचा अर्थ असा लागतो की "खूप मजा केली / खूप वेळ व्यर्थ घालवला / आत्ता कंटाळा आला .... आता बास करा !!"

इथे सर्वच(आंदोलक) अण्णाच्या तब्येतीबद्दल सिरीअस आहेत.

सरकारनं काही ऍक्शन घेतल्याशिवय हे थांबने उचीत नाही. नाहीतर १२ दिवस वाया गेल्यासरखेच् आहेत. जर आत्ता माघार घेतली तर जनतेला वाटेल घश्यापर्यंत येउन घास अडकला. त्यात १२ दिवसांनंतर अशी गत आहे तर पुढे कुनी ५-६ दिवस आंदोलन केले (आपपल्या काबिलियतनुसार) तर सरकार ढूंकुनही बघणार नाही त्याकडे.

आज (२७/०८/२०११) अपे़क्षा आहे की संसदेत काही घडेल आणि अण्णा उपोशन सोडतील.

देवाचरणी हीच प्रार्थना .

---------------------
-धनंजय कुलकर्णी

ज्योत तेवत ठेवणे, आवश्यक आहे.

भ्रष्टाचाराविरुद्ध पेटविलेली ज्योत तेवत ठेवणे, आवश्यक आहे.
ज्या दिवशी अण्णांनी उपोषण सुरू केले त्या क्षणापासून त्यांचा जीव धोक्यात आलेला आहे. आता नुसती काळजी करून उपयोगाचे नाही.

भ्रष्टाचार टीकावा आणि वाढावा अशी ज्यांची इच्छा आहे, त्यांना अण्णांनी उपोषण सोडावे असे वाटते. कारण त्यांना ते सोईचे होईल.
पण आपण तरी त्यांच्याच धर्तीवर बोलण्यापेक्षा अण्णा उपोषण सोडतील अशी स्थिती सरकारणे निर्माण करावी, असे म्हणणे आंदोलनाला बळकटी दिल्यासारखे होईल.

पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

असं कां वाटतंय?

'अण्णा, आता बास करा?' असे कां म्हणताय? अण्णांच्या उपोशणाला बसल्याने सामान्य माणसाला त्याच्या आयुश्यात कोणता फरक जाणवतोय? दुचिवावर, वर्तमान पत्रात त्याच त्याच बातम्या ऐकून कंटाळा आलाय म्हणून म्हणताय कां? हो! हे खरं आहे कि मला स्वतःला तरी कंटाळा आलाय.

हे जग निश्ठूर असतं. आणी म्हणूनच असं उगीचच वाटतंय कि ह्या उपोशणात गांधीच्या पावलावर पाऊल ठेवणार्‍या अण्णांचा मृत्यू ओढवला तर ते या देशाच्या भल्याचे होईल. कारण तसे झाले तरच कॉंग्रेस हा 'अजिंक्य पक्श' नामशेश होवू शकतो.

गांधींजींनी देश स्वतंत्र झाल्यावर कॉंग्रेस विघटीत करण्यात यावी असे म्हटले होते. त्यांचे कॉंग्रेसवाल्यांनी ऐकले नाही, उलट अप्रत्यक्शपणे आपल्या कृतीतून् त्यांना दाखवून दिले होते कि, ए म्हातार्‍या तुझं काम झालं, चल तू नीघ आता ह्या पटावरून!

अण्णांना हे उपोशण महाराश्ट्रातच करायचं होतं. पण त्यांना त्या मंडळींकडून दिल्लीत नेण्यात आले, व त्यांनी देखील ते जाणे नकळतपणे स्विकारले.

जर...एक फेरा पूर्ण करीत..नियतीने हे बाकी असलेले काम पूर्ण करायचे ठरवले असेल तर..अण्णांचा मृत्यू जवळ आलाय असे उगीचच वाटतेय. स्वातंत्र मिळण्यापूर्वी जी भोळीभाबडी दृश्टी होती, त्या जुन्या दृश्टीने आपल्या देशाकडे पाहणार्‍या एका युगाचा तो अस्त असेल बहुधा....!

बास केलं !

अप्पांची विनंती अण्णांनी मान्य केली ! :)

 
^ वर