इतिहासावरील पुस्तके

मी उपक्रमचा गेली काही वर्षे सदस्य व वाचक आहे. इतिहासा संबंधी तसेच बाकीच्या विविध रोचक लेखांसाठी आणि सविस्तर चर्चांसाठी सर्व उपक्रमींचे मनापासून धन्यवाद.

मला इतिहासाबद्दल ओढ, वाढतं कुतूहल आणि इतिहासातील छान छान पुस्तकांचा संग्रह करण्याचा छंद आहे. माझी उपक्रमींना विनंती आहे की - भारताच्या आणि महाराष्ट्राच्या अति-प्राचीन, प्राचीन, अर्वाचीन आणि ब्रिटीश राज ह्या विषयांवरील चांगली मराठी पुस्तके मला सुचवा. पुस्तके इतिहास, कथा, निबंध, कादंबरी इत्यादि. कुठल्याही प्रकारामध्ये चालतील.

माझ्या संग्रहातील काही पुस्तके / ई-पुस्तके उदाहरणार्थ .... १८५७ चा संग्राम, पेशवे घराण्याचा इतिहास, बाजीराव पेशवे (राऊ, प्रतापसूर्य श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे), शिवाजी महाराज (रणजीत देसाई लिखित श्रीमान योगी, ब. मो. पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती), लोकराजा शाहू छत्रपती, बंदासिंह बहाद्दूर, प. वि. वर्तक ह्यांची काही पुस्तके, महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, रामायण व महाभारत ह्या विषयांवर लिहिलेली काही अभ्यासपूर्ण पुस्तके. तसेच काही जालावरून अश्याच विषयांवरील पुस्तके संग्रहित केली आहेत जसे - वीर सावरकर लिखित इतिहासाची सहा सोनेरी पाने, श्री बाळशास्त्री हरदास लिखित महाभारतावरील व श्रीकृष्णावरील व्याख्याने .. वगैरे वगैरे ....

मौर्य, शुंग, गुप्त घराण्यांचा इतिहासही वाचायची इच्छा आहे. अशी पुस्तके भारता बाहेर (अमेरिकेमध्ये) सहज उपलब्ध नाहीत. उपक्रमींच्या लेखनावारून असे वाटते की तुम्हां सर्वांचे खूपच अभ्यासपूर्ण वाचन आहे. ह्या चर्चेद्वारे एक यादी बनवून पुस्तके मागवून घेता येतील. (पुस्तके मिळवण्याचा अजून चांगला मार्ग असल्यास तो सुद्धा सुचवावा!)

लेखनविषय: दुवे:

Comments

शुद्ध लेखनाची चूक..

"इतिहसावरील पुस्तके" नाही - "इतिहासावरील पुस्तके" असा विषय आहे. क्षमस्व.

अ रा कुलकर्णी

प्रा. अ रा कुलकर्णी यांची मराठीत तीन पुस्तकांची मालिका आहे - "अशी होती शिवशाही"; "पुण्याचे पेशवे" आणि "कंपनी सरकार". मराठेशाहीच्या इतिहासाची सरळ, सोप्या भाषेत प्राथमिक ओळख करून घेण्यासाठी ही मलिका उत्तम आहे. कुलकर्ण्यांचे संशोधन त्या काळच्या राजकीय किंवा लष्करी इतिहासापेक्षा आर्थिक/सामाजिक घडामोडींवर होते, आणि त्यांच्या अनेक संशोधनपर पुस्तकांतून प्रस्तुत केलेल्या अभ्यासाचा गोषवारा या छोट्या मालिकेत आहे. वाचून आता खूप दिवस झाले, पण १९व्या शतकात मराठेशाहीचा र्‍हास झाल्यावर कंपनी सरकारने काय काय संस्थात्मक बदल आणले याची तिसर्‍या पुस्तकातली चर्चा फारच सुरस वाटल्याचे स्मरते.

वेगवेगळ्या विषयांवर बरीच पुस्तके आहेत, आठवतील तशी देत जाते....

डिजिटल पुस्तके

सर्वांच्याच दृष्टीने, आणि तुम्ही भारताबाहेर राहात असल्यास विशेषेकरून, जुनी चांगली पण दुर्मिळ, out of print असलेली पुस्तके मिळणे हा मोठाच प्रश्न असतो. मी कोठल्याच विषयाचा academic professional प्रकारचा अभ्यासक नाही. तरीहि मला ज्या गोष्टी जाणून घ्यायची इच्छा असते त्यांची पुस्तके मी प्रामुख्याने पुढील जागी शोधतो: (उदाहरणार्थ सरदेसाई रियासत सर्व भाग क्र.१ वर पूर्ण आणि विनामूल्य उतरवून घेण्यासाठी उपलब्ध. तीच गोष्ट जदुनाथ सरकारांच्या पुस्तकांची...)
archive.org,
books.google.com,
Digital Library of India http://202.41.82.144/

ह्यापैकी प्रत्येक संकेतस्थानाची वैशिष्टये आहेत. क्र. १ आणि २ मध्ये पुस्तक शोधणे, वाचणे किंवा उतरवून घेणे अतिसुकर आहे पण क्र. २ मध्ये प्रामुख्याने अमेरिका-कॅनडामधील ग्रंथालयांमधील पुस्तके आहेत. ब्रिटिश काळात हिन्दुस्तानबाबत लिहिली गेलेली हजारो पुस्तके आणि नियतलकालिके तेथे आहेत पण ती बहुतांशी इंग्रजी असतात. मराठी, संस्कृत आणि अन्य भारतीय भाषांसाठी १ आणि ३ उपयुक्त आहेत.

क्र.१ आणि २ येथे पुस्तकांचा प्रचंड साठा आहे आणि तो प्रत्यही हजारोंच्या संख्येने वाढत आहे पण क्र.१ मध्ये copyright संपलेलीच पुस्तके केवळ मिळतात. क्र.२ मध्ये अशी पुस्तके आहेतच पण नवी, आजकाल छापलेली पुस्तकेहि प्रकाशकांनी संमति दिली असेल तर सुमारे १/४ पाने वाचण्यासाठी उपलब्ध आहेत - Full View, Limited Preview, Snippets अशा तीन प्रकारची पुस्तके येथे आहेत. क्र.२ मध्ये स्वतःचा ग्रंथसाठाहि online करता येतो. क्र.१ sharing प्रकारचे स्थळ आहे तेथे तुम्ही आपल्याजवळची संग्राह्य पुस्तके upload करू शकता. क्र.१ मध्ये नानाप्रकारचे संगीत, विडिओ असेहि उपलब्ध आहेत.

क्र.३ हे स्थळ मी सर्वात खालच्या क्रमांकावर ठेवतो कारण त्याची management अति खराब आहे. तेथे काम करणार्‍यांना त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेपलीकडे कोणतीहि भारतीय भाषा कळत नसावी असे वाटते कारण भारतीय भाषांमधील शब्दांचे रोमनीकरण करण्याची कोणतीच शास्त्रीय पद्धति तेथे आहे असे जाणवत नाही. (At random डोळयासमोर आलेली ही पुढील शीर्षके पहा - अक्षरशः, काहीहि मनचे नाही - Admavidya, adunik geeta, Afzal Khanachya mrutuca farce, श्री. कृ. कोल्हटकरलिखित Bharthiya jotirganith!) प्रथमावृत्ति, द्वितीयावृत्ति हे त्यांच्या लेखी पुस्तकांच्या नावाचेच भाग असतात. आजच्या दिवशी त्यांच्याकडे केवळ १०२० मराठी पुस्तके आहेत. (अन्य काही भारतीय भाषांचे आकडे पहा - हिन्दी २५,३८६, बंगाली १०,३८७, तेलुगु १४,३४२, संस्कृत ७,८७८, मराठी १,०२०, मलयालम् केवळ ७०. स्थळ ५-६ वर्षांपासून चालू आहे पण मराठीमध्ये गेली २-३ वर्षे एकहि नवे पुस्तक आलेले नाही असा माझा समज आहे.) त्यांच्या पुस्तकसूचीवर विसंबून काही शोधणे कर्मकठिण आहे. तेथून काही उतरवून घेणेहि अति अवघड आहे. थोडक्यात म्हणजे क्र.३ हे स्थळ 'we are not happy till you are not happy' ह्या सरकारमान्य तत्त्वावर चालले आहे असे वाटते. हे सर्व माझे मत झाले, प्रत्येकाला स्वतःचा अनुभव घ्यायला पाहिजे.

ह्यापलीकडे जाऊन scribd.com सारखी स्थळे, तसेच अनेक विद्यापीठांची संकेतस्थळे येथे डिजिटल संग्रह आहेत. ते वापरत राहिले म्हणजे हळूहळू ध्यानात येऊ लागतात.

क्र.३ हे स्थान आपणासारख्यांना खरे उपयुक्त ठरावे. त्यांचे व्यवस्थापन सुधारावे म्हणून म्हणून देव पाण्यात ठेऊन बसलो आहे!

अरविंद कोल्हटकर, ऑगस्ट २३, २०११.

नक्की एकच असेअ पुस्तक नाही सांगता येणार्

नक्की एकच असे पुस्तक नाही सांगता येणार. मराठा साम्राज्याबद्दल वाचायचे असल्यास सरदेसायांचे "रियासत" बघावे.(शेजवलकर, राजवाडेही उत्तम., पण कधीच वाचण्यात आले नाहित.)हे मी अत्यल्प, अल्पांशाने वाचलेले आहेत.

(पुरंदर्‍यांच्या चष्म्यातुन) "राज शिवछत्रपोती" व्यवस्थित. निदान महत्वाचे ठळक तपशील तरी कळतात(अफजलवध, शाहमीस्तेखान प्रकरण आग्र्याहून सुटका वगैरे).
एक shortcut सांगु का? वाचत बसण्यापेक्षा "भारत एक खोज"(Discovery of India) बघुन घ्या ना एकदा. आख्ख्या भारताचा थोडक्यात आढावा घेतलाय अगदि रामायण्-महाभारतापासुन ते सोळा महाजन्पदे-मौर्य- बुद्ध्-गुप्तकाल व मध्ययुगीन ते अर्वाचीन भारताचा प्रवास दाखवलाय. अगदि दक्षिण भारत व तिथल्या "विजयनगर" चीही माहिती थोडक्यात मिळेल.
शिवाय बी आर चोप्रांचे महाभारत आख्खे जालावर मिळेलच. उत्तम स्त्रोत आहे. शिव छत्रपती मालिका इतिहास म्हणुन बघायच्या गडबडित पडु नका , मला त्याच्या तपशिलात काही चुका आढळल्यात.

मी स्वतः ज्याबद्दल वाचायचे आहे, तो शब्द गूगलून खुश्शाल वाटेल ते वाचत सुटतो; उदा:- मौर्य, शुंग वगैरे.
बाकी फारसा अभ्यास नसल्याने मी अधिक सांगणे उचित होणार नाही. इतरांच्या प्रतिसादातून काही उपयुक्त जालिय दुवे मिळतील अशी अपेक्षा करतो. पानिपतावर एकाहून एक संक्षिप्त लेख http://www.evivek.com/12dec2010/index.html इथे सापडतील.

बाकी तुम्ही सांगितलेल्या कादंबर्‍यांचे इतिहास मूल्य फारसे नाही हे सांगवसं वाटतं.

--मनोबा

इतिहास

"भारत एक खोज"(Discovery of India) बघुन घ्या ना एकदा."

~ १००% अनुमोदन. ९ डीव्हीडी असलेला हा सेट अप्रतिमच आहे. भारताचा ५००० वर्षाचा इतिहास [१५ ऑगस्ट १९४७ ला यातील इतिहास कथन संपते असे दाखविले आहे] श्याम बेनेगल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी असा काही चित्रबद्ध आणि शब्दबद्ध केला आहे की पाहणारा थेट त्या काळात जाऊन पोचतो. मी खरेदी करतेवेळी सेट्सची किंमत रुपये २५००/- होती. हल्ली फ्लिपकार्टवरून 'ऑनलाईन' उपलब्ध आहे असे दिसत्ये.

~ मराठीतील ऐतिहासिक कादंबर्‍या वाचून 'इतिहास' समजेल अशा भ्रमात मात्र राहू नये.

अशोक पाटील

मस्त!

फ्लिपकार्ट वर ही मालिका उपलब्ध होती हे माहित नव्हते!! त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. आजच घरी गेल्यावर मागवते.

अच्छा, बेनेगलने नेहेरूंच्या "डिस्कवरिंग इंडिया" वर जशी मालिका काढली, तशीच दा.द. कोसंबी यांच्या प्राचीन भारतीय संस्कृती व सभ्यता वर आधारित (म्हणजे त्याच्या ऐतिहासिक दृष्टीकोनातून प्रेरित) भारताच्या प्राचीन-ते-आधुनिक इतिहासावर अजून एक टेली-मालिका आहे. अरविंद नारायण दास यांनी त्याचे लेखक-दिग्दर्शक होते. गूगल विडिओवर संपूर्ण मालिका पाहायला मिळेल. बेनेगल यांच्या मालिकेच्या तुलनेत फारच कमी रकमेत ही तयार केली गेली होती, त्यामुळे थोडेसे "हौशी" वाटते खरे, पण संकल्पनेत व इतिहासाच्या विश्लेषणातही अनेक फरक आहेत. आता दोन्ही मालिका बधून खूप दिवस झाले, पण पुन्हा पाहून ताडून पाहायला मजा येईल.

अर्थात, कोसंबींची पुस्तकेही आता मराठीत उपलब्ध आहेत, त्यामुळे ढोंगीबाबांना तेही वाचता येतीलच...

भारत एक खोज...

भारत एक खोज सध्या बघत आहे, आणि त्यावर अजून वेगळा चर्चा प्रस्ताव मनात आहे...

इतिहास

इतिहास वाचायचाच झाला तर जितका मूळ इतिहास वाचता येईल तितका तो वाचा. मूळ इतिहास म्हणजे तत्कालिन इतिहासकार, बखरकारांच्या नोंदी. उदा. अकबरासाठी अबु'ल फज़ल, शिवशाहीसाठी सभासदाची बखर इ. अर्थातच, दरबारी लेखक हे सर्वच गोष्टी इतिहास म्हणून न लिहिता भाटगिरी करतातच तरीही, काळानुरुप नोंदींची संख्या तेथे अधिक मिळते असे वाटते. अर्थातच, याचा अर्थ त्यात घोटाळे नाहीत असे नाही. उदा. मागील एका चर्चेतील एका बखरीत मिळालेला हा किस्सा वाचावा.

ऐतिहासिक कथा कादंबर्‍या वाचताना अतिशयोक्त वर्णन सामोरे येते, ज्यावर माणूस विश्वास ठेवू शकतो. उदा. स्वामी या कादंबरीतील रमा-माधवाचे प्रेम. रणजित देसाईंनी एका ऐतिहासिक कादंबरीची चक्क प्रेमकथा बनवून टाकली.

दुसरीकडे, प. वि. वर्तक आणि पु. ना. ओकांसारख्या प्रभृती महाकाव्ये आणि इतिहासाची हवी तशी चिरफाड करून आपला अजेंडा पुढे रेटत असतात. सावरकरांनीही इतकी टोकाची भूमिका घेतली नसली तरी सहा सोनेरी पानांना अस्सल, विश्वसनीय आणि प्रामाणिक इतिहास म्हणणे मला जिवावर येते.

असो.

रूची असल्यास इतिहासाची जी पुस्तके समोर येतील ती सर्व वाचत जावीत. नंतर मात्र सारासार बुद्धी वापरून जे आपल्याला पटते ते घेत जावे.

बखरकारांच्या नोंदी

बखरकारांच्या नोंदी जालावर मिळतील काय?
नसल्यास कोणत्या पुस्तकालयात मिळतील याची कल्पना आहे का?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

बखर..

कृष्णाजी अनंत सभासद यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेली ६८ पानी बखर इकडे बघायला मिळेल...

तरी पण...

प्रियाली आणि इतर सदस्य मंडळी... तुमचे म्हणणे योग्य आहे, कि कादंबरी किंवा मसालेदार पुस्तके वाचुन मला इतिहास जाणुन घ्यायच्या दृष्टीने फारसा उपयोग होणार नाही, परंतु तरी सुद्धा तुमच्या वाचनामध्ये आलेली चांगली पुस्तके सुचवलीत तर सुरुवात होइल आणि मग आपसुकच योग्य अयोग्य निवड करणे जमेल...
सध्या मी माझ्या आई-वडिलांना पुस्तके घेउन ठेवायला सांगतो, पण त्यांचे ही वाचन लिमिटेड असल्यामूळे, तसेच पुण्यामध्ये काही दुकानदार त्याना खिडकी खरेदी करु देत नाहीत, त्यामुळे, बर वाईट चाचपडून घेणे अवघड जाते.. ह्या कारणास्तव, तुमच्या मदतीची अपेक्षा आहे..

काही इ-पुस्तके

१. ’आधुनिक भारत’ - आचार्य शं.द. जावडेकर
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आचार्य स. ज. भागवत लिहितात -

"मराठीतील हा एक 'अक्षर ग्रंथ' होय. हा केवळ राजकीय इतिहासाचे निरुपण करणारा ग्रंथ नसून त्यामध्ये सांस्कृतिक प्रश्नांची मूलगामी चर्चा केली आहे. थोर तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांनी 'गीतारहस्यानंतरचा थोर ग्रंथ' म्हणून याचा गौरव केला. पेशवाईच्या अस्तापासून लोकमान्य टिळकांच्या निधनापर्यंतच्या शतकात हिंदुस्थानात आणि विशेषत: महाराष्ट्रात ज्या वैचारिक चळवळी झाल्या त्यांचे या ग्रंथात केलेले विश्लेषण आणि मूल्यमापन आता सर्वमान्य झाले आहे. महात्मा गांधींच्या राजकारणाचे व तत्त्वज्ञानाचे शास्त्रीय भूमिकेतून केलेले विवेचन अभिनव आहे."

पुस्तक इथून डाऊनलोड करता येईल.

२. सुभाषबाबूंचे अपूर्ण राहिलेले आत्मचरित्र
हे पुस्तक इथून डाऊनलोड करता येईल - "An Indian Pilgrim"

३. छत्रपती शिवाजी - सेतुमाधवराव पगडी
थोर इतिहास संशोधक सेतुमाधवराव पगडी यांनी लिहिलेले ’छत्रपती शिवाजी’ हे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. ते इथून डाऊनलोड करता येईल -

४. Glimpses of World History
लेखक - पंडीत नेहरु

५. पंडित नेहरुंची भाषणे
१९४६ ते १९४९ या काळात पंडित जवाहरलाल नेहरुंनी केलेल्या महत्त्वाच्या भाषणांचा संग्रह "Independence and After" या नावाने प्रसिद्ध आहे. ती भाषणे इथे -

भाग १

भाग २

६. गांधीजींच्या सहवासात एक आठवडा
लेखक - लुई फीशर

हे पुस्तक इथून डाऊनलोड करता येईल.

७. भारतीय राष्ट्रवादाचा विकास
भारतीय स्वातंत्र्य चळवळीसंबंधीचे न र फाटकांचे हे पुस्तक "भारतीय राष्ट्रवादाचा विकास"

८. शेजवलकरांचे पुस्तक: निजाम - पेशवे संबंध
निजाम - पेशवे संबंध : १८ वे शतक
लेखक - त्र्यं. शं. शेजवलकर

हे पुस्तक इथून डाऊनलोड करता येईल.

टीप - वरिल सर्व पुस्तके Digital Library of India या संकेतस्थळावरुन उतरवुन् घेवुन pdf स्वरुपात एकत्र केली आहेत.

घबाड

मोठेच घबाड उपलब्ध करून दिल्याबद्दल दीपक साळुंके यांना धन्यवाद.

नितिन थत्ते

+१

+१

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

आभार आभार आभार्......

आताच उतरवुन घेतलेल्या Glimpses of History चे काही भाग वाचून काढले. पुस्तक उपयुक्त आहे.
निजाम-पेशवे आता उतरवुन घेतोय.
शतशः आभार......

पहिल्यांदाच एकत्रित असे इतके काही हाताला लागले आहे. कुणाला रस असल्यास स्वा. सावरकरांचे भरपूर साहित्य http://www.savarkarsmarak.com/download.php इथुन उतरवुन घेता येइल. अगदि हिंदु पदपादशाही,सहासोनेरी पाने ही नेहमीच्या वाचण्यातली पुस्तके तर् आहेतच. पण इतरही लेख,टीका,टिप्पणी त्यांनी तत्कालीन काँग्रेसवगैरे बद्दल केलेली वाचायला मिळेल. शिवाय वैज्ञानिक निबंधाच्या निमित्ताने भारतातल्या चालीरितींचा मागोवाही घेतलेला आढळेल. (हे अस्सल "ऐतिहासिक" साहित्य वगैरे नसू शकते हे मान्य. पण सावरकरांच्या बाजुचे "Glimpses Of India" तरी नक्कीच म्हणता यावे. ह्यानिमित्ताने तेव्हाच्या नुसत्या घटनाच कळतात असे नव्हे तर काही ठळक राजकिय आणि सामाजिक विचारसरणीही स्पष्ट होते, हे मला अशी पुस्तके आवडण्याचे कारण आहे.)

--मनोबा

चांगला दुवा

धन्यवाद. :-)

डायमंड पब्लिकेशन ने प्रकाशित केलेली ही पुस्तके

दीपक साळुंके यांनी दिलेले दुवे उपयोगी असावेत. पुस्तके संकलित करून उत्तम काम केले आहे. अजून व्यवस्थित पाहिले नाहीत.

या शिवाय डायमंड पब्लिकेशन (पुणे) ने प्रकाशित केलेली ही पुस्तके इतिहासाच्या अभ्यासाठी महत्त्वाची आहेत.
ही सर्व पुस्तके मराठी भाषेत आहेत. पुण्यात मिळावीत.

  • प्राचीन भारताचा राजकीय इतिहास (१९२३) हेमचंद्र रायचौधुरी
  • भारतीय इतिहासाचा अभ्यास (१९५६) - भाषांतर दि. का. गर्दे
  • प्राचीन भारतीय संस्कृती आणि सभ्यता (१९६५) - कोसंबी
  • प्राचीन भारतातील राजकीय विचार आणि संस्था रामशरण शर्मा - भाषांतर डॉ. पंढरीनाथ रानडे
  • मौर्योयोत्तर व गुप्तकालीन राजस्वपद्धती डॉ. डी. एन. झा १९६४ - भाषांतर डॉ. गो. बं. देगलूरकर
  • अकबरकालीन हिंदुस्थान (१९२०) विल्यम हॅरिसन मूरलॅंड - भाषांतर सौ. सुनंदा कोगेकर
  • अकबर ते औरंगजेब (१९२३) विल्यम हॅरिसन मूरलॅंड - भाषांतर श्री. राजेंद्र बनहट्टी
  • औरंगजेब सर जदुनाथ सरकार -भाषांतर डॉ. शरद कोलारकर
  • मोगलकालीन महसूल पद्धती (१९५९) एन. ए. सिद्दिकी -भाषांतर डॉ. प्र. ल. सासवडकर
  • ब्रिटिशांची भारतातील राजनीती (१९६५) सर्वपल्ली गोपाल -भाषांतर डॉ. सरोज देशपांडे

वर उल्लेखलेली -

  • अशी होती शिवशाही - अ रा कुलकर्णी
  • पुण्याचे पेशवे - अ रा कुलकर्णी
  • कंपनी सरकार - अ रा कुलकर्णी

ही पुस्तके कुठे मिळू शकतील याची यादी येथे आहे.
शहरे:
पुणे

Diamond Book Depot (020-24480677)
Varma Book Center (020-24456525)
Vidhya Agencies (020-24334483, 020-24335448)
Patil Enterprises (020-24487629, 9422520480)

मुंबई
VK Book Agencies (022-24146862)
Ideal Pustak Triveni (022-24304254, 022-24303362)
Shabd the Book Gallery (9820147364)
Rajanigandha Sahitya (0251-2884228)
Namita Enterprises (9890139741)

नाशिक
Deep book center (0253-2594498)
Jyoti Stores (0253-2594516)
Anmol Pustaklaya (0253-2461603)
A. V. Publishers (9822091072)

अमरावती
Popular Books (0721-2574396)

धुळे
Manoj Pustakalay (02562-234392)
Geeta Books (02562 - 223282)

नांदेड

Debhadwad Pustak Bhandar (02462-236437)
Abhang Pustakalay (02462-326707)

परभणी
Gomatesh Agencies (02452-221648)

जळगाव
Prashant Books (0257-2227231, 9421636460)
Pritam Publications (0254-5610692)

मिरज
Ratnakar book sellers (0233-2220107)

गोवा
Shardiya Vitaran (9422057929)

त्यांचे संपर्क क्रमांक आहेतच. पुस्तके पोस्टाने मिळवणे अवघड भासू नये!
-निनाद

टीपः यांच्याशी माझा काहीही संबंध नाही. परंतु अनेक उपक्रमी भारताबाहेर असतात. भारत भेटीच्या मर्यादीत काळात पुस्तके हवी असतात. तेव्हा त्यांना मदत व्हावी म्हणून माहिती देण्याचा हा प्रपंच केला आहे.

मस्त पुस्तके

बरीच मस्त पुस्तके दिली आहेत. पण शिवशाहीवरील अग्रगण्य संशोधक श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांचा उल्लेख कुठेच दिसला नाही. असो. काही मस्ट् आणि मस्त रीड पुस्तके:

१. श्री राजा शिवछत्रपती-खंड १ & २, लेखक - गजानन भास्कर मेहेंदळे, डायमंड पब्लिकेशन्स्.
२. पानिपत १७६१, त्र्यंबक शंकर शेजवलकर.
३. शिवछत्रपतींचे आरमार-गजानन भास्कर मेहेंदळे.
४. शिवकालीन महाराष्ट्र- अ.रा.कुलकर्णी.
५. ऐतिहासिक लेख संग्रह- वासुदेवशास्त्री खरे.(कुठे नाही मिळत, नेटवर असल्यास् नै माहिती).

६.History and culture of Indian people
http://www.bhavans.info/store/bookdetail.asp?bid=391&bauth=R.+C+Majumdar...

स्वातंत्र्योत्तर काळात भारतात प्रकाशित झालेल्या सर्वोत्तम इतिहासाच्या पुस्तकांत याची गणना होते.

7.Story of civilization by Will Durant-any volume more than welcome. some can be found here:
http://archive.org/details/Story_of_Civ_CD

हे तर अल्टिमेट प्रकरण आहे. पूर्ण जगाचा इतिहास आहे यात आणि तोपण अप्रतिम शैलीत.

८. नबाबि आमले मुर्शिदाबाद(बंगाली). लेखक सुशील चौधुरी.

९. त्र्यंबक शंकर शेजवलकर निवडक लेखसंग्रह.

अजून लै आहेत. तूर्तास इतकेच.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

 
^ वर