आपण स्वत:ला फसवणे टाळू शकतो का?

आत्मवंचना ही एक सर्व सामान्य, (सर्वमान्य?) व पटदिशी कळणारी गोष्ट आहे याबद्दल कुणाच्याही मनात शंका नसावी. परंतु तुम्ही स्वत:लाच कसे काय फसवू शकता असे विचारल्यास इतरांना फसविण्यापेक्षा ही गोष्ट फार सोपी आहे हे लक्षात येईल.

स्वत:ला प्रश्न विचारणे हे कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याएवढी अवघड नसावी. आपण एकाच वेळी शिक्षकासारखे प्रश्नही विचारू शकतो व विद्यार्थासारखे उत्तरही देऊ शकतो. यात कुठल्याही प्रकारचा विरोधाभास नाही. परंतु आपण एकाच वेळी फसवणारे व फसणारे कसे काय असू शकतो? यासाठी (2 G स्पेक्ट्रम, CWG, आदर्श, यासारख्या घोटाळ्यात अडकलेल्या व न अडकलेल्या व )अत्यंत मुरलेल्या, मग्रूर राजकारण्यासारखी व उच्चपदस्थांसारखी मानसिकता लागते. करून सवरून आपण त्या गावचे नाही हे शपथेपूर्वक सांगण्यासाठी आत्मवंचनेचाच त्यांना आधार मिळत असतो. मात्र असे करण्यासाठी एकाच वेळी तुम्हाला काही गोष्टी माहितही असाव्यात व काही माहितही नसाव्यात. त्यासाठी नरो वा कुंजरोवा स्थितीत असावे लागते. स्वत:च आपल्याच हातानी डोळ्यावर पट्टी बांधून घ्यायचे व मला दिसत नाही असे ठणाणा करायचे.

काही वेळा आत्मवंचना हा शब्दप्रयोग केवळ संवादासाठी व काही गोष्टींच्या स्पष्टीकरणासाठी वापरले जात असावे. या वेळी तुम्ही सत्य लपवत नसून सत्यापासून दूर जाण्याच्या प्रयत्नात असता. उदाहरणार्थ टीव्हीच्या रियालिटी शोमधील 'उभरती' गायिका स्वत:ला लतादीदी वा आशा भोसले अशी समजूत करून घेतलेली असते. वास्तवात स्वत:च्या वकूबाचा तिला अंदाज नसतो व इतर काय म्हणतात याकडे ती दुर्लक्ष करते. परमेश्वर ही संकल्पना केंव्हाच कालबाह्य झाली असून त्या काठीच्या आधारे आपल्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत हे माहित असूनसुद्धा येता जाता, उठता बसता नमस्कार - नवस करण्यात आपण आपल्यालाच फसवत असतो, हे आपल्या लक्षातच येत नाही.

कित्येक प्रसंगी व/वा कित्येक वेळा सामान्यांना माहितही असते व माहितही नसते या निष्कर्षापर्यंत आपण पोचत असतो. परंतु हे शक्य आहे का? समाजात वावरणारी माणसं एखाद्या अजश्र यंत्राच्या सुट्या भागासारखे असतात. परंतु हे सर्व सुटे भाग एकच आवाज काढत नाहीत वा एकाच नजरेने बघत नाहीत. सहश्र डोळ्यानी बघत असताना प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा, मतं वेगळी. आपली मनं म्हणजे भोवर्‍यात सापडलेल्या वेगवेगळ्या हितासक्तींचा, इच्छा - आकांक्षांचा, क्षमतांचा, उत्स्फूर्ततेचा, विचारांचा, अपेक्षांचा गोळाबेरीज असून त्यांचा एकमेकाशी काहीही संबंध नसतो. उत्स्फूर्तता आपल्याला रस्त्याच्या कडेच्या गाडीवरील भजी खाण्यास उत्तेजित करत असते, त्याचवेळी आपल्यातील विवेक त्यापासून लांब राहण्याची धोक्याची सूचना देत असते. (परंतु आपण विवेकाचा गळा दाबून टाकण्यात चाणाक्ष असतो!)

आत्मवंचन हे एक न सुटलेल कोडं आहे. कारण आपण स्वत:ला एक सोलो वादक समजून घेत असतो. आपल्याला काहीही वाजवण्याची मुभा आहे या (गैर) समजूतीत वावरत असतो. परंतु आपण एका मोठ्या वाद्यवृंदाचा भाग असतो हे सोईस्करपणे विसरतो. आपल्या या अट्टाहासापायी ऑर्केस्ट्राचा रसभंग होतो हे आपण लक्षातच घेत नाही.

तुमचा लाइफ पार्टनर तुमच्याशी एकनिष्ठ आहे, वा तुमच्या romantic सादाला प्रतिसाद देणारी तुमची प्रेमिका आहे, किंवा सगळ्यात कठिण चाचणी परीक्षा तुम्ही सहजपणे पास होऊ शकता या कल्पनाविश्वात तुम्ही असल्यास तुमचे काही तरी चुकते आहे याची तुम्हाला जाणीव आहे का? कदाचित तुम्ही याला 'हो' म्हणाल. परंतु आपण नेहमीच आपल्या (स्वच्छ) हेतूबद्दल आपल्या अपेक्षाबद्दल आपल्यालाच आपण फसवत असतो. व अशा प्रकारे फसवत असताना कुठल्याही थरापर्यंत जाण्याची आपली तयारी असते. अपेक्षाभंगाच्या क्लेशदायक सत्य स्वीकारण्याची आपली तयारी नसते. व खोट्या समाधानाच्या मागे जाण्यातच आपण धन्य समजतो.

परंतु काही प्रमाणात आत्मवंचना करण्यात काही चूक नाही. उलट त्यापासून आपल्याला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फुग्यासारखी फुगवून ठेवलेली सकारात्मक दृष्टी आपल्या अडी-अडचणीवर मात करू शकते. कठिण प्रसंगातून बाहेर काढू शकते. नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढू शकते. परंतु जेव्हा आत्मवंचना सकारात्मकतेच्या पलिकडे जावून पुराव्यांच्या विरोधात असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास भाग पाडते तेव्हा मात्र आपण आणखी जास्त अडचणीत सापडू शकतो. वाळूत तोंड खुपसून राहिल्यामुळे सत्य परिस्थितीचे भान येणार नाही. कडवे सत्य पचविण्याचे सामर्थ्य राहणार नाही. त्यामुळे वेळीच उपाययोजना करू शकणार नाही.

आपण सत्य परिस्थितीलाच धूसर करण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे व आपल्याला हवे तसा सत्याची व्याख्या बदलत असल्यामुळे आत्मवंचनेची (व आत्मवंचितांची!) भरभराट होते. ती माझ्यावर खरोखरच प्रेम करते या दिवास्वप्नात इतके गुरफटून जातो की सत्य काय आहे, त्याचे पुरावे काय आहेत याबद्दल विचार करण्यास फुरसत मिळत नाही.

आत्मवंचना ही स्व:तहून लादून घेतलेली प्रक्रिया असते. त्यापासून दूर राहण्यासाठी वस्तुनिष्ठ विचार करण्याची, प्राप्त परिस्थितीचे कठोर विश्लेषण करण्याची सवय लावून घ्यावी लागेल. माझ्या जागी दुसरा असल्यास त्याची प्रतिक्रिया काय असू शकेल याचा अंदाज घ्यावा लागेल. कदाचित या कामी एखाद्या चांगल्या, प्रामाणिक, परखड बोलणार्‍या मित्राचा सल्ला घ्यावा लगेल.

न कळत ठरवलेल्या उद्धेशांना सफल करणे वा पारदर्शक करणे कदाचित आत्मवंचनेमुळे शक्य होणार नाही. परंतु आपण प्रयत्न केल्यास निदान सत्य काय आहे हे तरी समजू शकेल. व त्यासाठी आपल्यातला (थोडातरी!) ताठरपणा सोडून द्यावा लागेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

जाणिवांची व्याप्ति

'There are known knowns; there are things we know we know. We also know there are known unknowns; that is to say we know there are some things we do not know. But there are also unknown unknowns – the ones we don't know we don't know." डॉनल्ड रम्सफेल्ड.

(ह्या स्वैर भाषांतराची आणि अन्य विवरणाची खरे पाहता आवश्यकता नाही आणि मूळ अवतरणाची खुमारीहि त्यात नाही पण १० टक्क्यांहून कमी रोमन अक्षरे व्हावीत म्हणून म्हणून पुढील लिखाण केले आहे.)

'ज्ञात अशा काही गोष्टी आपणा स्वतःलाहि ज्ञात असतात. काही गोष्टी आपणास ज्ञात नाहीत हेहि आपण जाणून असतो. काही गोष्टी कोणासच ज्ञात नाहीत हेहि आपण जाणून असतो, म्हणजेच काही गोष्टी आपणास अशा असतात की त्या आपणा स्वतःला ज्ञात नाहीत हे आपण जाणून असतो. पण अशाहि काही गोष्टी असतात की ज्या अज्ञात असतात हेच अज्ञात असते - म्हणजे त्या गॉष्टी की ज्या आपणास ज्ञात नाहीत हेच आपणास ज्ञात नसते.'

अधिक विवरणासाठी पहा http://en.wikipedia.org/wiki/There_are_known_knowns

अशाच प्रकारचे जीए कुलकर्णींचे असे काहीसे वाक्य वाचल्याचे स्मरते. 'सर्वांना कठिण वाटणार्‍या प्रश्नाचे सोपे उत्तर आपणास सापडले असे जाणवताच त्या उत्तराच्या खरेपणाबाबत शंका निर्माण होणे हे शहाणपणाचे पहिले लक्षण आहे.'

अरविंद कोल्हटकर, ऑगस्ट १२, २०११.

द्न्यानातच अद्न्यान दडलेले असते कां?

व्यंजनांचा उच्चार करता येत नाही. असे शाळेत शिकवले गेले होते.
पण मला तो कसा करायचा हे कळले. अगदी आपसुखच. उदाहरण म्हणून पाहुया.

'द्' ह्या वर्णाचा उच्चार कसा करता येवू शकतो?
सोप्पं आहे.
आधी 'अ' ह्या स्वराचा उच्चार करायचा, मग 'द' म्हणता-म्हणता लगेच थांबायचे.
त्या उच्चारानंतर तोंडातून उत्छ्वास सोडायचा नाही.

आत्ता हे जमलं असेल तर....
.
.
.
.
.
म्हणा पाहू - 'द्न्यान'!
'द्न्य' लिहीण्याची पद्धत चूकीची वाटत असेल तर,
त्याऐवजी - 'ग्यान' म्हणून पहा.

 
^ वर