दैनिक सकाळ - ५० वर्षांपूर्वीचे काही वाद

सहज विचार करता पन्नासएक वर्षांपूर्वी दैनिक सकाळमध्ये (सकाळच्या छोटया बातम्या वाचक ताज्या बातम्यासारखे वाचतात!) अटीतटीने खेळले गेलेले काही वादविवाद आठवले. अशा वादांना लेखक आणि वाचक होते हेच आज मोठे आश्चर्याचे वाटते.

त्यांपैकी पहिला म्हणजे स्त्रियांनी सकच्छ वा विकच्छ नेसावे हा. सोप्या भाषेत - बायकांनी गोल साडी (कासोटयाशिवाय) नेसावी की नऊवारी (कासोटयासह) नेसावी. ह्या गहन प्रश्नावर दोनतीन महिने धुंवाधार वाद झाल्याचे आठवते. अशा प्रश्नांना अंतिम उत्तर नसते त्यामुळे वाद कसा संपला ते आठवत नाही. आज साडया - गोल वा नऊवारी - केवळ traditional day ला नेसण्यात येत असल्याने वादच उरला नाही.

दुसरा वाद म्हणजे स्त्रियांनी अंबाडा बांधावा की वेणी घालावी. ह्यात दोन्ही बाजूंनी अनेक मुद्दे पुढे आले होते. सर्वात विनोदी म्हणजे पंक्तीत वाढतांना वेणी आमटीत पडू शकते म्हणून वेणी नको असेहि एका बहाद्दराने सांगितले होते.

आजच्या काळात कोणी असे वाद उभा केलेच तर त्याला none of your business असे सांगितले जाईल ह्यात संशय नाही.

औंधकरांनी त्यांच्या एका युरोप दौर्‍यामधून एक रोमन तरूणाचा शरीर सौष्ठवपूर्ण पुतळा आणला होता, जो त्यांनी पुणे विद्यापीठाला भेट दिला. तो पुतळा नग्न होता. विद्यापीठाने तो पुतळा Convocation Hall च्या दारात उभा केला. (मला वाटते तो अजूनहि तेथेच असावा.) असा नग्न पुतळा विद्यादानाच्या पवित्र वातावरणात योग्य की अयोग्य ह्यावरचा वाद खूप दिवस पुरला.

देवळामधील गाभार्‍याच्या बाहेर एक दगडी कासव असते, ते का अशी शंका एकाने उपस्थित केली, त्यावर अनेक उत्तरे आली. पुष्कळांनी गीतेमधील २.५८ ह्या श्लोकाच्या आधारे 'कासव जसे आपले सहा पाय कवचाच्या खाली ओढून घेते तद्वत् भक्तांनी आपले षड्रिपु देवापुढे ताब्यात ठेवावे' असे सांगण्यासाठी देवापुढे कासव असते हा संदेश असावा असे मत मांडले. अन्य काहीजणांच्या मते कासव हे नेहमी आडवे म्हणजे लीन असते, तसेच देवापुढे आपण लीन असावे ह्याचे ते दर्शक आहे असे प्रतिपादन केले. (खरोखरच देवळात कासव का असते ह्याचे उत्तर मला आजहि ठाऊक नाही. कोणी ह्यावर प्रकाश टाकू शकेल काय?)

पुण्यातील अलका टॉकीजबाहेर पाणी वाहून नेणार्‍या ओलेत्या तरुणीचा पुतळा मला वाटते ५३-५४ साली उभारण्यात आला. त्यावेळी तो अश्लील आहे आणि शाळाकॉलेजात जाणार्‍या मुलामुलींसमोरे तो नको अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. अलीकडेच वाहतुकीस अडचण होते म्हणून तो काढून टाकण्यात आला तेव्हा शहराचे एक सौंदर्य नष्ट केले जात आहे अशीहि उलटी हाकाटी कानावर पडली.

अशोक शहाणे आणि त्यांच्या समविचारी मित्रांनी १९६२-६३ च्या काळात सामाजिक बांधिलकी नावाचे नवे वाङ्मयमूल्य वाचकांसमोर आणले. आमच्यासारख्या लोकांना त्यामुळे सार्त्र, काम्यू, आंद्रे मोर्वा, कोएस्लर, हैडेगर अशा नावांची आणि existentialism ह्या नव्या शब्दाची ओळख झाली. शहाणेंचे 'असो' अशा नावाचे अनियतकालिकहि ('केव्हाहि प्रकाशित होईल') तेव्हा सुरू झाले. त्रेसष्टच्या मनोहर मासिकाच्या एका अंकात शहाणेंनी 'मराठी साहित्यावर क्ष-किरण' असा एक लेख लिहून तुकाराम हा एकटाच काय तो सामाजिक भान असलेला म्हणून सच्चा लेखक अशा अर्थाचे काहीतरी लिखाण केले. रविकिरण मंडळ इत्यादि रोमँटिक लोक अर्थात बाद. त्यांच्यामध्ये सामाजिक जाणिवेचा अभाव. त्याच कारणासाठी टिळकांचे लिखाण वाण्याच्या दुकानात पुडया बांधण्याच्या लायकीचे आहे अशा अर्थाचेहि काहीतरी लिहिले. ह्या विधानामुळे महाराष्ट्रात (पक्षी - पुण्याच्या सदाशिव पेठेत) हलकल्लोळ माजला. वर्तमानपत्रांमधून निषेध तर आलेच पण मसाप सभागृहात ना. सी. फडके (कलेसाठी कला) ह्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होऊन शहाणेंचा निषेध करण्यात आला. 'असे लिहिणार्‍यांचे हात तोडले पाहिजेत' अशी हिंसक घोषणा स्वतः फडके ह्यांनी केली हे मी ऐकले आहे कारण तुडुंब भरलेल्या सभागृहात मीहि एक श्रोता होतो.

लेखनविषय: दुवे:

Comments

कासव

"अन्य काहीजणांच्या मते कासव हे नेहमी आडवे म्हणजे लीन असते, तसेच देवापुढे आपण लीन असावे ह्याचे ते दर्शक आहे असे प्रतिपादन केले."

~ असे असणार नाही. कारण कासव हे देवानी श्रेष्ठ मानलेल्या 'विष्णू' चे प्रतीक आहे [कुर्मावतार]. दुर्वासांच्या शापामुळे इन्द्र स्वर्गातून पदच्युत झाला आणि त्यामुळे सर्व देवगण मानवासम 'मर्त्य' गटात आले व त्यांचे हतबलता पाहून असुरांनी मग इन्द्रलोक ताब्यात घेतला....इत्यादी इत्यादी... आणि मग ते 'समुद्रमंथन'....कूर्मच्या पाठीवर मंदार पर्वताला ठेऊन सर्प वासुकीच्या मदतीने घुसळून ते अमृत काढणे. या सर्वासाठी 'विष्णूरूपी कासवा'चा त्रिकालाचा तोल सांभाळण्यासाठी केलेला उपयोग.

तिथून कासवाला सृष्टीचा तोल सांभाळणारी शक्ती असे समजले जाऊ लागले [कारण ते विष्णूचे रूप आहे] आणि त्यामुळेच सृष्टीचे प्रतिकात्मक रुप हे मंदिर असल्याने तिथे शिल्पकारांनी कासवालाही स्थान दिले.

चू.भू.द्या.घ्या.

[बाकी फडके यानी शहाणे यांच्याबद्दल काढलेल्या उदगाराबद्दल काय बोलावे ?]

:)

:) मजेशीर संकलन!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

कासव वाद्

या कासवाबद्दल मीदेखिल आईला विचारले होते तेव्हा तिने सांगितल्याप्रमाणे हे कासव थोडे थोडे पुढे सरकते. ते जेव्हा गाभार्‍यात जाईल तेव्हा जगाचा विनाश अटळ आहे हेसुद्धा तिने सांगितले.
बाकि येथिल प.पू. भाऊंनी यज्ञ करण्यास जागा पाहिजे म्हणुन हे कासव पुढे सरकवण्याचा प्रस्ताव मंदिर कमिटिपुढे ठेवला तेव्हा मोठा वाद झाला होता असे ऐकुन आहे. शेवटी भाऊंनी ते कासव पुढे सरकवलेच. पण अजून काही ते गाभार्‍यापर्यंत गेलेले नाही....हुश्श.!

छान

असे जुने वाद ऐकले की आजचे वाद नक्की किती महत्त्वाचे हे पर्स्पेक्टिव्हमध्ये ठेवायला मदत होते. विशेषतः स्त्रियांनी नऊवारी नेसावी की पाचवारी, वेणी घालावी की आंबाडा याबद्दल पुरुषांनी तावातावाने वाद घालावा यातली गंमत मागे वळून पहाताना कळते.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

चांगले संकलन

माहिती आवडली.

वर म्हटल्याप्रमाणे कूर्मावतारामुळे कासवाला मंदिरात स्थान असावे. कासवाने मेरुपर्वताला दिलेल्या आधारामुळे ते स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. सुहासिनी यांनी सांगितलेला प्रवादही मी ऐकला आहे. कासव कूर्मगतीने हळूहळू गाभार्‍याकडे सरकते. जेव्हा ते गाभार्‍यापर्यंत पोहोचेल तेव्हा महाप्रलय होणार. :-)

@ राजेश,

विशेषतः स्त्रियांनी नऊवारी नेसावी की पाचवारी, वेणी घालावी की आंबाडा याबद्दल पुरुषांनी तावातावाने वाद घालावा यातली गंमत मागे वळून पहाताना कळते.

स्त्रियांनी तोकडे कपडे घालावे की नाही किंवा भडक मेकअप करावा की नाही यावर आजही पुरुषांचेच तावातावाने वाद रंगलेले आढळतात. परिस्थिती फारशी बदललेली नाही.

शॉर्ट टी शर्ट घालणाऱ्या युवती!
बेशरम मोर्चा
मुलींचे स्कार्फ आणि विरोधाभास!!!
स्त्रियांची वेषभूषा व बलात्कार

स्त्रियांनी तोकडे कपडे घालावे की नाही

ह्यावरुन आठवलेले व्यंगचित्र :

रोचक माहिती

रोचक माहिती. कोणी काय घालावे/बोलावे/करावे हे दुसऱ्याने सांगावे ह्यालाच बर्याचदा कायदा म्हणतात, कधी कधी तो असा गंमतशीर असतो हे खरे. :)

मजेदार

लेख आवडला.

देवळातल्या ह्या कासवावर पाय द्यायचा नसतो. त्यामुळे गर्दीच्यावेळी हे कासव चांगलेच अडचणीचे वाटते.
शंकराच्या पिंडीजवळ जसा नंदी असतो तसे बाकीच्या देवतांनी कासवाला पसंती दिली आहे असा माझा बालपणी समज होता.

५० वर्षानंतर...

पन्नास वर्षानंतर असाच काहीसा धागा निघावा अशी सामुग्री आपण जमा करीत आहोत की नाही?
उदा. दादोजीचा पुतळा हटवण्याचा वाद, श्वानाचा पुतळा काढण्याची मागणी, गावांची/स्टेशनांची/विद्यापिठांची नावे बदलण्यावरून झालेले वाद, पाणीपुरी वाद, वडापाव वाद इ. इ. इ. :)

असो.
लेख रोचक वाटला !

संकलन

संकलन आवडले. काळाच्या प्रवाहात वाहून गेलेल्या समाजाचा तुकडा (स्लाईस या अर्थी) वगैरे वाटला.
पुण्यातल्या मंडईत टोमॅटो हे फळ पहिल्यांदा आले तेंव्हाही असाच वाद झाला होता असे म्हणतात. जे फळ कापल्यानंतर मांसासारखे दिसते आणि त्यातून रक्तासारखा द्राव वाहतो, ते फळ आम्ही आमच्या शाकाहारी बाजारात येऊ देणार नाही असे म्हणून काही लोकांनी पंचे आणि धोतरे कसली होती असे म्हणतात. समाजात होणार्‍या अशा स्थित्यंतरांची नोंद ठेवली गेली पाहिजे. उदाहरणार्थ वेळोवेळी प्रदर्शित होणार्‍या नाटकांची, चित्रपटांची वर्तमानपत्रांत, नियतकालिकांत येणारी परीक्षणे. 'शोले' जेंव्हा प्रदर्शित झाला तेंव्हा 'सकाळ'च्या कोल्हापूर आवृत्तीत 'प्रत्येकाने पाहिलेच पाहिजे असे मर्दानी चित्र' असे काहीसे पानभर आल्याचे स्मरते.
बाकी स्त्रियांनी काय करावे आणि काय करु नये याबाबत पुरुषांनी आपल्या पगड्या सांभाळत केलेल्या चर्चा, वाद आणि स्लट वॉकसारख्या आजच्या चळवळी यांतून पन्नास वर्षांत मूलभूत असे काहीच बदलले नाही हे ध्यानात येते. भारतासारख्या लैंगिक विफल देशात (सेक्शुअली फ्रस्टेटेड् या अर्थी) श्लील-अश्लील याबाबतचे वाद तर अजरामर आहेत. लैंगिकतेकडे बघण्याचा निकोप दृष्टीकोन आम्हाला कधी मिळवताच आला नाही. आणि आमच्या दुटप्पी वागण्याबद्दल तर काय लिहावे? राघोबादादांना देहांत प्रायश्चित्त सुनावणारे निस्पृह रामशास्त्री प्रभुणे यांनी मरायच्या आधी एक वर्ष - वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी- एका नऊ वर्षाच्या मुलीशी विवाह केला होता असे ऐकले आहे!
स्त्रियांनी नऊवारी नेसावी की पाचवारी, वेणी घालावी की आंबाडा याबद्दल पुरुषांनी तावातावाने वाद घालावा यातली गंमत मागे वळून पहाताना कळते.
हे आवडले. 'मागे वळून पहाताना' हा 'टंग इन चीक' घासकडवी टच!
सन्जोप राव
मुत्तकोडीकव्वाडीहडा, मुत्तकोडीकव्वाSSSडीहडा
प्यार में जो ना करना चाहा, वोभी मुझे करना पडा

अत्रे-फडके

"भारतासारख्या लैंगिक विफल देशात (सेक्शुअली फ्रस्टेटेड् या अर्थी) श्लील-अश्लील याबाबतचे वाद तर अजरामर आहेत."

~ विशेषतः महाराष्ट्रात तर आचार्य अत्रे यानी ज्या पद्धतीने हा प्रश्न आपल्या 'मराठा' तून निर्दयतेने हाताळला ते पाहता त्या लिखाणची तुलना केवळ खाटक्याच्या कोयत्याशीच होऊ शकते. अशी उग्र भाषा की तिला प्रत्युत्तर देण्याच्या भरात कोण लेखक पडेल ?

चंद्रकांत काकोडकर यांच्या 'श्यामा' कादंबरीवर १९६२-६३ मध्ये अश्लिलतेचा खटला दाखल झाला आणि फिर्यादी पक्षाच्यावतीने जे साक्षीदार बोलाविण्यात आले तीत अहमहमिकेने पुढे आलेले हे दोन थोर - अत्रे आणि फडके. संकेत असा की खटला चालू असताना त्या अनुषंगाने वर्तमानपत्रातून जाहीर वाच्यता वा त्या संदर्भातील 'प्रोज्+कॉन्स्' मते येऊ नयेत. पण अत्रे नामक दारूगोळ्याला कोण अडविणार. त्यातही कधी नव्हे ते अत्रे-फडके ही एरव्हीची ३६ आकड्याची जोडी 'श्यामा' मुद्यावर एकत्र आली होती.

५० वर्षापूर्वीच्या "सकाळ"मध्येच नव्हे तर झाडून सार्‍या मराठी वर्तमानपत्राला श्यामा प्रकरण 'चविष्ट' वाटल्याचे दाखले आहेत. खालच्या कोर्टात २०० रुपयाचा झालेला दंड काकोडकरांचे वकील श्री.सुशील शिरोडकर यानी मग थेट सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन केस जिंकून दाखवित दंडाची ती रक्कम परत मिळविली. पुढे 'श्यामा' च्या नव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत खुद्द लेखक म्हणतात : "लोकानी मला विचारले की, वीस हजार खर्च करून तुम्ही दोनशे रुपये कशासाठी मिळविले ? याला मी उत्तर देईन की 'लेखकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य." [अगदी हेच शब्द नसतील...आता या क्षणी आठवत नाही, पण इसेन्स हाच होता.]

राज्याचा इतिहास हेच सांगतो की अत्र्यांनी जे केले ते पुढे बाळासाहेब आणि को. ने 'सखाराम बाईंडर' बद्दलही केलेच.

प्रतिसाद

<<राघोबादादांना देहांत प्रायश्चित्त सुनावणारे निस्पृह रामशास्त्री प्रभुणे यांनी मरायच्या आधी एक वर्ष - वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी- एका नऊ वर्षाच्या मुलीशी विवाह केला होता असे ऐकले आहे!>>

अच्छा म्हणजे ऐकीव गोष्टींवर अवलंबून लगेच निष्कर्ष जाहीर पण केलात तर. संदर्भ पुरावा दिला असतात तर आमच्याही ज्ञानात भर पडली असती.
पण यात दुटप्पीपणा कसा काय बुवा? त्या काळात बालविवाहाची प्रथा सर्रास रुढ होती. मुलींची खरेदी पण होत असे. दस्तुरखुद्द नानासाहेब पेशव्यांनी मरायच्या अगोदर महिनाभर पैठणच्या एका देशस्थ ब्राह्मण सावकाराची अल्पवयीन मुलगी आधी सत्तेचे दडपण आणून आणि नंतर भरपूर धनाचे आमिष दाखवून कब्जात घेतली. (नशीब लग्न तरी केले.) नाना फडणवीसांनी तर एकाच वेळी दोन अल्पवयीन मुलींशी विवाह केला होता. तत्कालीन समाजाला हे मान्य होते. दोन-तीन विवाह करणे आणि घरी नांदत्या बायका असताना अंगवस्त्रे ठेवणे हे तालेवार लोकांमध्ये शिष्टसंमत होते. सरदार नाटकशाळा बाळगत. आता मुद्दा असा आहे, की हे सगळे वाईट होते, हे आपल्याला २०० वर्षांनी आधुनिक शिक्षणाचा स्पर्श झाल्यावर आणि स्त्रीमुक्तीसाठी अनेक सामाजिक चळवळी झाल्यावर उमगले. तत्कालीन समाजमान्य रुढींची चिकित्सा आजच्या निकषांवर करणे, हा खरा दुटप्पीपणा. रामाने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावलीच का? वनात पाठवलेच का? असे प्रश्न आजच्या काळात तावातावाने विचारणे हास्यास्पद असते. राघोबाला देहान्त प्रायश्चित्त सुनावण्याचा आणि रामशास्त्रींच्या खासगी आयुष्याचा संबंध काय? न्यायनिवाडा करण्याच्या बदल्यात शास्त्रीबुवांनी ही लाच स्वीकारली असती तर कदाचित दुटप्पीपणा म्हणता आला असता.

असो.

मजकूर संपादित. उपक्रमावर चर्चा करताना व्यक्तिगत रोखाच्या अनावश्यक वाक्यांचा वापर करू नये ही विनंती.

धन्यवाद,
संपादन मंडळ

मजकूर संपादित

व्यक्तिगत रोखाचा अनावश्यक मजकूर संपादित केला आहे याची कृपया नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.

घाई ..

मंदीरात घाई करू नये(कासवाप्रमाणे शांत असावे) अस काहीसा अर्थ असावा त्या कासवाचा.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

गमतीदार किस्से

किस्से गमतीदार आहेत.
देवळातील कासव पुष्कळदा उंबरठ्यापाशी असते. त्याबाबत दोन वेगवेगळ्या कथा ऐकलेल्या आहेत :
१. षड्रिपूंचे अकुंचन : कासव सहा अंगांचे अकुंचन करतो त्याप्रमाणे षड्रिपूंचे दमन करावे. (चार पाय, मुंडके आणि शेपटी हे सहा अवयव. सहा पायांचे नव्हे. सहा शत्रू म्हणजे षड्रिपू : काम-क्रोध-लोभ-मद-मोह-मत्सर असे असावेत. चूभूद्याघ्या.)
२. कासविणीबाबत अशी लोकोक्ती आहे, की (पलिकडच्या किनार्‍यावरून हे काही कथांमध्ये विशेष) ती पिलांकडे प्रेमाने निरखून बघते, आणि त्या दृष्टीतून पान्हा फुटल्यासारखे पिलांना दूध मिळते. तसे उत्कट निरीक्षण भक्त-आराध्यमूर्ती यांत असावे म्हणून उंबरठ्यावर कासव कोरतात.
(कासविणीचा दृष्टांत असलेले पुढील उल्लेख ज्ञानेश्वरीत सापडले :
अगा मुख मेळेंविइण । पिलियाचें पोषण । करी निरीक्षण । कूर्मी जेवीं ॥ १३.१४० ॥
डोळ्यां प्रियाची भेटी । कां पिलियां कूर्मीची दिठी । तैसीं भूतमात्रीं राहटी । मवाळ ते ॥ १६.१७० ॥
कूर्मीचिया पिलियां । दिठी पान्हा ये धनंजया । कां आकाश वाहे बापिया । घरींचें पाणी ॥ १८.१३४३ ॥
ज्ञानेश्वरीच्या पाठ्याचा स्रोत : विकीपुस्तके)

जुनाट लॉजिक

मंदिरातील कासव हे - 'कासव सहा अंगांचे अकुंचन करतो त्याप्रमाणे षड्रिपूंचे दमन करावे.' ह्यासाठी ठेवलेले असावे, असा विचार चूकीचा वाटतो.
असे कासव आपल्या शरीरातील सहा भाग आत ओढून बसलेल्या अवस्थेत कुठल्याच मंदीरात दाखवले गेलेले नसते.

तर्कसुसंगत विचार करायचा झाला तर,
कासवाच्या सहा कवचाबाहेर आलेल्या अंगाप्रमाणे मानवाने आपल्या पाच इंद्रियांच्या व सहावे इंद्रिय जे 'सदसतविवेकबुद्धी' आहे त्या अनुसार सतर्क ठेवून आपले जीवन शांतपणे, हळू-हळू व्यतीत करावे. असा करता येवू शकतो.

मंदिर हे मेरूदंडाचे प्रतीक आहे/असावे. ('मेरूदंड' हा शब्द 'मेरूपर्वत' ह्या संकल्पनेशी
जवळीक सांगण्यासाठी 'पाठीच्या कण्याला' वापरला जात असावा.)

वासना, इच्छा ह्या फणा काढलेल्या सापासारख्या असतात. त्या सापाचे मुख हे आसूरी गूण असलेल्या म्हणजेच काम-क्रोध-लोभ-मद-मोह-मत्सर यांच्याकडे असते. तर त्याचा विळखा मेरूदंडाला असून सापाचे शेपूट सदगुणांनी धरलेले असते.

'पाहिजे, पाहिजे, मला पाहिजे.', असे म्हणत असूर एखाद्या कृतीला चालना देत इच्छेचा साप आपल्या दिशेने ओढतात.
साप ओढल्यामुळे, त्याचे शेपूट धरून ते ओढत सदगुणरूपी देव म्हणतात, 'नको, नको, मला नको!'
ह्या दोन परस्पर विरोधी क्रियांमुळे मेरुदंड चक्राकारदिशेने कधी उलट तर कधी सुलट फिरत राहतो, घुसळत राहतो. ह्या घुसळवणूकीतून ज्या सागराच्या लाटा उसळतात, त्या 'विचारांच्या लहरी' असाव्यात. या विचारांच्या लहरीतून बर्‍याच गोश्टी बाहेर पडतात, असे पुराणात सांगितले आहे.
या सगळ्या प्रक्रियेतून जीवनात कधी अपयश, अपमान यांसारखे वीश मिळते, तर कधी यश, पैसा, संपत्ती यांसारखे गोश्टी मिळत जातात.

हिंदू मंदिरे ज्या संकल्पनेवर बांधलेली असतात त्या संकल्पना खूपच जुन्या युगातल्या आहेत. आजच्या काळातील घटनांचे, लोकांच्या वागण्याचे मंदिरांमधून दर्शन व्हायला हवे हि खरे. कारण हल्ली यश, पैसा, संमृद्धी ज्यांना मिळतेय, ते सगळे सदगुणी आहेत व ज्यांना मिळत नाही ते आसूरी गुणांनी युक्त आहेत, असे म्हटले तर काही खरे नाही!

किस्से आवडले.

वा किस्से आवडले! बाकी कोण रे तो म्हणतोय आजची पिढी वायफळ वेळ वाया घालवते म्हणून? ;-)

-Nile

+१

आजचीच पिढी नव्हे, आजची पिढीही वेळ वाया घालवते आणि मागची पिढीही आज वेळ वाया घालवताना आज दिसते आहे.

 
^ वर