गदर चळवळ आणि डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे
डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे (विकिपीडियावरून)

लाला हरदयाल ह्यांच्यावरील धाग्यातील गदर चळवळीच्या उल्लेखामुळे मला डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे ह्यांच्या आगळयावेगळया आयुष्याची आठवण झाली. त्याबाबत हे थोडेसे लिखाण. १९५६-५७ च्या काळात खानखोजे मेक्सिकोमधून भारतात परतले तेव्हा त्यांच्याबद्दल केसरीमध्ये बरेच लिहून आल्याचे चांगले आठवते. ते आणि जालावरून उपलब्ध होणारी महिती ह्या लिखाणात आहे.

१८८४ मध्ये जन्मलेल्या खानखोजेंचे सुरवातीचे आयुष्य वर्ध्यात गेले. १९०९ मध्ये पुढील शिक्षणासाठी ते ओरेगॉन शेती कॉलेजात गेले आणि अमेरिकेतील गदर चळवळीत त्यांचा प्रवेश झाला. पहिल्या युद्धाच्या काळात रशियापर्यंत प्रवास करून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध चळवळी करण्याचा प्रयत्न केला, परिणामतः हिन्दुस्तानात परतण्यावर सरकारने बंदी घातली. अमेरिकन सरकारलाहि हे चळवळे गैरसोयीचे होते. खानखोजे तेथून मेक्सिकोमध्ये गेले आणि वनस्पतिशास्त्र व पीक सुधारणा ह्यांवर मेक्सिकन सरकारच्या सेवेत राहून त्यांनी बरेच काम केले. तेथेच त्यांना त्यांची बेल्जियन पत्नी भेटली. डॉ. बोर्लॉगबरोबरहि त्यांचे सहकार्य होते. १९५०च्या पुढेमागे ते मेक्सिकन सरकारच्या नोकरीतून सेवानिवृत्त झाले.

भारताच्या स्वातन्त्र्यानंतर इकडे परतण्याच्या वेळी जुन्या रेकॉर्डमुळे त्यांना प्रथम प्रवेश नाकारण्यात आला पण अखेरीस १९५० च्या शतकात ते सपत्नीक नागपूरला येऊन स्थायिक झाले. त्यांच्या १९६७ मधील मृत्यूनंतर त्यांची पत्नी बरेच दिवस नागपूरमध्ये साधारण एकाकी अवस्थेत राहात होती पण नंतर तीहि मेक्सिकोला परतली. त्यांची एक मुलगी कॅनडामध्ये राहाते.

मराठीत त्यांचे चरित्र प्रसिद्ध झाले आहे असे कळले पण मी स्वत: ते वाचलेले नाही.

त्यांच्याबद्दल अधिक महिती येथे मिळेल.

१)विकिपीडिया
२)अमेरिकेतील शिक्षण
३)शेतीविषयी संशोधन
४)गदर चळवळ आणि अगदी सुरुवातीच्या काळातील अमेरिकेतील हिंदुस्तानी.

अरविंद कोल्हटकर, ऑगस्ट ०४, २०११.

लेखनविषय: दुवे:

Comments

गदर चळवळ आणि डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे

वरील लेखात `४)गदर चळवळ आणि अगदी सुरुवातीच्या काळातील अमेरिकेतील हिंदुस्तानी`हा दुवा चुकीचा पडला आहे. वस्तुतः तो असा हवा.

अरविंद कोल्हटकर, ऑगस्ट ०४, २०११.

डॉ. खानखोजे ह्यांचे चरित्र

डॉ. खानखोजे ह्यांचे चरित्र मराठीत वीणा गवाणकर ह्यांनी लिहिले आहे. डॉ. खानखोजे - नाही चिरा... असे त्या चरित्राचे नाव आहे. ह्याव्यतिरिक्त सशस्त्र क्रांतिकारकांविषयी लिहिणाऱ्या वि. श्री. जोशी ह्यांनी अग्निपथावरील परागंदा ह्या पुस्तकात डॉ. खानखोजे ह्यांच्याविषयी एक प्रकरण लिहिले आहे.

आणखी माहिती

डॉ. खानखोजे ह्यांना दोन मुली. लेखिका आणि कवयित्री माया खानखोजे मॉन्ट्रियलमध्ये राहतात. डॉ. सावित्री साहनी दिल्लीत. डॉ. सावित्री साहनी ह्यांनी त्यांच्या वडलांच्या आठवणी (I Shall Never Ask For Pardon: Memoirs of Pandurang Sadashiv Khankhoje) लिहिल्या आहेत.

ऑरेगन मराठी मंडळाचा हा दुवाही बघावा. बरीच चांगली माहिती आहे. ऑरेगनमध्ये त्यांच्या मराठी ऍक्सेन्टची कशी टिंगल केली जात असे तेही कळते.

अवांतर: खानखोजे कान्यकुब्जेचा अपभ्रंश असावा का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आभारी आहे.

माहितीबद्दल आभारी आहे.

ऑरेगन मराठी मंडळाचा हा दुवाही बघावा.

-असे तुम्हाला म्हणायचे असावे.

अवांतरः खानखोजे

अवांतर: खानखोजे कान्यकुब्जेचा अपभ्रंश असावा का?

खानखोजे आणि कान्यकुब्जेचा दूरान्वये संबंध लावण्यापेक्षा त्यांच्या घराण्यात पूर्वी कोणीतरी खानाकडे खोजा झाला असावा अशी शक्यता वाटते. - ह. घ्या.

विचारायला हवे

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे ह्यांचे मूळ घराणे कन्नौजकडील आहे किंवा नाही ह्याची खातरजमा करायला हवी. त्यांच्या कन्येचा ईमेल पत्ता उपलब्ध आहे. त्यांना विचारायला काही हरकत नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सरदार खानखोजे

नागपूरचे हर्षवर्धन निमखेडकर यानी डॉ.खानखोजे यांच्या कारकिर्दीवर लिहिलेल्या एका लेखात त्यानी 'खानखोजे' ची व्युत्पती अशी केली आहे :

"खानखोजे आडनावाला मुस्लिम टच् आहे. १८ व्या शतकात पुणे दरबारी त्याच्या पूर्वजापैकी एक 'प्रोफेशनल स्पाय किलर' अशा स्वरूपाच्या कामावर् होता. त्याच्या कामाचा एक भाग म्हणजे राज्यात छुप्या रितीने विखुरलेले अफगाणी पठाण शोधून ["खोज"] काढणे आणि त्यांचा नाश करणे. या अफगाणी पठाणांना कलेक्टिव्हली ["खान"] असे म्हणत. या खानांचा सत्ताधार्‍यांना विविध प्रकारे उपद्रव होत असल्याने त्यांचा सफाया करण्यासाठी अशी 'किलर' ची नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या या कार्याबद्दल त्याला नंतर 'सरदार खानखोजे' अशी उपाधी मिळाली.

संबंधित लिंक :

http://archiver.rootsweb.ancestry.com/th/read/INDIA-BRITISH-RAJ/2008-03/...

धन्यवाद

माहितीकरता धन्यवाद.

पुणे दरबारी त्यांना खानशोधे, खानहुडके, खानढुंढाळे अशी मराठमोळी उपाधी का मिळाली नसावी असा प्रश्न मात्र पडला. असो.

व्युत्पत्ती मजेदार

निमखेडकरांनी दिलेली व्युत्पत्ती फारच मजेदार आहे. धन्यवाद.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

थोडी वेगळी गोष्ट

वीणा गवाणकरांनी लिहीलेल्या चरित्रात खानखोजे या आडनावाची व्युत्पत्तीची गोष्ट थोडी वेगळी दिली आहे. त्यांनी त्यासाठी कोणता संदर्भ तिथेल्या तिथे दिलेला नाही. (पुस्तकाच्या शेवटी एक संदर्भ सूची आहे.) गोष्ट अशी की कोणी एक खान गोंडांना बाटवून मुसलमान करत असे. या खानाला खोजण्याची कामगिरी ज्यांना यशस्वीरित्या पार पाडली त्यांना नागपूरकर भोसल्यांनी खानखोजे अशी पदवी दिली.

प्रियाली: नागपूरकडचे हिंदाळलेले मराठी (आणि एकूणच त्या काळातला पर्शियन, हिंदी या भाषांचा मराठीवर असलेला प्रभाव) पाहता, खानखोजे हे नाव योग्य वाटतं.

धन्यवाद

चांगली माहिती आहे. धन्यवाद.

+१

चांगली माहिती आहे. धन्यवाद.

असेच बोल्तो.

-दिलीप बिरुटे

खानखोजे यांच्याबाबतची माझी एक आठवण

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे म्हणजे आमच्या, "नूतन भारत विद्यालय, अभ्यंकर नगर, नागपूर" ह्या शाळेचे, संस्थापक मुख्याध्यापक कै.श्री.म. ना. काळे, ह्यांचे मामा. स्वातंत्र्यवीर खानखोजे यांचा पुतळा आमच्या शाळेच्या मैदानात मध्यवर्ती ठिकाणी बसवलेला होता.

 
^ वर