दशरूपक

स्वप्नवासवदत्तम वरील लेखांत नाट्याचे १० प्रकार असतात असा उल्लेख मी केला होता व काही वाचकांनी ते १० प्रकार कोणते असे विचारले होते. त्यांचे कुतुहल आणखी थोडे चाळवण्यासाठी त्या १० प्रकारांची जुजबी माहिती येथे देते आहे. जेणेकरून वाचकांना कल्पना येईल, की संस्कृत साहित्यात 'नाट्य' या कलाकृतीवर केवढा विचार केला गेला होता. या लेखात दिलेली माहिती अंतीम नाही. ही तर केवळ एक सुरुवात आहे. अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांनी लेखाच्या शेवटी यादीत दिलेली पुस्तके मिळवून वाचावीत.

संस्कृत साहित्यात काव्याचे २ प्रकार मानले जातात- एक श्रव्यकाव्य, म्हणजे महाकाव्य, कथा, खंडकाव्य इ. ज्याचा मौखिक पद्धतीने प्रसार होतो व जे आताच्या काळात वाचले जाते. दुसरे आहे दृश्यकाव्य, म्हणजे नाट्य- जे आपण पाहतो व ऐकतो.

नाट्य म्हणजे एखाद्या ऐतिहासिक वा काल्पनिक व्यक्तीच्या आयुष्यातील काही नाट्यमय प्रसंगांची नाटकीय पुनर्बांधणी. हे नाटक आपल्या समोर सादर करणारे नट हे त्या मध्यवर्ती पात्राचे व त्याच्याशी संबंधित इतर पात्रांचे 'अनुकरण' करत असतात. नटांवर त्या पात्रांचा अशाप्रकारे 'आरोप' केल्याने आपल्या समोर रंगमंचावर घडणारे नाट्य हे त्या मध्यवर्ती पात्राच्या जीवनाचे 'रुपक' बनते. त्यामुळे नाट्याला 'रुपक' असे म्हटले जाते. थोडक्यात भूतकाळातल्या किंवा नाटककाराच्या कल्पनेतल्या एका व्यक्तीच्या विश्वाची प्रतिकृती म्हणजे नाट्य, असा नाट्याकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन असावा असे वाटते.

नाट्याचे कथानक काल्पनिक आहे की ऐतिहासिक, त्यातील मुख्य पात्रे समाजाच्या कुठल्या स्तरातील आहेत, मुख्य रस कोणता आहे,किती अंक आहेत अशा काही गोष्टींवर नाट्याचे पुढील १० प्रकारात वर्गीकरण केलेले आहे-

१- नाटक - कथानक 'प्रख्यात' म्हणजेच रामायण, महाभारत आदि ग्रंथांवर किंवा वेद, पुराणांवर आधारित असते. नाटकाचा नायक हा राजा असतो. वीर वा शृंगार रस मुख्य असतो. पण त्याचबरोबर इतरही काही रस थोड्या प्रमाणात वापरले जातात. अंकांची संख्या ५ ते १० इतकी असते.
नाटकांची उदाहरणे द्यायची झाली तर कालिदासाचे 'अभिज्ञानशाकुंतल' हे नाटक महाभारताच्या आदिपर्वात आलेल्या शकुंतला-दुश्यंत कथेवर आधारलेले आहे. त्यातला नायक राजा असून, त्यात ७ अंक आहेत व मुख्यरस शृंगार हा आहे. त्याच्यासोबतीने रौद्र, हास्य, करुणरस सुद्धा कमी-अधिक प्रमाणात आहेत.

२- प्रकरण - याचे कथानक काल्पनिक असते व त्यात सर्वसामान्य जनतेचे प्रतिबिंब उमटलेले असते. नायक हा कधीच राजा नसतो, तर ब्राह्मण, अमात्य किंवा व्यापारी असतो. नायिका ही एखादी कुलस्त्री किंवा गणिका असू शकते. बाकी रस व अंक नाटकाप्रमाणेच असावेत.
उदाहरण- शूद्रकाचे 'मृच्छकटिक'- यातला नायक- 'चारुदत्त' हा जन्माने ब्राह्मण तर कर्माने व्यापारी असतो. यात दोन नायिका असून एक त्याची पत्नी जी कुलस्त्री आहे व मुख्य नायिका- 'वसंतसेना' जी एक गणिका आहे.तसेच यात एकूण ३२ पात्रे असून ती राजाचा मेव्हणा ते गुलाम अशा समाजातल्या विविध स्तरांतून आलेली आहेत. यात १० अंक आहेत व शृंगार हा प्रधानरस आहे. त्याचप्रमाणे यात 'ट्रॅफिक जॅम' सारख्या दैनंदिन जीवनातल्या घडामोडींचे चित्रण आहे.

३-भाण - ही काल्पनिक कथावस्तु असलेली एकपात्री एकांकिका आहे. त्यातील एकमेव पात्र हे 'विट' म्हणजे गणिकांची दलाली करणारे पात्र असते. मुख्य रस शृंगार वा हास्य असतो. एकपात्री असल्याने 'विट' हाच स्वत:च्या संवादांबरोबरच 'काय म्हणतोस?' वगैरे शब्द वापरून इतर पात्रांचे संवादही म्हणतो. कथानकाचा मुख्य विषय हा 'धूर्तचरित्र' असतो व रंगमंचावर असलेली व नसलेली सर्वच पात्रे समाजाच्या अत्यंत खालच्या स्तरातील असतात.
उदाहरण- चतुर्भाणीतील ४ भाण- वररुचिचा 'उभयाभिसारिका', शूद्रकाचा 'पद्मप्राभृतक', ईश्वरदत्ताचा 'धूर्तविटसंवाद', आर्यश्यामिलकाचा 'पादताडितक'.

४- व्यायोग- कथानक नाटकाप्रमाणे 'प्रख्यात' असते. यातही एकच अंक असतो. २ वीरांचा संघर्ष हा त्यातील मुख्य विषय असतो व स्त्रीपात्रांची संख्या नगण्य असते. मुख्य रस अर्थातच वीर असतो.
उदाहरणार्थ- भासाचे 'मध्यमव्यायोग' ज्यात भीम व घटोत्कच यांच्यातील द्वंद्वयुद्ध चित्रित केले आहे.

५- समवकार - कथानक पौराणिक असते. त्यात ३ अंक असतात. कथेचा विषय देव- असुर यांच्यातील संग्राम असा असतो. त्यामुळे त्यात अनेक नायक, अनेक कपटे, पलायने असतात. दुसऱ्या बाजूला शृंगारही असतो. संपूर्ण नाट्याचा कालावधी १८ नाणिका एवढा असतो. (१ नाणिका = २४ मिनिटे)
उदाहरण द्यायला एकही समवकार आज उपलब्ध नाही. परंतू एका आख्यायिकेप्रमाणे भरतमुनींनी सादर केलेला 'अमृतमंथन' हा पहिलावहिला नाट्यप्रयोग समवकार प्रकाराचा होता.

६- ईहामृग - कथानक व नायक प्रख्यात असतात. ४ अंक असतात. मुख्य विषय दिव्य पुरुषांचा देवांगनांवरून चाललेला संघर्ष असा असल्याने मुख्य रस वीर. स्त्रियांचे अपहरण, मग त्यांना सोडवण्यासाठी युद्ध वगैरे प्रसंग असतात.
उदाहरण- वत्सराजाचे 'रुक्मिणीहरण'

७- डिम - कथानक प्रख्यात. एकूण १६ नायक व ते सर्व देव, गंधर्व, यक्ष, राक्षस असे अतिमानुष असतात. हे नाट्यही संघर्षाधारित असल्याने वीर व रौद्र रसप्रधान.
उदाहरण- एकही उपलब्ध नाही. परंतू आधि उल्लेखिलेल्या आख्यायिकेप्रमाणे भरतमुनींनी भगवान शंकरासमोर 'त्रिपुरदाह' या डिमाचा प्रयोग केला होता.

८- उत्सृष्टिकांक - करुणरसप्रधान एकांक. याचे कथानक प्रख्यात, कल्पित, मिश्र कसेही असू शकते व ते युद्धाशी संबंधित असते. मुख्य पात्र हे एका मर्त्य पुरुषाचे असते व एकूणच नाटकात वाग्युद्ध, पश्चात्तापयुक्त बोलणे, स्त्रीयांचा विलाप वगैरे असते.
उदाहरण- भासाने या नाट्यप्रकाराच्या मांडणीतून २ सुंदर शोकांतिका लिहिल्या आहेत- उरुभंग व कर्णभार. (संस्कृत साहित्यात ह्या दोन एकांकिका सोडता एकही शोकांतिका नाही.)

९- वीथी - कल्पित कथानक असलेली ही एक एकांकिका असते. यात १ किंवा २च पात्रे असतात. त्यात प्रणयप्रसंगांचे चित्रण असल्याने मुख्य रस शृंगार असतो.
उदाहरण- 'मालविका' या वीथीचा उल्लेख सापडतो, परंतू ती उपलब्ध नाही.

१०- प्रहसन - पुन्हा एकांकिका. कथानक कल्पित किंवा कल्पना व वास्तव यांचे मिश्रण सुद्धा असू शकते. हा नाट्यप्रकार मात्र हास्यरसप्रधान असल्याने त्यात हास्यरसाच्या विविध छटा पहायला मिळतात. हास्यरस निर्माण करण्यासाठी श्लेषपूर्ण वाक्यरचना, आंगिक अभिनय वगैरे क्लृप्त्या वापरल्या जातात. यातील पात्रांच्या सामाजिक स्तरानुसार प्रहसनाचे शुद्ध (साधू, ब्राह्मण), संकीर्ण (गुंड, वेश्या, दलाल), विकृत (षंढ, प्रेमात पडलेले संन्यासी) असे ३ प्रकार पडतात.
उदाहरण- बौधायनाचे 'भगवदज्जुकीय'.

असे हे नाट्याचे १० प्रकार आहेत. वर वर थोडेफार सारखे वाटले तरी त्यातील एखाद्याच वेगळ्या अटीमुळे नाट्याच्या सादरीकरणात बराच फरक पडू शकतो. उदाहरणार्थ यात अनेक एकांकिका आहेत. परंतू प्रहसन हास्यप्रधान आहे, वीथी शृंगारप्रधान, उत्सृष्टिकांक करुणरसप्रधान, व्यायोग वीररसप्रधान असतो व भाण हा एकांकी एकपात्री असल्याने या सर्वांहून पुन्हा वेगळा पडतो.

यांतला नाटक हा प्रकार सर्वाधिक लोकप्रिय आहे. कालिदासाच्या तीनही नाट्यकृती 'नाटक' या प्रकारातच मोडतात.

यापुढे जाऊन नाट्यशास्त्र अभिनयाचे प्रकार सांगते, नायक म्हणजे आजच्या भाषेत 'हीरो' चे, व 'हीरॉईन'चेही प्रकार सांगते. कोणत्या पात्रांनी कोणत्या भाषेत बोलावे, त्यांची वेशभूषा, केशभूषा कशी असावी, रंगमंचाची आखणी कशी करावी, एखाद्या विशिष्ट प्रसंगासाठी रंगमंचात काय बदल करावेत, प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था कशी असावी हे सर्व सांगते. याशिवाय नाट्यदर्पण, साहित्यदर्पण, दशरूपक असे आणखी काही ग्रंथही आहेत.

खरे म्हणजे ह्या विषयाबद्दल मला फार म्हणजे फार म्हणजे फारच कमी माहिती आहे. त्यामुळे अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मी काही पुस्तकांची नावे देते आहे. ही पुस्तके तुमचा नाट्यशास्त्रात प्रवेश करून देतील मग त्यातून माहिती झाल्यावर आपण पुढे पुढे आणखी मिळतील तशी पुस्तके वाचू शकता.
१- अभिजात संस्कृत साहित्याचा इतिहास - लेखिका- डॉ. मंजूषा गोखले, डॉ. गौरी माहुलीकर, डॉ. उमा वैद्य.
२- संस्कृतीकोश
३- Theatric Aspects of Sanskrit Drama- G.K.Bhat
४- संस्कृत वाङ्मयाचा सोपपत्तिक इतिहास- करंबेळकर
५- संस्कृत नाटके व नाटककार- गो.के. भट

लेखनविषय: दुवे:

Comments

वा!

उत्तम माहिती. लेख आवडला, असे अधिक येऊ दे.

नाटक आणि प्रकरण सोडून इतर प्रकारांचे शाब्दिक अर्थ देणे शक्य आहे का? (म्हणजे व्यायोग शब्दाचा शब्दशः अर्थ)

या नाटकांत प्रत्येक अंकाचा अंदाजे कालावधी किती याबाबत काही सांगता येईल का?

सही

खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

नेहेमीप्रमाणे काही प्रश्नही पडले -
हे नाट्याचे १० प्रकार कोणी पाडले ?
काही नाट्याचे प्रकार उपलब्ध आहेत, पण त्यामध्ये काही लिहिले गेले नाहिये (उदा - डिम, विथी) त्याअर्थी हे प्रकार खूप आधी पाडले गेलेत. म्हणजे ही फक्त थिअरी आहे का?
ह्या कशातच न बसणारे नाट्य कोणीच लिहिले नाही काय?

धन्यवाद!

नाट्य या विषयावर आपल्या संस्कृत साहित्यात इतका सखोल,सांगोपांग आणि विश्लेषणात्मक विचार केला गेला आहे याची कल्पनाच नव्हती. कालिदास,भास,इत्यादि कवींची आणि त्यांच्या कांही रचनांची नांवे ज्ञात होती. एका जर्मन साहित्यिकाने 'शाकुंतल' डोक्यावर घेतले एवढे वाचले होते. पण संस्कृत कवींनी नाट्य हे परिपूर्ण शास्त्रच निर्माण केले होते हे गावी नव्हते.राधिका यांनी मोजक्या शब्दांत या शास्त्राचे ईषत् दर्शन घडविले. त्याप्रीत्यर्थ त्यांचे मनःपूर्वक आभार.
........यनावाला.

शाकुंतल

एका जर्मन साहित्यिकाने 'शाकुंतल' डोक्यावर घेतले एवढे वाचले होते.

तो साहित्यिक म्हणजे गटे . (उच्चार बरोबर असावा अशी आशा करतो.)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

उत्तम

रूपकप्रकारांची माहिती देणारा लेख आवडला. उदाहरणे आणि संदर्भ यांमुळे लेख अधिक वाचनीय झाला आहे.
(शुद्धलेखनाच्या चुका काही प्रमाणात आहेत. उदाहरणार्थ स्त्रीयांचे नव्हे, स्त्रियांचे हवे. कुलस्त्री हवे, कूलस्त्री नको, वगैरे. प्रतिसाद आल्यानंतरही लेख संपादित करणे शक्य असल्यास जरूर करावा. )

अगदी असेच...

... म्हणावेसे वाटले.

लेखानंतर तत्परतेने प्रतिसादांतून राधिकाताईंनी केलेले शंकानिरसनही आवडले.

सुंदर लेख

लेख खूप आवडला. असे सर्व वर्गीकरण करण्याइतपत विविधता असल्याने नाट्यकलेला चांगले दिवस असावेत असे वाटते.

चित्रा

असेच

चित्रा यांच्याशी सहमत. वर्गीकरण आहे म्हणजे सार्‍या प्रकारातली, तसेच काही प्रकारात न बसणारी बरीच नाट्ये लिहिली गेली असणार. कालौघात हरवली. असो, नाट्यशास्त्राची माहिती देणारे साहित्य उपलब्ध आहे, हेही नसे थोडके.

उत्तम लेख

उत्तम लेख, संग्रहित (बुकमार्क) करून ठेवण्यासारखा. वरील प्रतिसादींशी सहमत.

लय भारी...

राधिका,

तुझा लेख लई भारी अन् अभ्यासपूर्ण वाटला. बहोत अच्छे..
अजूनही अवश्य लिही...

तात्या.

अवांतर -

१- अभिजात संस्कृत साहित्याचा इतिहास - लेखिका- डॉ. मंजूषा गोखले, डॉ. गौरी माहुलीकर, डॉ. उमा वैद्य.

डॉ मंजुषा गोखले यांच्याबरोबर मी एक लहानसा सांगितिक कार्यक्रम केला होता. मेघदूत आणि ऋतुसंहार यातल्या काही श्लोकांना रागदारी संगीतात बद्ध केले होते.

येत्या कालिदास दिनाच्या दिवशी आम्ही अजून एक दृकश्राव्य कार्यक्रम करणार आहोत. डॉ गोखले तेव्हा आम्हाला काही स्लाईडस् पुरवणार आहेत. कालिदासाच्या मेघदूतातील अजून काही श्लोकांना मी रागदारी संगीतात बद्ध केले आहे. तू या कार्यक्रमास अवश्य यावंस असं वाटतं.

तात्या.

उत्तम

नाट्यप्रकाराची ओळख करुन देणारा उत्तम लेख. लेखात म्हटल्याप्रमाणे यावर किती खोलवर विचार केला होता याचा प्रत्यय येतो.
पाश्चात्य नाट्यप्रकारात ट्रॅजेडी हा प्रकार विशेष लोकप्रिय होता (आधी ग्रीक संस्कृती आणि नंतर शेक्सपिअर). आपल्याकडे याच्याशी साधर्म्य असणारा नाट्यप्रकार होता का?

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

धन्यवाद/ उत्तरे

सर्वप्रथम सर्व प्रतिसादींना धन्यवाद.

शुद्धलेखनाच्या चुका काही प्रमाणात आहेत

पुढील वेळेपासून त्या टाळण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करीन. चूका दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. उपक्रमराव त्या चूका दुरुस्त करतील काय? येथे संपादनाचा पर्याय दिसत नाही आहे.

कालिदास दिनाच्या दिवशी आम्ही अजून एक दृकश्राव्य कार्यक्रम करणार आहोत.

अरे वा. आपल्याला त्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा! कृपया तारीख, वेळ, स्थळ सांगावे.

नाटक आणि प्रकरण सोडून इतर प्रकारांचे शाब्दिक अर्थ देणे शक्य आहे का?

हो.
व्यायोग- वि+आ+युज्- विशेषेण आयुज्यन्ते पात्राणि यत्र|
ईहामृग- ईह् हा धातू- अभिलाषा, इच्छा.
डिम- डिम् हा धातू- इजा करणे हानी पोचवणे
प्रहसन- यात अर्थातच हस् धातू असणार.

या नाटकांत प्रत्येक अंकाचा अंदाजे कालावधी किती याबाबत काही सांगता येईल का?

नाही.

हे नाट्याचे १० प्रकार कोणी पाडले ?

नक्की कोणी पाडले ते मला तरी किमान सांगता येणार नाही. परंतू भरताच्या नाट्यशास्त्रापासून हे १० प्रकार सर्व साहित्यग्रंथांनी मानले असे कुठेतरी वाचल्याचे अंधूक स्मरते.
काही शास्त्रकार तर २५-३० रूपके मानतात. उदाहरणार्थ- नाटकाची सर्व लक्षणे असलेले एखादे नाटक जर ४च अंकी असेल, तर त्याला नाटिका म्हणत. आणि ते प्राकृत भाषेत असेल, तर त्याला सट्टक म्हणत. वगैरे वगैरे.

म्हणजे ही फक्त थिअरी आहे का?

असेलही कदाचित. पण मला वाटते तसे नसावे. त्याकाळची प्रचलित नाटके लक्षात घेऊन मग नायक, रस, कथानक, अंकसंख्या इ. गोष्टींचा नाटकांच्या आराखड्यावर व रसनिष्पत्तीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन हे वर्गीकरण केले असावे. यातल्या काही प्रकारांची उदाहरणे सापडली नाहीत, तर त्यात वावगे काहीच नाही. लेखनपद्धती अस्तित्त्वात येण्यापूर्वी जर काही नाटके सादर केली गेली असतील, तर ती कालौघात विसरलीही गेली असतील. शिवाय नालंदा- तक्षशीला वगैरे विद्यापीठांतील पुस्तके जळून गेल्याचेही तुम्ही जाणत असालच. त्यात आपले बरेच साहित्यवैभव भस्मसात झाले आहे. त्यामुळे त्या प्रकाराची नाटके अस्तित्त्वात नसतीलच असे छातीठोकपणे सांगता येणार नाही.

ह्या कशातच न बसणारे नाट्य कोणीच लिहिले नाही काय?

मगाशी म्हटल्याप्रमाणे इतरही काही 'उप'रूपके होती, जी वरील प्रकारांशी तंतोतंत जुळत नसावीत. त्यामुळे या कशातच न बसणार्‍या नाटकांची संख्याही लक्षणीय असावी. मी लेखात म्हटल्याप्रमाणे भासाने 'उरुभंग' हे नाटक 'उत्सृष्टीकांक' या प्रकाराच्या मांडणीतून सादर केले. अशी वेगळी वाक्यरचना करण्याचे कारण हे, की उरुभंग हे पूर्णपणे उत्सृष्टीकांक प्रकारात बसत नाही. कारण एकच- संस्कृत नाट्यशास्त्राने रंगमंचावर एकही मृत्यू दाखवायचा नाही असा नियम घालून दिला आहे. शोकांतिकेत मात्र मुख्य पात्राचा मृत्यू ही महत्त्वाची घटना आहे. उरुभंगातील नायक- दुर्योधन हा नाटकाच्या शेवटी मृत्यू पावतो. त्यामुळे तसे पहायला गेल्यास हे नाटक कोणत्याच नाट्यप्रकारात बसत नाही.

पाश्चात्य नाट्यप्रकारात ट्रॅजेडी हा प्रकार विशेष लोकप्रिय होता (आधी ग्रीक संस्कृती आणि नंतर शेक्सपिअर). आपल्याकडे याच्याशी साधर्म्य असणारा नाट्यप्रकार होता का?

अखंड (उपलब्ध, कारण अनुपलब्ध नाटकांविषयी काहीच माहिती नाही ) संस्कृत साहित्यात उरुभंग व कर्णभार या दोनच शोकांतिका आहेत. त्यातही उरुभंग ही तांत्रिकदृष्ट्या व आशयदृष्ट्याही शोकांतिका आहे, कारण मुख्य पात्राचा मृत्यू रंगमंचावरच होतो. कर्णभार मात्र केवळ आशयदृष्ट्याच शोकांतिका मानली जाते, कारण कर्ण प्रत्यक्ष रंगभूमीवर मृत्यू पावत नाही. त्याचा मृत्यू केवळ सूचित केला गेला आहे.

राधिका

धन्यवाद

नेहेमीप्रमाणे जरा जास्तच प्रश्न पडले होते, त्यांची न कंटाळता सविस्तर उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद.

संस्कृत नाट्यशास्त्राने रंगमंचावर एकही मृत्यू दाखवायचा नाही असा नियम घालून दिला आहे.

हे वाचून गंमतही वाटली आणि धक्का पण बसला !! शोकांतिका म्हणजे आधी मृत्यू आठवतो !

एनीवे, खूपच छान लेख आणि उत्तरे ! पुढच्या लेखाची वाट पहात आहे.

उत्तम माहिती .

उत्तम माहिती. लेख आवडला,
डॉ. उमा वैद्य.यांची दोन व्याख्याने दोन दोन तासाची ऐकली आहेत. त्या उत्तम व्याख्यत्या आहेत.व्याख्यान कसे असावे हे त्यांच्याकडून शिकावे. त्या भेटल्यात तर नमस्कार, सांगा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखाविषई थोडे

प्रतिसाद लिहिणे सराव नसल्यामुळे अवघड जात आहे क्शम़स्व

अनभिद्न्य

आणखी संदर्भग्रंथ

Padmakar Dadegaonkar
अधिक अभ्यास करू इच्छिणार्‍यांसाठी-
१) दशरूपकविधान आणि २) रसभावविचार - संपादक र.पं. कंगले,साहित्य संस्कृति मंडळ
३) रसचर्चा - पद्माकर दादेगावकर. पॉप्युलर प्रकाशन
आपला रससिद्धांत साहित्यकृतीच्या समीक्षेमधला जगातला एक सर्वोत्कृष्ट सिद्धांत असल्याची कबुली पाश्चात्यांनीही दिली आहे. राधिकाताईंनी या विषयाचीही अशीच सोपी माहिती द्यावी अशी विनंती. सुंदर लेख आणि उद्बोधक चर्चा.
-पद्माकर दादेगावकर

धन्यवाद

पुस्तकांची नावे सुचवल्याबद्दल धन्यवाद. माझा रससिद्धांताचा काहीच अभ्यास नाही, त्यामुळे मला त्या विषयावर लेखन करणे शक्य नाही. परंतू आपल्यासारख्या जाणकार व्यक्तीकडून त्या संदर्भातला लेख वाचायला नक्कीच आवडेल.

राधिका

आणखी

Padmakar Dadegaonkar
मीच लिहिले असते, पण सध्या एका पुस्तकाच्या लेखनात व्यग्र असल्यामुळे सहा महिने तरी वेळ नाही.

 
^ वर