भगवद्गीता

भगवद्गीता हे सर्व भारतीय तत्त्वज्ञान अर्कस्वरूपाने सांगणारा ग्रंथ आहे हे आपण जाणतोच. (गीताध्यानः सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः| पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्|). ह्यापलीकडे जाऊन गीतेमध्ये आधुनिक काळाचेहि संदर्भ सापडतात हे आपल्या चटकन ध्यानात येत नाही. त्याचे काही उल्लेख पुढीलप्रमाणे:

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन - कर्म करत राहाणे एव्हढेच काय ते तुझ्या आधीन आहे. त्याचे फळ नेहमीच मिळेल असे नाही. कधीकधी चण्यावरहि भागवावे लागेल.

बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन - माझे अनेक जन्म होऊन गेले आहेत. अर्जुना. तू मात्र अलीकडचा ४ जूनचा आहेस.

सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो - सगळ्यांच्या हृदयात स्थित असलेले चहा आणि स्टोव्ह मीच आहे.

पुढील उल्लेख एका गोष्टीतून दिसतो.

स्वातन्त्र्यपूर्व काळात एका विद्वान् प्राध्यापकांनी गीतेवर एक विद्वत्ताप्रचुर पुस्तक लिहिले आणि ते छापण्यासाठी कोणी भांडवल पुरवेल काय असा शोध ते घेऊ लागले. तत्कालीन प्रथेनुसार अनेक श्रीमंत लोकांकडे त्यांनी याचना केली पण कोणी काही देईना. असेच ते महाराष्ट्रातल्या एका संस्थानात जाऊन पोहोचले आणि राजेसाहेबांची भेट घेऊन अनेक मार्गांनी राजेसाहेबांचे मन वळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण रामा शिवा गोविंदा! राजेसाहेब काही होकार देईनात.

विद्वान् प्राध्यापकांना माहीत होते की आपल्या दरबारातील मोहिते नामक सरदाराचे आणि राजेसाहेबांचे मुळीच पटत नाही. त्यांनी मोहिते कार्ड खेळायचे ठरविले.

ते म्हणाले, " महाराज, हा गीताग्रंथ इतका चांगला आहे की त्याला मोहिते हे नाव अजिबात आवडत नाही." "ते कसे?" महाराज म्हणाले. प्राध्यापकः "हे पहा. ७व्या अध्यायात स्पष्ट लिहिले आहे - त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभि: सर्वमिदं जगत्| मोहितं नाभिजानाति मामेभ्य: परमव्ययम्|| 'मी त्या दूष्ट मोहित्याला बिलकुल ओळखत नाही' असे म्हणते गीता. महाराजः "काय सांगता? मग तो ग्रंथ उत्तमच असला पाहिजे. (जवळ उभ्या असलेल्या कारभार्‍यांना उद्देशून) कारभारी, पुस्तक छापायचा जो काही खर्च असेल तो प्राध्यापकांना लगेच अदा करा आणि शंभर प्रति आपल्या संस्थानातल्या शाळांमध्या वाटण्यासाठी खरेदी करा."

अरविंद कोल्हटकर, जुलै २७, २०११.

लेखनविषय: दुवे:

Comments

४ जुन :)

>> चार्जुन -- तू मात्र अलीकडचा ४ जूनचा आहेस ...
भारी !!

---------------------
-धनंजय कुलकर्णी

वि.आ. बुवांचा अर्थ

वि.आ. बुवांनी लावलेला अर्थ थोडासा वेगळा आहे. हे अर्जुना, पुष्कळ मे महिने उलटून गेले तेव्हा कुठे चार जूनला तुझा जन्म झाला. --वाचक्नवी

अधिक गमतीदार

वि. आ. बुवांनी लावलेला अनर्थ अधिक गमतीदार आहे.

?

तुम्ही सुरूवात चांगली केली होती. अचानक काय झाले?

?

'फक्त' मनोरंजनात्मकपर लेख ललित गणले जावेत का?

-१

'फक्त' मनोरंजनात्मकपर लेख ललित गणले जावेत का?

या लेखातून संस्कृत (किंवा एखादी भाषा) न कळणार्‍या लोकांनी ऐच्छिक भाषांतरे करून गंमत केल्याचे दिसते. यावर चांगली चर्चा होऊ शकेल.

तरीही, कोल्हटकरांच्या इतर लेखांप्रमाणे हा लेख मला नावीन्यपूर्ण , माहितीपूर्ण वाटला नाही; विशेष आवडलाही नाही हे नमूद करेन.

सहमत

सहमत.

तशीच चर्चा कोब्याच्या कवितेवरही शक्य होती. :)

-१

तशीच चर्चा कोब्याच्या कवितेवरही शक्य होती. :)

असे वाटत नाही.

??

>>लोकांनी ऐच्छिक भाषांतरे करून गंमत केल्याचे दिसते. यावर चांगली चर्चा होऊ शकेल.

हे वाक्य कुठेही चपखल बसू शकते..नाही ? :)

नाही.

हे वाक्य कुठेही चपखल बसू शकते..नाही ? :)

नाही, हे वाक्य फक्त जेथे भाषांतरे होतात/ केली जातात आणि त्यातून गंमत निर्माण होते तेथेच चपखल बसू शकते.

शब्दछळ

कवितेचा ऐच्छिक अर्थ देखील काढता येऊ शकतो, त्यातून देखील गंमत निर्माण होऊ शकते, त्यावर चर्चा देखील चालूच होती.

असो, उपक्रम हे खाजगी संस्थळ आहे. :)

वाद कशाला?

उपक्रम हे खाजगी संस्थळ आहे. :)

हे माहित आहे तर मग वाद कशाला? तिरपे प्रतिसाद देऊन अवांतर कशाला? आणि उगीच वेळ वाया कशाला?

मी तरी रजा घेते.

तमसो मा जोतिर्गमय

उत्तम आधुनिक संदर्भ आहेत. आपले वेद, पुराण आणि धार्मिक ग्रंथ सर्व विद्यांचे आगरे आहेत.
ह्यावरून आठवले, की 'तमसो मा जोतिर्गमय'ह्याचा अर्थ खरे तर तुझी आई जोतिबाला गेली असा आहे. आमच्या महाविद्यालयात हा अर्थ प्रचलित होता.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

तमसो मा जोतिर्गमय

हिंदी मध्ये हा अर्थ प्रचलित आहे - तुम सो मा, मै ज्योतीके पास जाता हूं।

पयसा कमलेन...

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.अरविंद कोल्हटकर यांच्या लेखातील ".....जन्मानि तव चार्जुन.." आणि "सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो.." यांची विपरीत अर्थ वि.आ.बुवा यांनी लिहिले असावे(माझ्या समजुती प्रमाणे.मोहित्यांसंबंधीचा किस्सा प्रथमच वाचला.
शाळेत दहावीच्या सहामाही परीक्षेत संस्कृतभाषेच्या प्रश्नपत्रिकेत मराठीत अर्थ लिहिण्यासाठी पुढील सुभाषेत दिले होते.
.........कमले कमला शेते हरः शेते हिमालये|
.........क्षीराब्धौच हरि: शेते मन्ये मत्कुण शंकया|

काही विद्यार्थ्यांनी लिहिलेले अर्थ शिक्षकांनी वर्गात वाचून दाखवले.त्यांतील एक अजूनही स्मरतो तो असा:---
..."कमले गावात कमळाची शेते आहेत.हिमालयावर हिरवीगार शेते आहेत.तसेच कुठल्याशा त्या गावात हरी भरी शेते धो धो (खूप खूप) आहेत.याविषयी कुणाच्या मनात शंका नको."
...पण "पयसा कमलेन विभाति सरः" याचा श्री.सहज यांनी लावलेला अर्थ: --
...पण "पयसा कमलेन विभाति सरः" याचा श्री.सहज यांनी जो अर्थ लावला आहे
"[पयसा कमलेन विभाति सर:। हे राणीच्या बागेत म्हणजे कोणीतरी नव्या इश्टाईल मधे "सर, हे कमळ घेतलेत तर लै पैसा लाभेल व भिती (भय) पण सरेल (जाईल)" असे संस्कृतात सांगत लकी चार्म म्हणून कमळ विकतोय असे वाटते.]

» तो म्हणजे या सर्वांवर कडी आहे.

नि:शेष जाड्या पहा

या कुन्देन्दु तुषार हार धवला .... नि:शेष जाड्यापहा

कदाचीत

कदाचीत म्हणूनच, "... कालचा गोंधळ बरा होता", अशी म्हण आली असावी. ;)

बाकी यावरून अजून दोन आठवणी आल्या:

गोट्या मालीकेत "कर्मण्येवाधिकारस्ते" याचा अर्थ तो शाळेत "कर्मावरून रस्त्यात वाद का घालायचा" हे सांगतो.

"आओ बच्चो तुम्हे दिखाए झांकी हिंदूस्थान की, इस मिट्टीसे तिलककरोये धर्ती है बलीदान की" ह्या गाण्याचा अर्थ एकाने सांगता, "ज्या मातीत टिळक रडले..." असे म्हणत सांगायला सुरवात केली आणि मास्तरांकडून मार खाल्ला.

मार खाणे

>>> "ज्या मातीत टिळक रडले..." असे म्हणत सांगायला सुरवात केली आणि मास्तरांकडून मार खाल्ला. <<<

~ इथे पु.लं.च्या एका लेखाची लागलीच आठवण झाली. "बिगरी ते मॅट्रीक : एक भारी बिकट वाट". वर्गात भूगोलच्या मास्तरांनी सदैव सुषुम्नावस्थेत असलेल्य पु.लं.च्या वर्गमित्राला हलवून जागे केले आणि विचारले, "मसाल्याची बेटे कोणती ?" त्यावर अजूनही अर्धवट झोपेत असलेला तो मित्र उत्तरला, "बेडेकर आणि कुबल". यावर मास्तरांनी त्यालाच कुबल कुबल कुबलला. वास्तविक पुढील आयुष्यात त्या मित्राला संसारासाठी तीच माहिती उपयुक्त ठरणार होती, पण नाही. मास्तराना त्याचे काही सोयरसुतक नव्हते.

स्त्रियश्चरित्रं ....

स्त्रियश्चरित्रं पुरूषस्य भाग्यं, देवो न जानाति कुतो मनुष्य:

ह्याचा सरळ अर्थः स्त्रियांचे चरित्र पाहता पुरूष पळून जातात. जिथे देवही जात नाहीत तिथे माणसे जातीलच कशी!

 
^ वर