सातारा गावाची घडण

एस्.एस्.सी.पर्यंतचे माझे शिक्षण सातारा ह्या ऐतिहासिक गावी झाले. माझ्या आठवणीतल्या सातारा गावाची रचना कशी होत गेली असावी ह्याविषयीचे माझे काही विचार स्थूलमानाने मांडत आहे. माझे एक नातेवाईक कै. गो.रा.माटे ह्यांनी सुमारे १५-२० वर्षांपूर्वी 'असा घडला सातारा' नावाचे एक पुस्तक लिहिले होते. खाली मांडलेले विचार त्यातहि नाहीत असे मला वाटते. अर्थत् मी हे केवळ स्मरणाने लिहीत आहे. प्रस्तुत पुस्तक आता मला उपलब्ध होणे जवळजवळ दुरापास्त आहे.

सातारा
सातारा

छत्रपति शाहू ह्यांनी राजधानीचा दर्जा देईपर्यंत सातार्‍याला इतिहासात काही खास स्थान नसावे. गाव राष्ट्रकूटकालीन एका किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. ह्या किल्ल्यालाहि सातारचा किल्ला ह्याशिवाय अन्य नाव नसावे. बहुधा काही खास वस्तीहि नसावी. शाहूने हे गाव निवडण्यामागे दोन प्रमुख कारणे म्हणजे द़क्षिण आणि पश्चिम बाजूला उंच डोंगरांचे नैसर्गिक संरक्षण आणि सातारच्या किल्ल्यावर अन्य बहुसंख्य किल्ल्यांपेक्षा तुलनेने बरीच सपाट जागा असणे हे असावे.

अजिमतारा
अजिमतारा

औरंगजेबाच्या दक्खन मोहिमेत २१ एप्रिल १७०० ह्या दिवशी मुघल सैन्याने किल्ला काबीज केला आणि त्याला बादशाहाचा एक मुलगा अझमशाह ह्याच्यावरून अझमतारा नाव देण्यात आले. (लवकरच परळीचा किल्ला, आजचा सज्जनगडहि बादशाही सैन्याने जिंकला आणि त्याचे नामकरण नवरसतारा असे करण्यात आले. दोनहि किल्ले काही वर्षांनंतर पुनः मराठ्यांनी परत मिळविले.) नंतरच्या काळात हे नाव बदलत जाऊन अजिमतारा असे झाले. इतिहासानभिज्ञ लोकांनी त्याला आता अजिंक्यतारा असे 'विजयी' नाव दिले आहे.

शाहू आला तेव्हा तेथे मूळची वस्ती, रस्ते इत्यदि फार थोडे असावेत. किल्ल्याच्या पायथ्याशी शाहूने आपल्या स्वत:साठी एक वाडा बांधला. १९व्या शतकातच आगीने जळून गेलेला रंगमहाल नावाचा वाडा तोच असावा. वरील नकाशात पूर्वेकडून दक्षिणपश्चिमेच्या दिशेने किल्ल्याच्या पायथ्यापायथ्याने जाणारा रस्ता आणि त्याच्या जवळचे अन्य लहान रस्ते तेव्हाच निर्माण झाले असावेत. रंगमहाल आणि कचेरीची जागा 'अदालकीचा वाडा' (बहुधा 'अदालतीचा' वाडा) ह्या रस्त्यावरच आहेत. हा दुसरा वाडा अजूनहि उभा आहे. पहिल्यापहिल्या पेशवाईच्या दिवसात पेशव्यांचा मुक्काम खूपदा सातार्‍यात होत असे तेव्हा पेशवे अदालकीच्या वाड्यातच रहात असत. शाहूच्या कारकीर्दीच्या पहिल्यावहिल्या दिवसात एवढीच सातारची व्याप्ति असावी.

तदनंतर छत्रपतींच्या वास्तव्यामुळे त्यांचे अष्टप्रधान आणि सातारा गादीशी संबंधित असलेले सरदार ह्यांचे वाडे उभे राहिले. फडणीस वाडा, पंतसचिव वाडा असे त्यांपैकी काही अजूनहि उभे आहेत

अष्टीच्या लढाईत पेशवे सैन्याचा पराभव झाल्यामुळे त्यावेळचे छत्रपति प्रतापसिंह इंग्रजांच्या आश्रयाला आले आणि इंग्रजांनी नीरा आणि वारणा ह्यामधील मुलुख त्याच्या ताब्यात देऊन इंग्रजी देखरेखीखाली नव्या राज्याची स्थापना केली. हे राज्य इंग्रजांना सोयीस्कर वाटले तोपर्यंत टिकून राहिले. नंतरच्या काळात इंग्रजांना वाटले तेव्हा वारस नाही ह्या सबबीखाली झाशी सारखेच सातारचे राज्यहि जप्त झाले.

ह्या काळात सातार्‍यात इंग्रज रेसिडेंट असे आणि इंग्रज पलटणहि सातार्‍यात तैनात होती. वरील नकाशात उजव्या कडेला वरच्या बाजूला काही रस्ते मिळत आहेत. त्यास पवईचा (पाणपोईचा) नाका म्हणतात. नाक्याच्या पूर्वेस आणि उत्तरेस कँपमध्ये हे इंग्रज राहात असत. नंतर रेसिडेंट गेला आणि पलटणहि गेली, फक्त सातारा कँप हे नाव आणि काही इंग्रजी पद्द्धतीचे बंगले टिकून आहेत. पवई नाक्याच्या जवळच डाव्या बाजूला इंग्रजांची दफनभूमि होती. त्यातील अनेक कबरींवरचे लेख मी पूर्वी वाचलेले होते, उदा. वेण्णेच्या पुरात वाहून गेलेल्या २२ वर्षांच्या तरुणचा स्मृतिलेख. आज दफनभूमीची भिंत उभी आहे पण एकूणएक लेख गायब झाले आहेत. संगमरवर किंवा घडीव दगडांसाठी त्यांच्या चोर्‍या झाल्या असाव्यात.

मराठ्यांचा इतिहास प्रथम सुसंगतपणे लिहिण्यचे काम ग्रँट डफने सातार्‍यात रेसिडेंट असताना केले. त्यावेळी छत्रपतींच्या दप्तरखान्याचा त्याने खूप उपयोग केला. बादशाही मुलखात चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करण्याचा अधिकार बहाल करणारी सनद त्याने स्वतः पाहिली होती पण ऐतिहासिक महत्त्वाचा हा दस्तऐवज तेव्हापासून कोठे गहाळ झाला आहे तेच कळत नाही.

ह्या काळात सातार्‍याची गाव म्हणून खूप सुधारणा झाली. अठरा कारखाने निर्माण झाले. पैकी उष्टारखाना, फरासखाना, हत्तीखाना आमच्या वेळेपर्यंततरी व्यवस्थित उभे होते. त्यांचा वापर बदलला होता. उदा. माझी म्युनिसिपल शाळा नं. १३ फरासखान्यात भरत असे. हत्तीखान्यात एक हत्ती असे.

ह्या सुधारणांपैकी विशेष म्हणजे नवीन रस्त्यांची आखणी आणि बांधणी. उष्टारखान्यापासून राजवाड्यापर्यंत जाणारा दोनअडीच किलोमीटर लांबीचा सरळ आणि रुंद रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूंस पायी चालणार्‍यांसाठी रुंद फूटपाथ (ते रस्त्यापासून खालच्या पातळीवर होते), त्याच्या अखेरीस उद्यान, त्याच्यापासून उत्तरेकडे काटकोनात निघणारा प्रतापगंज रस्ता, ४५ अंशाच्या कोनात पूर्वेकडे निघणारा सदाशिव पेठ रस्ता, राजपथावर पाण्यासाठी कमानी हौद,पश्चिमेस पंतसचिव श्रीपतराव ह्यांनी बांधलेले श्रीपतरावचे तळे अशा गोष्टींवर खास आखणी असल्याची छाप स्पष्ट दिसते. ह्या प्रमुख रस्त्यांना धरून आणखी रस्ते आणि पेठा वाढत्या गावाला सामावून घेण्यासाठी निर्माण झाले.

ह्याच काळात छत्रपतींच्या राहण्यासाठी राजपथाच्या दुसर्‍या टोकाला राजवाडा आणि राजपथावर दिवाण महाजनी ह्यांचा वाडा असे वाडे बांधण्यात आला. अजूनहि ते शिल्लक आहेत. शेजारीच कचेर्‍यांसाठी तीन मजली नवा राजवाडा आणि थोडे पलीकडे भवानीदेवीसाठी जलमंदिर देऊळ तयार झाले. ह्या दोहोंचे १८५८ साली बार्टन नावाच्या प्रवाशाने घेतलेले फोटो त्याचे आताच्या काळातले वंशज आणि माझे इंटरनेटमित्र निकोलस बामर ह्यांनी मला पाठविले ते माझ्या संग्रहातून खाली दाखवीत आहे.

नवा राजवाडा
नवा राजवाडा
जलमंदिर
जलमंदिर

दोन्ही वास्तु आज तशाच ओळखता येतात. जलमंदिर रस्त्याची सुशोभित भिंत थोड्या पडझड अवस्थेत तशीच आहे. जलमंदिराबाहेरची बाग मात्र आता नाही, तेथे आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय आणि त्याचा दवाखाना उभा आहे.

त्याच काळातला आजहि स्पष्टपणे दिसणारा अवशेष म्हणजे गावातील अनेक ओढ्यांवरचे पूल. सातारा दोन डोंगरांच्या बेचक्यात असल्याने डोंगरावरून वाहात येणारे अनेक ओढे सातार्‍यामधून पुढे वेण्णा नदीकडे जातात. ह्या सर्ब ओढ्यांवर एकाच प्रकारचे पूल बांधण्यात आले. ह्या पुलांच्या कठड्यांच्या कातीव दगडांच्या आकारावरून ते एकाच वेळचे काम आहे हे कळते.

हेच डोंगराचे पाणी कास तलावातून डोंगराच्या उताराने खापरी नळातून गावात आणले होते आणि कमानी हौदासारख्या हौदांमध्ये खेळविले होते. ह्याच कामासाठी महारदरे नावाचे तळे यवतेश्वर डोंगराच्या पायथ्यापाशी बांधण्यात आले होते. खापरी नळाचे अवशेष अजून पाहावयास मिळतात. ह्या पाण्यासाठी ठिकठिकाणी बांधलेले उच्छ्वास अद्यापि जागेवर आहेत.

सातार्‍यातून दक्षिणेकडे गाडीरस्ता करण्याच्या हेतूने नकाशातील उजव्या खालच्या कोपर्‍यापाशी एक बोगदा खोदण्यात आला. कात्रज बोगद्याच्या काळातला हा बोगदा अद्यापि पूर्ण वापरात आहे.

सातार्‍यातील १९व्या शतकातील सुधारणांचा हा एक धावता आढावा.

अरविंद कोल्हटकर्, जुलै २२, २०११.

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगली माहिती

सातार्‍याविषयी माहिती आवडली पण थोडी त्रोटक वाटली. सातारा बघण्याचा कधी योगच आला नाही.

सातारा

मिपण सातार्‍याचाच...माहिती त्रोटक आहे आणि कुठे कुठे थोडी चुकीचीदेखील आहे. आजिमतारा पर्यंतचा ईतिहास बरोबर आहे..पण अजिंक्यतारा हे त्या किल्याला दिलेलं नाव आहे. मराठ्यांनी किल्ला जिंकल्यावर त्याचं नाव बदलुन अजिंक्यतारा असं ठेवलं. तसाही हा किल्ला सामरीक दॄष्ट्या फारसा महत्वाचा कधिच नव्हता. पेशवाईच्या काळातही किल्ल्यावर फारशी वस्ती नवतीच
माझ्यामाहिती प्रमाणे महारदर्‍यातुन गावाला फारसा पाणिपुरवठा होत नसावा. गावाचा महारवाडा तळ्यापासुन जवळ होता आणि महादर्‍याचं पाणि महारवाडा वापरत असे.तुमच्याकाळात नसेल पण हत्तीखान्यातही माझ्या आठवणीत शाळा होती आणि अजुनी आहे. सातारा शाळांसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध होतं. शेतकी शाळेत दुरदुरहुन मुलं येतं. माझ्री स्वताच्याशाळेने (न्यु इंल्गिश स्कुल) १९९९ साली १०० वर्ष पुर्ण केलि. शिवाय कर्मवीर भाउराव पाटीलांची रयत शिक्षणची कमवा-शिका योजना सातार्‍याची शान समजली जात असे.

अजिमतरा-अजिंक्यतारा

'पण अजिंक्यतारा हे त्या किल्याला दिलेलं नाव आहे. मराठ्यांनी किल्ला जिंकल्यावर त्याचं नाव बदलुन अजिंक्यतारा असं ठेवलं...`

ह्याला काही आधार आहे काय? मी सरदेसाईकृत रियासतीचे सर्व भाग, ग्रेंट डफकृत इतिहास आणि जदुनाथ सरकारांचे `Anecdotes of Aurangzeb`ही पुस्तके चाळली. अझमतारा- अजिमतारा ह्याला आधार आहे पण बहुतेक ठिकाणी किल्ल्याचा उल्लेख `सातारचा किल्ला`असा मिळतो, अजिंक्यतारा असे नामकरण झाल्याचा उल्लेख मिळाला नाही अथवा हे नावही कोठे वापरलेले नाही. माझे आजोबा चिंतामणराव कोल्हटकर ह्यांच्या `बहुरुपी`ह्या गाजलेल्या आत्मचरित्रवजा पुस्तकात `मंगळाईचा किल्ला`हेहि जुने नाव वापरलेले आहे. जुना इतिहास पुसून काढण्यासाठी नवी नावे द्यायचा प्रघात अगदी अलीकडचा आहे. अशी `गिमिक्री`तत्कालीन राज्यकर्ते आणि राजकारण दोन्हीच्या स्वभावात बसत नाही. दिल्लीकर बादशहा जरी निष्प्रभ झालेला होता तरी त्याला तोंडदेखला का होईना, पण सलाम करण्याचीच संस्कृति होती (अर्थात् शिवाजी-संभाजीनंतर.) तेव्हा कोण हे नवे नामकरण करणार?

महारदरे हे बांधीव तळे आहे, शेजारचा हत्तीतलाव मात्र पावसाच्या पाण्याची साठवण करणारा नैसर्गिक साठा आहे. महारदर्‍याचे पाणी नैसर्गिक उताराने आणून चिमणपुर्‍यातील २ हौद, नंतर श्रीपतरावचे तळे, तेथून धनिणीची बाग अशा मार्गाने फरासखान्याजवळच्या उच्छ्वासानंतर जलमंदिराबाहेरच्या ओढ्यात सोडलेले होते. ५५-६० सालापर्यंततरी उच्छ्वासात वेगाने वाहणारा पाण्याचा प्रवाह दिसत असे आणि ओढ्यात ते पाणी धबधब्यासारखे पडतांना दिसे.

लेख त्रोटक असण्याचे कारण म्हणजे सातार्‍याचा एक `uniqueness` दाखविणे हा त्याचा हेतु होता. १९व्या शतकाच्या पहिल्या भागात सातारा गाव नगररचना शास्त्राच्या विचाराने कसे आखले गेले ह्याची कोठे जाणीव नाही असे मला वाटले आणि तेच दर्शविण्यासाठी मी ते लिखाण केले.

अरविंद कोल्हटकर, जुलै २५, २०११.

लेख आवडला...

ह्या निमित्तानं होणार्‍या चर्चेतून विस्तृत माहिती मिळेल असं वाटतं.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर दख्खन काबीज करण्यासाठी स्वतः औरंगजेब दक्षिणेत सत्तावीस वर्षे राहिला.संभाजी, राजाराम, ताराबाई ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी त्याला बराच लढा दिला. ह्या दरम्यान कधीतरी सातार्‍याचा किल्ला औरंगजेबानं जिंकावा म्हणुन कुठल्यातरी मठाधिपतीनं एक् मोठा यज्ञ केला होता आणि किल्ला खरोखरच काही दिवसातच मुघलांच्या ताब्यात आला असं जालावर कुठतरी वाचलं होतं. सातारा किंवा तिथला किल्ला ह्याबद्दलची माझ्याकडे असलेली रोचक माहिती इतकीच.

--मनोबा

चांगला लेख

औरंगजेबाने किल्ला जिंकल्यावर त्याच नाव आझमगड ठेवल्याचं वाचलं आहे. बखरी आणि रियासत कर्‍हाडच्या घरी असल्याने लगेच चाळून बघता आल्या नाहीत.

झाशी सारखेच सातारचे राज्यहि जप्त झाले.

जे जप्त झाले ते औंधचे संस्थान असावे.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

साताराच, औंध नव्हे

प्रतापसिंहावरची इंग्रजांची मर्जी उतरली तेव्हा त्यास बनारसला पेन्शनीत पाठविले आणि त्याचा भाऊ अप्पासाहेब ह्याला गादीवर बसविले. तो निपुत्रिक वारल्यानंतर डलहौसीने राज्य खालसा केले.

प्रतापसिंहाच्या वतीने वकिली करण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते इंग्लंडला गेला आणि १४ वर्षे तेथे होता पण त्याच्या प्रयत्नास काही यश आले नाही.

औंध संस्थान स्वातन्त्र्यापर्यंत तसेच होते. छोटे पण प्रागतिक संस्थान अशी त्याची ख्याति होती. उदा. तेथे प्राथमिक स्वरूपाची लोकशाही आणण्याचा प्रयत्न केला गेला होता. किर्लोस्करवाडी, ओगलेवाडी असे कारखाने त्यामुळेच तेथे आले. व्यंकटेश माडगूळकरांच्या लेखनात संस्थानाच्या कारभाराचा प्रशंसेने उल्लेख आलेले आहेत कारण माडगूळ गाव संस्थानातच होते आणि त्यांचे प्राथमिक शिक्षणहि तेथेच झाले.

अधिक तपशीलासाठी रियासतीचा अखेरचा खंड पहावा.

अरविंद कोल्हटकर, जुलै २८, २०११.

सातार्‍या बद्दलची

छान माहिती, आवडली.

 
^ वर