सेवर्नद्रुग - सुवर्णदुर्ग
सेवर्नद्रुग कॅसल |
इंग्लंडमध्ये ग्रीनिच गावात शूटर्स हिल नावाची ८०० फूट उंचीची एक टेकडी आहे. तिच्या माथ्यावर सेवर्नद्रुग कॅसल नावाची तीन मजली मनोऱ्यासारखी दिसणारी एक जुनी वास्तु १७८४ पासून उभी आहे. त्या भागात राहणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या आठवणीचा ही वास्तु एक अविभाज्य भागच आहे. इमारतीचे सेवर्नद्रुग हे नाव बहुतेकांच्या लेखी इंग्लंडमधल्या सुप्रसिद्ध सेवर्न नदीवरून पडलं आहे. ह्या पुराण्या वास्तूविषयी स्थानिक जनतेला फारच थोडी माहिती आहे.
गमतीची गोष्ट अशी की सातासमुद्रापलीकडे २२५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ह्या वास्तूचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी फार जवळचा संबंध आहे. सेवर्नद्रुग हा खरा सुवर्णदुर्ग ह्या आपल्या समुद्री किल्ल्याच्या नावाचा अपभ्रंश आहे, ही वास्तु तिथं का बांधली गेली आणि तिला सेवर्नद्रुग असं नाव का मिळालं ह्याचा इतिहास मोठा मनोरंजक आहे.
सिद्दीच्या जंजिऱ्यापासून २० मैलावरच्या बेटावर उभा असलेला सुवर्णदुर्ग कान्होजी आंग्रे आणि आंग्रे कुटुंबाच्या ताब्यात होता. तिथे असलेल्या आरमाराच्या बळावर आंग्रे मुंबईकर इंग्रजांना दहशत बसवून होते. गोव्यापासून मुंबईपर्यंतच्या किनाऱ्यावर ह्या आरमाराचा दरारा होता. इंग्रज, पोर्तुगीज आणि डच व्यापारी गलबतांना त्यांची नेहमीच भीति वाटत असे. ईस्ट इंडिया कंपनीच्या मोठ्या जहाजांना - ज्यांना ईस्ट इंडियामेन म्हणत असत - आकारानं सुटसुटीत आणि चपळ अशी आंग्र्यांची गलबतं आणि गुराबा सळो की पळो करून सोडीत असत. त्यांच्या अशा कारवायांनी त्रस्त झालेल्या इंग्रजांनी कान्होजी आणि त्यांच्या आरमाराला चांचे असं ठरवून टाकलं होतं. आजही पाश्चात्यांच्या मनातला तो गैरसमज पूर्णपणे दूर झालेला नाही.
सर विल्यम जेम्स |
अखेरीस आग्र्यांचा कायमचा बंदोबस्त करून आपला व्यापार आणि मुंबईचं बंदर सुखरूप करण्याचा निश्चय इंग्रजांनी केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या इंडिया मरीन्स ह्या आरमाराचा प्रमुख कमोडोर विल्यम जेम्सच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी सुवर्णदुर्ग आणि अन्य सागरी किल्ल्यांविरुद्ध मोहीम काढली. सिद्दी आणि पेशवे ह्या दोघांनीहि आपापल्या कारणांसाठी इंग्रजांचीच मदत केली आणि एप्रिल २, १७५५ ह्या दिवशी सुवर्णदुर्गाचा पाडाव झाला. आग्वादपासून उत्तरेकडचे सगळे सागरी किल्ले कायमचे शांत झाले.
१७५९ सालात विल्यम जेम्स हिन्दुस्तानातला आपला मुक्काम संपवून इंग्लंडास परत गेला. तदनंतर तिथं त्यानं लग्न केलं आणि एल्थममध्ये काही जमीनजुमला खरेदी करून तो तिथला रहिवासी बनला. कालांतरानं त्याला इंग्लंडच्या राजाकडून बॅरोनेटचा किताब आणि नावामागं 'सर' हे बिरूद लावायची परवानगी मिळाली.
१७८३ साली आपल्या मुलीच्या विवाहप्रसंगीच सर विल्यम जेम्स हृदयक्रिया बंद पडून अचानक मृत्यु पावला. तेव्हा त्याचं वय ६३ वर्षांचं होतं. तदनंतर त्याच्या पत्नीनं आपल्या पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ शूटर्स हिलवर हा तीन मजली इमला उभारला. पतीच्या नौदलातल्या कामगिरीचा सर्वोच्च बिंदु म्हणून इमल्याला सुवर्णदुर्गाचं सेवर्नद्रुग असं नाव दिलं. हिन्दुस्तानातील शब्दांचा नेटका उच्चर करणं इंग्रजांना नेहमीच कठिण जाई आणि म्हणून इथल्या अनेक शब्दांचा ते आपल्याला सोयीस्कर असा अपभ्रंश करून तसा शब्द वापरीत असत. ( आपणही तेच करीत होतो. एल्फिन्स्टनचं अलपिष्टन आणि स्ट्युअर्टचं इष्टुर आपणही करीत होतोच, त्याचाच हा उलटा प्रकार!) कालांतरानं सेवर्नद्रुगचा सुवर्णदुर्गाशी असलेला संबंध विस्मृतिपथाला गेला आणि सेवर्न नदी तिथे येऊन चिकटली.
सुवर्णदुर्ग |
१७८४ नंतर ह्या इमल्याची मालकी वेळोवेळी बदलत गेली आणि त्याची पडझडही होत गेली. लंडन आणि पॅरिसच्या मध्ये सर्वात उंच जागा म्हणून दुसऱ्या महायुद्धात रेडिओसंदेश दळणवळणासाठी त्याचा चांगला उपयोग झाला. अखेर १९८६ मध्ये इमल्याची मालकी ग्रीनिच सिटी कौन्सिलकडे आली. २००२ मध्ये इमला प्रॉपर्टी डेव्हलपरला विकायचा प्रस्ताव सिटी कौन्सिलनं काढला तेव्हा स्थानिक जनतेला जाग येऊन इमला वाचवण्याचा निश्चय केला गेला गेला. २००३ मध्ये सेवर्नद्रुग कॅसल प्रेझर्वेशन ट्रस्ट स्थापन होऊन इमल्याची मालकी ट्रस्टकडं गेली आणि त्याला जीवदान मिळालं. सध्या ट्रस्ट अनेक मार्गांनी हे काम करीत आहे आणि अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक दुवा तिथे जतन करीत आहे.
ई-मेलवर झलेल्या पत्रव्यवहारावरून ट्रस्टच्या चालकमंडळीला सुवर्णदुर्गाशी असलेला संबंध पूर्णपणे माहीत आहे असं जाणवलं नाही. सुवर्णदुर्गाचा संबंध अधिक स्पष्ट केला जावा, तसंच आंग्र्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांचाही इतिहास अधिक विस्तारानं लिहिला जावा अशी विनंती त्यांना केली. दोनच दिवसात ट्रस्टच्या अध्यक्षांचं उलट उत्तर आलं आणि सूचनांची योग्य दखल आपण घेऊ असं आश्वासनही मिळालं. ट्रस्टच्या वेबसाईटवर तरी तसं अद्याप दिसून आलेलं नाही. ते होण्याची वाट पाहात आहे. दोनतीन महिन्यांनंतर त्यांना पुनः आठवण करण्याचा इरादा आहे.
(ह्या लिखाणामधली माहिती www.severndroogcastle.org.uk ह्या संकेतस्थळावरून आणि इंटरनेटमधील अन्य सामुग्रीवरून घेतलेली आहे.)
Comments
सेवर्नद्रुग
इंटरनेटच्या देवतांनी चित्रे का दाखविली नाहीत हे कळत नाही! माझ्या समजुतीनुसार संपादनसाहाय्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे मी सर्व केले होते. कृपया उपक्रमाबाहेर कोणी मार्गदर्शन करेल काय?
अरविंद कोल्हटकर, जुलै २०, २०११.
सेवर्नद्रुग
आता सगळी चित्रं दिसू लागली आहेत. प्रथम का दिसली नाहीत कळत नाही.
अरविंद कोल्हटकर, जुलै २०, २०११.
चित्रांचे दुवे सुधारले आहेत
लेखातील चित्रांचे दुवे आता सुधारले आहेत. लेखात चित्राचा समावेश करण्यासाठी केवळ चित्रापर्यंत नेणारा दुवा वापरावा.
एक उदाहरण खाली दाखवले आहे. सोयीसाठी चित्राचा दुवा वेगळ्या रंगात ठेवला आहे आणि त्रिकोणी कंसाऐवजी गोल कंस वापरले आहेत.
(table class="image" style="width: 1%; float:; border:1px solid #ccc; margin: 0.1em 0.1em;")(tr)(td)(img src="http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/8/84/Entrance_to_Suvarnadurg.JPG" alt="")(/td)(/tr)(tr)(td class="caption")(/td)(/tr)(/table)
मूळ लेखात दिलेले दुवे (लिन्क्स) चुकल्याने चित्रे दिसत नव्हती.
मूळ लेखात दिलेले दुवे (लिन्क्स) चुकल्याने चित्रे दिसत नव्हती. मूळ लेखात दिलेले दुवे (लिन्क्स) चुकल्याने चित्रे दिसत नव्हती. मूळ लेखात दिलेले दुवे (लिन्क्स) चुकल्याने चित्रे दिसत नव्हती. मूळ लेखात दिलेले दुवे (लिन्क्स) चुकल्याने चित्रे दिसत नव्हती.
तुळाजी आंग्रे
१७५५ मध्ये विल्यम्स जेम्स याने कान्होजी आंग्र्यांचा मुलगा तुळाजी आंग्रे याच्याशी प्रत्यक्ष लढाई केली होती असे वाटते. जहाजे लुटून तुळाजीची फौज सुवर्णदुर्गाच्या आश्रयाला जात असल्याने सुवर्णदुर्गावरच छापा मारण्याचे जेम्स याने निश्चित केले. यानंतर विजयदुर्गावरही छापे मारण्यात आले.
कान्होजींचा ज्येष्ठ पुत्र वारल्यावर इतर औरस मुलांमध्ये संभाजी आणि मानाजी यांच्यात संपत्ती, प्रदेशाची विभागणी झाली. १७४० मध्ये संभाजी आणि त्याच्या सोबत असणार्या तुळाजीने मानाजीच्या प्रदेशावर (अलिबाग, कुलाबा इ.) हल्ला केल्याने त्याने पेशव्यांकडे आणि ब्रिटिशांकडे मदत मागितली. त्यानंतर संभाजीवर हल्ले करून तुळाजीला कैद केले आणि संभाजी आंग्र्यांना पाठी फिरवले पण लवकरच पेशव्यांचा कावा आपला प्रदेश बळकवण्याचा आहे असे मानाजीच्या लक्षात आल्याने त्याने पुनश्च भावाशी हातमिळवणी केली आणि तुळाजीची सुटका झाली.
पुढे संभाजीच्या मृत्यूनंतर सत्ता तुळाजीच्या हाती आली. या काळात मानाजी आंग्र्यांशी संबंध बिघडल्याने पेशवे जंजिर्याच्या सिद्दीच्या सहाय्याने आंग्र्यांचा बिमोड करू पाहात होते. परंतु पुढे त्यांचे आणि मानाजींचे संबंध पुन्हा बरे झाले. याउलट, तुळाजीने पेशव्यांची सत्ता कधीच मानली नाही. त्यामुळे इंग्रजांच्या सहाय्याने पेशव्यांनी आणि सिद्दीने तुळाजीच्या विरोधात लढा दिला.
सुवर्णदुर्गाच्या पाडावा नंतर तुळाजीला मरेपर्यंत कैदेत राहावे लागले. १७८६ ला सातार्यानजीक त्यांचा मृत्यू झाला.
---
कोल्हटकरांचा आणखी एक माहितीपूर्ण लेख. सेवर्नद्रूगची माहिती आवडली.
लेख आणि माहिती आवडली
लेख आणि माहिती आवडली. प्रियाली यांचा प्रतिसादही माहितीपूर्ण आहे.
लेखाच्या तळटिपेत दिलेले सेवर्नद्रूग वास्तूबाबत संकेतस्थळही बघितले. आंग्र्यांच्याबाबत चांचे म्हणूनच उल्लेख आहे. त्यांना भारतीय दृष्टिकोनातून माहिती देण्याचा तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे.
(लेखातील चोन चित्रे विकीमीडियावरील प्रताधिकार-मुक्त चित्रे आहेत. त्यांचा वापर योग्यच आहे. परंतु चित्राखाली तसा उल्लेख करावा, अशी विनंती. त्याचा असा फायदा, की वाचकसुद्धा चित्रांचा मुक्त उपयोग करू शकतील.)
+ सहमत
+१ सहमत
असेच म्हणतो.
प्रमोद
तुळाजी आंग्रे
"सुवर्णदुर्गाच्या पाडावा नंतर तुळाजीला मरेपर्यंत कैदेत राहावे लागले. १७८६ ला सातार्यानजीक त्यांचा मृत्यू झाला."
पुण्याहून सातार्याकडे जातांना लिंबखिंडीच्या अलीकडे चंदन-वंदन नावाचे जोडकिल्ले डाव्या बाजूला दिसतात. ह्यापैकी वंदनवर तुळाजीला ठेवले होते अशी माझी माहिती आहे. दोन्ही किल्ले मी पाहून आलेलो आहे. वंदनवर गुहेवजा एक जागा आहे. तेथे तो कैदेत ठेवला गेला असावा असा माझा तर्क आहे.
१७ ५०' १८.११" उ ७४ ०२' ०५.२२" पू (उंची ३७८५') वंदन आणि १७ ५०' ५०.३२" उ ७४ ०२' ४२.८३" पू (उंची ३६९४') चंदन असे हवे असल्यास गूगल अर्थ/विकिमॅपिया येथे पाहता येतील. किल्ल्यांच्या पायथ्यापाशी किकली नावाचे गाव आहे आणि तेथे भैरवनाथाचे जुने (आता जीर्णोद्धार झालेले) मंदिर आहे. गावातील चावडीसमोर सुमारे तीस वर्षांपूर्वी मी काही शे वीरगळ अस्ताव्यस्त पडलेले पाहिले होते ह्यावरून गाव बरेच जुने आणि एकेकाळी काही महत्त्व असलेले वाटते.
अरविंद कोल्हटकर, २० जुलै २०११
वंदनवर समाधी
मला वाटते ही माहिती बरोबर आहे. तुळाजीची वंदनवर समाधी असल्याचे आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याची एक बायको सती गेल्याचे वाचल्याचे आठवते. चू. भू. द्या. घ्या.
तुळाजीला सुमारे ३० वर्षे कैद झाली होती. या कैदेदरम्यानही तुळाजीने पेशव्यांना बराच त्रास दिला. तो फितूरी करून सुटेल या भितीने त्याला कैदेतून बर्याचदा हलवले गेले, ते असे
१७८६ ला तुळाजी वंदनवर मरण पावला.
मराठी रियासतीच्या दुसर्या खंडात तुळाजी आंगर्याचा पाडाव असे स्वतंत्र प्रकरण आहे पण वेळे अभावी सध्या अधिक लिहू शकत नाही.
रोचक
माहीती रोचक आहे.
अजुन् येउ द्या.
आवडले.
छान माहिती आणि धागा.
आणखी अशीच माहिती येऊद्या.
कान्होजी आंग्रे हे शिवाजी महाराजांच्या आरमारात होते अशी माझी समजूत होती पण ती चुकीची असल्याचे आढळते.
अवांतर:
>>हिन्दुस्तानातील शब्दांचा नेटका उच्चर करणं इंग्रजांना नेहमीच कठिण जाई आणि म्हणून इथल्या अनेक शब्दांचा ते आपल्याला सोयीस्कर असा अपभ्रंश करून तसा शब्द वापरीत असत. ( आपणही तेच करीत होतो. एल्फिन्स्टनचं अलपिष्टन आणि स्ट्युअर्टचं इष्टुर आपणही करीत होतोच, त्याचाच हा उलटा प्रकार!) कालांतरानं सेवर्नद्रुगचा सुवर्णदुर्गाशी असलेला संबंध विस्मृतिपथाला गेला आणि सेवर्न नदी तिथे येऊन चिकटली.
This name possibly originated as the Old Portuguese phrase bom baim, meaning "good little bay". मुंबईबाबतही असेच झाले असेल का? ही व्युत्पत्ती बाजूस पडून मुंबादेवी-मुंबाआई येऊन चिकटली असावी का? शिवाजी महाराजांच्या किंवा तत्कालीन एतद्देशीयांच्या दस्तऐवजात मुंबई लिहिलेले असेल तर पहायला हवे.
नितिन थत्ते
द्रुग
मध्यप्रदेशातल्या 'दुर्ग' ह्या शहराचा उच्चार अनेकजण 'द्रुग' असाही करतात. हिंदुस्तानातल्या तत्सम शब्दांचा नेटका उच्चार करणे अनेक नेटिवांनाही कठीण जात असावे की काय? नागपूर शहरात 'बारा सिन्गल' नावाचा एक भाग आहे. 'सिन्गल' 'बारा' कसे असू शकतात असा प्रश्न काहींना पडू शकतो. पण इथे 'सिग्नल' ह्या शब्दाचे हे 'सिन्गल' अपभ्रष्ट रूप आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
नवी माहिती
जवळजवळ सगळी माहिती नवी आहे
श्री अरविंद, प्रियाली यांचे आभार
@प्रियाली,
वेळ मिळताच तुळाजी व त्याच्या पाडावावर एक स्वतंत्र लेख होऊन जाऊदे :)
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
सेवर्नद्रुग - सुवर्णदुर्ग
नमस्कार् ,
मी येथे नवीन् आहे. पण् मला ह्या प्रकरणाबद्दल माननीय श्री. अरविन्द कोल्हटकर ह्यान्च्याशी प्रत्यक्ष बोलायला आवडेल. माझा इ-मेल gherarasalgad@gmail.com असा आहे. माझा भ्रमणध्वनी ९३२३२९४५३० असा आहे. क्रुपया सम्पर्क साधावा
आपला नवीन सहकारी,
प्रवीण कदम
रोचक
रोचक माहिती. लेख आवडला. प्रियालीच्या प्रतिसादांरतूनही चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.
____________________________________
माझ्या अनुदिनी - वातकुक्कुट आणि विवस्वान