'नासक' नावाचा हिरा आणि दुसर्या बाजीरावाची संपत्ति
(खालील मजकूर बरेच दिवसांपासून माझ्या संगणकामध्ये आहे आणि तो Itrans मध्ये लिहिण्यात आला होता. तेथून उचलून copy/paste मार्गाने मी तो येथे आणला आहे. हा अखेर आपणांस कसा दिसेल ह्याचा मला काहीच अंदाज नाही पण 'केल्याशिवाय कळत नाही' म्हणून मी हा प्रयोग करीत आहे. लेख नीट न दिसल्यास पुन: संपूर्ण नव्याने करेन. पूर्वपरीक्षणात तरी मला तो ठीक दिसला आहे.
माझ्या समजुतीनुसार बाजीराव आणि अन्य हिंदुस्तानी राजे-महाराजे आणि नबाब ह्यांच्याकडून ब्रिटिशांनी वेळोवेळी ज्या रकमा आणि जडजवाहीर युद्धाच्या मार्गाने मिळविले त्यांचे पुढे काय झाले ह्याबद्दल आपल्याकडे स्पष्ट अशी काहीच माहिती उपलब्ध नाही. ती संपत्ति ब्रिटिशांनी 'लुटली' एवढेच आपण म्हणू शकतो. आता बुक्स.गूगल सारख्या स्थळांमुळे १८व्या-१९व्या शतकातले छापील साहित्य आपल्याला नव्याने उपलब्ध झाले आहे आणि बाजीरावच्या संपत्तीचे काय झाले ह्याचे पुष्कळसे समाधानकारक उत्तर मिळू शकते. ते वाचकांना मनोरंजक वाटेल अशी अपेक्षा आहे.)
नासक हिरा |
२० जुलै १८३७ ह्या दिवशी लंडनमध्ये अनेक मौल्यवान रत्ने लिलावात विकली गेली. त्यांमध्ये 'नासक' नावाचा एक हिरा आणि एकेकाळी अर्काटच्या नबाबाच्या तिजोरीत असलेले काही दागदागिने ह्यांचाहि समावेश होता. 'नासक' हिरा 'डेक्कन प्राईझ मनी'चे विश्वस्त ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि कर्नल अर्बथनॉट ह्यांच्या आज्ञेवरून विक्रीस आला होता. तो विकत घेतला मार्क्विस ऑफ वेस्टमिन्स्टर ह्यांनी. त्यांनी तो आपल्या समारंभांमध्ये वापराच्या तलवारीच्या मुठीमध्ये बसवला. ती तलवार कमरेला लटकावूनच ते नुकत्याच राज्याभिषेक झालेल्या विक्टोरिया राणीच्या वाढदिवस दरबाराला २४ मे १८३८ ह्या दिवशी उपस्थित राहिले होते. ब्रिटिश साम्राज्याच्या दूरदूरच्या कानाकोपऱ्यात अगदी ऑस्ट्रेलिया-न्यू झीलंडपर्यंतच्या वृत्तपत्रांनी ह्या हिराखरेदीची दखल घेतली.
'नासक' ह्या नावानं आजहि ओळखल्या जाणाऱ्या हिऱ्याचं हे नाव आपल्या नाशिक ह्या गावावरून पडलेलं आहे. ह्या नावामागे मराठेशाहीच्या अस्ताच्या दिवसांतले आणि कोणास फारसे माहीत नसलेले मनोरंजक तपशील दडलेले आहेत.
ह्या हिऱ्याला हे नाव का पडलं ह्याची प्रचलित कथा अशी आहे की हा हिरा कोणे एके काळी त्र्यंबकेश्वराच्या देवळाच्या संपत्तीचा भाग होता. दुसऱ्या बाजीरावानं तो तेथून आपल्या ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून विजेत्या इंग्रजांनी तो मिळवला. हिऱ्याचे मूल्य वाढविण्यासाठी कोणीतरी बुद्ध्याच बनवलेली अशी ही कपोलकल्पित कथा दिसते. कसे ते पुढे पाहूच.
खडकीच्या लढाईत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी १७ नोव्हेंबर १८१७ ह्या दिवशी पुणं सोडलं आणि पेशवे पुढं आणि इंग्रज मागं अशी शर्यत सुरू झाली. पेशवे पुण्याहून प्रथम नाशिक-खानदेशाकडं गेले. तेथून चांद्याकडं आणि अखेरीस उत्तरेकडं पेशवे सरकत असतांना अखेर सर जॉन माल्कम -महाबळेश्वरातील माल्कमपेठवाला- ह्यानं त्यांना गाठलं आणि अखेर पेशव्यांनी सत्ता सोडून बिठूरास पेन्शन घेऊन राहण्याचं मान्य केलं. पेशव्यांची खाजगी मालमत्ता इंग्रजांनी लढाईतली लूट म्हणून ताब्यात घेतली.
इंग्रजांच्या वतीनं कमिशनर म्हणून पुण्यातून माउंटस्ट्युअर्ट एल्फिन्स्टन सूत्रं हलवीत होता. त्याला कोठूनतरी बातमी लागली की उत्तरेकडं सरकतांना पेशव्यांनी नाशिकला एका विश्वासू व्यक्तीच्या घरात काही जडजवाहिर लपवून ठेवलं आहे. बातमी कळताक्षणी त्यानं आपल्या हाताखालच्या कॅ. ब्रिग्जला हे जडजवाहिर शोधून ताब्यात घेण्याची कामगिरी सोपविली. कॅ. ब्रिग्ज लगोलग नाशिकास रवाना झाला आणि त्या व्यक्तीच्या घराचा शोध घेऊन त्यानं घराची खणती केली. अपेक्षित घबाड त्याच्या हाती लागलं. हे घडलं २ मे १८१८ च्या रात्री. ह्या घटनाक्रमाला आधार आहे तो म्हणजे 'डेक्कन प्राईझ मनी' बाबतचा तत्कालीन इंग्रजी वृत्तपत्रांमधून वेळोवेळी आलेला मजकूर. कोणाच्या घरात हा ऐवज दडविण्यात आला होता हे नाव आज कळू शकत नाही.
'डेक्कन प्राईझ मनी' म्हणजे काय? तत्कालीन रिवाजानुसार परपक्षाचा पराभव झाल्यावर त्या पक्षाची जी काही दौलत विजेत्यांच्या हातात पडेल तिचे सैनिकांमध्ये वाटप करून सैनिकांना खूष ठेवण्याची पद्धत युरोपात रूढ होती. अशा लुटीमध्ये सर्वोच्च राजसत्तेपासून मोहिमेत भाग घेतलेले सर्व अधिकारी आणि सामान्य सैनिकांपर्यंत प्रत्येकाचा दर्जानुसार वाटा असे. हे वाटप कसे करायचे ह्याचेही नियम ठरलेले होते. तदनुसार किरकोळ मूल्याच्या वस्तू जागीच विकून सर्वसामान्य सैनिकांमध्ये ती रक्कम वाटत असत. अधिक मौल्यवान वस्तू, विशेषेकरून जडजवाहिर आणि हिऱ्यांसारख्या वस्तु, इंग्लंडला पाठवून तिथं त्या सरकारजमा होत आणि कालांतरानं योग्य किमतीला त्या विकून त्या रकमेचंहि वाटप होत असे. पेशवाईच्या अस्तानंतर अशा प्रकारे नागपूरकर भोसले, होळकर आणि पेशवे ह्यांच्याकडून इंग्रजांनी बरीच लूट ताब्यात घेतली. त्यांपैकी मौल्यवान अशा वस्तु आणि जडजवाहिर इंग्लंडमध्ये पाठवलं. हाच 'डेक्कन प्राईझ मनी. ह्या रकमेचं व्यवस्थित वाटप व्हावं म्हणून ती ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि कर्नल अर्बथनॉट ह्यांच्या ताब्यात विश्वस्त म्हणून देण्यात आली. विश्वस्तांचं ऑफिस ८ रीजंट स्ट्रीट इथं होतं. विश्वस्तांनी आपलं काम कसं केलं ह्याचे अनेक तपशील इंग्लंडमधील तत्कालीन वृत्तपत्रांमधून वाचायला मिळतात. ड्यूक ऑफ वेलिंग्टनकडं हे काम सोपवलं जाण्याचं कारण म्हणजे त्या काळात त्यांच्या नावाचा फार मोठा दबदबा होता. नेपोलियनवर नुकताच विजय मिळवून त्यांनी आपलं इतिहासातलं स्थान पक्कं केलं होतंच. ह्याशिवाय दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात त्यांचा महाराष्ट्राशी चांगलाच परिचय झालेला होता.
थोडक्यात म्हणजे मराठ्यांच्याबरोबरच्या अखेरच्या लढाईत इंग्रजांच्या हातात एक खूप मोठी रक्कम आली आणि तिचं वाटप करण्यासाठी तिच्यातला महत्त्वाचा भाग इंग्लंडमध्ये पोहोचला. लुटीतल्या बऱ्याच गोष्टी जागीच विकून रकमेचं वाटप केलं होतं. निवडक निवडक वस्तु ज्या इंग्लंडला गेल्या त्यांमध्ये 'नासक' हिराहि होत. १६ मार्च १८२१ च्या एका वृत्तपत्रात असं नाव दिलेला एक मोठा हिरा इंग्लंडात येऊन पोहोचल्याचा उल्लेख मिळतो. ह्या उल्लेखावरून असं वाटतं की हिरा नाशिकला मिळाला म्हणूनच त्याला 'Nassuck' हे नाव मिळालं. इथं हे लक्षात घ्यायला हवं की तेव्हांच्या सर्व इंग्रजी लिखाणात नाशिकचा उल्लेख Nassuck असाच केलेला आढळतो. ह्या सर्व खजिन्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी विश्वस्तांना बरीच वर्षं मेहनत घ्यावी लागली. पुढची पंधराएक वर्षं तरी हे काम चालू असल्याचं दिसतं.
एव्हढा वेळ लागायचं कारण असं की प्रत्यक्ष लूट घेतांना जागेवर असलेले आणि जागी नसलेले तरी ज्यांचं लुटीमध्ये योगदान होतं अशा दोन्ही गटांना वाटा घेण्याचा अधिकार होता पण कोणाचा किती वाटा ह्याबद्दल बरेच मतभेद होते. एकूण मोहिमेचा प्रमुख जनरल हिस्लॉप आणि त्याचा राजकीय वरिष्ठ कलकत्तेकर गवर्नर-जनरल मार्क्विस ऑफ हेस्टिंग्ज ह्या दोघांमध्ये बरेच मतभेद होते. हिस्लॉपची तक्रार होती की आपल्या मागणीकडं पाहण्याचा ड्यूक ऑफ वेलिंग्टनचा दृष्टिकोण उपेक्षेचा आणि तुच्छतेचा आहे. नाशिकच्या खणतीच्या दिवसातला तिथं उपस्थित असलेला अधिकारी कर्नल मॅकडॉवेलची तक्रार होती की पुण्याहून आलेल्या ब्रिग्जनं त्याला अंधारात ठेऊनच आपला कार्यभाग साधला आणि त्याला न्याय्य हिश्श्यापासून वंचित ठेवलं. अशा एक ना दोन अनेक वादांमुळं हे प्रकरण पुढं पंधराएक वर्षं खदखदत होतं. वृत्तपत्रांमधून आणि पार्लमेंटात अनेकदा त्यावर प्रश्न विचारले गेले. अखेरीस १८३६-३७ साली प्रकरण अखेरीस मार्गी लागलं आणि 'नासक' हिरा विकायला बाहेर आला.
अशी अनेक वादांच्या भोवऱ्यात सापडलेली रक्कमहि तशीच जबरदस्त असली पाहिजे. एका ठिकाणी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ती ७२ लाख रुपये इतकी होती. त्यावेळेस सोन्याचा भाव १८-१९ रुपये तोळा होता असं धरलं तर आजच्या किमतीनं ह्या लुटीची किंमत ६-७ अब्जाच्या घरात जाते. हे जरा ढोबळच अनुमान आहे पण रक्कम खूपच मोठी होती एवढं कळायला पुरेसं आहे.
आणखी एका वादाचा इथं उल्लेख करायला हवा. सिंहगड किल्ला २ मार्च १८१८ ह्या दिवशी पाडाव झाला आणि मराठ्यांनी किल्ला खाली केला. त्यावेळी ठरलेल्या अटींनुसार किल्ल्यातील लोकांना केवळ आपापले वैयक्तिक सामान बाहेर काढण्याची अनुमति देण्यात आली होती. नारो गोविंद औटी नावाचा बाजीरावाचा विश्वासू किल्ल्यात होता आणि तो बाहेर पडताना त्याच्याजवळ सोन्याच्या नाण्यांनी भरलेले चार पेटारे होते. ह्या नारो गोविंदाचा सर्व इंग्रजी लिखाणामध्ये केलेला उल्लेख Narroba Govind Outia असा आहे. नारो गोविंदच्या दाव्यानुसार ती सुमारे ३६ लाखाची मालमत्ता त्याची खाजगीतली होती. इंग्रजांना शंका होती की मालमत्ता बाजीरावाची असली पाहिजे आणि तसं असलं तर तिच्यावर विजेते म्हणून त्यांचा अधिकार होता. ती त्या जागी जप्त केली गेली पण नारो गोविंद आणि इंग्रजांच्यातील हा वाद बरेच वर्षं चालू रहिला. मध्यन्तरी केव्हातरी नारो गोविंदाचा मृत्यु झाला पण त्याच्या वतीनं दोघा मारवाडी व्यक्तींनी दावा पुढं चालू ठेवला. हा दावा त्यांनी रोख पैसे देऊन बहुधा नारो गोविंदाच्या पुढच्या पिढ्यांपासून विकत घेतला असला पाहिजे. आश्चर्याची गोष्ट अशी की मुंबईच्या सुप्रीम कोर्टात निर्णय नारो गोविंदाच्या बाजूनं लागला. त्या निर्णयाविरुद्ध कंपनी सरकारनं लंडनला प्रिव्ही कौन्सिलमध्ये अपील दाखल केलं. ह्या अपीलाचा निर्णय लागेपर्यंत डेक्कन प्राईझ मनीचं वाटप केलं जाऊ नये अशी पार्लमेंटात मागणी आली आणि त्यानुसार वाटप थांबवून ठेवण्यात आलं. प्रिव्ही कौन्सिलचा हा निर्णय कंपनीच्या अपीलाच्या बाजूनं लागला पण हे होता होता १८३० साल उजाडलं. हा निर्णय वाचायला उपलब्ध आहे.
'नासक' हिऱ्याचं पुढं काय झालं? अक्रोडाच्या आकाराच्या ह्या हिऱ्याचं वजन ८९ कॅरटहून थोडं अधिक होतं. त्याचं तेज वाढविण्याच्या हेतूनं त्याला नंतर दोनदा पैलू पाडण्यात आले. हिरा मार्क्विस ऑफ वेस्टमिन्स्टरच्या पुढील पिढ्यांच्या ताब्यात पुढची सत्तरएक वर्षं होता. तदनंतर तो तीनचार वेळा युरोप-अमेरिकेत विकला गेला आणि सध्या तो एका धनाढ्य अमेरिकनाच्या मालकीचा आहे. ही शेवटची विक्री १९७० मध्ये झाली. आजची त्याची किंमत सुमारे ३० लाख अमेरिकन डॉलर्स असावी असा तर्क केला जातो. मराठेशाहीचा असा एक अवशेष एका अमेरिकेतल्या तिजोरीत बंद आहे. काळाचा चमत्कार - दुसरं काय?
Comments
अतिशय रोचक
लेख अर्थातच फार आवडला. 'भाषा आणि जीवन'मधला लेखही आवडला आहे. कोहिनुरापासून नासकापर्यंत हिऱ्यांचे इतिहास एकंदर रोचकच आहेत असे दिसते. असो. उपक्रमावर आपले स्वागत आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
छान लेख
युद्धातल्या लुटीची विल्हेवाट लावण्यासाठी अगदी "कायदेशीर" पद्धत आणि ती पद्धत राबवणारी नोकरशाही होती!
हिर्याच्या नावाची प्रचलित कथा नीट समजली नाही. त्र्यंबकेश्वर गाव हे नाशकाजवळच आहे ना? म्हणजे त्र्यंबकेश्वराला सापडलेल्या हिर्याचे नाव "नाशिकचा हिरा" असू शकेल.
नाशिकचा हिरा
उपक्रमावर स्वागत. लेख आणि माहिती देण्याची पद्धत दोन्ही आवडले. नाशिकजवळ सापडल्यानेच त्याला नाशिक हिरा म्हणत असावे. हा हिरा पैलू पाडल्यावर आता असा दिसतो.
विकीवर त्याबद्दल ही माहिती मिळाली.
ठीक आहे. त्याने आता आहे त्या जागी सुरक्षित राहावे म्हणजे झाले. :-)
छान लेख
अतिशय रोचक लेख आहे. जगप्रसिद्ध कोहिनूर (लंडन) आणि होप डायमंड (स्मिथ्सोनियन, वॉशिंग्टन डीसी) विषयी भरपूर ऐकायला मिळते पण ह्या नासक हिर्याविषयी नवी माहिती मिळाली.
कोहिनूरही ब्रिटिशांनी ताब्यात घेतला तेव्हा साधारण २०० कॅरट्चा होता पण त्याचे पैलू सुमार दर्जाचे होते आणि त्यामुळे तेज कमी होते म्हणून पुन्हा पैलू पाडले ज्यात तो १०५ कॅरटचाच राहिला असे वाचले होते. इतके करुनही पैलू पाडणारे खूष नव्हते असेही वाचले होते.
कोहिनूर :
उपक्रमावर स्वागत!
वर वैद्य म्हणाले तरसे होप डायमंड, कोहिनूर वगैरे बद्दल ऐकून होतो. ही नवी माहिती समजली. अर्थातच लेखन आवडले
उपक्रमावर स्वागत!
बाकी हे हिरे, केरळमधील मंदीरात मिळालेले सोने वगैरे पाहिलं की भारत खरच एकेकाळी श्रीमंत पेक्षा सुबत्तापूर्ण होता की काय असा संशय येतो.
असे खरंच असल्यास भारत 'गरीब' कधी व कसा झाला? का पूर्वापार ही संपत्ती धार्मिक आणि राजकीय नेत्यांकडेच होती आणि सामान्य जनता गरीबच होती?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
+१
लेख आवडला, आणि वर ऋषिकेश यांना पडलेला प्रश्नही (पडला) !
पद्मनाभ मंदिराप्रमाणेच ससाबांच्या भिंतीतून निघणारे सोने/चांदी/रोकड, स्विस बँकातला अवाढव्य काळा पैसा, शिर्डी / तिरूपतीसारखी एव्हरग्रीन देवस्थाने वगैरे पाहून 'सोन्याचा धूर' ही काही अगदीच थाप नसावी असे वाटते. 'फ्रीडम ऍट मिडनाईट'मधेही राजे-रजवाडे आणि त्यांच्या संपत्तीबद्दल काही रोचक संदर्भ वाचल्याचे स्मरते. भारत हा नक्कीच 'भरपूर संपत्ती निर्माण करणारा' देश असला पाहिजे.
'प्राचीन भारतातील संपत्ती' हा विषय घेऊन उपक्रमावर एखादा लेख यावा, वाचायला आवडेल.
निकष
त्या निकषाने भारत अजूनही सोन्याच्या धुराचा देशच आहे. तिरुपतीचे सोने, साईबाबांचे चांदीचे सिंहासन वगैरे आजच्या काळातलेच.
भारत पूर्वी आणि आजही भरपूर संपत्ती निर्माण करणारा देश होता/आहे. तसाच तेव्हाही आणि आताही मोठ्या संखेने दरिद्री लोक असलेला देश होता/आहे. या दोन वाक्यांत कुठलाच परस्पर-विरोध नाही
भूतकाळ ससंदर्भ आहे का?
या दोन्ही वाक्यातील भूतकाळ हा ससंदर्भ आहे का?
असल्यास
-- पूर्वी म्हणजे कधीपासुन?
-- ही संपत्ती कशी व कोणी निर्माण केली? का भारतीयांनीही ती कोण्या काळी लुटून आणली होती?
-- भारतात इतके सोने कसे आले?
वगैरे अनेक प्रश्नांच्या अनुशंगाने झालेला उहापोह वाचायला आवडेल. अर्थात या धाग्याला अवांतर असल्याने ज्या उपक्रमींना या विषयात माहिती / गती आहे ते वेगळा धागा सुरू करतील का?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
फ्याड असेल ;-)
भारतात विशेषतः कर्नाटकात सोन्याच्या खाणी आहेत/ होत्या. सोन्याची आवड माणसाला फार पूर्वीपासून आहे आणि भारतातल्याच नाही तर इजिप्शियन, ग्रीक, पर्शियन वगैरे इतर संस्कृतीतही सोन्याला मागणी होतीच.
रंग, झळाळी, लवचिकता वगैरे अनेक कारणांनी सोने लोकप्रिय असल्यास नवल नाही. सुवर्णकांती, सुवर्णप्रभा, हिरण्यगर्भ वगैरे वगैरे अनेक शब्दांतून भारतीयांची सोन्याबद्दल आसक्ती दिसते. अर्थातच, त्यामुळे सोन्याला भाव निर्माण झाला असणार. सोन्याची कमी जागा व्यापणारी साठवण, चांदीप्रमाणे त्याची झीज न होणे, दागिने, कपडे वगैरे रितीने अंगावर मिरवता येणे वगैरे अनेक गोष्टींतून सोन्याला संपत्ती मानले गेले असावे.
बाकी, भारतीयांनी बाहेर जाऊन सोने लुटून आणले नसावे. त्यांच्याकडे ते मुबलक होते. परंतु भारतातच त्यांनी एकमेकांपासून लुटले असावे. उदा. सामान्य जनतेकडून राजाने/ त्याच्या अधिकार्यांनी आणि दरोडेखोरांनी आणि राजाकडून त्याच्या शत्रूने. मयूर सिंहासन असेच भारताबाहेर पोहोचले.
भारतातील सोने
(मलाहि वाटते की भारताच्या जुन्या संपत्तीबाबत नवा धागा सुरू करता येईल. तूर्तास पुढील मजकूर लिहितो.)
<बाकी, भारतीयांनी बाहेर जाऊन सोने लुटून आणले नसावे. त्यांच्याकडे ते मुबलक होते.>
भारतात अर्थातच स्वतःच्या खाणींचे सोने होतेच पण व्यापारमार्गेहि खूप सोने बाहेरून येत असे. प्लिनीने त्याच्या काळी रोमन साम्राज्यामधून व्यापारातील वस्तूंची किंमत चुकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोममधून भारतात सोने जाते अशी तक्रार नोंदविली आहे. भारतातील ब्रिटिश दिवसांच्या बरोबर विरुद्ध स्थिति. पहा http://www.britishmuseum.org/explore/highlights/highlight_objects/cm/g/g...
अरविंद कोल्हटकर, जुलै २१, २०११.
या संदर्भात
१. या संदर्भात "भूतकाळ" म्हणजे पद्मनाभस्वामीच्या देवळात सोने साठवले, तो काळ. अथवा नासक हिरा थोरामोठ्यांकडून थोरामोठ्यांनी विकत घेतली, तो काळ. (वाटेल तो काळ घ्या. कुठलाही एक काळ घेतला, तरी माझा प्रतिसाद लागू आहे.)
२. "संपत्ती कोणी निर्माण केली" वाक्याचा अर्थ संदिग्ध आहे.
नासक हिरा हा खनिज स्वरूपात भारतातच सापडला. ("निसर्गनिर्मित" म्हणायचे, की "खाणमालकाने धंदा स्थापल्यामुळे मनुष्य-व्यवहारात आलेला = निर्माण झालेला" असे म्हणायचे, की "खाणकामगाराने शोधून पैलू पाडणार्याने चमकवून स्वस्त दगडापासून मूल्यवान हिरा निर्माण झाला" असे म्हणायचे, की "हिर्याला किंमत ही बाजारातले लिलाव करणारे ग्राहक ठरवतात, त्यांनी किंमत ठरवली/वाढवली तशी तशी त्या हिर्यात संपत्ती उत्पन्न होत गेली" असे म्हणायचे आहे?)
सोने : सोन्याच्या खाणी भारतात त्या मानाने कमी प्रमाणात आहेत. म्हणजे भारतात सोने आहे, त्या मानाने कमी प्रमाणात. (भारतातल्या खाणीतल्या सोन्यासाठी "संपत्ती कोणी निर्माण केली" प्रश्न विचारल्यास वरीलप्रमाणेच संदिग्ध अर्थ आहेत.)
३. भारतातले बरेचसे सोने व्यापारातून आले. केरळात सोने आणणारा परदेश व्यापार (अन्य मालापैकी अग्रणी अशा) मसाल्याच्या पदार्थांचा होता. अन्य प्रदेशातला परदेश व्यापार अन्य मालाचा होता. भारतातील राजांनी एकमेकांकडून अधूनमधून सोने लुटले होते. अथवा तहाच्या कलमांत एकमेकांकडून मिळवले होते. तहांत मराठ्यांनी युद्ध जिंकल्यावर तहनाम्यात सोने मिळवलेले आहे, आणि पराभवाच्या तहनाम्यात सोने दिलेले आहे -- दोन्ही प्रकारचे उल्लेख सापडतात मराठ्यांच्या ऐतिहासिक कागदपत्रांत सापडतात. ही पद्धत अन्य राजांची सुद्धा असावी. अशा युद्धांतून भारत-भारताबाहेरील राजांमध्ये सोन्याचे हस्तांतरण झालेले असू शकेल.
- - -
ऋषिकेश, तुम्हीच नवीन धागा सुरू करावा. माझी माहिती धागा सुरू करण्याइतपत नाही. मला तुमच्या प्रश्नांचा ढाचा तितकासा कळला नाही. त्यामुळे माझी वरील उत्तरे समर्पक आहेत की नाहीत तेही कळलेले नाही.
सोने लुटणे
अर्थात! "सोने लुटणे" (मग त्याला दसर्याचा मुहूर्त लाभला तरी) ही आपली परंपरा नाही का!! ;-)