बिनडोकपणाचा कळस !

खासगी वितरणासाठी असलेली एक पुस्तिका अलिकडेच माझ्या वाचनात आली. त्यातील उतारे वाचताना आपण कुठल्या 'अंधार''युगात वावरत आहोत असे वाटू लागले. आपल्यातील काही 'उपक्रमीं'ना असल्या (बिनडोकपणाच्या!) लेखनामध्ये (नको तितके!) रुची असल्यासारखे वाटते म्हणून खास त्यांच्यासाठी काही उतारे टंकलिखित करण्याचे कष्ट घेत आहे.

आपला हिंदू धर्म मरणोत्तर जीवनाचा पुरस्कर्ता आहे. म्हणजेच हिंदू धर्म हा व्यक्तीच्या मृत्युनंतरसुद्धा त्याच्या आत्म्याचे अस्तित्व मानतो.... मृत्यु हा जीवनाचा शेवट नसून मृत्युनंतर नष्ट होतो तो फक्त देह! जे जाते ते केवळ जड शरीर !..... ज्याच्या त्याच्या पापांनुसार कमी जास्त काळ भोग भोगण्यासाठी भूतयोनीत आत्मा तडफडत राहतो. त्याला भयंकर क्लेष होतात; पण या त्रासातून तो स्वत:ची सुटका करून घेऊ शकत नाही.गतजन्मीच्या पापाचा हिशोब चुकता होईपर्यंत तसेच भावनांतून सुटेपर्यंत तो भूतयोनीत खिजपत पडतो. हे कार्यक्षेत्र नसून भोगक्षेत्र असल्याने तेथे कुठलेही कर्म करता येत नाही. तर फक्त केलेल्या कर्माचे भोग भोगावे लागतात. कर्म करू शकणार्‍या देहाअभावी भावनांची तीव्रता वाढते. निष्क्रिय परावलंबित्व त्याला बोचत राहते. फालतू गोष्टीत संपूर्ण जन्म व्यर्थ दवडल्याने प्रचंड दु:ख त्याला सलत राहते; पण ते व्यक्त करता येत नाही. ना तो संवाद करू शकतो, ना त्याला कृती करता येते!

अतृप्त आत्म्यास कमी पडणारे पुण्य त्याला कुठल्या माध्यमाद्वारे पोहोचविता येईल ह्यावर प्राचीन ऋषी - मुनींनी वर्षानुवर्षे केलेल्या अथक संशोधनाचे फलित म्हणजेच अंत्यसंस्कारादि अंत्यविधी आणि पिंडदानादि श्राद्धविधी!

सर्व शास्त्रशुद्ध विधिसहित योग्य प्रकारे मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जाणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तो मृतदेह आत्म्याचे त्या जन्माचे घर असतो व साहजिकच आत्म्याशी संलग्न भावना देहाशी निगडित असतात. देहाला जमिनीत पुरून त्या भावनांतून आत्म्यास सोडविणे शक्य नसते. पुन्हा पुन्हा आत्मा त्या देहाकडे आकर्षित होऊन मुक्तीच्या मार्गातून ढळू शकतो. आणि अंतिम ध्येयापासून वंचित राहतो. ह्याकरिता देहाचे पूर्ण ज्वलन करून तो संपूर्ण नष्ट करण्यासाठी अंत्यसंस्कारात देहाला अग्नी दिला जातो. शिवाय परमेश्वराने दिलेल्या देहाचे हवन करून तो त्यास समर्पित करण्याचा भाव त्यामागे आहे. त्याखेरीज ईश्वरी शक्तीच्या विरुद्ध कार्य करणाऱ्या असुरी शक्ती अग्नीला घाबरतात आणि म्हणूनच त्या मृतदेहाचा पर्यायाने त्या आत्म्याचा ताबा घेण्यास अशा शक्ती धजावत नाहीत.

काही महाभाग मृतदेहास अग्नी न देता विद्युतदाहिनीत जाळतात. ते शास्त्रान्वये पूर्णत: अयोग्य असून असे कदापि करू नये. लाकडात सुप्त शक्ती असल्याने लाकडाला धार्मिक महत्व आहे. ...चंदनाचे लाकूड पवित्र तर असतेच पण चंदनाची शीतलता आत्म्यास उद्विग्नता येऊ न देता शांत व विरक्त मार्ग दर्शवून मोक्षाकडे नेते. अग्नीसंस्कारात म्हणून लाकडाचा अग्नी असावा हेच खरे!

पाश्चात्य मान्यवर वैज्ञानिकांनी संशोधनांती सिद्ध केले आहे की आपल्या शरीरात आत्मा आहे व तो 'ईथर' ह्यासदृश रासायनिक घटकाचा बनला असून रक्तातील प्लाझ्मा अवस्थेतील एक्टोप्लाझ्म हा घटक पदार्थ त्याचा मूळ आधार असतो. प्रयोगांती आढळले की धार्मिकविधी, योगासने आणि सूर्य किरणात एक्टोप्लाझ्म दाट होते तर अमावास्येस व विवक्षित स्थळी ते विरळ होते. तपस्वी व्यक्तीभोवती एक्टोप्लाझ्म तेजस्वी सोनेरी छटा निर्माण करते तर मृत्युपंथावरील अत्यवस्थ व्यक्तीभोवती ते काळी छटा निर्माण करते. ह्या आत्म्याचे फोटो इन्फ्रा-रेड कॅमेराद्वारे घेतले गेले असून त्यात ते धुरकट भासतात. आत्म्याला मुक्ती देणे म्हणजे एक्टोप्लाझ्मच्या भोवताली जमलेली वलये, ज्यांना वासनादेह म्हणतात त्यातून त्यास, पूर्णत: मोकळे करणे.

मृत्युनंतर अंत्यसंस्कार यथाविधी केले असतील तरीही जोडीला श्राद्धविधी करणे जरूरीचे आहे. अतृप्त आत्म्याला मुक्ती मिळवण्याच्या मार्गात असणारे अडथळे दूर करण्यासाठी अंत्यसंस्काराच्या विधीमध्ये जरी भरपूर उपाययोजना असली तरीही तो आत्मा भावना-वासनामध्ये इतका खोलवर बुडालेला असतो की अंत्यसंस्काराचे उपाय त्यास पूर्णत: मुक्त करू शकत नाहीत. म्हणून यथासांग श्राद्धविधी केले जातात.

सप्त वासनादेहामध्ये अडकून पडलेले अतृप्त आत्मे अनेक बंधनामध्ये अडकलेले असतात. शारीरिक नव्हे तर मानसिक भूक त्यांना त्रस्त करते. अन्न, पाणी दिसले तरीही अन्न खाता येत नाही, पण अन्नाचा वास मात्र त्यांना पोहोचू शकतो. त्यांच्या नावे ठेवलेल्या अन्नाच्या वासनादेहावर ताबा मिळवून त्यास पितर ग्रहण करतात. श्राद्धविधी हा मुख्यत्वे अन्नदानाचा विधी आहे. सर्वच धर्मामध्ये अन्नदान हे सर्वोच्च मानले गेले आहे. विशिष्ट प्रकारे अन्नदान करून आत्म्यास कमी पडणारे पुण्य मिळवून देण्याचा प्रकार श्राद्धविधी अंतर्गत पार पाडला जातो. ह्यामध्ये कधी नव्हे तो कावळ्याला मोठा मान दिला जातो. कारण एक तर सर्व पशू - पक्षींपैकी कावळाच एक सहजपणे सापडतो व दुसरे म्हणजे त्याच्या काळ्या रंगामुळे पितरांना त्यावर पकड घेणे सोपे जाते. कारण सर्पाकारात पितरांचे मुख मानलेल्या राहूचा रंग काळा आहे.

हा फक्त ट्रेलर आहे, बाकी 'चित्रपट' भरपूर मोठा आहे व त्यात यापेक्षा जास्त भयानक, सुरस, व चमत्कारिक विधानांचा साठा आहे. अशा आत्म्याच्या गोष्ठींना गंभीरपणे घेणारे अजूनही आपल्यात आहेत याचे सखेदाश्चर्य वाटते. विपश्यनेचे गोयंका नेहमीच एक वाक्य घोळत असतात. "नेहमीच्या व्यवहारातील गोष्टीसाठी तुम्ही बुद्धी वापरा. परंतु धर्म व अध्यात्म या गोष्टी बुद्धीच्या पलिकडे आहेत." त्यामुळे बुद्धी, विचार, वैज्ञानिक दृष्टी, विवेक इत्यादींना गुंडाळून ठेऊनच अशा गोष्टींना सहमती दाखवायला लागेल.

सुज्ञास सांगणे न लगे!

लेखनविषय: दुवे:

Comments

मनोरंजक

वै़ज्ञानिक मुलामा असलेल्या (अंध)श्रद्धा अशा गोष्टींमुळे मनोरंजक बनतात.
बाकी हे सनातन प्रभात वाल्यांचे 'मनोरंजन' दिसते.
प्रकाश घाटपांडे

असेच

वै़ज्ञानिक मुलामा असलेल्या (अंध)श्रद्धा अशा गोष्टींमुळे मनोरंजक बनतात.
बाकी हे सनातन प्रभात वाल्यांचे 'मनोरंजन' दिसते.

असेच वाटले!

हा कळस आहे..

>>> पाश्चात्य मान्यवर वैज्ञानिकांनी संशोधनांती सिद्ध केले आहे की आपल्या शरीरात आत्मा आहे व तो 'ईथर' ह्यासदृश रासायनिक घटकाचा बनला असून रक्तातील प्लाझ्मा अवस्थेतील एक्टोप्लाझ्म हा घटक पदार्थ त्याचा मूळ आधार असतो. प्रयोगांती आढळले की धार्मिकविधी, योगासने आणि सूर्य किरणात एक्टोप्लाझ्म दाट होते तर अमावास्येस व विवक्षित स्थळी ते विरळ होते. तपस्वी व्यक्तीभोवती एक्टोप्लाझ्म तेजस्वी सोनेरी छटा निर्माण करते तर मृत्युपंथावरील अत्यवस्थ व्यक्तीभोवती ते काळी छटा निर्माण करते. ह्या आत्म्याचे फोटो इन्फ्रा-रेड कॅमेराद्वारे घेतले गेले असून त्यात ते धुरकट भासतात. आत्म्याला मुक्ती देणे म्हणजे एक्टोप्लाझ्मच्या भोवताली जमलेली वलये, ज्यांना वासनादेह म्हणतात त्यातून त्यास, पूर्णत: मोकळे करणे

हे वाचून तर हसू का रडू असे झालयं... हा कळस आहे..

- पिंगू

हे अत्यंत विनोदी लेखन

हे अत्यंत विनोदी लेखन निश्चित पणे पप्पू आठवले यांच्या सनातन कंपूतील एखाद्या लेखकाचं असणार...धर्म शास्त्राचं गोंडस(खर म्हणजे हिडिस)मार्केटिंग करण्याची कामगिरी अत्ताच्या काळात त्यांनीच उचललेली आहे.

सनातन हि संस्थाच

चमत्कारिक आहे,असे म्हणायला हवे.

*'पुढे येणार्‍या भीषण आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधना वाढवा !' - संस्थापक डॉ. जयंत आठवले

*'उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मुले आणि त्यांचे वर्तन'

या दोन गोष्टि बाबत वाचले तर आजही ते कोणत्या जगात आहेत ते कळेल.
त्याची खाली लिंक आहे.

http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2011/06/blog-post_7938.html#more

प्रभाकर नानावटी = सर्व पशू - पक्षींपैकी कावळाच एक सहजपणे सापडतो व दुसरे म्हणजे त्याच्या काळ्या रंगामुळे पितरांना त्यावर पकड घेणे सोपे जाते. कारण सर्पाकारात पितरांचे मुख मानलेल्या राहूचा रंग काळा आहे.

फुटलो वाचून
तसा उंदरांचा रंगही काळाच आहेना..

बाकी लेख वाचून भारी मनोरंजन झाले. धन्यवाद प्रभाकर नानावटी जी

ह.ह.प्.वा.

लेख वाचून हहपुवा झाली. अंधश्रद्धाविरोधी विधेयक पास झाले की असल्या लेखकांचा कायदेशीर समाचार घेता येईल. तोपर्यंत या लेखाच्या लेखकाला पकडून आणून त्याची रस्त्यामधून धिंड काढावी. --वाचक्नवी

सनातन प्रभात

सनातन प्रभात वाचल्यासारखेच वाटले. पण अशा लेखनात रस असलेले कुणीच अद्याप बाह्या सरसावून रिंगणात उतरलेले नाहीत, हे कसे?
सन्जोप राव

वैसे तो तुम्हीनें मुझे बरबाद किया है
इल्जाम किसी और के सर जाये तो अच्छा.

त्रिवार निषेध

आपल्यातील काही 'उपक्रमीं'ना असल्या (बिनडोकपणाच्या!) लेखनामध्ये (नको तितके!)

भारतीय संस्कृतीचा आणी अध्यात्माचा अपमान करणाऱ्या हिडिस लेखनाचा आणि प्रतीसादांचा मी निषेध करतो आहे. माफी मागा. निषेध, निषेध, त्रिवार निषेध.

(हो मला झुरळ असण्याचा अभीमान आहे.)

विनोदी

एकदम धम्माल विनोदी लेख येथे देऊन आमचे मनोरंजन केल्याबद्दल नानावटींचे आभार! ;)

पाश्चात्य मान्यवर वैज्ञानिकांनी संशोधनांती सिद्ध केले आहे की आपल्या शरीरात आत्मा आहे व तो 'ईथर' ह्यासदृश रासायनिक घटकाचा बनला असून रक्तातील प्लाझ्मा अवस्थेतील एक्टोप्लाझ्म हा घटक पदार्थ त्याचा मूळ आधार असतो. प्रयोगांती आढळले की धार्मिकविधी, योगासने आणि सूर्य किरणात एक्टोप्लाझ्म दाट होते तर अमावास्येस व विवक्षित स्थळी ते विरळ होते. तपस्वी व्यक्तीभोवती एक्टोप्लाझ्म तेजस्वी सोनेरी छटा निर्माण करते तर मृत्युपंथावरील अत्यवस्थ व्यक्तीभोवती ते काळी छटा निर्माण करते. ह्या आत्म्याचे फोटो इन्फ्रा-रेड कॅमेराद्वारे घेतले गेले असून त्यात ते धुरकट भासतात. आत्म्याला मुक्ती देणे म्हणजे एक्टोप्लाझ्मच्या भोवताली जमलेली वलये, ज्यांना वासनादेह म्हणतात त्यातून त्यास, पूर्णत: मोकळे करणे.

हे विनोदी म्हणावे की अकलेची कीव करावी काही कळत नाही. आत्म्याचे फोटो!!!!???

एक तर सर्व पशू - पक्षींपैकी कावळाच एक सहजपणे सापडतो व दुसरे म्हणजे त्याच्या काळ्या रंगामुळे पितरांना त्यावर पकड घेणे सोपे जाते. कारण सर्पाकारात पितरांचे मुख मानलेल्या राहूचा रंग काळा आहे.

हे वाचून ह. ह. पु. वा. म्हैस, अस्वल, कोकिळा, इ. काळ्या पशू-पक्षींना विसरलेत की काय?

विनोदी आणि ललित

ललितलेखन उपक्रमावर चालत नाही अशी काही उपक्रमाची धोरणे आहेत ना?

बिन्डोक

उपक्रमावर बिन्डोक लेखनही चालू नये असे वाटते. ;-) पण ही गंमत चालून जावी अपवादात्मक रितीने.

देहाला जमिनीत पुरून त्या भावनांतून आत्म्यास सोडविणे शक्य नसते. पुन्हा पुन्हा आत्मा त्या देहाकडे आकर्षित होऊन मुक्तीच्या मार्गातून ढळू शकतो.

बिगर हिंदू लोक सरसकट झोम्बी होतात असे दिसते.

हिंदुधर्माचे शत्रू

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्रद्धाळू लोकांच्या धार्मिक भावनांचा गैरफायदा घेऊन समाजावरील धर्मसत्ता अबाधित राखण्यासाठी आणि स्वर्थासाठी धर्ममार्तंडानी निरर्थक कर्मकांडे निर्माण करून धर्मशास्त्रात घुसडली. किंबहुना हेच ईश्वरप्रणीत धर्मशास्त्र आहे असे जनमानसावर बिंबवले.अंत्यसंस्कारांविषयीची ही कर्मकांडे म्हणजे अंधश्रद्धा आहेत.
हिंदुधर्माच्या वटवृक्षावर अशा अनेक अंधश्रद्धांची बांडगुळे माजली आहेत.ती मूळवृक्षाच्या जीवनरसाचे शोषण करीत आहेत.अनाठायी आत्मगौरव आणि आंधळा धर्माभिमान यांनी ग्रस्त झालेल्या सनातन सारख्या हिंदुत्ववादी संस्था अशा अंधश्रद्धांची पाठराखण करीत आहेत.
सध्या धार्मिक उत्सव,होम-हवनादि कर्मकांडे यांना देशभर ऊत आला आहे.त्यामुळे हिंदुधर्माची वेगाने वाढ होत आहे असे वाटते.पण हे चित्र भ्रामक आहे. वाढ बांडगुळांची होत आहे.मूळ धर्मवृक्ष वठत चालला आहे.
बांडगुळे समूळ काढून टाकली नाहीत तर [हिंदुधर्म=श्रीयंत्रे,ग्रहरत्ने,नजरसुरक्षा कवचे, हसरे बुद्ध, वास्तुदिशाभूलशास्त्र इ.] असे समीकरण होईल.
खर्‍या हिंदुधर्मीयांनी हें संकट ओळखायला हवे.

हिंदुधर्माचे शत्रू

श्रद्धाळू लोकांच्या धार्मिक भावनांचा गैरफायदा घेऊन समाजावरील धर्मसत्ता अबाधित राखण्यासाठी आणि स्वर्थासाठी धर्ममार्तंडानी निरर्थक कर्मकांडे निर्माण करून धर्मशास्त्रात घुसडली. किंबहुना हेच ईश्वरप्रणीत धर्मशास्त्र आहे असे जनमानसावर बिंबवले.अंत्यसंस्कारांविषयीची ही कर्मकांडे म्हणजे अंधश्रद्धा आहेत.

अतिशय आवडले.

हिंदुधर्माच्या वटवृक्षावर अशा अनेक अंधश्रद्धांची बांडगुळे माजली आहेत.ती मूळवृक्षाच्या जीवनरसाचे शोषण करीत आहेत.अनाठायी आत्मगौरव आणि आंधळा धर्माभिमान यांनी ग्रस्त झालेल्या सनातन सारख्या हिंदुत्ववादी संस्था अशा अंधश्रद्धांची पाठराखण करीत आहेत.
सध्या धार्मिक उत्सव,होम-हवनादि कर्मकांडे यांना देशभर ऊत आला आहे.त्यामुळे हिंदुधर्माची वेगाने वाढ होत आहे असे वाटते.पण हे चित्र भ्रामक आहे. वाढ बांडगुळांची होत आहे.मूळ धर्मवृक्ष वठत चालला आहे.
बांडगुळे समूळ काढून टाकली नाहीत तर [हिंदुधर्म=श्रीयंत्रे,ग्रहरत्ने,नजरसुरक्षा कवचे, हसरे बुद्ध, वास्तुदिशाभूलशास्त्र इ.] असे समीकरण होईल.
खर्‍या हिंदुधर्मीयांनी हें संकट ओळखायला हवे.

वरिल प्रमाणेच.
अवांतरःअशा बांडगुळांमुळेच धर्मांतरे होत असावित,

अगदी अगदी

यनावाला सर, तुमचे मत पूर्णपणे पटले. स्वा. सावरकरांचे विचार असेच होते. महान द्रष्टा विचारवंत होता तो. पण नतद्रष्ट लोकांनी त्यांच्या विचारांची माती केली.

मूळ धर्मवृक्ष वठत चालला आहे.

- हा धर्म मुळात नक्की कसा होता/आहे? - ते मात्र कळत नाही. आपण काही वाचले असेल/चिंतन केले असेल तर जरूर लिहावे.

+१००००

१. हा धर्म मुळात नक्की कसा होता/आहे? - ते मात्र कळत नाही. - लाखमोलाचा प्रश्न आहे.

२. आपण काही वाचले असेल/चिंतन केले असेल तर जरूर लिहावे. - यावर बरेच सविस्तर प्रतिसाद मिळावेत अशी आशा/ उत्सुकता आहे.

एक सुचवण

नमस्कार. तुम्ही विचारलेले प्रश्न मोलाचे आहेत. त्या सन्दर्भात 'संतधर्म जीवनदर्शन' - श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर (सांगाती प्रकाशन, मूल्य रु. १५) हे पुस्तक अवश्य वाचा.

(आपल्या धर्माच्या झाडावरची बांडगुळे काढण्याचे काम मोठ्या तडफेने आणि हौसेने सगळीकडे चालूच आहेच. त्या सपाट्यात अजून तरी झाड मेलेले नाही. कुणीतरी सातत्याने खतपाणी पुरवत राहिल्याने आणि मुळातच मजबूत असल्याने ते तग धरून आहे एवढेच म्हणेन.)

पुर्ण सहमत

+१०००००००००

१००% सहमत

१००% सहमत

- शिपाईगडी

 
^ वर