आध्यात्मिक प्रवचन

आध्यात्मिक प्रवचन
परवा एका प्रवचनाचे श्रवणसुख अनुभवायला गेलो होतो.प्रवचनकार आध्यात्मिक क्षेत्रातील ख्यातनाम वक्ते होते.त्यांच्या वक्तृत्वाची आणि गहनगूढ विषयावरील अभ्यासपूर्ण निरूपणाची वाखाणणी वृत्तपत्रात वाचली होती.
अशा या महान वक्त्याचे एकतरी प्रवचन याचि देही याचि कर्णी ऐकावे या हेतूने सभागृहात गेलो. पुष्कळ स्त्री-पुरुष श्रोते जमले होते.मला जरा विलंब झाला होता.पण मागच्या रांगेत एक खुर्ची मिळाली.तिथे बसलो.कार्यक्रम सुरू झाला.एक ध्वनिवर्धक जवळच होता.आवाज सुस्पष्ट येत होता.प्रवचन ऐकू लागलो. नामवंत वक्त्याचे शब्द कानावर पडत होते:
"ब्रह्मवर्चस्व पुरुष हा ब्रह्मस्वरूप असूनही तो जेव्हा आत्मस्वरूपी गूढ गुहेमध्ये प्रविष्ट होतो,तेव्हा तो जणू विराट पुरुषाला आपल्या देहातच कोंडून घेतो.हे जडचेतनात्मक संपूर्ण विश्व त्याच्या महाकाय देहात सामावलेले असते.
श्रीमद्भगवद्गीतेतील अकराव्या अध्यायात विश्वरूपदर्शनवर्णन आहे ते याच पुरुषाचे.पुरुषसूक्तातील विस्मयकारक आदिपुरुष तो हाच.हा विश्वपुरुष निर्गुणतेतून ज्योतिर्मय होतो.
तो कालात्मा.तोच संवत्सर. तोच ऋतू.तोच पक्ष.अहर्निशही तोच.त्याला जाणणे महत्त्वाचे.
कालातीतातून तो जेव्हा कालस्वरूपात व्यक्त होतो तेव्हा तो विराटपुरुष चतुष्पाद होतो.
त्याचा एक चरण म्हणजे हे मर्त्य विश्व.उर्वरित तीन चरण म्हणजे ज्योतिर्मय जगज्जननी.तीच आदिमाया.तीच आदिशक्ती.तीच काली.ती विराटपुरुषाच्या तीन चरणांतून प्रकट होते.त्याने निर्माण केलेले ऋक्-साम हे अभेद्य अद्वैत आहे.विश्वोत्पत्तीपासून अनंतकाळ पावेतो हेच अद्वैत विश्व व्यापून राहाणार आहे.
चक्षू हे ऋक् आणि आत्मा हा साम
वाक् हे ऋक् आणि प्राण हा साम
कर्ण हे ऋक् आणि मन हे साम
असे हे निर्भेद्य अद्वैत आहे. ते अविनाशी आहे.हा छांदोग्यातील विचार अत्यंत गूढ आणि गंभीर आहे.हा विचार जणू आत्मचक्षूच.यांतूनच चाक्षूस पुरुषाचा आदिसंकल्प हुंकारला.हे ताम्रवर्णीय रूप म्हणजे जणू महालक्ष्मीचा महन्मंगल पदरच! "

प्रवचनकारांचा अस्खलित वाक्प्रवाह धो धो चालू होता.
मी चक्रावलो.प्रवचनाचा विषय आहे तरी काय? एवढ्या शिरा ताणून,हातवारे करून हे महाशय काय सांगण्याचा प्रयत्‍न करीत आहेत? लक्ष केंद्रित करण्याचे कितीही प्रयास केले तरी मला काहीच कसे समजत नाही? कशावर काय बोलताहेत याचा काहीच कसा पत्ता लागत नाही?
प्रवचन मराठी भाषेत आहे. शब्द तसे परिचयाचे आहेत.पण सुसंगत असा अर्थ काही लागत नाही.
इतर श्रोत्यांकडे पाहिले.स्त्री-पुरुष सगळे तल्लीन होऊन ऐकत होते.माना डोलावत होते.काहीजण तर टिपणे घेत होते !
हे सर्व लोक माझ्याहून एवढे वेगळे कसे? त्यांना हे सगळे समजते आहे.मग मलाच कसे काही समजत नाही? का हे शब्द म्हणजे मंत्रच आहेत? मंत्रशक्तीवर माझी श्रद्धा नसल्याने माझ्यावर त्यांचा प्रभाव पडत नसावा काय? का माझ्या डोक्यावर काही आघात झाला आहे? माझी विचारशक्ती ठप्प झाली आहे? कांही कळेना.
प्रवचनकार जणू देहभान विसरून सांगत होते:
.
"सर्वदेवस्वरूप मातेने अर्गलारूपी भद्र संकल्प विश्वारंभापासून करून ठेवला आहे. तो अभेद्य आहे.मन हे त्यानंतर निर्माण झाले.सूर्य हा विश्वात्म्याचा प्राण आणि चंद्र हे विश्वात्म्याचे मन आहे. चंद्रमा मनसो जात: असे म्हटले आहे......"
.
आता मात्र सहनशीलतेची परिसीमा झाली.मागचा दरवाजा किलकिला उघडून मी सभागृहाच्या बाहेर पडलो आणि हुश्श्य केले!
बाहेर पडून चालत चालत घरी जाताना माझा "आपुला संवाद आपणाशी झाला.तो असा:
.
"सभेतून गुपचूपपणे मागच्या दाराने बाहेर पडलास ते योग्य झाले नाही."
.
"पण ते प्रवचनकार जे बोलत होते त्याचा सुसंगत असा काही अर्थच लागत नव्हता.केवळ वाक्ये. बहुतेक अर्थशून्य. ते ऐकणे असह्य झाले"
.
"असे होते तर उभे राहून त्यांना सांगायचे की तुम्ही बोलत आहात ते असंबद्ध आहे.त्यातून कोणताही सलग सुसंगत अर्थ व्यक्त होत नाही."
.
" तसे सांगितले असते तर तो शिष्टाचाराचा,सभ्यतेचा भंग झाला असता."
.
"इथे खरे ते न सांगण्यात सभ्यता असेल तर ती सभ्यता अशोभनीय होय."
.
"भर सभेत उठून एवढ्या नामवंत प्रवचनकारांना --तुमचे बोलणे असंबद्ध आहे--असे म्हटले असते तर श्रोत्यांनी ’खाली बसा ! गप्प राहा’ असा गिल्ला केला असता.
.
"आपले प्रामाणिक मत व्यक्त करण्यासाठी एवढे सहन करायला हवे.श्रोत्यांनी आरडा ओरडा केला असता.पण तुला मारहाण केली नसती.काही श्रोत्यांना तुझे मत पटलेही असते कदाचित्."
.
"मारझोड केली नसती हे खरे."
.
" 'राजाचे अदृश्य कपडे' ही गोष्ट ठाऊक आहे ना?"
.
"हो.पूर्वी इंग्रजी विषयाच्या पुस्तकात होती."
.
"महाराजांच्या अंगावर कपडे नाहीत.ते नग्न आहेत.हे कोणीतरी स्पष्टपणे सांगणे आवश्यक असते."
.
" हे पटले.खरे आहे. चुकले माझे.मी भरसभेत उठून माझे मत मांडायला हवे होते. तसे न करण्यात चूक झाली खरी"
.
" शाळेत होतास तेव्हा तुझ्या अशा पश्चातबुद्धीविषयी आई काय म्हणायची आठवते का?"

"होय. पण स्वभावो दुरतिक्रम:।"
......................................................................................................
[ प्रवचनात काय ऐकले ते घरी आल्यावर लिहून काढायचा प्रयत्‍न केला.पण जे ऐकले त्यात काही सुसंगतता नसल्याने काही आठवेना. मग कल्पनेने अर्थशून्य असंबद्ध वाक्ये लिहिता येतात का ते पाहिले. प्रवचनाच्या तोडीचे लिहिणे महाकर्मकठिण वाटले. प्रवचनाशी मिळती जुळती वाक्ये पुस्तकात सापडली.ती इथे दिली आहेत.]
..........................................................................................................

Comments

भा'शा'आणि आकलन

भाषा हे संवादाचे माध्यम असल्याचे सातत्याने म्हटले जात असले तरी ते पूर्णांशाने खरे नाही. बरेचदा भरपूर काही बोलून काहीही न सांगण्याचे कामही भाषेच्या माध्यमातून बेमालूमपणे करता येते. हे केवळ अध्यात्माच्याच क्षेत्रात होते असे समजण्याचे कारण नाही.
म्हणजे उदाहरणार्थ नेमाड्यांच्या पुस्तकाचे शीर्षक किंवा मार्क्सवाद्यांची बुर्झ्वा समाजव्यवस्थेतल्या त्रुटींबद्दलची टिपणे किंवा समीक्षकांच्या साक्षेपी लेखनातले जाणिवांच्या कक्षा रुंदावणारे व्यामिश्र मनोव्यापारांचे कल्लोळ किंवा संध्यामग्न ग्रेसच्या चंद्रमौळी कवडशांचे तुकडे किंवा सतिश रावलेंचे भाशाविशयक कॅलिडोस्कोपिक विचार ही काही वानगीदाखल उदाहरणे सांगता येतील, जी वाचतांना/ऐकतांना मनातून नकळत 'व्हॉट द #*' असा एक अस्फुट हुंकार बाहेर पडतो.

काही वेळा आपली समज कमी पडत असते, काही वेळा विषयच गहन असू शकतो. क्वचित दोन्ही कारणे असतात किंवा काहीही कारण नसते.
पण असे अनुभव येतात, याच्याशी सहमत आहे. :)

यनांचा लेख नेहमीप्रमाणेच आवडला, हेवेसांनकोच.

शाब्दिक गोंगाट

लेख आवडला आणि ज्ञानेश... यांचा वरचा प्रतिसादही. काहीवेळा एखाद्या गोष्टीची उकल करून देताना केवळ शाब्दिक गोंगाट ऐकू येतो. या शाब्दिक गोंगाटात मूळ विषय आणि आशय हरवला जातो त्याचे हे उदाहरण वाटले.

अशावेळेस मागल्या दाराने चालू पडणे हा एक उत्तम पर्याय आहे असे मला वाटते त्यामुळे यनांनी इतरांच्या समाधानात भंग आणला नाही आणि चालू पडून स्वत:चेही समाधान केले.

प्रवचनात काय ऐकले ते घरी आल्यावर लिहून काढायचा प्रयत्‍न केला.पण जे ऐकले त्यात काही सुसंगतता नसल्याने काही आठवेना. मग कल्पनेने अर्थशून्य असंबद्ध वाक्ये लिहिता येतात का ते पाहिले. प्रवचनाच्या तोडीचे लिहिणे महाकर्मकठिण वाटले. प्रवचनाशी मिळती जुळती वाक्ये पुस्तकात सापडली.ती इथे दिली आहेत

या खुलाशाबद्दल आभारी आहे. जी गोष्ट मेंदूला रूचत नाही, कळत नाही ती गोष्ट स्वीकारण्याचे आणि लक्षात ठेवण्याचे मेंदू नाकारतो असे वाटते. लेख वाचताना यनांनी ती आध्यात्मिक वाक्ये कशी बरे लक्षात ठेवली असा प्रश्न पडला होता त्याची उकल झाली. :-)

असेच अजुन एक प्रवचन

- शिपाईगडी

काही शंका..

माझ्या भाबड्या मनाला काही शंका पडतायत्...
१. जर् का तुम्हाला एकंदरीतच् अध्यात्म् या विषयातले काहीही कळत् नाही, तर् तुम्ही अशा 'प्रवचनाचे श्रवणसुख अनुभवायला' गेलातच् कशाला?
मागाहून् अशा 'कळ्लेच् नाही' वगरै तक्रारी करण्यात् काही अर्थ् नाही.
२. प्रवचनाचा विषय आहे तरी काय? एवढ्या शिरा ताणून,हातवारे करून हे महाशय काय सांगण्याचा प्रयत्‍न करीत आहेत? हे तुम्हाला इतका वेळ् ऐकून् अजूनही कळत् नसेल्, तर् इथे धागा टाकून् कळेल् अशी आशा आहे की काय्?
३. लोकाना कळत् असेल् किंवा नसेल्, तो त्यांचा प्रत्येकाचा वैयक्तिक् प्रश्न आहे.
त्यांन कळत् नसूनच ते 'राजाचे अदृश्य कपडे' या गोष्टीतल्याप्रमाणे वागत् आहेत् या निषकर्षाला काही पुरावा आहे का? तुम्ही तिथे उपस्थित् असलेल्या किती टक्के लोकांशी यावर् चर्चा केलीत्?
४. चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज् उठवावा हे शंभर् टक्के खरय्. पण् आकळत् नसलेली प्रत्येक् गोष्ट चुकीचीच् आहे, हे कसे काय्?

बाकी वर् उधृत केलेली वाक्य मूळ् प्रवचनातील् नसल्याने, त्याबद्दल् इच्छा असूनही काहीही लिहिणार् नाही.

-कविता

+१

बाडिस!

(काय गाम्भिर्याने घ्यावे आणि काय थट्टेवारी न्यावे हे बघणार्याच्या 'गेस्टाल्ट' प्रमाणे ठरते.)

माझा अनुभव

अशी काही प्रवचने मी जराशी ऐकली आहेत. आजकाल त्यासाठी कुठे जाण्याची गरज नसते. आस्थासारख्या वाहिनीवर ती घरबसल्या ऐकायला मिळतात. मी त्यातला गुह्य अर्थ वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न न करता वक्त्याचा आविर्भाव, हातवारे, त्याच्या आवाजातील चढ उतार, श्रोत्यांच्या मुद्रेवरील भाव वगैरेकडे लक्ष ठेवतो. ते खूप मनोरंजक असते. असे काही तरी 'देवाचे' नुसते कानावर पडले की आपला उद्धार होतो असा विश्वास बाळगणारे अनेक लोक असतात. कदाचित माझाही होईल !
कुठल्याशा स्वामीजींच्या प्रवचनावर स्व.पु.ल.देशपांडे यांचा मस्त ले़ख आहे.

असो

असे काही देवाचे नुसते कानावर पडले तरी तिळपापड होणारे, इनोदबुद्धी जागृत होणारे, देवाचाच उद्धार करणारे, त्याला रिटायर करणारेही बरेचजण असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती.

+

खूप खूप हसणारे

नसलेल्या देवाच्या नावाने बिले

इनोदबुद्धी जागृत होणारे, देवाचाच उद्धार करणारे, त्याला रिटायर करणारेही बरेचजण असतात.

देवही कसा गुपचूप ऐकून घेतो कळत नाही. हे सगळे बाबाबुबा आणि त्यांचे भक्तबिक्त वगैरे नसलेल्या देवाच्या नावाने बिले फाडतात. दुसरे काय.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

जो तो आपल्या 'ह्या'त

वरील काही प्रतिसादांमध्ये 'जाऊ द्या हो, ऐकणारे ऐकतात, आनंद मिळवणारे आनंद मिळवतात. तुम्ही कशाला त्रास करुन घेता?' असा एक भाव आला आहे. असा तटस्थपणा लोकप्रियतेच्या स्पर्धेत असलेल्यांसाठी ठीक आहे. पण काहीतरी घुसळले जाऊन काही नवनीत वर यावे अस हेतू असलेल्यांना अशा चर्चांचे वावडे नसावे. वर पु.लंच्या एका लेखाचा उल्लेख आला आहे. 'एक शून्य मी' हे पु.लंचे पूर्ण पुस्तकच अशा रुढी-रीती-चालींचा धांडोळा घेणारे आहे (ते विनोदी पुस्तक नाही!) यनावाला सरांच्या चर्चाप्रस्तावातून आस्तिकांचे लोंढे नास्तिकतेच्या ओढ्यांतून वाहू लागतील अशी अपेक्षा नाही. पण बाबांच्या शब्दबंबाळ प्रवचनात गुंगून जाणार्‍या, अगदी टिपणेबिपणे काढणार्‍या एखाद्याला तरी आपण काय करतो आहोत हे तपासून बघावेसे वाटले तरी या चर्चाप्रस्तावाचे सार्थक झाले, असे मला वाटते.
राहता राहिला प्रश्न त्रास करुन घेण्याचा. तो काही लोकांना आपसूकच होतो. त्यासाठी 'चला आज थोडा समाजातल्या अनिष्ट रुढींचा त्रास करुन घेऊया' अशी बैठक मारावी लागत नाही. त्याबाबत तुष्टतुंदिल आहारभयमैथुनी मालिकावाद्यांनी विचार करत बसू नये. लोक अस्वस्थ होतात, लिहितात, बोलतात, कुठेतरी काहीतरी हलते, काहीतरी तुटते, काहीतरी बदलते. कळत-नकळत हे सगळे सुरुच राहते.
सन्जोप राव

वैसे तो तुम्हीनें मुझे बरबाद किया है
इल्जाम किसी और के सर जाये तो अच्छा.

पु. लं. चा लेख

त्यांना असामी असामी मधलं कायकिणी गोपाळरावांच्या आध्यात्मिक गुरुंचे भाषण म्हणायचे असेल. - आय इन द यू इन द यू ... पुलंचा 'आम्ही शून्यात जातो' हा लेख सामाजिक बाबां/आचार्य (विनोबा) यांच्यावरची टिका आहे.

- ओंकार.

विनोबा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.ओंकार लिहितातः"पुलंचा 'आम्ही शून्यात जातो' हा लेख सामाजिक बाबां/आचार्य (विनोबा) यांच्यावरची टिका आहे."

नाही हो! विनोबांवर मुळीच नाही.पुल विनोबांवर टीका करतील हे कदापि संभवत नाही. तुझे आहे तुजपाशी मधील 'आचार्य पोफळे गुरुजी' हे पात्र विनोबांवर बेतले आहे असे काहीजण समजतात.पण तो सर्वस्वी चुकीचा समज आहे.
श्री.सन्जोपराव यांनी ज्या 'एक शून्य मी' या पुस्तकाचा उल्लेख केला आहे त्यांतील "विनोबा जवळचे आणि दूरचे'' हा लेख वाचावा.(तसे सर्वच वाचावे)म्हणजे पुलंना विनोबांविषयी किती आदर होता याची कल्पना येईल.

लेख वाचला नाही

लेख वाचला नाही त्यामुळे काही भाष्य करत नाही.

पण आणिबाणीचे समर्थन ('अनुशासन पर्व') केल्यामुळे विनोबांवर आणिबाणीच्या विरोधातील बहुतांश लोक नाराज होते. या नाराज लोकांमध्ये पु.ल. ही होते का?

- ओंकार.

आम्ही शून्यात जातो - विनोबांचा उल्लेख

"आम्ही शून्यात जातो" लेखात विनोबांचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यातील रोख विनोबांकडेच असावा. आणि बहुतांश टीका अनुशासनपर्वाबाबत आहे.

आचार्य पोफळे गुरुजी मात्र विनोबांवर बेतलेले नसून आणखी काणावरतरी बेतलेले आहे, असे ऐकलेले आहे. आचार्य पोफळे गुरुजींच्या वागण्याबद्दल टीका असली, तरी त्यांच्या आंतरिक ऊर्मीबद्दल काहीशी सहानुभूती आहे.

"पु. ल. एक साठवण" या संग्रहात "काय म्हणाले गुरुदेव" नावाचा एक लेख वाचलेला आहे. त्या लेखात "आय ऍम द यू ऑफ द हू" असे काहीसे प्रवचन देणारा गुरुदेव आहे. (हा लेख मुळात "असा मी असामी"मधील असावा - खाली श्री. घारे सांगतात तोच असावा.)

ब्रह्मचारी आणि तुझे आहे तुजपाशी

"आम्ही शून्यात जातो" लेखात विनोबांचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यातील रोख विनोबांकडेच असावा. आणि बहुतांश टीका अनुशासनपर्वाबाबत आहे.

-सहमत.

आचार्य पोफळे गुरुजी मात्र विनोबांवर बेतलेले नसून आणखी काणावरतरी बेतलेले आहे, असे ऐकलेले आहे. आचार्य पोफळे गुरुजींच्या वागण्याबद्दल टीका असली, तरी त्यांच्या आंतरिक ऊर्मीबद्दल काहीशी सहानुभूती आहे.

- आचार्य अत्रे यांचे "ब्रह्मचारी" आणि पुलंचे "तुझे आहे तुजपाशी" यांची मध्यवर्ती संकल्पना समान आहे, 'कोणा एका गुरुच्या शिकवणूकीमुळे ब्रह्मचर्य स्विकारणारा तरुण आणि नंतर त्याचे मतपरिवर्तन होउन प्रपंचात परत येणे'. त्याकाळी स्वामी शिवानंद यांनी लिहिलेले "ब्रह्मचर्य हेच जीवन" पुस्तक आणि त्यासोबत स्वामींची प्रवचणे, याचा परिणाम होउन अनेक तरुण ब्रह्मचर्याची शपथ घ्यायचे. त्याला प्रत्युत्तर म्हणून अत्रे यांनी ब्रह्मचारी लिहिले होते व त्यातील आचार्याचे पात्र स्वामी शिवानंदांवर बेतलेले आहे, पुलंचे नाटक स्वातंत्र्यानंतर आले तरिही आचार्यांचे पात्र याच स्वामींवर आधारित आहे आणि काकाजींचे पात्र हे पुलंच्या मनातले विचार सांगते.

- शिपाईगडी

आम्ही शून्यात जातो

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.शिपाईगडी यांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण साधार विवेचन अगदी योग्य आहे. पटण्यासारखे आहे.पटलेच.धन्यवाद!

'खिल्ली'

पुलंनी विनोबांवर टीका करणारा एक लेख लिहिला आहे. 'खिल्ली' या पुस्तकात वाचता येईल. 'आम्ही सूक्ष्मात जातो' असे शीर्षक आहे. हा लेख जुलै १९७८ मध्ये लिहिला होता. आणीबाणीच्या काळात विनोबांची भूमिका न पटल्याने हा लेख लिहिला आहे. विनोबांच्या विनीदी ढंगाने चितारलेल्या व्यक्तिरेखेसह. खास पुल शैलीत. विनोबा-जेपी यांच्यामधील मतभेदांचाही उल्लेख आहे.

त्यांनी विनोबांबद्दल सकारात्मक असे दोन लेख लिहिले आहेत. एक 'गणगोत' मध्ये (मला दिसलेले विनोबा). हा लेख १९५४ सालचा आहे. आणि एक 'एक शून्य मी' मध्ये (दूरचे विनोबा आणि जवळचे विनोबा). हा लेख प्रथम म.टा. मध्ये प्रकशित झाला होता. ९ सप्टेंबर, १९७३.

तेच

असामी असामी मधलं कायकिणी गोपाळरावांच्या आध्यात्मिक गुरुंचे ....
तेच असावेत.
शिष्याचा प्रत्येक रोग स्वतःवर घेणारे हे गुरू एका शिष्यिणीच्या कुत्र्याच्या शेपटीला झालेला फोड आता कुठे घेणार आहेत असा पुलंना प्रश्न पडला होता.

प्रतिसाद आवडला

राव साहेब, तुमचा प्रतिसाद आवडला. मूळ लेखात दिलेले उदाहरण 'अनिष्ट रूढी' या प्रकारातले नाही. त्यामुळेच लेखकाचे त्रास करून् घेणे अनाठायी आहे असे वाटते. टिपणे बिपणे काढणार्याना असेल त्या विषयात स्वारस्य, आपण सगळ्याना सरसकट भम्पक ठरविण्यासाठी (तसे ठरवण्याचाही त्रास काहीना आपसूकच होतो) लेख वगैरे लिहावा का हे लेखकाने तपासून पाहिले तर कविता यान्च्या प्रतिक्रियेचेही सार्थक होईल.

गृहीत धरले

--इतर श्रोत्यांकडे पाहिले.स्त्री-पुरुष सगळे तल्लीन होऊन ऐकत होते.माना डोलावत होते.काहीजण तर टिपणे घेत होते !--

ह्या वाक्यात एक उपहास आहे- यनावालांनी असे गृहीत धरले आहे की, त्यांना एखादा अर्थ नाही कळला की, इतरांनाही त्याचा बोध झाला नाही पाहीजे.

प्रत्येक शाखेची एक भाषा असते हे यनावाला नाकारु शकणार नाहीत- बोटनीच्या शाखेतील ल्याटीन नावे, मेडीकल सायन्सची भाषा, शासकीय मराठी भाषा, ई उदाहरणे त्यास पुरेशी आहेत. तशीच आधात्मवाल्यांची वेगळी भाषा असणे गैर काय. ती तुम्हाला समजत नसेल तर त्या भाषेतील शब्दांचा अर्थ लावा - जसे तुम्ही इतर सगळ्या वेळी करता. हॉलिवुडमधे अमेरीकन इंग्रजीमधे तयार झालेल्या चित्रपटाला ब्रिटीश इंग्रजी सबटायटल्स् लावुन तो चित्रपट इंग्लंड मधे दाखवले गेले अशी माहिती मध्यंतरी ऐकली होती.- पॉइंट असा आहे की, एखादी भाषा कळत नसली की, ती कळण्यांवर काहीतरी चिखलफेक करुन आकांडतांडव करण्यापेक्षा समजुन घेऊन बोध घ्यावा.

संवाद आवडला

आपुला संवाद आपणाशी आवडला. अगदी आमच्या मनातलाच.
बर्‍याच वेळा आपण जगरहाटीसाठी आपल्याला न आवडणार्‍या गोष्टी सुद्धा करतो.त्याचा आपल्याला मानसिक त्रासही होतो. तो कुठेतरी व्यक्त करावा असे नक्कीच वाटते.प्रवचनकाराचे शब्दबांबळ्य अगदी प्रातिनिधिक आहे. अगदी विद्यावाचस्पणीय.
मागच्या दाराने कल्टी मारताना अगदी अपराधी वाटत पण काय करणार नाईलाज असतो. किती सहन करायचं?
प्रकाश घाटपांडे

नवीन शब्दप्रयोग

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कांही प्रतिसादांतील नवीन शब्दप्रयोग समर्पक आणि अर्थवाही आहेत.उदाहरणार्थः
.
"संध्यामग्न (कवि) ग्रेस"....ज्ञानेश
.
"शाब्दिक गोंगाट".......प्रियाली
.
"तुष्टतुंदिल आहारमैथुनी मालिकावादी"(का मालिकाप्रेमी?)....सन्जोपराव.
.
"शब्दबांबळ्य,..विद्यावाचस्पणीय".... प्रकाश घाटपांडे
धन्यवाद!

अध्यात्माच्या संकल्पना

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कविता११ आणि श्री.गिरीश यांच्या प्रतिसादांवरून दिसते की मला(यनावालाला) अध्यात्मातले ओ की ठो कळत नाही असे त्यांनी गृहीत धरले आहे. नम्रतापूर्वक सांगतो की अध्यात्मविषयाचा माझा थोडा फार अभ्यास आहे.अध्यात्म हे आत्म्याविषयी असल्याने ते मूलतः औपनिषदिक तत्त्वज्ञान आहे.ईशादि नऊ उपनिषदे (हरिकृष्णदास गोयंदका यांच्या हिंदी टीकेसह) वाचली आहेत.तसेच आणखी चार उपनिषदे (स्वामी चिन्मयानन्द यांची इंग्रजी टीका) पूर्ण वाचली आहेत. महर्षी व्यास रचित वेदान्त दर्शन अर्थात ब्रह्मसूत्र (हरिकृष्णदास गोयंदका यांची संस्कृतप्रचुर हिंदी टीका) या ग्रंथाचे वाचन केले आहे.तसेच गीता,ज्ञानेश्वरी यांचे वाचन आहेच. त्यामुळे अध्यात्माची परिभाषा, त्यांतील संकल्पना यांचे बरेचसे शब्दज्ञान मला आहे.मात्र अनुभूती,साक्षात्कार,दृष्टान्त असले प्रकार नाहीत.
असल्या प्रवचनांचे बहुसंख्यश्रोते वक्त्याच्या प्रभावाखाली असतात. "परब्रह्म परमेश्वर निर्गुण निराकार असतो" असे ऐकले की मान डोलावायची.घरी देवमूर्ती समोर अर्धा तास बसून तिची शोडषोपचारे पूजा करायची."मृत्यूनंतर देह पंचत्वात विलीन होतो "हे टिपून घ्यायचे.मात्र मृत आप्ताच्या नावे श्राद्ध करून ब्राह्मण भोजन घालायचे.का? तर स्वर्गातील मृत आप्ताला अन्न मिळावे. एकतर त्यांना अर्थ कळत नाही.किंवा स्वतःचा असा कोणताही ठाम विचार नाही.
.
माझ्या परिचयाचे एक गृहस्थ आहेत.ते ठासून सांगतात,"अहो व्हायचे ते होणारच! ते कधी चुकत नाही.त्याची चिंता का करायची? म्हटलेच आहे--होणारे न चुके कधीही जरी ये ब्रह्मा तया आडवा|" मात्र रस्ता ओलांडताना ते दोन्ही कडची वाहने मान वेळावून वेळावून काळजीपूर्वक बघतात.सुरक्षित वाटले तरच क्रॉस करतात. होणारे चुकवतात!

व्याख्या

अध्यात्म हे आत्म्याविषयी असल्याने ते मूलतः औपनिषदिक तत्त्वज्ञान आहे.ईशादि नऊ उपनिषदे (हरिकृष्णदास गोयंदका यांच्या हिंदी टीकेसह) वाचली आहेत.

हे नवीनच कळले.

माझ्या ऐकीव माहिती प्रमाणे कुणाच्या "अध्यात" अथवा "मध्यात" कसे राहू नये ह्याच्या शिकवणीस "अध्यात्म" म्हणतात. :-)

बाकी अध्यात्म ह्या शब्दाला इंग्रजी समानार्थी शब्द काय आहे?

चिंतामुक्ती

अहो व्हायचे ते होणारच! ते कधी चुकत नाही. यापेक्षा त्याची चिंता का करायची? हे जास्त महत्वाचे आहे.
काळजी करत राहण्यामुळे उद्भवणारे अनेक विकार चितामुक्त झाल्यामुळे टळ्तात. 'मन चिंती ते वैरी न चिंती' असे म्हणतात. 'व्हायचे ते होणारच' हे अशा शंकाकुल मनाची समजूत घालण्यापुरते असते. त्यावर खरोखर विश्वास ठेऊन कोणीही विसंबून रहात नाही.

वदतो व्याघातः|

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
होणार त्याची चिंता आणि घडले त्याचा शोक करू नये हे खरेच.गतं न शोच्यम् | असे म्हटलेच आहे. पण इथे घडणारे न चुके.. असे म्हणणारे गृहस्थ घडणारे चुकविता येते हे स्वतःच सिद्ध करून दाखवित आहेत,याची गंमत वाटते इतकेच.

पुन्हा.....

पुन्हा एकदा लोक कायकाय करतात, यावर टीका वाचायला मिळाली.
लोक म्हणजे किनै 'एकदम हेच्च' आहेत, अशा प्रकारचा सतत लावलेला सूर खटकतो, म्हणून मी काही शंका विचारल्या.

पुन्हा एक शंका; ९ उपनिषदे वाचून्, त्यातील अध्यात्माची परिभाषा, त्यांतील संकल्पना यांचे बरेचसे शब्दज्ञान असे सर्व मिळवून् पुन्हा असे कुठले शब्दबंबाळ ज्ञान मिळवायचे राहून् गेले, की पुन्हा एकदा 'श्रवणसुख' अनुभवायची गरज पडली.

याचा मी तरी सरळसरळ असा अर्थ घेते, की एकतर अजूनही 'काहीतरी' जाणून घ्यायचे राहून गेले आहे, अशी भावना मनात आहे,किंवा केवळ टीका करायला 'काहीतरी' हवे होते!
यातील् पहिली शक्यता गृहीत धरून मला असे सांगावसे वाटतय, की सगळ्या माणसांची स्थिती एकसारखीच असते, की शाब्दिक पातळीवर सगळेच कळतंय, पण् अजून 'काहीतरी' राहून जातंय. अशा वेळेस्, आपले अनुभव आणि ज्ञान विषद करुन् सांगणार्‍यांवर् व ते मनापासून् ऐकणार्‍यांवर, अशा प्रकारे सतत बहिर्मुख राहून, टीका करून, काय मिळणार?

अवांतरः 'अध्यात्म हे आत्म्याविषयी' आहे हे थोडेसे चुकतंय. ते 'आत्मविषयक' म्हणजे स्वतःबद्दल आहे.
स्वतःच स्वतःला तपासून पहाण्याची एक पद्धत. पण त्यासाठी अंतर्मुख व्हायची गरज असते. 'हे कसे करावे' हे शिकण्यासाठी बहिर्मुखही व्हावे.
पण शेवटी 'नक्की खरे-खरे काय' हे प्रत्येकाला स्वतःचे स्वतः आत वळूनच कळते.

-कविता

म्हणजे

अवांतरः 'अध्यात्म हे आत्म्याविषयी' आहे हे थोडेसे चुकतंय. ते 'आत्मविषयक' म्हणजे स्वतःबद्दल आहे.

म्हणजे तुमचा आत्म्याबित्म्यावर विश्वास नाही तर.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

असहमत

याचा मी तरी सरळसरळ असा अर्थ घेते, की एकतर अजूनही 'काहीतरी' जाणून घ्यायचे राहून गेले आहे, अशी भावना मनात आहे,किंवा केवळ टीका करायला 'काहीतरी' हवे होते!

एखाद्या गोष्टीवर जर मला लेख लिहायचा असेल, छोटे मोठे भाषण् द्यायचे असेल् किंवा जरी त्यावर मला नुसती मतं मांडायाची असतील तरी मी कळलेला विषयही पुन्हा एकदा चाळेन, वाचेन इ. त्यामुळे ह्या आ़क्षेपाला काही अर्थ नाही.

तुमचे मत त्यांना फक्त 'काहीतरी' हवे आहे असे झाले आहे का? असे असल्यास् त्यांचे प्रतिसाद् वा लेख तुम्ही यापुढे वाचणार् नाही अन्यथा फक्त 'काहीतरी' विरोध करण्या करता वाचाल असा अर्थ घेणे अपेक्षित आहे का?

अशा वेळेस्, आपले अनुभव आणि ज्ञान विषद करुन् सांगणार्‍यांवर् व ते मनापासून् ऐकणार्‍यांवर, अशा प्रकारे सतत बहिर्मुख राहून, टीका करून, काय मिळणार?

(समजा असे) कोणी मूर्ख बडबड करत असेल (मूर्खांचेही स्वतःचे अनूभव असतीलच की), तर ते मनापासून ऐकणार्‍यांवर टिका केल्याने कदाचित ते मनापासून ऐकणारे असेच काही मूर्ख अनूभव घेण्यापासून परावृत्त होऊ शकतातच की. हा उद्देश अमान्य का असावा हे कळत नाही.

-Nile

अध्यात्म

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
माझ्या समजुतीप्रमाणे अध्यात्म हे आत्म्यासंबंधीचे शास्त्र आहे.इथे आत्मा म्हणजे जीवात्मा तसेच परमात्मा.आत्म्याचे अमरत्व,जीवात्म्याचा भुवर्लोकात वास,त्याचा देही म्हणून पुनर्जन्म,देहपतनानंतर विदेही जीवात्म्याचे परलोकगमन, त्याचे अर्चिरादि मार्ग, जन्ममरणाचे फ़ेरे,जीवात्म्याचे परमात्म्यात विलिनीकरण-म्हणजे मोक्ष-शाश्वत,चिरंतन आनंदाची प्राप्ती.या सर्व अभ्यासाचे शास्त्र म्हणजे अध्यात्म.त्यात मोक्षप्राप्तीच्या मार्गांचा-संन्यासयोग,कर्मयोग,सांख्ययोग(ज्ञानमार्ग),आदींचा समावेश आहे.
गीतेच्या आठव्या अध्यायात स्वभावोsध्यात्ममुच्यते असे म्हटले आहे हे खरे. पण इथे स्वभाव म्हणजे आत्म्याचा स्वभाव असा अर्थ ज्ञानेश्वरीत घेतला आहे. म्हणजे अध्यात्म हे अंतत: आत्म्याचे शास्त्र ठरते.

हम्म

आत्मा म्हणजे जीवात्मा तसेच परमात्मा, अर्चिरादी मार्ग, देहपतनानन्तर विदेही जीवात्म्याचे परलोकगमन (की परमात्म्यात विलीनीकरण?).... साधी अध्यात्माची व्याख्या करताना कितीही नाही म्हणले तरी त्या ओघात जाडजूड शब्द, दमछाक करणारी वाक्ये आणि थोडाफार (तथाकथित) असम्बद्धपणा येतातच. असो.

असंबद्धपणा?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.मूकवाचक लिहितातः"साधी अध्यात्माची व्याख्या करताना कितीही नाही म्हणले तरी त्या ओघात जाडजूड शब्द, दमछाक करणारी वाक्ये आणि थोडाफार (तथाकथित) असम्बद्धपणा येतातच"
..
*अध्यात्माची व्याख्या लिहिलेली नाही.माझ्या समजुतीप्रमाणे अध्यात्मशास्त्रात समाविष्ट असलेल्या काही विषयांची नांवे दिली आहेत.
*त्या लेखनात कुठे असंबद्धता नसावी.असल्यास कृपया निदर्शनाला आणून द्यावी.

क्षमस्व

"अध्यात्माची व्याख्या लिहिलेली नाही.माझ्या समजुतीप्रमाणे अध्यात्मशास्त्रात समाविष्ट असलेल्या काही विषयांची नांवे दिली आहेत."
प्रश्नच मिटला. धन्यवाद.

लेख आवडला.

माझा स्वतःचा अनुभवही काहीसा असाच आहे,
माझ्या एका जीवलग मित्राच्या हट्टा मुळे मला एकदा संतनिरंकारी बाबाच्या प्रवचनाला जावे लागले होते,
प्रवचन एका शाळेतील सभागृहात होते,तिथे स्टेज वर या संतनिरंकारी बाबा अन् त्यांच्या पत्नीचा फोटो मांडलेला होता,
हळू हळू लोक जमू लागले,पुरुष एकिकडे महीला एकीकडे,
एका वक्त्याने माईकचा ताबा घेतला,प्रवचन द्यायला सुरुवात केली,प्रवचनकाराचे शब्दबंबांळणे सरु झाले,
ही गोष्ट काही वर्षे पुर्वीची असल्यामुळे आता इतके स्पष्ट आठवत नाही,
पण सगळे डोक्यावरुन गेले होते,शेवटी महाभारत,रामायण या गोष्टि सुरु झाल्या,या नेहमीच्याच असल्यामुळे त्या लक्षात रहाणे आलेच.
असो, प्रवचन संपल्यानंतर सर्व लोक तिथे मांडलेल्या तस्बीरीला अन् त्या प्रवचनकराच्या पाया पडून जवळच ठेवलेल्या दान पात्रात आपल्या जवळील असलेले धन टाकू लागले,(यथाशक्ति),
अन् 'धन निरंकार' असे मोठ्याने म्हणू लागले,
('धन हे निरंकार' असते याचा अनुभव तेव्हा आला)
मलाही मित्राने जवळ जवळ ढकलतच नेले,पण मी असे काहीही केले नाही,
बाहेर आल्यावर यावरुन आमच्या मध्ये खडाजंगी झाली,
मी मित्राला विचारले प्रवचनकाराने अगोदर जे काय शब्दबंबांळले ते तुला कळले का?
यावर त्यालाही काही बोलता आले नाही,
मित्राचे म्हणने होते इथे येऊन मनःशांती मिळते,समाजात कसे वागायचे याचे ज्ञान मिळते,
इथे सगळे एक मेकांना मान देतात वाकून नमस्कार करतात (धन निरंकार जी असे म्हणतात)
हे इतके लोक काय वेडे म्हणून येतात? तुच काय तो मोठा शहाणा?

मी म्हटले बाबा रे यात काहीच गैर नाही,पण ज्या गोष्टी मला माझ्या आई-बाबांनी सांगितल्यात त्यापेक्षा यात वेगळे असे काहीच नव्हते,
समाजात कसे वागावे इतरांशी कसे वागावे हे संस्कार आपल्यावर आपल्या आई-बाबांनी लहाणपनापासूनच केलेले आहेत ना..
मग अशा लोकांची गरज का लागावी?

यावर त्याचे एकच पालूपद मग इतकी लोकं मुर्ख म्हणून येतात का?
त्यांच्यावरही त्यांच्या आई-बाबांनी तसे संस्कार अन् इतर गोष्टि केल्या,सांगितल्या असतीलच
ना मग तरी ते येतातच ना,

मी म्हणले मग त्यात त्यांच्या आई-बाबांचा दोष मानावा काय?
त्यांचे संस्कार कमी पडले किंवा ते जवळ जवळ नाकारुनच हे लोक इथे येतात अन् तु ही असे समजावे काय?
यावर मात्र त्याला काही उत्तर देता आले नाही,
फक्त तु सुधारणार नाहीस,जाऊ दे एवढे बोलून चर्चा संपवली.

या गोष्टि अशाच वर्षानुवर्षे चालु असतात,लोकांना आपण या कल्ट मध्ये गुरफटलोय हे ही समजत नसते,

जाता जाता:

"महाराजांच्या अंगावर कपडे नाहीत.ते नग्न आहेत.हे कोणीतरी स्पष्टपणे सांगणे आवश्यक असते."

मार्मिक विधान..
असे सांगायला कोणीतरी उभे राहीले की महाराजांवर प्रेम करणार्‍या भक्तांच्या रोषाला बळी पडावे लागते.

सन्जोप राव = बाबांच्या शब्दबंबाळ प्रवचनात गुंगून जाणार्‍या, अगदी टिपणेबिपणे काढणार्‍या एखाद्याला तरी आपण काय करतो आहोत हे तपासून बघावेसे वाटले तरी या चर्चाप्रस्तावाचे सार्थक झाले, असे मला वाटते.

असेच म्हणतो.

प्रशंसनीय कृती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"प्रवचन संपल्यानंतर सर्व लोक तिथे मांडलेल्या तस्बीरीला अन् त्या प्रवचनकराच्या पाया पडून जवळच ठेवलेल्या दान पात्रात आपल्या जवळील असलेले धन टाकू लागले,(यथाशक्ति),
अन् 'धन निरंकार' असे मोठ्याने म्हणू लागले,
('धन हे निरंकार' असते याचा अनुभव तेव्हा आला)
मलाही मित्राने जवळ जवळ ढकलतच नेले,पण मी असे काहीही केले नाही."

......श्री.अजातशत्रू यांच्या प्रतिसादातून.
.
स्वबुद्धीने विचार करून योग्य काय,अयोग्य काय ते ठरविणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन.
दुसरे अनेकजण जे करतात ते योग्यच असले पाहिजे असे मानून आपणही तसे करणे म्हणजे गतानुगतिकता,मेष (मेंढरू)वृत्ती.
श्री.अजातशत्रू यांनी कुणाच्याही प्रभावाखाली न जाता स्वतःच्या बुद्धीला पटले तेच केले ही गोष्ट अभिनंदनीय आहे.हे प्रत्येकाला शक्य आहे.बुद्धी असतेच.ती वापरायला हवी एवढेच.विवेकी माणूस भारावून न जाता कोणतीही कृती विचारपूर्वक करतो.

धन्यवाद सर,

असे जेव्हा सगळेच आपली बुद्धीवापरुन विवेकशीलपणे वागतील तो सुदिन असेल आपल्या देशाचा !

आपला लेख वाचला

यानावाला यांना प्रणाम,

आपण केलेल्या वक्त्याच्या (नाव आपण सांगीतले नाहीत) बद्दलल्या लेखातल्या काही गोष्टी खटकल्या त्या अशा -
आपण लिहिले आहेत
आध्यात्मिक क्षेत्रातील ख्यातनाम वक्ते होते.........

वक्ते चांगलेच असावेत नाहितर ख्यातनाम झाले नसते. काही गोष्टी अशा वक्त्यांच्या तोंडूनच ऐकायला चांगल्या असतात कारण ते कोणत्या संदर्भाने काय सांगतात ते कळते. आपण काही ओळी दिल्या आहेत व ते ही आठवून किंवा पुस्तकातून त्यातून काही ताडता येत नाही .. कारण ती वाक्य त्या वक्त्याची नव्हती.

दुसरे म्हणजे आपल्याला आवडले नाही त्याचे खापर येथे कशाला फोडायचे. कोणाला जर का ते प्रवचन ऐकून समाधान होत असेल, त्याचा अर्थ कळत असेल (बरेच लोक आली होती म्हणून वाटते - काही तरी कारण असावे म्हणूनच आली असतील) व आनंद मिळत असेल तर काय बिघडले त्यात. जो पर्यन्त देशा विरुद्ध काही चिथावणी करत नाही किंवा अश्लिल गलिच्छ काही तरी प्रसार करत नाही तो पर्यन्त चालू देत की.

आम्ही अरुंधती रॉय व गिलानी यांच्या सारख्यांना झेलतो तर मग ह्यात काहीच प्रॉब्लेम नाही वाटते मला.

लोभ आहेच

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

कायच्याकाय!

कोणाला जर का ते प्रवचन ऐकून समाधान होत असेल, त्याचा अर्थ कळत असेल (बरेच लोक आली होती म्हणून वाटते - काही तरी कारण असावे म्हणूनच आली असतील) व आनंद मिळत असेल तर काय बिघडले त्यात.

कोणाला तर ते प्रवचन ऐकून कंटाळा/त्रास/वैताग होत असेल, त्याचा अर्थ कळत नसेल (मूर्खांना जमायला कारण असतेच असे नाही) व त्यामुळे कोणी त्यावर काही लिहले तर काय् बिघडले त्यात?

आम्ही अरुंधती रॉय व गिलानी यांच्या सारख्यांना झेलतो तर मग ह्यात काहीच प्रॉब्लेम नाही वाटते मला.

तुमच्या प्रतिसादांसारखे प्रतिसाद आम्ही झेलतोच तर मग यनांच्या लेखांचा काहीच प्रॉब्लेम नाही वाटते मला. (तुमचंच लॉजिक तुम्हाला)

-Nile

+१

मूर्खांना जमायला कारण असतेच असे नाही.

+१

प्रत्येकाच्या येण्याने (व असण्यानेच) लोक जमतात. यनावाला साहेब सुद्धा काही कारणानीच गेले असतीलना ते प्रवचन ऐकायला. तेथे जमलेल्या बाकी लोकांकडे सुद्धा काही कारणे असतीलच की.

 
^ वर