भाषा किती ? बोटांवर मोजण्याइतक्याच

डिस्क्लेमर - प्रेरणा अर्थातच शरद यांचा देवांच्या संख्येविषयीचा लेख . शरद व इतर वाचकही हा लेख हलक्यानेच घेतील अशी आशा आहे. तसा तो न घेतल्याने जर काही गैरसमज झाले तर त्याला लेखक जबाबदार नाही.

भाषा किती ? बोटांवर मोजण्याइतक्याच !

जगभर अनेक भाषा बोलल्या जातात. भाषातज्ञांच्या मते भाषांची संख्या पाच हजारच्या वर आहे. या उघडउघड अतिशयोक्त संख्येकडे दुर्लक्ष केलं तरी भाषा किती हा एक मजेदार प्रश्न शिल्लक रहातोच. मोजमाप करावयाच्या दृष्टीने त्यांची वर्गवारी करवयाचा प्रयत्न करू.

(१) आदिम भाषा : सुमेरिअन, इजिप्शियन चित्रलिपी, मोहेंजोदाडो संस्कृतीची भाषा, व त्याही भाषांपूर्वीच्या आदीम संस्कृतींनी वापरलेल्या भाषा. यांपैली कोणतीही भाषा आज वापरली जात नाही.

(२) प्राचीन भाषा: नंतरच्या काळात या जुन्या भाषा मागे पडून अक्काडिअन, जुनी अरामिक, लॅटिन, वैदिक संस्कृत, जुनी चीनी वगैरे भाषा पुढे आल्या. त्या भाषांची पुढे भ्रष्ट किंवा बदललेल्या स्वरूपात इतर भाषा तयार झाल्या. पण त्यातल्या बहुधा कुठच्याच टिकून नाहीत. उदाहरणार्थ गावठी लॅटिन, पाली, अर्धमागधी, मध्य चीनी वगैरे.

(३) अर्वाचीन भाषा : गेल्या काही शतकांत उदयाला आलेल्या व साम्राज्यविस्ताराबरोबर वाढलेल्या अथवा त्यातून टिकून राहिलेल्या भाषा. यात इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, या पसरलेल्या भाषा तर टिकून राहिलेल्या चीनी, हिंदी, जर्मन वगैरे भाषा येतात. याच भाषांची भावंडं म्हणजे बंगाली, मराठी, गुजराथी या भारतात वापरल्या जाणाऱ्या स्थानिक भाषा.

(४) क्षुद्र भाषा : क्षुद्र व शूद्र यांचा घोळ घालू नका. क्षुद्र म्हणजे दुय्यम. हा शब्दप्रयोग पूर्वीपासून चालू आहे. यात कोणाला हिणवावयाचे असे नसून (२) व (३) मधील भाषांपासून वेगळे दाखवयाचे असते. कुठल्यातरी टोळीने सुरू केलेल्या व तिथे प्रसारित झालेल्या भाषा. तसंच भिन्न भाषिक नोकर अथवा गुलाम एकत्र काम करत असताना त्यांनी मालकांच्या भाषेपासून तयार केलेल्या भाषा (पिज्जिन). किंवा मुख्य प्रचलित भाषेचा अपभ्रंश करून बोलल्या जाणाऱ्या स्थानिक बोली. सामान्यत : या भाषाच्या व्याकरणाचं प्रमाणीकरण झालेलं नसतं. त्यामुळे त्यांच्यात वैविध्य असतं व कानाला त्या काहीशा परखड लागतात. खेडोपाडी यांचा प्रभाव दांडगा असतो व अनेकांनी प्रमाणीकरणाचे प्रयत्न करूनही त्यांचे ग्रामजीवनावरील अधिराज्य आजही लक्षणीय आहे.

आता भाषा किती या प्रश्नाचे उत्तर शोधावयास एक दंडक असा लावू की ज्या भाषा बोलणारे लोक संख्येने जास्त आहेत त्यांचीच गणना करणे उचित ठरेल. पूर्वापारपासून भाषेच्या बाबतीत साडेतीन टक्के हा पुरेसा लहान आकडा मानण्यात आला आहे. तेव्हा जगाच्या लोकसंख्येच्या साडेतीन टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी बोलली तरच ती भाषा असं मानू. कदाचित नंतर भाषासंख्येवर आणखीन मर्यादा आणण्यासाठी त्यातल्या खऱ्या अर्थाने जिवंत भाषा शोधून काढता येतील. तेव्हा (१) व (२) मधील भाषा बाद करू. (४) मधील भाषा मोजणे अशक्य आहे; त्याहीसोडून देऊ. कोकणी, कारवारी, अहिराणी इत्यादी शिकवणाऱ्या जेमतेम ५-१० विद्यापीठं सापडतील पण त्यांचाही विचार करण्याची गरज नाही. उरल्या किती ? (३) मधल्या अनेक भाषा साडेतीन टक्क्यांचा निकष लावून बाद करता येतात.

इंग्लिश व तिचे इंग्रजांच्या साम्राज्यातल्या देशांनी स्वीकारलेले (की केलेले) अवतार. माय फेअर लेडीमधला प्रोफेसर हिगिन्स तर म्हणतो की इंग्लिश लोकांनाही धड इंग्लिश बोलता येत नाही. त्यामुळे इतर जे काही बोलतात त्याला इंग्लिश म्हणावं का असा प्रश्न पडतो. पण काही असलं तरी जगातले पंचवीस ते तीस टक्के लोक कमी अधिक प्रमाणात हीच भाषा बोलत असल्याचा दावा करतात.

चीनी भाषेने परदेशांत प्रसार करण्याचे कष्ट घेतले नाहीत. मात्र स्थानिक भागातच प्रचंड साम्राज्य प्रस्थापित करून मोठ्या लोकसंख्येला आपल्या अंमलाखाली आणण्यात यश मिळवलं. हिंदी स्वीकारण्यात भारतातली दक्षिणेकडची राज्यं विरोध करतात. लोकशाही असल्यामुळे असला विरोध चालून देखील जातो. पूर्वीच्या (व आत्ताच्याही) चीनमध्ये ती अडचण नसल्यामुळे हे करणं राजसत्तेला सोपं गेलं असावं.

स्पॅनिश भाषा इंग्लिश भाषेप्रमाणेच स्पॅनिश साम्राज्याबरोबर पसरली. ते साम्राज्य लयाला गेलं तरी कापानंतरची भोकं राहिली.

अरबी भाषा आता फारशी बोलली जात नाही असं वाटत असलं तरी तेलाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे तिला महती आहे. ही भाषा उलटी वाचली जात असल्यामुळे ती इतर भाषांपासून थोडी उठून दिसते.

रशियन भाषा ही स्लाव्हिक भाषांपैकी एक. कोणीतरी म्हटलं होतं की भाषा म्हणजे सैन्य बाळगून असणारी बोली. या भाषेने चांगलंच मोठं सैन्य बाळगलं व इतर स्लाव्हिक भाषांना स्लेव्ह करण्याचा प्रयत्न केला. आता राज्य फुटलं तरी भाषा पसरून आहे.

फ्रेंच लोक फ्रेंच सोडून दुसऱ्या कोणाच्या भाषा बोलत नाहीत. आढ्यताखोरी आणि प्रेम दोन्ही दर्शवण्यासाठी ही भाषा उत्तम आहे असं म्हटलं जातं.

पोर्तुगीज आपली साडेतीन टक्क्याच्या थोडीशी वर आहे म्हणून आहे. जर्मन सारखी कठोर भाषा व मलाई सारखी मऊ भाषा साडेतीन टक्क्याच्या थोड्या खाली येतात. मराठी पावणेदोन टक्क्यांची तर संस्कृत त्याहूनही कमी लोकांची. म्हणून या दोन्ही भाषा गणलेल्या नाहीत.

जर वर सांगितलेली व्याख्या मानली तर इंग्लिश, चीनी, स्पॅनिश, रशियन, अरबी, फ्रेंच, पोर्तुगीज एवढ्याच भाषा उरतात. एखादी राहिली असेल तर ती धरूनही बोटांवर मोजता येतील एवढ्याच " भाषा " खरे.

अशाच पद्धतीने 'अबक किती?' असे रोचक लेख लिहिता येतील असा माझा अंदाज आहे. अबक साठी योग्य उमेदवार सुचवावेत ही वाचकांना विनंती.

Comments

भले भले

हिन्दी का वगळता हो ? घेऊन टाका. आता विचारले आहेच म्हणून सांगतो की " राग किती ? " यावर श्री. विसोबा खेचर यांनी अवष्य प्रकाश टाकावा.

शरद

हिंदी चुकून राहिली....

हिंदी भाषा आहेच. जवळपास साताठ टक्क्यांची आहे. आणि शिवाय तिचं मराठीसारखं डबकं नाही झालेलं. तेव्हा हिंदी देखील या यादीत असायला हवी होती. नजरचुकीने राहिली. पण तरीही हाताची बोटं पुरी पडतातच.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

चिनी भाषा

या नावाची भाषा आहे? एवढ्या प्रचंड आकाराच्या चीनसारख्या देशामध्ये एकच भाषा बोलली जात असेल? लिपी एक असेल, पण भाषा अनेक असाव्यात. मॅन्डेरीन, गॅन, वू, कॅन्टॉनीज, हक्का, जिन्यू, झियाँग आणि कितीतरी.
पोर्तुगीज किंवा रशियन भाषा बोलणार्‍या लोकांपेक्षा बंगाली बोलणारे जास्त असवेत. तसेच फ्रेन्च बोलणार्‍यांपेक्षा जावानीज आणि कोरियन्स.-- वाचक्नवी

 
^ वर