देव किती ? बोटांवर मोजण्याएवढेच

देव किती ? बोटांवर मोजण्या इतकेच !
वेदातील तेहेतीस देवांवरून कल्पलेली " तेहेतीस कोटी " ही संख्या सोडून दिली तरी देव किती हा एक मजेदार प्रश्न शिल्लक रहातोच. मोजमाप करावयाच्या दृष्टीने त्यांची वर्गवारी करवयाचा प्रयत्न करू.

(१) वैदिक देवता : मरुत, इंद्र, वरुण, अग्नी,उषा, सूर्य,सोम, इत्यादी.( विष्णु ही एक तृतीय श्रेणीतील देवताही होती.) यांपैली कॊणाचीही पूजा आज केली जात नाही.

(२) पौराणिक देवता : पौराणिक काळात वैदिक देवता मागे पडून विष्णु, शंकर,देवी, गणपती, स्कंद या देवता पुढे आल्या.

(३) ग्रामदेवता व कुलदेवता : गावाचे रक्षण करणार्‍या देवता (बहुतांशी स्त्रीदेवता) उदा. सातेरी, भुमका, पिडारी, मरीआई, तसेच भैरोबा, रवळनाथ, वेताळ, अय्यनार इत्यादी. प्रत्येक कुलाच्या विशिष्ट उपास्य देवता, उदा. खंडोबा, ज्योतिबा, भवानी, योगेश्वरी, शांतादुर्गा, व्याघ्रेश्वर, इत्यादी. खरे म्हणजे या देवताच आदीमदेवता म्हणावयास पाहिजेत. पण उच्चवर्गीयांनी यांतील बर्‍याच जणांना शंकर, पार्वती, विष्णु यांचे अवतार वा सेवक असे रूप देऊन त्यांचा समावेश (२) मध्ये केला.

(४) क्षुद्र देवता : क्षुद्र व शूद्र यांचा घोळ घालू नका. क्षुद्र म्हणजे दुय्यम. हा शब्दप्रयोग पूर्वीपासून चालू आहे. यात कोणाला हिणवावयाचे असे नसून (२) मधील देवतांपासून वेगळे दाखवयाचे असते. गावाच्या सीमेवर, पडक्या भिंतीवर, एखाद्या शीळेवर शेंदूराने त्रिशूळ काढून त्या देवतेचे
स्थान दाखवले असते. सामान्यत : या देवता उग्र-भयंकर असतात व त्या मांस-मद्याच्या नेवैद्याचा आग्रह धरतात.खेडोपाडी यांचा प्रभाव दांडगा असतो व संतांनी प्रयत्न करूनही त्यांचे ग्रामजीवनावरील अधिराज्य आजही लक्षणीय आहे.

आता देव किती या प्रश्नाचे उत्तर शोधावयास एक दंडक असा लावू की ज्यांची मोठ्या प्रमाणात देवळे आहेत व ज्यांची पूजा करणारे भक्त संख्येने जास्त आहेत त्यांचीच गणना करणे उचित ठरेल. तेव्हा (१) मधील देव बाद करू. (३) व (४) मधील देव मोजणे अशक्य आहे; तेही सोडून देऊ. शनी, सूर्य,नरसिंह इत्यादींची ५-१० देवळे सापडतील पण त्यांचाही विचार करण्याची गरज नाही. उरले किती ?

विष्णु व त्याचे राम कृष्ण, विठ्ठल ( हा खरा (३) मधील देव पण त्याला बढती देऊन कृष्णाचा अवतार केला गेला) इत्यादी अवतार. य़ांच्या भक्तांना म्हणावयाचे " वैष्णव ". सर्व हिंदुस्थानात याची देवळे आहेत व मोठ्या प्रमाणात भक्तही आहेत. यांतील पंथ व उपपंथ लक्षणीय आहेत.

शंकर यांनी अवतार घेण्याचे कष्ट घेतले नाहीत. ऊपासकांना " शैव " म्हणतात. शैवांत अनेक पंथ आहेत. आसेतुहिमाचल देवळे आहेत.
( पसंती डोंगर-दर्‍यांची)र. विष्णूपेक्षा थोडा "कडक " देव. शांभवी चालते.

देवी (पार्वती व तिची रुपे) शक्ती ही एक प्राचिन व लोकमान्य देवता आहे, उपासकांना " शाक्त " म्हणतात. दानवमर्दिनी हे रूप जास्त आवडते असल्याने शंकरापेक्षाही जास्त उग्र रुप आढळून येते. तांत्रिक उपासनेत देवी व शिव यांना प्राधान्य दिले गेले आहे.

गणपती हा जरा सौम्यच देव आहे. थोडे दैत्य मारले हे खरे पण देवाने असे काही करावे अशी अपेक्षा असते म्हणून. बाकी कार्यारंभी वंदन करावयाचा मान असल्याने सर्वत्र संचार. उपासकांना "गाणपत्य " म्हणतात.

कार्तिकेय शंकर परिवारातला शेवटचा देव. दक्षिणेत जास्त उपासना केली जाते. सुब्रह्मण्य व मुरुग ही दुसरी नावे.

हनुमान रामाचा दास (दास हनुमान ) म्हणून प्रसिद्ध असला तरी यक्ष पूजेतून आलेल्या या देवाची " वीर हनुमान " ही ओळख ग्रामीण भागात आढळून येते.याची देवळे व भक्तगण मोठ्या संख्येने आढळतात.

जर वर सांगितलेली व्याख्या मानली तर विष्णु, राम कृष्ण, विठ्ठल, शंकर, देवी, गणपती, कार्तिकेय व हनुमान एवढेच देव उरतात.एखादा राहिला असला तर तो धरूनही बोटांवर मोजता येतील एवढेच " देव " खरे.

(श्री. प्रमोद देव यांनी उपक्रमवर नाव बदलण्याचा इरादा व्यक्त केला असल्याने त्यांची गणना येथे केलेली नाही.)

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

काही राहिले का?

खंडोबा म्हणजे स्कंदच ना? आणि व्यंकटेश हे विष्णूचेच रूप का? आणि दत्ताची गणना का नाही केली? ते तिन्ही देवांचे एकत्रित रूप असले तरी आज त्याची उपासना स्वतंत्रपणे आणि मोठ्या प्रमाणावर केली जाते. परशुरामाला देव मानणाराही एक मोठा लोकसमूह आहे.

खंडोबा मल्लारी वगैरे

खंडोबा, भैरव, मल्हारिमार्तंड वगैरे शंकराचे अवतार, आणि व्यंकटेश हा विष्णूचा. स्कंद म्हणजे कार्तिकस्वामी. देवळांच्या संख्येवरून देवांची लोकप्रियता मोजायची झाली तर शंकराचा नंबर पहिला आणि विष्णूचा दुसरा लागेल. विठ्ठलाचा नंबर लागणारच नाही. मारुतीचा तिसरा आणि साईबाबाचा चौथा लागावा.--वाचक्नवी

+१

देवळांच्या संख्येवरून देवांची लोकप्रियता मोजायची झाली तर शंकराचा नंबर पहिला आणि विष्णूचा दुसरा लागेल. विठ्ठलाचा नंबर लागणारच नाही. मारुतीचा तिसरा आणि साईबाबाचा चौथा लागावा

+१.

साईबाबांना ४थ्या नंबराचे पद मिळण्याचे नेमके कारण काय असावे? इतकी प्रसिद्धी का मिळाली असावी?

प्रश्न

साईबाबांबद्दलचा प्रश्न मलाही पडला आहे, त्यांची स्वतःची अशी काही शिकवण आहे असेही मला ऐकून माहित नाही.

-Nile

साईबाबांची देवळे

जेव्हा जेव्हा एखादा डोंगर, नदीकाठ, मोकळे मैदान, रस्त्याचा कोपरा किंवा रस्त्याचा कमी वर्दळीचा हिस्सा, सार्वजनिक कामासाठी राखून ठेवलेला भूखंड किंवा मालकाने दुर्लक्षित केलेला जमिनीचा तुकडा जर बळकावायचा असेल तर तेथे आधी साईबाबाची तसबीर, नंतर मातीची किंवा प्लॅस्टर ऑफ् पॅरिसची लहान मूर्ती आणि नंतर मूर्तीभोवती देऊळ बांधतात. अशा प्रकारे बांधलेली देवळे महाराष्ट्रात भरपूर आहेत आणि हळूहळू दक्षिण भारतात त्यांचा विस्तार होत आहे. शेंदूर लावलेला दगड किंवा थडग्यासारखा दिसणारा एखादा उंचवटा जे काम पूर्वी करीत असे तेच काम हल्ली ही साईबाबाची देवळे करतात. साहजिकच मारुती-गणपतीच्या पाठोपाठ सध्या, साईबाबांच्या देवळांचे नाणे जास्त चलनात आहे.--वाचक्नवी

शक्यता

समाजात नव्या गटाकडे आर्थिक/राजकीय बळ आले की त्यांना अस्मितांचे वेगळेपण जपण्याची गरज भासते असे मला वाटते. प्रस्थापितांचे महत्व नाकारणार्‍या सत्यनारायण, संतोषी माता, साईबाबा, इ. ना सबाल्टर्नांनी जवळ केले असावे.

ब्रह्मदेव

ब्रह्मदेवाचा उल्लेख राहून गेला आहे.

गमतीदार

लेख वाचून मजा वाटली.

वर्ग ३ आणि ४ वगळण्याचे कारण तितकेसे पटले नाही.

(विठ्ठलाच्या देवळांची संख्या कितीशी आहे? सूर्यमंदिरांपेक्षा बहुधा कमीच असावी. अगदी ब्रह्ममंदिरांपेक्षाही कमी असावी. कित्येक गावांतील ब्रह्ममंदिराच्या पुजार्‍यांनी मला सांगितलेले आहे - ब्रह्ममंदिरे दोनच : एक आमचे _(लोणार/बह्मकर्मळी...इ.इ.)_ गावातले, आणि दुसरे राजस्थानातील पुष्कर येथील! ज्यांचे प्रमुख आराध्यदैवत विठ्ठल आहे, अशा भक्तांची संख्या ब्रह्मभक्तांपेक्षा अधिक आहे, हे खरेच आहे. पण तो मुद्दा वेगळा आहे.)
- - -
काही असो. शरद म्हणतात, त्याप्रमाणे देवळांची खानेसुमारी करून संख्येनुसार क्रमवारी लावता येईलच. (अथवा "तुमचे प्राथमिक आराध्यदैवत कुठले? तुम्ही बहुतेक करून कुठल्या देवळात जाता?" असे सर्वेक्षण करून त्या आकड्यांची संख्येनुसार क्रमवारी लावता येईल.) त्यातील वराच्या क्रमांकांमध्ये शरद यांनी सांगितलेले देव येतील बहुधा.

पण त्या क्रमवारीत "क्ष क्रमांकाच्या वरचे क्रमांक मोजण्यालायक, खालचे बिगरमोजण्यालायक" असे म्हणणे थोडेसे लहरी वाटते.

कैच्या कै

(विठ्ठलाच्या देवळांची संख्या कितीशी आहे? सूर्यमंदिरांपेक्षा बहुधा कमीच असावी. अगदी ब्रह्ममंदिरांपेक्षाही कमी असावी.

हे विधान बरोबर नाही. खाली एक दुवा दिला आहे. त्यात ठिकठिकाणच्या विठ्ठलमंदिरातून आषाढी एकादशी कशी साजरी झाली याची वर्णने आहेत. यावरून महाराष्ट्रामधील विठ्ठल मंदिरांची संख्या (एकूण सूर्य, ब्रह्ममंदिरांपेक्षा) बरीच असे समजण्यास वाव आहे.

विठ्ठल मंदिरे

शंका

अनेक ठिकाणी शंकराची आद्य देवता/निर्माता/अनादी अनंत वगैरे नोंद केलेली असते ना? मग वेदांत (जे सर्वात आद्य मानले जातात तिथे)शंकराचा देव म्हणून उल्लेख कसा काय् नाही?

-Nile

रुद्र

वेदांत रुद्र ही देवता आहे. पण ती विघ्नकारक,यज्ञविध्वंसक आहे. त्याची प्रार्थना सर्व सुरळीत व्हावे याकरिता आहे. पुराण काळात हे बदलून रुद्राला महादेव म्हणून ज्येष्टता मिळाली.
शरद

रोचक

शंकर हा अनादी नाही ही माहिती रोचक आहे.

-Nile

चांगली माहीती

देवांच्या खानेसुमारीबद्दलच्या सहज कल्पनेने देवांचे क्षुल्लकत्व प्रकर्षाने जाणवले. बाकी प्रतिसादांपैकी परशुराम भक्तांच्या मोठ्या संख्येचा दावा करणारा प्रतिसाद मजेशीर वाटला

देवांची खानेसुमारी

देवांची खानेसुमारी करायची झाली तर कुठलेही देव सोडू नयेत. ग्रामदेवता कुलदेवता वगैरे अगणित नसणारच. उलट त्यांच्यातील वैविध्य जाणून घ्यायला आवडेल. (कधीतरी देवांचा कोश करण्याचा प्रयत्न करावा म्हणतो.)

कधी लोकप्रियतेनुसार तर कधी पुराणात नसल्याने तुम्ही देव गाळले आहेत. अपवाद फक्त विठ्ठलाचा. विठ्ठलाला धरले तर बालाजी, जगन्नाथ, खंडोबा, अय्यप्पा, मुरुगन (मला असे वाटते की हा कार्तिकेय नसावा), दुर्गा, गौरी, मरिआई, लक्ष्मी, सरस्वती(हिची देवळे आहेत.), तुळजाभवानी हे तितकेच महत्वाचे देव आहेत. सर्व देव्या एकत्र मोजण्याचा प्रकार निषेधार्ह! (ह.घ्या.)

मारुतीला धरले तर नंदीला सोडायला नको. (नंदीची स्वतंत्र मंदिरे आहेत.) दगडाला शेंदूर फासले की मारुती होतो म्हणतात. मारुतीला मुख्य देव म्हणायचे आणि दगडावरचे क्षुद्र. हे देखिल बरोबर नाही.

ब्रह्माला सोडायला नको. दक्षिणपूर्वेत ब्रह्मा हे मोठे दैवत असावे. (भरपूर देवळे सापडतात.)

या सोबत साईबाबा या अति लोकप्रिय दैवताचा समावेश व्हायला हवा. दत्ता बद्दल वर म्हटलेच आहे. ज्योतिबा, काळूबाई ही दैवते देखिल बरीच लोकप्रिय आहेत.

प्रमोद

देवगणना

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.शरद यांनी जो दंडक घालून दिला आहे तदनुसार त्यांनी मोजलेली देवसंख्या तत्त्वतः मान्य होण्यास प्रत्यवाय नसावा.मात्र श्री.प्रमोद सहस्रबुद्धे निर्देश करतातः"सर्व देव्या एकत्र मोजण्याचा प्रकार निषेधार्ह! (ह.घ्या.)"..ते गंभीरपणे घ्यायला हवे.लक्ष्मी,सरस्वती,पार्वती या तीन प्रमुख देव्या आहेतच.सर्वांना देवी या एकाच नावाखाली गुंडाळता येणार नाही.
ही झाली तात्त्विक देवगणना.भक्तांची देवविषयक भूक अशम्य असते.कितीही देवांचे दर्शन घेतले तरी त्यांचे समाधान म्हणून होत नाही.त्यांना आणखी,आणखी आणि अधिक आणखी देव हवे असतात.
गणपती हा एक देव आहे.स्थानिक भक्तांच्या सोयीसाठी त्या त्या ठिकाणी मंदिर असणार, त्यात मूर्ती असणार,सर्व ठिकाणच्या मूर्ती सारख्या नसणार,गणेश-गजानन-विनायक असे काहीतरी नाव असणार हे ठीक. पण शेवटी गणपती देव एकच असायला हवा ना?.पण अनेक गणेशभक्तांना वारंवार आठ ठिकाणी जाऊन आठ गणपतींचे दर्शन घेतल्याशिवाय चैनच पडत नाही, हे काय? मला तर हे पटतच नाही!

होय खरे आहे.

--पण अनेक गणेशभक्तांना वारंवार आठ ठिकाणी जाऊन आठ गणपतींचे दर्शन घेतल्याशिवाय चैनच पडत नाही, हे काय? मला तर हे पटतच नाही!--

लोकांकडे ३,४ टू व्हीलर असतात, २-३ चारचाक्या असतात, २-३ मोबाईल कनेक्शन असतात, १-२ इंतरनेट कनेक्शन असतात, ४-५ जोडे असतात, २०-२५ शर्टस् आणि ट्राऊजर असतात... आता का असतात ते ज्याला-त्याला ठावुक आणि आपण कोण त्यास जाब विचारणार? ह्या वस्तु विकल्या गेल्या नाही तर इकॉनॉमी कशी वाढणार? लोकांना नव्या नोक-या कशा मिळणार? पगारवाढ कशी देणार? त्यामुळे काही गोष्टी पटल्या नाहीत तरी ती वैयक्तिक बाब आहे असे समजावे.

अच्छा

म्हणजे देव सुद्धा मानवाने बनवलेल्या इतर गाडी, चपला, फोन वगैरेसारखी एखादी कमॉडीटी आहे असे तुम्हाला वाटते तर. गंमत आहे.

-Nile

जबरी

जबरी ! सॉलीड अनालिटीकल !

-- गंमत आहे.--

आहे पण ती तुमच्या विचारपद्धतीची !

अज्ञानाचे लक्षण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
एखादे पुस्तक तुमच्या फार आवडीचे आहे.म्हणून त्या पुस्तकाच्या आठ प्रती खरेदी करून त्या वाचत बसणार का? ते पुस्तक तुम्हाला आठदा वाचायचे असेल तर एकच प्रत पुनःपुन्हा आठदा वाचली तर चालणार नाही का?
तद्वत गणपती हा तुमचा आवडता देव आहे.तुम्ही पुण्यात राहाता.तर प्रतिदिनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले तर चालणार नाही का? अष्टविनायक यात्राच करायला हवी काय? ते आठ गणपती मूलतःच भिन्न आहेत असे मानणे हे अज्ञान नव्हे काय?

सिद्ध करा

--आठ गणपती मूलतःच भिन्न आहेत असे मानणे हे अज्ञान नव्हे काय?
ते भिन्न नाहीत हे सिद्ध करा. दुवे द्या, तरच् तुमच्या क्लेमला विश्वासार्हता मिळेल.

:(

या मोरॉनला हाकलण्याची सुपारी कुणीच घेत नाही काय?

हेलो

हेलो डॉ. रीवर्क हिलरी, तुमच्या प्रतिसादाला येथे कोणी भीक घातलेली दिसत नाही अजुन. :-)

सहजोद्गार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
तो तुमचा (श्री.गिरीश यांचा) प्रतिसाद वाचून कुणाही विचारी व्यक्तीला उद्विग्नता येणे साहजिक आहे. त्यावेळी मुखातून जो सहजोद्गार येतो त्याचे ते लिखित रूप आहे. कुणाला सुपारी देण्याचे आवाहन नव्हे असे मला वाटते.

विचारी व्यक्ति !

--तो तुमचा (श्री.गिरीश यांचा) प्रतिसाद वाचून कुणाही विचारी व्यक्तीला उद्विग्नता येणे साहजिक आहे. ---

वरील वाक्यातील "विचारी व्यक्तिला" ह्या संदर्भाशी १००% सहमत. :-)

:)

तुम्हाला मोरॉन म्हणण्यास त्यांची संमती आहे तेवढे पुरे.

का दुखवा ?

तुम्हाला त्यात आनंद मिळत असेल तर का दुखवा असे त्यांना वाटत असावे. :-) काहीतरी उद्योग त्यामुळे तुम्हाला मिळतो असे वाटत असावे.

देवळात का जावे?

खरं तर माणसांतच देव आहे म्हणतात. देवळात तरी का जावे?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

गॉस्पेल ट्रुथ

--खरं तर माणसांतच देव आहे म्हणतात--
देवाचं अस्तित्व मान्य करण्यासारखे आहे हे. डॉ. रीवर्क हिलरी आणि त्यांचा विचारवंतांचा कंपू ह्याबद्दल काय म्हणतोय ते जाणणे आवश्यक आहे. ते जे म्हणतील ते गॉस्पेल ट्रुथ.

माणुसकी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"खरं तर माणसांतच देव आहे म्हणतात. देवळात तरी का जावे?"

ऋषिकेश
.
अगदी योग्य! देवळात जाऊ नयेच. पण माणसात देव असण्याची काही आवश्यकता नाही. माणसात माणुसकी हवी. काही जणांत देव इतका ओतप्रोत भरलेला असतो की तिथे माणुसकीला जागाच नसते!
माणसात विवेक असावा.दया,करुणा, सहसंवेदना असावी.नीतिमत्ता असावी."अद्वेष्टा सर्व भूतानाम् मैत्र: करुण एव च" असे असावे.त्यासाठी देवा-धर्माची काही आवश्यकता नाही.सदसद्विवेकबुद्धी जागृत असली की सगळे समजते.

परीपुर्ण सदसद्विवेकबुद्धी

--सदसद्विवेकबुद्धी जागृत असली की सगळे समजते.---

ही सदसद्विवेकबुद्धी विद्न्यानात (!) लिहिलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे अंतिम द्न्यान अशी भ्रामक समजुत करुन देत नसेल तरच परीपुर्ण असते. कारण अनेक अझम्पशन्स वर बेतलेली सायन्स / विद्न्यान वाल्यांची विधाने / सिद्धांत अनेकदा सरसकट ग्राह्य न धरणे हे ही त्या सदसद्विवेकबुद्धी कळले पाहिजे. तसेच मला विद्न्यान कळले म्हणजे ब्रह्मद्न्यान मिळाले नाही, मी सर्वद्न्यानी झालो नाही असेही त्या सदसद्विवेकबुद्धीला कळले पाहिजे.

--काही जणांत देव इतका ओतप्रोत भरलेला असतो की तिथे माणुसकीला जागाच नसते!
१००% सहमत. चांगला विचार..

काही जणांत विद्न्यान इतका ओतप्रोत भरलेला असतो की तिथे माणुसकीला जागाच नसते!
असेही म्हणता येइल.

ह्यॅ

काही जणांत विद्न्यान इतका ओतप्रोत भरलेला असतो की तिथे माणुसकीला जागाच नसते!

माणुसकी तर आमच्यात आहेच, तुमच्याशी आम्ही जसे वागतो त्यावरून असे दिसते की आमच्यात भूतदयाही आहे.

"दिसते"?

--तुमच्याशी आम्ही जसे वागतो त्यावरून असे दिसते की आमच्यात भूतदयाही आहे.---

तुमच्यातील भूतदया तुम्हाला "दिसते"? जाणवली पाहिजे. अवैद्न्यानिक विधान झाले तुमचे.

सिद्ध झाले

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
* माझ्या प्रतिसादात आहे (अ):"आठ गणपती मूलतःच भिन्न आहेत असे मानणे हे अज्ञानाचे लक्षण आहे."
.
*श्री.गिरीश लिहितात (ब):,:"ते भिन्न नाहीत हे सिद्ध करा."

.
ते आठ गणपती मूलतः भिन्न नाहीत हे स्वयंसिद्ध आहे.
श्री.गिरीश यांच्या (ब) या प्रतिसादामुळे वरील विधान (अ) सिद्ध झाले आहे.

(क)

* यनावालांच्या प्रतिसादात आहे (क) "ते आठ गणपती मूलतः भिन्न नाहीत हे स्वयंसिद्ध आहे."
हे स्टेटमेंट स्वयंसिद्ध आहे हे खरे आहे, एका वेगळ्या अर्थाने ! ते स्वतःच तुम्ही सिद्ध केले आहे- त्यास कोणताच पुरावा दिलेला नाही.

पटले नाही

वरळीच्या (नेहरू) सायन्स सेंटरमध्ये मी अनेकदा गेलेलो आहे. तरीही बंगलोरच्या (विश्वेश्वरैया) सायन्स सेंटरमध्येही गेलो आणि दिल्लीच्या (राष्ट्रीय) सायन्स सेंटरमध्येही गेलो. त्याचत्याच संकल्पनांवर आधारित ती एनर्जी यंत्रे पहायला मला आवडते. भाक्रानांगलचे दर्शन घेतल्यावर कोयना धरणाचे दर्शन घ्यावेसे वाटूच नये? ;)

पाठभेद

असे कसे होईल? प्रत्येक दोन प्रतींमध्ये काहीतरी पाठभेद असणारच! ते शोधण्यासाठी तरी निदान आठ प्रती विकत घ्यायला पाहिजेत.--वाचक्नवी

पाठभेद?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.वाचक्नवी विधान करतातः"प्रत्येक दोन प्रतींमध्ये काहीतरी पाठभेद असणारच! "
.
त्यांचे हे विधान शतप्रतिशत (१००%)असत्य आहे.
आणि कसले हो पाठभेद? माझा प्रतिसाद कुणाच्या संदर्भात आहे? तर सर्वसामान्य गणेशभक्तांच्या.अष्टविनायक म्हणजे शिल्पकलेचे अभ्यसनीय असे आठ नमुने आहेत काय? बरे! तुमच्या मते असले तर भक्त अनेकवेळां आठही मूर्ती पाहायला जातात ते त्या नमुन्यांचा अभ्यास करायला का? उगीच आपले काहीतरी काय!

धरणे आणि अष्टविनायक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.रिटे लिहितातः"भाक्रानांगलचे दर्शन घेतल्यावर कोयना धरणाचे दर्शन घ्यावेसे वाटूच नये? ;)

अवश्य वाटावे. एकतर ती दोन धरणे भिन्न आहेत. तसेच अष्टविनायकांच्या सर्व मूर्ती उत्सुकतेपोटी एकदा/दोनदा पाहाणे समजू शकतो.पण वर्षातून दोनदा सर्व आठ गणपती पाहायला वर्षानुवर्षे जाणे समजू शकत नाही.असेही ऐकले आहे की सर्व आठांचे दर्शन घेतल्याविना यात्रा सफल होत नाही. म्हणजे कसे? सर्व आठ मूर्तींत गणपती तर एकच आहे ना? की हे गणपतीचे आठ अवतार आहेत? मत्स्य,कूर्म,वराह.. हे श्रीविष्णूचे अवतार आहेत. प्रत्येकाचे अवतारकार्य भिन्न आहे. म्हणून परशुराम,राम,कृष्ण हे तीन भिन्न देव आहेत असे म्हणता येते. एका गणेशमूर्तीच्या आराधनेने पुत्रप्राप्ती होते, दुसर्‍या ग.मू.च्या उपासनेने धनप्राप्ती होते,तिसरीच्या पूजेने आरोग्य लाभते असे मानणे हे अज्ञानमूलक ठरते. कारण सर्व मूर्तींतील गणपती एकच आहे.
असो. या प्रतिवादाचा काही उपयोग नाही.कारण श्रद्धा या विषयात नो अब्सर्डिटी इज बार्ड.

 
^ वर