नवाज शरीफ सही बोलले!

नवाज शरीफ सही बोलले!
(माझ्या नेहमीच्या लेखांतील विचारांपेक्षा एक वेगळाच विचार मांडणारा लेख)
गेल्याच आठवड्यात नवाज शरीफ यांनी सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्काच दिला! कराचीत त्यांच्या "पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज" या पक्षाच्या वतीने बोलावलेल्या पत्रकारसंमेलनात त्यांनी "पाकिस्तानने आता भारताला त्याचा सर्वात मोठा शत्रू समजणे सोडून दिले पाहिजे" असे उद्गार काडले आणि "पाकिस्तानला जर प्रगतीच्या वाटेवर पाऊल टाकायचे असेल तर त्याने भारताबरोबरच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन (Re-appraisal) केले पहिजे" असेही ते पुढे म्हणाले. दुवा आहे (http://tinyurl.com/3lhesqp)*
हे उद्गार आहेत पकिस्तानच्या भूतपूर्व पंतप्रधानांचे! भारतीयांना आठवत असेल कीं या नवाज शरीफ यांनीच वाजपेयींसह भारत-पाक मैत्रीचे पहिले पाऊल म्हणून "लाहोर-दिल्ली बस सेवा" सुरू केली होती.(*१) वाजपेयींचे स्वागत करायला ते लाहोरला आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांचे हे उद्गार फारच मोलाचे असून वार्‍याच्या एकाद्या सुखद झुळुकेसारखे आहेत. पाकिस्तानी जनतेला त्यांचे हे म्हणणे पटवून देण्यात आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी मनोवृत्तीत बदल करण्यात शरीफना ज्यादिवशी यश येईल तो दिवस सोन्याच्या अक्षरात लिहिला जाईल यात शंका नाहीं. भारतच आपला खराखुरा आणि सर्वोत्तम मित्र आहे हे पाकिस्तानी लोकांना ते पटवून देऊ शकतील अशी आशा सर्व भारतीयांच्या मनात आहे.
अशा धीट आणि लोकमताच्या सद्यप्रवाहाच्या विरुद्ध भासणार्‍या नवाज शरीफ यांच्या वक्तव्याचे आणि मुत्सद्दीपणाचे (Statesmanshipचे) मला खरेच कौतुक वाटले. कारण या भावनेने जर मूळ धरले तर ही एक परस्परसहकार्याची मुहूर्तमेढच ठरेल. भारताने जरी मैत्रीचा हात नेहमीच पुढे केलेला असला तरी दोन्ही देशात कांहीं अंशी एक अविश्वासाची भावना आहे. (हल्ली त्यासाठी Trust deficit हा फॅशनेबल शब्द वापरण्यात येतो!) त्या भावनेला ओलांडून पाकिस्तान आपलाही मैत्रीच हात पुढे करेल काय? मला सध्या सर्व बाजूंनी घेरला गेलेला पाकिस्तान भारताच्या सद्यपरिस्थितीवरून योग्य तो बोध घेऊन असे पाऊल उचलेल अशी आशा मला वाटते.
पण भारताबरोबर मैत्री करायची असेल तर पाकिस्तानला फुकटेपणाची संवय सोडावी लागेल! आजपर्यंत पाकिस्तानला करावा लागणारा खर्च कधीच कमवावा लागलेला नाहीं. मग तो खर्च लष्करी सामुग्रीवरचा खर्च असो, आपल्या देशातील मूलभूत सोयी (infrastructure) असोत भूकंप, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती असोत, पण यापुढे फुकट मदत बंद! पाकिस्तानने कर्ज जरूर काढावे, ते दोन्ही पक्षांनी केलेल्या करारानुसार परत करावे पण फुकटची मदत घेऊ नये! कारण फुकटच्या मदतीबरोबर देशाच्या स्वातंत्र्यावर अनेक मर्यादा येतात व एक तर्‍हेचा मिंधेपणाही येतो. तो कुठल्याही परिस्थितीत टाळला पाहिजे.
पाकिस्तानी लोक भारतीयांसारखेच कल्पक, मेहनती आणि कुशल आहेत. शिवाय आपण कित्येक बाबतीत सारखे आहोत. चेहरेपट्टी, पोषाख, विचार करण्याची पद्धत आणि (गोमांस सोडल्यास) खाण्या-पिण्याच्या आवडी अशा अनेक बाबतीत आपण सारखे आहोत. ज्या दिवशी देश या नात्याने पकिस्तान (आणि पाकिस्तानी जनता) कुठल्याही परिस्थितीत स्वत:च्या पायांवर उभे रहाण्याचा निर्णय घेईल त्या दिवसापासून तेही आपल्यासारखेच यशस्वी होऊ लागतील.
भारताने टाकलेल्या एका अनुकरणीय पावलाचे उदाहरण मला इथे द्यावेसे वाटते. १९९१साली भारतालाही एका दारुण प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते. भारताकडे असलेली विदेशी चलनाची गंगाजळी संपली होती व रोजच्या गरजा भागविण्याचीही भ्रांत पडली होती. अशा परिस्थितीत भारताला आपल्याजवळचे तारण म्हणून राखलेले सोने हवाई मार्गाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे गहाण म्हणून पाठवायची नामुष्की सहन करावी लागली होती. तरीही भारताने मदतीचा स्वीकार न करता, मिंधेपणा न पत्करता ते पाऊल उचलले व पाठोपाठ नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली आपल्या आर्थिक धोरणात अमूलाग्र व क्रांतिकारक बदल घडवून आणला व भारताला प्रगतीपथावर आणून उभे केले. अशा तर्‍हेच्या निर्णयामुळे भारत आज एक कणखर, काटक आणि निग्रही देश बनला आहे.
पाकिस्तानही भारताच्या अशा धोरणांचे अनुकरण करून स्वत:ला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतो. "डॉन" व "एक्सप्रेस ट्रिब्यून" सारख्या वृत्तपत्रातील वाचकांच्या प्रतिसादांचा मागोवा घेतल्यास आज पाकिस्तानची जनता अमेरिकेची मदत नाकारून तिच्याबरोबरचे गुलामीसदृष संबंध तोडून पाकिस्तानने स्वत:च्या पायावर उभे रहावे अशा मताचे आहेत असेच आढळून येईल.
जो मुलूख खरोखर पाकिस्तानचा आहे त्या मुलुखाची अभिलाषा भारताने कधीच धरली नाहीं. याबाबतचा जो गैरसमज पाकिस्तानी जनतेच्या मनात आहे तो त्यांनी काढून टाकला पाहिजे. सध्या चालू असलेल्या पंचायतीच्या निवडणुकीत गिलानीसारख्या फुटीरवाद्यांच्या चिथावणीला धिक्कारून ७०-८० टक्क्याच्या प्रचंड प्रमाणात मतदान करून जम्मू-काश्मीरच्या जनतेने आपल्या मनाचा कौलही दाखवून दिला आहे. दोनेक वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही असेच भरघोस मतदान झाले होते. ही सत्य परिस्थिती समजावून सांगून पाकिस्तानला सद्यपरिस्थितीची जाणीव करून द्यायची हीच योग्य वेळ आहे व पोलाद गरम असतानाच ते घडविले पाहिजे.
पाकिस्तानात काय पद्धतीची ’हवा’ चालू आहे, तेथील विचारवंत कसा विचार करत आहेत हे वाचणे मनोरंजक आहे. डॉन व एक्सप्रेस ट्रिब्यून नेहमी वाचत असल्यामुळे मला त्याची बरीच कल्पना आहे. माझ्या आधीच्या लेखात मी असे अनेक दुवेही दिले होते. खाली दिलेला दुवा वापरून वाचकांना डॉ. तारीक रहमान यांनी एक्सप्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्रात लिहिलेला लेख वाचता येईल. माझ्या मते प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाने हा लेख वाचला पाहिजे.
आता पाकिस्तान-चीन मैत्रीकडे वळूया. युसुफ राजा गिलानी या मैत्रीला ’सदाबहार’ मैत्री म्हणतात, तसेच चीनहून निघता-निघता गिलानींनी तिचा ’निरंतर मैत्री’ असाही उल्लेख केला. चिनी लोक निमंत्रणाला मान देऊन एकाद्या देशात आले कीं ते त्या देशाला ’निरंतरपणे’ व्यापून टाकतात. खरे तर त्यांना यासाठी निमंत्रणही लागत नाहीं हा अनुभव आपल्याला अक्साईचिनबाबतीत आलेलाच आहे.
माझ्या मते "शत्रूचा शत्रू तो आपला मित्र" या कालबाह्य प्रणालीवर आधारलेले चिनचे हे धोरण कधीच यशस्वी होणार नाहीं. पाकिस्तानने आपण बांगलादेश युद्धानंतर त्या देशातून आपले सैन्य बाहेर काढून सत्ता मुजीबुर रहमान यांना बहाल केली हे विसरू नये. या उलट चीनने तिबेटवरची आपली मगरमिठी आणखीच घट्ट आवळून त्यांच्या 'निरंतन मैत्री'चे उत्कृष्ठ उदाहरण आहे हेही विसरू नये. आपला मित्र नीट पारखून निवडावा. सर्वांगीण विचार करता पाकिस्तानला भारताच्या मैत्रीशिवाय पर्यायच नाहीं हे त्यांना पटेल यात मला तरी शंका वाटत नाहीं.
(*१) पुढे त्यांना विचारता ज. मुशर्रफ यांनी केलेल्या "कारगिल" मोहिमेच्या फाजील दुस्साहसाने ही मैत्री रुळावरून जवळ-जवळ खाली उतरलीच होती. पण पुढे नवाज शरीफना सत्य आणि चूक समजून आली व त्यांनी ही मोहीम मागे घेतली. लाहोरला वाजपेयींच्या स्वागताला न आलेल्यात सर्वात नजरेत भरणारी अनुपस्थित व्यक्ती होती पाठीत वार करू पहाणारे मुशर्रफ हीच! पुढे त्यांच्याबरोबर उगीचच समेटाची बोलणी करण्यासाठी त्यांनाच आग्रा शिखर परिषदेसाठी बोलावून त्यांना अस्थानी प्रतिष्ठा देऊन, त्याच्या CEO या बिरुदावलीचे राष्ट्राध्यक्ष (President) मध्ये रूपांतर करायची संधी देऊन वाजपेयींनी एक घोडचूकच केली होती!)
हा लेख इतर कांहीं संस्थळांवर यापूर्वी प्रसिद्ध झालेला आहे. कांहींनी वाचलाही असेल.

 
^ वर