तुम्हाला कोण व्हायचंय? - लेखक, कवी की नाटककार!

नमस्कार,
नुकत्याच वाचनात आलेल्या एक-दोन पुस्तकांमुळे काही लेखक आणि कवींचा थोडा जवळून परिचय झाला. त्यामुळे एक प्रश्न मनात आला तो इथे चर्चेला घेत आहे.
' आपल्या मते इथून पुढे साधारण दहा वर्षांनी मराठी साहित्यात नवीन कवी आणि लेखक निर्माण/प्रसिद्ध होतील का?' असा साधारण या चर्चेचा विषय आहे. इथे मला अभिप्रेत असलेले लेखक/कवी म्हणजे ज्यांचे लिखाण प्रसिद्ध् होते/होईल असे आहेत.
मला महत्वाचे वाटणारे काही मुद्दे आणि निरीक्षणे खाली देत आहे.

१. कला शाखा आणि शिक्षकी पेशा - मराठीतील लेखक/कवी पाहिले तर बरेचसे हे शिक्षक/प्राध्यापक असलेले दिसतात. उदा. मर्ढेकर, खांडेकर. सध्या शिक्षक/प्राध्यापक (कला शाखा) हा व्यवसाय म्हणून पाहिला जात नाही. कला शाखा ही बाकी काही जमले नाही तर अशा कारणांमुळे घेतली जाते. मुलाला/मुलीला जरी एखादेवेळेस इच्छा असली तरीही पालक तयार नसतात. त्यामुळे गुणवान विद्यार्थांनी कलाशाखेकडे पाठ फिरवलेली दिसते. (अर्थात बाकी शाखांमध्ये पदवी घेऊन लिखाणाची आवड जोपासणे शक्य आहे. पण प्रतिभावंत आणि प्रसिद्धीस येणार्‍या लेखनासाठी कला शाखा आवश्यक वाटते.)
२. माध्यमिक शाळांचे माध्यम - वर्तमानपत्रातून बरेचदा याबद्दल लिहून येते. तशीच आणखी एक बातमी. इंग्रजी माध्यमामुळे मराठी साहित्य वाचनाकडे मुलांचे आपोआप दुर्लक्ष होते. तसे इथून आलेले ही काही कवी बनतायत. पण इंग्लीश. (उदा. बातमी.)
३. मराठी विषयाचा अभ्यासक्रम आणि शिकवणारे प्राध्यापक - प्राध्यापकांचा मुद्दा वर आलेला आहेच. विषयाची गोडी लावणारे शिक्षक मराठी माध्यमिक शाळेत फार कमी आढळतात. मराठी विषय ही भाषा/साहित्य असा शिकवला जात नाही. प्रश्नपत्रिकाही पाढांतरावर भर देणार्‍या असतात.
४. यामुळे वाचन कमी. जीएंची पत्रे वाचल्यानंतर त्यांच्या अफाट इंग्रजी व मराठी वाचनाची कल्पना आली.
५. घरातील वातावरण - हा मुद्दा बोरकरांच्या कवितासंग्रहाची प्रस्तावना वाचताना मनात आला. त्यांनी त्यांच्या लहानपणी झालेले संतकाव्याचे संस्कार यात लिहिले होतेज आता रात्री गोष्टी सांगणे, कविता श्लोक पाठ करणे हे संपल्यात जमा झाल्यामुळे मुले उशीरा वाचनाकडे वळतात.
या मुद्दयांना धरून आपली मते किंवा काही नवे मुद्दे असतील तर ते इथे मांडावीत ही विनंती.

तळटीप : - शीर्षकावरून हा 'लेखक म्हणून ....वर प्रसिद्ध कसे व्हावे?' किंवा 'प्रतिसाद मिळवण्याच्या सोप्या युक्त्या' अशा सदरातील लेख वाटेल. पण हा चर्चाप्रस्ताव आहे.

Comments

दुवे

लेखातील दुवे दिसत नाही आहेत. ते खाली देत आहे.
आणखी एक बातमी http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2065956.cms

पण इंग्लीश. (उदा. बातमी.) http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2061678.cms

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

टिव्हीचा प्रभाव आणि 'ग्लॅमर'चा अभाव

' आपल्या मते इथून पुढे साधारण दहा वर्षांनी मराठी साहित्यात नवीन कवी आणि लेखक निर्माण/प्रसिद्ध होतील का?'

होतील पण त्यांची संख्या फारच कमी असेल असे वाटते.

चर्चेच्या प्रस्तावात दिलेले मुद्दे विशेषतः कला शाखेविषयी औदासिन्य, मराठी माध्यमातून शिक्षणाचे घटते प्रमाण, इंग्रजीचा सर्वत्र वाढता वापर (जो काळाची गरज म्हणून स्वीकारणे अपरिहार्य आहे), कारणीभूत आहेतच, त्याशिवाय मला वाटते

१. दूरचित्रवाणीचा प्रभाव - शेकडो वाहिन्या, मालिका, "रिऍलिटी शोज़" इ. च्या प्रभावामुळे मुलांचा तसेच पालकांचा बराच वेळ टिव्ही पाहण्यात जातो. त्यामुळे वाचनाबरोबरच इतर सामाजिक कार्यक्रम आपोआप कमी होतात.
२. 'ग्लॅमर'चा अभाव - कलाक्षेत्रातील इतर लोकांपेक्षा लेखक, कवी यांचे ग्लॅमर कमी आहे. याला निरनिराळ्या माध्यमांमधून लेखक साहित्यिकांना मिळणारे कमी महत्त्व आणि चित्रपट/टिव्ही कलाकारांना मिळणारे अवास्तव महत्व जबाबदार आहे. म्हणजे पर्यायाने आपण सर्व ("लोकांना जे हवे ते आम्ही देतो") जबाबदार आहोत. (क्रिकेटच्या ग्लॅमरमुळे इतर खेळांची होणारी घुसमट या प्रकारचीच.)

या गोष्टीही कारणीभूत आहेत.

प्रतिसाद

आपल्या मते इथून पुढे साधारण दहा वर्षांनी मराठी साहित्यात नवीन कवी आणि लेखक निर्माण/प्रसिद्ध होतील का?'

१० वर्षांनी व्हायला हरकत नाही परंतु १०० वर्षांनी किती होतील किंवा होतील का असा प्रश्न पडतो.

कलाशाखेतही जाणारे हुषार विद्यार्थीही पाहिले आहेत, परंतु प्रामुख्याने मध्यमवर्गियांत ज्यांना सुखकर आयुष्याची ओढ आहे त्यांना योग्य मार्गाने झटपट पैसा मिळवण्यासाठी कलाशाखा उपयुक्त नाही असे वाटत असावे. तसेच, जे आधीच सुखवस्तू आहेत त्यांना आपली परंपरा, पत, पोझिशन टिकवण्यासाठी कलाशाखा अडसर वाटत असावी. जसे, डॉक्टरच्या मुलाला वडिलांचा उद्योग सांभाळण्यासाठी डॉक्टरच व्हावे असे वाटते किंवा त्याच्यावर तशी जबाबदारी पडते वगैरे.

मराठीकडे दुर्लक्ष होते ही गोष्ट नाकारून मात्र चालणार नाही. त्याला पालकांची अनास्थाही कारणीभूत आहे. लेखकांना ग्लॅमर नाही असे वरील प्रतिसादात म्हटले आहे ते खोटे नाही. मराठी सोडा परंतु इंग्रजी वाचनही मुले फार करतात असे वाटत नाही. यावर एक उदा. उपाय म्हणून द्यावेसे वाटते.

अमेरिकेत बालकथा लिहिणार्‍या लेखकांना शाळांत आमंत्रित केले जाते. मुले त्याच्याबरोबर पूर्ण दिवस घालवतात. त्याला लेखन करायची इच्छा कशी झाली, त्याने कोणती पुस्तके लिहिली, त्यातून त्याला कसा आनंद मिळाला इ. गोष्टींवर बोलणे होते. दरवर्षी मुले अभ्यासक्रम म्हणून पुस्तके लिहितात, त्याचे मुखपृष्ठ तयार करतात, चित्रे बनवतात. लेखक ज्या दिवशी शाळेत येतो त्या दिवशी या पुस्तकांचे प्रदर्शन होते. (बालकथेचा संदर्भ आला कारण मला प्राथमिक शाळेबद्दलच माहित आहे. पुढच्या वर्गांत कसे काय होते त्याबाबत सध्या कल्पना नाही.)

याखेरिज, मुलांना त्यांच्या प्रगतीप्रमाणे पुस्तके वाचायला दिली जातात. ती अपेक्षित काळात वाचून त्यावर त्यांना संगणकावर प्रश्नावली सोडवावी लागते. त्यांना ग्रंथालयात काम/ मदत करता येते. पुस्तक प्रदर्शनात मदत करता येते.

टिव्ही किंवा संध्याकाळी ट्युशन क्लासेस, खेळाचे क्लासेस यामुळे जर मुलांना वाचनाला वेळ होत नसेल तरीही दिवसातून १५-२० मि. ते अर्धा तास वाचनाला मिळू नये ही अतिशयोक्ती वाटते. काळ बदलत आहे. पाढे म्हणणे, श्लोक म्हणणे हे जर कालबाह्य होत असेल तर आपण वेगळे उपाय योजले पाहिजेत.

वा! पण कुठुन आणायचे ते?

प्रियाली ताई,
किती छान उपक्रम् आहे बालकथाकारांना शाळेत बोलावण्याचा!
फार आवडला!

पण विचार करायला लागल्यावर प्रश्न पडला की नव्या पुढीत कोणते लेखक असे आहेत? राजा मंगळवेढेकर, शांता शेळके नि त्यांच्या बरोबरचे लेखक कधीच हरवले. त्यांचा वारसा वारसा चालवायला त्या ताकदीचं कोणी आलंच नाही. आणी आले असले तरी त्यांचं लेखन छापल्यावर खपलं तर पहिजे ना?

ते सोडा, ऐकायची म्हंटली तर नवीन बाल कविता नि गाणी तरी कुठे आहेत?
जुन्याच "मामाच्या गावाला जाऊया" ला नवीन साज देण्या शिवाय काय येते आहे सध्या बाजारात?

(व्यथीत)
गुंडोपंत

धरून बांधून आणायला हवेत. :)

पण विचार करायला लागल्यावर प्रश्न पडला की नव्या पुढीत कोणते लेखक असे आहेत? राजा मंगळवेढेकर, शांता शेळके नि त्यांच्या बरोबरचे लेखक कधीच हरवले. त्यांचा वारसा वारसा चालवायला त्या ताकदीचं कोणी आलंच नाही. आणी आले असले तरी त्यांचं लेखन छापल्यावर खपलं तर पहिजे ना?

प्रश्न महत्त्वाचा आहे खरा परंतु याकडे वेगळ्या नजरेतून पाहता येईल. फुरसुंगीचा फा. फे. तुम्हा-आम्हाला आवडला म्हणून तो आजच्या पिढीला आवडेलच असे नाही. (असे म्हणताना वाईट वाटते पण ते सत्य आहे. शेरलॉक होम्स आजच्या पोरांना आवडत नाही. बोजड कपडे घालणारा, जवळ पिस्तुलही न बाळगणारा कोणी सत्यान्वेशी असू शकतो काय? असे प्रश्न त्यांना पडतात. काळ बदलला आहे त्यामुळे मुलांनी आपल्या वाटेने जाण्याऐवजी आपण त्यांच्या वाटेने जाऊन सुवर्णमध्य साधणे आवश्यक.)

पूर्वीच्या काळी पुस्तके सोडून इतर माध्यमे उपलब्ध नव्हती, आता आहेत, करमणूकीची साधने बदलली आहेत. तरीही,

लोकसत्ता बालरंग नावाची पुरवणी काढते. त्यात अनेक लेखक लिहितात. वर्तमानपत्रांत मुलांच्या कार्टून फिती दिसतात, मुलांच्या मालिका बनतात त्यांचे पटकथाकार असतात. जे लेखक आता नाहीत त्यांच्या मुला-नातेवाईकांना आमंत्रित करुन आपल्या आई-वडलांविषयी आणि त्यांच्या साहित्याविषयी बोलते करता येईल. मला वाटते बाजारात अद्यापही असे अनेक लेखक पुढे येण्यास उत्सुक असावेत परंतु आम्हाला बोक्या सातबंडेऐवजी हॅरी पॉटर आवडत असल्याने आपणच त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. (मी भारतात जे बालसाहित्य अस्तित्वात आहे त्याची अंदाजपंचे नावे टाकली आहेत, त्याऐवजी योग्य नावे सुचली तर ती घालावीत.)

अशी उदासीनता वाढत राहिली तर मात्र हे सर्व नामशेष होईल असे वाटते.

छान

प्रियाली,
आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार. हो. वाचनाची आवड ही लहानपणापासूनच लागते. परदेशात मुलांना शिक्षणाव्यतिरिक्त इतर कलागुणांमध्येही पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण मला वाटते काही उपाय आपण घरापासून चालू केले पाहिजेत. अगदी चांगले उदाहरण म्हणजे भा. रा. भागवतांचा फास्टर फेणे. अलिकडे किती मुले ही पुस्तके वाचतात आणि किती हॅरी पॉटर चे सिनेमे बघतात हे पाहिले तर फरक नक्कीच स्पष्ट होईल.

- ओंकार.

स्पष्ट झालेलं नाही..

ओंकारा,

लेका, तुला नक्की काय म्हणायचं आहे, नक्की कोणत्या मुद्द्यावर चर्चा अपेक्षित आहे हे निदान मला तरी स्पष्ट झालेलं नाही!

असो..

तात्या.

मिसळपाव डॉट कॉमच्या संपादक मंडळात प्रवेशभरती सुरू आहे. इच्छुकांनी संत तात्याबांकडे अर्ज करावेत! ;)

बरोबर

तात्या,
चर्चाप्रस्ताव टाकल्यानंतर मलाही असेच वाटले. काय झाले की डोक्यात बरेच मुद्दे घोळत होते. ते सगळे मांडले पण मूळ मुद्दाच हरवला. तर मला सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात मराठीला चांगले लेखक/कवी मिळतील का? आमच्या व नंतरच्या पिढीतील किती मुले/मुली छापण्यायोग्य लिखाण करतील? असे प्रश्न पडले ज्यांची उत्तरे फारशी समाधानकारक नाहीत. तर यावर उपाय काय असू शकतात? असा साधारण चर्चेचा विषय मला मांडायचा आहे.

- ओंकार.

अहो दुवा तर द्या

मिसळपावाची चर्चा बरीच झाली,

आपण सुरू केलेल्या व जाहिरातबाजी करीत असलेल्या संकेतस्थळाचा दुवा आपल्या सही शिक्क्या सोबत देण्याची कृपा तरी कराल की नाही ?

की, आपण अर्धवट सोडलेल्या कथांसारखा हा ही एक "उपक्रम" आहे ?

(निंदकाचे घर असावे शेजारी !)

कमालच आहे.

मराठी विषय ही भाषा/साहित्य असा शिकवला जात नाही.
कमालच आहे.आता काय बोलावं !

कोणताही कलावंत घडतो.तेव्हा काही गूण सोन्याचे असतात,अन् काही सोनाराचे.सर्वच मातीची, सूंदर गाडगी मडगी होत नाही.असा कूंभारांचा अनूभव असतो.त्यातली कितीतरी मातीचे गोळे टाकून द्यावे लागतात.म्हणजे बघा, मला मातीपासून सूंदर मूर्ती बनवायची आहे.त्यासाठी मातीचा दर्जा,चिखलाचा गोळा,पाण्याचे त्याच्यातले प्रमाण,आणि मग कूंभाराचे कोशल्य.मग एक सूंदर मूर्ती तयार होते.
जर आडातच नसेल तर पोह-यात कूठून येणार.
अवांतर:-आमच्या मार्गदर्शनामूळे अनेक विद्यार्थी , लेखक,कवी,म्हणून घडले, घडविले आहेत. नोकरी लागल्यावर,आणि लग्न झाल्यावर त्यांच्यातल्या या प्रतिभेचे काय होते कूणास ठाऊक.नंतर त्याला काही सूचतच नाही म्हणे आता हा आमच्या काळजीचा विषय आहे;)

आपला.
कूंभार,सोनार,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कमाल कसली?

मराठी विषय ही भाषा/साहित्य असा शिकवला जात नाही.
कमालच आहे.आता काय बोलावं
!

बिरुटे साहेब,
अहो यात कमाल कसली. जे अनुभवलं ते लिहिलय. आमच्या शाळेत केवळ दोन शिक्षक असे होते ज्यांना अभ्यासक्रमात असलेली कविता शिकवताना त्या कवीच्या इतर कविता ही माहीत असत. नाहीतर बाकीच्यांना धडा वाचून दाखवला आणि कवितेच्या प्रत्येक ओळीतला अर्थ (अर्थातच मार्गदर्शक वापरून ) सांगितला की मराठीचा तास झाला असे वाटे. जे लिहीले होते त्यास अर्थातच सन्माननीय अपवाद असतीलच . मुद्दा हा प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचा देखील आहे. जे परिक्षेत विचारतात तेच आणि तेवढेच आम्ही शिकवतो असे म्हटले तर ते देखील चूक म्हणता येणार नाही.

अवांतर:-आमच्या मार्गदर्शनामूळे अनेक विद्यार्थी , लेखक,कवी,म्हणून घडले, घडविले आहेत. नोकरी लागल्यावर,आणि लग्न झाल्यावर त्यांच्यातल्या या प्रतिभेचे काय होते कूणास ठाऊक.नंतर त्याला काही सूचतच नाही म्हणे आता हा आमच्या काळजीचा विषय आहे;)

हो. आमच्याही. कारण लेखक/कवी हा व्यवसाय म्हणून बघण्याची मानसिकता आता दिसत नाही.

- ओंकार.

 
^ वर