ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र - कोंकणपूर- भाग 2

द्रविड देशातील कांचीपुरम येथून निघालेल्या ह्युएन त्सांगने परतीच्या प्रवासासाठी उत्तर दिशेला प्रयाण केले व आपला पुढचा मुक्काम कोंकणपुर या गावात केला हे आपण आधीच्या भागात बघितले. या प्रवासाबद्दल ह्युएन त्सांगने स्वत: काय लिहून ठेवले आहे ते आपण प्रथम पाहूया.
“Leaving the country of Ta-lo-pi-ch'a (Dravida) and travelling northwards, we enter a forest wild, in which are a succession of deserted towns, or rather little villages.
Brigands, in concert together, wound and capture (or delay) travellers. After going 2000 li or so we come to Kong-kin-na-pu-lo (Konkanapura).”
"द्रविड देश सोडून उत्तर दिशेला प्रवास करण्यास प्रारंभ केला की आपण एका मनुष्य वावर नसलेल्या अरण्यात शिरतो. या अरण्यात एका पाठोपाठ एक अनेक निर्मनुष्य गावे किंवा खेडेगावे लागतात.” Watters या संशोधकाने या वाक्याचे भाषांतर "निर्मनुष्य असलेले एक मोठे गाव व छोट्या वस्त्या लागतात" असे केले आहे. "लुटारू व दरोडेखोर एकत्रितपणे प्रवाशांवर हल्ला करतात किंवा त्यांना पकडतात. यामुळे प्रवासात दिरंगाई होऊ शकते. 2000 लि अंतर चालल्यावर आपण कोंकणपुरला पोचतो.”
ह्युएन त्सांगचा शिष्य 'हुई लि' हा याच प्रवासाबद्दल लिहितो.
“From Dravida he (Master of law) went north-west in company with about seventy priests from Simhala, and visited the sacred traces for the purpose of reverent observation”
"द्रविड देशातून 'विधीविशारद' व त्यांच्या बरोबरचे अंदाजे सत्तर सिंहली भिख्खू यांनी वायव्येकडे प्रयाण केले व या प्रवासात त्यांनी अनेक आदरणीय व पवित्र स्थानांना भेटी दिल्या.”
या दोन्ही प्रवासवृत्तांमधून, ह्युएन त्सांग व त्याचे शिष्य यांनी उत्तरेला प्रयाण केले की वायव्येला या बद्दल एकवाक्यता आढळत नाही. जे. बर्गेस या संशोधकाने जून 14, 1893 रोजी प्रसिद्ध केलेल्या आपल्या एका लेखात, या फरकाचा खुलासा दिला आहे. त्याच्या मताने ह्युएन त्सांग किंवा त्या काळातील इतर चिनी प्रवासी हे चार मुख्य दिशांचा ढोबळ मानाने उल्लेख करत असत. ज्या वेळी एखादे स्थळ वायव्येसारख्या एखाद्या उपदिशेला अगदी सरळ मार्गावर असेल तरच उपदिशांचा वापर करत. त्यामुळे ह्युएन त्सांगने निर्देश केलेल्या उत्तर दिशेचा अर्थ ईशान्य व वायव्य या दिशांमधील कोनाची दिशा असा घेतला तरी चालण्यासारखे आहे. यामुळे कोंकणपुरचा शोध घेताना आपण एवढेच लक्षात घ्यायचे की हे स्थान कांचीपुरमच्या उत्तर ते वायव्य दिशांमधे कोठेतरी होते.
दुसरा महत्वाचा मुद्दा अंतरांबद्दलचा आहे. ह्युएन त्सांगने मोजलेली अंतरे ही दोन ठिकाणांमधले अंतर चालायला किती पावले टाकायला लागली? यावर आधारित आहेत. याला चीनमध्ये लि असे नाव आहे. (अर्थात 1 लि म्हणजे 1 पाऊल नव्हे.) लि या एककात (Unit) दिलेली अंतरे कोणत्या रस्त्याने प्रवास केला? त्याला वळणे होती का? घाट होते का? नद्या ओलांडून जाण्यासाठी लांबचा फेरा घ्यावा लागला का? या सगळ्या बाबींवर अवलंबून असणार आहेत. त्यामुळे या 'लि' एककात दिलेल्या अंतराचे, मैलात केलेले परिवर्तन ढोबळ मानानेच घेणे आवश्यक आहे. या कारणामुळे कांचीपुरम आणि कोकणपूर यातला 330 मैलाचा अंदाज प्रत्यक्षात 200 मैलापासून 350 मैलापर्यंत असू शकतो असे मला वाटते.
कोंकणपूर गाव व राज्य याबद्दल ह्युएन त्सांगने बरेच वर्णन केले आहे. या वर्णनावरून हे स्थान बरेच महत्वाचे व मोठे असले पाहिजे हे लगेच लक्षात येते. ह्युएन त्सांगने कोंकणपूर बद्दल लिहिलेल्या वर्णनापैकी आपल्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे असे आहेत.
1. देशाचा परिघ 5000 लि (अंदाजे 800 मैल) एवढा आहे. (देश फारसा मोठा नाही)
2. जमीन अतिशय सुपीक व सतत लागवडीखाली असल्याने उत्तम पिके येतात. हवा अतिशय गरम आहे. ह्युएन त्सांगने केलेल्या इतर वर्णनावरून देशातील सुबत्तेची व श्रीमंतीची कल्पना येते.
3. स्थानिक लोक कृष्णवर्णाचे आहेत. त्यांचा स्वभाव रानटी व असभ्य वाटतो. मात्र या लोकांची आकलनशक्ती अतिशय तीव्र आहे व ते मनस्वी स्वभावाचे वाटतात. शिक्षणाबद्दल त्यांना प्रेम आहे व सद्गुण व अंगभूत हुशारी यांना ते महत्व देतात. या देशात 100 संघराम आहेत व 10000 उपासक आहेत. महायान व हीनयान अशा दोन्ही पंथांचे उपासक येथे आहेत. देशात शेकडोच्या संख्येने निरनिराळ्या पंथांच्या देवांची देवळे आहेत व या सर्व देवांची येथे उपासना होते.
4. शहराच्या उत्तरेला ताल वृक्षांचे 30 लि (अंदाजे 5 मैल) परिघाचे एक मोठे अरण्य आहे.
5. शहराच्या नैऋत्येला सम्राट अशोकाने बांधलेला 100 फूट उंचीचा स्तूप आहे.
कोंकणपूरच्या स्थानाबद्दल आपण काही अंदाज करण्याआधी भाषांतरकारांनी केलेले अंदाज तपासू. सर्वसाधारणपणे कोंकणपूर दक्षिण भारतात असावे या बद्दल जरी एक मत असले तरी प्रत्यक्ष स्थानाबद्दल प्रचंड मतभेद आहेत. कोंकणपूरचे स्थान म्हणून ज्या जागा निरनिराळ्या संशोधकांनी सूचित केल्या आहेत. त्या अशा आहेत.
1. कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील बनवासी हे गाव. कदंब राजांची राजधानी येथे होती. -
( Saint-Martin या संशोधकाच्या मताप्रमाणे)
2. तुंगभद्रा नदीच्या उत्तर काठावर असलेले अनागुन्डी गाव.
- (Cunningham या संशोधकाच्या मताने)
3. मैसूर जवळचे नागपट्टम - (Fergusson या संशोधकाच्या मताने )
4. चंद्रपूर
5. गोळकोंडा(हैदराबाद) - (Beal या संशोधकांच्या मताने. )
6. कोकनुर- (Burgess या संशोधकाच्या मताने )
7. Watters या संशोधकाने अल बिरूनीचा दाखला दिला आहे. अल बिरुनीने कोकण हा प्रदेश समुद्राजवळ असल्याचे सांगितले असल्याने या गावाचे नाव चिनी लिपीतून इंग्रजीत भाषांतर करताना चुकीने कोकणपूर असे पूर्वीच्या भाषांतरकारांनी ठरवलेले आहे व प्रत्यक्षात योग्य भाषांतर केल्यास हे नाव दख्खनपूर किंवा थक्कनपूर असे असले पाहिजे असे आपले मत त्याने व्यक्त केले आहे.
कणपूर गावाच्या स्थानाबद्दल, संशोधकांनी केलेले हे दावे, एवढ्या विस्तृत प्रदेशांतर्गत आहेत की हे सर्व अंदाज अंधारात एखादा दगड फेकण्यासारखेच आहेत असे मला राहून राहून वाटते आहे. मग कोकणपूरचे स्थान आपल्याला नेहमी अज्ञातच राहणार आहे का आपण काही नवे अंदाज बांधू शकतो?
या सर्व संशोधकांनी आपले अंदाज करताना त्या काळची राजकीय परिस्थिती बहुदा लक्षातच घेतली नसावी असे माझे मत झाले आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की कोकणपूर या स्थानामधल्या मुक्कामानंतर, ह्युएन त्सांगने पुलकेशीच्या महाराष्ट्रामधे प्रवेश केलेला आहे या महत्वाच्या बाबीकडे या सर्व संशोधकांचे दुर्लक्ष झालेले दिसते आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, कोकणपूर हे गाव व राज्य पुलकेशीच्या महाराष्ट्रात नव्हते किंवा किमान पक्षी हे गाव व राज्य, पुलकेशी सम्राटाचे मांडलिक राज्य तरी असले पाहिजे. सुदैवाने पुलकेशीच्या साम्राज्य सीमा काय होत्या त्या बद्दलचा एक महत्वपूर्ण शिलालेख आज उपलब्ध आहे. हा शिलालेख कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील ऐहोले गावाजवळच्या जैन मंदिरात सापडलेला आहे. या लेखातील वर्णनाप्रमाणे, पश्चिमेला कोकण प्रांताचा समुद्र तट, पूर्वेला कलिंग देशाचा समुद्र तट, उत्तरेला हर्षाच्या राज्याला भिडलेला व नर्मदा नदीपर्यंतचा भाग व दक्षिणेला कावेरी नदीपर्यंतचा भाग, पुलकेशीच्या राज्याचा भाग होता. या शिलालेखावरून हे स्पष्ट होते की कोकणपूर हे गाव पुलकेशीच्या स्वामित्वाखाली असलेल्या या भूप्रदेशात नसणार आहे. ही गोष्ट लक्षात घेतली की संशोधकांनी वर सूचित केलेली सर्व गावे बाद ठरतात आणि Watters या संशोधकाच्या म्हणण्याप्रमाणे कोकणपूर हे भाषांतरही बहुदा चुकीचे असावे असे दिसते.
ह्युएन त्सांगने जेंव्हा हा प्रवास केला होता तेंव्हा पुलकेशी राजाला एकच प्रबळ असा शत्रू उरलेला होता. तो म्हणजे पल्लव राजघराण्यातील महिन्द्रवर्मन (पहिला) हा राजा. या राजाची राजधानी, ह्युएन त्सांगने आपला प्रवास जेथून चालू केला ते कांचीपुरम शहर ही होती. याच्या काही काल आधी, पुलकेशी राजाने या महिन्द्रवर्मन राजाचा युद्धात मोठा पराभव केला होता. परंतु कांचीपुरम मात्र अभेद्यच राहिले होते. कांचीपुरम पुलकेशीच्या राज्याच्या साधारण अग्नेय दिशेला येते व या दिशेला पुलकेशीचे साम्राज्य साधारन पेन्नार नदीकाठापर्यंतच सीमित होते.
Chalukya_territories_lg
ह्युएन त्सांगच्या वर्णनातील एका महत्वाच्या वाक्याचा वर मी उल्लेख केला आहे. कांचीपुरम ते कोकणपूर या प्रवासात आपल्याला अनेक निर्मनुष्य गावे एका पाठोपाठ लागली असे वर्णन तो करतो. माझ्या मताने या वर्णनाचा स्पष्ट अर्थ असा होतो की ह्युएन त्सांग प्रवास करत असलेल्या त्या मार्गावर मोठे युद्ध काही काळापूर्वी होऊन गेले होते व त्या युद्धात नष्ट झालेली गावे त्याने प्रवास करताना बघितली होती. या सगळ्या वर्णनावरूम एक गोष्ट मला तरी स्पष्ट होते आहे. ती म्हणजे कोकणपूर हे गाव पल्लव व चालुक्य राज्यांचा सीमेवर असलेले मांडलिक राज्य असले पाहिजे व त्या राज्याचे पुलकेशी राजाशी असलेले संबंध सौहार्दपूर्ण असले पाहिजेत.
त्या वेळच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला तर असे दोन उमेदवार आपल्याला मिळतात. पहिला उमेदवार म्हणजे कोंगानीवर्मन माधव या राजाने स्थापन केलेले गंगा(पश्चिम) हे राज्य. पुलकेशीच्या काळात दुर्विनिता हा राजा या राज्याच्या गादीवर होता. ऐहोलेच्या शिलालेखात या राजघराण्याच्या पुलकेशीशी असलेल्या एकनिष्ठतेचा उल्लेख आहे. या राज्यामध्ये सध्याच्या मैसूर, हसन, मंड्या व बंगलूरू या शहरांच्या परिसरातला भाग, तामिळनाडू मधला कोंगू हा भाग व कर्नाटक, आंध्र-प्रदेश सीमेवरचा अनंतपूर जवळचा भाग यांचा समावेश होत होता. या राज्याची राजधानी दक्षिण कर्नाटकातील तालकड येथे होती.
आन्ध्र प्रदेशातील नेल्लोर पासून कर्नाटक सीमेवरील अनंतपूर पर्यंत राज्याची सीमा असलेले या भागातले दुसरे महत्वाचे मांडलिक राज्य म्हणजे बाण हे राज्य, आपला दुसरा उमेदवार आहे. हे राज्य आधी पल्लव राजांचे मांडलिक राज्य होते. पुलकेशीने पल्लव राजाचा पराभव केल्यावर हे राज्य पुलकेशीचा सामंत राज्य झाले. सामंत राज्य आणि मांडलिक राज्य यात मला तरी फारसा फरक दिसला नाही. पुलकेशीच्या काळात हे राज्य, कर्नाटकातील चित्तूर पासून आंध्र प्रदेशातील कडाप्पा व नेल्लोर पर्यंत पसरलेले होते.
पलार नदी ही या राज्याची दक्षिण सीमा होती. बाण या राज्याची राजधानी, आन्ध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्हा व हिंदुपूर तालुक्यात असलेल्या पारिगी (पूर्वीचे नाव पारिवीपूर) या गावाजवळ होती.
नकाशावर बघितले तर गंगा या राज्याची राजधानी असलेले तालकड हे गाव कांचीपुरमच्या नैऋत्येला येते. त्यामुळे ते बादच करावे लागेल. बाण राज्याची राजधानी असलेले पारिगी (पूर्वीचे नाव पारिवीपूर) हे गाव मात्र कांचीपुरमच्या वायव्येला येते आहे. हिंदुपूर तालुक्याचा परिसर ज्या भौगोलिक स्थानावर आहे तो भाग नकाशावर बघितला तर तो चालुक्य व पल्लव साम्राज्यांच्या सीमेवर येतो.
india map with parigi location
पारिगी व कांचीपुरम यातील As Crow fliesअंतर, 170 मैल आहे. परंतु पारिगीला कांचीपुरम पासून पोचण्यासाठी सध्याच्या रस्त्यांचा वापर केला तर 300 मैलाहून जास्त अंतर कापावे लागते. त्यामुळे ह्युएन त्सांगने दिलेले अंतर फारसे चूक नसावे असे मला तरी वाटते.
कोकणपूर हे गाव म्हणजे आन्ध्र प्रदेशातील पारिगी या खेडेगावाचा परिसरात असलेले पारिवीपूर आहे असे मान्य करायचे ठरवले तर आतापर्यंतच्या चर्चेतल्या कोणत्या गोष्टी या निवडीला पाठिंबा देऊ शकतात?
1. पेन्नर आणि चित्रावती या दोन नद्या या भागातून वहातात, त्यामुळे ह्युएन त्सांगच्या कालात येथे निबिड अरण्य असणे पूर्ण शक्य आहे.
2. हवा अतिशय उष्ण आहे.
3. लोकांचे वर्णन आंध्र प्रदेशच्या लोकांना बर्‍यापैकी लागू पडते.
4. हा भाग चालुक्य व पल्लव राज्यांचा सीमेवर असल्याने युद्धामुळे गावे बेचिराख झाल्याचे वर्णन या भागात पूर्ण शक्य आहे.
5. आन्ध्र प्रदेशात बुद्धकालीन जुनी मंदिरे, विहार यांचे अवशेष विपुल प्रमाणात आढळतात त्यामुळे ह्युएन त्सांगने केलेली स्तूपांची वगैरे वर्णने या भागाला गैरलागू वाटत नाहीत. तसेच येथे हिंदू देवळांची संख्याही भरपूर असणार आहे.
ही सर्व कारणे लक्षात घेतली तर पारिगी गावाच्या परिसरातील पारिवीपूर हे ह्युएन त्सांगचे कोकणपूर असावे असे म्हणणे पूर्ण शक्य वाटते.
8 मे 2011

लेखनविषय: दुवे:

Comments

कोंगणपुरम्

कोंगणपुरम्

मग कोकणपूरचे स्थान आपल्याला नेहमी अज्ञातच राहणार आहे का आपण काही नवे अंदाज बांधू शकतो?

आधुनिक भारतदेशाच्या तमिळनाडु राज्यामध्ये सेलम् जिल्ह्यात कोंगणपुरम् नामे एक पंचायतग्राम आहे. येथे कोंगु लोकांची वस्ती अधिकपक्षी असल्याने ह्यास कोंगणपुरम् हे नांव प्राप्त आहे. आपल्या लेखात उद्धृत केलेली युवान् सुवांङ् (யுவான் சுவாங்) ह्याची कोकणपूर येथील लोकांबद्दलची काही निरिक्षणे कोंगणपुरम् येथील कोंगु लोकांशी जुळावीत. कोंगु लोक कृष्णवर्णीय होत. कोंगु वेळाळर् लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि जमीनदारी असून ते आजदेखील श्रीमंतांत गणले जातात. कोंगुदेशामध्ये ऊष्ण तापमानांत येणारी पिके घेतली जातात. जमीनदारी व्यवसायाच्या पार्श्वभूमीकारणे बाहेरील व्यक्तीस हे लोक 'स्वभावाने रानटी आणि असभ्य' वाटणे शक्य आहे. आपण निर्देशिलेल्या दिशांचा विचार करतां मात्र हे कोंगणपुरम् एकूणांत चित्तभ्रमोत्पादक ठरते. संगती जोडलेले मानचित्र पहावे.

इतर विधानांविषयी माझ्याजवळ विशेष माहिती नाही, परंतु नवे अंदाज बांधतांना ह्या माहितीचा निश्चितच विचार होवू शकेल असे वाटते.

--

सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

वाचते आहे

हा ह्युएन त्सांगचा प्रवास मार्ग www.r4e.org येथून घेतला आहे.

चंद्रशेखर आणि प्रमोद सहस्रबुद्धेंचे लेख एका मागोमाग एक वाचल्याने गोंधळ उडाला म्हणून नकाशे चिकटवते आहे.

ऐहोले येथील शिलालेख्

माझ्या लेखात निर्देश केलेला ऐहोले येथील शिलालेखाचा दुवा लेखात द्यायचा राहिला. तो येथे दिला आहे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

कोंगणीपूर म्हणजेच कोंगणीवर्मनचे गंगा राज्य

गंगा या राज्याची राजधानी असलेले तालकड

हे जरी कांचीच्या नैऋत्येस असले तरी ह्युआन त्सांगच्या काळी गंगा (गंगावाडी ९६०००) राज्याची राजधानी "कोलार" अथवा कुवलालपुर या ठिकाणी होती.
केवळ तालकडच्या उल्लेखामुळे तो पर्याय नाकारण्याचे कारण कळले नाही.
हे राज्य कोंगणीवर्मा (दडिगा) आणि माधव यांनी स्थापन केलेले असल्याने त्याला कोंगणपूर असे म्हटले जाणे स्वाभाविक वाटते.(हा मंड्या गॅझेटियरचा दुवा पहा.
या वंशाचे राजे स्वतःला 'कोंगणी' म्हणवत. (जसे - Konguni Rajadhiraja Parameswara).
(Medieval Indian culture and political geography- By K. Satyamurthy गुगल बुक्स मधील नकाशेही उपयुक्त आहेत.)

अशा अनेक पुराव्यांमुळे ह्युआन त्सांग एकतर कोलारला गेला असावा अथवा नंदगिरीला गेला असावा असे वाटते. दोन्ही गंगा राज्यातील महत्त्वाची ठिकाणे आहेत.

गंगा राज्य

विसूनाना म्हणतात तसा गंगा राज्यातील तालकड, कोलार व नंदीगिरी या तिन्ही गावांचा मी विचार केला होता. ही तिन्ही गावे मला कोकणपूर या स्थानासाठी खालील कारणामुळे योग्य वाटली नाहीत.
1. नंदगिरी हे गाव करीमनगर जिल्ह्यात येते. पुलकेशीच्या साम्राज्याचा नकाशा बघितला तर हैदराबादच्या उत्तरेला असलेला भाग नक्कीच त्या साम्राज्यात असला पाहिजे. त्यामुळे नंदगिरी पुलकेशीच्या साम्राज्याच्या बाहेर असेल असे मला वाटले नाही.
2. कोलार या गावाचे अक्षांश 13.13 अंश आहेत. कांचीपुरमचे अक्षांश 12 .82 अंश आहेत. म्हणजेच कोलार कांचीपुरमच्या पश्चिमेला येते. आपल्याला उत्तर किंवा वायव्य या दिशेला असलेले स्थान शोधण्याची आवश्यकता आहे.
3. तालकड तर स्पष्टपणे नैऋत्येला आहे.
4. ह्युएन त्सांगच्या प्रवासाच्या आधी काही वर्षे पुलकेशीने पल्लव राजा महिन्द्रवर्मन याच्यावर आक्रमण केले होते व त्याची सेना कांचीपुरम पासून 40/50 मैलापर्यंत पोचली होती. या युद्धाबद्दल ऐहोलेचा शिलालेख म्हणतो की परतणारा राजा पुलकेशी वाटपी गावात विजयी होऊन आला होता. मी याचा अर्थ असा घेतला आहे की आक्रमण करताना सुद्धा पुलकेशीची सेना वाटपी (बदामी) वरूनच कांचीपुरमच्या दिशेने गेली असणार आहे. माझ्या लेखाबरोबर दिलेला गुगल मॅप बघितला तर पिरवीपूर हे वाटपी व कांचीपुरम यांच्या मध्ये येते. म्हणजेच पुलकेशीची सेना कांचीपुरम-पिरवीपूर मार्गेच परत आली असावी. या सेनेने वाटेत लागणारी गावे बेचिराख केलेली असणार व या गावांच्याबद्दल ह्युएन त्सांग त्याच्या वर्णनात उल्लेख करतो आहे.
या कारणासाठी मी कोलार न निवडता पिरवीपूर निवडले आहे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अनागुंडी की अनागोंदी ?

तुंगभद्रा नदीच्या उत्तर काठावर असलेले अनागुन्डी गाव.

उच्चार अनागुंडी आहे होय. मी आपले अनागोंदी समजत होतो. किंवा मराठीत अनागोंदी असा उच्चार असावा. मराठीत अनागुंडी कारभार का म्हणत नाहीत असाही प्रश्न पडला.

लेख छान आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अनागोंदी

अनागोंदी या शब्दाची ही व्युत्पत्ती विलक्षण आहे व रोचकही आहे. मला वाटते की विजयनगरचे राजे सुरवातीस येथूनच राज्यकारभार बघत असत. तपासून नक्की सांगतो किंवा प्रियालीला पास.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

 
^ वर