ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र - माहिती थोडी, प्रश्न जास्त! -भाग 1
ह्युएन त्सांग ( शुएनझांग XuenZang ) या प्रसिद्ध चिनी भिख्खूने इ.स. 629 ते इ.स. 645 या कालामध्ये चीन पासून सुरूवात करून दक्षिण भारतापर्यंत व तेथून परतीचा केलेला खुष्कीच्या मार्गाने प्रवास व त्या प्रवासाचे त्याने लिहून ठेवलेले प्रवासवर्णन हे सर्वश्रुत आहे. आपला परतीचा प्रवास त्याने तमिळनाडू मधील कांचीपुरम पासून सुरू केला होता. कांचीपुरम ते गुजरातमधील भडोच या त्याच्या प्रवासाच्या टप्प्यात त्याचा प्रवास मार्ग महाराष्ट्रातून गेलेला असल्याने मला त्याच्या या प्रवासाबद्दल बरेच कुतुहल होते. त्याच्या या प्रवास वर्णनावरून सातव्या शतकातील महाराष्ट्र कसा होता याची काही कल्पना मिळेल असे मला वाटत होते. ह्युएन त्सांगने लिहून ठेवलेले मूळ प्रवास वर्णन अर्थातच चिनी लिपीत असल्याने, इंग्रजी भाषांतरावरच मला समाधान मानावे लागणार आहे हे उघड होते. सुदैवाने बर्याच संशोधकांनी प्रसिद्ध केलेली अशी भाषांतरे उपलब्ध आहेत. 1884 मध्ये प्रसिद्ध झालेले सॅम्युएल बील (Samuel Beal) याचे व 1904 मध्ये प्रसिद्ध झालेले थॉमस वॉटर्स (Thomas Watters) या लेखकाचे, अशा दोन भाषांतरांचा मी मुख्य संदर्भ घेतला आहे. या शिवाय, व्हिन्सेंट ए. स्मिथ(Vincent A. Smith) या संशोधकाच्या 'ह्युएनत्सांगचा प्रवास-मार्ग' (The Itinerary of Yuan Chwang) या लेखाचा, तसेच ह्युएन त्सांग या भिख्खूचा एक शिष्य हुई लि (Hwui Li) याने आपल्या गुरूच्या भारत प्रवासाबद्दल लिहिलेले व सॅम्युएल बील यांनीच भाषांतर केलेले, The life of Hiuen-Tsiang, by the shaman Hwui Li. या पुस्तकातील काही भाग व ई. बर्गेस यांच्या एका लेखाचा मी संदर्भ घेतला आहे.
ह्युएन त्सांगने हा महाराष्ट्रातील प्रवास कोठून व कसा केला हे आपण थोडक्यात पाहूया.
1. ह्युएन त्सांग त्या वेळी द्रविड देशातील कांचीपुरम या स्थानी होता. हे स्थान म्हणजे तमिळनाडूमधील कांचीपुरम आहे याबद्दल दुमत असल्याचे काहीच कारण नाही.
2. कांचीपुरम मधून ह्युएन त्सांग उत्तर किंवा वायव्य दिशेने निघाला व साधारण 330 मैल अंतर असलेल्या कोकणपूर किंवा कोंगणपूर या राज्यामध्ये त्याने पुढचा मुक्काम केला. कोकणपूर राज्याचे रहिवासी कृष्णवर्णीय आहेत व त्यांची वागण्याची पद्धत (Manners) रानटी व असभ्य (Fierce and Uncultivated) आहेत असे तो लिहितो.
3. कोकणपूर मधून परत वायव्य दिशेने पदक्रमण करून ह्युएन त्सांग सुमारे 400 मैलावरच्या महाराष्ट्र या देशाच्या राजधानीत पोचला. महाराष्ट्राची राजधानी राज्याच्या पश्चिमेला एका मोठ्या नदीकाठी होती.
4. महाराष्ट्र या देशावर त्यावेळी पुलकेशी हा राजा राज्य करत होता. हा राजा पराक्रमी असून त्याने शिलादित्य राजाला नर्मदेपलीकडे येऊ दिले नव्हते.
5. महाराष्ट्राच्या राजधानीहून ह्युएन त्सांग त्या राज्याच्या पूर्व सीमेवर असलेल्या एका मोठ्या बुद्ध-विहारापाशी पोचला. हा बुद्ध विहार एका मोठ्या पर्वताच्या एका अंधार्या दरीत होता. या ठिकाणी अनेक मजल्यांच्या गुफा होत्या व त्यावर बुद्ध जीवनातील प्रसंग चित्रित केलेले होते. या विहाराचे वर्णन बारकाईने ह्युएन त्सांगने केलेले आहे. त्यावरून ही जागा म्हणजे प्रसिद्ध अजिंठा गुफा आहेत याबद्दल एकमत आहे.
6. अजिंठ्या पासून ह्युएन त्सांग पश्चिम दिशेकडे निघाला व नर्मदा नदी ओलांडून तो सुमारे 200 मैल अंतरावरच्या भडोच या स्थानावर पोचला. भडोच या स्थानाबद्दलही एकमत आहे. (भडोच शहर अजिंठ्यापासून 200 मैल अंतरावरच साधारण आहे.)
ह्येन त्सांग व त्याचा शिष्य शमन हुई लि या दोघांनी केलेली वर्णने वाचल्यावर माझ्या मनात बराच गोंधळ निर्माण झाला. माझ्या मनात आलेले प्रमुख प्रश्न असे आहेत. कोकणपूर हे गाव कोणते असावे? कांचीपुरम पासून 330 मैलावर असलेल्या या राज्यातील रहिवासी, कृष्णवर्णीय व रानवट वागणूकीचे आहेत म्हणजे हे गाव कोठे असावे? महाराष्ट्राची राजधानी कोठे असावी? त्या काळात महाराष्ट्राचा राजा असलेल्या पुलकेशीने सम्राट हर्षवर्धनाचा पराभव केला होता व त्यांच्यात तह होऊन नर्मदा ही दोन्ही राज्यांची सीमा ठरली होती असा इतिहास मी वाचलेला असल्याने ह्युएन त्सांग हर्षवर्धन राजाला शिलादित्य असे का संबोधतो?
या संभ्रमात टाकणार्या मुद्यांवर काही प्रकाश टाकता येतो का? हे आपण पुढे बघूया!
6 मे 2011
Comments
हर्ष शिलादित्य
माझ्या मते हर्षवर्धनाचे शिलादित्य हे नाव मी आधीही ऐकले आहे. आता ते ह्युएन त्सांगने ठेवले किंवा कसे ते मला माहित नाही पण संदर्भासाठी काही गूगल बुक्सचे दुवे देते.
इतरांकडून अधिक माहितीच्या प्रतीक्षेत पण शिलादित्य नावाचा हरयाणात एक जुना जाट राजा होता असे वाटते. तो हर्षाच्याच वंशातील होता किंवा हर्षाचा आणि त्याचा नेमका संबंध मिळू शकला नाही. मला वाटते हर्ष आणि शिलादित्य हे विर्क या जाट गोत्रातील राजे होते.
महाराष्ट्राची राजधानी पैठण
असणार असा अंदाज आहे. अंदाज म्हणण्यापेक्षा दाट शक्यता वाटते.
त्या काळात भरभराटीला असणारी एकच नगरी "प्रतिष्ठान नगरी "वाटते. कारण पुलकेशीच्या काही आधीच सातवाहन राजघराणे होउन गेले. आख्ख्या दक्षिण भारतावर प्रभाव असणारे आणि स्वतःला "त्रिसमुद्रेश्वर" म्हणवणारे हे घराणे स्थायिक झाले ते इथेच, पैठण/प्रतिष्ठान ला. भलेही त्यांची सत्ता चारेक शतकांच्या दीर्घ काळानंतर् लोप पावली असेल, पण स्थान महात्म्य हे राहतेच.
पूर्वीच्या राजधान्या मग महत्वाची सांस्कृतिक केंद्रे होतात. आणि त्याच्या आसपासच नवीन सत्ताकेंद्रे उदयास येतात.
पैठणला अगदि यादव कालापर्यंत प्रचंड महत्व होतं. यादवांची राजधानी देवगिरी ही इथुन हाकेच्या अंतरावर, पन्नासेक किलोमीटरही नाही. पैठण हे खुश्किच्या व्यापारी मार्गावरचं महत्वाचं ठाणं होतं, आजही खुश्कीच्या व्यापारी मार्गा दरम्यान आजचे "पाथरवट" आणि त्याकाळातले अतिकुशल तंत्रज्ञ,ज्यांनी वेरुळ वगैरे लेणी खोदली, त्यांच्या वस्त्या दिसतात.
ह्या नगराचा उल्लेख व्यापारी मार्गांसंदर्भात अगदि प्राचीन रोम,,मध्यपूर्व इथेही आढळला तर आश्चर्य वाटु नये.
ह्याशिवाय् इतर ठिकाणे महत्वाची नसावीत. आजचे पुणे, तत्कालीन पुनवडी निव्वळ एक वाडी/ पन्नासेक उंबर्यांची वस्ती असावी.
मुंबई जवळच्या "कल्याण"ला चालुक्य उदयास आले, तेही पुष्कळच उशीरा. त्यामुळे तोही चान्स नाही.
शिवाय पैठण हे दक्षिणेकडुन येताना नक्कीच अजिंठ्याच्या मर्गावर लागत्, हे नक्क्की.
माझं मत प्रतिष्ठान नगरीलाच.
(इतर त्याकाळात वस्ती असलेली प्रमुख शहरं म्हणजे कोल्हापूर्,बेळगाव,गोवा,पंढरपूर,नाशिक-त्र्यंबक,नंदिग्राम/नांदेड्(ह्यावर हल्ला केल्याचे मौर्य वाञ्मयात उल्लेख आहेत! म्हणजे हे मौर्यकालीन असावं.) रामटेक आणि आपल्याच मागच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे बदामी जे महाराष्ट्रापासुन जवळ आहे.)
लेख उत्तमच.
हे वे सां न ल
--मनोबा
+१
हे मी वरच्या प्रतिसादात टाकायचे राहून गेले पण पुलकेशीच्या काळात महाराष्ट्राची राजधानी पैठणच असावी.
शिवाय ह्युअन् त्संग ह्याच्या
लिखाणात मराठी समाजाचं जे वर्णन आहे ते असं काहिसं:-
"ही माणसं मध्यम उंचीची ,काटक आणि सावळी असतात. गिल्हे-दिल्हे अशी भाषा बोलतात."
भाषेची ही ढब आजही मराठवाड्यातल्या ग्रामीण भागात दिसते. नागपुरी मराठी सारखा त्यावर मध्य भारतीय उचारांचा प्रभाव नाही.कोल्हापूर सांगली सारखं हेल काढुन बोलणं नाही. त्यामुळं ह्यआन त्संग आमच्या मराठवाड्यात येउन गेला हे नक्की.
--मनोबा
काही दुरुस्त्या
>>"ही माणसं मध्यम उंचीची ,काटक आणि सावळी असतात. गिल्हे-दिल्हे अशी भाषा बोलतात."
हे मराठी लोकांचे वर्णन ह्यूएन त्सँगने केलेले नसून जैन श्रमण उद्योतनसूरींच्या कुवलयमाला या ग्रंथातील आहे.मूळ प्राकृत ओळ विसरलो, पण पुरंदर्यांच्या राजा शिव छत्रपतीमधील पहिल्या प्रकरणात दिलेली आहे.
>>भाषेची ही ढब आजही मराठवाड्यातल्या ग्रामीण भागात दिसते. नागपुरी मराठी सारखा त्यावर मध्य भारतीय उचारांचा प्रभाव नाही.कोल्हापूर सांगली सारखं हेल काढुन बोलणं नाही. त्यामुळं ह्यआन त्संग आमच्या मराठवाड्यात येउन गेला हे नक्की.
ह्यूएन त्सँग पैठणला आला असावा असे मलादेखील वाटते. परंतु भाषिक कारणांवरून तो निष्कर्ष निघत नाही.
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||
+१
महाराष्ट्राच्या राजधानीहून ह्युएन त्सांग त्या राज्याच्या पूर्व सीमेवर असलेल्या एका मोठ्या बुद्ध-विहारापाशी पोचला.
पैठणच असावी
लेख आवडला
लेख अतिशय आवडला. ह्युएन त्सांग वरची माहिती वाचायची होतीच.
पैठण त्यावेळच्या महाराष्ट्राची राजधानी असावी हा एक माझाही अंदाज.
कोकणपूर मात्र रंजक अगदी रहस्यकथांची उत्सुकता चाळवणारे.
प्रमोद
शक्यता
कोकणपुरसाठी गूगलण्याआधी मी हैद्राबादला मत दिले ;)
कोंगाडी या शब्दाने शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु यश मिळाले नाही. हैद्राबादजवळ कोंडापुर सापडले आणि ते कांचिपुरमच्या उत्तरेला ४०० मैलांवर आहे. (भडोच ते अजिंठा हे अंतर सध्या २६० मैल आहे परंतु ह्युएन त्संगने ते २०० मैल असे नोंदविले आहे. त्यामुळे ३३० ऐवजी ४०० हा फरकही खपवून घेता येईल असे मला वाटते.) उलट, कोंडापुर ते पैठण हे अंतर ३३० मैल आहे!
--
प्रस्तुत धागा चर्चाप्रस्ताव नसून लेख असल्यामुळे अशीही शक्यता आहे की धागाप्रवर्तकांकडे उत्तर तयारच आहे, परंतु तो प्रश्न एक कोडे म्हणूनही सोडविता येऊ शकेल काय?
तयार उत्तरे नाहीत
माझ्याकडे तयार उत्तरे नाहीत त्यामुळे इतर प्रतिसादांतून जे अंदाज लोक मांडत आहेत त्याचा विचार आपण जरूर पुढच्या भागात करूया.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
ह्युएन् त्सांग् आणि अजिंठा
ह्युएन् त्सांग् च्या प्रवासवर्णनाच्या इंग्रजी भाषांतरामधे त्याने भेट दिलेल्या मोठ्या बुद्धविहाराची जागा अजिंठा असावी असा तर्क केला होता व जवळजवळ शंभर-सव्वाशे वर्षे तो मान्यताप्राप्त होता. अलीकडे मात्र मुंबईतल्या काही इतिहासतज्ञांनी ते स्थळ कान्हेरी हे असावे अशी साधार मांडणी केली आहे व त्याला मान्यताही मिळत आहे. ह्यासंबंधीचे दुवे विकीवर कदाचित सापडणार नाहीत. कारण कान्हेरीवर पुरेसे लिखाण इंग्रजीमधून झालेले नाही. एकेकाळी कान्हेरी हे नालंदा तक्षशिला सारखेच बौद्धधर्माचे खूप मोठे अभ्यासकेंद्र होते. कान्हेरीचा र्हास का व कसा झाला हे मात्र एक गूढ आहे.काहींच्यामते या प्रांतात शैवमत प्रबळ झाल्याने बौद्ध धर्माचा राजाश्रय गेला. आणखी काहींच्यामते सोळाव्या शतकाच्या प्रारंभी सासष्टी प्रांतात पोर्तुगीजांनी धर्मांतराचा सपाटा लावला. कान्हेरीच्या खर्चासाठी परंपरागत वर्ग असलेली गावे ताब्यात घेऊन त्यांची उत्पन्ने आपल्या धर्ममठाकडे वर्ग केली.तोपर्यंत म्हणजे चौदाव्या/पंधराव्या शतकापर्यंत इथे बौद्ध संस्कृती बहरात नसली तरी अस्तित्वात होती.
कान्हेरी
कान्हेरीला अजिंठ्यासारखी रंगवलेली चित्रे (फ्रेस्कोज) असल्याचे मी ऐकलेले नाही. कान्हेरीला लेणी आहेत. ह्युएन त्सांगच्या वर्णनात रंगवलेल्या चित्रांचा स्पष्ट उल्लेख आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
भित्तीचित्रे
कान्हेरीतल्या कमीतकमी एका गुहेत तरी भित्तीचित्रांचे अगदी अस्पष्ट अवशेष आहेत. पण याविषयी अधिक काही केवळ स्मरणातून लिहिण्यापेक्षा त्या तज्ज्ञांशी बोलून,त्यांचे नक्की संदर्भ मिळवून मग लिहिलेले बरे असे वाटल्याने सद्ध्या पूर्ण विराम. फोनाफोनी करून संपर्क साधायला कदाचित् वेळ लागू शकतो.
उल्लेख बादामी शहराचा असू शकेल काय?
उल्लेख बादामी शहराचा असू शकेल काय? दुसर्या पुलकेशिनाची राजधानी बादामी (वातापी) येथे होती.
हे कोंगणपूर राज्य असावे काय?
कोंगणपूर म्हणजे "Konganivarman Madhava" कोंगणीवर्मन माधव याने स्थापन केलेले गंगा राज्य तर नव्हे?
चावुंडराय (श्रवणबेळगोळचा '...गंगराये सुत्ताले करवियले' मराठी लेख) हा याच गंगा राज्याचा सेनाधिपती होता.
पण ते राज्य (राजधानी कोलार) कांचीपासून फारतर २०० किमीवर होते असे दिसते.
अर्थात् हे ३०० आणि ४०० मैल भाषांतरातील चुकाही असू शकतील. कारण चालुक्य पुलकेशी २ याची राजधानी पैठण नसून बदामी होती. आणि बदामी निश्चितच कोलारपासून ४०० मैल अंतरावर नाही. पण कांची ते कोलार आणि कोलार ते बदामी यांच्यातील अंतराचे गुणोत्तर ३:४ आहे असे वाटते.
तेव्हा ते अंतराचे एकक मैल नसावे.
छान!
नवीनच माहिती!
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||
वाचनीय.
लेख आणी चर्चा दोन्ही वाचनीय. धन्यवाद.
-Nile