कर्नाळा - इतिहास

कर्नाळा लेख लिहिल्या नंतर वाचकांनी कर्नाळ्याच्या इतिहास बद्दल उत्सुकता दाखवली होती(मनोगत), तसे कर्नाळ्याच्या इतिहासा शिवाय तो लेखच अपूर्ण होता. मुळातच कर्नाळा किल्ल्या बद्दल बऱ्याच लोकांना ठोस माहिती नाही व इतर बऱ्याच ऐतिहासिक वाड:मयात देखील कर्नाळा बद्दल पूर्ण उल्लेख नाही. लोकांना कर्नाळाची तोंडओळख आहे ती पक्षी अभयारण्य म्हणून पण ह्या किल्ल्याने देखील ईतिहासात बऱ्याच लढाया पाहिलेल्या आहेत. कर्नाळाचा ईतिहास मी तिथे नमूद केलेल्या फलका वरील मजकुरावरून माझ्या भाषेत लिहितं आहे.

प्राचीन काळी पनवेल व बोर घाटातून (त्यावेळच्या) मुंबई व चौल बंदराकडे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाळा किल्ल्याचा उपयोग होत असे. चौल हे ठिकाण अलिबागच्या पुढे रेवदंडा जवळ मुरूडच्या वाटेवर आहे. तिथून येणारा माल कर्नाळा वरून त्या काळच्या पुणे, ठाणे येथील बाजारपेठेत पोहचवला जायचा. कर्नाळावर देवगिरी यादवांचे १२४८ ते १३१८ पर्यंत राज्य होते, किल्ल्याचे बांधकाम कोणी केले याचा पुरावा दिला नसला तरी देवगिरी यादवांनीच कर्नाळा बांधला असावा. बहुतेक करून महाराष्ट्रातील प्राचीन किल्ल्यां पैकी एक असा बहुमान कर्नाळ्याला आपण देऊ शकतो (चुकीची दुरुस्ती करण्यात यावी.). पुढे सन १३१८ ते १३४७ पर्यंत दौलताबादाच्या मुस्लिम शासकाकडे कर्नाळ्याचा ताबा होता. तेव्हा कर्नाळा उत्तर कोंकण म्हणजेच ठाणे व रायगड ह्यांचे मुख्यालय होते.दौलताबाद कडून कर्नाळाचा ताबा गुजरातच्या फौजे कडे गेला. हा गुजराती शासक कोण होता ह्याचा उल्लेख कुठेच नाही आहे, तसा मला पण ह्या बद्दल कोडे आहे कारण गुजराती शासकाने कर्नाळा पर्यंत मारलेली मजल ह्या बद्दल कुठेच अजून पर्यंत वाचनात आलेले नाही.

१५४० मध्ये अहमदनगरच्या निजामाने हा किल्ला जिंकला, पण गुजराती शासकाने पोर्तुगीजांच्या साहाय्याने कर्नाळा परत मिळवला. परत एकदा निजाम चालून आला असता गुजराती शासकाने कर्नाळा पोर्तुगीजांना बहाल केला, वसईच्या कॅप्टनने निजामाच्या सैन्याचा वेढा मोडून काढून स्वतःचा अंमल स्थापन केला आणि किल्ल्याच्या संरक्षणार्थ ३०० युरोपियन सैनिक तैनात केले. पुढे पोर्तुगीज व निजाम यांच्या मध्ये झालेल्या मैत्रीच्या तहात वार्षिक १७५० पौंड ह्या ठराविक खंडणीच्या रकमेवर पोर्तुगीजांनी हा किल्ला निजामशहाकाडे सोपविला. एवढा उहापोह पाहिल्या नंतर त्या काळात कर्नाळाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते.

निजामशहा कडून मग हा किल्ला मुघलांकडे होता, ह्या बद्दल सविस्तर माहिती मिळाली नाही. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी कर्नाळा मुघलांकडून जिंकून स्वराज्यात समाविष्ट केला. मिर्झाराजा जयसिंग बरोबर झालेल्या पुरंदरा च्या तहात कर्नाळ्याचा देखील बळी गेला होता पण लवकरच इतर किल्ल्यां बरोबर कर्नाळ्याचे स्वराज्यात पुनरागमन झाले. महाराजांच्या मृत्यू नंतर औरंगजेबाने कर्नाळा परत जिंकला आणि कर्नाळा पारतंत्र्याच्या साखळदंडा मध्ये जेरबंद झाला. सन १७४० मध्ये पेशव्यांनी कर्नाळ्याला परत स्वराज्यात आणले. १८०३ मध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाच्या वतीने गडाचा ताबा घेतला व १८१८ मध्ये स्वतःचा अंमल जाहीर केला. सन १८१८ पर्यंत क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके ह्यांचे आजोबा कर्नाळ्याचे किल्लेदार होते. ह्याच कर्नाळाच्या बेलाग सुळक्याने तरूण वासुदेव ह्यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली आणि ह्या आद्य क्रांतीकाराला एडनच्या तुरंगाची भिंत पण थोपवू नाही शकली.

हा इतिहास तुम्हाला रंजक वाटला असेल तर कर्नाळाची छायाचित्रे सुद्धा तितकीच छान आहेत (माझ्या लिखाणापेक्षा नक्कीच). काही छायाचित्रे गेल्या जानेवारीत काढलेली आहेत तर गर्द हिरव्या रंगातली छायाचित्रे गेल्या शनिवारी काढलेली आहेत. त्यासाठी तुम्ही हा दुवा पाहू शकता.

लेखनविषय: दुवे:

Comments

वावा..

हा आणि 'जंजिरा' वरचा दोन्ही लेख आवडले.
स्वाती

सही !!

लेख आवडला !!

आणि फोटोज् पण. कुठला कॅमेरा?

आवडले

गडकिल्ल्यांविषयी केलेले लेखन नेहमीच आवडते. छायाचित्रेही विशेष आवडली.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

लेख आवडला

लेख आवडला.
संदर्भ असल्यास द्यावेत अशी सुचवण आहे.
आपला
गुंडोपंत
~ उपक्रम वयाने वाढावे ह्याचे मी समर्थन करतो!
म्हणजे काय?
म्हणजे 'वय वर्षे १८ अधिक' अशा समूहा चे वावडे उपक्रमाला का असावे बरं? ~

कॅमेरा

निकॉन् एफ ७५ एसेलार आणि एचपी एम३१० डिजीटल्, अजून संदर्भ जूळवत आहे. लवकर प्रकाशित करेन.

छान लेख

आता पर्यंत दोन वेळा कर्नाळा किल्ल्यावर जाऊन आलो. पण आता त्याला एवढा इतिहास आहे कळल्यावर पुन्हा जावसं वाटत आहे.
फार उपयुक्त माहीती.

(शिवप्रेमी) रम्या

छान/निजाम

कर्नाळ्याला मीही भेट दिली आहे. पण हा इतिहास माहीत नव्हता. लेख छानच आहे.

१५४० मध्ये अहमदनगरच्या निजामाने हा किल्ला जिंकला ...

अहमदनगरला निजाम होता की आदिलशाही?

अवांतर - G = ङ् , vaaGmaya = वाङ्मय (अधिक माहिती )

निजामशाही नसावी पण निजाम असावा

अहमदनगर - निजाम

बरोब्बर!!!!

अवांतरः

अहमदनगरला निजामाचे राज्य असले तरी सन १५४०मध्ये निजामशाही नसावी. परंतु निजाम घराण्याकडे येथील सत्ता असावी आणि प्रमुख सत्ताधीश बहमनी असावेत. याकाळात बहमनी राज्यच होते असे वाटते. ते पुढे फुटून त्यातून ५ राज्ये निर्माण झाली त्यापैकी एक निजामशाही होते.

कुतुबशहा मात्र गोवळकोंडा+हैद्राबाद राज्य अशा प्रांताचा शासक होता वाटते. प्रमुख हैद्राबादेत निजामच होता.

चू. भू. दे. घे.

कुठला कॅमेरा?

कुठला कॅमेरा?

हे अस विचारण होत जस काय एका चित्रकाराने कुठला ब्रश वापरला.

कुठला कॅमेरा? कॅमेरा कुठला हि असो या पेक्षा फोटो काढणार्‍याला जास्त किंमत असावी अस वाटत.

सुतावरून स्वर्ग?

कुठला कॅमेरा? कॅमेरा कुठला हि असो या पेक्षा फोटो काढणार्‍याला जास्त किंमत असावी अस वाटत.
कुठला कॅमेरा? हा प्रश्न विचारल्याने फोटोग्राफरच्या कलेची किंमत कमी होते असं थोडचं आहे.

हे अस विचारण होत जस काय एका चित्रकाराने कुठला ब्रश वापरला

अगदी योग्य. पण चित्रकाराकडे कितीही प्रतिभा असली तरी त्याला ब्रशचा आधार घ्यावाच लागतो. त्याच्या कडे कला आहे म्हणून तो काय रस्त्यावरच्या नेमके दोनच केस असलेला दोन रुपयाचा ब्रश वापरून चित्र काढायला बसणार का?
अहो सुतार सुद्धा काम सुतार काम करण्याआधी आपल्या रंध्याच्या पात्याला धार आहे कि नाही, करवतीचे दाते व्यवस्थित तासलेले आहेत की नाही पाहतो.

डिजिटल कॅमेर्‍याच्या जगात एकाच वस्तूचे दोन वेगवेगळ्या कॅमेर्‍यानी फोटो काढल्यास वेगवेगळे परिणाम मिळतात.

कुठला कॅमेरा? या प्रश्न निव्वळ तांत्रिक स्वरुपाचा आहे. उगाच प्रश्नाचा संबध चित्रकाराच्या कलेशी कशाला जोडावा?

धन्यवाद रम्या

माझ्या अनुपस्थितीत माझी बाजू मांडल्याबद्दल. माझेही असेच उत्तर आले असते.

एनिवे, मी एवढ्यासाठी हे विचारलं होतं की कॅमे-याची रेंज चांगली होती. हाच फोटो अन्य कॅमे-यातून वेगळाच दिसला असता. आणि मलाही डिजिटल घ्यायचाय, तेव्हा माहिती असलेली बरी.

 
^ वर