दिवास्वप्नांतून प्रेरणा!
एखाद्या गहन समस्येवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून त्या समस्येबद्दलची इत्थंभूत माहिती काढणे, त्यातील बारकावे तपासणे, मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे, समस्या निवारणासाठी वेगवेगळे उपाय सुचविणे व त्यापैकी एखाद्या उपायाला अंतिम स्वरूप देणे.... खरे पाहता हे एक कौशल्यच असते. काहींना ते जमते; व काहींना किती कोलांट्या उड्या मारल्या तरी शेवटपर्यंत यश हाती गवसत नाही. अशा प्रकारे निरंतर प्रयत्न करत एकाग्रचित्ताने लक्ष केंद्रित करून जगाला आश्चर्यचकित केलेले अनेक वैज्ञानिक (व संशोधक) आपल्याला माहित असतील. व त्यांच्या यशाचे गुपित अशा प्रकारच्या अथक प्रयत्नातच असते हेही आपल्याला जाणवेल. परंतु अलिकडील एका निरीक्षणानुसार एखाद्या समस्येला उत्तर शोधण्यासाठी केवळ एकाग्रता तितकेसे पुरेशी ठरत नाही. मेंदूत उठलेल्या वादळातून समस्येला उपाय सापडेलच याची खात्री देता येत नाही. काही वेळा मेंदू कुठेतरी भरकटत असतानासुद्धा काही क्षणात समस्येला उत्तरं सापडलेली उदाहरणं, केवळ वैज्ञानिक क्षेत्रातच नव्हे तर, साहित्याच्या क्षेत्रातही सापडलेली आहेत. सर्जनशील मेंदू कुठे, केव्हा व कसे मार्ग शोधू शकतो, हे अजूनही आपल्याला आश्चर्यचकित करणारी गोष्ट ठरत आहे.
काही वेळा लक्ष नसतानासुद्धा मोठमोठ्या कल्पना डोळ्यासमोर तरंगू लागतात. ही कल्पना कशी सुचली, ती त्या व्यक्तीलाच का सुचली, तेंव्हाच का सुचली इत्यादी प्रश्नांना उत्तर नाही. उदाहरणार्थ अर्किमिडिस, अल्बर्ट आइन्स्टाइन, थोर भौतिकी लिओ झिलार्ड, रसायन शास्त्रज्ञ ऑगस्ट केकुले, जीवरसायन शास्त्रज्ञ केरी मुल्लिक हे वैज्ञानिक आंघोळ करत असताना, कुठेतरी फिरत असताना वा गाडी चालवत असताना त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला व त्यांनी जगाचा चेहरा मोहरा बदलू शकणारे शोध लावून जगाला आश्चर्यचकित केले. खरे पाहता त्यांच्या डोक्यात आलेल्या विचारांना भन्नाट कल्पना असेच म्हणता येईल. दिवास्वप्नात रमणारे तास न तास वा दिवसे न दिवस आपल्या कल्पनाजगतात वावरत असतात. आपल्या सारख्या सामान्यांच्या दृष्टीने अशा प्रकारे वेळेचा अपव्यय करणे योग्यही नसेल. परंतु दिवास्वप्न पाहणारेसुद्धा या जगाला अमूल्य देणगी देऊन थक्क केलेले आहेत, हेही तितकेच खरे! 19व्या शतकातील ब्राँटे भगिनींनी लिहिलेली पुस्तकं अजूनही वाचाविशी वाटतात. खरे पाहता या भगिनी बालपणीच्या कल्पनाविलासातून बाहेर न पडलेल्या अवस्थेतूनच लिहित होत्या. तुर्कस्तानातील लेखक, ओर्हान पामुक या नोबल पारितोषक विजेत्याच्या कादंबर्या अशाच प्रकारच्या भरकटलेल्या मानसिक अवस्थेतील आविष्कार आहेत.
राजमुकुटातील भेसळ
क्रि. पू. 200 मध्ये सिराक्युसच्या राजाने त्याच्या दरबारातील अर्किमिडिस या गणितज्ञासमोर एक समस्या मांडली. राजाला भेटवस्तू म्हणून मांडलीक राजाने सोन्याचे किरीट दिले होते. परंतु किरीट बनविणार्या कारागिराने काही मखलाशी करून मला फसवत तर नाही ना असा संशय राजाला आला. कदाचित काही प्रमाणात शुद्ध सोन्याऐवजी चांदी मिसळली असेल. कुठल्याही प्रकारे किरीटाची मोडतोड न करता वा त्याचा कुठलाही भाग न वितळवता राजाच्या संशयाचे निवारण कसे करावे हा प्रश्न अर्किमिडिससमोर होता.
अर्किमिडिसने भरपूर डोके खाजविले. परंतु या प्रश्नाला उत्तर काही सापडेना. विचार करून करून कंटाळा आल्यामुळे आंघोळ तरी करावे म्हणून नोकराला बाथटबमध्ये पाणी भरण्यास तो सांगतो. कपडे बाहेर काढून जसजसा तो टबमध्ये उतरू लागला तसतसे टबमधील पाण्याची पातळी वाढू लागली व बाहेर पाणी वाहू लागले. वाहत्या पाण्याकडे बघत असताना त्याच्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला. पाण्यात टाकलेल्या वजनावरून वस्तूचे घनफळ मोजता येते हे त्याच्या लक्षात आले. त्याच धुंदीत तसाच तो नागड्यानेच युरेका युरेका असे ओरडत बाहेर रस्त्यावर पळू लागला.
पाण्याच्या भाडीतून बाहेर पडणार्या पाण्याच्या घनफळाचे मोजमाप घेतल्यास एकाच वजनाच्या दोन वस्तूंच्या मोजमापामध्ये नक्कीच फरक जाणवेल. शुद्ध सोन्याच्या व शुद्ध चांदीच्या एकाच वजनाचे किरीट घेवून त्यांचे घनफळ काढल्यास तफावत लक्षात येईल. याचे प्रत्यक्ष प्रयोग राजासमोर अर्किमिडिसने करून दाखविल्यामुळे राजाचा संशय अनाठायी नव्हता, हे लक्षात आले. राजमुकुटात काही प्रमाणात चांदीची भेसळ केली होती हे सिद्ध झाले.
वेळ व अवकाश यातील मेळ
अल्बर्ट आइन्स्टाइनच्या कल्पनाविलासातूनच सापेक्षता सिद्धांताला मूर्त स्वरूप मिळाले, असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे. गणिताच्या जंजाळात अडकून पडलेल्या आइन्स्टाइनला गणितातून फुरसत मिळाल्या मिळाल्या सापेक्षता सिद्धांताचे मर्म सापडले. अवकाश व काळ या संकल्पनांभोवती त्याचे मन भटकू लागले. आपण बसलेल्या चालत्या रेलगाडीच्या पुढच्या व मागच्या डब्यावर एकाच क्षणी वीज कोसळल्यास काय होईल या विचाराने त्याच्या मेंदूचा ताबा घेतला. जरी गाडीत बसलेल्य़ांना वीज एकाच क्षणी दोन्ही डब्यावर कोसळली आहे असे वाटत असले तरी फलाटावर उभा असलेल्याला वीज एका क्षणी पडली असे वाटणार नाही. 1924 साली एका भाषणाच्या वेळी आइन्स्टाइन स्वत: ' त्या क्षणा'बद्दल बोलताना " 1895 ते 1905 या सात वर्षाच्या काळात मी याबद्दल विचार करत असताना एका निसटत्या क्षणी अवकाश व वेळ या संकल्पना आपल्या अनुभवाशी निगडित असून त्या सापेक्ष असतात याची मला जाण आली व हाच अनुभव या संकल्पनांना व नियमांना बदलू शकला " असे विधान करतो.
स्फोटक अंतर्दृष्टी
हंगेरी येथील भौतशास्त्रज्ञ, लिओ झिलार्ड यालासुद्धा अर्नेस्ट रुदरफोर्ड या अजून एका नावाजलेल्या शास्त्रज्ञाप्रमाणे वस्तूच्या भाराचे ऊर्जेत कधीच रूपांतरित करता येणार नाही यावर ठाम विश्वास होता. परंतु एके दिवशी लंडन येथे रस्ता ओलांडत असताना ' एखाद्या विशिष्ट अशा मूलभूत वस्तूतील रेणूंवर न्यूट्रान्सचा मारा करत गेल्यास अणूचे विभाजन होऊन अजून दोन न्यूट्रान्स त्यातून बाहेर पडतील व बाहेर पडलेले न्यूट्रान्स जवळच्या अणूंवर मारा करत त्यांचे विभाजन करतील व त्यातून पुऩ्हा न्यूट्रान्स बाहेर पडतील... अशा प्रकारे या साखळी विक्रियेतून करोडो करोडो न्यूट्रान्स काही मिलिसेकंदात बाहेर पडू लागतील. ' हा स्फोटक विचार सुचला व त्यातूनच अणुकेंद्रीय विभाजनाचा पाया रचला गेला. अणु बाँब व अणुशक्तीसाठीचे रिऍक्टर्स यांचा जन्म या अफलातून सुचलेल्या विचारातूनच झाला.
रेणूंची रचना
19व्या शतकातील रसायनशास्त्रज्ञ ऑगस्ट केकुले व्हॉन स्ट्राडोनिट्झ यांनी सेंद्रीय रसायनशास्त्रातील अणुरचनेचा पाया रचला. एखाद्या रेणूमध्ये अणूंची रचना कशी असते हा विचार केकुले दिवास्वप्नात असतानाच आला. केकुलेला पहिल्यापासूनच रेणूंच्या रचनेविषयी अत्यंत उत्सुकता होती. अणूंची संख्या समान असलेल्या दोन रेणूंच्या रचनेबद्दलचा विचार त्याच्या डोक्यात असे. उदाहरणार्थ 5 कार्बनचे व 12 हायड्रोजनचे अणू असलेले रेणू टूथपेस्टमध्ये एका स्वरूपात व blowing agent म्हणून दुसर्या स्वरूपात कसे काय असू शकतात या विचाराने तो अस्वस्थ झाला होता. याचे उत्तर त्याला घोडागाडीतून प्रवास करताना सापडले. काही वर्षानंतर या घटनेच्याबद्दल भाष्य करत असताना " त्यादिवशी गाडीत असताना माझ्या डोळ्यासमोर अणू नाचू लागल्या. लहान अणूंच्या जोड्या तयार होत होत्या. काही वेळा दोन तर काही वेळा चार चार अणू एकमेकांना चिकटलेले दिसायचे. हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडत होते. जणू त्या नाचणार्या बाहुल्याच.... "
केकुलेच्या या दिवास्वप्नामुळे रेणूंच्या रचनेतील गुपित उघड झाले. 5 कार्बन व 12 हायड्रोजनच्या अणूंच्या प्रक्रियेत कार्बनचा प्रत्येक अणू इतर चार अणूशी जोडला जात होता. व त्यातून वेगवेगळ्या संयुगांची रचना तयार होत होती. हे संयुग त्यांच्यातील विशिष्ट रचनेमुळे वेगवेगळे पदार्थ म्हणून ओळखल्या जात होत्या. काही pentane, काही methylbutane व इतर काही dimethylopropane.
डिएनएचे रेणू
नोबेल पारितोषक विजेता, केरी मुलिस याला कार चालवत असताना प्रयोगशाळेत डिएनए कसे तयार करावेत याची कल्पना सुचली. 1983मध्ये कॅलिफोर्नियाच्या हायवेवरून बर्कले ते मेंडोसिनोला, शनिवार - रविवारची सुट्टी घालवण्यासाठी जात असताना कृत्रिमरित्या जनुकांचा संच कसा करावा याचे मर्म त्याला क्षणार्धात कळले. न्यूक्लियोटाइड्स मधून डिएनएचे रेणू बाहेर कसे पडतात याचा विचार करत असताना डिएनएचे अगणित तुकडे तयार करू शकणार्या एंझाइमचा (वितंचक) वापर करून न्यूक्लियोटाइड्समधून डिएनए तयार करता येतात ही कल्पना त्याला सुचली. यापूर्वी सजीव पेशीमधूनच डिएनएना वेगळे केले जात होते. त्यामुळे डिएनए फारच कमी प्रमाणात मिळत होत्या. शिवाय ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची व कंटाळवाणी होती. मुलिस याने प्रथमच ही कल्पना वापरून Polymerise Chain Reaction (PCR) चा शोध लावला. यासाठी त्याला 1993मध्ये नोबेल पारितोषक मिळाले. "प्रयोग शाळेतील रोजच्या कामाच्या रगाड्यात मला ही कल्पना कधीच सुचली नसती. परंतु ड्रायव्हिंग करताना सुसाट वार्याच्या झुळुकात मला ही कल्पना क्षणार्धात सुचली. "
रम्य बालपण
चार्लोट, एमिली व ऍन ब्राँटे या भगिनी ब्रानवेल या त्यांच्या एकुलत्या भावाबरोबर लहानपणी इंग्लंड येथील यार्कशायरच्या दलदलित प्रदेशात राहत असताना अंग्रिया आणि गोंडाल या काल्पनिक देशांनी त्यांना पछाडले. त्यांच्या स्वप्नातील अंग्रिया हा देश अत्यंत श्रीमंतांचा व हलाखीत राहणार्या अत्यंत गरीबांचा. बहुतेक जण दारूच्या गुत्त्यात वा हॉटेलमध्ये वेळ घालवत होते. गोंडाल हा तुलनेने श्रींमंत देश होता. येथील स्त्रिया मात्र आक्रमक होत्या. या दोन काल्पनिक देशाभोवती या बंधू भगिनी अनेक कथा प्रसंग रचल्या व लहानशा चिटोऱ्यावर लिहून एकमेकांना पाठवू लागल्या. अशाप्रकारे तिन्ही बहिणी काल्पनिक राज्यातील सुख-दु:खात रमत होत्या. परंतु या भगिनी जेव्हा वयाने मोठ्या झाल्या तेव्हासुद्धा बालपणीचे दिवास्वप्न त्यांना सोडायला तयार नव्हते. त्याच आठवणींच्या आधारे चार्लोट ब्रॉंटे हिने जेन ऐर, एमिली ब्राँटे हिने वुदरिंग हाइट्स व ऍन ब्राँटेने वाइल्टफेल हॉल या त्याकाळातील अत्यंत गाजलेल्या कादंबर्या लिहून साहित्य विश्वात अजरामर झाल्या.
स्वप्नदृश्ये
2006 साली साहित्यातील नोबेल पारितोषक मिळवणारा टर्किश कादंबरीकार, ओर्हान पामुक हासुद्धा, त्याच्या स्नो या गाजलेल्या कादंबरीतील प्रमुख पात्राप्रमाणे, स्वप्न बघत राहणारा व त्या स्वप्नांचेच आपल्या कादंबर्यात हुबेहूब वर्णन करणारा लेखक आहे. 'कॉलरिज या कवीला ज्या प्रकारे कविता स्फुरत होत्या, त्याप्रमाणे मीसुद्धा नाट्यपूर्ण प्रसंग स्फुरण्याची वाट बघतो. अनेक वेळा माझी स्वप्नं पूर्णही झाल्या आहेत' कादंबरी लिहिण्याचे रहस्य अशा प्रकारच्या दृश्यांची व प्रसंगांची मनाच्या कोपर्यातील अंधाराला बाहेर काढण्याची व शांत क्षणांची वाट बघण्यातच आहे. कादंबरीतील कथानक नेहमीच अशा प्रकारच्या घटनाप्रसंगातून, दृश्यमालिकेतून वाट काढत काढत जात असते. आपल्या मनातील स्वप्नांना साकार करत जात असते. अशा प्रकारच्या वेगळ्या वळणातील वाटांना एकत्र आणून त्यांना एक अर्थ प्राप्त करून देण्यातच कादंबरी आकार घेत असते.
काही आस्तिक वा धार्मिक या प्रकारच्या दिवास्वप्नातील प्रेरणेला 'अनुभूती' वा 'साक्षात्कार' या सदरात टाकून मोकळे होतील. परंतु आस्तिकांची अनुभूती वा साक्षात्कार त्या व्यक्तीपुरतेच मर्यादित असते व ते सिद्ध करणे अशक्यातली गोष्ट ठरते. वैज्ञनिकांचा हा 'साक्षात्कार'मात्र सिद्ध करण्याजोगा असतो. एक मात्र खरे की अशा प्रकारच्या दिवास्वप्नातून उत्तर शोधणे हे येरागबाळाचे काम नाही. त्यासाठी मशागत केलेल्या शेतजमिनीप्रमाणे सुपीक मेंदू लागतो; समस्या डोक्यात भुणभुणत असावी लागते; व क्षणार्धात सुचलेल्या कल्पनेचा समस्याशी संबंध जोडण्याचा शहाणपणा असावा लागतो. काही क्षण समस्यापासून दूर भटकत असल्यारखे वाटत असले तरी मेंदूच्या कोपर्यात, कळत न कळत, कुठे ना कुठे तरी समस्येला अजून उत्तर न सापडल्याची चुटपुट सतावत असते. या गोष्टी नसल्यास ती एक वेडगळ कल्पना ठरण्याची भीती असते.
Comments
उत्तम माहिती आणि लेख
उत्तम माहिती आणि लेख. धन्यवाद.
>>काही आस्तिक वा धार्मिक या प्रकारच्या दिवास्वप्नातील प्रेरणेला 'अनुभूती' वा 'साक्षात्कार' या सदरात टाकून मोकळे होतील
बाकी, काही आस्तिक लोक ह्या प्रेरणेला "(परा-मध्यमा-पश्यंती-वैखरी) मध्ये घडणारी चिंतन-प्रक्रिया " असे म्हणतात.
>>वैज्ञनिकांचा हा 'साक्षात्कार'मात्र सिद्ध करण्याजोगा असतो.
!!! विशेष.
विज्ञानाचा इतिहास
मी कॉलेजात शिकत असताना आम्हाला हिस्टरी ऑफ साय न्स म्हणून एक विषय असे. माझ्या आठवणीप्रमाणे विज्ञानातील अनेक महत्वाचे शोध अशा दिवास्वप्नांमधूनच लागलेले आहेत. श्री. नानवटी यांनी एक अतिश्य रोचक विषय मांडला आहे. नंतर सावकाश मला माहित असलेले असे काही आणखी शोध देण्याचा प्रयत्न करीन.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
माहितीपूर्ण लेख
विविध शोधांच्या जन्मकथा रंजक वाटल्या. काही शोध कसे लागतात याची ही उदाहरणे आहेत.
या उलट एडिसनचे ३०००+ फिलामेंट टेस्टिंगचे दिव्य असावे. दिव्याचा शोध हा सततच्या अथक प्रकियेतला एक भाग होता.
मला वाटते की वर दिलेल्या आणि एडिसनच्या शोधप्रक्रियेत साम्य आहे. डोक्यात विविध कल्पना येत असतात. प्रत्येक कल्पनेचे टेस्टिंग (प्रत्यक्षाबरोबरचे) चालू असते. त्यातील एक कल्पना या प्रक्रियेत उतरते असे काहीसे ते असावे. ही कल्पना कशी आली, केव्हा आली वगैरे माहिती मनोरंजक असली तरी केवळ तेवढेच महत्वाचे नाही तर पुढील टेस्टींग प्रक्रियेत तिचे उतरणे महत्वाचे आहे.
काही आस्तिक वा धार्मिक या प्रकारच्या दिवास्वप्नातील प्रेरणेला 'अनुभूती' वा 'साक्षात्कार' या सदरात टाकून मोकळे होतील. परंतु आस्तिकांची अनुभूती वा साक्षात्कार त्या व्यक्तीपुरतेच मर्यादित असते व ते सिद्ध करणे अशक्यातली गोष्ट ठरते. वैज्ञनिकांचा हा 'साक्षात्कार'मात्र सिद्ध करण्याजोगा असतो.
या परिच्छेदातील एकंदर कल्पनेस सहमती असली तरी सिद्ध शब्द फारसा पटला नाही. साक्षात्कारी व्यक्तिचा साक्षात्कार (आस्तिक वा धार्मिकांना साक्षात्कार होतोच असे नाही.) हा सिद्ध करण्याजोगा नसतो तर वैज्ञानिकांचा साक्षात्कार सिद्ध करण्याजोगा असतो यातील सिद्धता शब्दास विविध कंगोरे दिसले. साक्षात्कार (धार्मिक व्यक्तिच्या) हा नेहमीच सिद्ध करण्याच्या योग्यतेचा नसतो हे पटले नाही. (काही साक्षात्कार भ्रामक असल्याचे सिद्ध झाले आहे.) तर काही वैज्ञानिक साक्षात्कार हे हायपोथेसिस सदरातले असू शकतात. म्हणजे सिद्धता नसली तरी एक सुसंगत चित्र त्याने उलगडलेले असते.
प्रत्यक्ष साक्षात्कार झाला की नाही वा दिवास्वप्नातून प्रेरणा आली की नाही या गोष्टींची सिद्धता अशक्यच.
प्रमोद
मस्त
चांगले संकलन.. मस्त!
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
केकुलेचा अनुभव थोडा वेगळा वाचलाय
फ्रेडरिक ऑगस्ट केकुले हा जर्मन रसायनशास्त्रज्ञ. १८६५ मध्ये त्याने बेंझिनच्या अणुरचनेवरील आपल्या पहिल्या सिद्धांताची संशोधनपत्रिका सादर केली होती. त्या कामगिरीचा गौरव जर्मन केमिकल सोसायटीने १८९० मध्ये समारंभपूर्वक केला. बेंझिनच्या अणुरचनेवरील पहिल्या संशोधनपत्रिकेचा रौप्य महोत्सव साजरा करणे, हा त्यामागील हेतू होता. याप्रसंगी भाषणात केकुलेने ही रचना आपल्याला कशी स्फुरली ते सांगितले. त्याला दिवास्वप्नात एक साप आपले शेपूट तोंडात घालून बसलेला दिसला. यावरुन बंझिनमधील कार्बन अणू असेच एकमेकांशी बंध तयार करुन अंगठीसारखी रचना (रिंग स्ट्र्क्चर) दाखवतात, असा सिद्धांत केकुलेने मांडला. तो पुढे खरा ठरला.
भविष्यकथन आणि स्वप्नसिद्धांत याबाबत प्रसिद्ध व्यक्तींनी नोंदवलेले अनुभव रंजक आहेत.
चांगला लेख!
एवढे वरील विधाने सोडली तर बाकिचा लेख फक्कड झाला आहे.
'अनूभूती होणे'ही एक मोनोकायिक अवस्था असते. 'साक्शात्कार होणे' ही एक बौद्धिक स्तरावरची घटना असते. जी व्यक्ती चिंतनशील असते, त्या व्यक्तीला साक्शात्काराचा अनूभव नित्याचाच असतो. 'अनूभूती' नेहमी-नेहमी, सहजपणे होत नाही.
*'अनूभूती झाल्यानंतर त्या व्यक्तीला काहि सिद्धी प्राप्त होत असाव्यात. जस-जसा अनुभूतीचा वरचा स्तर गाठला जाईल तसतशी सिद्धींच्या क्शमता हि वाढत जात असाव्यात.' सिद्धीतून ज्या कृती घडत जातात त्या इतरांसाठी 'चमत्कार' असतात.
एखादे वाहन चालवता येणे, हाताळता येणे हि असते त्या विशयातील 'सिद्धी'.
त्या ऐवजी एखादे वाहन कसे चालवायचे? ते कसे हाताळायचे? हे शब्दबद्ध करून इतरांना सांगणे म्हणजे 'शास्त्र'.
पण माझ्या या *तर्काला काही अपवाद ही आहेत. संत द्न्यानेश्वरांना आधि काहि सिद्धी प्राप्त झाल्या होत्या व नंतर मोठ्या भावाकडून 'एनर्जी चॅनलईस्ज्ड' करून मिळाल्या होत्या. त्यानंतर त्यांना बहुधा त्यांनी त्यांच्या मागच्या जन्मात वाचलेल्या वेदांमधल्या अनेक गोश्टी त्यांच्या वर्तमान जन्मात सहजपणे आठवत गेल्या व त्या मराठीतून व्यक्त केल्या.
उदा. खालील कडवी वेदांमधील काही ओळींचे उत्स्फुर्त मराठीकरण आहे.
अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ॥
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥
हे तिन्ही एकवटले । तेथें शब्द्ब्रम्ह कवळलें ॥
ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥
रंजक
विज्ञानाविषयी आवड वाढविण्यासाठी अशा नोंदी उपयोगी पडू शकतील.
--
मात्र, रंजकतेसाठी अशा नोंदी कधीकधी बनविल्याही जातात. उदा., विकिपीडियावर असे दिले आहे की आर्किमिडीजने वापरलेली पद्धत थोडी वेगळी असावी आणि न्हाणीगृहाच्या प्रसंगाची त्याने नोंद केली नाही. (सोन्यात चांदीची भेसळ करतात की तांब्याची?)
एडिसनने दिव्याचा शोध लावला त्या प्रसंगाची स्फूर्तीकथाही चित्रपटासाठी बनविण्यात आली असे वाचल्याचे स्मरते.
--
रोचक दुवा