अणूऊर्जेचा प्रताप

फुकुशिमा अणुविद्युत केंद्रासंबंधी तीन लेख आणि 'परमाणू ऊर्जेचा शोध' या माझ्या मागील लेखांमध्ये मी माझ्या ओळखीच्या शब्दांचा उपयोग केला होता. 'मोलेक्यूल' आणि 'अॅटम' या इंग्रजी शब्दांना 'अणू' आणि 'परमाणू' हे मराठी प्रतिशब्द मी दिले होते. ते चुकीचे किंवा कालबाह्य असल्याचे या लेखांवर झालेल्या चर्चेमधून समजले. 'मोलेक्यूल' आणि 'अॅटम' या इंग्रजी शब्दांना 'रेणू' आणि 'अणू' हे मराठी प्रतिशब्द आता प्रमाणभाषेत दिले जातात असे समजल्यामुळे यापुढील लेखांमध्ये मी या शब्दांचा उपयोग करणार आहे.

एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस मेरी क्यूरी आणि इतर शास्त्रज्ञांनी रेडिओअॅक्टिव्हिटीचा शोध लावल्यानंतर विज्ञानाच्या पुस्तकात नवा अध्याय सुरू झाला होता. इतर अनेक पदार्थ सुध्दा रेडिओअॅक्टिव्ह असल्याचे प्रयोगातून सिध्द होत होते. त्या काळात आढळलेले हे सारे पदार्थ नैसर्गिकच होते. प्रत्येक मूलद्रव्यांमधून बाहेर पडणारे किरण वेगळ्या प्रकारचे असतात. त्या किरणांवरून त्या पदार्थाचे अस्तित्व ओळखण्याचे तसेच अधिक तपशील गोळा करण्याचे शास्त्र विकसित होत गेले. उत्खननात सापडलेल्या मानवनिर्मित वस्तूंच्या अवशेषांवरून त्यांचा कालखंड ठरवण्याचे साधन (कार्बन डेटिंग) या शास्त्रामुळे इतिहासकारांना मिळाले आणि खडकांमधून निघणा-या किरणांच्या अभ्यासावरून जिऑलॉजिस्ट्सना त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळू लागली.

अशा प्रकारे रेडिओअॅक्टिव्हिटीचा उपयोग संशोधनासाठी होत असला तरी 'ऊर्जेचे साधन' या दृष्टीने त्याचा उपयोग होऊ शकत नव्हता. सूर्यकिरणांपासून आपल्याला प्रकाश आणि ऊष्णता या दोन प्रकारची ऊर्जा मिळते. त्यांचा आपल्याला भरपूर उपयोग होतो. चंद्राच्या चांदण्यामधून फक्त उजेड मिळतो, जाणवण्याइतपत ऊष्णता मिळत नाही. काळोख्या रात्री आकाशातले तारे आपल्याला दिसतात, पण त्यांच्या प्रकाशामध्ये आपल्याला स्वतःचा हातसुध्दा दिसत नाही, इतका तो उजेड क्षीण असतो. बहुतेक नैसर्गिक रेडिओअॅक्टिव्ह पदार्थांमधून बाहेर पडणारे किरण अदृष्य आणि अत्यंत क्षीण असतात. त्यांच्यामध्ये असलेल्या ऊर्जेचा रोजच्या जीवनात काही उपयोग असत नाही किंवा त्यामुळे विशेष अपायही होत नाही.

रेडिओअॅक्टिव्ह पदार्थांमधून निघणारे किरण थेट अणूमधून निघाले असणार हे सिध्द झाले. अणूची अंतर्गत रचना कशी असावी याबद्दल केलेले तर्क सर्वमान्य झाले. त्याच्या केंद्रभागी 'प्रोटॉन' नावाचे घनविद्युतभारी कण असावेत आणि 'इलेक्ट्रॉन' नावाचे ऋणविद्युतभारी कण त्यांच्या सभोवती घिरट्या घालत असावेत हे मॉडेल सर्वमान्य झाले. प्रत्येक अणूत जेवढे प्रोटॉन्स तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. पण त्यांचे इलेक्ट्रिकल गुणधर्म आणि वजन यात सुसंगती दिसत नसल्यामुळे प्रोटॉन्सच्या सोबत कोणताही विद्युतभार नसलेले 'न्यूट्रॉन्स' नावाचे कण असावेत अशी कल्पना पुढे आली. प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांचा अभ्यास होत गेला. वजन सोडून मूलद्रव्यांचे बाकीचे बहुतेक गुणधर्म या कणांच्यामुळे ठरतात आणि रासायनिक क्रियांमध्ये यांचा सक्रिय सहभाग असतो हे समजले. न्यूक्लीयसमधील प्रोटॉन्सची संख्या बदलली की मूलद्रव्यच बदलते पण एक दोन न्यूट्रॉन्स कमी किंवा जास्तीचे असले तरी घनते खेरीज इतर कोणताही गुणधर्म बदलत नाही. असे न्यूट्रॉन्स हे कण गूढ राहिले. काही काम न करणारे हे कण प्रोटॉन्सना चिकटून आळशी ठोंब्यासारखे नुसते स्वस्थ बसलेले असतात अशी सुरुवातीच्या काळातली समजूत होती. ते किती महाबली आणि चपळ असतात याची तेंव्हा कल्पना नव्हती.

इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्सची दुनिया थोडी सुरस आणि चमत्कारिक वाटते. ऋण आणि घन विद्युत भारांमध्ये परस्परांबद्दल आकर्षण (attraction) असते आणि एकाच प्रकारचा भार (charge) असलेले पदार्थ एकमेकांना दूर ढकलत असतात (repulsion) असे सर्वसाधारणपणे दिसते. पण ऋणविद्युतभारी इलेक्ट्रॉन घनविद्युतभारी प्रोटॉन्सपर्यंत जाऊन त्यांना भेटत नाहीत, ते त्यांच्या सभोवती घिरट्या घालत राहतात. एका अणूमध्ये खूप इलेक्टॉन्स असले तर ते आपसांमधील रिपल्शनमुळे एकत्र असणार नाहीत हे कदाचित सहजपणे समजण्यासारखे आहे. ते निरनिराळ्या कक्षांमध्ये गटागटांमध्ये राहून फिरत राहतात. घनविद्युतभारी प्रोटॉन्स एकमेकांपासून दूर का जात नाहीत याचे आश्चर्य वाटेल. कोणताही विद्युतभार नसलेले न्यूट्रॉन्स त्यांना एका जागी धरून ठेवत असतात. न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स (यांना संयुक्तपणे न्यूक्लिऑन्स म्हणतात) यांना एकत्र बांधून ठेवणारी एक बाइंडिंग एनर्जी असते. ती त्या अणूच्या वस्तुमानाच्या स्वरूपात त्यात दडलेली असते. दोन किंवा अधिक फक्त प्रोटॉन्स एकमेकांसोबत राहू शकत नाहीत, पण त्यांच्यासमवेत न्यूट्रॉन्स असतील तर मात्र त्या सर्वांची मिळून पुरेशी बाइंडिंग एनर्जी होते आणि ते सर्वजण मिळून अणूच्या केंद्रभागी (nucleus) एकत्र राहतात.

न्यूट्रॉनला अणूच्या केंद्रामधून बाहेर काढून त्याचे वेगळे अस्तित्व उपकरणांच्या द्वारे ओळखता आल्यानंतर या क्षेत्रातला आणखी एक नवा अध्याय सुरू झाला. त्यात न्यूट्रॉन्सच्या गुणधर्मांचा अभ्यास सुरू झाला. तसेच न्यूट्रॉन्सच्या निर्मितीचे तंत्र विकसित होताच न्यूट्रॉनमुळे इतर मूलद्रव्यांवर काय परिणाम होतात याचे संशोधन सुरू झाले. न्यूट्रॉनकडे कशाच्याही आरपार जाण्याची अद्भुत शक्ती असते. इतर सर्व प्रकारच्या रेडिएशनला शिसे हा जड धातू अडथळा आणतो पण न्यूट्रॉन मात्र शिशाच्या जाड भिंतीमधून सुध्दा अतीशय वेगाने सरळ लीलया आरपार जातो. या उलट पाणी, मेण यासारख्या हलक्या पदार्थामधून जातांना त्याची गती मंद होते आणि दिशा बदलत राहून तो तिथल्या तिथे थोडासा घुटमळत राहतो. सुटा न्यूट्रॉन फार काळ आपले अस्तित्व टिकवून धरत नाही. तो दुस-या एकाद्या अणूच्या केंद्रात शिरून तिथे असलेल्या न्यूट्रॉन्सच्या मेळाव्यात सामील होतो. तसे झाले नाहीच तर त्याचे विघटन होऊन एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन यांची जोडी जन्माला येते.

दुस-या अणूमध्ये सामील झालेल्या या नव्या न्यूट्रॉनमुळे त्या अणूत गरजेपेक्षा अधिक ऊर्जा (बाइंडिंग एनर्जीमुळे) असल्याकारणाने तो अणू अस्थिर होऊन रेडिओअॅक्टिव्ह होतो आणि आपल्याकडील जास्तीच्या ऊर्जेला बाहेर टाकू लागतो. या प्रकारे अनेक मानवनिर्मित नवी मूलद्रव्ये किंवा त्यांचे आयसोटोप्स तयार होऊ लागले. आदिमानवाच्या काळात तो निस्रर्गातील वस्तूंचे तुकडे किंवा चेंदामेंदाच करू शकत होता, त्यात त्यांच्या सूक्ष्म अणूरेणूंवर काही परिणाम होत नसे. मानवाने अग्नीला वश करून घेतल्यानंतर तो इंधनाच्या रेणूंचे परिवर्तन करू लागला आणि रसायनशास्त्रातील प्रगतीमुळे तो नवी संयुगे (कंपाउंड्स) तयार करायला शिकला, त्यात नवे मानवनिर्मित रेणू जन्माला आले. आता न्यूट्रॉन्सचा उपयोग करून त्याने निसर्गात अस्तित्वात नसलेले नवे अणू तयार केले. यातल्या काही कृत्रिम अणूंचा वैद्यकीय उपचार आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चांगला उपयोग होत असला तरी किरणोत्सारामुळे तापदायक ठरलेल्या अणूंचे प्रमाण त्याहून फार मोठे आहे.

न्यूट्रॉनच्या झोताचा मारा युरेनियम या धातूवर केला गेला तेंव्हा एक धक्कादायक सत्य जगासमोर आले. अचानक तो पदार्थ तापला आणि त्याच वेळी न्यूट्रॉन्सच्या संख्येत घट होण्याऐवजी खूप मोठी वाढ झालेली दिसली. युरेनियम धातूच्या यू२३५ या आयसोटोपच्या अणूच्या केंद्रामध्ये ९२ प्रोटॉन्स आणि १४३ न्यूट्रॉन्स असतात. त्यात आणखी एकाची भर पडली की ती संख्या १४४ होते आणि नव्याने तयार झालेला यू २३६ हा नवा अणू इतका अस्थिर असतो की लगेच त्याचे भंजन होऊन चक्क दोन तुकडे पडतात. युरेनियमच्या केंद्रामधील काही प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मिळून वेगळ्याच मूलद्रव्याचा एक नवा अणू आणि आणखी काही प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मिळून दुसरा नवा अणू तयार होतो. अशा प्रकारे एका मोठ्या अणूमधून दोन लहान अणू निघतात. तरीही दोन तीन न्यूट्रॉन्सना त्यातल्या कशातच जागा मिळत नाही. त्यामुळे ते बिचारे सुटेच राहतात आणि वेगाने दूर फेकले जातात. या दोन नव्या अणूंमधील बाइंडिंग एनर्जीची बेरीज एकट्या यू २३५ मधील बाइंडिंग एनर्जीपेक्षा कमी असल्यामुळे ही जास्तीची ऊर्जा त्या नव्या अणूंना आणि सुट्या न्यूट्रॉन्सना मिळते. ही बाइंडिंग एनर्जी वस्तुमानाच्या रूपात असल्यामुळे दोन नवे अणू आणि बाहेर पडलेले दोन किंवा तीन न्यूट्रॉन्स यांच्या वस्तुमानांची बेरीज एक यू२३५ अणू आणि एक सुटा न्यूट्रॉन यांच्या बेरजेहून कमी असते आणि या फरकाचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते. हीच ती अणूऊर्जा.

या क्रियेमध्ये दोन तीन सुटे न्यूट्रॉन बाहेर पडत असल्यामुळे ते न्यूट्रॉन्स त्यांना भेटणा-या निरनिराळ्या यू २३५ अणूंचे भंजन करत जातात. यामुळे त्यांची संख्या वाढत जाऊन त्याची साखळी (chain reaction) तयार होऊ शकते आणि ती अतीशय वेगाने मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत जाऊन भयंकर अक्राळविक्राळ रूप धारण करू शकते. वस्तुमानाचे रूपांतर प्रचंड ऊर्जेमध्ये होऊ शकेल हे न्यूट्रॉन्स आणि भंजन (Fission) यांची माहितीसुध्दा नसतांनाच्या काळात आईन्स्टाईनने केलेले भाकित अशा प्रकारे खरे ठरेल अशी शक्यता दिसू लागताच त्याच्या भयानक परिणामांचा विचार करता या विषयावरील सारे संशोधन अत्यंत गुप्त ठेवले जाऊ लागले. पण तेवढ्यात दुसरे महायुध्द भडकले. आपण जर शत्रूचा संहार केला नाही तर तो वरचढ ठरेल आणि त्यानंतर तो आपली गय करणार नाही अशा भीतीदायक विचाराने मानवता, अहिंसा, शांती वगैरे सूज्ञपणाला बाजूला ठेवले गेले. युध्दपातळीवर काम करून भंजनाच्या तत्वावर आधारित एक संहारक अस्त्र तयार केले गेले आणि एका वाळवंटात त्याची चाचणी करून झाल्यावर ते अणूबाँब जपानवरील दोन शहरांवर टाकून त्या शहरांचा विध्वंस करण्यात आला. अशा प्रकारे अणूशक्ती पहिल्यांदा जगापुढे आली ती या संहारक रूपाने. त्या वेळी केलेल्या एकेका स्फोटातून कल्पनातीत एवढी प्रचंड ऊर्जा क्षणभरात बाहेर पडली आणि त्याने सर्व परिसर पार बेचिराख करून टाकला. जगाने तेंव्हा घेतलेल्या त्या धसक्यातून ते आजपर्यंत सावरलेले नाही. अणूशक्ती म्हणजे सर्वनाश असा घोषा लावणे अजून चाललेले आहे.

मूलद्रव्यांचा अतीशय काटेकोर आणि सूक्ष्म अभ्यास करून त्यांच्या प्रत्येक आइसोटोपच्या अणूमधल्या बाइंडिंग एनर्जीचा अभ्यास करण्यात काही गोष्टी लक्षात आल्या. युरेनियमसारख्या जड अणूमध्ये खूप जास्त बाइंडिंग एनर्जी असते आणि त्या अणूचे दोन तुकडे झाले तर त्यातून तयार होणा-या दोन अणूंना मिळूनसुध्दा इतक्या बाइंडिंग एनर्जीची आवश्यकता नसते. त्यामुळे ती अणूंच्या गाभ्यांमधून बाहेर पडते. लहान अणूंमध्ये याच्या नेमकी उलट परिस्थिती असते. हैड्रोजनच्या अणूमध्ये फक्त एकटा प्रोटॉन असल्यामुळे बाइंडिंग एनर्जीचा प्रश्नच नसतो. बाहेरून एक न्यूट्रॉन येऊन त्याना मिळाला तर तो त्याला चिकटतो आणि ड्यूटेरियम हे हैड्रोजनचे आयसोटोप तयार होते आणि त्याच्या अणूमध्ये बाइंडिंग एनर्जी असते. त्यात आणखी एक न्यूट्रॉन आला तर त्याचे ट्रिशियम आयसोटोप बनते, पण हा अणू अस्थिर असतो. असे दोन अणू एकत्र आले तर त्यातून हीलियम या वेगळ्या मूलद्रव्याचा अणू तयार होतो, पण त्याची एकट्याची बाइंडिंग एनर्जी हैड्रोजनच्या दोन अणूंमधील बाइंडिंग एनर्जीपेक्षा कमी असल्यामुळे या संमीलनातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. याला थर्मोन्यूक्लियर फ्यूजन रिअॅक्शन म्हणतात आणि या तत्वानेच सूर्यामध्ये ऊष्णता तयार होत असते. आपल्याला ठाऊक असलेल्या सूर्य या सर्वात मोठ्या ऊर्जास्त्रोतातली ऊर्जा सर्वात लहान आकाराच्या अतीसूक्ष्म अशा हैड्रोजनच्या अणूंपासून तयार होत असते एवढा या अणूऊर्जेचा प्रताप आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

फारच छान !

मस्त लेख ... आवडला.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

छानच

माहिती समजण्यासारखी दिलेली आहे.

तुम्ही (अन्य लेखांत) आकृतीसुद्धा चांगल्या काढता. त्यामुळे समजायला सोपे जाते ते जातेच, आणि डोळ्यांना विश्रांती देत मुद्दे आत्मसात करायलाही चित्रे जागा देतात. तशाच आकृती या लेखासाठी सुद्धा दिल्यात तर आणखी मजा येईल.

चित्र

हे पहा.

AtomFissionFusion

जबरा लेख

मस्त लेख. फार आवडला.

मस्त

साध्या सोप्या शब्दांत माहितीपूर्ण असा लेख.

छान लेख

अगदी सोप्या शब्दात आणि सहजतेने लेख लिहिला आहे. माहितीपूर्ण तर आहेच.

थोड्या शंका:
कार्बन डेटिंगचा शोध आणि अणुउर्जेचा शोध हे साधाराण पणे एकाच वेळी लागल्याचे दिसते. कार्बन डेटिंग १९४९ तर पहिली प्रायोगिक अणु भट्टी १९४२ वा असे काहीसे. लेखातील वर्णनानुसार कार्बन डेटिंग आधी आल्यासारखे वाटते. (नेमके तसे लिहिले नाही.)

रेडिओअॅक्टिव्ह पदार्थांमधून निघणारे किरण थेट अणूमधून निघाले असणार हे सिध्द झाले.
यातला अणू शब्द थोडा खटकला त्याला न्युक्लियस (पर्यायी मराठी शब्द) म्हणायला हवे होते.

आपल्याला ठाऊक असलेल्या सूर्य या सर्वात मोठ्या ऊर्जास्त्रोतातली ऊर्जा सर्वात लहान आकाराच्या अतीसूक्ष्म अशा हैड्रोजनच्या अणूंपासून तयार होत असते एवढा या अणूऊर्जेचा प्रताप आहे.

या वाक्यात काही आक्षेपार्ह नाही. पण मला लहानपणची एक गैरसमजूत आठवली. मला वाटायचे की एका अणुभंजनाने अतिप्रचंड उर्जा होत असते. (अणुबॉम्ब) खरे तर ती उर्जा अणुच्या मानाने खूप मोठी असली तरी आपल्या मानाने काहीच मोठी नाही. असे कित्येक अणू सहभागी झाल्यावर ही उर्जा आपल्याला जाणवणारी वा महाकाय होत असते. तुम्ही दिलेल्या वाक्याने माझ्या लहानपणच्या गैरसमजुतीला थोडे खतपाणी मिळते.

नंतरच्या प्रतिसादातली चित्रे आवडली. याच बरोबर थोडी आकडेवारी आली असती (काही जण आकडे आले की दुर्बोध असे समजतात त्यातला मी नाही.) तर अजून चांगले झाले असते.

प्रमोद

खुलासा

१.कार्बन डेटिंगचा उल्लेख नैसर्गिक रेडिओअॅक्टिव्हिटीचा उपयोग कसा केला जातो या संदर्भात मी केला आहे. (विशेषतः त्यामधील अत्यल्प अशी ऊर्जा आपल्या कामाची नाही हे दाखवण्यासाठी) त्या विधानाचा अणुभट्टीशी काही संबंध नाही.
२.रेडिओअॅक्टिव्हिटीचा शोध लागला त्या वेळी अणूची अंतर्गत रचना, न्यूक्लियसची संकल्पना वगैरे गोष्टी अजून समोर आल्या नव्हत्या. कोणतीही रासायनिक क्रिया न होता हे किरण एकट्या मूलद्रव्यामधून निघत आहेत एवढेच शास्त्रज्ञांना समजले होते. कदाचित त्यामुळेही अणू या तोपर्यंत सर्वात लहान समजल्या जाणा-या कणाच्या आत काय आहे यावर विचाराला चालना मिळाली असावी.

ऊर्जेचे साधन या अर्थाने रेडिओअॅक्टिव्हिटीचा उपयोग फक्त अतीशय विशिष्ट अशा उपकरणांमध्येच केला जातो. अणू ऊर्जा याचा अर्थ मुख्यतः भंजनापासून मिळणारी ऊर्जा असा आज केला जातो. भविष्यात कधीतरी फ्यूजनरिअॅक्टर्स अस्तित्वात येतील. पण रेडिओअॅक्टिव्हिटी (काही बाबतीत) ते फ्यूजन या सर्वांमधील ऊर्जा खरे तर अणूच्या केंद्रामधून (न्यूक्लियसपासून) निघते आणि संशोधन होत असतांना एकमेकींचा विचार केला गेला. या कारणाने मी त्यांचा उल्लेख माझ्या लेखात केला आहे.
अणू आणि त्याचे केंद्र याबाबत आजही थोडा गोंधळ केला जातो. अॅटॉमिक एनर्जी आणि न्यूक्लियर पॉवर या दोन्ही शब्दांचा एकाच अर्थाने उपयोग केला जातांना दिसतो.

धन्यवाद

लेख आवडला

अतिशय सोप्या भाषेत, तांत्रिक शब्दांचा बडिवार न करता, नेमकी माहिती देण्याची तुमची क्षमता इथेही दिसून आली.

अणुऊर्जेविषयी विचार करताना लोकांना एक अगम्य भीती असते. रेडिएशन या केवळ शब्दानेसुद्धा लोकं घाबरतात. तो धोका किती असतो, तो अणुऊर्जाकेंद्रांमध्ये कसा आटोक्यात ठेवण्यात येतो याविषयीही लिहावं ही विनंती.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

लेखमालिका

लिहायचे असे मी ठरवले आहे. हा महत्वाचा विषय यथानुक्रमे त्यात येईलच.

लेख आवडला

फारच सुंदर विवेचन, माहितीसाठी धन्यवाद.

तरी माझ्या काही शंका. (कदाचित बाळबोध असतील)

सुटा न्यूट्रॉन फार काळ आपले अस्तित्व टिकवून धरत नाही. तो दुस-या एकाद्या अणूच्या केंद्रात शिरून तिथे असलेल्या न्यूट्रॉन्सच्या मेळाव्यात सामील होतो. तसे झाले नाहीच तर त्याचे विघटन होऊन एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन यांची जोडी जन्माला येते.

एखाद्या अणूच्या केंद्रात तो सुटा न्यूट्रॉन सामील न होण्यासाठी काय कारण असू शकेल? प्रोटॉन/इलेक्ट्रॉन चे कॉंम्बीनेशन त्या सुट्या न्यूट्रॉनला सामील करून घेण्यास/न घेण्यास कारणीभूत असेल काय?

या क्रियेमध्ये दोन तीन सुटे न्यूट्रॉन बाहेर पडत असल्यामुळे ते न्यूट्रॉन्स त्यांना भेटणा-या निरनिराळ्या यू २३५ अणूंचे भंजन करत जातात. यामुळे त्यांची संख्या वाढत जाऊन त्याची साखळी (chain reaction) तयार होऊ शकते आणि ती अतीशय वेगाने मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत जाऊन भयंकर अक्राळविक्राळ रूप धारण करू शकते

हे मी आधी देखील वाचले होते, पण मग ते भंजन कुठे तरी थांबते, ते का थांबते? मग ज्या कारणामुळे ते थांबते तेच कारण ती उर्जा कंटेन करायला उपयोगी पडू शकेल काय?

पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.

खुलासा

आपण विचारलेले प्रश्न चांगले आहेत. हा लेख सर्वसामान्य वाचकाला समजावा या दृष्टीने मी हा काँप्लिकेटेड विषय सोपा केला आहे. उत्तर देण्यासाठी थोडे खोलात जाऊ.
एखाद्या अणूच्या केंद्रात तो सुटा न्यूट्रॉन सामील न होण्यासाठी काय कारण असू शकेल?
एकादा न्यूट्रॉन जेंव्हा कोणत्याही अणूच्या न्यूक्लियसवर आपटतो तेंव्हा तीन निरनिराळ्या प्रकारच्या घटना घडण्याच्या शक्यता असतात.
१. तो न्यूट्रॉन त्या न्यूक्लियसमध्ये सामावून घेतला जाईल, म्हणजेच त्या न्यूक्लियसमधील न्यूट्रॉन्सची संख्या १ ने वाढून नवा आयसोटोप तयार होईल. उदाहरणार्थ कोबाल्ट ५९ चे रूपांतर कोबाल्ट ६० मध्ये होते. ..... किंवा
२. तो न्यूट्रॉन परावर्तित होऊन वेगळ्या दिशेला चालला जाईल.
याशिवाय जर तो न्यूक्लियस भंजनक्षम अणूचा असेल तर
३ त्याचे भंजन होऊन त्यामधून दोन नवे अणू आणि दोन किंवा तीन न्यूट्रॉन्स वेगळे होतील.
या तीनही शक्यता स्टॅटिस्टिकल आहेत. एकाच एलिमेंटचा अॅटम कधी न्यूट्रॉनला सामावून घेतो आणि कधी त्याला बाहेरच्या बाहेर पिटाळून लावतो. एक ग्रॅम वस्तुमानामध्ये अनेक परार्धइतके अणू असतात. त्यामुळे या क्रिया स्टॅटिस्टिकल असूनसुध्दा त्यांचे प्रमाण निश्चित राहते. या नियमांचा सखोल अभ्यास करून ग्राफच्या रूपाने ती प्रमाणे पुस्तकात दाखवली जातात.
युरेनियम २३५ अणूचे सुध्दा न्यूट्रॉनमुळे नेहमीच भंजन होत नाही. ते सुध्दा स्टॅटिस्टिकल असते. अधिकतर वेळा तो सुध्दा न्यूट्रॉनला परावर्तितच करतो. न्यूट्रॉन किती वेगाने जात असेल त्या वेगानुसार या शक्यतांचे प्रमाण बदलते. प्रत्येक मूलद्रव्याचे या बाबतीतले गुणधर्म निरनिराळे असतात. कॅड्मियम आणि बोरॉनचे न्यूक्लियस फार मोठ्या प्रमाणात न्यूट्रॉन्सना शोषून घेऊन नष्ट करतात. यामुळे त्यांना पॉइझन म्हणतात. झिर्कोनियम हा धातू कमीत कमी न्यूट्रॉन्सना नष्ट करतो. त्याला आपण न्यूट्रॉनमित्र म्हणू. या कारणाने त्याचा उपयोग रिअॅक्टरमधील काही महत्वाची अंतर्गत यंत्रणा तयार करण्यासाठी केला जातो. तिथे जर आपण साधे लोखंड किंवा स्टेनलेस स्टील वापरले तर ते मोठ्या प्रमाणात न्यूट्रॉन्सचे भक्षण करतील आणि भंजनांची साखळी तयार होऊ शकणार नाही.

पण मग ते भंजन कुठे तरी थांबते, ते का थांबते? मग ज्या कारणामुळे ते थांबते तेच कारण ती उर्जा कंटेन करायला उपयोगी पडू शकेल काय?
पहिल्या भंजनामधून तीन न्यूट्रॉन्स बाहेर पडले असे समजू. ते सर्व दिशांना फेकले जातात. त्यातला कमीत कमी एक न्यूट्रॉन दुस-या युरेनियमच्या अणूला भेटला आणि त्याचे भंजन झाले तरच साखळी पुढे जाईल. नाही तर ती तिथेच थांबेल. रिअॅक्टरची रचना अशा प्रकारे केलेली असते की पहिल्या शंभर भंजनामधून जे २५० न्यूट्रॉन्स बाहेर पडतात त्यातले फक्त १४०-१४५ न्यूट्रॉन्स वाया जातात आणि १०५-११० पुन्हा भंजन करू शकतात. त्यातील जास्तीच्या ५-१० न्यूट्रॉन्सना कंट्रोल रॉडमधील पॉइझन शोषून घेते आणि त्याची संख्या १०० वर स्थिर ठेवली जाते. त्यामुळे सस्टेन्ड चेन रिअॅक्शन चालत राहून रिअॅक्टरची ( त्याबरोबर पॉवर स्टेशनची) पॉवर स्थिर राहते.
आपण सुचवल्याप्रमाणे ज्या कारणाने भंजनक्रिया थांबते त्यांचाच उपयोग ती ऊर्जा स्थिर पातळीवर ठेवण्यासाठी केला जातो.
या गोष्टी मी माझ्या फुकुशिमावरील लेखात लिहिल्या होत्या, पण कदाचित त्या समजायला कठीण वाटल्या असाव्यात. यामुळे मी ही नवी मालिका सुरू केली आहे. आपण विचारलेल्या प्रश्नांची तपशीलवार उत्तरे त्यात देता येतील अशी अपेक्षा आहे.

मस्त

उत्तरे दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे.
हा लेख, असे लेखन वृत्तपत्रांतून लेख मालिकेच्या स्वरुपात द्यावे, म्हणजे माझ्या सारख्या अनेक लोकांना नक्की अणू ऊर्जेबद्दल ज्ञान होईल.

हा हा

असे लेखन वृत्तपत्रांतून लेख मालिकेच्या स्वरुपात द्यावे,
माझी इच्छा आणि तयारी आहे, पण कोणी छापायलाच तयार नाहीत

प्रयत्न

मी प्रयत्न करून बघतो, खरडवहीतून कळवितो.

ज्या उपक्रमींना शक्य असेल त्यांनी यासाठी कृपया मदत करावी.

घारे साहेब.

लेखन वृत्तपत्रांतून लेख मालिकेच्या स्वरुपात द्यावे, माझी इच्छा आणि तयारी आहे, पण कोणी छापायलाच तयार नाहीत

घारे साहेब, औरंगाबाद आवृत्तीच्या काही संपादन विभागातील मित्रांशी चर्चा करुन लेख मालिका प्रसिद्ध करता येईल का त्याबद्दल चौकशी करुन सांगतो.

उपक्रमवर दै. सकाळचे पुणे आवृतीत संपादन विभागात काम करणारे पंकज जोशी आहेत त्यांनाही विचारले पाहिजे. पण तेही उपक्रमवर बर्‍याच दिवसात दिसले नाहीत.:(

काळे काकांप्रमाणे दै. सकाळमधे ई-आवृत्तीसाठी लेख मालिका पाठवावी हाही एक उत्तम पर्याय मला वाटतो.

-दिलीप बिरुटे

आभार

आपल्या सूचनेबद्दल आभारी आहे. माझे मित्र सुधीर काळे इंडोनेशियात राहून जे करू शकतात ते मी इथे राहून करू शकलेलो नाही हे खरे आहे.
आपल्या लिखाणाची बाडं खांद्यावर घेऊन प्रकाशकांचे उंबरठे आणि स्वतःच्या चपला झिजवणे मला जमेल असे कधी वाटलेच नाही. मी या बाबतीत आळशी आहे. सहजासहजी जमण्यासारखे असेल तर ठीक आहे, नाही तर आपला ब्लॉग, उपक्रम, मिसळपाव वगैरे जागा आहेतच!

हरकत नाही.

काही दिवसांपूर्वी ह्या लेखांबद्दल मी आमच्या एक-दोन संपर्कांना विचारले. लेख लगेच दिले असते तर प्रकाशित करता आले असते असे ते म्हणाले. आणि हे लेख प्रकाशित होईपर्यंत फुकुशिमावर एक दोन लेख तसेही येऊन गेले होते. पुढच्या वेळेस अशा लेखमालिकेचा विचार मनात आल्यावर बघा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

थोरियम

चांगली माहिती मिळाली.
थोरियमचे भारतात मोठे साठे आहेत त्याचे नाव नेहमी पेप्रात येते. त्याचा खरच काही उपयोग आहे की उगाच उभे केलेले बुज्गावणे आहे? की इतर देश थोरियमची अणुभट्टी आपल्याला विकण्यात रस घेत नाही? आपल्याला अणुभट्ट्या बाहेरून का विकत घ्याव्ह्या लागतात? भारतात त्या बनू शकत नाही का?
शिवा

थोरियम

थोरियमचे भारतात मोठे साठे आहेत त्याचे नाव नेहमी पेप्रात येते.
थोरियमचा जगातील सर्वात मोठा साठा भारतात आहे. हा धातू नैसर्गिक रीत्या भंजनक्षम नाही. पण एका न्यूट्रॉनला सामावून घेऊन त्याचे रूपांतर युरेनियमच्या एका आयसोटोपमध्ये होते. हे काम विशिष्ट प्रकारच्या रिअॅक्टरमध्येच होऊ शकते. असले रिअॅक्टर्स व्यावसायिक दृष्टीने फायदेशीर नसल्यामुळे जगातल्या अगदी मोजक्या राष्ट्रांमध्ये सुध्दा ते मुख्य़तः संशोधनाच्या कामासाठी उभारले गेले आहेत.
इतर देश थोरियमची अणुभट्टी आपल्याला विकण्यात रस घेत नाही?
भारत वगळता इतर देशांना या विषयात फारसा रस नसल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर अशा भट्ट्या उभारलेल्याच नाहीत. आपल्या परीने लहान प्रमाणात आपले प्रयत्न चालले आहेत. कदाचित आणखी वीस वर्षांनी हे चित्र बदललेले दिसेल.
आपल्याला अणुभट्ट्या बाहेरून का विकत घ्याव्ह्या लागतात? भारतात त्या बनू शकत नाही का?
अगदी सुरुवातीला १९६० च्या दशकात आपण परदेशातून दोन निरनिराळ्या प्रकारचे प्रॉजेक्ट्स (४ भट्ट्या) आणले. त्यानंतर १६ अणुभट्ट्या आपण भारतातच निर्माण केल्या. आणखी ४ भट्ट्यांच्या कामाला सुरुवात झालेली आहे. जनतेने विरोध केला नाही तर हे काम असेच पुढे चालत राहणार आहे. या सर्व अणूभट्ट्या एका प्रकारच्या आहेत. याखेरीज वेगळ्या प्रकारच्या २ भट्ट्यांचे कामही सध्या पूर्णावस्थेच्या जवळ पोचत आहे आणि जैतापूरसह अनेक नव्या प्रॉजेक्ट्सवर चर्चा चालू आहे. तशा प्रकारच्या आणि तेवढ्या मोठ्या क्षमतेच्या अणूभट्ट्या सध्या देशात तयार होत नाहीत. भविष्यकाळात तसे प्रयत्न केले जातील.
आज आपल्या देशाची परकीय चलनाची गंगाजळी समाधानकारक असल्यामुळे बाहेरून सहजपणे मिळू शकणा-या अनेक वस्तू आता आयात केल्या जाऊ शकतात. राजकीय, तांत्रिक आणि आर्थिक बाजूने विचार केल्यानंतरच त्याबद्दल निर्णय घेतले जातात. यामुळे आपल्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करून विजेची जेवढी निर्मिती आपण करू शकतो त्याशिवाय परदेशातून आणलेल्या केंद्रांमध्ये विजेचे उत्पादन केले तर या जास्तीच्या विजेचा लाभ आपल्यालाच होईल. औष्णिक आणि जलविद्युत केंद्रासाठी लागणारी यंत्रसामुग्री भारतात तयार होत असली तरी याच कारणासाठी तिची सुध्दा मोठी आयात होत आहे. जी गोष्ट इथे बनत नाही तीच फक्त बाहेरून आणायची ही विचारसरणी आता बदलली आहे आणि हे जागतिकीकरण आता जगभरात सगळीकडे झालेले आहे.

 
^ वर