विश्वमान्य धर्म ?

नमस्कार,
मनोरंजन,टवाळकी ,आणि हलकं-फूलकं वाचावयाच्या अपेक्षेने येणा-या मित्रांची क्षमा मागून विषयाला सूरूवात करतो.

विश्वमान्य धर्म...जगातील विचारवंत,तत्वचिंतक,विश्वमान्य धर्माचा विचार करत आहेत.एच.जी.वेल्स चे नाव या विषयासंबधी मोठ्या आदराने घेतले जाते.त्यांच्या आश्चर्य कारक,व रोमांचक लघूकथा अनेकांनी वाचलेल्या असतील.तरिही विश्वमान्य धर्माच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारी त्यांची अर्थ-गंभीर पुस्तकेही त्यांनी लिहीली आहेत.Outlines of the History of the world या पूस्तकात त्यांनी विश्वराजसभा शक्य आहे याचे जोरात समर्थन केले आहे.अशी राजसभा शक्तीवर नव्हे तर भक्तीवर आधारित असली पाहिजे.मानवप्रेम-व्यक्तिप्रेम यांच्यावर ती उभारली गेली तर नक्की टिकेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.अर्थात धर्माचे बंधन असेल तरच वैश्विक राजसभा टिकून राहील.पण तो धर्म आज तुम्ही आम्ही ज्याची कल्पना करतो,तसा संकूचित राहणार नाही.प्रतिक्रियात्मक( reactionary)ही असणार नाही,
नसणार.तर सात्विक पार्श्वभूमीवर आधारित बनलेला असेल.हा लेखक लिहितो त्याप्रमाणे '' It will be based upon a common world religion very much simplified and universalised and better understood" अस धर्म कोणत्या प्रकारचा असला पाहिजे त्याची चिकित्सा करतांना तो सांगतो:" It will not be Christianity,nor Islam nor Buddhism,nor any such specialised form of religion That religion will be based on selfless human service"अर्थात अशी विश्वसभा एक फारच साधी,सरळ व सहजपणे समजू शकेल अशा सामान्य विश्वधर्मावर आधारलेली असेल.तसेच कोणत्याही प्रकारच्या धर्मावर आधारलेली नसेल.म्हणजेच निष्काम कर्मयोगावर आधारलेला असेल. या कथनाद्वारे भावी विश्वधर्मावर आज असलेल्या सर्व संप्रदायावर तलवार चालवून आजच्या विचारवंतांनी मानवाची गरज (necessity)काय आहे व त्याचा विचारप्रवाह कोणत्या दिशेला धावत आहे याचे स्पष्ट दर्शन घडविलेले आहे.ते दाखवून देत आहे की, हे सर्व संकूचित विचार व जेथे सांप्रदायिक मतभेदांचे नाव राहाणार नाही असा निस्वार्थी मानवसेवे (selfless human service)चा म्हणजे निष्काम कर्मयोगाचा धर्मच मान्य होईल.पण कोणता धर्म आहे ,जो जगाचा सामान्य धर्म बनू शकेल?जगाची आवश्यकता कोणता धर्म पूर्ण करु शकेल.?आपल्या या बद्दलच्या प्रतिक्रियांची वाट पहात आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

विश्वधर्म

प्रा.(डॉ.) दिलीप बिरुटे यांस सप्रेम नमस्कार.
आपण मोजक्या शब्दांत एक उत्तम विचार मांडला आहे. प्रचलित असलेल्या विविध धर्मांमुळे माणसाचे अतोनात नुकसान झाले आहे.आजही होत आहे.धर्माच्या नावाखाली माणसाने माणसावर अनन्वित अत्याचार केले आहेत. धर्माच्या नावावर जेवढा रक्तपात झाला आहे तेवढा अन्य कोणत्याही कारणाने झालेला नाही.याला इतिहासाची (आणि वर्तमानाची सुद्धा) साक्ष आहे."मजहब नही सिखाता आपसमे बैर रखना "हे म्हणायला बरे आहे. "मजहबनेही सिखाया आपसमे बैर रखना " हे धरती वरचे वास्तव आहे."सर्वधर्म समभाव "हे तत्त्व कुचकामी आहे."सर्वधर्म अभाव "याची आता संपूर्ण जगाला गरज आहे.
या धर्मांबद्दल लिहावे तेवढे थोडे आहे.मात्र प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत निराशा जनक आहे.जगभर धार्मिक कट्टरता वाद वाढतोच आहे. तेव्हा तुमच्या माझ्या सारख्या चार जणानी लिहून काय होणार? असे असले तरी निराश होता नये. आपले विचार मांडलेच पाहिहेत.कोणीतरी समानविचारी भेटतोच.
.........यनावाला.

नमस्कार

नमस्कार प्राध्यापक महोदय,
आपण घेतलेला चर्चा विषय फार छान आहे.
जेव्हा आपण समाजाकडून अथवा व्यक्तीकडून वागणुकीसंदर्भात काही आपेक्षा करतो जसे selfless human service त्या वेळेला त्या मागे त्या बद्दल काही गृहितके आणि त्यांचे विश्लेशण असते. ते काय आहे हे मला जाणून घेण्याची इच्छा आहे.

या ठिकाणी प्राचीन काळापासून चालू असलेला नीति-अनीति विचार हाच पुन्हा पुन्हा वेगळे तपशील वापरुन करावा लागणार असे वाटते. आणि selfless human service असे म्हणताना ते का?, कसे ? या प्रश्नांची सर्व सापेक्षपैलू लक्षात घेवून मांडणी झाली पाहिजे. जी अनेक विचारवंतानी यापूर्वी सुद्धा केली आहेच.

या लेखात आपण वापरलेले सात्विक, कर्मयोग इत्यादी शब्द त्यामागचे एका विशिष्ट सिद्धांताचे विचार घेवून येतात. ते शब्द पूर्णतः उदासिन नाहित. सात्विक म्हटले की पुन्हा ते कसे? आणि मग जे सात्विक नाही ते राजसिक, तामसी म्हणजे काय? हे आलेच. ओघाने एखाद्या वागणूकीला चांगले का म्हणावे हा विचार पुन्हा आलाच. मग त्या साठी आत्मोन्नती अथवा समाजोन्नती ही कल्पना आणि आपण म्हणू ती उन्नती कशावरुन हे समजावणे आले.

'सर्वधर्म अभाव' हा प्रकार तर माझ्या साठी पूर्ण कल्पनाविलासच ठरतो. कारण मानवाच्या मनाची रचनाच कोणतातरी प्रवाह चालू ठेवण्याची आहे. त्यामूळे सर्वधर्म अभाव हाच धर्म बनणार खास. कर्मकांड बाजूला सारले तर उरणारा सिद्धांत पातळीवरचा वैदिक धर्म आणि त्यापुढे जावून आजच्या भारतभूमीवर असणारा लवचीक, समावेशक हिंदू धर्म जो अनेक मतमतांतरांना घेवून राहतो तो सर्व जनांस उपकारक आहे असे आपणास वाटत नाही का? तोच जर कट्टरते पासून दूर केला तर कसे? मग तीच विचारपद्धती आपल्याला अपेक्षित धर्म पद्धती असेल का?

--लिखाळ

पाळामुळांच्या लोणच्याचे चाहते आणि पुराणातल्या वांग्याच्या भाजीचे वाढपी.

सर्वधर्म (सम्)अभाव

एक कल्पनाविलास म्हणून ही संकल्पना बरी आहे. बाकी, व्यवहारात पहायचे झाले तर ती अशक्य वाटते. विशेषतः ज्या धर्मांची संकल्पना आपली तत्त्वे इतरांवर ठसवल्याने आणि धर्मांतराने धर्म वाढतो अशी आहे त्यांना अशा संकल्पना फारशा रुचत नाहीत असे वाटते.

एक अनुभव जो गेले काही दिवस घेत आहे तो येथे नमूद करावासा वाटतो.

काही आठवड्यांपूर्वी दारावरची बेल वाजली आणि बाहेर एक चांगल्या पोशाखातील स्त्री दिसली म्हणून घर चुकली की काय असे वाटल्याने दार उघडले. बाहेरील बाई देवाच्या पुत्राला शरण या नाहीतर वर्जिनिया टेकमध्ये जो प्रकार झाला तो संपूर्ण जगात होईल असा प्रचार करत होती. आता दरवाजा उघडलाच आणि बाई वयाने मोठी होती म्हणून तिचे बोलणे ऐकून घेतले. यानंतर तिने एक दोन पुस्तिका हातात कोंबल्या आणि ती गेली. गेल्यावर बला टळली असे वाटले. यानंतर ही बाई आणि काहीजण दर आठवड्यातून एकदा दोनदा दारावर येतात. 'जगात एकच देव आहे आणि तो आमचा. त्याला शरण या, त्याचे नाव आपल्या तोंडाने उच्चारा' वगैरे बाष्कळ प्रचार करतात. त्यांना दरवाजा न उघडणे योग्य वाटते, तरीही एकदा दरवाजा उघडून आमच्या श्रद्धा वेगळ्या आहेत. तुमच्या धर्माचाही आम्ही आदर करतो परंतु त्यात सामील व्हायचे नाही इ. सांगून झाले तरी या माणसांवर ढीम्म परिणाम नाही. गेल्या आठवड्यात आल्या होत्या, आताही येतील. यावेळेस पुन्हा आलात तर ९११ डायल करावा लागेल अशी धमकी देण्यापर्यंत परिस्थिती आली आहे. (एकदा आल्या तेव्हा दाराबाहेर सिमेंटचे स्लॅब बदलले होते त्यात आपल्या पायांचे ठसे उमटवून गेल्या. आता झक्कत त्या ठशांना नमस्कार करून घरात यावे लागते.)

विश्वमान्य धर्म ही कल्पनाही केवळ कल्पनाविलासापुरती असावी असे वाटते. याला एक उदाहरण म्हणून बादशहा अकबराने स्थापन केलेला दिन-ए-इलाही हा धर्म. त्याचे पुढे काय झाले हे सर्वश्रुत आहे. स्वतः सम्राटाने स्थापन केलेला धर्म त्याच्या आपल्या आप्तस्वकियांना मान्य नव्हता. राजा मानसिंगसारख्या अकबराच्या मर्जीतील माणसानेही 'यापेक्षा मी इस्लाम स्वीकारेन कारण नव्याने स्थापन झालेल्या या धर्माबद्द्ल कोणतीही आपुलकी नाही.' अशातर्‍हेचे उद्गार काढले होते. (नक्की शब्द आठवत नाहीत. आशय बहुधा असाच असावा. चू. भू. दे. घे.)

तेव्हा विश्वमान्य धर्म/ सर्वधर्म समभाव/ अभाव इ. करण्यापेक्षा आपापले धर्म ही आपली खाजगी बाब आहे आणि इतरांच्या धर्मात नाक न खुपसणे इतके पाळले तरी खूप वाटते.

हो असंच!

असाच एक किस्सा,
माझ्या एका मित्राने असल्याच चर्चवाल्यांशी इतकी मोठी चर्चा केली आणी त्याला पटवले की जेवढा मोठा (पुर्व जन्म आणी कर्माचा सिध्दांत वगैरे) वैश्विक विचार हिंदु धर्मात केला आहे, तेव्हढा नवीन धर्मांत नाही. तो 'चर्ची' शेवटी याचे विचार मान्य करून परत गेला!
पण दुसर्‍याच दिवशी त्याच्या बॉस (?) सकट चर्चा करायला हजर झाला!
मग माझा मित्र भडकला आणी त्याने सांगितले की, तो हिंदु मिशनरी आहे. आणी त्या 'चर्चीं 'ना जर धर्मांतर करायचे असेल तरच; त्यांनी याच्या अटी मान्य करुन मगच चर्चेला यावे. असे म्हणून त्याला त्यांना अक्षरश: हाकलून द्यावे लागले.
याच प्रकारे मी पण असे २-३ जण हाकून लावले आहेत ;) एकाला तर मी मराठी मध्ये बोलायला सुरवात केल्याने पर्यायच राहिला नव्हता.

आवांतर: मराठी मध्ये बोलणे हा (दुष्ट?) प्रकार मी तिकिटचेकर बरोबर पण केलाय, (योग्य ते तिकिट असतांना) करुन पहा खुप मजा येते! ( आपल्याला :) )
-निनाद

सर्व धर्म स्विकार.

चांगला विषय आहे. सर्व धर्म अभावापेक्षा,सर्व धर्म स्विकारणारा,असा एक धर्म असला तर, उदा.हिंदूधर्म यात सर्व धर्माची बांधणी करायची व कोणते तरी कॉमन विचार निवडायचे आणि तो सर्वांनी धर्म आचरण म्हणून पाळला तर असे अशक्य नाही .पण कोणती ही चांगली गोष्ट करायची म्हटली तर ते शक्य नाही असे वाटते,नंतर मात्र ते यशस्वी होते. आता पूर्वी अनेक जाती-पोट जाती होत्या आता त्या हळू-हळू कमी होत आहेत,एकमेकांशी रोटी-बेटी व्यव्हार नव्हते.आता मात्र होते आहे.आणि काय सांगावं आणखी काही एक शंभर किंवा अधिक वर्षात धर्म नष्ट होतील.आणि एकच धर्म असेल तो म्हणजे विश्वाला मान्य असलेला धर्म. विश्वमान्य धर्माची संकल्पना कशी असेल,आता सांगणे जरा धाडसाचे होईल. मात्र विचार करायला हरकत नाही.

वेल्स-रसेल आणि सारांश.

वेल्स यांच्याच first and last things नावाचे पूस्तक धर्माच्या दोन संभाव्यतेवर प्रकाश पाडते."विश्वशांतीसाठी अशा धर्माची आवश्यकता आहे की,जी व्यक्ती व समाज म्हणजेच जगावर आंतरिक व बाह्य विचारांवर अंकूश ठेवू शकेल."व्यक्ती व समाज या दोघांचा ज्याने विचार केला असेल तर तोच धर्म जीवनाला उपयोगी पडु शकेल.केवळ परलोकाचा विचार करणारे काही धर्म आहेत,केवळ इहलोकाचा विचार करणारे काही धर्म आहे,काही इह-परलोकाचा विचार करणारे आहेत पण आपणाला आज इहपरलोकाचा विचार करून सामाजिक स्थिरता आणणारा व व्यक्तीचा वयक्तिक विकास करणारा धर्म हवा आहे.
ब.रसेल यांनीही Social Reconstruction नामक पुस्तकात जगातील धर्माचे विवेचन करून त्याचे वर्गीकरण केलेले आहे.तो त्या विवेचनातून सांगतो: Religion is partly personal and partly social, to the Protestant it is primarily plersonal, to the Catholicit is primarily social.त्याला प्रोटेस्टंट धर्म देखील primarily personal वाटतो.या सर्व विवेचनानंतर तो अशा निर्णयावर येतो की,"It is only when the two elements are intimmately biended :that religion becomes a powerful force in moulding society."म्हणजे हा एक नवा धर्म असला पाहिजे .जो जगाच्या उलट्या-सूलट्या प्रवाहात उभा राहू शकेल व जगाला-व्यक्तीला समाजाला खरा रस्ता दाखवू शकेल.
सारांश,जगाला कोणत्याही प्रकारची संप्रदायिकता,संकूचितता वा पक्षबाजी यांच्यापासून दूर अशा धर्माची गरज आहे.कोणती एक वस्तू वा व्यक्ती यांचा आग्रहरहित धर्मच व्यक्तीचे व समाजाचे जीवन उन्नत करू शकतो.इहलोकात व परलोकात मानवाला सुख,शांती व समाधान देऊ शकतो आणि असाच धर्म विश्वधर्म शकतो
.असा कोणता धर्म बनू शकतो हा आमच्या अभ्यासाचा विषय आहे.कधी तरी त्याच्यावरही बोलू .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशक्य कल्पना

सगळयांचा एकच धर्म ही कल्पना अशक्य वाटते. धर्म म्हणजे काय, माणसाला पटणारे, रुचणारे आचार विचार आणि श्रध्दास्थान. हे अर्थात सगळ्यांचे वेगवेगळेच असणार. त्यातच 'धर्म' या शब्दाला अर्थ आहे, नाहीतर तो एकतर निधर्म (कुठलाच धर्म नाही ) किंवा अधर्म (लादलेला धर्म) होईल.
शिवाय लहानपणापासून जे संस्कार होतात ते विसरणं कसं शक्य आहे? हे तुम्ही गणपतीच्या देवळात न जाता फक्त चर्च मध्येच जावे, किंवा संध्याकाळी शुभंकरोति न म्हणता मशिदीत बांग द्यावी असे म्हणण्यासारखे आहे.
हजारो वर्षांच्या इतिहासात अनेक धर्म जन्मले असतील आणि लयाला गेले असतील, हे असेच पुढे चालू राहणार. पण धर्मापेक्षाही महत्वाचं आहे माणसाचं सुसंस्कृत असणं ते कोणत्याही धर्मात शक्य आहे.

धर्म शाश्वत असुच शकत नाही

मेघदूत यांचे म्हणणे पटले. सर्वमान्य, चिरातन टिकणारा धर्म असुच शकणार नाही. धर्म ही कल्पना सापेक्ष आहे. त्याचे अक्ष बरेच आहेत. त्यापैकी महत्वाचे तीन

  1. समाज-समूह-राष्ट्र वगैरे
  2. काळ
  3. स्थळ-वातावरण वगैरे

या मधील एक जरी बदलला तर नियम बदलावे लागतात. उदाहरणार्थ सतीची प्रथा पूर्वी भारतात होती. त्या काळी स्त्री रक्षणाकरता योग्य होती. कालांतराने रक्षणाचे नवीन उपाय उपलब्ध झाले व ती प्रथा कालबाह्य झाली. अरबस्तानात रक्षणाकरता पुरुषाला ४ बायका करण्याची धर्माने परवानगी दिली. कारण युद्धात पुरुष मरत असत व स्त्रीयांचे प्रमाण पुरुषापेक्षा चौपट असावे. याचा अर्थ ही प्रथा जगभर सुरु करावी किंवा जगभराकरता योग्य आहे असे होऊच शकत नाही. फार झाले तर प्रत्येक राष्ट्राकरत एक धर्म होऊ शकतो. आणी हे अस्तित्त्वात आहे. देशाची घटना कायदे हाच त्या देशाचा धर्म. तरी पण तो शाश्वत होऊ शकत नाही. बंधुत्त्व हे धर्माचे मूळ तत्त्व आहे. ते शाश्वत आहे परंतु नियम कधीच शाश्वत नसतात. ते बदलावेच् लागतात.

 
^ वर