कल्ट्स आणी ब्रेनवॉशिंग

कल्ट या शब्दाला योग्य मराठी प्रतिशब्द मिळाला नाही म्हणून इंग्रजीच शब्द वापरत आहे. कल्टची एका वाक्यात व्याख्या करणे कठीण आहे. एखाद्या प्रभावी (charismatic) व्यक्ती भोवती जमलेला व्यक्तीपूजक समुदाय अशी याची अगदी ढोबळ व्याख्या करता येईल. ती व्यक्ती जिवंत असलीच पाहिजे असे नाही. कल्टचे आणखी एक लक्षण म्हणजे आपल्या निवडक अनुयायांकडून वेळ आणी पैसा यांची मोठ्या कमिटमेंटची मागणी करणे. बरेचसे कल्टस आपल्या काही अनुयायांना सारा वेळ आणी संपत्ती दान करण्यास उद्युक्त करतात. ब्रेन वॉशिंग हे त्यांचे अजून एक लक्षण असते. दुर्दैवाने ब्रेन वॉशिंग झालेला माणूस आपले ब्रेन वॉशिंग झालेले आहे हेच मुळी कबूल करायला तयार होत नाही. कल्ट डीप्रोग्रॅमिन्ग वर ही बरेच साहित्य आहे पण ते सारे इंग्रजीत आहे. युनिफिकेशन चर्च, सायंटॉलॉजी, इस्कॉन यातून बाहेर पडलेल्या लोकांनी आपल्या अनुभवावर आधारीत पुस्तकेही लिहिली आहेत. एरवी चारचौघांसारखेच असणारे लोक अशा प्रकारच्या विचित्र कल्ट मध्ये कसे ओढले जातात हे पहाणे उद्बोधक आहे. शिवाय अमेरिकेतील आणी भारतातील कल्ट्सच्या कार्यपद्धतीमध्ये बरेच साम्य आहे.

कल्ट ची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील. अर्थात सर्वच लक्षणे सर्वच कल्ट मध्ये असतात असे नाही.

१ Bait And Switch : अमेरिकेत पूर्वी दुकानामध्ये खरेदी करताना एखादा भारतीय माणूस कारण नसताना ओळख देऊन चहाला घरी बोलवीत असे. तेथे गेल्यावर मात्र हा अ‍ॅम्वे सारखा प्रकार आहे हे ध्यानात येत असे. भारतात सनातन सारख्या संघटना ध्यान करण्याने एकाग्रता वाढून अभ्यासाला मदत होते असे सांगून तरुणांना आकर्षीत करतात आणी मग हळूच त्यंचे ब्रेन वॉशिंग सुरू करतात. सायंटॉलॉजी वाले "मोफत स्ट्रेस टेस्ट" चे स्टॉल लावतात आणी त्याद्वारे नवे बकरे शोधतात.

२ नव्या अनुयायांना घरादारापासून तोडणे: एकदा एखादा नवा अनुयायी बकरा म्हणून ठरला की हळूहळू त्याला घरादारापासून तोडण्यात येते. तुझे आई बाबा भाऊ बहिण हे सारे तुझ्या अध्यात्मिक प्रगतीच्या आड येणारे धोंडे आहेत हे त्याच्या मनावर ठसवले जाते. त्याला घरापासून दूर असलेल्या आश्रमात ठेवले जाते ( उदा आसाराम बापू,सनातन). असे केल्याने त्याला घरापासून दूर ठेवता येतेच, पण फुकट राबवून ही घेता येते. त्याच्या घरची माणसे भेटायला आली तरीही त्या अनुयायाला एकटे भेटू दिले जात नाही. सिनियर माणसे अवती भवती घुटमळत असतातच. हे ब्रेन वॉशिंग इतके प्रभावी असते की त्याची सुटका कारायला आलेले आईवडील त्याला शत्रूच वाटतात.

३ 'ते' आणी 'आपण' अशी विभागणी करणे : त्यासाठी विशिष्ट कपडे घालणे ( उदा ब्रम्हकुमारी फक्त पांढरे कपडे घालतात) एकमेकांना नमस्कार करताना राम राम ऐवजी वेगळेच संबोधन वापरणे, अनुयायांनी शक्यतो फक्त अनुयायांशीच सामाजिक संबंध ठेवण्याचा आग्रह करणे. काही कल्ट्स तर अनुयायांचीच एकमेकात लग्ने लावून देतात. (उदा सहज योगी, मूनीज) काही इतर लग्न न करायला प्रोत्साहन देतात.

४ एकदा जगबुडी झाली की आपणच तरणार असा विश्वास निर्माण करणे: ब्रम्हकुमारी असे मानतात की जगबुडी झाली आणी नवे राज्य आले की ब्रम्हकुमारी लोक मालक होणार आणी बाकी सारे नोकर. इतरही बर्‍याच कल्ट मध्ये हे आढळते.

५ कल्ट ची हास्यास्पद गृहितके केवळ कमिटेड सदस्यांनाच सांगणे: सायंटॉलॉजी ची झेनु (xenu) ची कथा वाचली तर नवा माणूस तिकडे फिरकणार ही नाही. म्हणून एकदा माणूस ब्रेन वॉशिंग ने एका विशिष्ट पातळीवर आला की मगच ती सांगितली जाते. तोवर त्याची सारासार विचार करायची शक्ती संपलेली असते.

६ इतर अनुयायांच्या कमिटमेंट च्या तुलनेत तू किती कमी पडतोस हे दाखवून त्याचा वारंवार तेजोभंग करणे. त्यायोगे त्याचे व्यक्तीमत्व ढासळून जाते आणी त्याला नियंत्रीत करणे सोपे जाते. जास्त कमिटमेंट दाखविणार्‍या निवडक अनुयायांचा सन्मान करून एक प्रकारची स्पर्धा निर्माण करणे. नव्या अनुयायाला सकाळी लवकर उठून प्रार्थना करण्यापासून रात्री झोपेपर्यंत व्यस्त ठेवणे. त्यायोगे त्याची क्रिटिकल थिन्किंग ची शक्ती कमी होते.

७ हिप्नॉटिझम चा बेजबाबदार उपयोग करणे.

८ आपला नेता देवाचा अवतार आहे हे अनुयायांवर बिंबविणे. हे कधी अगदी उघडपणे तर कधी सूक्ष्म पणे केले जाते. त्यासाठी कपोलकल्पित कथा खपविण्यात येतात.

९ आपल्या नेत्याबद्दल कोणतीही टीका किंवा शंका सहन न करणे. नेत्यावर झालेले आर्थिक घोळाचे आरोप हे एका मोठ्या कटाचा भाग आहे असे समजणे. टीव्ही, मासिके वाचण्यापासून आपल्या अनुयायांना परावृत्त करणे. आपल्याच नेत्याचे गुणगान करणारी मासिके सुरु करणे.

१० नव्या अनुयायाला आपली गुपिते सांगायला भाग पाडणे : आपल्या पैकी कुणीही परफेक्ट नसतो. प्रत्येकाची काही गुपिते असतात, मग पूर्वी घडलेली एखादी घटना असेल, एखादा वैचारिक चाळा असेल, किंवा आणखी काही. बरेचदा नव्या अनुयायाला इनिशिएशन च्या नावाखाली अशी गुपिते आपल्या मेंटर कडे कबूल करायला उद्युक्त केले जाते.

११ जुन्या अनुयायांचा वापर नवे बकरे मिळविण्यासाठी करणे. ही कला आर्ट ऑफ लिव्हिंग च्या लोकांना फारच छान जमली आहे.

१२ सुप्रसिद्ध अनुयायी असतील तर त्यांचा मार्केटिंग सारखा उपयोग करणे. सुनील गावसकर सत्य साईबाबांचे भक्त आहेत, महर्षी महेश योगी बीटल्स चे गुरु होते, परमहंस योगानंदांनी गांधीजींना क्रियायोग शिकविला वगैरे. अमेरिकेत सायंटॉलॉजी-टॉम क्रूझ कब्बाला-मॅडोना ई ई.

१३ एखादी अगदीच साधी क्रिया घेऊन तीवर मार्केटिंगचा शेंदूर थापून काहीतरी नवीन पॉवरफुल शोध असल्याचे सोंग करणे. त्याला दोन तीन अक्षरी इन्ग्रजी शॉर्टफॉर्म देता आला तर फारच छान. त्यावर कॉपीराइट/ट्रेडमार्क घेणे. ही आयडिया आर्ट ऑफ लिव्हिन्ग वाल्यांनी महेश योगींकडून उचलली.

कल्ट्स मध्ये एखादा माणूस जितका जास्त दिवस रहातो तितकेच त्याचे परत येणे कष्टप्रद होत जाते. कल्ट्स मधून बाहेर पडलेल्या माणसाला त्या कल्ट च्या सदस्यांच्या रोषाला आणी जुन्या परिचितांच्या शेरेबाजीला सामोरे जावे लागते. अमेरिकेत इंटरवेन्शन नावाचा प्रकार उपलब्ध आहे ज्यात त्या अनुयायाचे नातेवाईक/हितचिन्तक एका अनुभवी आणी व्यवसायीक तज्ञाच्या मदतीने त्या अनुयायाचे अपहरणच करतात. काही दिवस त्याला वेगळ्या वातावरणात ठेवताच बहुतेकदा त्याला आपला वेडेपणा समजून येतो. रिक रॉस या माणसाने यावर मोठे काम केले आहे ( पहा रिकरॉसडॉटकॉम). त्या कामासाठी त्याला बर्‍याच खटल्यांनाही तोंड द्यावे लागले आहे
अमेरिकेतील काही कल्ट्स

सायंटॉलॉजी : बाकीच्या कल्ट्स ना खर्चाच्या दृष्टीने होंडा/टोयोटा ची उपमा दिली तर हा म्हणजे थेट मर्सिडिझ आहे. एल रॉन हब्बार्ड या सुमार दर्जाच्या विज्ञान कथा लिहिणार्‍या माणसाने हा सुरु केला. थोड्याच वेळात भरपूर पैसा मिळवायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपला कल्ट सुरु करणे असे त्याने स्वतःच लिहून ठेवले आहे. इथल्या लेव्हल वन च्या कोर्स ची फी आहे फक्त तेरा हजार डॉलर्स. अशा सात लेव्हल्स पार केल्या की मग एका गुप्त खोलीत नेऊन आपल्या हातात एक सीलबंद लिफाफा ठेवला जातो. त्या लिफाफ्यात झेनु (xenu) ची कथा असते. ती कथा इतर कुणाला संगितली तर ती ऐकणारा न्युमोनियाने मरेल अशी तंबीही दिली जाते. चार पाच हजार डॉलर्स ना विकत मिळणारे त्यांचे ई मीटर ( आपला wheatstone bridge हो!) हाही असाच एक नमुना. बाकी सतत या ना त्या कोर्स ची जाहिरात करून अनुयायांकडून वारंवार पैसे उकळणे इथेही आहेच. टॉम क्रुझ, जॉन ट्रव्होल्टा वगैरे सेलेब्रिटीज सदस्य असल्याने यांना तशी फुकट प्रसिद्धी बरीच मिळते. आपल्या विरोधकांना काहीही करून प्रचंड मानसिक त्रास देणे हे यांचे अजून एक वैशिष्ट्य. अमेरिकेसारख्या देशात कोर्टबाजी फार महाग असते. एखाद्याने आपल्यावर अगदी मानहानीचा क्षुल्लक खटला भरला तरीही वकीलीच्या फीने आपले दिवाळे निघते. आयुष्यातली काही वर्षे वाया जातात आणी मनस्ताप होतो तो वेगळाच. नेमका याचाच फायदा घेऊन आपल्या विरोधकांना या ना त्या खटल्यात अडकवून ठेवले जाते. अमेरिकेत कल्ट अवेअर्नेस नेटवर्क नावाची एक संस्था होती. कल्ट मध्ये सापडलेल्या मुलांच्या नातेवाईकांसाठी एक हेल्प लाईन असे तिचे स्वरूप होते. एक मोठा खटला हरल्याने त्या संस्थेचे दिवाळे निघाले. त्यानंतर सायंटॉलॉजीने ते डोमेन नेम खरेदी केले. आजकाल तिथे कुणी गेले तर सायंटॉलॉजी चे लोक असतात. हे म्हणजे पुण्यातल्या मुक्तांगण च्या जागेवर देशी दारूचे दुकान उघडण्यासारखे झाले. या कल्टवर बर्‍याच देशांत बंदी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेत ठिकठिकाणी मोफत स्ट्रेस टेस्ट चे स्टॉल लावून बकरे हुडकणे हे यांचे एक वैशिष्ट्य. हा भारतात प्रवेश करायला उत्सुक आहे (घरचे झाले थोडे ...)

कबाला : सेलिब्रीटीज चा उपयोग करून आपले जाळे विणणारा आणखी एक कल्ट. सुप्रसिद्ध पॉप गायिका मॅडोना ही याची सदस्य आहे. प्राचीन हेब्रु ग्रंथातील मजकूरावरून नुसता हात फिरविला ( ब्रेल सारखा) तर तो वाचण्याचे पुण्य लागते अशा तद्दन हास्यास्पद तत्वावर हा आधारलेला आहे. के मार्ट मध्ये जेमतेम एक डॉलर ला मिळणारे सुती ब्रेसलेट मंत्र घालून तीनशे डॉलर्स ना विकण्याचे कसब यांचेच. इथले नेते फडतूस पुस्तकांचा रतीब घालतात आणी ती महागडी पुस्तके विकत घ्यायला अनुयायांना प्रवृत्त करतात.

युनिफिकेशन चर्च ( अमेरिकेत यांना मूनीज म्हणतात) : या ग्रूप मध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तीन दिवस रहाण्याची संधी मला योगायोगाने मिळाली. श्री मून आणी त्यांची (दुसरी) पत्नी हा देवाचा अवतार आहेत आणी तेच आपले खरे माता पिता आहेत अशी या सदस्यांची धारणा असते. एकाच वेळी हजारो अनुयायांची लग्ने लावून देण्यासाठी हा प्रसिद्ध आहे. याचे बहुतेक सदस्य कोरियन आहेत ( niche marketing चे उदाहरण). 'वन वर्ल्ड फॅमिली' ही यांची कॅचलाईन हल्ली आर्ट ऑफ लिव्हिंग ने उचलली आहे. या कल्ट मधून बाहेर पडलेल्यांनी लिहिलेली पुस्तके वाचली तर घरो घरी मातीच्या चुली प्रमाणे देशो देशीच्या कल्ट्स ची कार्यपद्धती सारखीच असते हे लक्षात येते.

लँडमार्क एजुकेशन: ( पुर्वीचा est ). Werner Erhardt याने सुरु केलेल्या या सेमिनार्स्/वर्कशॉप नी प्रथम मोठ्या प्रमाणावर LGAT( Large Group Awareness Training) ची सुरुवात केली असे म्हणता येइल. ई एस टी हे नाव फारच बदनाम झाल्यामुळे लँडमार्क या नावाने हा उद्योग चालतो. त्याच्या बर्‍याच नकला ह्युमन पोटेन्शियल सेमिनार च्या नावाखाली खपतात. उदा the work, the secret, NXVIM, LifeSpring etc etc. एखाद्या व्यक्तीचे जुने व्यक्तिमत्व पूर्णपणे नष्ट करण्याचा अव्यापारेषु व्यापार असेही याचे वर्णन करता येइल. यांचे सेमिनार सलग तीन तीन दिवस एखाद्या हॉटेलच्या हॉल मध्ये चालतात. सकाळपासून सायंकाळपर्यंत तीच तीच भाषणे ऐकून मती गुंग होते. आणी मग team building excercises च्या नावाखाली mind control सुरु होते. इथले काही मटेरिअल आर्ट ऑफ लिविंग च्या DSN आणी TTC कोर्सेस मध्ये वापरले जाते ( अर्थात तिथे मुळात ओरिजिनल काय आहे हा प्रश्नच आहे म्हणा.). इतर बर्‍याच कल्ट्स नी माईंड कंट्रोल साठी यांच्या आयडिया वापरल्या आहेत. बरेच कल्ट धार्मिक प्रतिमा (motifs) वापरत असले तरीही काही अपवादही आहेत. इतर कल्ट्स ना सुगम संगिताची उपमा दिली तर LGAT हे शास्त्रीय संगीत आहेत.

फालून : एका चिनि व्यवसायिकाने सुरु केलेला कल्ट. चीन मध्ये आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येते हा त्यांचा कांगावा बहुतेक लोकांना खरा वाटतो. अमेरिकेत बेकायदेशीर पणे वास्तव्य करून असलेले बरेच चिनी लोक यात आहेत. धार्मिक छळवादाच्या निमित्ताने आपल्याला राजकिय निर्वासीत वर्गातून ग्रीन कार्ड मिळेल ही चतुर आशा.

Dahn Yoga एका कोरियन माणसाने सुरु केलेला कल्ट. वास्तवीक याचे आधीचे नाव dahn hak असे होते. पण अमेरिकेत प्रवेश करताना केवळ मार्केटिंग साठी नावापुढे योगा लावले गेले. याचे संस्थापक स्वतःला Perfect Master समजतात.

जिम जोन्स : कल्ट मधले ब्रेन वॉशिंग किती परिणामकारक असते याचे भयंकर उदाहरण. त्याच्या आदेशावरून सुमारे एक हजार अनुयायांनी वीष पिऊन आत्महत्या केली. त्यातल्या आईवडिलांनी आधी आपल्या मुलांना वीष दिले. तो प्रसंग jonestown massacre म्हणून प्रसिद्ध आहे.

MLM : अ‍ॅमवे, हर्बालाईफ, क्विक्स्टार वगैरे मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपन्यांनाही काही मानसशास्त्रज्ञ कल्टच म्हणतात आणी त्यात तथ्यही आहे.

ख्रिश्चन कल्ट्स

"कॅम्पस क्रुसेड फॉर ख्राईस्ट"मुख्यत्वे कॉलेज कॅम्पस वर सक्रिय आहे. पहिल्यांदाच घराबाहेर पडलेल्या आणी नव्या वातावरणात बावरलेल्या मुलांना टार्गेट करण्यात येते.

"चिल्ड्रन ऑफ गॉड" हा सत्तर च्या दशकात फारच धुमाकूळ घालत होता. त्यांनीच आपल्या महिला अनुयायांना नवे अनुयायी शोधण्यासाठी flirting सारखी तंत्रे वापरायला उद्युक्त केले.

जेहोवाज विटनेस : बायबलच्या वेगळ्याच आकलनावर आधारीत कल्ट. यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते बायबल मधली काही भाग शब्दशः घेतात. त्यामुळे ते रक्तदानाला विरोध करतात. कित्येकदा त्या अनुयायांची मुले रक्त नाकारल्याने जीव गमावून बसतात. एखाद्या अनुयायाने रक्त घेतलेच तर त्याला बहिष्कृत केले जाते. अमेरिकेत कधी कधी शनिवारी सकाळी घरोघरी जाऊन बायबल वाटतात.

Regnum Christi : एका मेक्सिकन माणसाने १९४१ मध्ये सुरु केलेला कल्ट. शक्यतो आठरा वीस वर्षांच्या मुलींना टार्गेट केले जाते. केवळ सहा आठवड्याच्या ट्रेनिंग नंतर त्या मुली नन बनतात आणी व्हॅटिकन च्या भाषेत "voluntarily renounce the use of their capacity for decision-making". त्यानंतरचे सारे आयुष्य अत्यंत काटेकोर नियमात बांधलेले असते, अगदी संत्रे कसे खावे इथपासून. हा कल्ट पोप जॉन पॉल २ च्या आवडीचा होता. संस्थापकांविरुध्द लैंगीक शोषणाच्या तक्रारी आल्या तेव्हा व्हॅटिकन ने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. शेवटी संस्थापकाच्या निधनानंतर व्हॅटिकन ने कबूल केले कि संस्थापकाने नन्स बरोबर तीन मुलांना जन्म दिला होता. अजूनही व्हॅटिकन तर्फे 'चौकशी' चालू आहे.

१९७० : सत्तरच्या दशकात अमेरिकेत फारच सामाजिक उलथापालथ झाली होती. व्हियेतनाम युद्धात झालेला दारूण पराभव, त्या नंतर आलेल्या पेंटॅगॉन पेपर्स, आणी निक्सन यांचा राजिनामा यामुळे अमेरिकन युवक वर्गात एक नैराश्याची भावना आली होती. त्याचवेळी बीटल्स, वूडस्टॉक, फ्लॉवर चिल्ड्रन, गांजा यामुळे एक प्रकारचे anti establishment वातावरण युवक वर्गात निर्माण झाले होते. अमेरिकन युवक वर्गात पौर्वात्य तत्वज्ञानाबद्दल कुतुहलही निर्माण झाले होते. अशा वातावरणात बर्‍याच भारतीय कल्ट्सनी अमेरिकेत बस्तान बसविले. किंबहुना एखाद्या देशात जेव्हा सामाजिक अस्थिरता पसरते तेव्हा कल्ट्स ना आयतेच रान मिळते. रशिया आणी पूर्व युरोपातील देश हे आजचे उदाहरण.

१ इस्कॉन : यांचे अनुयायी क्रिष्नाज म्हणून प्रसिद्ध होते. आपला "हरे रामा ." चित्रपट आठवा. संस्थापकांच्या निधनानंतर शिष्यांमध्ये तु तु मै मै सुरु झाली. त्यातल्या दहाबारा शिष्यांनी आपल्याला संस्थापकांनी उत्तराधिकारी नेमले आहे असा दावा केला आणी जगभरात पसरलेले हे साम्राज्य झोनल गुरु च्या रुपात आपसात वाटून घेतले. हिंदु धर्मात संन्यास हा अतिशय विचारपूर्वक घेण्याचा निर्णय आहे. पण इथे माणूस संन्यास घ्यायला 'तयार' आहे कि नाही याचा अजिबात विचार न करता मागेल त्याला संन्यास दीक्षा दिली गेली. जणू काही जिल्हा सहकारी बँकेतली सभासदभरतीच. अमेरिकेत काही खूनही पडले. संस्थेतर्फे चालवल्या जाणार्‍या होस्टेल्स मध्ये लहान मुलांवर अत्याचार झाल्याने बरीच मोठी नुकसान भरपाई द्यावी लागल्याने दिवाळे निघाले. आजकाल थोडेसे पुनरुज्जीवन करण्याचे चालले आहे पण आता अमेरिकन लोकांत फारच बदनामी झाल्याने Indian Diaspora आणी पूर्व युरोप कडे जास्त लक्ष आहे. आपल्या संस्थेत लहान मुलांवर अत्याचार होत आहेत हे लक्षात येऊनही प्रतिष्ठेच्या काळजीने हे सारे कव्हर अप करायची प्रवृती कॅथॉलिक चर्च सारखीच आहे.

२ प्रेम रावत उर्फ महाराजी : एखादा कल्ट सुरु करण्यासठी जबरदस्त पर्सनॅलिटी असणे आवश्यक नाही हे यांनी सिद्ध केले असे म्हणयला हरकत नाही. एकेकाळी हे (आपल्या स्वतःच्या ) विमानातून खाली उतरताच त्यांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी अमेरिकन भक्तांची झुंबड उडत असे. यांच्या अनुयायांना प्रेमीज म्हणत. आपल्या वक्तृत्वकलेमुळे अत्यंत लहान वयात ते फारच प्रसिद्ध झाले होते. पण आपल्या आईच्या इच्छेविरुद्ध त्यांनी एका अभारतीय शिष्येशी विवाह केल्यामुळे आईने त्यांच्याशी संबंध तोडला. तेव्हापासून त्यांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हेच खरे. एकेकाळच्या सुपरस्टार नटीने उदरनिर्वाहासाठी केकता सिरियल्स मध्ये सासूच्या भूमिका कराव्यात तसे आजकाल भाषणे देतात, पण वो मजा नही.

३ स्वामी सच्चिदानंद (Yogaville) : वूडस्टॉक या अतिशय गाजलेल्या संगीत महोत्सवात opening speaker असल्याने ते अतिशय प्रसिद्ध झाले. व्हर्जिनिया मध्ये yogaville नावाचा आश्रमही स्थापन केला. १९९० च्या सुमारास काही महिला शिष्यांनी लैंगीक शोषणाचे आरोप केल्याने उठलेल्या वादळामुळे पसारा कमी झाला. Integral Yoga Institute च्या नावाखाली काही ठिकाणी योगा शिकवण्याची केंद्रे आहेत पण ती कल्ट साठी बकरे शोधण्यासाठीच वापरली जातात. लॉ स्कूल मध्ये शिकणारी जेमतेम पंचविशीची एक मुलगी एक महिन्याचा योगाचा रेसिडेन्शियल कोर्स करायला जाते काय आणी पंधरा दिवसातच एका पन्नाशीच्या XYZआनंद स्वामींशी लग्न करते काय, सगळेच विचित्र.

४ SYDA
मुंबईजवळ गणेशपुरी इथल्या नित्यानंद महाराजांचे कथित शिष्य मुक्तानंद यांनी स्थापन केलेला कल्ट. आपले वारसदार म्हणून यांनी नेमलेल्या दोन व्यक्तींमध्ये ( जे सख्खे भाऊ बहीण होते ) मुक्तानंदांच्या निधनानंतर सत्तासंघर्ष सुरु झाला. अगदी दे दणादण मारामारी. त्या रोमांचक कथेवर एक झी टीव्ही सिरियल बनू शकेल. शेवटी बहिणीचा विजय झाला आणी अमेरिकेत सिद्ध योगा या नावाखाली हा कल्ट सुरु राहिला. इतर कल्ट्स अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स च्या नावाखाली फी उकळतात त्याला इथे intensive म्हणले जाते. श्री मुक्तानंद आपल्या भाषणातून कडक ब्रम्हचर्याचे महत्व सांगत. पुढे काय झाले हे चाणाक्ष वाचकांना ई ई.

५ महर्षी महेश योगी बीटल्स बरोबर फोटो कढल्याने रातोरात बीटल्स चे गुरु म्हणून प्रसिद्ध झाले. आपल्या Transcendental Meditation च्या प्रसारासाठी pseudoscience चा आधार घेणे हे एक वैशिष्ट्य.

या सर्व कल्ट्स मधला एक समान धागा म्हणजे 'गुरु' किंवा Master या संकल्पनेचा बेसुमार गैरवापर. सुरुवातीच्या पातळ्यांवर गुरुशिवाय तरणोपाय नाही, गुरुला अनन्यभावाने शरण गेल्या शिवाय enlightenment नाही, गुरु जे करतील वा सांगतील ते आपल्या भल्याचेच आहे, मग विरोधाभास दिसला तरीही तो आपल्या कच्चेपणाचा परिणाम आहे असे ठसविले गेल्याने नंतर गुरुने अक्षरशः काहीही केले तरीही त्याचे समर्थन आणी internalization केले जाते. गुरुने असभ्य वर्तन केले तरीही त्यात काहितरी आपल्या आकलनापलिकडली तांत्रिक साधना असेल अशी मनाची समजूत घातली जाते. शिष्यांकडून अत्यंत साध्या रहाणीची अपेक्षा करणारे गुरु (आणी त्यांचे नातेवाईक) महागडे दागिने, पर्स, साड्या वापरतात तेव्हा 'गुरुलीला' म्हणले जाते. थोडेबहुत stockholm syndrom शी ही साम्य आहे. या 'गुरु म्हणजेच सर्वकाही' या ब्रेन वॉशिंगचा विशेषतः लहान मुलांवर इतका परिणाम होतो की गुरुने काही चुकीचे केलेच तर ती मुले तो प्रसंग आपल्या मेमरीतूनही काढून टाकतात.

दुसरा एक समान धागा म्हणजे इगो चा विनाकारण बाऊ. चोवीस कॅरेट च्या सोन्यात जसे दागिने बनवायला थोडे इतर धातू लागतातच तसाच थोडासा इगो माणसाला असावाच. इगो वर मात करणे ही चांगली गोष्ट असली तरीही ते एकमात्र ध्येय असू शकत नाही. आपल्या इगो वर मात करून तो एखाद्या फडतूस गुरुच्या चरणी अर्पण करण्यापेक्षा तो इगो चांगल्या कामासाठी वापरणे बरे. इगो चे तुणतुणे वाजविणार्‍या गुरुला यंत्रमानवासारखे अनुयायी हवे असतात. इगो स्ट्रिपिंग च्या नावाखाली जे उपद्व्याप चालतात त्यांचा हेतू हाच असतो.

अमेरिकेत योगा शिकायचे असेल तर एखाद्या अमेरिकन व्यक्तीने एखाद्या शॉपिंग सेंटर मध्ये चालवलेल्या शुद्ध अमेरिकन योगा स्टुडिओ मध्ये नाव नोंदणे हेच सुरक्षित आहे. तिथे योग्य ती फी आकारून फक्त योगाच शिकविले जाते. सत्संग, अ‍ॅडव्हान्स कोर्स, गुरुपूजा वगैरे नावाखाली गुरफटून टाकले जात नाही.

भारतातील काही कल्टस

रजनीश : विलक्षण बुद्धीमत्ता, इंग्रजी व हिंदी भाषेवरचे प्रभुत्व, ओघवती वाणी आणी चौफेर वाचन असे अनेक गुण त्यांच्यात होते. त्यांनी लिहिलेली गीता, कबीर, मीरा, रैदास, झेन, जैन आणी बुद्ध तत्वज्ञान अशा अनेक विषयावरची पुस्तके सुंदर आहेत. मुल्ला नसिरुद्दीनच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगून आपले म्हणणे सांगण्याची त्यांची कलाही छान होती. संघटीत धर्माविरुद्ध परखडपणे बोलून आपले करीयर सुरु करणार्‍या या माणसाने नंतर आपलाच एक धर्म सुरु केला आणी लोकांना संन्यास (neo sanyas) द्यायला सुरुवात केली. आणी मग रजनीश, आचार्य रजनीश, भगवान रजनीश, ओशो, असा प्रवास सुरु झाला. एखादे भक्तीगीत ऐकताना किंवा देवाचे सुंदर चित्र पहाताना त्या गायकाच्या वा कलाकाराच्या व्यक्तीगत चरित्राचा आपण विचार करत नाही तसेच यांनी सुरुवातीच्या काळात लिहिलेली पुस्तके वाचायला हरकत नाही. पैसे देऊन विकत घेण्यासारखी पुस्तके लिहिणारे या यादीतले कदाचित एकमेव.

सत्य साईबाबा : आपण शिर्डी साईबाबांचे अवतार आहोत असा दावा करणार्‍या अनेक बुबांपैकी एक. वास्तवीक त्यांच्या हवेतून अंगठी काढण्याच्या फडतूस चमत्कारावर दहावी पास झालेली डोळस व्यक्तीही विश्वास ठेवणार नाही. पण ए पी जे अब्दुल कलाम, मनमोहन सिंग सारखे लोकही त्यांच्या वाढदिवसाला (सरकारी खर्चाने) हजेरी लावतात. यावरून उच्च शिक्षण आणी विवेकवादी दृष्टीकोण यांच संबंध नाही हे सिद्ध होते. आय आय टीत शिकलेले लोकही अमक्या तमक्या गुरुचे शिष्य आहेत असे सांगितले जाते तेव्हा इम्प्रेस व्हायचे कारण नाही ते याचसाठी.

ब्रम्हकुमारी: जगबुडी वर आधारीत एक कल्ट. यांना इंग्रजीत Millennial Cults असे म्हणतात. २०३६ मध्ये जगबुडी होणार आणी भारत वगळता इतर सर्व देश पाण्याखाली जाणार अशी त्यांची निष्ठा आहे. ( ही तारीख आधी १९४४ मग १९७० मग २००० मग २०३६ अशी बदलत असते) एकदा का जगबुडी झाली की मग फक्त ९ लाख ब्रम्हकुमारी शिल्लक रहाणार आणी नंदनवन येणार. नव्या नंदनवनात ब्रम्हकुमारी चे नेतेच राजे होणार वगैरे वगैरे. घराणेशाही इथेही आहेच. त्यामुळे संघटनेच्या नाड्या अजूनही संस्थापकांच्या कुटुंबियांच्याच हातात आहेत. शिवाय राष्टपती, पंतप्रधान अशा व्ही आय पी ना आपल्या समारंभात बोलवून आपली लेजिटिमसी वाढविण्याची युक्तीही आहे. अणखी एक क्लुप्ती म्हणजे वयोवृद्ध धनाढ्य व्यक्तींना जगबुडीचा बागुलबुवा दाखवून आपली संपत्ती अणी एल आय सी पॉलिसीज कल्टच्या नावे करायला भाग पाडणे. तुम्ही जितकी संपत्ती आम्हाला दान कराल तितकेच वरचे स्थान नव्या नंदनवनात तुम्हाला मिळेल असे सांगितले जाते. आस्था चॅनेल वरच्या गोड गोड बोलण्यावर विश्वास ठेऊ नये असा अत्यंत Cunning and Manipulative कल्ट.

नित्यानंद :एका स्कॅंडल मुळे नुकतेच प्रकाशात आलेले एक स्वामी. सखाराम गटणेच्या भाषेत सांगायचे तर त्यांचे जीवनविषयक सूत्र "खोटे बोल पण रेटून बोल" असे आहे. रामकृष्ण आश्रमात जेमतेम दोन वर्षे राहिलेल्या या माणसाने स्वतःला 'परमहंस' ही पदवी घेतली. वास्तवीक त्या आश्रमात जीवनभर निरलसपणे काम केलेले स्वामीही ही पदवी घेत नाहीत. खरे तर भारत सरकारने एखादा वटहुकुम काढून एखाद्या माणसाने स्वतःला परमहंस पदवी द्यायला बंदीच घालायला हवी. या तोतया परमहंसाने मग Enlightenment चे कोर्सेसच सुरु केले. इकडून तिकडून काही मजकूर ढापून ठराविक buzz words कोंबून केलेली त्यांची दाक्षिणात्य उच्चारातील भाषणे ऐकताना ओक ट्री रोड वरच्या उडुपी हॉटेलातला वेटरच बोलतोय असा भास व्हावा. या कल्ट मध्ये एकदा का माणूस अडकला की मग अमका कोर्स तमका कोर्स च्या नावाखाली पैसे उकळणे सुरु होते. आजकाल गुरु लोकांना अमेरिकेत जाणे तितकेसे अवघड राहिलेले नाही आणी अमेरिकेत NRI Guilt + Mid Life Crisis ने त्रस्त झालेले अनेक मध्यमवयीन बकरे मिळत असल्याने बघता बघता त्यांची देवळे उभारली गेली. Culture Shock मुळे अमेरिकेत मायक्रोसॉफ्ट मध्ये काम करणारी काही मुलेमुलीही सन्यासी झाली. त्या मुलामुलींचे ब्रेन वॉशिंग इतके प्रभावी होते की त्यातल्या एकीने आपल्याच आई वडिलांविरुद्ध तक्रार केली की ते मला मनाविरुद्ध आश्रमातून नेत आहेत.
यांचे स्कँडल बाहेर आल्यावर सत्संगाची दुकाने चालविणार्‍या दुसर्‍या एकाही गुरुने त्यांच्या विरुद्ध काही शब्दही काढले नाहीत. कारण इस हमाम मे सभी नंगे है या उक्ती प्रमाणे सर्‍यांचीच काही ना काही प्रकरणे असतात.
यांचे स्कॅंडल बाहेर आले आणी ते फरारी होते तेव्हा अमेरिकास्थित एका एन आर आय हिंदुत्ववाद्याने त्यांची भेट घेऊन मुलाखत घेतली. (एन आर आय हिंदुत्ववादी हा तर एका वेगळ्याच लेखाचा विषय) ते जामिनावर सुटल्यावर विहिंप च्या अध्यक्षांनी त्यांच्या आश्रमाला भेट देऊन ते स्वच्छ असल्याचे प्रशस्तीपत्र दिले. हे सारे स्कँडल म्हणजे ख्रिश्चन मिशनरी लोकांचे कारस्थान आहे अशी नेहेमीची कोल्हेकुईही आहेच.

सनातन (हिंदुजागृती ) : या कल्टच्या संस्थापकांनी हिप्नॉटिझमचे शिक्षणच घेतले आहे. या कल्ट मध्ये व्यक्तीपूजा आणी अंधश्रद्धेबरोबर आक्रमक हिंदुत्वाचेही कॉकटेल आहे. आपल्या दैनिकातून प्रक्षोभक मजकूर छापून उगाच तणाव निर्माण करणे हा यांचा आवडता उद्योग. काही अतिरेकी कृत्यांच्या संदर्भात इथले काही "साधक" प्रकाशात आले होते. इंटरनेटच्या जमन्यात कल्ट्स किती झपाट्याने पसरतात याचे उदाहरण म्हणजे हा थेट सर्बिया मध्ये पोहोचला आहे. आपल्या अंधश्रद्धेला pseudoscience मध्ये गुंडाळायला subtle energy, vibrations असे शब्द वापरले जातात. या कल्टवर बंदी आणायच्या हालचाली सुरु आहेत.

निर्मला माता उर्फ सहज योग: आपण शिष्यांची कुंडलिनी (अगदी इंटरनेटवरूनही ) जागृत करू शकतो असा दावा करणार्‍या या माताजींबद्दल अनिल अवचटानी तीसेक वर्षापूर्वी लिहिलेल्या पुस्तकात एक प्रकरण टाकले होते. "आमचे कडे घरगुती लोणची, रुखवताचे सामान आणी कुंडलिनी जागृत करून मिळेल" अशी पाटी डोळ्यासमोर यावी. आज जगभर पसारा वाढलेला आहे. इतर बहुतेक कल्ट्स प्रमाणे इथेही Bait and Switch वापरले जाते. सहज मेडिटेशन नावाखाली अमेरिकेत आणी इतरत्र जी जाहिरात केली जाते त्यात माताजींचा फोटोही नसतो. तणाव मुक्तीसाठी मेडिटेशन शिकायला जे येतात त्यांना आपण गुरफटले जातोय हे लवकर लक्षात येत नाही. माताजी स्वतःला बुद्ध, महदी ( इस्लामचा येऊ घातलेला प्रेषित) , येशू आणी आदिशक्ती यांचे कॉम्बिनेशन समजतात. आपल्या अनुयायांची एकमेकात लग्ने लावून देणे आणी ते संसारात फारच रमायला लागले तर अचानक घटस्फोट घ्यायला लावणे हे माताजींचे वैशिष्ट्य. माताजींचा फोटो बघून अनुयायाचे एखादे लहान मूल रडायला लागले तर त्याला भूतबाधा झाली आहे असे सांगून इटली किंवा भारतात असलेल्या बोर्डिंग शाळेत ठेवले जाते. There is method to this madness या म्हणीप्रमाणे अशा लहरीपणात शिष्यांना कायम नियंत्रणात ठेवणे हा हेतू असतो. शिवाय "माताजींची लीला अगाध आहे, तुमच्या सारख्या पामरांना काय कळणार" हेही आहेच. याचे सदस्य कायम तणावाखाली वावरत असतात कारण कल्ट सोडून जाणारे विविध असाध्य रोगांना बळी पडतात असे बिंबविलेले असते. शिवाय आम्ही भारतात सामाजिक काम करतो असे सांगून इतर देशातून देणग्या गोळा केल्या जातात. माताजींनी नोबेल पारितोषिकासाठी बरीच खटपट केली. काही वर्षापूर्वी माताजींचा सातार्‍याला भेट देण्याचा कार्यक्रम अंनिस ने दिलेल्या आव्हानामुळे रद्द झाला. पुण्यात यांचा सत्कार बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते झाला तेव्हा या कार्यक्रमाला बाबासाहेबांनी जाऊन त्यांना प्रतिष्ठा देऊ नये म्हणून काही लोकांनी विनंतीही केली होती. क्रिकेटपटू, सिनेस्टार, राजकारणी यांच्याकडून प्रगल्भतेची अपेक्षा नसतेच पण बाबासाहेबांसारख्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाने आपण कुणाचा सत्कार करतो किंवा कुणाकडून सत्कार स्वीकारतो याबद्दल तारतम्य दाखवणे गरजेचे आहे.

अम्माची जगभर The Hugging Saint म्हणून प्रसिद्ध. यांनी केलेल्या विविध चमत्कारांच्या सुरस कहाण्या सांगण्यात येतात.

आसाराम बापू प्रामुख्याने गुजराती समाजात प्रसिद्ध. यांच्या आश्रमात दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संशयाच्या भोवर्‍यात सापडले होते. आपल्या आश्रमात आयुर्वेदिक औषधेही विकतात. बरेच फिल्म स्टार आपल्या मुलालाही हिरो बनवितात तसे यांनी आपल्या मुलालाही गुरु बनविले आहे.

अम्मा भगवान ऊर्फ कलकी : गेल्या काही वर्षात विशेषतः दक्षिण भारतात आणी जगभर अत्यंत वेगाने वाढणारा कल्ट. एल आय सी मध्ये काम करणार्‍या श्री विजयकुमार यांनी एक दिवस अचानक आपण कलकी अवतार आहोत असे सांगायला सुरु केले. तरीही त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना मानसोपचारतज्ञाकडे नेले नाही. पुढे कलकी हे नाव अडचणीचे झाल्याने नुसतेच अम्मा भगवान या नावाने हे जोडपे वावरते. अमेरिकेत एका भक्ताच्या घरी ठेवलेल्या फोटोतून मध कसा पाझरला, किंवा फ्रांस मध्ये एका भक्ताच्या घरी गुप्तपणे येऊन नैवेद्याचा घास कसा घेतला अशा भाकडकथा रंगवून सांगितल्या जातात. २०१२ साली जग बुडणार आणी तोपर्यंन्त किमान ६४,००० लोकांनी यांची वननेस दीक्षा घेतली तरच हे टळेल असा यांचा दावा. ही दीक्षा सात हजार डॉलर्स ना पडते ही एक किरकोळ अडचण आहे. हे दांपत्य आपल्या दर्शनासाठी पंचवीस हजार रुपये घेते. वननेस दीक्षेचे वर्णन करताना It is a Neurobilological Event असे वैज्ञानीक शब्दही घुसडले जातात. एक परिचित यांच्या दर्शनाला अमेरिकेतून गेले होते तेव्हा त्यांनी 'मी तुला या आधीच तुझ्या लाल रंगाच्या निसान अल्टिमा मध्ये पाहिले आहे' असे सांगितले. हे ऐकून ते गृहस्थ प्रचंड म्हणजे तुडुंब इंप्रेस झाले. परत आल्यावर त्यांनी मला भक्तीभावाने अम्मा भगवानांचा फोटो दाखवला. त्या फोटोत एक सोनेरी गोळाही होता. त्यात Universal Conciousness (म्हणजे काय?) आहे म्हणे. मला तो गोळा पाहून 'पाताल भैरवी' सिनेमाचीच आठवण झाली आणी त्या गोळ्यातून एखादी नृत्यांगना प्रकट होईल की काय अशी भीती वाटली. एकवीस दिवसाच्या कोर्स करायला आलेल्यांना मादक द्रव्ये देतात अशीही वदंता होती. आजकाल अशा भोंदु लोकांना अमेरिकेत मार्केटिंग करायला कंसल्टंटच उपलब्ध आहेत. ते झटपट वेब साईट तयार करून देतात आणी मार्केटिंग स्ट्रॅटेजी बद्दल सल्लाही देतात. आधी तामिळनाडू मधे आश्रम होता पण फारच बोंब झाल्याने तो आंध्रात हलवला आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंग Vedic Mumbo Jumbo + Large Group Awareness Training + Multi Level Marketing या शब्दात याचे वर्णन करता येइल. इथे शिकविली जाणारी क्रिया ( जिचे नाव लिहिले तर उगाच प्रताधिकाराचा भंग व्हायचा) दुसरे तिसरे काहीही नसून Transcendental Meditation आहे. मुळात तीही Hyperventilation च आहे. हे Hyperventilation सर्वांनाच योग्य आहे असे नव्हे. पण झटपट शिकून तयार झालेल्या शिक्षकांनाही ते माहित नसते. आपल्या गुरुच्या अंगी असलेल्या अलौकीक सिद्धी आणी चमत्कार हा इथल्या शिक्षकांचा आवडता विषय. प्राणायाम आणी काही योगासने नियमितपणे केल्याने फायदा होतोच. पण "आमच्या पेटंटेड पद्धतीने प्राणायाम म्हणजे बहात्तर रोगांवरचा अक्सीर इलाज" असले दावे ऐकून आचार्य अत्रेंच्या "साष्टांग नमस्कार" या नाटकाची आठवण यावी.
Landmark Forum मधून यांनी Hot Chair ची संकल्पना घेतली आहे. यात एखाद्या कोर्स च्या विद्यार्थ्यांना आळीपाळीने खुर्चीवर बसवले जाते आणी इतर विद्यार्थी त्याची यथेच्छ निंदानालस्ती करतात. ही प्रक्रिया सामान्य लोकांनाही सहन करणे अवघड असते, पण जे काही वैयक्तीक अडचणीतून जात असतात त्यांना तर फारच अवघड जाते आणी त्यांचा आत्मसन्मान गळून पडतो.
आणखी एक आचरटपणा म्हणजे बुद्धा प्रोसेस. यात विद्यार्थ्यांना फाटके कपडे घालून रस्त्यावर भीक मागायला उद्युक्त केले जाते. त्यामुळे म्हणे इगो कमी होतो.
इतर काही कल्ट्स प्रमाणे यांनीही Diversification करून रियल इस्टेट, आयुर्वेदिक उत्पादने, सौंदर्य प्रसाधने वगैरे विकायला सुरुवात केली आहे. काही दिवसानी 'वैदिक आयब्रो थ्रेडिंग' किंवा 'वैदिक फेशियल' वगैरेही सुरु होईल.
आधुनिक बिझिनेस मॅनेजमेंट मधली क्रॉस सेलिंग ची संकल्पना इथेही वापरली जाते. मग मूळ क्रियेबरोबरच 'सहज मेडिटेशन' 'श्री श्री आयुर्वेदा' ई ई प्रॉडक्ट्स विकले जातात.

स्वाध्याय : संस्थापकांच्या निधनानंतर नातेवाईक आणी इतर अनुयायी यांच्यात झालेल्या सत्तासंघर्षाचे विदारक उदाहरण. आर्थिक बाबतीत पारदर्शीकता आणावी म्हणून खटपट करणार्‍या एका ज्येष्ठ सदस्याची हत्याही स्वाध्यायी लोकांनीच केली.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम संकलन

भारतात हॅपी थॉट्स का तेज ग्यान नामक अजुन एक नवा कल्ट आला आहे त्याबद्दल कोणी माहीती देउ शकेल काय?

भारत हा साधुसंतांचा देश आहे असे लहानपणी ऐकले होते. त्यामुळे हिमालयात बर्‍याच गुहा, मठ, आश्रम आहेत अशी भाबडी समजुत होती. पण आज प्रत्येक शहर, उपनगरात कोणी ना कोणी बस्तान बसवत आहे.

नुकताच अम्मा (अलिंगन साध्वी) यांच्या दर्शनाचा लाभ घ्या असे पोस्टर पाहीले, स्थळ होते एक मोठा कॅसीनो. जुगारी बरेचसे (अंध)श्रद्धाळू असतात. 'अम्माचा आशिर्वाद घ्या व आत जुगार जिंका' अशीच जाहीरात करायची बाकी होते असे वाटले.

हाच लेख मराठी विकी तसेच मराठी वृत्तपत्रात यावा.

दुनिया झुकती है...

हेच खरं...झुकानेवाले नावं बदलून येतच असतात.
राधास्वामी,नरेंद्र महाराज, नागराणी, अनिरुद्ध बापू,वामनराव पै.....आणि अजून असे कितीतरी लोक नव्याने निर्माण होतच आहेत...भविष्यातही होतच राहतील.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

सहमत.

दुनिया झुकती हैशी सहमत.

-दिलीप बिरुटे

हैशी

मराठी भाषेला हैशी हा नवीन शब्द प्रदान केल्याबद्दल प्रा.डॉ. यांचे अभिनंदन. अशीच मराठी सारस्वताची सेवा आपल्या हातून घडो हीच इश्वरचरणी प्रार्थना.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

आभार....!

>>>मराठी भाषेला हैशी हा नवीन शब्द प्रदान केल्याबद्दल प्रा.डॉ. यांचे अभिनंदन.
हाहा ..! कौतुकाबद्दल मनःपूर्वक आभारी आहे. :)

>>>अशीच मराठी सारस्वताची सेवा आपल्या हातून घडो हीच इश्वरचरणी प्रार्थना.
बहुतेक आपल्या ''श्वरचरणी''असे म्हणायचे असावे. बाकी, माय मराठीची सेवा आमची चालूच आहे.

-दिलीप बिरुटे

एक गूढ प्रश्न

कल्ट्सचे चांगले संकलन केले आहे. यातील सत्यसाईबाबा, सहज योग, कल्की भगवान, आर्ट ऑफ लिव्हिंग ( आजकाल एसएसवाय फारसा दिसत नाही) यासारख्या काही कल्टमध्ये शिकली सवरलेली, शहाणी सुरती, विवेकशील अशी माझ्या ओळखीची माणसे कशी सामील होतात असा गूढ प्रश्न मला पडत असे. त्या सगळ्यांना लेखात सांगितल्याएवढे वाईट अनुभव आले नव्हते. अनेकांना त्याचा फायदा झाला असल्यासारखे वाटत होते. त्या घोळक्यात सामील होऊन व्यक्तिपूजा करणे त्यांच्या मनाला आणि बुद्धील कसे पटते याचे मला आश्चर्य वाटायचे.
मला असे वाटते की हे सुद्धा एकाद्या व्यसना सारखे असावे. आधी कुतूहल म्हणून किंवा कुणाच्या सांगण्यावरून सुरुवात होते. पहिला घोट घेतल्यावर तरतरी येते ती बरी वाटते. दुसरा घोट घ्यावासा वाटतो. त्याच्या आहारी गेल्यानंतर आपण त्यात अडकलो आहोत अशी समजूत होते. त्याप्रमाणे सुरुवातीला काही फायदे होतात नंतर त्याची सवय लागते. व्यसनाचे वाईट परिणाम लगेच दिसत नाहीत. त्यामुळे मी इतक्या सिगरेटी किंवा पेग घेतो तरी मजा धाड भरलेली नाही अशी फुशारकी मारणारे लोक असतात, त्याच्या लुत्फात काय मजा असते याचे गुणगान करून ते इतरांना उद्युक्त करतात. याच प्रमाणे बाबांचे अनुयायी आपला किती फायदा झाला हे सांगून ओळखीतल्या लोकांनासुद्धा तो व्हावा या शुद्ध उद्देशाने त्यांना आपल्याबरोबर नेतात.
काही लोकांना व्यसन लागतच नाही त्याप्रमाणे ते या बाबांच्या मागे लागत नाहीत. कोणीही मला ' हाय कम्बख्त तूने पीही नही' असे म्हणू शकणार नाही इतपत मीही 'घेतली' आहे आणि अनेक कल्ट्सच्या मेळाव्यांना, भजनाच्या कार्यक्रमांनाही हजेरी लावली आहे. एकदा तर एका भजनाच्या कार्यक्रमानंतर थेट ओल्या पार्टीला जावे लागले होते. पण माझ्यावर दोन्हीचा टिकाऊ परिणाम झालाच नाही.

मौनम् सर्वाथ साधनम्

मौनम् सर्वाथ साधनम्.............. :) करमणूक झाली वाचून. नरेन्द्र दाभोळकरांच्या कल्ट विषयी माहिती आली असती तर अधिक भर पडली असती.....................

:)

जळजळ पोचली.

दाभोळकरांचा कल्ट म्हणावा असे काही अजून आढळलेले नाही. दाभोळकरांची त्यांनीच सांगितलेल्या तत्त्वाच्या विरोधी कृती 'नक्कीच आपल्याला न कळलेले काहीतरी गूढ असेल' असे मानून घेण्याची पद्धत नाही.

डाव्या विचारसरणीत थोडासा हा भाग निर्माण झालेला होता.

(अवांतर : स्वर्गरहस्य छाप पुस्तकांची चौकशी करून वाचकांचे कुतुहल चाळवून ते पुस्तक वाचण्यास उद्युक्त करण्याची आय्ड्या नाही ना?)

नितिन थत्ते

त्याचा स्वतंत्र उद्देश आहे

अनेक गोष्टी आहेत. ज्यावरुन सिध्द करता येईल की दाभोळकरांचा कल्ट आहे व त्याचा स्वतंत्र उद्देश आहे.उदा: सणातील प्रथांवर वृक्षतोड होते म्हणून विरोध करणे. ग्रीटींग कार्डस्(ज्या साठी कागद लागतो व त्याला लाकुड लागते) बद्दल सोईस्कर मौन बाळगणे.

अवांतर-आपली शंका ज्या त्या धाग्यात व्यक्त झाल्यास प्रतिसाद देणे सोईस्कर पडते :)

Wit Beyond Measure is Man's Greatest Treasure !!

अजून तरी नाही

सणातील प्रथांवर वृक्षतोड होते म्हणून विरोध करणे. ग्रीटींग कार्डस्(ज्या साठी कागद लागतो व त्याला लाकुड लागते) बद्दल सोईस्कर मौन बाळगणे

सहमत आहे, परंतु अद्यापतरी कल्ट म्हणावे इतकी दुरवस्था वाटत नाही.
--
आगरकर, सावरकर यांच्या विज्ञानवादापेक्षा अंनिसमध्ये शाहू, फुले, लोकहितवादी, यांच्या कार्यालाच पसंती दिली जाते, दाभोळकर स्वतः साधना परिवारातील आहेत मात्र साने गुरुजींच्या अस्पृश्यताविरोधाला तेथे फारशी प्रसिद्धी नसते असे वाटते. राज्यघटनेचा उल्लेख 'बाबासाहेबांनी लिहिलेली' असा करण्याचा प्रयत्न असतो असे मला जाणवले. आता तर जय जिजाऊ गटही अंनिसमध्ये शिरला आहे.

नवीन ठ्

आपल्याकडे पूर्वी एक ठ नावाचे सभासद असत. त्यांचे नंतर काय झाले ते गौडबंगाल आहे. त्यांची आपल्याला उणीव भासू नये म्हणून काही नवीन सभासद प्रयत्नशील आहेत असे दिसते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

माहितीपूर्ण संकलन

लेखन आवडले. प्रयत्नपूर्वक केलेले संकलन अतिशय माहितीपूर्ण आहे. कृपया 'ओम शिनरीक्यो'सारख्या जपान व इतर देशातील कल्ट्सबद्दलही माहिती द्यावी.

छान ओळख.

पण व्यक्तिपूजेच्या बाबतीत ह्या सगळ्यांच्या थोबाडित मारेल असा एक कल्ट दक्षिण भारतात आहे.
सुपरष्टार रजनी-कल्ट. त्याबद्दलची माहिती नसलेली बघुन आश्चर्य वाटले.

मराठी आंतरजालावर (कधी परस्परविरोधी आणि कधी परस्परपूरक असे) बुद्धिवाद्यांचे आणि ज्योतिषसमर्थकांचे आपापले कल्ट आहेत असं ऐकुन आहे.

--मनोबा

लेख आवडला

माहितीपूर्ण, मुद्देसूद् लेख आवडला.

एक छोटासा प्रश्न. धर्म आणि कल्ट यात एक मोठा एक छोटा हा फरक मानायचा का एक मोठा सेट दुसरा सबसेट मानायचा?

प्रमोद

मल्टी-लेव्हल मार्केटींग

ऍमवे सारखे मल्टी-लेव्हल मार्केटींग प्रकारही ह्यात धरले तर चालतील.

राजकीय कल्ट

कल्ट= धर्मीक.

कल्ट्सचे चांगले संकलन केले आहे. मते वेगवेगळी असु शकतात. अर्थात् अ से कल्ट यो ग्य की अयोग्य हे महत्वाचे.

धर्मीक कल्ट बद्दल ही मा हीती आहे. राजकीय पक्ष हा कल्ट होउ शकतो का?

मौनम् सर्वाथ साधयेत.

राजकीय कल्ट

इथे अमेरिकेत 'लिंडन ल रूश' नावाच्या माणसाचा एक राजकिय कल्ट आहे.

कल्ट आणि धर्मपंथ

लेख छान, आवडला. कल्ट आणि धर्मपंथ यातील फरक जरा जास्त विशद केला असता तर आवडले असते. बहुतेक धर्मपंथ सुरवातीस कल्ट म्हणूनच चालू झाले असण्याची शक्यता आहे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अगदी बरोबर

>>बहुतेक धर्मपंथ सुरवातीस कल्ट म्हणूनच चालू झाले असण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील जेहोवा मॉर्मन वगैरे आधी कल्टच्या रूपातच होते.

माहितीपूर्ण आणि मनोरंजक

उपक्रमावर स्वागत. लेख अतिशय माहितीपूर्ण आणि मनोरंजक आहे.

आर्ट ऑफ लिविंगचा पंथ तर मला रोटरी क्लबसारखा वाटतो. मला एकदा एक मित्र खेचून घेऊन गेला होता. मीही आपला प्राणिसंग्रहालय बघायला जातो आहे असे समजून गेलो. तर कमीअधिक फरकाने सगळे असेच. मनःशांतींचे माहीत नाही पण इथे नेटवर्किंग चांगले होते. सत्य साईबाबा नावाचा हातचलाखी करणाऱ्या गृहस्थाकडे राष्ट्रपती, गृहमंत्री, वायुसेनाप्रमुख, अणुशास्त्रज्ञ सगळे जातात/जात असत. तो म्हणे लोकसभेचीही तिकिटे मिळवून देतो/द्यायचा. थोडक्यात त्याचे उच्चपदांसाठी मनुष्यबळ पुरवण्याचे काम आहे/होते.

बहुतेक धर्मपंथ सुरवातीस कल्ट म्हणूनच चालू झाले असण्याची शक्यता आहे.

धर्मपंथ म्हणजे वाढ संपलेल्या, खुंटलेल्या आदिम परंपरांचे किंवा कल्टांचे अश्मीकरण (petrification) आहे असे काहीसे म्हणता येईल.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

माहितीपूर्ण

लेख अतिशय माहितीपूर्ण आहे.

कल्टचा अर्थ केवळ धर्म-परंपरांशीच संबंधीत नाही. मेरिअम वेबस्टर डिक्शनरीप्रमाणे, कल्ट म्हणजे, "great devotion to a person, idea, object, movement, or work (as a film or book); especially : such devotion regarded as a literary or intellectual fad."

काही कॉमेंट्सः

तेथे गेल्यावर मात्र हा अ‍ॅम्वे सारखा प्रकार आहे हे ध्यानात येत असे.
ह्य ऍम्वेवाल्यांनी प्रचंड डोके फिरवले होते. त्यामुळे एकदा का असला अनुभव आला, की नंतर कधी कोणी अनोळखी (भारतीय) अगदी निस्वार्थीपणे देखील चांगले वागले तरी ते ऍम्वेचेच वाटू लागत.

नव्या अनुयायांना घरादारापासून तोडणे
मला असारामबापूंवाले कोणी (चांगले/वाईट) माहित नाही त्यामुळे पहील्यांदाच ऐकले असे म्हणेन. पण जे काही सनातनचे दृश्य स्वरूप आहे त्यावरून कोणी माहीत नसूनही आपण म्हणत असल्याशी सहमत आहे असे म्हणावे लागेल..

एकदा जगबुडी झाली की आपणच तरणार असा विश्वास निर्माण करणे
ह्याच्या उलट हेवन्स गेट नामक एक विचित्र कल्ट हा १९९७ साली समजला...तेंव्हा हे प्रकरण अमेरिकेत खूप गाजले होते. एरव्ही प्रोफेशनल्स असलेल्या ३९ लोकांचा असा दृढ विश्वास होता की हेल-बॉप धुमकेतू (जो १९९५ मधे शोधला गेला होता) जेंव्हा पृथ्वीच्या अगदी जवळ असेल तेंव्हा जर मेलो तर त्या धुमकेतूमधून "उघडले स्वर्गाचे दार" असे काहीसे होईल. जेंव्हा त्यांचे मृतदेह मिळाले तेंव्हा त्यांना अगदी शांतपणे मरण आले होते (आत्महत्या होत्या, खून नाही अशा अर्थाने), हे ध्यानात आले होते. त्यासंदर्भातील ही मुलाखत वाचली तर डोकी कशी चालतात हे समजेल...

अम्माची जगभर The Hugging Saint म्हणून प्रसिद्ध. यांनी केलेल्या विविध चमत्कारांच्या सुरस कहाण्या सांगण्यात येतात.

ह्यासंदर्भात खूप ऐकले आहे. अगदी एनपीआर सारख्या प्रतिष्ठीत आणि सेक्यूलर (त्यांना अमेरिकेतील लेफ्टीस्ट धरले जाते) रेडीओ स्टेशन्सवर पण कुतुह्ल मिश्रीत आदराचे कार्यक्रम ऐकले आहेत. इतके इथल्या लोकांना त्याबद्दल का वाटते माहीत नाही. मी ऐकले होते तेंव्हा, कॅनडात जवळपास सलग दोन दिवस - अपवादात्मक वेळ सोडता, ह्या अम्मा सतत मिठ्या मारत होत्या आणि लोकांची ही भली मोठी रांग होती. त्यात केवळ भारतीय नव्हते, किंबहूना भारतीयही होते असे म्हणायची परिस्थिती आहे.

स्वाध्याय : संस्थापकांच्या निधनानंतर नातेवाईक आणी इतर अनुयायी यांच्यात झालेल्या सत्तासंघर्षाचे विदारक उदाहरण.

सहमत. माझ्या प्रत्यक्ष ओळखीचे स्वाध्यायी नाहीत. मात्र जे काही वाचले आहे त्यावरून त्यामुळे पांडूरंगशास्त्रींचे काम हे "कल्ट" या कनोटेशन असलेल्या शब्दाशी निगडीत करावे का असा प्रश्न जरूर पडतो.

बाकी वर म्हणल्याप्रमाणे स्वतःला केवळ बुद्धीवादी/विचारवंत म्हणतात अशांचे देखील बर्‍याचदा कल्टच असतात. एखादी स्वतःला पटेल अशी माहिती सतत एखादा म्होरक्या अथवा एखादी म्होरकी विचारधारा सांगत रहाते आणि तेच खरे वाटू लागते. इतके, की त्यात सत्य आहे का नाही हे समजून घेण्यासाठी एरव्ही जे सत्यासत्याचे निकष लावले जातात ते देखील लावले जात नाहीत, किंबहून तसे लावायला कुठेतरी अशा लोकांना भितीच वाटते.

तेच "आपल्या नेत्याबद्दल कोणतीही टीका किंवा शंका सहन न करणे." या संदर्भात. हे तर अनेक भारतीयांना लागू आहे, जे स्वत:ला निधर्मी म्हणत असतील... त्याबाबत, बोलावे तितके कमी...

स्व.पांडुरंगशास्त्री

स्वाध्याय : संस्थापकांच्या निधनानंतर नातेवाईक आणी इतर अनुयायी यांच्यात झालेल्या सत्तासंघर्षाचे विदारक उदाहरण.
स्व.शास्त्रीजींना जवळून पाहण्याचा योग माझ्या जीवनात आला होता आणि ते माझे भाग्य होते असेच मी समजत आलो आहे. माझ्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. 'तेथे कर माझे जुळती' या शीर्षकाखाली मी काही शब्दचित्रे रेखाटायचे ठरवल्यावर सर्वात पहिले पुष्प त्यांना वाहिले. स्वाध्याय चळवळीत मात्र मी कधी भाग घेतला नाही. त्यांचा प्रचंड मेळावा खारघर येथे भरल्याचे वृत्तपत्रात वाचले. तिथेही सत्तासंघर्षाची लागण झाल्याचे वाचून वाईट वाटले.

कुतूहल

बाकी वर म्हणल्याप्रमाणे स्वतःला केवळ बुद्धीवादी/विचारवंत म्हणतात अशांचे देखील बर्‍याचदा कल्टच असतात. एखादी स्वतःला पटेल अशी माहिती सतत एखादा म्होरक्या अथवा एखादी म्होरकी विचारधारा सांगत रहाते आणि तेच खरे वाटू लागते. इतके, की त्यात सत्य आहे का नाही हे समजून घेण्यासाठी एरव्ही जे सत्यासत्याचे निकष लावले जातात ते देखील लावले जात नाहीत, किंबहून तसे लावायला कुठेतरी अशा लोकांना भितीच वाटते.

'बर्‍याचदा' या शब्दप्रयोगामुळे कुतूहल आहे. त्या तथाकथित 'बर्‍याच' उदाहरणांपैकी काही उद्धृत करा, ही विनंती.

चांगला लेख

चांगला लेख आणि उपक्रमावर स्वागत!

मनुष्याने गटाने राहणे आणि इतरांना आपल्या गटात खेचणे आणि एकदा गटात आल्यावर प्रेमाने, धाकाने किंवा सक्तीने त्याला त्या गटात गुंतवून ठेवण्याचे उद्योग अनादीकालापासून केले आहेत. कल्ट ही माणसाची गरज असावी असेही म्हणता येईल. आपण कुणाशी तरी संबंधित आहोत, एखाद्याच्या कृपाछत्राखाली आहोत किंवा आपल्याला जवळ करणारे कोणीतरी आहे ही जाणीव दिलासादायक असावी. अर्थातच अशांच्या भावनांचा गैरफायदा घेणे सहजशक्य होते.

लेखकाने महाराष्ट्रातील बाबाबुवांच्या कल्टवर आणखी थोडा प्रकाश टाकायला हवा होता असे वाटते.

एखाद्या प्रभावी (charismatic) व्यक्ती भोवती जमलेला व्यक्तीपूजक समुदाय अशी याची अगदी ढोबळ व्याख्या करता येईल.

ढोबळ व्याख्या हे ठीक आहे कारण गजानन महाराज, स्वामी समर्थ वगैरेंकडे बघून तरी ते प्रभावी वगैरे असल्याची कल्पना येत नाही. तिथे ते कसे प्रभावी आहेत हे पटवून देणारी व्यक्ती (किंगमेकर प्रमाणे बाबामेकर) निश्चितच प्रभावी असावी.

आपला तो

कल्ट प्रकारात (बाबाभक्तांमध्ये) अजून एक विशेष समज असतो तो म्हणजे "इतर बाबा असतीलही भोंदू पण आमचे हे बाबा नाहीत हां तसे!!!!"

नितिन थत्ते

अगदी...

कल्ट प्रकारात (बाबाभक्तांमध्ये) अजून एक विशेष समज असतो तो म्हणजे "इतर बाबा असतीलही भोंदू पण आमचे हे बाबा नाहीत हां तसे!!!!"

अगदी अगदी!

प्रियाली यांचे अभिनंदन

उपक्रमावरील अश्याच एका कल्टचा पर्दाफाश केल्याबद्दल.

उपक्रमावरील कल्ट

कुतूहल

तो कल्ट उपक्रमवर असल्याचा दावा त्या प्रतिसादात दिसला नाही.

यनावालांच्या

खालील लेखावर ही प्रतिक्रिया आहे. यावरून हा कल्ट उपक्रमावरचा आहे हे लक्षात यावे.

भ्रमाचा भोपळा

शंका

सद्य लेखावरील प्रतिसादामध्ये हॅपी थॉट्स या कल्टचा उल्लेख आहे परंतु तो कल्ट मात्र उपक्रमवर दिसला नाही. प्रियाली यांचा प्रतिसाद नक्की यनावालांच्या लेखावरील टिपण्णीच होता असे खात्रीने कसे सांगता येईल?

प्रियाली यांनीच खुलासा करावा

कारण माझा तरी असा समज आहे. हा प्रतिसाद यनावालांच्या लेखाबद्दल नसल्यास क्षमस्व आणि प्रियालींचे अभिनंदन मागे घेतले जाईल.

खुलासा वगैरे

गोरे आणि रिटे यांच्यात टेनिसची म्याच सुरू ठेवावी की बंद करावी असा प्रश्न पडला होता पण तरीही उत्तर देते.

काही गोष्टी आपापल्या समजुतींप्रमाणे स्वीकारणे पथ्यावर असते. देव आहे की नाही या प्रश्नाला "ज्यांना वाटतो आहे त्यांच्यासाठी आहे. ज्यांना नाही वाटत त्यांच्यासाठी नाही " असे सोपे उत्तर तसेच आपण करावे. हे यनांना उद्देशून आहे असे गोर्‍यांना वाटत असेल तर त्यांनी तसे घ्यावे. रिटेला वाटत नसेल तर त्याने तसे घेऊ नये. म्याटर खतम! मी खुलासे करायलाच हवेत असे माझ्यावर बंधन नाही.

बाकी, मी गोर्‍यांकडून अभिनंदनाची कधी अपेक्षा केली नव्हती. किंबहुना त्यांनी अभिनंदन मागे घ्यावेच. अभिनंदन वगैरे वाचून मला कससंच होतं! :-(

छान

सर्व कल्टांचं संकलन आवडलं. मी बाबागिरीविषयी एक लेख लिहिला आहे तो वाचून पहावा.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

साबण

माझ्याकडे साबण आहे, आणि तो वापरलास की तुझं मन निर्मळ होईल हा विश्वासच साबणापेक्षा महत्त्वाचा असतो. तो विश्वासच खरं तर मनाचा साबण बनतो.

अगदी अगदी हेच ते रहस्य कल्टचे.
प्रकाश घाटपांडे

कल्ट आणी ब्रेनवॉशिंग

कल्ट आणी ब्रेनवॉशिंग मधे एक प्रकार असाही दिसतो की समजा ह्या लोकांना टाळुन मार्ग काढला तरी पुन्हा आपापल्या भाषा, जात, धर्म प्रमाणे कोण्या राजकीय संघटनेला बांधुन घेणे.

यातुनही वाचले की महागडे शिक्षण, महागडे घर, महागडी गाडी, इन्शुरन्स्, मेडीकल प्लॅन, डॉक्टर, उंची खाणे-पिणे, पिकनिक, कट्टे, उपभोग जीवनशैली या भांडवलशाही कल्टात अडकवून घेणे. :-) वॉशिंग म्हणाल तर बाहेर लाँड्रीमधेही होते किंवा घरच्या घरी देखील होते. ब्रेनचे देखील फार वेगळे नाही.

शेवटी ह्युमन बिइंग इज अ सोशल एनीमल हेच खरे! जो तो आपापल्या ब्रेशवॉशिंगप्रमाणे कुठे तरी स्व:ताला बांधून घेत असतो.

उपक्रमवर स्वागत

लेख आवडला
इतर गोष्टींबरोबर अनेक मंडळींच्या काळ्या पैशाची वासलात, टोळीयुद्धांच्यावेळी मांडवलीची (आणि राजकीय निवडणुकींच्यावेळी तहाची) जागा हे प्रत्येक समाजव्यवस्थेतील महत्त्वाचे अंग क्ल्टद्वारे पुरवले जाते.
त्याच बरोबर राजकीय पक्षांना वेळोवेळी कार्यकर्ते मिळवून देणे हा त्यांचा (साईड) बिजनेस म्हणता यावा.

खुद्दा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सहज प्रवेश मिळवणारे हे 'कल्टी'बाज उद्या राष्ट्रपती भवनात होम करताना दिसले तरी आश्चर्य वाटणार नाही.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

कल्टची गरज

समाजात २% माणसे ही प्रस्था॑पित असतात. २% बंडखोर असतात. उरलेले ९६% हे यांच्या पैकी कुणाचा तरी अनुयायीत्व व अनुनयत्व करणारे असतात. त्यातून त्यांना मानसिक सुरक्षितता मिळत असते. कल्ट ही मानसिक आरोग्याशी निगडीत गोष्ट आहे.
ईश यांच्या अंधश्रद्धा निर्मुलन हा देखील कल्ट आहे या वाक्याशी सहमत आहे. एका अर्थाने तो कल्टच आहे असे स्वानुभवाने सांगु शकतो.पण अशा कल्टची गरज आहेच हे मात्र अधोरेखीत. श्रद्धेच्या दुकांनांना व मार्केटिंगला अंधश्रद्धा निर्मुलनाच्या दुकानाने व मार्केटिंगने प्रतिउत्तर असा तो भाग आहे.
पंथ हा प्रतिशब्द कल्टला जवळचा आहे.
प्रकाश घाटपांडे

सहमत

सहमत

" असे कल्ट योग्य की अयोग्य हे महत्वाचे. "असे मी म्हणालो

मानसिक रोगी

कल्ट ही मानसिक आरोग्याशी निगडीत गोष्ट आहे.

बाबाबुबांकडे जाणारे मानसिक रोगी असतात हे पटण्यासारखे आहे.

ईश यांच्या अंधश्रद्धा निर्मुलन हा देखील कल्ट आहे या वाक्याशी सहमत आहे. एका अर्थाने तो कल्टच आहे असे स्वानुभवाने सांगु शकतो.

कॅरस्म्याटिक माणसाभोवती असतो ना कल्ट. अंधश्रद्धा निर्मूलनावाल्यांकडे कोण आहे बरे असे? असो. मानव की दाभोळकर? असो. आणि अंनिसवाले बुद्धीला, तर्काला शटडाउन करतात का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ह्म्म्म्

अंनिसवाले बुद्धीला, तर्काला शटडाउन करतात का?

कल्टमधे लोकांच्या विचारशक्तीला असे काहि वळवले जाते की लोक ठराविक म्हणणे सत्य समजू लागतात आणि मग कळत-नकळत त्या कल्टला आर्थिक/सामाजिक/राजकीय लाभ करून/करवून देतात.

अंनिसच्या कार्यामुळे त्यांनी सांगितलेल्या व्यक्ती ह्या भोंदूच आहेत / नाहीत असे जर लोक (स्वतःचा तर्क न वापरता) मत बनवत असतील व त्यामुळे त्यांना आर्थिक/सामाजिक/राजकीय 'लाभ' होत असेल तर तर त्यांना कल्ट म्हणता यावे असे वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

समजू लागणे

कल्टमधे लोकांच्या विचारशक्तीला असे काहि वळवले जाते की लोक ठराविक म्हणणेच सत्य समजू लागतात

पण तर्काला आणि बुद्धीला शटडाउन केले की ह्या समजू लागण्याच्या गोष्टी होतात. आणि कल्ट म्हटले फ्रीकपणा, विकृतपणा, नित्यानंदपणा, सत्यसाईपणा डोळ्यांसमोर येतो. तसे अंनिसच्या बाबतीत म्हणता येते का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

लगे रहो!

नित्यानंदपणा, सत्यसाईपणा हे शब्द इतके आवडले की प्रतिवाद करायचा तर्क विसरून गेलो
मस्त! लगे रहो! :प्

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

श्याम मानव

कॅरस्म्याटिक माणसाभोवती असतो ना कल्ट. अंधश्रद्धा निर्मूलनावाल्यांकडे कोण आहे बरे असे? असो. मानव की दाभोळकर? असो. आणि अंनिसवाले बुद्धीला, तर्काला शटडाउन करतात का?

खोटी माहिती लिहून बदनामी केल्या बद्दल श्याम मानव ह्यांना जेलची हवा खावी लागली आहे(वर्तकां विरुद्ध्च्या खटल्यात). दाभोळकरांवर सुदैवाने तशी वेळ आलेली नाही अजून.

Wit Beyond Measure is Man's Greatest Treasure !!

हे वर्तक कोण हो?

खोटी माहिती लिहून बदनामी केल्या बद्दल श्याम मानव ह्यांना जेलची हवा खावी लागली आहे(वर्तकां विरुद्ध्च्या खटल्यात).

माझ्या प्रश्नाच्या दृष्टीने ही माहिती अवांतर आहे.पण मानव हे तसे फ्लॅश खूप मारायचे. अजूनही मारत असतील. पण हे वर्तक कोण हो? कृपया माहिती द्याल का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हेच तर कल्ट मध्ये चालते ना ??

ह्यावरुन धार्मिक कल्ट बरोबर अंधश्रध्दा निर्मुलन कल्ट मध्ये ही थापा मारणे, फसवणे, दिशाभुल करणे असे प्रकार चालतात असे दिसून येते....

वर्तक कोण हे?

कुठल्याही मानवावर कुणीही डोळे मिटून विश्वास ठेवू नये असेच बुद्धिवाद (किंवा तर्कदुष्टता) म्हणतो. मानवांनी काय केले ते डिटेलवार सांगा आणि हे वर्तक कोण हेही सांगा. म्हणजे ठरवता येईल नक्की काय झाले ते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आणखी कोण असणार...

वर्तक म्हणजे तेच - सूक्ष्म देहाने मंगळावर जाऊन आलेले.

ईश आपटे पण जाऊन आले आहेत का? मंगळावर? शुक्रावर? सूर्यावर? वगैरे. ;-)

प वि वर्तक

प वि वर्तक आणि मंगळ पहा
अवांतर- भविष्यात ईश आपटे आणि मंगळ / पृथ्वी
प्रकाश घाटपांडे

वायफळ खर्च करण्यापेक्षा योगज दृष्टीचे मार्गदर्शन घ्यावे

इस्त्रो ची तांत्रिक क्षमता बघता, इस्त्रोने करोडो रुपये वायफळ खर्च करण्यापेक्षा योगज दृष्टीचे मार्गदर्शन घ्यावे असे वाटते....
http://www.isro.org/chandrayaan/htmls/ImageMoon_tmc.htm

असल्या सुमार कामगिरी व तंत्रामुळे, चंद्रावरील मानवाचे पाऊल हा बनाव होता ह्या अफवेला जोर चढतो.

योगज दृष्टी म्हणजे?

योगज दृष्टी म्हणजे काय? त्यामुळे सूक्ष्म देहाने आकाशगंगेत घिरट्या मारता येतात का? तुम्ही मारल्या असतील तर आम्हाला माहिती द्या बघू!

 
^ वर