रिकामा देव्हारा

याच देव्हार्‍यात होता ....

याच देव्हार्‍यात होता देव आमुचा आधार
आता रिकामा देव्हारा तरी माझा नमस्कार.

नमस्कारास वाकता क्षणी घडे चमत्कार
वीणा लागली वाजाया झाला टाळांचा गजर.

समईत जळू लागे प्राण होऊनिया ज्योत
आणि उजळले विश्व काळ राहिला तेवत.

कसे मला आता दिसे माझे वेगळे शरीर
रिकाम्या देव्हार्‍याला पुन्हा माझा नमस्कार.
शंकर वैद्य

श्री. वैद्यांचा चमत्कार काय तो पाहण्याआधी थोडी अवांतर माहिती देतो. शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर माऊली दोघेही अद्वैती. दोघांनी गीतेवर टीका लिहल्या. दोघांच्या मतात साम्य दिसल्याने डॉ. पेंडसे यांनी आपल्या पुस्तकात नित्कर्ष काढला की ज्ञानेश्वर पूर्वासूरींना "वाट पुसतात" ते पूर्वसुरी म्हणजे शंकराचार्यच. पण तसे दिसत नाही. आचार्य म्हणतात "ब्रह्म सत्य, जगन्मिथ्या " . दिसणारे जग ही माया आहे. ज्ञानेश्वर अगदी उलटे टोक घेतात. म्हणतात "म्हणौनि जग असकी ! वस्तुप्रभा !! " जग हा ब्रह्माचा चिद्विलास आहे. जितके ब्रह्म सत्य, तितके जगही सत्य ! ब्रह्म आणि जग हे एकच आहे. तत्वज्ञानाबद्दल माहिती देण्याची ही जागा नाही. पण ज्ञानेश्वरांचा विचार समजावून घेतल्याशिवाय वैद्यांची कविताही समजणार नाही.

आख्या दोन-चार मिनिटांच्या कालावधीत घडलेली घटना. देव्हार्‍यातला देव हा जगण्याचा आधार म्हणून त्याला नमस्कार करावयाची प्रथा. नेहमी सारखा कवी नमस्कार करावयास गेला आणि पहातो तो देव्हारा रिकामा. तरीही तो नमस्कार करतो आणि सगळे क्षणार्धात बदलते. वीणेचा झणत्कार,टाळांचा गजर, प्राण होऊन जळणारी समई ... सारे विश्वच उजळून जाते. नेहमीपेक्षा आज काय निराळे झाले होते म्हणून हे अकल्पित घडावे ? नेहमी तो देवाला नमस्कार करतो, देव निराळा, हा निराळा. आज देव नाही तरी तो रिकाम्या देव्हार्‍याला नमस्कार करतो. आज "वस्तु" नसली तरी तो "वस्तुप्रभेला" नमस्कार करतो. आज जगाला नमस्कार आहे, स्वत:चा प्राण जाळून तो जगाशी एकरुपता साधतो. नाद, ज्योत ह्या गोष्टी समाधी लागल्यानंतरची अनुभुती दाखवतात. हे अद्वैत एकदा साधले की स्वत:चे शरीर तुम्हाला निराळे दिसावयास लागते. आणि ही गोडी एकदा लागली की तुम्हाला दुसरे काही रुचतच नाही. कवी परत एकदा रिकाम्या देव्हर्‍यालाच नमस्कार करत आहे.

सातशे वर्षांपूर्वीचे ज्ञानेश्वर व त्यांचे तत्वज्ञान... नाही जुळत अनुबंध ? द्या सोडून. मंगेश पाडगांवकर तर तुमचे आजचे लाडके कवी आहेत नां ? त्यांनाही हेच दिसते आहे कीं

शुभ्र तुरे लेऊन आल्या निळ्यानिळ्या लाटा
रानफुले घेऊन सजल्या या हिरव्या वाटा..

आणि हे पाहतांना सूर लागतात ते सुद्धा 'तुझे गीत गाण्यसाठी ". निसर्गाशी, जगाशी एकरूप पावलात की तुमचे सूर हे त्याचेच गाणे होते; तुम्हाला दिसणारी प्रत्येक गोष्ट त्याच्याच आरशातील प्रतिबिंब होते. "मेरा सूर बने तुम्हारा ".

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

ज्ञानेश्वर आणि शंकराचार्य

यांच्या तत्त्वज्ञानाची तुलना करणारा लेख मी लिहिला होता. बाकी वैद्यांच्या कवितेचे थोडेसे साम्य "कानडाऊ विठ्ठलु" अभंगाशी दिसते.

"पाया पडू गेले तव पाउलेची ना दिसे" किंवा "क्षेम देऊ गेले तंव मीचि मी एकली आसावला जीव राओ"हे रिकामा देव्हार्‍याचेच वर्णन वाटते.

खुद्द ज्ञानेश्वरीत अश्या वस्तुप्रभेचे सौंदर्य दाखवणारी अनेक स्थळे आहेत. उदा. सहाव्या अध्यायात त्यांनी ध्यानासाठी जागा कशी असावी याचे वर्णन केले आहे ते वाचावे.

ज्ञानेश्वर आणि शंकराचार्य

कानडाऊ विठ्ठलु

देव्हारा

उपक्रमावर ह्याविषयावरील लेख वाचून मनापासुन आनंद झाला.

चिद्विलास

निसर्गाशी नाळ जोडता येणे हा एक खास अनुभव असतो. एकुण विवेचन आवडले.
पण एका शब्दाशी अडलो - चिद्विलास म्हणजे नेमके काय?

तत्वज्ञानाबद्दल माहिती देण्याची ही जागा नाही.

हे पटले नाही!
कोणत्याही तत्वज्ञानाबद्दल उपक्रमावर मोकळी आणि पूर्वग्रह विरहीत चर्चा व्हायला काही हरकत नसावी.

-निनाद

रीकाम देव्हारा

सध्या ई टीव्हि मराठी वर चालु असलेली कालाय तस्मै नम: ही सीरीयल एका जून्या वाड्यामधील रीकामा देव्हारा व त्याचि नीत्य पुजा यान्च्या रहस्यावर आधारीत आहे.

 
^ वर