दख्खनच्या पठारावर – 7
बदामी गावाच्या परिसरात शिरत असताना प्रथम मला कसली आठवण होते आहे ती म्हणजे अमेरिकेतील ऍरिझोना राज्यामधील सिडोनाच्या भव्य खडकांची(Sedona). बदामी गावाला लागून सिडोनासारखेच लाल रंगाचे ऊंच दगडी डोंगर उभे आहेत. मात्र सिडोना मधले रॉक्स नुसते दगड म्हणूनच उभे आहेत. फार फार तर काही हौशी मंडळी त्यावर आपली रॉक क्लाइंबिंगची हौस पुरवत असताना आढळतात. बदामीची गोष्टच निराळी आहे. चालुक्य राजघराण्यातला विख्यात राजा दुसरा पुलकेशी याने आपली राजधानी ऐहोले वरून बदामीला सहाव्या शतकात आणल्यानंतर, बदामीच्या लाल दगडी डोंगरावर चालुक्य राजांनी गुंफा मंदिरे बांधली व त्यावर काही अप्रतिम भित्तिशिल्पे निर्माण करून घेतली व एक कला दालनच निर्माण केले.
मी बदामी गावात उतरल्यावर प्रथम पेटपूजेच्या मागे लागलो आहे. गेले काही दिवस सतत दाक्षिणात्य चवीचे भोजन घेतल्यावर आज बदामीला मिळणारे मराठी ढंगाचे जेवण खरे सांगायचे तर चवीला एकंदरीत बरे लागते आहे हे मात्र नक्की. पोट भरल्यानंतर तिथल्याच एका आराम खुर्चीत आराम करणे आवश्यकच आहे कारण बदामीच्या डोंगरावर भर दुपारी चढण्यात काही अर्थ नाही.
पुराणकाळातील बदामीचे जुने नाव वाटपी असे होते. चालुक्य राजांच्या आधीच्या कालखंडातच कधीतरी हे नाव बदामी असे झाले असावे. ग्रीक भूगोलकार टॉलेमी याने दुसर्या शतकात लिहिलेल्या आपल्या पुस्तकात बदामीचा उल्लेख केलेला आढळतो. त्या कालापासूनच हे व्यापाराचे एक प्रमुख केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. सध्या हे गाव तालुक्याचे गाव व एक व्यापार केन्द्र आहे. चालुक्य कालात बदामीला, राजधानी असल्याने, प्रचंड सांस्कृतिक व राजकीय महत्व प्राप्त झाले होते. विख्यात चिनी बौद्ध भिक्षू झुएन त्झांग (Xuanzang) याने दुसरा पुलकेशी याच्या कारकिर्दीत बदामीला भेट दिली होती. अगदी अलीकडच्या कालात म्हणजे अठराव्या शतकात, पेशव्यांच्या सैन्यापासून या भागाचे संरक्षण करण्यासाठी टिपू सुलतानाने बदामीच्या डोंगरावर एक किल्ला व शेजारच्या डोंगरावर राजकोष बांधले होते व त्याचे अवशेष अजूनही बघता येतात.
बदामीचा किल्ला व शैव किंवा पहिली गुंफा
दुपारचे चार वाजले आहेत व बदामीच्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत बस आम्हाला घेऊन चालली आहे. डोंगराच्या अगदी पायथ्यापाशी बस उभी राहते आहे. समोरच बदामीचा लाल रंगाचा डोंगर व त्याच्या डोक्यावर असलेला बदामीचा किल्ला स्पष्ट दिसतो आहे. बदामीची पहिली गुंफा ही शैव गुंफा म्हणून ओळखली जाते. ही गुंफा जमिनीपासून तीस पस्तीस पायर्यांवरच आहे त्यामुळे या गुंफेच्या दारापर्यंत सुरेख हिरवळ व फुलझाडे लावलेली दिसत आहेत. बदामीच्या सर्व गुंफांची खोदाई एकाच पद्धतीची आहे. प्रत्येक गुंफेच्या समोर सपाट मोकळी जागा खडक तोडून केलेली दिसते. त्या सपाट जागेपासून पाच ते सात पायर्या चढून गेले की मुख मंडप म्हणून ओळखला जाणारा कक्ष लागतो. या कक्षाला आधार देण्यासाठी दगडी खांब उभारलेले आहेत. मुख कक्षाच्या दोन्ही टोकांना व बाजूंना हाय रिलिफ प्रकारची शिल्पे कोरलेली आहेत. मुख मंडपातून आत गेले की सभा मंडप लागतो. यालाही आधार स्तंभ उभारलेले आहेतच. सभा मंडपाच्या भिंतीवर शिल्पे शिल्पे कोरलेली दिसत नाहीत. मात्र सभा मंडप व मुख मंडप यांत उभारलेले आधार स्तंभ जिथे छताला टेकतात त्या ठिकाणी असलेल्या ब्रॅकेट्सवर सुंदर शिल्पे साकारलेली दिसतात. सभा मंडपाच्या आतल्या बाजूस गाभार्याची गुंफा असते. या गाभारा गुंफेत एक त्या मंदिराची देवता सोडली तर इतर फारसे कोरीव काम दिसत नाही.
शैव गुंफेचा मुख मंडप
81 नृत्य मुद्रा दर्शविणारा 18 हातांचा नटराज
शैव द्वारपाल
महिषासुरमर्दिनी, म्हशीचे पारडू, महिषासुर म्हणून दाखवलेले आहे
अर्धनारीनटेश्वर, डाव्या बाजूस निम्मी पार्वती व उजव्या बाजूचा निम्मा शंकर
हरिहर
नंदीवर बसलेला शंकर मागे त्याला धरून व एकीकडे पाय टाकून बसलेली पिलियन रायडर पार्वती
शैव किंवा पहिली गुंफा ही इ.स. 543 मधे चालुक्य राजा पहिला पुलकेशी याच्या कालात खोदली गेली होती. मी पायर्या चढून मुख मंडपात प्रवेश करतो. उजव्या बाजूला 18 हात असलेल्या नटराजाचे एक सुरेख शिल्प आहे. या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यातल्या कोणत्याही दोन हाताची जोडी एक नृत्य मुद्रा दाखवते. म्हणजेच एकूण 81 नृत्य मुद्रा हा नटराज दाखवतो. या नटराजाच्या बरोबर समोरच्या बाजूस हातात त्रिशूळ घेतलेल्या द्वारपालाची मूर्ती दिसते. मुख मंडपांच्या भिंतीवर महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे. यात म्हशीचे एक पारडू महिषासुर म्हणून दाखवले आहे. याच्या बाजूला अर्धनारी नटेश्वर म्हणून शिल्प आहे. यातील देवतेची निम्मी व डावी बाजू पार्वती व निम्मी उजवी बाजू शंकर दाखवला आहे. याच्याच धर्तीवर निम्मा शंकर व निम्मा विष्णू दाखवलेले हरिहराचे शिल्प आहे. बाजूलाच असलेले एक शिल्प मला जरा वैशिष्ट्य[पूर्ण वाटते आहे. यात नंदीवर शंकर व त्याच्या मागे पिलियन रायडर म्हणून पार्वती बसलेली आहे. मात्र अलीकडे स्त्रिया स्कूटरवर जशा एका बाजूला दोन्ही पाय टाकून बसतात तशीच पार्वती नंदीवर बसलेली बघून गंमत वाटते आहे. मी सभा मंडपात प्रवेश करतो. आता फारसा उजेड नाही. परंतु आत फारसे काहीच बघण्यासारखे नाही हे लक्षात आल्यामुळे गाभार्याकडे एक दृष्टीक्षेप टाकून मी बाहेर येतो व परत पुढच्या पायर्या चढण्यास सुरवात करतो. सुमारे साठ पायर्या चढून गेल्यावर विष्णू किंवा दुसरी गुंफा समोर येते.
विष्णू त्रिविक्रम किंवा वामन अवतार
इंग्लिश न्याधीशांसारखे शिरस्त्राण घातलेले वाद्य वादक
स्वस्तिक वापरून केलेले एक बारीक डिझाइन
वराह अवतार, हातातल्या कमलावर भूदेवी उभी आहे.
विष्णू गुंफेत दोन महत्वाची शिल्पे आहेत एक म्हणजे भूदेवीची सुटका करणारा विष्णूचा वराह अवतार. यात दाखवलेली भूदेवता वराहाच्या हातातील कमलावर उभी आहे व तिने वराहाच्या मुखावर हात ठेवून त्याचा आधार घेतलेला आहे. इथले दुसरे महत्वाचे शिल्प म्हणजे बळी राजाने दान दिल्यामुळे तिन्ही लोक पादांक्रित करणारा वामन अवतार. यालाच त्रिविक्रम या नावानेही ओळखले जाते. या विष्णू त्रिविक्रम शिल्पाच्या खालच्या बाजूस काही वाद्यवादकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत या वादकांच्या डोक्यावर इंग्लंड मधील न्यायाधीश ज्या प्रकारचे एक शिरस्त्राण घालतात तसलेच दाखवलेले आहे.
हिरण्यकश्यपूचा वध केल्याने हास्य करणारा नृसिंह
हरिहर
दुसर्या गुंफेपासून परत साठ पासष्ठ पायर्या चढून गेले की महाविष्णू किंवा तिसरी गुंफा लागते. ही गुंफा इ.स. 598 मधे पहिला किर्तीवर्मा या चालुक्य राजाच्या स्मरणार्थ त्याचा भाऊ मंगलेश याने खोदून घेतली होती. या गुंफेतील प्रमुख शिल्पे म्हणजे हिरण्यकश्यपूचा नाश केल्यावर विकट हास्य करणारा नृसिंह, महाविष्णू व हरिहर यांची आहेत.
महाविष्णू किंवा तिसरी गुंफा
झाडाखाली उभे असलेले प्रेमी युगुल. पुरुष स्त्रीच्या पायाचे मर्दन करतो आहे
ऐहोले व पट्टडकल येथे दिसणारी प्रेमी युगुले या महाविष्णू गुंफेत आपल्याला परत एकदा वरच्यादर्शन देताना दिसत आहेत. या ठिकाणी ही युगुले आधारस्तंभांच्या वरच्या बाजूच्या ब्रॅकेट्सवर कोरलेली आहेत. पुरुषाकडून पायाचे मर्दन करून घेणारी एक स्त्री किंवा आंब्याच्या झाडाखाली उभे असलेले प्रेमी युगुल ही मोठी रोचक वाटतात. काही यक्ष युगुलेही दिसत आहेत. या गुंफेच्या गाभार्यात महाविष्णूची मूर्ती दिसते आहे. आणखी तीस पायर्या चढल्यावर जैन गुंफा लागते आहे. या गुंफेत पार्श्वनाथ, गोमटेश्वर किंवा बाहुबली व महावीर यांची शिल्पे आहेत.
वारुळात तप करणारा गोमटेश्वर किंवा बाहुबली
जैन गुंफा बघून मी बाहेर येतो आहे. समोरच्या मोकळ्या जागेत उभा राहून गुंफेच्या विरूद्ध दिशेला बघितल्यावर समोर एक अतिशय रम्य असे तळे दिसते आहे. या तळ्याचे नाव आहे अगस्ती तीर्थ. याच्या एका कडेला एक छान बांधलेले मंदिर दिसते आहे. या मंदिराला भूतनाथ मंदिर म्हणतात.
अगस्त्य तीर्थ
भूतनाथ मंदिर
बदामीचा हा भाग इतका रम्य आहे की चालुक्य राजांनी आपली राजधानी म्हणून हे स्थान का निवडले असावे हे लगेच लक्षात येते आहे.
माझी चालुक्य कालातील महत्वाची ठिकाणे आता बघून झाली असल्याने मला परतीचे वेध लागले आहेत. मात्र दख्खनच्या इतिहासाच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचे ठिकाण माझे बघायचे अजून राहिलेच आहे. मात्र त्यासाठी मला परत आठशे वर्षांचा काल ओलांडून, विजयनगरच्या अखेरच्या काळाकडे जायला हवे. पण हे सगळे विचार मी उद्यावर ढकलतो कारण आता हवी आहे मला फक्त विश्रांती.
21 फेब्रुवारी 2011
Comments
मस्त लेख.
नेहमीप्रमाणेच आवडला.माहितीपूर्ण आहेच/असतोच.
मी लेख वाचतो आहे. वाचताना माझ्या डोक्यात विचार येतो आहे.
"वातापि गणपतिम्" हे कर्नाटकी शास्त्रीय संगीतात पुनः पुनः जागृत/प्रसिद्ध/भक्तप्रिय देवस्थान म्हणुन ऐकल्याचं आठवतं आहे.
पूर्वीच्या काळी जिथे जिथे बलाढ्य राजसत्ता होत्या तिथेच नवनवीन देवस्थानं प्रगत झालित असं वाटतं आहे.
उदा:- हे बदामीचं ठिकाण. काशी नगरी-प्राचीन पुराणिक/महाभारतातील नगरी.
अतिप्राचीन उज्जैन नगरी. अवंती. कुशावस्ती. शाक्यांचं काठमांडु. शालिवाहनांची राजधानी पैठण/प्रतिष्ठाण.
सुरटी सोमनाथचही महत्त्व "तिथल्या राजांचं कुलदैवत" म्हणुनच ऐकल्याचं आठवतं आहे. अगदि अर्वाचीन उदाहरण म्हणजे पुण्याच्या आसपास
पेशवेकालात उदयाला आलेली पेशच्यांचं इष्टदैवत गणेशाची अष्टविनायक ठिकाणं असही वाटतं आहे.
"जिथं जिथं प्रबळ राजसत्ता होती तिथं तिथं प्रबळ धार्मिक सत्ता उदयास आली." असं म्हणण्यात तथ्य असावं का? की वस्तुस्थिती ह्याच्या उलट असावी?
--मनोबा
राजे आणि मंदिरे
मनोबा म्हणतात ते योग्य वाटते. हिंदू राजे आपल्या राजधानीत मंदिते बांधत असत. जैन किंवा बौद्ध राजे स्तूप किंवा चैत्यगृहे बांधत असत. इस्लामिक राजे आपले थडगे बांधत असत. कालांतराने या वास्तू जागृत वगैरे मानल्या जाऊ लागत.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
नेहमीसारखाच
नेहमीसारखाच माहितीपूर्ण आणि चित्रदर्शी भाग. अर्थातच आवडला.
बदामीच्या आजूबाजूचा परिसर थोडासा रखरखीत वाटतो का? खडकाळ किंवा कातळांचा? असे असेल तर अशा ठिकाणी राजधानी वसवायचे कारण काय असावे? (फतेह्पूर सिक्री सारखे तर नाही?)
दगडांच्या देशा
बदामी किल्ला व त्याच्या आजूबाजूचे डोंगर बघितले तर परिसर रखरखीत आहे असे वाटते खरे. पण प्रत्यक्षात बदामीचा परिसर मोठा सुपिक आहे. सूर्यफूल, कापूस व ज्वारीची शेती सगळीकडे दिसते. किल्ला बांधण्यासाठी योग्य जागा असल्याने येथे राजधानी वसवली असावी.
आता दख्खन हा प्रदेश दगडांचाच देश आहे त्यामुळे तो खडकाळ किंवा कातळांचा दिसणारच.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
फार छान
फार छान लेख सिरियल आहे ही. कीप इट अप.
शिवा
छान
छानच.
८१ हस्त मुद्रांचा नटराज आहे, असे आमच्या मार्गदर्शकानेसुद्धा आम्हाला सांगितले. पण मला अजून ८१ मुद्रा मोजता आलेल्या नाहीत, फक्त ६४ मुद्राच मोजता आल्या आहेत. (म्हणजे मला उजवीकडे ८ आणि डावीकडे ८ इतकेच हात दिसत आहेत. ८*८=६४. मार्गदर्शकाच्या सांगण्यावरून उजवीकडे नऊ हात, आणि डावीकडे ९ हात आहेत. ९*९ = ८१)
जैन तीर्थंकार बहुधा पार्श्वनाथ आहे. (बाहुबली नसावा. बाहुबलीच्या अंगावरती वेली असतात. पार्श्वनाथाच्या अंगावरती नाग असतात.)
पार्श्वनाथ का बाहुबली?
आमच्या मार्गदर्शकाच्या म्हणण्याप्रमाणे लेखातील तीर्थंकार हा बाहुबलीच आहे. पार्श्वनाथाचे शिल्प दुसरीकडे आहे. त्याचे छायाचित्र खाली दिले आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
8 का 9 हात
माझ्या लेखात दिलेला फोटो काळजीपूर्वक बघितला तर मूर्तीच्या डाव्या बाजूला असलेले 9 हात लगेच दिसतात. उजव्या बाजूला 8 हात स्पष्ट आहेत. 9वा हात माझ्या मते कंबरेजवळ आहे. तेथे फक्त तळवा व बोटे दिसतात.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.