वृत्ताचा समर्थ उपयोग - भा. रा. तांबे यांचे "रुद्रास आवाहन"

प्रस्तावना : कवितेत कवीकडून रसिकापर्यंत जे जाते, किंवा रसिक जे काय स्वतःहून अनुभवतो म्हणा, ते सामान्य भाषाप्रयोगापेक्षा बहुपदरी असते. सामान्य संवादामध्ये आशय पोचवला म्हणजे पुरेसे असते. नेहमीच्या संवादाच्या संदर्भांत आशय पोचवण्यासाठी जे ध्वनि-द्रव्य किंवा शब्द-द्रव्य वापरले जाते, त्याचे स्वतःहून महत्त्व नसते. कवितेत मात्र वाक्यार्थ आणि वाहन-शब्द दोन्हींमधून कवीकडून रसिकाकडे कसलेतरी संक्रमण होत असते. या मुद्द्याचे विवरण करण्यासाठी येथे भा. रा. तांब्यांच्या "रुद्रास आवाहन" कवितेच्या पहिल्या कडव्याचे उदाहरण घेतलेले आहे.
- - -

मूलपाठ्य :
डमडमत डमरु ये,
खणखणत शूळ ये,
शंख फुंकीत ये
येइ रुद्रा

ही कविता ज्यांनी-ज्यांनी वाचली असेल, त्यांनी पुन्हा-पुन्हा गुणगुणली असेल, मोठ्याने म्हटलेली असेल, आपलीशी केली असेल, याची मला खात्री आहे. माझे प्रयत्न मी पुढे सांगणार आहेच. मी ज्या उच्चारणापाशी पोचलो, ते तुम्ही पोचला त्या ठिकाणापेक्षा वेगळे असेल. या लेखाचा उद्देश माझे उच्चारण अंतिम सत्य म्हणून पटवणे नव्हे. केवळ एक मार्ग रेखाटणे, इतकाच आहे.

कवितेत फक्त वाक्यार्थ-आशय नाही, आणखी काही आहे
आधी एक छोटासा मुद्दा सोदहारण बाजूला सारणे उपयोगाचे ठरावे. या कवितेत आशयापेक्षा जास्त काहीतरी आहे हे बघूया. माझ्या पुढील "अनुवादा"त आशय बहुतांशी उतरलेला आहे, असे मला वाटते :
डमरूने ताल धरित
शूळाला खणकावित
शंखाचा नाद करित
रुद्रा ये गा.

वेगळे वृत्त का असेना हा अनुवाद वृत्तबद्धही आहे. मराठीवेगळ्या भाषेत भाषांतर करायचा प्रयत्न केला असता तर यापेक्षा अधिक महत्त्वाकांक्षा फार धाडसी भाषांतरकाराने ठेवावी! परंतु पुढील ध्वनिमुद्रण ऐकून आपणा सर्वांना जाणवेल, की शब्दार्थाचा आशय पोचला तरी भा. रा. तांब्यांच्या कवितेतले खूप काही पोचलेले नाही.

Get this widget | Track details | eSnips Social DNA

हा प्रकार फारतर भाषांतरित कविता म्हणून खपेल. शब्दार्थ-वाक्यार्थाच्या आशयापेक्षा पुष्कळ काही भा. रा. तांब्यांच्या शब्दांकनात आहे हे आता चांगलेच स्पष्ट असावे.

लय-ताल-ठेका
तांब्यांच्या या कवितेचा त्या मानाने सहजसाध्य असलेला पदर म्हणजे त्याचा लय-ताल-ठेका. कवितेच्या संदर्भात याचे विश्लेषण करण्यापूर्वी गद्य उच्चारात शब्दांतील आघात बघूया :
'मडमत 'मरु 'ये, 'णखणत 'शूळ 'ये, 'शंख 'फुंकीत 'ये, 'येऽ(इ) रु'द्रा.
येथे ऐकूया :

Get this widget | Track details | eSnips Social DNA

सुरुवातीला मला हा गमतीदार ताल आपोआप सुचला.
डम'मत 'मरु ये,
खण'णत 'शूळ ये,
(दन धनन धनन दन
दन धनन धनन दन...*)
*वरील बोल हे शास्त्रीय संगीताच्या तबल्यांच्या बोलांपेक्षा वेगळे आहेत. प्रमुख आघातासाठी "ध", दुय्यम आघातासाठी "द" आणि विनाआघाती मात्रेसाठी "न" अक्षर वापरलेले आहे.
आघातांचे हे विचलन फार विचित्र नाही. "डमडमत" आणि "खणखणत" हे ध्वनिसुचक द्वित्त शब्द आहेत. पहिल्या किंवा दुसर्‍या द्वित्तावर आघात दिल्यामुळे मराठीच्या नैसर्गिक आघातांवर फार हिंसा होत नाही. आता हे ऐकूया :

Get this widget | Track details | eSnips Social DNA

काय झोक आहे! विचलित आघातांमुळे (सिन्कोपेशनमुळे) हा झोक येत आहे. दुर्दैवाने हा ताल ग्राह्य नाही. त्याच झोकदार तालात पुढील ओळ म्हणता नैसर्गिक आघातांचा विचका होतो :
डम'मत 'मरु ये,
खण'णत 'शूळ ये,
शं' 'फुंकीत ये
ये' 'रुद्रा
हे ऐकूया :

Get this widget | Track details | eSnips Social DNA

आणि जर पुढल्या ओळीवर नैसर्गिक आघात कायम ठेवले, तर आदल्या तालाशी सांधा साधला जात नाही. कवितेत वेगळाच ताल येणे काही चूक नाही. पण तसे झाल्यास वाचका-ऐकणार्‍याला जो झटका बसतो, त्याचे काहीतरी प्रयोजन हवे. असे काही उगाच आशयद्रव्याशी असंबंद्ध झाले तर फारच बेकार-बेढब वाटते.
डम'मत 'मरु ये,
खण'णत 'शूळ ये,
'शंख 'फुंकीत ये
'येइ रु'द्रा

Get this widget | Track details | eSnips Social DNA

तर मग या झोकदार तालाचा मोह बाजूला ठेवून नैसर्गिक आघातांचा तालासाठी आधार घेऊन बघूया.
"मडमत 'मरु ये,
"णखणत 'शूळ ये,
"शंख फुं'कीत ये
"येइ रु'द्रा
फक्त एकच आघाताचे विचलन झालेले आहे : 'फुंकीत ऐवजी फुं'की
हेसुद्धा एका गुरू अक्षरावरून दुसर्‍या गुरू अक्षरावर विचलन झालेले आहे, म्हणजे साहजिकच वाटते :

Get this widget | Track details | eSnips Social DNA

तालात प्राथमिक, दुय्यम आणि तृतीयश्रेणीचे आघात आहेत. (मी ते ध-द-त असे उच्चारलेले आहेत.) पुन्हा-पुन्हा आवर्तन झाले तरी कंटाळवाणा होणार नाही, इतकी गुंतागुंत आहे. अतिशय जोराने रेटा देत बळेच वाचकाला प्रवाहात ओढत नेणारा हा ताल पूर्ण कडव्यास व्यापतो :

Get this widget | Track details | eSnips Social DNA

माझ्यापुरते बघता ही लय, हा ताल आशयास पूरक आहे. हा ताल बदलत नाही, एक स्थिर भूमी देतो. त्याच्या अंतर्गत अनुप्रासांची यमकांची लय कमीअधिक होते :
डम-डमत डम...
खण-खण...
शूळ... शंख
(श)ङ्ख (फु)ङ्क
...ये ...ये ...ये
सर्वांची अंतर्गत लय वेगवेगळी आहे.

त्यांचा प्रभाव होण्याकरिता तालाची स्थिर पार्श्वभूमी कळीची आहे.

सारांश
या कवितेच्या शब्दार्थ-वाक्यार्थांतून आशय व्यक्त होतो, तो होतोच. त्याशिवाय वृत्तात आघातांची मांडणी नेमकी असल्यामुळे ध्वनीमध्ये रुद्रावताराचे तांडव व्यक्त होते. ध्वनि-शब्द हे शब्दार्थ-आशयाचे केवळ वाहन न राहाता एक श्राव्य-चित्र होते. वृत्तबद्ध कविता या कलाप्रकाराचे हे अंगभूत सामर्थ्य आहे. या उदाहरणात ध्वनिचित्राचा स्तर जितका सहजप्राप्य आहे, तितका अन्य कवितांमध्ये नसेल. मात्र कुठल्याही उत्तम वृत्तबद्ध कवितेत या श्राव्यकलावस्तूकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दुर्लक्ष केल्यास रसिक आस्वादाच्या एका सुंदर पातळीस मुकलाच.

- - -

जाता-जाता काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत :
१. मुळात कविता वाचताना मी तांत्रिक पारिभाषिक शब्दांत विचार केला नाही. फक्त पुन्हापुन्हा कविता गुणगुणलो. जे काय पर्याय गुणगुणले, त्यांच्याबद्दल तांत्रिक विवेचन पश्चाद्विश्लेषणाने केलेले आहे.
२. मुळात कवीनेसुद्धा कुठलाही तांत्रिक विचार केलेला नसणारच. मात्र इतक्या गेय कविता रचणारे तांबे हे कविता आळवून आळवून पूर्ततेस नेत असतील, याबद्दल मला खात्री वाटते. आळवता-आळवता त्यांना प्रतिभेने (आणि सुदैवानेही) काही शब्द सापडले असणार. त्यांनी प्रतिभेने अंतिम रूप स्थिर केल्यावर त्या स्थिर रूपाचे विश्लेषण आपण जरूर करू शकतो.
३. मला समाधान वाटलेले उच्चारण हेच कवीला अध्याहृत उच्चारण असेल, किंवा हा लेख वाचणार्‍यांचे समाधान करणारे उच्चारण असेल, असे माझे प्रतिपादन नव्हे. परंतु अन्य रसिकांनासुद्धा आशयाला समृद्ध करणारा कुठलातरी ताल सापडला असेल याबद्दल मला खात्री आहे. ताल सोडता अन्य अलंकार हे बेमालूम असू शकतात. अनुप्रास-यमके वगैरे लक्षात न येतासुद्धा आपला परिणाम नकळत करतात. पण अतिशय बलवान लय-ताल-ठेका मात्र या कवितेत कुठल्याही रसिकाच्या लक्षात आल्याशिवाय राहाणार नाही.

Comments

ही कविता कोणत्या वृत्तात आहे ???

ही कविता कोणत्या वृत्तात आहे ???

मुळात कवीनेसुद्धा कुठलाही तांत्रिक विचार केलेला नसणारच. मात्र इतक्या गेय कविता रचणारे तांबे हे कविता आळवून आळवून पूर्ततेस नेत असतील, याबद्दल मला खात्री वाटते. आळवता-आळवता त्यांना प्रतिभेने (आणि सुदैवानेही) काही शब्द सापडले असणार. त्यांनी प्रतिभेने अंतिम रूप स्थिर केल्यावर त्या स्थिर रूपाचे विश्लेषण आपण जरूर करू शकतो

प्रतिभाशाली कवींची कविता लिहिण्याची प्रक्रिया अशीच असते . आधी ताल सूचत जातात, नंतर त्यावर शब्द आपसूकच येउन बसतात. ठरवून वृत्तात लिहायची म्हणून ते लिहीत नसतात. गदिमा, केशवसुत , अगदी ग्रेस सुध्दा हेच फोलो करताना दिसतात...

नाव माहीत नाही

नाव माहीत नाही. पण मात्रा/गणवृत्ताची लक्षणे स्पष्ट कळून येतात :
५ । ५ ॥ ५ । ५ ॥ ५ । ५ ॥ ५ +गु
असे वृत्त समजून येते.
पहिल्या तीन ओळींत अंत्ययमक आहे.

कोणाला जातीचे/वृत्ताचे नाव माहीत असले, तर जरुर द्यावे, ही विनंती.

खरंच कोणते वृत्त असेल हे?

व्याकरणाच्या पुस्तकात वृत पाहिली. हा पाच पाचचा संच सापडला नाही. भा. रा. तांबे यांच्या 'नववधू प्रिया मी बावरते' काव्यावरुन 'नववधू' हे वृत्त रुढ झाले. 'रुद्रास आवाहन' ही कविता प्रचलित वृत्तांमध्ये नसल्यास या वृत्ताला 'रुद्र' म्हणावे का?

हे काव्य लक्षात राहण्याचे कारण म्हणजे त्यात ओतप्रोत असलेला रौद्र रस.

डमडमत डमरु ये
खणखणत शूल ये
शंख फुंकित ये
येई रुद्रा

प्रलयघनभैरवा
करीत कर्कश रवा
घे अक्राळविक्राळ
कृद्ध मुद्रा

विशेषतः या कवितेतील पुढील ओळी अगदी आजच्या काळासही लागू आहेत.

पाड ती सिंहासने पालथी
ओढ हत्तीवरुनी मत्त नृप खालती
मुकूट रंकास दे, करटी भूपाप्रती

जाति-वृत्त

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रस्तुत कवितेविषयी"मराठी साहित्य व व्याकरण"(ले.मोरेश्वर स.मोने) आवृत्ती आठवी १९४७ या पुस्तकात लिहिले आहे:
..............................................................
झंपा (वीरभद्र) मात्रा (२०+१७)
यांत प्रथमार्धात ५/५ मात्रांचे चार गट असतात, उत्तरार्धात तीन गट आणि शेवटी गुरु अक्षर असते.अशा प्रकारची चरण युग्मके असतात.
.

डुम् डुमत, डमरु ये|खण् खणत, शूल ये|
शंख फुं,कीत ये| येईं रुद्रा|१|

.
कवि अनेक तर्‍हांची चरण युग्मके, ध्रुवपदे,अंतरे इ.जुळवून कविता करितात.त्यामुळे जाति-वृत्तांचे अनेक प्रकार ,उपप्रकार होतात.येथे केवळ प्रसिद्ध आणि प्रचलित कवितांची जाति-वृत्ते दिली आहेत.कवि आणखी जे सुंदर रीतीने प्रकार निर्माण करितील त्यांची शास्त्रशुद्ध छाननी उत्तरोत्तर होत राहील.
सध्या सुंदर रीतीने गाईलेल्या कवितांचा स्वरमाधुर्य व शब्दमार्दव यांच्या योगे घरोघरी फैलाव होत आहे.म्हणून या जाति-वृत्तांसंबंधी काही ढोबळ माहिती असणे जरूर आहे.ती इथे दिली आहे.

झंपा/झपताल

चांगली माहिती आहे.
हिंदुस्तानी संगीतातल्या झपतालाला झंपा असेसुद्धा म्हणतात. त्याचे बोल :
धीना | धीधीना | तीना | धीधीना
(+ - | २ - - | ० - | ४ - - )
म्हणजे १० मात्रांचा, त्यातही (२+३=)५/५ असे विभाग असलेला ताल आहे हा.

उत्तम लेख

उत्तम लेख आणखी येऊ देत
चन्द्रशेखर

सेर सिवराय

धनंजय यांनी एवढी मेहनत घेऊन तयार केलेल्या ध्वनिफिती मी ऐकू शकलेलो नाही. 'डमडमत डमरू ये' ही कविता आम्ही शाळेत असतांना जशा आवेशात म्हणत होतो त्याची आठवण मला 'सेर सिवराय है' हे गाणे ऐकतांना होत असे.

ध्वनिफिती

गेले कित्येक महिने संगणकाचे स्पीकर्स बंद आहेत. फारशी कधी अडचण जाणवली नाही. आता मात्र जाणवतेय.
प्रतिसाद आणि विश्लेषण वा़चतोय. ऐकायची ओढ आहे.

प्रमोद

सलग लघू अक्षरे

ध्वनिफिती ऐकल्या. विश्लेषणही आवडले.

डमडमत डमरु ये,
खणखणत शूळ ये,
शंख फुंकीत ये
येइ रुद्रा

वरील ओळीत माझ्यामते आलेले ७ किंवा ५ लघू अक्षरे आणि त्यातला अनुप्रास त्यामुळे झोकात कविता म्हटली तर एखाद्या तालवाद्याचे बोलच ऐकतो आहोत असे वाटू शकते. एक शंका: डमडम, खणखण हे शब्द ऑनमॅटपियाची उदाहरणे म्हणता येतील का?

ध्वनि-शब्द हे शब्दार्थ-आशयाचे केवळ वाहन न राहाता एक श्राव्य-चित्र होते. वृत्तबद्ध कविता या कलाप्रकाराचे हे अंगभूत सामर्थ्य आहे. या उदाहरणात ध्वनिचित्राचा स्तर जितका सहजप्राप्य आहे, तितका अन्य कवितांमध्ये नसेल. मात्र कुठल्याही उत्तम वृत्तबद्ध कवितेत या श्राव्यकलावस्तूकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दुर्लक्ष केल्यास रसिक आस्वादाच्या एका सुंदर पातळीस मुकलाच.

सारांशाशी बहुतांशी सहमत आहे. श्राव्यकलावस्तूप्रेमींशिवाय कविता जात्याच नादमधुर असल्यास, तिला उत्तम शाब्दिक लय असल्यास संगीत देताना फायदा होत असावा. मात्र श्राव्य-चित्र तयार करणे हा प्रत्येकवेळी कवीचा किंवा कवितेचा हेतू असेलच किंवा असावाच असे नाही.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

ध्वनि-अनुकरण, सलग लघू - बरोबर

"डमडमत" आणि "खणखणत" ही मराठीतली ध्वन्यनुकरणाची (ओनोमॅटोपिया) उदाहरणे आहेत हे बरोबर आहे. गंमत म्हणजे "निरर्थक" ध्वनीचे अनुकरण काय होते, याबाबत भाषा-भाषांच्या लकबी वेगवेगळ्या असतात.
उदाहरणार्थ इंग्रजीमध्ये "ब" आणि "प" हे ध्वनी ढोल-डफाचे अनुकरण म्हणून लोकांना सुचतात. उदाहरणार्थ :
"बाडाबिङ्-बाडबुम्" ; किंवा एका प्रसिद्ध लोकगीतातले "रम्-पप-पम्-पम्"
मराठी भाषा बोलताना ब/प हे ढोल-डफाच्या अनुकरणासाठी सुचायची शक्यता कमीच. हिंदुस्थानी संगीतातल्या तबल्यांच्या बोलांमध्ये "प/ब" हे कुठेच येत नाहीत, ते हिंदी-मराठींच्या भाषिक लकबीमुळेच असेल.
कुत्र्याच्या भुंकण्याचे अनुकरण करताना कितीतरी इंडो-युरोपियन भाषांत "ब/भ"कार आढळतो. मराठीत "भूभू", इंग्रजीत "बाववाव" वगैरे. पण तमिऴमध्ये मुलांना आधी कळतो तो अनुकरण-शब्द "लोऴ-लोऴ" असा असतो - म्हणजे खूपच वेगळा.
"खण्" या शब्दात धातूची वस्तू आपटल्याचे अनुकरण आहे, हे जितके मराठी माणसाला पटेल, तितके "रॅटल्" मध्ये वाटणार नाही. इंग्रजीभाषकाच्या बाबतीत उलट क्रमाने पटतील.

- - -

सुरुवातीला अनेक लघू अक्षरे घेणे हे तालवाद्याच्या आभासासाठी महत्त्वाचे आहे. बरोबर आहे.
अर्थातच माझे-तुमचे हे वाक्य अतिसुलभीकृत आहे हे मान्य करूया. अक्षरांच्या लघुगुरुत्वाशिवाय वापरलेल्या व्यंजनांचे महत्त्वही फार आहे. उदाहरणार्थ :
छन्-खळखळ-छन् ढुम्-ढुम्-पट-ढुम् लेझिम चाले जोरात...
...गागाललगा...

माझा "अनुवाद" करताना मी पुन्हापुन्हा कडवे गुणगुणलो होतो. काही करून अनुवादात मुळातले ध्वनिचित्र पुसट व्हावे, असा माझा प्रयत्न होता. लघुगुरू मोजले नव्हते, तरी माझ्या अंतिम कृतीचे विश्लेषण करता येतेच. यात सुरुवातीच्या प्रत्येक भृंगावर्तनात २-३ गुरू आहेतच. यावरून तुमचा लघुमात्रांबद्दल कयास पटतो.

अर्थात व्यंजनांचा उपयोग करून मी असेही तालवाद्याचे ध्वनिचित्र तयार करू शकतो :
ढोलास ढुम्-ढुम्-क झोकात ठोकून
टाळा-मृदंगास साथीस घेऊन
तुण्-तुण् करी एकतारी मधून
आनंद गोंगाट गर्दी भरून
(याची कलाकृती करायला स्फूर्ती/प्रतिभा हवी.)

- - -

कविता/कलाकृती म्हटली म्हणजे वाक्यार्थापेक्षा अधिक कुठल्याशा स्तरावर आशय असणारच, असा सामान्यनियम मी मानतो. मग ते स्तर कुठले का असेनात. हे उदाहरण घेण्याचे कारण की या उदाहरणात ध्वनिचित्र अतिशय सहजप्राप्य आहे. इतके सहजप्राप्य आहे, की रसिकाने गुणगुणून थयथयाटाचे ध्वनिचित्र बनवावे हे कवीचे प्रयोजनच होते, ही बाब सहज पटते. या स्तरापेक्षा अस्पष्ट स्तरांवरसुद्धा भा. रा. तांब्यांनी आशयपोषण केलेले आहे, असे माझे मत आहे. पण ते सर्व "अस्पष्ट" स्तर असे असतात, की त्याबाबत रसिका-रसिकामध्ये मतभेद असू शकतात. इतकेच काय काही बाबतीत रसिक आणि कवी यांच्यामध्ये मतभेद असू शकतील!

येथे एक मुद्दा पटवायचा होता. म्हणून रसिका-रसिकात मतभेद होतील असे उदाहरण घेऊन चालले नसते. इतके गडद-स्पष्ट ध्वनिचित्र घेण्यावाचून पर्याय नव्हता.

कविता करताना कवीला भरपूर स्वातंत्र्य उपलब्ध असते. तरी कवी जाणूनबुजून स्वतःवर मर्यादा घालून घेतो. आणि "आपण अमुकतमुक मर्यादा घालून घेतली" हे त्या परंपरेतील रसिकाला जाहीरही करतो. उदाहरणार्थ : गझलेत "आपण अमुक इतका लांबलचक काफिया, अमुक असा रदिफ घेतला आहे" ही घोषणा कवी मतल्यात करतो. अमुकच मर्यादा स्वतःवर घालून घेण्याची कुठलीही सक्ती कवीवर नसते. पण एकदा का या मर्यादा स्वतःहून आनंदाने घोषित केल्यावर त्या जर पाळल्या नाहीत, तर काय म्हणावे? दोन पर्याय सहज मनात येतात : (१) जर कवीच्या कुवतीबद्दल आदल्या कवितांमधून किंवा याच कवितेमधून खात्री असेल, तर "प्रमाद" ही पहिली शक्यता बाजूला ठेवावी लागते. (२) दुसरा पर्याय की कवी या ठिकाणी बंड पुकारतो आहे. आणि कमकुवत नसल्यामुळे आशयघनतेसाठीच हे बंड पुकारतो आहे. ज्या ठिकाणी रसिकाची अपेक्षा तोंडघशी पाडतो आहे, त्या ओळीचे/शब्दाचे काही विशेष महत्त्व जर नसेल, तर ती रचना चक्रावून टाकेल. रसभंग करेल.

रदिफ-काफिया चे वरील उदाहरण कवीने घोषित केलेल्या कुठल्याही मर्यादेसाठी मी सामान्यीकृत करत आहे. वृत्त हे शुद्ध ध्वनींबद्दल (अर्थापासून अपोद्धार - ऍब्स्ट्रॅक्शन करून) मर्यादा आहे. कविता रसिकापुढे मांडण्यापूर्वी कवी वाटेल ते वृत्त निवडण्यास स्वतंत्र आहे. पण कवी अमुक कुठले वृत्त निवडतो. सर्व स्वातंत्र्य असताना केलेली ही निवड आशयाला अनुरूप असावी, अशी रसिकाने किमान अपेक्षा ठेवावी. या अपेक्षेविरुद्ध सुद्धा कवी बंड करू शकतो. पण ते बंड समर्थ असावे. (वेगळ्या कलेचे उदाहरण घेऊन : इंद्रधनुष्याचा फोटो बनवताना कृष्णधवल मर्यादा स्वतःवर घालू नये, असे कोणीही रसिक म्हणेल. पण एखादा प्रकाशचित्रकार या अपेक्षेविरुद्ध बंड करून आह्वान घोषित करेल "मी कृषणधवलाची मर्यादा घेतो, आणि इंद्रधनुष्याचे चित्र सुंदर करून दाखवतो." हे आह्वान शब्दात सांगायची गरज नसते. कृष्णधवलाच्या निवडीतच ते आह्वान सांगितले जाते. पण आह्वान घोषित केल्यानंतर ते अचाट कार्य जमले नाही, तर कलाकृती फसली.)

यतिभंगाबाबत माझे असेच काही विश्लेषण आहे. अमुक ठिकाणी मी यती घेणार असे कवीने घोषित केले, समजा. (ही घोषणा वेगळी करावी लागत नाही. पहिल्या दोन-तीन ओळीत मर्यादा पाळली म्हणजे "घोषणा केली".) त्यानंतर कवी यतिभंग करणार नाही, अशी रसिकाची रास्त अपेक्षा असते. या रास्त अपेक्षेविरुद्ध बंड जरूर करता येते. पण मग "हे बंड केल्यामुळे आशय अधिक सघन होतो आहे" असे आह्वान कवी घोषित करतो. असे नसेल, तर पर्यायाने कवी रसिकाला असे तरी सुचवतो - "यतिभंग झाला असे तुला वाटते, तिथे तुझा नेहमीचा शब्दोच्चार नको करूस. मुद्दामून शब्द तोडून अपेक्षेप्रमाणे यती घे, आणि आशयाचा वेगळाच पैलू, वेगळाच स्तर तुला जाणवेल. माझे बंड तुझ्या यतीविरुद्ध नाही, तर मराठी भाषेतील या एका शब्दोच्चाराच्या विरुद्ध आहे." असे काही नसेल तर रसिकाशी असा हा खेळ "मी सांगितली यती घेतो - पण कसे फसवले टुक्-टुक्!" बेचव होतो.

रसिकांची अपेक्षा

"डमडमत" आणि "खणखणत" ही मराठीतली ध्वन्यनुकरणाची (ओनोमॅटोपिया) उदाहरणे आहेत हे बरोबर आहे. गंमत म्हणजे "निरर्थक" ध्वनीचे अनुकरण काय होते, याबाबत भाषा-भाषांच्या लकबी वेगवेगळ्या असतात.उदाहरणार्थ इंग्रजीमध्ये "ब" आणि "प" हे ध्वनी ढोल-डफाचे अनुकरण म्हणून लोकांना सुचतात. उदाहरणार्थ :
"बाडाबिङ्-बाडबुम्" ; किंवा एका प्रसिद्ध लोकगीतातले "रम्-पप-पम्-पम्"

फारच रोचक.

कविता करताना कवीला भरपूर स्वातंत्र्य उपलब्ध असते. तरी कवी जाणूनबुजून स्वतःवर मर्यादा घालून घेतो. आणि "आपण अमुकतमुक मर्यादा घालून घेतली" हे त्या परंपरेतील रसिकाला जाहीरही करतो. उदाहरणार्थ : गझलेत "आपण अमुक इतका लांबलचक काफिया, अमुक असा रदिफ घेतला आहे" ही घोषणा कवी मतल्यात करतो. अमुकच मर्यादा स्वतःवर घालून घेण्याची कुठलीही सक्ती कवीवर नसते. पण एकदा का या मर्यादा स्वतःहून आनंदाने घोषित केल्यावर त्या जर पाळल्या नाहीत, तर काय म्हणावे?

गझलेबाबत मतल्यात निश्चित झालेल्या मर्यादा पाळायल्या हव्यात गझलेत अशा मर्यादा पाळल्या नाहीत तर गझल राहणार नाही. ह्या मर्यादा म्हणजे वृत्त आणि अलामत, यमक-अन्त्ययमकविषय नियमांचे पालन. ह्याशिवाय गझल ह्या काव्यप्रकारात इतर कुठल्या मर्यादा आहेत?

दोन पर्याय सहज मनात येतात : (१) जर कवीच्या कुवतीबद्दल आदल्या कवितांमधून किंवा याच कवितेमधून खात्री असेल, तर "प्रमाद" ही पहिली शक्यता बाजूला ठेवावी लागते. (२) दुसरा पर्याय की कवी या ठिकाणी बंड पुकारतो आहे. आणि कमकुवत नसल्यामुळे आशयघनतेसाठीच हे बंड पुकारतो आहे. ज्या ठिकाणी रसिकाची अपेक्षा तोंडघशी पाडतो आहे, त्या ओळीचे/शब्दाचे काही विशेष महत्त्व जर नसेल, तर ती रचना चक्रावून टाकेल. रसभंग करेल.

हे सोदाहरण सांगितल्यास बरे होईल. अशी अपेक्षा लक्षात ठेवून काव्यरचना करायला हवी का हा मुद्दा आहे. माझी कविता वाचून रसिकाच्या मनात एक सुंदरसे ध्वनिचित्र निर्माण व्हायला हवे, ती एक निरुपम श्राव्यकलावस्तू असायला हवी असे ठरवून कविता रचायला नको असे मला वाटते. दुसरे थोडेसे अवांतर म्हणजे केवळ यूफनी किंवा नादमाधुर्य हाच कवितालेखनाचा हेतू असायला हवा का? सिड्या किंवा अल्बम काढायचे असल्यास ठीक आहे. काहीतरी छानछान, गोडगोड कानांवर पडायला हवे म्हणून पोकळपोकळ शब्द वृत्तात मांडून वाढले जातात. असो. वेगळ्या चर्चेचा विषय आहे.

वृत्त हे शुद्ध ध्वनींबद्दल (अर्थापासून अपोद्धार - ऍब्स्ट्रॅक्शन करून) मर्यादा आहे.

शुद्ध ध्वनींबद्दल मर्यादा हे पुरेसे कळले नाही. कृपया सोदाहरण सांगावे.

यतिभंगाबाबत माझे असेच काही विश्लेषण आहे. अमुक ठिकाणी मी यती घेणार असे कवीने घोषित केले, समजा. (ही घोषणा वेगळी करावी लागत नाही. पहिल्या दोन-तीन ओळीत मर्यादा पाळली म्हणजे "घोषणा केली".)

अशी घोषणा मी गृहीत धरत नाही. गृहीत धरू नये असे मला वाटते.

त्यानंतर कवी यतिभंग करणार नाही, अशी रसिकाची रास्त अपेक्षा असते.

काही, किंबहुना बहुसंख्य, रसिकांची अशी अपेक्षा असू शकते. शेवटीयती मानण्यावर असतो. रास्त असणे नसणे शेवटी सापेक्ष आहे. इथे बंडाचा प्रश्न उद्भवत नाही असे वाटते.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

काही उत्तरे

पण काही उत्तरे देण्यापूर्वी काही खुलासे. म्हणजे "अमुक माझे मुद्दे नाहीत" असे स्पष्ट केले म्हणजे त्या बाबतीत मी उत्तरे देणार नाही, हे येईलच. या मुद्द्यांच्या बाबतीत आपली सहमती आहे. फरक असल्याबाबत गैरसमज असू नयेत.

माझी कविता वाचून रसिकाच्या मनात एक सुंदरसे ध्वनिचित्र निर्माण व्हायला हवे

नाही. असा माझा मुद्दा मुळीच नाही. जी काही निर्मिती होईल ती बहुआयामी आणि एकसंध असेल. हेसुद्धा "उद्दिष्ट" नाही. मात्र बहुआयामी आणि एकसंध नसली तर कलाकृती एकसुरी-रटाळ आणि गोंधळलेली असेल.

दुसरे थोडेसे अवांतर म्हणजे केवळ यूफनी किंवा नादमाधुर्य हाच कवितालेखनाचा हेतू असायला हवा का?

मुळीच नाही. (वरील खुलासाही बघावा.) नाद मधुर असला पाहिजे किंवा यूफोनिक असला पाहिजे असे मुळीच नाही. नाद मुद्दामून तिखट/कडवट असला तरी चालेल. मुळात कुठलाच नाद अभिप्रेत नसून केवळ सुलेखन असलेल्या (वाटल्यास मुद्दामून गिचमिड लेखन असलेल्या) कलाकृतीसुद्धा आपण बघतोच ना. पण जे काय आहे, ते बहुआयामी आणि एकसंध असावे. वरील गैरसमज न व्हावा म्हणून मी मूळ लेखात प्रयत्न केला होता. उदाहरणार्थ लेखातील एका ध्वनिफितीत फक्त "धनतनन दननतन" असे बोल आहेत. त्या ध्वनिफितीत नादमाधुर्य आहे, पण वाक्यार्थ आशय नाही. भा. रा. तांब्याच्या कवितेऐवजी ते बोल नुसते रचले असते, तर ती रचना अतिशय दरिद्री असती, हे वेगळे सांगितले नाही, तरी सुस्पष्ट असावे.

वृत्त आणि अलामत, यमक-अन्त्ययमकविषय नियमांचे पालन. ह्याशिवाय गझल ह्या काव्यप्रकारात इतर कुठल्या मर्यादा आहेत?

आणखी कुठल्याच मर्यादा आठवत नाहीत. माझ्या वरील प्रतिसादात याच मर्यादा अभिप्रेत होत्या. त्यातही विशेष काफिया आणि रदिफाचे विवेचन केले आहे. बेहराबाबत समांतर विवेचन अध्याहृत होते.

- - खुलासे संपले --

(अमुक कुठली) अपेक्षा लक्षात ठेवून काव्यरचना करायला हवी का हा मुद्दा आहे.
निश्चित झालेल्या मर्यादा पाळायल्या हव्यात गझलेत अशा मर्यादा पाळल्या नाहीत तर गझल राहणार नाही.

वरील दोन वाक्ये वेगवेगळ्या परिच्छेदांतली आहेत. परंतु मी ती एकत्र विचारात घेतो आहे. "अमुक" अशी कुठलीही अपेक्षा सुरुवातीला नसते. इतकेच काय कविता गझल असावी ही अपेक्षासुद्धा सुरुवातीला नसते. आणि जर गझल नसेल तर मतल्यासारख्या भासणार्‍या प्रथम द्विपदीला "हा मतलाच नाही, आणि या मर्यादाच नाहीत" असे म्हणण्यास कवी स्वतंत्र असतो. मात्र त्या कवीच्या आणि रसिकाच्या परंपरेत गझल-प्रकार असला, तर पहिली द्विपदी वाचून रसिकाचा संभ्रम होऊ शकतो, खरा. ज्या काय मर्यादा कवी स्वीकारतो, त्या सुरुवातीनंतर कधीतरी स्वखुशीने स्वीकारतो.

दोन पर्याय सहज मनात येतात : (१) जर कवीच्या कुवतीबद्दल आदल्या कवितांमधून किंवा याच कवितेमधून खात्री असेल, तर "प्रमाद" ही पहिली शक्यता बाजूला ठेवावी लागते. (२) दुसरा पर्याय की कवी या ठिकाणी बंड पुकारतो आहे. आणि कमकुवत नसल्यामुळे आशयघनतेसाठीच हे बंड पुकारतो आहे. ज्या ठिकाणी रसिकाची अपेक्षा तोंडघशी पाडतो आहे, त्या ओळीचे/शब्दाचे काही विशेष महत्त्व जर नसेल, तर ती रचना चक्रावून टाकेल. रसभंग करेल.

हे सोदाहरण सांगितल्यास बरे होईल.

पहिल्या पर्यायाबाबत खरोखर उदाहरण द्यायला सांगू नका. पौगंड मुलांनी केलेल्या कविता वाचताना, किंवा नवशिक्या लोकांनी केलेल्या कविता वाचताना आपल्याला "प्रमाद" पटकन जाणवतो. वाटल्यास येथे मीच एक प्रामादिक वृत्तभंग असलेली रचना मी शिघ्र-रचून देतो :
कवी हे किती मोडिती अक्षरांना
तरी त्यांस स्वातंत्र्य द्यावे म्हणू का?
या इथे लगागा नको का रचाया
किती होतसे त्रास वाचावयाला

आता दुसर्‍या पर्यायासाठी उदाहरण म्हणून मर्ढेकरांचे हे कडवे घेऊया (गझलेचे सुस्पष्ट उदाहरण माहीत नाही, कमी सुस्पष्ट उदाहरण वेगळ्या प्रतिसादात देईन.) :

"असें न कांही घडले : फक्त
अनंत उठले सुतकी शब्द;
दो मिनिटांची सडी शांतता
शहारली अन् मिटली लब्ध--
.................
प्रतिष्ठितांवर : "
.................
................. -- वदला पौष
जातां जातां या माघाला;
अन् इसवी सन कवायतीचा
कदम उचलुनी पुढे सरकला.

हे उदाहरण सापडणे सुद्धा फारच निवडक आहे. यतिभंगाचे भडक उदाहरण, आणि तेसुद्धा ज्या कवीला यती राखण्याची चाड आहे अशा कवीच्या कवितेतलेच उदाहरण देणे भाग आहे. आणि यतिभंग मुद्दामून केला आहे, हे कवीने सूचित केले, असेच उदाहरण हवे. नाहीतर मी उगाच आपलाच अर्थ रेटतो आहे, असे खंडन शक्य होते. तसे हे वरचे उदाहरण "निवडक" आहे. ओळीच्या अंतीची यती ही त्यातल्या त्यात फारच "पवित्र" असावी. मराठी कवींच्या कवितांमध्ये या यतीचा भंग केल्याची उदाहरणे क्वचितच दिसतात. मर्ढेकरांच्या समग्र कवितेत ओळीच्या अंतीच्या यतीचा भंग इन-मिन-तीन वेळा दिसतो, त्यापैकी हे एक उदाहरण आहे : "लब्ध-\प्रतिष्ठितांवर". मर्ढेकरांच्या समग्र कवितेवरून असे दिसते, की त्यांनासुद्धा ही यती ९९%पेक्षा खूपखूप जास्त पाळायलाच आवडते. मर्ढेकरांचीच इच्छा आहे म्हणून मी ही यती पाळली जावी ही अपेक्षाही करतो. ती पाळण्याइतपत शब्दभांडार आणि कल्पकता मर्ढेकरांपाशी आहे, असे मी सहज म्हणू शकतो. या ठिकाणी यतिभंग केलेला आहे ते त्यांनासुद्धा ठाऊक आहे : "लब्ध-" अशी आडवी रेघ देऊन शब्द पुढल्या ओळीवर चालू आहे असे त्यांनीच सुचवले आहे. विरामचिह्नांच्या उपयोगाबाबत मर्ढेकर काटेकोर होते, असे कवितासंग्रहाचे संपादक श्री. पु. भागवत म्हणतात. म्हणजे ही आडवी रेघ मर्ढेकरांनी काटेकोरपणे घातली आहे, असे मानण्यास सबळ कारण आहे. या ठिकाणी रसिकाची पादांतयतीची अपेक्षा कवी तोंडघशी पाडतो आहे. ती प्रमादाने नव्हे तर मुद्दामून, असे मानणे क्रमप्राप्त आहे.

या ठिकाणी मर्ढेकरांनी रसिकाला जाणूनबुजून (अपेक्षाभंग करून) अडखळायला लावले आहे. रसिक येथे थबकेलच. एखादा रसिक अनवधानानाने (!) अडखळला नाही असे व्हायला नको, म्हणून ओळींमध्ये पॅराग्राफ बदलल्यासारखे मोठे लाइन-स्पेस दिलेले आहे. तस्मात् कविता वाचताना त्या ठिकाणी वृत्ताच्या लयीस मुरड घालावा; लय विचलित केल्याने आशय घन होतो, असे मर्ढेकर सूचित करतात. आणि मर्ढेकरांनी लाइन-स्पेसने सूचित केले नसते, तरी रसिक म्हणून मी यतिभंगावरूनच ओळखणे शहाणपणाचे.

वृत्त हे शुद्ध ध्वनींबद्दल (अर्थापासून अपोद्धार - ऍब्स्ट्रॅक्शन करून) मर्यादा आहे.

शुद्ध ध्वनींबद्दल मर्यादा हे पुरेसे कळले नाही. कृपया सोदाहरण सांगावे.

येथे "शुद्ध ध्वनी" म्हणजे "अर्थापासून अपोद्धार-ऍब्स्ट्रॅक्शन" इतपतच "शुद्ध". कवितेमध्ये जे शब्द असतील त्यांच्या अर्थावरून, किंवा वाक्याच्या अर्थावरून वृत्त ठरत नाही. त्या अर्थाबद्दल उदासीन असून फक्त लघुगुरू ध्वनींची माळ मनात आणून वृत्ताची संवेदना होते.
उदाहरणार्थ : "शत्रू" आणि "स्नेही" या शब्दांचे अर्थ कमालीचे वेगळे असले, तरी दोघांचे वृत्तांतील स्थान "गागा" असेच आहे. "काया" आणि "तनु" या दोन शब्दांच्या अर्थात खूपच साम्य असले, तरी वृत्ताच्या दृष्टीने ते एकसारखे नाहीत - एक "गागा" तर दुसरा "लल" हवे त्याच ठिकाणी वृत्तात बसू शकेल.
(खरे तर या सर्व बाबतीत आपली सहमती आहे. माझ्याकडून कसले स्पष्टीकरण हवे त्याबद्दल तुमची विनंतीच मला कळली नाही, असे वाटते आहे.)
मागे असे झाले होते, की मी कुठलीशी कविता लिहिली भुजंगप्रयातात लिहिली होती, आणि एका प्रतिसादकाने "मनाच्या श्लोकांचे हेच का वृत्त" म्हणून पृच्छा केली होती. माझ्या कवितेतील कुठलेही वाक्य रामदासांच्या मनाच्या श्लोकांतून उद्धृत नव्हते. कवितेचा विषयही वेगळाच काहीतरी होता. तरी त्या वाचकाला आठवण झाली, हे तथ्य आहे. म्हणजे कवितेच्या अर्थापासून ऍब्स्ट्रॅक्शन करून वृत्ताचा कसलातरी नाद त्या वाचकाच्या मनात रुंजी घालत होता. (त्या वाचकाला काही सोडून मनाच्या श्लोकांची आठवण आली. बहुधा त्या वाचकाचा रसभंग झाला.) तसाच कुठलासा अर्थ-नसलेला नाद माझ्या मनातही रचना करताना गुंजन करत होता, अशी साक्ष मी देतो. माझ्या मनात मनाच्या श्लोकांचाही अर्थ नव्हता. (मराठी कवितेच्या परंपरेत भुजंगप्रयाताचे भावनिक क्षेत्र विस्तृत आहे : "पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची घडी सैल झाली" या अनुरक्त कवितेपासून "मना सज्जना भक्तिपंथेचि जावे" या विरक्त कवितेपर्यंत हे क्षेत्र पसरलेले आहे. बहुधा अतिशय वैचारिक गुंतागुंत मात्र या वृत्ताला मानवणारी नाही. प्रा. डॉ. बिरुटे यांच्या प्रतिसादास उपप्रतिसाद म्हणून "माणवकक्रीडितक" या संकुचित भावनिक क्षेत्राच्या थिल्लर वृत्ताचे उदाहरण दिलेले आहे. उर्दू गझलांच्या काही छोटेखानी बेहरांना सुद्धा तत्त्वज्ञानाची फार गुंतागुंत मानवत नाही असे ऐकून आहे. पटकन उदाहरण सुचत नाही.) जे काय आहे, माझ्या मनात जो ध्वनी रुंजी घालत होता, तो त्या रचनेसाठी पोषक होता. नाहीतर कितीतरी वृत्ते-ध्वनी उपलब्ध आहेतच ना. शिवाय स्वतःहून वृत्त बनवायची किंवा मुक्तछंदात कुठलीशी मस्त लय बनवायची, हे स्वातंत्र्य मला होते. तरी मी त्या भुजंगप्रयाताला माझ्या मनात रुंजी घालण्यासच त्या दिवशी निवड केली.

रास्त असणे नसणे शेवटी सापेक्ष आहे. इथे बंडाचा प्रश्न उद्भवत नाही असे वाटते.

:-) अर्ध-सहमत की पूर्ण-सहमत ते मला सांगता येत नाही. "रास्त असणे" हे जसे सापेक्ष आहे, तसे "बंड" हेसुद्धा सापेक्षच आहे. कवी आणि रसिक हे एकमेकांच्या परंपरेच्या जितक्या निकट, तितकी परस्पर-असहमत-सापेक्षता कमी. नाहीतर गंमत होऊ शकते : कवी "बंड नाही" म्हणतो, आणि रसिक "बंड आहे" असे म्हणतो; किंवा उलट कवी बिचारा "बंड" करायला जातो, आणि रसिक ते नाविन्य सहजगत्या "अपेक्षित" म्हणून पचवतो... हे सगळे प्रकार होतात. पुन्हा मर्ढेकरांचेच उदाहरण घ्यायचे झाले तर घेऊया. मर्ढेकरांच्या कवितेत वाक्ये कित्येकता अर्ध्या ओळीत संपतात, आणि मग त्याच ओळीत नवीन वाक्य सुरू होते. उदाहरणार्थ :

स्वप्नांवरती धूर सांडणें
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिण् मिण् जळत्या
; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.

मला वाटते हे त्या काळातल्या काही रसिकांना बंडखोर वाटले. मात्र मर्ढेकर हे इंग्रजी-मराठी दुहेरी काव्यपरंपरेतले होते. इंग्रजी कवितेत हा "ओव्हरफ्लो" प्रकार अतिशय सामान्य असतो. अपेक्षितच असतो - ओव्हरफ्लो नसला तर रसिकाला चुकचुकते. कोणास ठाऊक मर्ढेकरांना खरेच बंड करायचे असेल तरी इंग्रजीप्रधान-मराठीदुय्यम अशा रसिकाला मर्ढेकरांच्या ओव्हरफ्लो रचनांत काहीही अनपेक्षित असल्याचे लक्षात येणार नाही!

काही मते

आधीच्या प्रतिसादांत मी यतिभंगाबद्दल बोललो होतो तेव्हा चरणान्ती यती लक्षात घेतला नव्हता. चरणाच्या आतला यती हा मानण्यावर आहे.
उदा.
आमच्या वस्तीत करतो सूर्य टाळाटाळ देवा
गोठला आहे कधीपासून येथे काळ देवा
कोसळाया लागले आहे पुन्हा दाही दिशांनी
बांधले कंत्राटदाराने कुण्या आभाळ देवा
ह्या वृत्तात (नाव विसरलो) राधिका ताराप गागा | राधिका ताराप गागा असे तुकडे पाडतात.पण वरील चार ओळींत पहिली ओळ सोडल्यास इतर ओळीत हा यती पाळलेला दिसत नाही. आणि माझ्यामते असा यतिभंग दोष नाहीच. यती पाळलेल्या रचना बहुधा संगीतकारांना बांधणे सोपे जाते.

चरणान्ती यती हा घ्यायलाच हवा असे म्हणतात.

शहारली अन् मिटली लब्ध--
.................
प्रतिष्ठितांवर : "
.................
................. -- वदला पौष

वरील ओळींत मर्ढेकरांनी चरणान्ती यती नाकारलेला दिसतो. मर्ढेकर हे इंग्रजी-मराठी दुहेरी काव्यपरंपरेतले होते हे तुम्ही म्हणता ते लक्षात घेतल्यास ही बंडखोरी तेवढी अनपेक्षित नाही. ज्यांना उर्दूतले आज़ाद नज़्म/मुक़फ़्फ़ल नज़्म हे प्रकार माहीत असतील त्यांनाही. इंदिरा संतांची ऐक जरा ना ही कविता एक उदाहरण.

मर्ढेकरांच्या आधी गडकरींनीही काही मजेदार प्रकार केले आहेत.

कवीचा कारखाना ह्या त्यांच्या लेखातला हा उतारा पहा:

रचना व टीकांचा भडिमार ही दोन्हीही इतक्या अमर्याद प्रमाणावर वाढत चालली आहेत की, नियतकालीन वाङ्मयाकडे नुसते धावता धावता पाहणारालाही तद्विषयक बरीचशी माहिती झाल्यावाचून राहणार नाही. त्यातून मला तर मित्रत्वाच्या नात्याने उभयपक्षींच्या वाग्भटांचा जिवंत वाणीचाही लाभ होत असल्यामुळे 'अधिकस्याधिकं फलम्' होऊन बसले आहे. आणि म्हणूनच आप

* ल्या तावडीत सापडलेल्या हरिणाला जसा चित्ता।
बघतो तशा प्रकारे तत्परतेने व पूर्ण समचित्ता॥ 1॥
ने वाचक जर माझा प्रस्तुतचा लेख नीट बघतील।
तर त्यांना कवितेचे पुष्कळसे ज्ञान खास होईल!॥ 2॥

जगातली एकंदर काव्यसंपदेकडे निरखून पाहणाराला तिचे दोन अगदी ठळक भाग करता येण्यासारखे आहेत.

* गद्य व पद्य यांचे परस्परभिन्न रचनानियम बहुतेक काटेतोल सावधगिरीने सांभाळून हे 'काव्यगद्य' निर्माण केलेले आहे. गद्य व कविता- अतएव निसर्ग व कला- यांच्या एकजीव तादाम्याचे हे पहिले उदाहरण आहे अशी उमेद आहे. लांबलांब संस्कृत समास व कोवळे कोवळे शब्द यांच्या जाळयांतील शाब्दिक उपमांची जी एक गुंतावळ अलीकडे 'एक गद्यकाव्य' म्हणून लोकांसमोर मांडण्यात येते, तिच्यावरून या काव्यगद्याची कल्पना सुचलेली आहे.

गोविंदाग्रजांच्या काव्यगद्याची ही सुधारित मर्ढेकरी आवृत्ती आहे की काय असे वाटून गेले.

येथे "शुद्ध ध्वनी" म्हणजे "अर्थापासून अपोद्धार-ऍब्स्ट्रॅक्शन" इतपतच "शुद्ध". कवितेमध्ये जे शब्द असतील त्यांच्या अर्थावरून, किंवा वाक्याच्या अर्थावरून वृत्त ठरत नाही. त्या अर्थाबद्दल उदासीन असून फक्त लघुगुरू ध्वनींची माळ मनात आणून वृत्ताची संवेदना होते.
उदाहरणार्थ : "शत्रू" आणि "स्नेही" या शब्दांचे अर्थ कमालीचे वेगळे असले, तरी दोघांचे वृत्तांतील स्थान "गागा" असेच आहे. "काया" आणि "तनु" या दोन शब्दांच्या अर्थात खूपच साम्य असले, तरी वृत्ताच्या दृष्टीने ते एकसारखे नाहीत - एक "गागा" तर दुसरा "लल" हवे त्याच ठिकाणी वृत्तात बसू शकेल.
ओके. कळले. टाळक्यात घुसले नव्हते.

मराठी कवितेच्या परंपरेत भुजंगप्रयाताचे भावनिक क्षेत्र विस्तृत आहे : "पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची घडी सैल झाली" या अनुरक्त कवितेपासून "मना सज्जना भक्तिपंथेचि जावे" या विरक्त कवितेपर्यंत हे क्षेत्र पसरलेले आहे. बहुधा अतिशय वैचारिक गुंतागुंत मात्र या वृत्ताला मानवणारी नाही. प्रा. डॉ. बिरुटे यांच्या प्रतिसादास उपप्रतिसाद म्हणून "माणवकक्रीडितक" या संकुचित भावनिक क्षेत्राच्या थिल्लर वृत्ताचे उदाहरण दिलेले आहे. उर्दू गझलांच्या काही छोटेखानी बेहरांना सुद्धा तत्त्वज्ञानाची फार गुंतागुंत मानवत नाही असे ऐकून आहे. पटकन उदाहरण सुचत नाही

गुंतागुंत मानवत नाही असे म्हणण्यापेक्षा काव्यचित्र रेखाटताना त्यात तपशील भरायला खूप वाव नसतो असे म्हणणे योग्य राहील. त्यामुळे बरेचदा ह्या आणि अशा छोट्या वृत्तात (तुमच्या भाषेत अकुशल कवींकडून) पाडकामच जास्त होते. शब्दमर्यादेमुळे साहजिकच सूचकते भर द्यावा लागतो, असतो. त्यामुळे एकाच शब्दाच्या अनेक छटांचा वापर, ओळींत श्वास घ्यायला जागा ठेवणे (त्यांना ओपन एन्डेड ठेवणे) इत्यादींचा अवलंब होतो. बरेचदा हे करताना कविता सामान्य वाचकांपासून दूर तरी जाते आणि/किंवा आपण काही तरी ग्रेट लिहिले असे कवीला वाटत राहाते.

आणखी एक. एखाद्या वृत्तात कुठल्या प्रकारचे काव्य रचले गेले आहे त्यावरून त्याची ओळख ठरतो. त्यामुळे बहुतेकांना शार्दूलविक्रीडित हे वृत्त म्हटले की मंगलाष्टके किंवा सुनीते आठवतात.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

हम्म

ध्वनिफिती ऐकण्याच्या बाबतीत माझ्या संगणकावर काही तांत्रिक गडबड असल्यामुळे ऐकता येत नाही. पण कवितेच्या आशयाचा शोध घेतांना त्याच्या ताल-ठेक्याचा आघातावरुन एक वेगळा विचार केला पाहिजे असा सूर आपल्या लेखनातून दिसतो आहे. गेय कवितेत ताल असतोच. पण,म्हणून वरील वृत्तबद्ध ओळीत नेमकं असं काय वेगळं आहे, मला ते नीट समजलेले नाही. शीर्षकावरून वृत्ताचा वापर समर्थपणे भा.रा.तांबे कसे करतात त्याचे विश्लेषण केवळ वरील एका कवितेतून कसे निदर्शनास येऊ शकते ? कविता म्हणजे केवळ शब्दरचना नसते तर कविता म्हणजे आशयरचना. शब्दांच्या परस्परसंबंधातून काही एक अर्थ सुचित होत असतो आणि असा हा आशय ताल ठेक्यातून, ताल-ठेक्याच्या आघातावरुन वेगळा ठरतो काय ? ठरत असला तर नेमका कसा ? थोडं समजून सांगाल काय..!

बाकी, मेहनत घेऊन तयार केलेल्या ध्वनिफितींचं कौतुक आहेच. शब्द वाचता वाचता. कविता गाता-गाता काही तरी वेगळा अर्थ शोधण्याचे कसब निव्वळ ग्रेट.

-दिलीप बिरुटे

एका उदाहरणाबद्दल खोलात

ध्वनिफिती अनेक लोकांना ऐकू येत नाहीत याबद्दल वाईट वाटते. मलासुद्धा काल एका संगणकावरून ध्वनिफिती ऐकू आल्या नाहीत, तर दुसर्‍या संगणकावरून चांगल्या ऐकू येत आहेत. आता खाली एका प्रतिसादात हायपरलिंक दुवे दिलेले आहेत.

ध्वनिफिती ऐकू न येणार्‍यांकरिता ठळक/अधोरेखित अक्षरयोजनेने ताल/ठेक्याचे लेखन करायचा प्रयत्न केलेला आहे. मराठीमध्ये गेल्या काही दशकांपूर्वी (नेहमीच्या बोलण्यातल्या) आघातांच्या व्याकरणाच्या अभ्यासाबद्दल उदासीनता होती. (गेल्या दोनतीन दशकांत मात्र बराच अभ्यास झालेला आहे.) म्हणून का काय, आघात, बलमान आणि स्वरमान लेखनासाठी चिह्ने अभ्यासकांतही खूप प्रचलित नाही. तरी मी वापरलेल्या ठळक/अधोरेखनांसह वाचून बघावे ही विनंती.

शीर्षकावरून वृत्ताचा वापर समर्थपणे भा.रा.तांबे कसे करतात त्याचे विश्लेषण केवळ वरील एका कवितेतून कसे निदर्शनास येऊ शकते ?

शीर्षकावरून असा गैरसमज होत असेल तर दिलगीर आहे. कवितेत वृत्ताने घातलेल्या मर्यादेचे बंधन मानण्याऐवजी सामर्थ्यच मानण्यात समृद्ध कवन होते. हे भा. रा. तांब्याच्याच बाबतीत नव्हे, तर कोणत्याही कवीच्या बाबतीत खरे आहे. भा. रा. तांबे नेहमीच तालवाद्याचे ध्वनिचित्र उभे करत असत, किंवा भा. रा. तांबे यांच्या सर्व कवितांत ध्वनिचित्र हेच प्रमुख वैशिष्ट्य आहे, असा माझा निर्देश नव्हता. "वृत्ताच्या मर्यादेचेच सामर्थ्य बनवणे" या कल्पनेचे विवरण करण्यासाठी या एकाच उदाहरणाचे खोलात विवेचन केलेले आहे. वाचकाने स्वतःहून अशा कितीतरी कविता - वेगवेगळ्या कवींच्या का असेनात - गणगुणून आत्मसात केलेल्या असतील. वाचकाने स्वतः अनुभवलेल्या कवितांना मी केल्यासारखे विश्लेषण लागूउ करून बघावे, अशी विनंती आहे.

कविता म्हणजे केवळ शब्दरचना नसते तर कविता म्हणजे आशयरचना.

बहुधा "आशय" म्हणजे "कवितेतील सर्व अनुभूतींमध्ये काहीतरी एकसंधता असते" असे तुम्हाला म्हणायचे आहे. मी सहमत आहे. तरी शब्दार्थ/वाक्यार्थ यांना सुद्धा काही लोक "आशय" म्हणतात. हे जे काय बहुआयामी-एकसंध असे कवीकडून रसिकापर्यंत पोचते, ते त्या वाक्यार्थ-आशयापेक्षा मोठे असते, असा माझा मुद्दा आहे.

शब्दांच्या परस्परसंबंधातून काही एक अर्थ सुचित होत असतो आणि असा हा आशय ताल ठेक्यातून, ताल-ठेक्याच्या आघातावरुन वेगळा ठरतो काय ?

चांगल्या रचनेत ते जे काय वाक्यार्थापेक्षा मोठे असते, त्यांच्या वेगवेगळ्या मितींमध्ये रसभंग होईल असा काहीच वेगळेपणा नसतो. मात्र अकुशल रचनेत रसभंग होणारे वेगवेगळे अनुभव होऊ शकतात. वेगवेगळ्या अनुभूतींमध्ये पोषक रस कुठले, हे रसिकाच्या परंपरेतून कळते. (उदाहरणार्थ : कोमल गांधार हा पाश्चिमात्य संगीतात करुण रसातील गाण्याला पोषक मानतात, पण भारतीय परंपरेत असे काही नाही. वेगवेगळ्या आयामांमधले मेळ योग्य त्या परंपरेला अनुसरूनच घेतला पाहिजे.) आता उदाहरणादाखल पुढील कडवे बघा.

बाळ जधी ना जगले
माय न आक्रोश करे
कूस सुनी विश्व सुने
कंठ मुका चक्षु सुके

भारतीय परंपरेत हे माणवकक्रीडितक वृत्त थिल्लर मानले जाते. या वाक्यार्थाने कारुण्य सांगितले जाते, आणि वृत्ताने भलताच काही परिणाम होतो. त्या मानाने पुढील शार्दुलविक्रीडित वृत्त आणि वाक्यार्थ एकमेकांवर कुरघोडी करत नाहीत. भारतीय परंपरेत शार्दूलविक्रीडिताची भावना-कक्षा तशी गंभीराकडेच झुकणारी आहे.

आई ना करि एक शब्द, न ढळे अश्रूहि डोळ्यांतुनी
कुक्षी सुन्न नि विश्वहि सुन्न गमे बाळास नेताक्षणी

(उदाहरणादाखलची कडवी माझी स्वरचित आहे. शिघ्रकाव्य असल्यामुळे त्यांचा दर्जा सुमार आहे. तरी माणवकक्रीडितकातील रसभंग तरी सुस्पष्ट व्हावा.) येथे ऐकावीत (विजेट वाजले नाही, तर या दुव्यावर जावे):

Get this widget | Track details | eSnips Social DNA

म्हणून काही असा कायदा होत नाही की माणवकक्रीडितकात शोककाव्य रचू नये. मात्र जर एखाद्या कवीने ते तसे रचायला घेतले, तर तो आह्वान घोषित करतो - "रसिका! वृत्ताचे आणि वाक्यार्थाचे सामांतर्य साधत नसले, तरी त्यांच्या विरोध-पूरकतेमुळे (कॉन्ट्रास्टमुळे) अधिक खोल एकसंधता साधते आहे." ती एकसंधता रसिकाला पटवण्यात कवी कमी पडला, रसिकाचा आस्वाद बेरंग झाला, तर कलाकृती फसली.

उत्तम विश्लेषण, नेमकं उदाहरण

वृत्तात आघातांची मांडणी नेमकी असल्यामुळे ध्वनीमध्ये रुद्रावताराचे तांडव व्यक्त होते. ध्वनि-शब्द हे शब्दार्थ-आशयाचे केवळ वाहन न राहाता एक श्राव्य-चित्र होते.

माध्यमाच्या पोताचाही अर्थवाहित्वासाठी उपयोग केला गेला की कलाकृती कशी वरच्या पातळीला जाते याचं छान उदाहरण. विश्लेषण आवडलं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

शब्दप्रधान गायकी...

या लेखाच्या संदर्भात "शब्दप्रधान गायकी" ( ले. यशवंत देव बहुधा. चू.भू. दे.घे.) ह्या सुगम संगिताच्या अभ्यासाकरता महत्वाच्या पुस्तकाची आठवण झाली. जरूर वाचा.

प्रतिसाद.

प्रतिसाद.

श्री. धनंजय, एका निराळ्या विषयास हात घातल्याबद्दल अभिनंदन. विविधभाषांतील काव्यप्रकार अभ्यासणे मला आवडते, त्याकारणे हा लेख अभ्यासताना आनंदप्राप्ती झाली. धन्यवाद.

...मुळात कवीनेसुद्धा कुठलाही तांत्रिक विचार केलेला नसणारच.
...आळवता-आळवता त्यांना प्रतिभेने (आणि सुदैवानेही) काही शब्द सापडले असणार.

मला श्री. भा.रा. तांबे ह्यांच्याविषयी माहिती नाही, परंतु बहुधा कवींचा व्याकरणाचा अभ्यास विशेष चांगला असतो असे माझे निरिक्षण आहे. त्यासह, कवितेतून ज्या भावना पोहोचवावयाच्या त्यांबद्दलही, उपयोजिल्या जाणार्‍या शब्दांविषयीही विशेष विचार केलेला निश्चित दिसतो. असा विचार करताना तांत्रिक बाजूंचा विचार हा होतो, परंतु तो निराळा करावा लागत नसून आपसूकच होत असावा असे माझे मत आहे. ह्याठिकाणी प्रतिभा वि. सुदैव ह्या वादास जागा नाही. प्रतिभा निश्चितच श्रेष्ठ; 'सुदैव' म्हणतां प्रतिभेस झाकोळले वाटू नये असे वाटते.

कवितेत वेगळाच ताल येणे काही चूक नाही. पण तसे झाल्यास वाचका-ऐकणार्‍याला जो झटका बसतो, त्याचे काहीतरी प्रयोजन हवे. असे काही उगाच आशयद्रव्याशी असंबंद्ध झाले तर फारच बेकार-बेढब वाटते.

उपरोक्त कवितेमध्ये, पहिल दोन पंक्तींमध्ये ज्या डमरू आणि शूलांचे वर्णन केले जाते आहे, ते अनुक्रमे तालवाद्य आणि शस्त्र आहेत. "डमडमत" आणि "खणखणत" हे आपण म्हटलेप्रमाने ध्वनिसूचक द्वित्त शब्द होत; त्यामुळे, त्यांच्या नैसर्गिक ध्वनिंचे अनुकरण करणेसाठी त्यांतील पुनरुक्त ध्वनिंवर आघात देणे सयुक्तिकच वाटते. (डममत / खणणत) मात्र त्यापुढील पंक्तीमध्ये, ज्या शंखाचा उल्लेख येतो आहे, तो वाद्य अथवा शस्त्र नसून एक वैधिक वस्तु आहे. रणवाद्य ह्या अर्थाने शंख उपयोजिला जातो. त्याच्या नादांत आघात नसून ध्वनि मात्र आहे. शांतिकर शंकराच्या डमरूचा डमडमणारा ध्वनि, त्रिशूलाचा खणखणता ध्वनि ह्या दोन्हीही ध्वनिंचे प्रयोजन रुद्रतांडव व्यक्त होण्यासाठी आहे. त्यापुढे शिवाच्या शंखाचा ध्वनि हा सार्‍या आसमंतास शांत करणारा आहे असे मानून* जेथे शंखाचे वर्णन करावयाचे, तेथे ताल बदलून शांत तरीही भेदक अशी शब्दयोजना करणे कवीस अभिप्रेत असावे. ही कवीच्या विचारांमागील एक तांत्रिक बाब असावी. 'येई रुद्रा' म्हणताना तालबद्धता अंशतः संपुष्टात येवून केवळ शांती अपेक्षित असावी. असो.

अधिक विचार करता तालातील हे विचलन आशयद्रव्याशी मुळीच असंबद्ध वाटत नाही, बेकार-बेढब तर नाहीच नाही! म्हणतांना खालीलप्रमाणे आघात देवून पाहावे, (कदाचित्) आपणांसही असंबद्ध / बेकार / बेढब वाटणार नाही, ताल विचलित झाला तरीही झटका बसणार नाही.

डममत मरु ये,
खणणत शूल ये,
शंफुंकीत ये
येरुद्रा

------------------------------------------------------------------------------------------

आरंभीच्या चार ओळींमध्ये दुसर्‍या आणि तिसर्‍या ध्वनिवर आघात दिलेली, नंतरच्या दोन ओळींमध्ये तालविचलन झालेली, साधारणतः समान वाटावी अशी ध्वनियोजना केलेली एक तमिळ भाषेतील कविता देण्याचा मोह आवरत नाही.

------------------------------------------------------------------------------------------

श्री. शंकराचार्य विरचित कवितांमध्ये ताललालित्य एकसंध आढळते, त्यापैकी एक :-

न तातो न माता न बन्धुर्न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता
न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ||१||
भवाब्धावपारे महादुःखभीरु पपात प्रकामी प्रलोभी प्रमत्तः
कुसंसारपाशप्रबद्धः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ||२||
न जानामि दानं न च ध्यानयोगं न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रम्
न जानामि पूजां न च न्यासयोगं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ||३||
न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित्
न जानामि भक्तिं व्रतं वापि मातर्गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ||४||
कुकर्मी कुसङ्गी कुबुद्धिः कुदासः कुलाचारहीनः कदाचारलीनः
कुदृष्टिः कुवाक्यप्रबन्धः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ||५||
प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं निशीथेश्वरं वा कदाचित्
न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ||६||
विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये
अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ||७||
अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः
विपत्तौ प्रविष्टः प्रनष्टः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ||८||

--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

छान

तुम्हाला माझा सुरुवातीचा झोकात जाणारा तालच आवडला तर. शंखाबद्दल तुम्ही म्हणता तसा विचार मी केला होता, पण मला ते ताल बदलणारे उच्चारण पेलता आले नाही. (माझे उच्चारण दुव्यावरून तुम्ही ऐकू शकलात काय? "झोकात_नो_ब्रिज" असे नाव मी त्या ध्वनिफितीला दिले आहे. मला बदलणार्‍या तालांमध्ये पूल बांधणे जमले नाही.) परंतु अन्य कोणी ते उच्चारण करू शकत असेलही. अशाच रसग्रहणातील फरकामध्ये गंमत आहे.

तुम्ही दिलेल्या भवानी अष्टकात भुजंगप्रयाताचा ठेका आहे. शिवाय "न"काराच्या ("कु"काराच्या वगैरे) अनुप्रासाने एक वेगळी - अडीचपट धीमी - लय त्यावर पखरली जाते.

शंकराचार्यांच्या स्तोत्रांच्या नंतर नादमाधुर्य हेच साम्य असलेली त्यांच्यासारखी स्तोत्रे अनेक लोक लिहू लागले. परंतु पुष्कळदा नादमाधुर्याच्या हव्यासापायी शब्दार्थ-आशयाकडे हे नंतरचे कित्येक कवी दुर्लक्ष करत, असे वाटू लागते!

(श्री. चित्तरंजन यांच्याशी वरच्या चर्चेत हाच मुद्दा आला आहे. नादमाधुर्याच्या खाली कल्पनादारिद्र्य दडलेली एक रचना मी मागे मुद्दामून रचली होती - तिचा दुवा असा : झटपट स्तोत्ररचना)

तमिळ गाण्याची ध्वनिफीत दिल्याबद्दल धन्यवाद.

ध्वनिफिती डकवायचा पुन्हा प्रयत्न

ध्वनिफिती डकवायचा पुन्हा प्रयत्न. लेखातील ध्वनिफिती लिनिक्स यंत्रावर ऐकू येत आहेत, तर प्रतिसादांतील बहुतेक ध्वनिफिती विंडोज यंत्रावर ऐकू येत आहेत. विजेटमधून ऐकू आल्या नाहीत, तर हायपलिंकवरून तरी ऐकू येत आहेत.

नाहीतर या फोल्डरचा दुवा बघावा :
http://www.esnips.com/web/rudrAsaAvAhana
ध्वनिफितींची नावे थोडीफार निर्देश करतील, पण क्रम उलटसुलट आहे :-(

शिवाय विजेटवर वाजवण्याऐवजी ईस्निप्स वरील हापरलिंक दुवेसुद्धा दिलेले आहेत.

"अनुवाद"
डमरूने ताल धरित
शूळाला खणकावित
शंखाचा नाद करित
रुद्रा ये गा.

Get this widget | Track details | eSnips Social DNA

- - -
संवादातील आघातस्थाने :
'मडमत 'मरु 'ये, 'णखणत 'शूळ 'ये, 'शंख 'फुंकीत 'ये, 'येऽ(इ) रु'द्रा.

Get this widget | Track details | eSnips Social DNA

- - -
गमतीदार ताल (सुरुवातीला सुचलेला)
डम'मत 'मरु ये,
खण'णत 'शूळ ये,
(दन धनन धनन दन
दन धनन धनन दन...)

Get this widget | Track details | eSnips Social DNA

- - -
नैसर्गिक आघातांचा विचका :
डम'मत 'मरु ये,
खण'णत 'शूळ ये,
शं' 'फुंकीत ये
ये' 'रुद्रा

Get this widget | Track details | eSnips Social DNA

- - -
आदल्या तालाशी सांधा साधला जात नाही :
डम'मत 'मरु ये,
खण'णत 'शूळ ये,
'शंख 'फुंकीत ये
'येइ रु'द्रा

Get this widget | Track details | eSnips Social DNA

- - -
नैसर्गिक आघातांचा तालासाठी आधार घेऊन :
"मडमत 'मरु ये,
"णखणत 'शूळ ये,
"शंख फुं'कीत ये
"येइ रु'द्रा

Get this widget | Track details | eSnips Social DNA

- - -
त्याचा ताल :

Get this widget | Track details | eSnips Social DNA
 
^ वर