जनगणना २०११

जनगणनेचा प्राथमिक अहवाल आजच आला आहे. तो येथे उपलब्ध आहे.

नुकतीच वाचायला सुरुवात केली आहे. त्यामुळे माहितीपर लेख न लिहिता चर्चेचा मुद्दा म्हणून मांडत आहे.

भारताची लोकसंख्या वाढून १,२१.६ कोटी झाली आहे. वाढीचा दर १.६ टक्के दरसाल एवढा कमी झाला आहे. (पूर्वीचा दर साधारण २ टक्के).
या दरवाढीत आयुर्मानामुळे होणारी भर किती आणि जन्मदराने होणारी वाढ किती हे कळले नाही.

महिला पुरुष संख्या एकंदरीत (दरहजारी पुरुषास) ९२७ (१९९१) ९३३ (२००१) वाढून ९४० (२०११) मधे झाली आहे.
पण ०-५ वयोगटात हाच रेशो ९१४ एवढा घसरला आहे. या पूर्वीचे आक्डे ९४५ (१९९१), ९२७ (२००१). (म्हणजे वाढ ही महिलांच्या आयुर्मानाने झालेली दिसते.)

साक्षरांच्या संखेत वाढ झालेली दिसते. आता जवळपास ७४ टक्के साक्षर आहेत. महिला आणि पुरुष वर्गातील साक्षरतेची विषमता तेवढीच आहे.

महाराष्ट्राची लोकसंख्या वाढ मला पटकन मिळाली नाही. या चर्चेदरम्यान हे आकडे पुढे यावेत. मात्र प्रसार माध्यमातून ही वाढ देशाच्या वाढीपेक्षा कमी आहे (०.१ -०.२ टक्क्यानी) असे वाटले. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत लोक येतात असे मानले तर खरी वाढ ही त्यापेक्षा कमी आहे.

प्रमोद

Comments

उ. प्रदेशा नंतर् सर्वात जास्त् लोकसंख्या महाराष्ट्राची आहे

उ. प्रदेशा नंतर् सर्वात जास्त् लोकसंख्या महाराष्ट्राची आहे..........ही बहुधा स्थलांतरितांमुळे असावी... तसेच ठाणे सर्वात अधिक लोकसंख्येचा जिल्हा बनला आहे...

स्थलांतरीत

महाराष्ट्राची लोकसंख्या वाढ ही देशापेक्षा कमी आहे. त्यामुळे दुसरा क्रमांकास काही महत्व नाही. बिहारचे (मप्र.?) तुकडे झाल्यामुळे महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आला हे एवढेच.
प्रमोद

अधिक माहिती

महाराष्ट्राचा सेक्स रेशो आताच कळला. महाराष्ट्रात ०-६ गटात मुलींचे प्रमाण हे ८८२ एवढे कमी आहे.
तर एकंदर प्रमाण ९२२ महिला (सर्व वयोगट मिळून) आहे.
महाराष्ट्रातील साक्षरता देशापेक्षा बरीच जास्त आहे. एकंदर साक्षरता ८३ (देशाची ७४) पुरुष साक्षरता ८९ (८२) महिला साक्षरता ७५ (६५)

प्रमोद

बालकांतले लिंग-गुणोत्तर चिंताजनक

बालकांतले लिंग-गुणोत्तर चिंताजनक आहे.

उत्तर भारत या स्त्रीगर्भपाताच्या नकोशा बाबतीत चीनचा कित्ता गिरवणार आहे अशी लक्षणे दिसतात. पुढच्यास ठेच मागचा शाहाणा म्हणून आपल्या समाजाला काही करता येईल काय? हा आपणा सर्वांसमोरचा अनुत्तरित प्रश्न आहे.

असे दिसते की कित्येक जन्मदात्यांचा अजूनही असा (गैर)*समज असावा, की "मुलगी म्हणजे वाया जाणारी गुंतवणूक".

*(गैर)समज असे का म्हटले आहे? कारण हा समज कित्येक पिढ्यांपर्यंत स्वतःला खरा करून घेणारा असतो. (सेल्फ फुल्फिलिंग प्रॉफेसी.)

+१

>>असे दिसते की कित्येक जन्मदात्यांचा अजूनही असा (गैर)*समज असावा, की "मुलगी म्हणजे वाया जाणारी गुंतवणूक".

समज गुंतवणुकीविषयी आहे की वंशाचा दिवा म्हणून आहे ते कळत नाही.

परंतु माझ्या सामाजिक वर्गातल्या* माझ्या वयोगटातल्या किंवा माझ्याहून लहान अश्या वयाच्या लोकांपैकी ज्यांना दोन किंवा अधिक मुले आहेत त्यांतल्या बहुतेकांना पहिली मुलगी आहे. त्याअर्थी मुलगा हवाच अशी समजूत अजूनही टिकून आहे असे म्हणता येईल.
[त्यांनी दुसरे मूल का होऊ दिलं? तर पहिली मुलगी झाली आणि मुलगा व्हावा अशी इच्छा होती].

* शाळेतील मित्र, कॉलेजातील मित्र, काम केलेल्या विविध ऑफिसांतील सहकारी, जवळचे नातेवाईक, शेजारी इत्यादि- माझ्या सामाजिक वर्गात एकच मूल असण्याची मनोभूमिका प्रबळ आहे असे मला वाटते.

परंतु एकच मुलगी असलेलेही पुष्कळ लोक आहेत आणि पहिला मुलगा होऊनही दुसरे मूल होऊ दिलेलेही काही लोक आहेत]

नितिन थत्ते

+१

सहमत.

"मुलगा हवा" ह्या धारणेसाठी कदाचित अनेक वर्ष चालत आलेली पुरुष प्रधान संस्कृती हेच कारण असावे, तसेच काही काळापूर्वी, म्हातारपणी मुलगी सासरी (दूरगावी??) असल्याने आपला सांभाळ मुलगाच करेल हा तर्क देखील ठीक वाटतो, तरीदेखील त्यासाठी मुलीला मारणे वगैरे ह्याला काही आधार नाही.

वंशाचा दिवा म्हणून आपण जो मुद्दा उपस्थित केला आहे त्याबद्दल एक शंका अशी येते की - जनुकसातत्य राखण्यासाठी मुल हवे हे सत्य मानल्यास, मुलगाच हवा हि इच्छा असण्यामागे काही विवक्षित जनुकांचे सातत्य तसेच रहावे असे काही असेल काय? म्हणजे "जनुकांचे काही पॅटर्न फक्त मुलांमध्येच आढळतात" असे शक्य आहे काय?

नेचर आणि नर्चर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
माणसाच्या काही प्रेरणा (७०%+) जीनदत्त असतात. तर काही प्रेरणा संस्कारदत्त असतात.
आपल्या वंशाचा दिवा हवा ही प्रेरणा पिढ्यानपिढ्या झालेल्या संस्कारांतून आलेली आहे.

शक्यता

'जीनदत्त नाहीच' असे ठामपणे का म्हणता येईल?

आणखी एक कारण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
सर्व देशभर स्त्रीभ्रूण हत्या होतात याविषयी दुमत नाही."वंशाचा दिवा","आर्थिक गुंतवणूक,"
"पुरुषप्रधान संस्कृती" ही कारणे असतीलच आणखी एक कारण संभवते ते असे:
सध्या मुलींचे-विशेषतः तरुण मुलींचे -जीवन सुरक्षित नाही. त्यांच्यावरील अत्याचाराच्या बातम्या वारंवार येत असतात.माता पित्यांना त्यांच्या तरुण कन्येची सतत काळजी वाटत असते.हा घोर नको म्हणूनही स्त्रीभ्रूणहत्या होत असतील.

दाऊ टू यना?

>>सध्या मुलींचे-विशेषतः तरुण मुलींचे -जीवन सुरक्षित नाही. त्यांच्यावरील अत्याचाराच्या बातम्या वारंवार येत असतात.

पूर्वीच्या मुलींचे जीवन सुरक्षित होते का?

नितिन थत्ते

+1

पूर्ण सहमत
यना आपल्याकडून हे एक्स्पेक्टेड नव्हते.

आय ऍम स्पीचलेस नाऊ

चन्द्रशेखर

बातम्या

पूर्वी लोक अगतिक होते, दुधात बुडविण्यासाठी अधिक धैर्य लागत असावे. तंत्रज्ञानामुळे भावनांना जपणे शक्य होते.
हल्ली बातम्या अधिक असल्यामुळे अधिक परिणाम होत असणे शक्य आहे. शिवाय, पूर्वीचे अत्याचार घरातच (=क्षम्य???) होत असावेत, हल्ली बाह्य जगाशी संबंध येतो त्यामुळे त्यांची शक्यता वाढली असावी.
--
अपत्यांना जनुकीय रोग असल्यास त्यांना जन्माला घालावे की नाही याचा निर्णय पालकांना देण्यात येतो. अपत्यासाठी असलेली मद्यपान करून दुचाकी अपघातात मरण्याची शक्यता, बलात्कार+हत्येची शक्यता, फुफ्फुसाच्या कर्करोगाची शक्यता, प्रोस्टेटच्या कर्करोगाची शक्यता, रक्तक्षयाची शक्यता, गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता, इ. शक्यता पत्कराव्या की टाळाव्या त्याचा निर्णयही पालकांना का मिळू नये?

फक्त एवढेच?

हल्ली बातम्या अधिक असल्यामुळे अधिक परिणाम होत असणे शक्य आहे. शिवाय, पूर्वीचे अत्याचार घरातच (=क्षम्य???) होत असावेत, हल्ली बाह्य जगाशी संबंध येतो त्यामुळे त्यांची शक्यता वाढली असावी.

नव्हे नव्हे! पूर्वीचे अत्याचार घरात होत असले तरी अत्याचारांची यादी केवढी मोठी होती - बालविवाह, जरठकुमारीविवाह, पोरवडा (बाळंतपणात मृत्यू), अनेक लग्ने (दुर्लक्ष), सतीप्रथा, विधवाकेशवपन, आर्थिकपारतंत्र्य, काडीमोड, परित्यक्ता इ. घरात चालत असेच पण याचबरोबर स्वार्थासाठी मुलींची लग्ने लावून देणे, त्यांना देवदासी किंवा गुलामीत विकणे इ.

परंतु इतरांच्या बायका पळवणे (शत्रूची मानहानी करण्याचा उत्तम मार्ग), पराजितांच्या बायकांवर बलात्कार करणे, त्यांची गुलाम म्हणून विक्री करणे, आपल्या बाया शत्रूच्या हाती पडू नयेत म्हणून त्यांना जोहार करायला लावणे वगैरे वगैरे प्रकारांतून बायकांवर घराबाहेरही भरपूर अत्याचार होत होते.

तरीही

तेव्हा स्त्रियांना काही स्थानच नसल्यास मुलीला भोगावे लागणारे त्रास टाळावे असे पित्याला वाटतच नसावे. आज, व्यक्ती म्हणून स्थान मान्य असल्यामुळे त्यांना त्रासात जगावे लागल्यास पित्यांना दु:खे होत असतील.

.

सध्या मुलींचे-विशेषतः तरुण मुलींचे -जीवन सुरक्षित नाही. त्यांच्यावरील अत्याचाराच्या बातम्या वारंवार येत असतात.माता पित्यांना त्यांच्या तरुण कन्येची सतत काळजी वाटत असते.हा घोर नको म्हणूनही स्त्रीभ्रूणहत्या होत असतील.

आय ऍम स्पीचलेस. आय ऍम विदाउट स्पीच.

हा धोका त्या तरूण मुलीशी लग्न केल्यावरही आहे, मग सर्व तरूण पुरूषांनी ६०+ वधू निवडावी का? ;)

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

काही तरीच!

असे कसे म्हणू शकता?
स्त्रीभ्रूणहत्या हे पुरुषप्रधान संस्कृतीच्या वरचढपणाचे व पुरुषी पाषवीवृत्तीचे उघडे प्रदर्शन आहे.

स्त्रीभ्रूणहत्या

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*इथे स्त्रीभ्रूणहत्येचे समर्थन केलेले नाही.त्या हत्येसाठी माता-पित्यांची मानसिकता कशी असू शकते याचे संभाव्य कारण सांगितले आहे.मी जणू अशा हत्येचे समर्थन करतो आहे असा अवाक् होणार्‍या सदस्यांचा समज झाला असावा.
*पूर्वी गर्भलिंगनिदानाचे तंत्र ज्ञात नव्हते. असते तर पूर्वीसुद्धा स्त्रीभ्रूणहत्या झाल्याच असत्या.कुटुंबनियोजनाच्या पद्धती ठाऊक नव्हत्या. तेव्हा पुष्कळ अपत्ये जन्माला येत.बालमृत्यूचे प्रमाणही खूप होते. जन्मलेल्या अपत्यांत मुलींची संख्या साधारण ५०% असणार.स्त्रीलिंगी अर्भकाला मारून टाकण्याचे प्रकार क्वचितच होत असावे.या समाजात आपल्या कन्येचे हाल होणार याची आई-वडिलांना कल्पना असली तरी त्याकाळी ते अगतिक होते.
सर्व बाजूंनी विचार केल्यास मी लिहिले आहे ते अनेक कारणांतील एक संभाव्य कारण असू शकते हे पटावे.

संभाव्य कारण

मी "दाऊ टू" असे म्हटले ते केवळ हल्ली मुलींचे जीवन असुरक्षित झाले आहे या प्रतिपादनामुळे.

नितिन थत्ते

स्त्रीची सुरक्षितता

भारतातली आजची स्त्री जेवढी सुरक्षित आहे तेवढी ज्ञात इतिहास कालात कधीच नव्हती असे माझे स्पष्ट मत आहे. या कारणासाठी स्त्री भ्रूण हत्या होत असेल ही शक्यता असंभवनीयच वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

हे कारण नसून

हे कारण नसून सबब आहे.
वर मुलींचे गर्भ पाडण्याच्या सर्व सबबी आहेत.

वरील विचार मान्य केल्यास हा खालील विचारही मान्य होण्यास हरकत नसावी.
मुलींना या त्रासातून मुक्तता देणे हा पित्यांचा (आणि मातांचाही) थोर विचार असला, तर अपत्यांना जन्माला न घालणे हा त्याहीपेक्षा सर्वश्रेष्ठ थोर विचार असू शकतो कारण जगात जेवढे त्रास आहेत त्यातून स्त्री-पुरुष सर्वांनाच मुक्ती मिळाली पाहिजे. पुरुषांनी अशा निर्दय जगात जन्माला येणे हा त्यांच्यावरील अन्याय ठरेल.

हे बर्‍याच प्रमाणावर आर्थिक कारणांसाठी, वंशसातत्यासाठीच होते. माझ्या ओळखीच्या एका मुलीने घरच्यांच्या विचाराने हल्लीच्या घराबरोबर करीअर सांभाळण्याच्या काळात एकच मूल सांभाळता येणार तर ते मुलगा हवे म्हणून पहिल्या वेळी गर्भपात करून घेतला होता. त्यावेळी तिला वाईट वाटलेले दिसत असे. पण नंतर तिला पुरुष गर्भ राहिला. मुलगा झाला. घरचे तिच्याशी नीट वागायला लागले. तीही हे मागचे विसरली असावी.

बालकातील लिंग गुणोत्तर

गेल्या जनगणनेच्या वेळी मी महाराष्ट्रातल्या बालकातील लिंग गुणोत्तराबाबत माहिती पाहिली होती.
त्यात ज्या ठिकाणी वैदकीय सोयी जास्त आहेत अशा जिल्ह्यात हे प्रमाण (स्त्रियांचे प्रमाण) कमी होते. गडचिरोली इत्यादी जिल्ह्यात ते जास्त होते.
लिंगगुणोत्तरात बदल होण्याची कारणे दोन. गर्भचिकित्सा करून स्त्रीगर्भपात होणे तर दुसरे म्हणजे स्त्रीबालकांची हेळसांड यात स्त्री बालमृत्युदर जास्त असणे. भारतात पूर्वी पासून दुसर्‍या कारणाने स्त्रीबालकांची संख्या कमी असायची (९५० आसपास). आता गर्भपातामुळे हे प्रमाण अधिक खालावले आहे. कदाचित विषम हेळसांड थोडी कमी झाली असे गृहित धरता येईल.

भारतत कुठेही हे प्रमाण ९६६ च्या वर नाही. (जास्तीजास्त ९६६ अंदमान निकोबार मधे.)
उ.प्र. व बिहार, झारखंड (बिभाजित बिरार) ही उत्तरेतली मोठी राज्ये येथे हे प्रमाण ८९९ ९३०, ९४३ असे आहे. पंजाबात ८४६, हरियाणात ८३०, दिल्लीत ८६६ असे आहे. गुजरात महाराष्ट्राच्या बरोबरीने आहे. जम्मु काश्मिर ८५९ हे अजून तसेच राज्य.
दक्षिणेची चार राज्ये घेतल्यास आंध्र -९४३, कर्नाटका ९४३, केरळा ९५९, तामिळनाडू ९४६ असे आहे.

प्रमोद

गुणोत्तर

भारतत कुठेही हे प्रमाण ९६६ च्या वर नाही. (जास्तीजास्त ९६६ अंदमान निकोबार मधे.)

तुम्ही मांडलेली कारणं योग्य आहेत (मुलींचा गर्भ पाडणे व हेळसांड). पण तुलना १००० शी करण्याऐवजी ~९६० शी करायला हवी. मुलींचा गर्भ नष्ट न करणाऱ्या समाजांमध्येदेखील ते गुणोत्तर दिसून येतं. उदाहरणार्थ अमेरिकेत ० ते १५ वयोगटात हेच गुणोत्तर आहे (९६२).

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

उपयुक्त माहिती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रमोद सहस्रबुद्धे यांच्या लेखांतील माहिती नेहमीच उपयुक्त आणि विश्वासार्ह असते.जनगणनेसंबंधीच्या आकड्यांची वाटच पाहात होतो.ती माहिती मिळाली.धन्यवाद!

+१

पुर्ण सहमत. धन्यवाद. चर्चा वाचण्यास् उत्सुक.

-Nile

बालकांतले लिंग गुणोत्तर

महाराष्ट्रातील विषम परिस्थिती पाहून लग्नाची बिकट झालेली समस्या (मुलींचे नखरे वाढल्येत ही ;-)) अजून काही वर्षांनी आणखीच बिकट होऊन जाईल की काय अशी शंका वाटली.

बाकी, चर्चा आवडली आणि माहितीही. अमेरिकन सेन्ससवरील एक लेख आजच येथे वाचला.

नकाशा

वॉलस्ट्रीटमध्ये हा नकाशा मिळाला:

India's Population

अधिक प्रतिसाद माहिती मिळवल्यानंतर

चांगली माहिती

लेख व चर्चा आवडली . माझी काही निरिक्षणे देण्याचा मोह आवरत नाही
1. महाराष्ट्राची लोकसंख्या द्वितिय क्रमांकावर आहे यात आश्चर्यजनक काही नाही. वेड्यासारखे बहुसंख्य नवीन उद्योगधंदे जर देशाच्या एकाच भागात काढायचे ठरवले तर त्या भागाकडे अर्थाजनासाठी येणार्‍या स्थलांतरितांचे लोंढे वाढत जाणारच. याला उपाय म्हणजे महाराष्ट्र सरकारने आपल्याकडे नवीन उद्योग धंदे येणार नाहीत अशी धोरणे स्वीकारणे. प्रथमदर्शी हा विचार वेडेपणाचा वाटेल पण मोठ्या कालाचा विचार केला तर असा स्थानिक असमतोल सामाजिक असंतोष निर्माण करण्यास कारणीभूत असतो. अगदी स्थानिक पातळीवर बोलायचे तर पुण्यामधे कोणतेही नवीन उद्योगधंदे चालू करण्यास पूर्ण बंदी करणे आवश्यक दिसते.
2. मुलींची घटणारी संख्या ही चिंताजनक बाब आहे हे खरे परंतु एक ज्येष्ठ नागरिक म्हणून माझी काही निरिक्षणे नोंदवावीशी वाटतात. पूर्वीच्या काळी मुलगी लग्न हो ऊन नव्या घरात तिच्या संसारात जात असे. आई-वडीलांच्या दृष्टीने तिचा भावनिक किंवा आर्थिक आधार रहातच नसे. आता उलटे झाले आहे. ज्येष्ठ आई-वडीलांना आधार मुलीचाच वाटतो असे दिसते आहे. ज्या आई-वडीलांना फक्त मुलगेच आहेत. त्यांचे वृद्धापकाळी खरोखरच हाल होतात असे दिसते आहे. सामाजिक परिस्थिती इतकी बदलत चालली आहे की एकच मूल होणार असले तर ती मुलगीच असावी असे बर्‍याच जोडप्यांना वाटते. ही सामाजिक परिस्थिती कदाचित अजून खेड्यापाड्यांच्यात पोचलेली नसावी. ती एकदा पोचली की हे चित्र नकीच बदलेल असे वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

महाराष्ट्र सरकारने आपल्याकडे नवीन उद्योग धंदे येणार नाहीत अशी धो

या दिशेने महाराष्ट्राने अगोदरच (नकळत) पाऊल उचलले आहे. वीजेचा तुटवडा, महागडे कामगार, प्रत्येक नगरपालिकेचा/महानगरपालिकेचा जकात कर, दळणवळण व्यवस्थेचा उडालेला बोजावारा यामुळे उद्योगधंधे एकतर बंद होत आहेत किंवा बाजुच्या राज्यात जात आहेत. मात्र शेजारच्या राज्यातली लोकसंख्या वाढली आहे अशी चर्चा होताना दिसत नाही. मुंबई / ठाणे पट्यातील उद्योगधंद्यामधे फारशी वाढ झाल्यासारखे वाटत नाही (स्वरुप मात्र बरेच बदलले आहे).

"महागडे कामगार" हा देखील कळीचा मुद्दा आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत असताना केवळ कामगारवर्गाच्या वेतनावर कुर्‍हाड चालवून उद्योगांनी आपले बस्तान मांडावे असे देखील म्हणवत नाही.

दुसर्‍या मुद्याशी सहमत.

एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही तुमच्या वेळच्या कामगार व्यवस्थापनाचे काही अनुभव नमूद कराल तर ते वाचायला आवडेल.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

महाराष्ट्रात होणारी गुंतवणूक

महाराष्ट्र आणि विशेषत: पुणे विभागात कशी वेड्यासारखी गुंतवणूक होते आहे हे बघायचे असले तर हा दुवा बघावा.
व्यवस्थापनातील माझ्या काही जुन्या अनुभवांबद्दल हा दुवा बघावा.
चंद्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

द्वितीय क्रमांकावरील महाराष्ट्र

माझ्या समजुतीने महाराष्ट्राने आपला क्रमांक सोडला नाही. पूर्वी तिसरा क्रमांक (उ.प्र. बिहार नंतर) असलेला महाराष्ट्र बिहारच्या विभाजना नंतर दुसर्‍या क्रमांकावर पोचला. आजही बिहार आणि झारखंड यांची एकत्रित लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे.
पूर्वी लिहिल्याप्रमाणे महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढदर हा देशाच्या लोकसंख्यावाढीदरा पेक्षा कमी आहे. म्हणजे कुणाला गाठून पुढे जाणे हे सहज नाही.
पुण्याचा, ठाण्याचा लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे. (असावा) पण शहर वाढतात आणि गावे घटतात हा ट्रेंड कित्येक वर्षे चाललेला आहे त्याचा हा भाग आहे.
खेड्यांची लोकसंख्या घटते आहे असे कोणी शोधून काढले तर मला आश्चर्य वाटणार नाही.

प्रमोद

तृतिय पंथी

तृतिय पंथी लोकांची नोंद जनगणनेत नसते का? या विषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल. हा समाजातील उपेक्षित घटक आहे.
प्रकाश घाटपांडे

इतरांचा समावेश पुरुषांत

अवर सेन्सस, अवर फ्यूचर ही पुस्तिका विरोपातून मिळाली त्यात इतरांचा समावेश पुरुषांत केलेला दिसतो आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

उत्स्फुर्त हास्य ..

हा हा हा :)

- गद्दाफी

लैंगिक पारगमक व्यक्ती

लैंगिक पारगमक (Transsexual) व्यक्ती

याविषयी अलिकडेच वाचलेल्या काही विधानांचा उल्लेख करत आहे.
अशा व्यक्तींना रूढपणे 'हिजडा' म्हणून संबोधले जाते. 'लिंगभाव भूमिका' (gender role) व 'लिंगभाव ओळख' (gender identity) या विषयावर जॉन हॉपकिन्स इन्स्टिट्यूट येथील जगप्रसिद्ध संशोधक डॉ जॉन मनी यानी संशोधन केले. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला मुलाची किंवा मुलीची जननेंद्रिये प्राप्त झालेली असतात. पण त्या मुलाची किंवा मुलीची मानसिकता लिंगअनुरूप होईलच असे नाही. स्वत:ला मुलगा किंवा मुलगी म्हणून समजणे (लिंगभाव ओळख - gender identity) व त्यानुसार वागणे ( लिंगभाव भूमिका - gender role) यावर डॉ मनी यांचे संशोधन होते.

शरीराने पुरुष पण मनाने स्त्री असणार्‍या व्यक्तीच्या लिंगबदलाची पहिली शस्त्रक्रिया जॉन हॉपकिन्समध्ये जॉन मनी यांच्या देखरेखीखाली झाली.

जन्मानंतर 'मुलगा' म्हणून वाढविलेला मुलगा वयात आल्यावर मुलगी असल्याचे कळते. (स्तन वाढणे, मासिकपाळी येणे, दाढीमिशी न दिसणे). पूर्वी अशा व्यक्तीवर शस्त्रक्रिया करून त्याला मुलगी बनवीत. पण डॉ. जॉन मनी यांनी अशा मुलाला मुलगी न बनवता मुलगाच होण्यासाठी शस्त्रक्रिया करावी (स्तन व गर्भाशय काढणे, टेस्टोस्टेरॉन हे पुरुषी संप्रेरक देणे) असे प्रतिपादन केले.

वयाच्या बारा तेरा वर्षापर्यंतचा मुलगा म्हणून वावरत असलेल्या मुलाला 'तू आजपासून मुलगी आहेस' असे सांगितले तर ही बाब पचविणे व मुलीप्रमाणे वागणे शक्य होणार नाही. वयाच्या तीन वर्षापर्यत व्यक्तीची 'लिंगभाव ओळख' आकाराला येते व ती व्यक्ती, त्याप्रमाणे वागत असते. यात पुढे आयुष्यभर बदल होत नाही. जन्मावेळी संदिग्ध जननेंद्रिय असल्यास मुलगी की मुलगा ठरवायचे यासाठी जगभरातून व्यक्ती त्यांच्याकडे येत असत.

संदर्भ: स्नेहबंध - ले. डॉ विठ्ठल प्रभू
डॉ. जॉन मनीं नंतरच्या काळात भरपूर विवादात सापडले. त्यांचे काही निष्कर्ष सुसंगत नव्हते हेही लक्षात आले. परंतु या विषयीच्या संशोधनाला त्यांनी नवी दिशा दिली हे मान्य करावे लागेल.

तृतियपंथी

भारतातले रस्त्यावरचे तृतीयपंथी हे नैसर्गिक रित्या झालेले नाहीत. बहुतेकांचे गावठी पद्धतीने कॅस्ट्रेशन केलेले आहे.
हे काही चालींचे बळी आहेत.

प्रमोद

चांगली माहिती

अहवालाच्या प्रसिद्धीचे वृत्त तसेच त्यावर चर्चा घडवून आणल्याबद्दल श्री सहस्त्रबुद्धे यांना धन्यवाद.

धन्यु

चर्चाप्रस्ताव आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.

-दिलीप बिरुटे

जनगणनेचे पुडचे अहवाल

जनगणनेचे पुढचे अहवाल यायला बराच वेळ जाणार आहे असे दिसते.
यापुढील महत्वाचे अहवाल म्हणजे धर्म-जात विभागवार झालेली गणना.
गेल्या जनगणनेत धर्मवार माहिती आली होती ती बरीच वादाची ठरली होती.

वयोमानानुसार जनगणना काढायची पद्धत भारतीय जनगणनेत पाहिली नाही. ती पण फार रोचक असते. जन्मदर, मृत्युदर, नेट रिप्रॉडक्शन रेशो (एका स्त्रीस किती मुले होतात.), आयुर्मान इत्यादी अनेक बाबी वाचण्यासारख्या असतात.

किती ठिकाणे (घरे/कार्यालये वगैरे) त्यात राहणारी किती माणसे. दर घरटी किती माणसे असे अहवाल येत असतात. पण वेबसाईटवर संशोधन करून ते मिळतात.
खूपसे अहवाल विकत मिळतात.
सर्व अहवाल यायला पाचाच्या वर वर्षेजातील असे कुठेतरी वाचले. आणि एवढे करून हवे तेवढे येतच नाही.

स्त्रीभ्रुण हत्या जनगणनेवर प्रमाण करू पहाणार्‍या एवढ्या होत आहेत. एक साधा विचार मांडतो. भारतातला जन्मदर आता २६-३० च्या मधे असेल. १० लाख लोकसंख्येच्या शहरात तो रोज ८० मुले एवढा होतो. हजारात पन्नास फरक पडण्यासाठी (९६२ ते ९१४) याच्या जोडीला स्त्रिभ्रूण असलेले रोज २-३ गर्भपात होत असले पाहिजेत. याच लोकसंख्या असलेल्या शहरात रोज ३२ जण मृत्यु पावतात (१२ चा मृत्युदर धरून). यावरून प्रश्नाची बिकटता समजते. (ही आकडेवारी अंदाजपंचे आहे.)

प्रमोद

बूच

लोकसंख्या वाढीचा घटलेला दर, वाढलेली साक्षरता या समाधान देणा-या गोष्टी असल्या तरी मुलींचे घटलेले प्रमाण मात्र निराश करणारेच आहे. 'या जनगणनेमध्ये दडलंय काय ' डॉ.सजीवनी मुळ्ये यांनी कालच्या दै. सकाळमधे थोडक्यात पण उत्तम आढावा घेतला आहे.

अजुन येऊ द्या...!

-दिलीप बिरुटे

 
^ वर