दख्खनच्या पठारावर – 6

इसवी सनानंतरच्या सहाव्या शतकापासून ते आठव्या शतकापर्यंत, दख्खनच्या पठारावर आपली सत्ता अबाधित राखणार्‍या चालुक्य राजवंशातील राजांनी, प्रथम आपली राजधानी ऐहोले येथे स्थापन केली असली तरी नंतर त्यांनी ती कर्नाटक राज्यामधल्या बागलकोट जिल्ह्यात असलेल्या बदामी या गावात हलवली होती. या बदामी पासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘पट्टडकल‘ हे खेडेगाव या राजांच्या दृष्टीने एक महत्वाचे स्थान होते. तसे पहायला गेले तर ऐहोले प्रमाणेच पट्टडकल सुद्धा एक अतिशय सर्वसामान्य असेच खेडेगाव आहे. परंतु या गावाजवळ चालुक्य राजांनी अनेक सुंदर मंदिरे या कालात बांधली. ही मंदिरे बांधण्यासाठी बदामी या राजधानीची निवड न करता हे गाव त्यांनी का निवडले याचे एक कारण या गावाचे भौगोलिक स्थान हे दिले जाते. या गावाजवळून मलप्रभा ही कृष्णा नदीची एक उपनदी वाहते. दख्खनमधल्या किंवा दक्षिण भारतातल्या बहुसंख्य नद्या पश्चिकेकडून पूर्वेकडे वहातात. मलप्रभा ही नदी सुद्धा याला अपवाद नाही. मात्र पट्टडकल गावाजवळ ही नदी एकदम नव्वद अंशात वळते व काही अंतर दक्षिणेकडून उत्तरेकडे वहाते. पट्टडकलची मंदिरे या दक्षिण-उत्तर प्रवाहाच्या अगदी काठालगत बांधलेली आहेत. चालुक्य काळात हे स्थान अतिशय पवित्र असे मानले जात होते व चालुक्य राजे आपला राज्याभिषेक राजधानी बदामी मधे न करवून घेता पट्टडकल मंदिरांच्यात करवून घेत असत.
pattadakal temple complex with titles

ऐहोले वरून मी आता पट्टडकल कडे निघालो आहे. हा रस्ताही फारसा सुखावह नाही. अरूंद व खड्यांनी भरलेला रस्ता, आजूबाजूला उसाची शेती असल्याने उसांनी भरलेले मोठमोठे ट्रॅक्टर-ट्रेलर, गाई-म्हशी व धूळ व या सगळ्यात भर म्हणून कडकडीत ऊन, हे सगळे सहन करत येथे प्रवासी येत रहातात याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे बावनकशी सोन्यासारखी असलेली पट्टडकलची मंदिरे. या मंदिरांच्या स्थापत्याची जर ऐहोले व बदामीच्या स्थापत्याशी तुलना केली तर विनोदाने असे म्हटले जाते की जर ऐहोले मंदिरांना प्राथमिक शाळेतल्या मुलांचे हस्तकौशल्य मानले तर बदामी येथील मंदिरे ही माध्यमिक शाळेतील मुलांचे हस्तकौशल्य ठरतील व पट्टडकल मंदिरे ही कॉलेजात शिकणार्‍या मुलांचे हस्तकौशल्य मानावे लागेल. पट्टडकल गावाजवळ एका मोठ्या परिसरात आठ मंदिरांचा हा समूह आहे.

Pattakadal temples
माझी बस पट्टडकल मंदिरांच्या परिसराजवळ थांबते. हा सर्व परिसर तारेच्या संरक्षक जाळीने सुरक्षित केलेला आहे व आत प्रवेश करण्यासाठी प्रवेशमूल्य द्यावे लागते. आत शिरल्यावर मला प्रथम दिसत आहेत मोठमोठी व हिरवीगार राखलेली हिरवळीची कुरणे. या कुरणांच्या पलीकडे पट्टडकलची मंदिरे मोठ्या दिमाखाने उभी आहेत.
Kadasiddeshvara temple Pattakadal
कडासिद्धेश्वर मंदिर

पट्टकडलची मंदिरे सातव्या आणि आठव्या शतकात बांधली गेलेली असल्याने एकूणच आराखडा व कारागिरी ऐहोले पेक्षा जास्त सरस आहे हे प्रथम दर्शनीच जाणवते आहे. मी उत्तरेला असलेल्या प्रवेशद्वारातून प्रवेश करतो व समोर असलेली हिरवळ ओलांडल्यावर पहिल्यांदा छोटेखानी आकाराची दोन मंदिरे समोर दिसत आहेत. ही मंदिरे आहेत कडासिद्धेश्वर व जाम्बुलिंग मंदिरे. दोन्ही मंदिरांची धाटणी अगदी साधी व साधारण सारखीच आहे. कडासिद्धेश्वर मंदिराच्या पूर्वेच्या भिंतीवर दोन द्वारपाल मूर्ती कोरलेल्या आहेत तर जाम्बुलिंग मंदिराची पूर्वेकडची भिंत कोरी आहे. दोन्ही मंदिरांच्या वरचे कळस उत्तर भारतीय म्हणजे रेखा-नगर प्रकारचे आहेत.
Galganatha temple pattakadal
गलगनाथ मंदिर
Galgnatha temple tower
गलगनाथ मंदिराचा उत्तर हिंदुस्थानी धाटणीचा रेखा-नगर कळस
Galganatha temple door lintel with dancing shiva

गलगनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावरचा नृत्य करणारा शिव

Sangameshvara temple Pattakadal
संगमेश्वर मंदिर

पट्टडकल मंदिरे बांधणार्‍या स्थापत्यविशारदांना नवीन नवीन प्रयोग करून बघण्याची इच्छा होती. त्यामुळे इथे असलेल्या मंदिरांच्या कळसांचे स्थापत्य उत्तर हिंदुस्तानी किंवा दाक्षिणात्य अशा दोन्ही धाटणींचे दिसते. कडासिद्धेश्वर व जाम्बुलिंग मंदिरांचे कळस हे रेखा-नगर प्रकारचे असले तरी कळसाच्या दर्शनी बाजूच्या मध्यभागी एक कोरलेले शिल्पही दिसते. मी थोडा पुढे जातो पुढे दिसणारे मंदिर म्हणजे गलगनाथ मंदिर आहे. या मंदिराचा कळस जरी आधीच्या दोन मंदिरांसारखाच असला तरी या मंदिराला दोन्ही बाजूंना पंखांप्रमाणे जोडलेले दोन व्हरांडे आहेत. या व्हरांड्यांवर उतरती दगडी छते आहेत. प्रवेशद्वारावरच्या लिंटेलवर, नृत्य करणारा शंकर, पार्वती व नंदी यांचे शिल्प आहे. या नंतर मी बघतो आहे. संगमेश्वर मंदिर. 2009 साली मलप्रभा नदीला मोठा पूर आला होता व पट्टकडल गाव पाण्याखाली बुडले होते. बर्‍याच गावकर्‍यांनी त्या वेळेस या संगमेश्वर मंदिराच्या छतावर आश्रय घेतला होता. हे मंदिर खूपच प्रशस्त आहे व बांधकाम अतिशय मजबूत दिसते आहे. मात्र मंदिरावर कलाकुसर फारच थोडी दिसते आहे.
Virupaksha mallikarjuna kashi vishveswara temples
डावीकडे मल्लिकार्जुन, उजवीकडे विरूपाक्ष व मध्यभागी काशी विश्वेश्वर मंदिरे
Malprabha river view from Virupaksha temple
विरूपाक्ष मंदिरातून दिसणारा मलप्रभा नदीचा देखावा
Nandi Virupaksha temple
विरूपाक्ष मंदिरासमोरचा नंदी
Rang Mandap Virupaksha temple
विरूपाक्ष मंदिर रंग मंडप, खांबांच्या वरचे बास रिलिफ उठून दिसत आहेत.
surya in a chariot on ceiling panel Virupaksha temple

सात घोड्यांच्या रथावर आरूढ सूर्य नारायणाचे छतावर असलेले अप्रतिम भित्ती शिल्प

Vishnu outside wall Virupaksha temple
विरूपाक्ष मंदिराच्या बाह्य भिंतीवरचा विष्णू

थोडे आणखी पुढे गेल्यावर माझ्या नजरेसमोर येते आहे पट्टकडलचे सर्वात मोठे व प्रसिद्ध असलेले विरूपाक्ष मंदिर. दुसरा विक्रमादित्य या चालुक्य राजाची मोठी राणी लोकमहादेवी हिने हे मंदिर, कांची येथील युद्धात मोठा विजय विक्रमादित्य राजाला मिळाला म्हणून बांधले होते. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला हाय रिलिफ प्रकाराची शिल्पे आहेत. यात शंकर-उमा सारखी देवांची शिल्पे तर आहेतच पण या शिवाय युगुलांची चित्रे, योगासन करणारी एक व्यक्ती यासारखी अगदी निराळी शिल्पे पण आहेत. मंदिरासमोर काळ्या पाषाणाचा एक मोठा नंदी आहे. या नंदीच्या मागच्या बाजूस मलप्रभा नदीचा प्रवाह दिसतो. आहे. एकंदरीत हे मंदिर लक्षात राहण्यासारखे खासच आहे. मी मंदिरातील सभामंडपात जातो. वर छतावर 7 घोड्यांच्या रथावर स्वार झालेल्या सूर्यदेवांचे मोठे लक्षवेधक शिल्प आहे. मंडपाच्या खांबांवर छोटी किंवा मिनिअचर बास रिलिफ प्रकारची पॅनेल्स आहेत. रामायण, महाभारत आणि भागवत यातील गोष्टी या पॅनेल्सवर कोरल्या आहेत.
Shankar outside wall Virupaksha temple

विरूपाक्ष मंदिराच्या बाह्य भिंतीवरील शिव मूर्ती

Shankar Uma Nandi outside wall Virupaksha temple
शंकर, उमा व व नंदी, विरूपाक्ष मंदिर बाह्य भिंत
A couple Virupaksha temple
विरूपाक्ष मंदिर बाह्य भिंतीवरील एक युगुल, पुरुष नाही म्हणत असल्याने स्त्री चिडलेली दिसते आहे.
Doing exercise Virupaksha temple
विरूपाक्ष मंदिर बाह्य भिंत, अचाट व्यायामप्रकार करणारी एक व्यक्ती
Woman scolding man Virupaksha temple
नंदी मंडपावरचे एक युगुल. स्त्री पुरुषाला सज्जड दम देताना दिसते आहे.
Mahabharat in nutshell,  bheeshma lying Virupaksha temple

विरूपाक्ष मंदिर, महाभारताचे मिनिएचर बास रिलिफ

Brmha Mahesh Vishnu Virupaksha temple
ब्रम्हा, महेश-उमा व विष्णू यांचे मिनिएचर बास रिलिफ
Pillar decoration Mallikarjun temple
मल्लिकार्जुन मंदिर खांबावरील बास रिलिफ
Samudra manthan Virupaksha temple
समुद्र मंथन, मिनिएचर बास रिलिफ
Panchatantra child, mother, snake and mongoose
पंचतंत्रातील लहान मुलाला वाचवणारे मुंगुस व त्यालाच मारणारी अविवेकी स्त्री
bull elephant common head Virupaksha temple
वृषभ व हत्ती यांचे एकच मस्तक असणारे गमतीदार शिल्प

या मंदिरातील युगुल चित्रे थोडी निराळी वाटत आहेत. काही प्रेमी युगुले दिसत असली तरी पुरुषाला चांगले खडसवत असलेली स्त्री किंवा पुरुषाबरोबर वाद घालत असलेली स्त्री, ही शिल्पेही इथे दिसत आहेत. या सर्व शिल्पांचे बारकाईने निरिक्षण करण्यासाठी पट्टकडल मंदिरांच्यात काही दिवस तरी घालवायला हवेत. माझ्याजवळ फारच कमी वेळ असल्याने मी पुढे निघतो आहे. या मंदिराच्या बाजूला आणखी एक शिव मंदिर आहे. विक्रमादित्य राजाची धाकटी राणी व लोकमहादेवी राणीची धाकटी बहीण, त्रैलोक्यमहादेवी हिने हे मंदिर बांधले होते. याचे नाव आहे मल्लिकार्जुन मंदिर. मंदिराचा एकूण आराखडा विरूपाक्ष मंदिरासारखाच असला तरी आतली बास रिलिफ्स मात्र पंचतंत्र आणि पुराणे यातल्या गोष्टींवर आधारित आहे. विरूपाक्ष आणि मल्लिकार्जुन या दोन्ही मंदिरांवरचे कळस हे दक्षिण भारतीय पद्धतीचे आहेत, त्यामुळे ही दोन मंदिरे एकदम निराळी उठून दिसत आहेत.
Happy couple 1 virupaksha temple

एक प्रेमी युगुल, पुरुष व स्त्री यांची केश रचना सारखीच दिसते आहे

Happy couple 2 Virupaksha temple
प्रेमी युगुल, पुरुष व स्त्री या दोघांनी एकमेकाच्या खांद्यावर हात टाकला आहे.
Argument Virupaksha temple
वादविवादाचा प्रसंग
Ladies fashions mini skirt and kurta salwar Virupaksha temple
1300 वर्षांपूर्वीची आधुनिक फॅशन, मिनिस्कर्ट व कुर्ता

मल्लिकार्जुन मंदिराच्या मागच्या बाजूस काशी विश्वेश्वर मंदिर आहे. या मंदिराचा कळस परत उत्तर हिंदुस्थानी किंवा रेखा-नगर प्रकारचा आहे. कळसावरचे डिझाइन मात्र अगदी निराळे आहे.
Kashivishvanatha temple Pattakadal
काशी विश्वेश्वर मंदिर

पट्टडकल मंदिरांचे स्थापत्य हे भारतीय स्थापत्यशास्त्राच्या इतिहासातला एक महत्वाचा टप्पा मानला जातो. उत्तर व दक्षिण हिंदुस्थानी स्थापत्य यांचा एक मिलाफ या मंदिरांच्यात झालेला दिसतो असे जाणकार म्हणतात. मला स्थापत्यातली काही विशेष जाण नसल्याने मला याबद्दल फारसे काही लिहिणे शक्य नाही. ऐहोले आणि पट्टडकल मंदिरांची मी मनात तुलना करतो आहे. पट्टडकल मंदिरांचे स्थापत्य जरी खूपच उजवे असले तरी भित्तीशिल्पे किंवा रिलिफ्स मधे मात्र मला फरक जाणवतो आहे. ऐहोले मधली सर्व शिल्पे हाय रिलिफ प्रकारची असल्याने जास्त जिवंत वाटतात असे मला वाटते. पट्टडकलला असलेली हाय रिलिफ शिल्पे सोडली तर मंदिराच्या आतली सर्व शिल्पे मात्र बास रिलिफ आहेत. (अर्थात ऐहोलेला मंदिराच्या आत शिल्पेच नाहीत.) बास रिलिफ शिल्पे तेवढी जिवंत वाटत नाहीत असे मला वाटते.

पट्टडकलची भेट आटोपती घेऊन मी आता बदामी कडे निघालो आहे. तेथे पोचल्यावर प्रथम पेटपूजा, थोडी विश्रांती व नंतर बदामीच्या प्रसिद्ध गुहांतील मंदिरांना भेट द्यायची असा कार्यक्रम आहे.

19 फेब्रुवारी 2011

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्तच...

प्राचीन् काळात भारतीय स्थापत्यशास्त्र बर्‍यापैकी पुढारलेले होते असे सर्व लेखांवरुन जाणवते.
त्यामध्येही ढोबळ मानाने मला जाणवलेले प्रकार असे:-

एक् तुम्ही बदामीला किंवा विजयनगरात बघितलेली दाक्षिणात्य प्रभाव असणारी शैली. सभामंडप्, महाल् अशा मोठ्या रचानांसाठी ही उत्कृष्ट वाटाते.
त्याच्या जवळ जाणारा वास्तुप्रकार म्हणजे ज्यात महाराष्ट्रातले बहुतांश प्राचीन बांधकामं केली आहेत् ते :- हेमांडपंथी.
************************
ह्याशिवाय भारतीय स्थापत्यातील महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा यश मानता येइल ते म्हणजे गुजरात किंवा राजपुतान्यात असणार्‍या प्रसिद्ध "बावडी" किंवा विहिरी आणि त्याच्या आसपास असणारे वैषिष्ट्यपूर्ण किल्ले,गढ्या आणि हवेल्या. ह्यांच्यावर जरी नंतरच्या काळात मुघलांची छाप पडली तरी मूळ त्यांची स्वतःची अशी एक् शैली होती हे नक्की.

वरच्या दोन्ही वास्तु अभिजनांच्या, उच्च् वर्गाच्या झाल्या.समाजाचा काही मर्यादित भागच ह्याचा वापर करी. ह्याशिवाय ज्याचा बहुतांश जनता वापर करीत असे ते म्हणजे स्थानिक हवामान व नैसर्गिक रचनेनुसार सर्व् ऋतुंना आत्मसात करणारी भारतभर पसरलेली हजारो प्रकारची साधी घरे किंवा झोपड्या.

म्हणजे, केरळचे किनारपट्टीचे वातावरण वेगळे, तिथे स्थानिक आढळणारी झुडुपे,झाडे व खडक्-माती वेगळे व तिथल्या वातावरणात् अनुकूल् असे असणार.
तर् इथे महाराष्ट्रात देशावर आढळणारे वातावरण व त्याला अनुरुप असलेली आधीच अस्तित्वात असणारी नैसर्गिक सोय. मातीची,शेणाने सारवलेली घरे,जी हिवाळ्यात थोडीशी उबदार वाटतात आणि अगदि भर उन्हाळ्यात तुम्हाला शांत आल्हाददायक वातावरण देतात. गांधीजींच्या आणि विनोबांच्या लिखाणात ह्याचा बराच पुरस्कार केलेला दिसतो.

**************************
भारतीयांकडे मुळातच चांगली संस्कृती व त्यायोगाने चांगले, भूभागाला अनुरुप असे प्रगत स्थापत्यशास्त्र कसे होते, हे सगळे हा लेख् वाचुन आठवले, इतकेच.
बाकी सर्व अवांतर्, पण इथे आठवले म्हणुन लगेच टंकले.

चांगली मालिका. वाचतो आहे.

अजुन एक अवांतरः-
चालुक्य घराणी नक्की कुठं कुठं आणी किती होती? म्हणजे बदामीचे चालुक्य असाही इतिहासात उल्लेख सापडतो. तिकडे पश्चिम् किनारपट्टीचे चालुक्य असाही उल्लेख सापडतो.(एक् तर् हे गुजरातेते असावेत् किंवा मुंबईच्या जवळ कल्याणच्या आसपास् कुठेतरी. )
भरीला भर् म्हणजे राजस्थानमधले सोळंकीही काही ठिकाणी स्वतःला चालुक्य घराणे म्हणवुन घेतात.म्हंजे राजस्थानातही तेच, दक्षिणेतही तेच!

--मनोबा

चालुक्य घराणी

चालुक्य राजांची दोन प्रमुख घराणी आहेत. बदामी राजधानी असलेले पश्चिमेकडचे किंवा बदामीचे चालुक्य घराणे. सहाव्या शतकात हे घराणे उदयास आले व आठव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांनी राज्य केले. राष्ट्रकूटांनी यांच्याकडून सत्ता ताब्यात घेतली. राष्ट्रकूटांचा पराभव दहाव्या शतकात करून दुसरे म्हञे कल्याणीचे चालुक्य घराणे उदयास आले. या घराण्याने बाराव्या शतकापर्यंत दख्ख्कनवर राज्य केले होते.
जास्त माहितीसाठी हा मुद्दा प्रियाली यांच्याकडे पास

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

तिसरे घराणे

वेंगीचे घराणे. आणि बदामी/ वातापीच्या घराण्याला पश्चिमेचे म्हणत नाहीत. कल्याणीच्या घराण्याला पश्चिमेचे म्हणतात.

ही तीन घराणी काहीशी अशी सध्याच्या राज्यांना भाषेच्या/ संस्कृतीच्या दृष्टीने जवळची पडतात -

वेंगी - तमीळनाडू/ आंध्र,
वातापी - कर्नाटक/ महाराष्ट्र्,
कल्याणी - महाराष्ट्र/ गुजरात.

सगळ्यांत जुने वातापीचे. हर्षाला नर्मदेवर अडवून धरणारा पुलकेशी दुसरा हा वातापीचा चालुक्य. त्याने त्याच्या लाडक्या धाकट्या भावाला वेंगीचे राज्य काढून दिले.

पुढे सोळंकी नावाचे एक घराणे राजस्थानात तसेच गुजरातेत सापडते. ते चालुक्यांचीच शाखा असल्याचे मानतात.

विसरले

मी लेख वाचला होता पण प्रतिसाद द्यायला विसरून गेले. :-)

लेख नेहमीप्रमाणेच मस्त. चित्रे सुरेख आहेतच.

जास्त माहितीसाठी हा मुद्दा प्रियाली यांच्याकडे पास

इथे तुम्ही आणि आरांनी दिलेली माहिती आहे तेवढीच जवळपास माहिती माझ्याजवळ आहे. चालुक्यांचे राज्य गुजराथेपासून, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रात असल्याने त्यांच्याशी जवळीक दाखवणारे असणारच. तेव्हा सोळंकी हे चालुक्यांशी संबंध दाखवतात ते योग्य असावे.

लेख आवडला

थोडे विस्ताराने वेळ मिळाल्यावर लिहीन..
जागा राखून ठेवते.

वाचत आहे

इथे दिलेल्या छायाचित्रातील मंदीरे, शिल्पांची ओळख गाईडकडून कळली की प्रत्येक मोठ्या मंदीर, मुर्तीबद्दल माहीती देणारे फलक जागोजागी आहेत?

गाईड

बहुतेक माहिती गाईडकडून. थोडीफार माहिती येथे बाहेर पुस्तके मिळतात त्यातून घेतली आहे.

चन्द्रशेखर

नेहमीसारखे छान

नेहमीसारखे छान.

बारीकशी टीप : "विरूपाक्ष मंदिर बाह्य भिंत, अचाट व्यायामप्रकार करणारी एक व्यक्ती" - ही "त्रिविक्रम" वामनावतार दाखवण्याकरिता नेहमीची आकृती आहे. एक पाऊल जमिनीवर, एक पाऊल स्वर्गात, तर "तिसरे पाऊल कुठे ठेवू?" या कथाभागाचे हे चित्रण आहे.
डावीकडे आदला कथाभाग आहे : छत्री घेतलेला बुटका वामन राजापाशी दान मागतो आहे.
उजवीकडे नंतरचा कथाभाग आहे : कोलमडलेली छोटीशी आकृती बलिराजाची आहे.

वामनावतार

आपण म्हणता तसेच मलाही हे शिल्प वामनावताराचे आहे असेच वाटले होते. परंतु आमच्या गाईडकडे या संबंधी मी पृच्छा केली असता हे शिल्प वामनावताराचे नाही व व्यायाम करणार्‍या व्यक्तीचे आहे असे उत्तर मिळाल्याने मी या चित्राला हा मथळा दिला आहे. कदाचित शिल्पातील फिगर उचलेल्या पायाला आपल्या हाताने स्पर्श करताना दाखवली आहे त्यामुळे हा व्यायामप्रकार असेल. बदामीला वामनावताराचे शिल्प आहे व ते या शिल्पापेक्षा निराळे आहे. त्या शिल्पाचा फोटो पुढच्या भागात येईल.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सुंदर

अतिशय सुंदर माहितीपूर्ण लेखमाला. या लेखनाचे उत्तम पुस्तक होईल. पण त्याही पलिकडे जाऊन छायाचित्रांचा दर्जा उत्तम असल्याने याचे मराठी भाषेतील 'कॉफी टेबल बुक' ही करण्याचे मनावर घ्या.
धनंजय यांनी दिलेल्या माहितीमुळे ही कोरीव चित्रे बारकाईने समजली. धन्यवाद!
-निनाद

लेखमाला उत्कंठेने वाचतो आहे.

लेखमाला उत्कंठेने वाचतो/बघतो आहे. फार छान वर्णन आणि छायाचित्रे.
बदामीतील गुहांची मंदिरांच्या प्रतिक्षेत.

प्रमोद

 
^ वर