डावा की उजवा?

डावखुर्‍या व्यक्तींना बरेचदा चित्र विचित्र प्रसंग आणि नजरांना तोंड द्यावे लागते. सध्याच्या जमान्यात अजून ही किती लोक या गोष्टीला महत्व देतात ते माहीत नाही, पण एक काळ नक्की असा होता (अगदी ९८-९९ पर्यंत) की समारंभात (जसे की लग्न, मुंज, बारसे ई ई) सगळ्यांच्या देखत डावा हात वापरून जेवणे हे अतिशय कठीण काम असायचे. बरेचजण - विशेषतः आजी आजोबांच्या वयाची माणसं अशी बघायची की मी नुकताच परसाकडे जाऊन आलो आहे आणि हात न धुताच जेवायला बसलो आहे. एकदा तर एका आजींनी मला पकडून ४०-४५ मिनिटे भाषणं दिले की डाव्या हाताने खाणे कसे चुकीचे आहे. त्यांच्या लॉजीक प्रमाणे संडासला जो हात वापरतो त्यानेच खाणे म्हणजे महापाप. मी बिचारा त्यांना काकुळतीला येऊन सांगत होतो की अहो माझं सगळचं ऊलट असतं हो :)
अजून एक भयंकर ऑकवर्ड् करणारा प्रसंग म्हणजे प्रसाद घेणे. मी हटकून डावा हात पुढे करणार आणि प्रसाद देणारा मला दहा हजार् आठ्या घालून सांगणार की हा नाही तो हात. आजू बाजू ला माझी आई असेल तर् तिच्याकडे काय् हे एव्हढ ही नाही शिकवलं असं बघणार. त्या बाबतीत मी फार् सुखी होतो. आईने मला लहाणपणी फक्त् एकदाच् बदडून काढल. पण माझ्यावर ढिम्म् परिणाम झाला नाही. नंतर तीनी डॉक्टरना विचारल तर ते म्हणाले की असू द्यात, हे नैसर्गिक आहे. बस्स त्या नंतर कधीही मार पडला नाही.

तुमच्या पैकी किंवा जवळच्या नातलगांपैकी कुणी डावखुरे आहे का?
असल्यास तुमचे काही सुरस अनुभव आहेत का?
अजून ही भारतात अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं का?

लेखनविषय: दुवे:

Comments

माझी मुलगी आहे डावखुरी...

मला तुमच्या अनुभवांची जाणीव आहे.
डावखुर्‍या व्यक्तींबाबत आपल्याकडे लोक जे वागतात ते बघून चीड येते. माझी मुलगी डावखुरी आहे. लहान आहे. देवळात गेल्यावर प्रसाद घेण्यासाठी तिचा डावा हात सहजपणे पुढे होतो. अशावेळी प्रसाद वाटणार्‍या बायका किंवा पुरुष मोठ्या तोर्‍यात तिला सांगतात, 'अगं प्रसाद डाव्या हाताने घेऊ नकोस.' आम्ही कितीही समजाऊन सांगितले, की ही डावखुरी आहे तरी त्यांची आढ्यता काही जात नाही. परवा सांगूनही एक आजीबाई म्हणाल्या, 'तरीही डाव्या हाताने प्रसाद घ्यायचा नाही' मी त्यांच्यासमोर मुलीला म्हटले, 'तू प्रसाद घेऊ नकोस.' मी संतापून त्या थेरडीला (माफ करा. ही क्षुब्ध भावना आहे) चांगले सुनावणार होतो, पण माझी बायको मध्ये पडली. तिने तो प्रसाद स्वतःकडे घेतला आणि नंतर मुलीला डाव्या हाताने खाऊ दिला. साध्या साध्या गोष्टीत माणसे किती हेकेखोर होतात? पुरुषाला उजवे आणि स्त्रीला कायम डावे स्थान. धार्मिक कार्यक्रमात तिने डाव्या बाजूला बसायचे. एकदा 'वामांगी रखुमाई' म्हटले, की सगळीकडे डाव्याचा आग्रह धरायचा. ज्योतिषात स्त्रीचा डावा हात बघायचा, तिने निजायचे तेही डाव्या कुशीवर. रुढींच्या नावाखाली तद्दन भंपकपणा नुसता.

अमेरिकेत डावखुर्‍या लोकांची संघटना आहे. ते लोक लेफ्ट हँडर्स डे पण साजरा करतात. डावखुर्‍यांना वापरण्यास सोईची ठरतील अशी अनेक उत्पादने मुद्दाम विकसित केली जातात. डावखुरे लोक अत्यंत हुशार आणि कल्पक असतात. मात्र डाव्या हाताने लिहिताना वेग थोडा कमी पडत असावा, असे आपले माझे निरीक्षण आहे. माझ्या शाळेत बेंचवर बाजूला बसणारा मित्र डावखुरा होता. त्याला लिहिताना वेळ लागायचा. माझ्या मुलीला ग्राऊंडवर सुरवातीला थोडा प्रॉब्लेम आला. विश्राम असे म्हटल्यावर तिने प्रथम डावा पाय बाजूला घेतला, पण नंतर इतर मुलांचे बघून आता ती उजवा पाय बाजूला घ्यायला शिकली आहे.

तुमची मुलगी

लकी आहे की तिला असे माता पिता लाभले.
> डावखुर्‍यांना वापरण्यास सोईची ठरतील अशी अनेक उत्पादने मुद्दाम विकसित केली जातात.
ईजिनियरिंगला असताना ड्राफ्टर नावाच्या उपकरणानी फार म्हणजे फारच त्रास दिला होता. तो मी माझ्या सोईपणे जोडला की हमखास पुढच्या माणसाला पाठित टोचायचा.
> डावखुरे लोक अत्यंत हुशार आणि कल्पक असतात.
कल्पना नाही..आमच्या हुशारीचा उजेड अजून तरी पडायचा आहे :)
> माझ्या मुलीला ग्राऊंडवर सुरवातीला थोडा प्रॉब्लेम आला. विश्राम असे म्हटल्यावर तिने प्रथम डावा पाय बाजूला घेतला, पण नंतर इतर मुलांचे बघून आता ती उजवा पाय बाजूला घ्यायला शिकली आहे.
+१ सेम सेम सेम. अजून एक म्हणजे मला डाव्या हातानी वळा किंवा उजव्या हातानी वळा सांगताना व्हायचे. कारण की सर्व साधारण पणे लिहायला जो हात तो उजवा अस समीकरण असते.

डावखुर्‍या लोकांसाठी डिझाईन

मी किंवा माझ्या कुटुंबियांपैकी कोणीच डावखुरे नाही. परंतु दोन वर्षापूर्वी माझ्या एका हाताला फ्रॅक्चर (सुदैवाने डाव्या) झाले असताना सर्व गोष्टी एकाच हाताने करण्याची पाळी आली होती. त्या वेळेस मला पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात आली की आपल्या रोजच्या वापरातील सर्व गोष्टी या उजव्या हाताने वापरता येतील याच पद्धतीने डिझाईन केलेल्या असतात. साध्या दरवाज्याचे उदाहरण घ्या. दरवाजाचे लॅच, कडी कोयंडा हा नेहमी उजव्या बाजूला बसवलेला असतो, जेणेकरून उजव्या हाताने तो बंद किंवा उघडता यावा. याच पद्धतीने कपाटाची हॅ न्डल्स तशीच बसवलेली असतात. दोन दारांचे कपाट असले तर हॅ न्डल असे बसवलेले असते की डाव्या हाताने एक भाग दाबून धरून उजव्या हाताने कपाटाचे दुसरे दार उघडता यावे. लिहिण्यासाठी फळी जोडलेली खुर्ची बघितली तरी ती उजव्या हाताने लिहिण्यासाठीच बनवलेली असते.
डावखुर्‍यांना केवढे प्रयास उजव्यांच्या या जगात करायला लागत असतील याची उजव्यांना कधीच कल्पना येऊ शकत नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

+१

अजून एक वैताग आणणारी गोष्ट म्हणजे स्क्रुज्. हमखास सोडवायला जायचे म्हणून डाव्या हातानी पिळून घट्ट करणार.

स्क्रूबाबत समजण्यास अवघड जात आहे

चर्चेत इतरत्र दिलेली कात्री, दरवाजाचे हँडल वगैरे उदाहरणे समजण्यासारखी असली तरी स्क्रूबाबत असा अनुभव का यावा हे अनाकलनीय आहे. स्क्रूचे थ्रेड्स ऍँटीक्लॉकवाईज असले तरी स्क्रू पिळताना उजवा किंवा डावा हात वापरणारा माणूस त्याच्या आजवरच्या अनुभवानुसारच स्क्रू योग्य दिशेने पिळत असतो. बहुसंख्य डावखुरे हे जन्मापासूनच डावखुरे असतात. त्यामुळे भूतकाळात कधीतरी उजव्या पद्धतीने स्क्रू पिळण्याची सवय होऊन आता अचानक डावखुरे झाल्याचा साक्षात्कार झाल्यावर डाव्या पद्धतीने स्क्रू पिळणे त्रासदायक होत आहे असा अनुभव येणे अशक्य आहे.

स्क्रू

मी उजवा असलो तरी स्क्रू घट्ट करणे मला डाव्या हाताने सुकर वाटते.

नितिन थत्ते

बायसेप्स

स्क्रू बसविणे उजवखुर्‍यांना सोपे असते तर स्क्रू काढणे डावखुर्‍यांना!

+१

एका हाताने फिरकी देणारी उपकरणे ही नेहमी डाव्या-उजव्यांत डावे-उजवे करणार.

येथे संगीत-वाद्ये डावी-उजवी करतात त्याबद्दल उपक्रमावरील लेख वाचता येईल.

:)

'डावे-उजवे करणे' हा वाक्प्रचार वापरून आपण डाव्या-उजव्यांत डावे-उजवे करतो त्याचे काय?

आधुनिकोत्तर स्वसंदर्भ

शब्दांचे काही अर्थसंदर्भ सामाजिक संकेताने ठरतात ते बदलू शकतात. अशा प्रकारे आपण संदर्भांपैकी उजव्यांना डावलू शकतो आणि डाव्यांना उजवू शकतो. कालांतराने सर्वच अर्थसंदर्भ बदलून व्युत्पत्ती नि:संदर्भ होऊ लागते.

वाक्व्रचारांमधील उजवखोरांचे सिनिस्टर हल्ले निरर्थक करण्यातत डावखुर्‍या लोकांनी डेक्स्ट्रस असावे.

:-)

काहीतरी गल्लत

प्रेषक नितिन थत्ते (मंगळ, 03/15/2011 - 15:29)

मी उजवा असलो तरी स्क्रू घट्ट करणे मला डाव्या हाताने सुकर वाटते.

प्रेषक रिकामटेकडा (मंगळ, 03/15/2011 - 16:00)

स्क्रू बसविणे उजवखुर्‍यांना सोपे असते तर स्क्रू काढणे डावखुर्‍यांना!

वर केलेले थत्ते व रिकामटेकडा यांचे दावे परस्परविरोधी आहेत.

साईज डझ मॅटर

मोठे स्क्रू पिळण्यासाठी कोपराचे स्नायू वापरावे लागतात. त्यांपैकी बायसेप्स सर्वांत अधिक शक्तिवान असतो. उलट, छोटे स्क्रू पिळण्यासाठी मनगटाचे लॅटरल फ्लेक्शन/एक्स्टेन्शन करूनही काम होऊ शकते. त्यांपैकीसुद्धा, फ्लेक्शनच अधिक शक्तिवान असते.
मोठे स्क्रू बसविण्यासाठी उजवे कोपर वापरणे उपयुक्त असते तर छोटे स्क्रू बसविण्यासाठी डावे मनगट वापरणे उपयुक्त असते.

मूळ प्रतिसाद

मूळ प्रतिसादात तुम्ही स्क्रूच्या साईजचा उल्लेख न करता काढणे व बसवणे यांचा उल्लेख केला आहे.

स्क्रू, साईज, काढणे, हाताचा वापर वगैरे शब्द प्रयोगांमुळे चर्चा किंचित 'पूजेची पथ्ये' या प्रकारची होऊ लागली आहे का?

ठीक

छोटे स्क्रूसुद्धा उजव्या कोपराने पिळणे शक्य आहेच, त्यामुळे पराकोटीची शक्ती लावून एखादा बारीक स्क्रू उघडायचा असेल तेव्हासुद्धा ते डावखुर्‍यांपेक्षा उजवखुर्‍यांना सोपेच ठरेल.

खुलासा

या प्रकारे स्क्रूड्रायव्हर धरल्यास उजव्या हाताने घट्ट करणे सुकर असते पण टॉर्क कमी लावले जाते.

मी सहसा खालील प्रकारे स्क्रूड्रायव्हर धरतो. तेव्हा डाव्या हातात धरून घट्ट करणे सोयीचे वाटते. असे धरून स्क्रू घट्ट केल्यास टॉर्क जास्त लावता येते (स्क्रू जास्त घट्ट बसतो).

संपादकांना या चित्राचा आकार कमी करता आल्यास बरे होईल.

नितिन थत्ते

हे पहा

http://www.indiana.edu/~primate/lspeak.html

फक्त मीच नाही तर ईतरांना देखील हा प्रॉब्लेम येतो.

१०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत,१०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत, १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

उत्तम

प्रसाद कोणत्याही हाताने घेतला तरी काही फरक पडू नये.
माझा उपाय - अशा ठिकाणी (पुजार्‍याला) फरक पडत असेल तर त्याला घरी पाठवावे किंवा आपण घरीच रहावे.
-निनाद

प्रसाद..

प्रसाद दोन्ही हातांनी घ्यायला सांगा (ओंजळ करून).

बाकी तुमचे निरीक्षन ठीक वाटते. मला नाही अनूभव की ते थोडे स्लो लिहितात. परंतू वहीच्या डिसाइन मधे काही झोल असेल काय ?
---------------------
-धनंजय कुलकर्णी

हम्म्

डावखुरे लोक चांगले आर्टिस्ट असतात असे ही म्हंटले जाते. जाणकारांनी प्रकाष टाकावा. बाकी आम्हाला लहाणपणापासुनंच उजव्या हाताने खायची सवय लावली आहे. चमचा मात्र डाव्या हातातंच् पकडावा लागतो . प्रसादासाठी डावखुर्‍या व्यक्ती ला उजवा हात पुढे करायला सांगणे म्हणजे पाय डोक्या मागे घेउन् पायाने नमस्कार करन्या इतके अवघड् आहे असे वाटत् नाही.

- (डावखुरा) टारझन

(डावखुरा) टारझन

> डावखुरे लोक चांगले आर्टिस्ट असतात असे ही म्हंटले जाते.
तुमची क्रियेटिविटि अनेकविध सह्यांमधून विविध संकेतस्थळांवर पाहीली आहे. त्यामुळे या विधानात जोर असयची शक्यता नाकारता येत नाही :).
> प्रसादासाठी डावखुर्‍या व्यक्ती ला उजवा हात पुढे करायला सांगणे म्हणजे पाय डोक्या मागे घेउन् पायाने नमस्कार करन्या इतके अवघड् आहे असे वाटत् नाही.
मान्य. पण तरीदेखील पटकन डावा हात पुढे जातो ते जातोच.

असहमत..

प्रसादासाठी डावखुर्‍या व्यक्ती ला उजवा हात पुढे करायला सांगणे म्हणजे पाय डोक्या मागे घेउन् पायाने नमस्कार करन्या इतके अवघड् आहे असे वाटत् नाही.

..वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतरही समोरच्या व्यक्तीला स्वतःच्या हट्टाप्रमाणे वागायला लावणे, ही असंवेदनशीलता आहे, असे माझे मत आहे.

असंवेदनशीलता

कुणाची असंवेदनशीलता? डावखुर्‍याची की प्रसाद देणार्‍याची? प्रसाद उजव्या हातात घ्यायचा असतो ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतरही समोरच्या व्यक्तीला स्वतःच्या हट्टाप्रमाणे डावा हातच पुढे करणे ही असंवेदनशीलता नाही का?

डावा हात

स्वतःचाच पुढे करताहेत ना डावरे? त्यात कसली आलिये असंवेदनशीलता?

मात्र तथाकथित भटजी,प्रसाद देणारे मात्र कुणा दुसर्‍याचाच हात नियंत्रित् करु बघतात. हीच असंवेदनशीलता आहे.

दुसर्‍याच्या गोष्टी, हस्त-प्राधान्य ठरवणे ही असंवेदनशीलता.
स्वतःचं हस्त-प्राधान्य ठरवणे हे स्वातंत्र्य.

भटजीला प्रसाद् उजव्या हातात घेणं ठिक वाटत असेल तर त्यानं स्वतः तो उजव्या हातात घ्यावा.
दुसर्‍यांना जबरदस्ती कशाला?
डावरे काही येउन तुम्हाला जबरदस्ती करत नाहित ना " डाव्याच हातानं प्रसाद द्या किंवा घ्या" म्हणुन?

तुमच्या देव मूर्तीला ही डावा हात असतोच की. वर त्या हातावरनं घरंगळत आलेलं देव-स्नान-जल तुम्ही तीर्थ म्हणुन घेता. ते बरं चालतं?
इतकी किळस असेल डाव्याची तर मूर्तीलाही दोन्ही हात उजवेच ठेवा की.!!

आपलाच मनोबा.

असंवेदनशीलताच

प्रसाद देणार्‍याची (तो भटजीच असला पाहिजे असे नाही, घरातले वडिलधारेही असू शकतात) श्रद्धा असते की उजव्या हातात घ्यावा ह्यात घेणार्‍याचेच हित चिंतलेले असते. अशा वेळेस निव्वळ आपण डावे आहोत् म्हणून मुद्दाम डावाच हात पुढे करुन वडिलधार्‍यांच्या श्रद्धांचा अपमान करणे ही असंवेदनशीलता नाही काय? सहज पुढे आलेला डावा हात मागे घेऊन उजवा पुढे करायला असे किती कष्ट पडतात?

हो, एकदम सेम!

अगदी सेम!! मलाही उजव्या हाताने खायची सवय व चमचा डाव्याच् हातात पकडता येतो. उजव्या हाताने ग्रिपच येत नाही.
परंतू बॅडमिंटन खेळताना मी उजव्या हातात रॅकेट धरायचे.
स्क्रु फिरवणे हा कायमचा गोंधळ्. मी राईट् हँड थंब रूल वापरून् बघते स्क्रु घट्ट् बसणारे की सैल् होणारे हे पाहण्यासाठी.. :)
गाडीचे लॉक, दार, कात्री, त्या पुढे रायटींग् पॅड्स् असलेल्या खुर्च्या... किती तो त्रास आम्हा डावखुर्‍यांना! स्वयपाक् करताना चमचे व् डाव मी डाव्याच् हातात् पकडते मग् लोकं वैतागतात्! :)
बाकी मीही ऐकलेय्, डावखुरी लोकं कलाकार् असतात्! :)

डावखुरे?

किस्से तर रोचक आहेत्.
तुमच्या पैकी किंवा जवळच्या (सध्याच्या)नातलगांपैकी कुणी डावखुरे आहे का?: -
--नाही

असल्यास तुमचे काही सुरस अनुभव आहेत का?: -
--हो. आमची (भावी) "ही" भडकली की डाव्या हातानं सणसणित चपराक ठेउन देते.
उत्स्फुर्त पणे तिचा डावा हातच पुढे येतो.(टाळी देताना किंवा हेल्मेट घालताना किंवा लाथा घालताना)
पण सामान्य जीवनात ती केवळ लेखन आणि मारहाण डाव्या हातानं करते.
भोजन्,वादन, खेळ(टे टे,ब्याडमिंटन वगैरे) हे सर्व सहसा उजव्या हातानेच.
बाहेर् फिरायला जाताना माझा नेहमी डावा पाय आधी बाहेर येतो,तिचा उजवा.!!

अजून ही भारतात अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं का?:-
--कल्पना नाही. जावं लागु नये असं वाटतं.

डावर्‍यातही प्रकार असावेत, काही जण सगळिच कामं उलटी करतात्.
तर काही जण काही विशिष्ट कामांसाठिच हातांची अदलाबदल करतात (अर्धवट डावरे)
उदा:- खालिल् प्रसिद्ध व्यक्तिमत्वे बघा:-
१.सौरव गांगुली :- डाव्यानं ब्याटिंग उजव्यानं गोलंदाजी
२.आपला सचिन ब्याटिंग बोलिंग उजव्यानं, पण इतरत्र डावरं व्यक्तिमत्व(लेखन्,भोजन्,टाळी देतानाही त्याचा डावा हात उत्स्फुर्तपणे वर जाताना पाहिलाय् म्याचमध्ये. वगैरे.)
३.झहीर खानः- अगदि सौरव च्या उलट.
४.झिंबाब्वे चा १९९९ विश्वचषकाचा स्टार नील जॉन्सन सौरव प्रमाणेच.
५.आशिष नेहरा, कर्टली आंब्रोस, अर्जुना रणतुंगाही शेम टु शेम
६.आफ्रिकेचा लान्स क्लुजनर सौरव सारखाच.
७.महाभारत ह्या ग्रंथातील श्री अर्जुन पांडु कुरुवंशी (भगवान श्रीकृष्णाचा आते भाउ) हा दोन्ही हातांनी बाण मारण्यास सक्षम् होता म्हणे.(सव्यसाची)
८.महाभारत सिरियल मध्ये दुर्योधन आणि कर्ण डावरे दाखवलेत.

काही डावरे सर्वत्र डावा हातच प्राधान्यानं वापरतात (फुल फ्लेज्ड डावरे)
१.सनथ जयसुर्या
२.वासिम अक्रम
३.युवराज सिंग(की सिंघ??)
४.विनोद कांबळी,ब्रायन लारा
५.वन-डे स्पेशालिस्ट मायकल बेव्हन

अजुन एक केसः-
सुनील गावसकर जशी नेहमी उजव्या हातानं अप्रतिम फलंदाजी करायचे, जवळ जवळ तशीच त्यांनी डाव्या हातानही रणजीमध्ये वगैरे केल्याचं ऐकलय.(ह्यालाच सव्यसाचि म्हणतात काय् ? )

क्रिकेट मधले डावरे शैलीदार वाटतात, हे खरच.

अभिनेत्यांपैकी केवळ दोन जण माहित् आहेत् डावरे:-
बच्चन् पिता -पुत्र.

आपालाच मनोबा.

आमची (भावी) "ही" भडकली की डाव्या हातानं सणसणित चपराक ठेउन देते.

ऊप्स .. आमची सहानुभुती आहे, कारण की डाव्या हताची लागते पण ज्यास्तच.

> उदा:- खालिल् प्रसिद्ध व्यक्तिमत्वे बघा:-

तुम्ही फक्त क्रिकेट मधीलच उदाहरणे दिली. पण खर तर डावा हात का उजवा हात् याचा फरक ईतर् खेळ जसे की टेनिस ई मध्ये ज्यास्त पडावा.

> तर काही जण काही विशिष्ट कामांसाठिच हातांची अदलाबदल करतात (अर्धवट डावरे)

खर आहे, मी स्वतः सर्व गोष्टी डाव्या हताने करतो पण चेस् मात्र उजव्या हाताने खेळतो :P

डावा आणि उजवा

तुमच्या पैकी किंवा जवळच्या नातलगांपैकी कुणी डावखुरे आहे का?
नाही.
>>असल्यास तुमचे काही सुरस अनुभव आहेत का?
असे काही खास अनुभव नाहीत पण-

मला क्रिकेट खेळतांना डाव्या हातांनी गोलंदाजी आणि फलंदाजी करायला आवडले असते.

-दिलीप बिरुटे

रोचक

मनोबाची निरीक्षणे रोचक आहेत खरी.
मी इतकी वर्षे क्रिकेट पाहतोय, पण असा विचार केला नव्हता.

उत्स्फुर्त पणे तिचा डावा हातच पुढे येतो.(टाळी देताना किंवा हेल्मेट घालताना किंवा लाथा घालताना)
लाथा घालतांनाही हातच पुढे येतो म्हणजे प्रकरण अवघड आहे. ;)

तर्क

लाथा घालतांनाही हातच पुढे येतो म्हणजे प्रकरण अवघड आहे. ;)

बहुधा लाथा खाणारी व्यक्ती निसटून जाऊ नये म्हणून पकडून ठेवण्यासाठी हाताचा वापर होत असावा.

छे हो.......

लाथा डाव्या पायानं घालते जास्त जोरात असं निरिक्षण (आणि अनुभव ;-) ) आहे.
असं म्हणायचं होतं.
भयाण आठवणीच्या भयानं काहितरी भलतच टाइप् केलं आधी .

तितकच नाही, ह्या डावर्‍यांनी खास स्वतःची अशी south paw नामक खत्तरनाक शैली विकसित केलिये boxing मध्ये.

ह्यांचा एखादा ठोसाही जन्मभराची अद्दल घडवण्यास सक्षम असतो. प्रत्यक्ष परिणाम बघायचे असतील तर जरुर् भेटा. ;-)

आपलाच मनोबा

प्रत्यक्ष परिणाम

प्रत्यक्ष परिणाम बघायचे असतील तर जरुर् भेटा. ;-)

तुमच्यावर असे परिणाम झाले आहेत काय? तुम्हाला भेटल्यास हे परिणाम पाहावयास मिळतील काय?

हम्म

माझे वडील, भाऊ आणि भावाची लहान मुलगी हे डावखुरे आहेत. वडील आणि भावाच्या लहानपणी त्यांना मारूनमुटकून उजव्या हाताने लिहिण्याची सवय लावल्याने त्यांची हस्ताक्षरे दिव्य झाली आहेत. त्यांना चमच्याने खाताना उजवा हात वापरताच येत नाही. त्यामुळे भावाच्या मुलीबाबत हे उपाय केले जाणार नाहीत असे वाटते. सुरस अनुभव फारसे नाहीत. जवळच्या व्यक्तींचा डावखुरेपणा पाहिल्याने त्यात फारसे वावगे वाटत नाही. प्रसाद वगैरे डाव्या हातात घेतलेला बरा असे माझे मत आहे. जेणेकरून तो हात चिकट झाला तरी इतर कामे उजव्या हाताने सुरळीतपणे होऊ शकतात.

किती महान

भारतीय स्ण्स्कृती किती महान आहे हे तुमच्या उदाहरणांवरुन दिसुन येते.

डावखुर्‍यांची संघटना

  • माझ्या माहितीप्रमाणे पुण्यात Left handers' Association ही संघटना कार्यरत होती/आहे. श्री बिपिनचंद्र चौगुले या असोसिएशनच्या कामात उत्साहाने भाग घेत होते. या संघटनेबद्दलची माहिती येथे मिळेल. होम पेजवर उद्दिष्ट नमूद केले आहेत.
  • 11 ऑगस्ट हा दिवस लेफ्ट हॅंडर्स डे म्हणून साजरा केला जातो.
  • जगभरात डावखुर्‍यांची संख्या सुमारे 11 टक्के आहे. परंतु त्यांच्यासाठीच म्हणून कुठलेही उत्पादन नाहीत.
  • खरे पाहता कात्री पकडताना, चाकूने कापताना, रायफल चालवताना, सायकलीवर चढताना व उतरताना, संगणकाचा माउस वापरताना व पुस्तक/वृत्तपत्रं/नियतकालिकं उलटताना डावखुर्‍यांना अडचणी येत असतात. त्यांच्या रचनेत (डिझाइनमध्ये) सूक्त बदल केल्यास डावखुर्‍यांना सुलभपणे या गोष्टी हाताळता येतील. पण कोण लक्षात घेतो?
  • पु्स्तकांची रचना व बांधणी उजव्या हातांचा वापर करणार्‍यांसाठीच आहे. डावखुर्‍यांना पुस्तकं उलटताना त्रास होतो. त्या तुलनेने उर्दू पुस्तकं वा (लिहिण्याची पद्धत) डावखुर्‍यांना अनुकूलकारक आहेत.
  • बराक ओबामा, ब्रिटिश प्रधान मंत्री डेव्हिड कॅमेरॉन लेफ्ट हॅंडर्स आहेत.

परदेशात

परदेशात आल्यावर इतकी डावखुरी माणसे पाहून मला आश्चर्य वाटले होते. नंतर आपल्याकडे अशी डावखुरी माणसे कमी का दिसतात त्याचे कारण लक्षात आले.

माझ्या घरात डावखुरे कोणी नाही पण त्यात मुद्दाम घातलेल्या सवयी नाहीत. लहानपणी माझ्या भावाला जरा काही झाले की बोटांना बँड-एड गुंडाळण्याची सवय होती. बँड-एड हे ट्रॉफी असल्यागत त्याच्या अंगावर/ बोटांवर चिकटलेले असे. अशावेळी आमच्या मातोश्रीच "इइइ! त्या बँड-एडवाल्या हाताने जेवू नकोस. डाव्या हाताने खा." असे सांगत.

देवळातला प्रसाद

मी देवळात प्रसाद खायला जातच नाही. आयुष्यातली एक कटकट आपोआप कमी होते. एकदा देवधर्म वर्ज्य केला की (डावखुरेपणाबद्दलचे) विचित्र प्रसंग आणि नजरा टळतात किंवा खुपण्याइतपत जाणवतदेखील नाहीत. बाकी व्यावहारिक अडचणींबद्दल सहानुभूती.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

हेच

हेच म्हणतो.
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

प्र(ति)साद

मी देवळात प्रसाद खायला जातच नाही.

देवळात प्रसाद खायला म्हणून कुणीच जात नसावं

आयुष्यातली एक कटकट आपोआप कमी होते.

प्रसाद खाण्यात काय कटकट आहे? मला तर सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा फार-फार आवडतो.

एकदा देवधर्म वर्ज्य केला की (डावखुरेपणाबद्दलचे) विचित्र प्रसंग आणि नजरा टळतात किंवा खुपण्याइतपत जाणवतदेखील नाहीत.

तुम्ही देवधर्म वर्ज्य केला म्हणून बाकिच्यांचा नजरा कशा बदलतील?

प्रतिसादाचा प्रसाद

देवळात प्रसाद खायला म्हणून कुणीच जात नसावं

माझ्या मते 'देवळात प्रसाद खायला जाणे' आणि 'प्रसाद खायला देवळात जाणे' यात किंचित फरक आहे. भाषातज्ज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा.

प्रसाद खाण्यात काय कटकट आहे? मला तर सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा फार-फार आवडतो.

देवळांचा अनुभव कमी त्यामुळे सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा कोणत्या देवळांत मिळतो याची कल्पना नाही म्हणून माझा पास.

तुम्ही देवधर्म वर्ज्य केला म्हणून बाकिच्यांचा नजरा कशा बदलतील?

देवधर्म वर्ज्य केल्याने आमची कातडी गेंड्याची होते आणि इतरांच्या हलकट वर्तनाचा फार परिणाम होत नाही. (त्यामुळेच संस्थळांवरही वाटेल तसे वागण्यासाठी एक आय्.डी. पुरतो ;-))
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

प्रसादाचा प्रतिसाद

माझ्या मते 'देवळात प्रसाद खायला जाणे' आणि 'प्रसाद खायला देवळात जाणे' यात किंचित फरक आहे. भाषातज्ज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा.

माझ्या मते दोन्हीचा अर्थ एकच. 'आंबे आणायला बाजारात गेलो' आणि 'बाजारात आंबे आणायला गेलो ' दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच.

देवळांचा अनुभव कमी त्यामुळे सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा कोणत्या देवळांत मिळतो याची कल्पना नाही म्हणून माझा पास.

मग अनुभव वाढवा, प्रसादाला 'कटकट' म्हणण्याची घाई होते आहे.

देवधर्म वर्ज्य केल्याने आमची कातडी गेंड्याची होते आणि इतरांच्या हलकट वर्तनाचा फार परिणाम होत नाही. (त्यामुळेच संस्थळांवरही वाटेल तसे वागण्यासाठी एक आय्.डी. पुरतो ;-))

कातडी गेंड्याची करुन घेण्याचा आणि देवधर्म वर्ज्य करायचा काय संबंध? जगातील अनेक पराकोटीची हिंसक कामे धर्माच्या नावाखाली केली गेली आहेत, त्या सर्वांची कातडी मुलायम होती असे म्हणायचे आहे का?

संस्थळांवर वाटेल तसे वागायला आम्हालाही एकच आयडी पुरतो.

काय कटकट आहे

मग अनुभव वाढवा, प्रसादाला 'कटकट' म्हणण्याची घाई होते आहे.

या दिशेने अनुभव वाढवण्याची इच्छा नाही आणि गरजही वाटत नाही. मी प्रसादाला कटकट म्हटले आहे असा माझा दावा नाही; आपला असावा. प्रसाद घेण्यात कटकट कोणती आहे त्याच्या संदर्भासाठी योगप्रभू यांच्या मुलीचा अनुभव पुन्हा एकदा वाचावा अशी नम्र विनंती. या विषयावर अधिक भाष्य करण्यासारखे माझ्यापाशी काही नाही. बाकी चालू द्या.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

वाक्याचा डावाउजवा भाग

वाक्याचा डावाउजवा* भाग (आधीची पदे, नंतरची पदे): हा जरा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. यातून कधीकधी अर्थछटा बदलतात.
- - -
*प्रतिसादात "डावाउजवा" असा उल्लेख करून माझा प्रतिसाद पूर्णपणे अवांतर नसल्याचा कांगावा करता यावा, म्हणून तो उल्लेख घुसडलेला आहे.
- - -

वेगवेगळ्या अर्थछटांकरिता या वाक्यांची ध्वनिरूपाने उच्चरली, तर ही संदिग्धता येत नाही असे जाणवेल. याचे स्पष्टीकरण उपलब्ध आहे. अवांतर विस्तारभयास्तव ते पूर्ण येथे देत नाही.

मराठी (आणि अन्य भाषांतल्या) वाक्यांचे दोन भाग पाडता येतात. "टोपोस" आणि "स्क्रिप्टम्". (मराठी प्रतिशब्द या क्षणी आठवत नाहीत.) टोपोस म्हणजे जे आधी माहीत असते ते (किंवा वाक्यार्थ समजण्यापुरते जे आधी माहीत असल्यासारखे गृहीत धरायचे असते ते). स्क्रिप्टम् म्हणजे त्या बाबतीत नवी माहिती.

मराठीमध्ये (आणि कित्येक अन्य भाषांमध्ये) वाक्यातील टोपोस आणि स्क्रिप्टम् यांच्यात दोन श्वासखंड असतात. स्वर खाली-वर होणे (पिच् - इंग्रजी शब्द) या बाबतीत टोपोस आणि स्क्रिप्टम् हे दोन वेगवेगळे दिसून येतात.

चिंतातुर जंतु यांनी सांगितलेले मत
चिंतातुर जंतु यांना टोपोस||स्क्रिप्टम् यांची अशी फोड अपेक्षित होती असे वाटते :
मी देवळात || प्रसाद खायला जात नाही.
("मी देवळात" या खंडात चढता पिच्; "प्रसाद खायला जात नाही" या खंडात उतरता पिच्)
यातून असा काही अर्थ निघतो की "मी देवळात (जाणे)", हा टोपोस गृहीत धरावा, आणि त्या टोपोसबद्दल नवी माहिती अशी की "प्रसाद खायला नाही (जात)".

साधारण अशा लयीत (म्हणजे पहिली दोन पदे टोपोसमध्ये टाकून) पुढील वाक्याचा अर्थ बदलतो :
मी प्रसाद खायला || देवळात जात नाही.
यातून असा काही अर्थ निघतो की "मी प्रसाद खाणे", हा टोपोस गृहीत धरावा, आणि त्या टोपोसबद्दल नवी माहिती अशी की "देवळात नाही जात".

या दोहोंतून अर्थ बदलतो असे चिंतातुर जंतु आपल्या अनुभवातून म्हणतात. (त्यांचे स्पष्टीकरण काही का असेना, अर्थ बदलण्याबाबत त्यांचा अनुभव निर्विवाद आत्त म्हणून मान्य केला पाहिजे.)

- - -
डार्क मॅटर यांनी सांगितलेले मत
मात्र टोपोस||स्क्रिप्टम् यांची अशी फोड केली तर अर्थ वेगळा होतो :
मी || देवळात प्रसाद खायला जात नाही.
("मी" या खंडात जोरदार चढता पिच्; "प्रसाद खायला जात नाही" या खंडात त्या मानाने लऊ चढून-उतरता पिच्)
यातून असा काही अर्थ निघतो की "मी", हा टोपोस गृहीत धरावा, आणि त्या टोपोसबद्दल नवी माहिती अशी की "देवळात प्रसाद खायला नाही (जात)". या प्रकारात स्क्रिप्टम् मधील पदे आलटून-पालटून अर्थ फारसा बदलत नाही.
मी || प्रसाद खायला देवळात जात नाही.
या दोहोंतून अर्थ बदलत नाही असे डार्क मॅटर आपल्या अनुभवातून म्हणतात. (त्यांचे स्पष्टीकरण काही का असेना, अर्थ बदलण्याबाबत त्यांचा अनुभव निर्विवाद आत्त म्हणून मान्य केला पाहिजे.)
- - -

दोन्ही अनुभव आत्त म्हणून मान्य करण्याबद्दल माझे स्पष्टीकरण थोडक्यात असे : दोघांच्या तोंडात/कानात वाक्यांचे हेल वेगवेगळे आहेत. उच्चारण ऐकल्यास त्या दोघांचे वाक्यार्थाबद्दल विचार इतके परस्परविरोधी वाटणार नाहीत.

- - -
संदर्भ :
१. टोपोस्-स्क्रिप्टम् आणि वाक्यातील श्वासखंड/बलमाने यांच्याबद्दल तपशीलवार अभ्यास प्रा. अशोक केळकरांच्या पुस्तकात सापडेल : Language in a semiotic perspective: Architecture of the Marathi sentence
२. विस्तारभयास्तव न केलेला विचार - नकाराचा अन्वय. त्याबद्दल काही विचार उपक्रमाच्या दिवाळी अंकातील माझ्या लेखात सांगितलेले आहेत.

डावरेपणा

डावे कम्युनिस्ट डावरे असतात काय?
बिशनसिंग बेदी उत्तम डावखुरा गोलंदाज होता.
दरवाजे डाव्या उजव्या दोन्ही बाजूंचे असतात.
मोबाइल फोन नेहमी कुठल्या कानाला लावता?
उगीच हळवेपणा कशाला?

डावे कम्युनिस्ट डावरे असतात काय?

डावरी देणार्‍या बायका डावर्‍या असतात काय?

> मोबाइल फोन नेहमी कुठल्या कानाला लावता?
हॅन्डस् फ्री

> उगीच हळवेपणा कशाला?
बिलकूल हळवेपणा नाही. फक्त अनुभव शेअरिंग.

हॅन्डस् फ्री

हॅन्ड्सफ्री कुठल्या कानात घालता?

डावे

चीन मध्ये सगळ्यात जास्त "डावे" राहतात असे ऐकतो ;)

मी स्वतः "उजवा" आहे.

झापडेबद्दल थोडा असहमत -
Archie: Danny, slap him.
Danny: [slaps Bandy]
Archie: With the right Danny, properly.
Danny: [slaps Bandy]
Archie: No, no, no, NO. Come on, do it properly with the back of the right hand.

महाभारतात कोणी डावखुरा आहे का ह्याबद्दल काही नोंद आढळत नाही...:)

डाव्याला डकना असे देखील म्हणतात.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

गुजराथी

भारतात गुजराथी समाजात डावर्‍यांचे प्रमाण जास्त दिसते. ह्याचे कारण काय असावे?

बंगाली

पण सौरव गांगुली तर बंगाली आहे. ह्याचे कारण काय असावे?

अर्गॉनॉमिक्स

दुचाकी (किंवा, त्यापूर्वी घोडा) चालविण्यासाठी अशी सोय असते की दुय्यम असा डावा हात केवळ कौशल्य आवश्यक नसलेल्या कामांत (क्लच/लगाम वापरणे) सतत गुंतवून ठेवावा आणि उजवा हात आवश्यकतेनुसार विविध कामांसाठी वापरावा: दुचाकीवर ऍक्सिलरेशन/पुढचा ब्रेक/पिस्तुल, इ.; घोड्यावर चाबूक/तलवार, इ.
उलट, शीतकपाट उघडण्यासाठी अधिक शक्तीचा असा उजवा हात गुंतवावा लागतो आणि वस्तू ठेवण्या/उचलण्याचा भार मात्र डाव्या हातावर येतो :( (मोठ्या शीतकपाटांना डावे आणि उजवे अशी दोन दारे असली तरी अवजड पदार्थ ठेवण्याची जागा उजव्या हाताच्या दारामागेच असते असे वाटते.)

 
^ वर