पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-४: ईडन गार्डन्सला झालेले भारताचे पानीपत!
पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-४: ईडन गार्डन्सला झालेले भारताचे पानीपत!
या उपांत्य सामन्याच्या चारच दिवस आधी भारतीय संघ पाकिस्तानबरोबरच्या तंग आणि उत्कंठावर्धक उपांत्यपूर्व सामन्यात विजयी झाला असला तरी त्याची शारीरिक आणि मानसिक थकावट झाली होती. लंकेबरोबरच्या उपांत्य सामन्यातील विजयाबद्दलच्या फाजील आत्मविश्वासामुळे विश्वचषक स्पर्धेतील विजयोत्सवाची सुरुवातही झालेली होती. पाकिस्तानच्या आमेर सोहेलने स्वतःच्या संघाच्या पराजयानंतरच्या पत्रकारपरिषदेत तर भारताला लाहोर येथील अंत्य सामन्याबद्दल आधीच शुभेच्छाही देऊन टाकल्या होत्या.
तसे पाहिले तर विश्वचषक स्पर्धा चालू व्हायच्या आधीपासूनच लंकेच्या जयसूर्या आणि कालुवितरणा या दोन फलंदाजांनी आपल्या तुफानी, झंझावाती फलंदाजीने एक तर्हेचा दरारा निर्माण केला होता आणि दिल्लीच्या साखळी-सामन्यात त्याची थोडीशी प्रचीती, थोडीशी झलक भारताला दिसलीही होती. त्या सामन्यात (बिचार्या) मनोज प्रभाकरच्या पहिल्या दोन षटकांत अनुक्रमे ११ व २२ धावा ठोकण्यात आल्या होत्या. जयसूर्याने त्या सामन्यात ७९ धावा केल्या होत्या. त्या मानाने कालुवितरणाची बॅट मात्र या संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत फारशी तळपलेली नव्हती. केवळ १२ धावांच्या सरासरीने त्याने या स्पर्धेत एकूण ७३ धावाच काढल्या होत्या आणि तो फक्त दोनदाच २० पेक्षा जास्त धावा करू शकला होता.
या पार्श्वभूमीवर भारत आणि श्रीलंका उपांत्य फेरीत एकमेकांसमोर उभे होते.
१३ हा आकडा अशुभ मानला जातो. १९९६ सालच्या विश्वचषक स्पर्धेतील हा उपांत्य सामना खेळला गेला १३ मार्च २०११ रोजी!! आणि हा १३ आकडा भारताला अशुभच ठरला.
नाणेफेक जिंकून भारतीय कप्तान अझारुद्दीनने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊन श्रीलंकेला फलंदाजीसाठी पाचारण केले. समोरील लक्ष्य माहीत असताना त्याचा पाठलाग करणे श्रीलंकेला जास्त पसंत असल्याचे त्यांनी केलेला दिल्लीतील सामन्यातील यशस्वी पाठलागावरून उघड झाले होते व या अप्रिय आठवणीचा अझारुद्दीनवर परिणाम झाला असावा. कालूवितरणा आणि जयसूर्यासारखे तडाखेबंद फलंदाज पहिल्याच षटकाच्या पहिल्या चार चेंडूत तंबूत परतले होते हे त्याचा हा निर्णय योग्य असल्याचेच सूचित करत होते. भोपळा फोडायच्या आधीच श्रीनाथच्या चेंडूवर मांजरेकरने कालूवितरणाला टिपले (१-१). त्याच्या जागी गुरुसिंहा फलंदाजीला उतरला. पाठोपाठ चौथ्या चेंडूवर जयसूर्याला वेंकटेशप्रसादने टिपले. (१-२)! दोघेही श्रीनाथच्या चेंडूंवर बेजबाबदारपणे फटका मारण्याचा प्रयत्न फसून ’थर्ड मॅन’च्या जागी टिपले गेले होते! श्रीलंकेला हे दोन्ही धक्के प्रचंडच होते. ईडन गार्डन्सवरील एक लाख प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतले. इथवर सारे भारताच्या दृष्टीने झकास चालले होते.
पण पुढील तासात जे घडले ते मात्र चित्तथरारक आणि मंत्रमुग्ध करणारे होते. कारण फलंदाजीला आलेला अरविदा डिसिल्वा एकाद्या ’अंगात आलेल्या’ आणि तंद्री लागलेल्या माणसासारखा फलंदाजी करत होता. संघाची दारुण परिस्थिती किंवा एक लाख प्रेक्षकांचा हल्लकल्लोळ या दोन्ही गोष्टी जणू त्याच्या गावीही नव्हत्या. त्याने इतक्या जलद गतीने धावा केल्या की त्याच्या पन्नास धावा ११ चौकारांच्या सहाय्याने केवळ ३२ चेंडूंत झाल्या होत्या. त्याच्या फलंदाजीला ’झंजावाती’ म्हणता येणार नाहीं कारण त्याची फटकेबाजी हिंसक किंवा माथेफिरूसारखी नव्हती. उलट त्याने कव्हर-एक्स्ट्राकव्हरमधून मारलेले फटके अतीशय रेखीव होते. त्या फटक्यात एक तर्हेची प्रसन्नताही होती. ते इतक्या अचूकपणे मारले होते कीं क्षेत्ररक्षक ते अडवूच शकत नव्हते. त्याची फलंदाजी इतकी कलात्मक होती कीं त्याच्या हातात जणू एकाद्या कमनीय युवतीच्या हातातला पंखाच होता. डिसिल्व्हाच्या तूलनेत दुसर्या बाजूला फलंदाजी करणार्या गुरुसिंहाने १६ चेंडूंत फक्त एक धाव काढली होती व तोसुद्धा सोळा चेंडूत केवळ एक धाव काढून संघाची धावसंख्या ३५ असताना बाद झाला होता.(३५-३) त्यावेळी डिसिल्व्हाची फलंदाजीवर इतकी जबरदस्त पकड होती कीं इतके बळी पडूनही श्रीलंकेने षटकामागे ७ या वेगाने धावा जमविल्या होत्या.
आणखी तीन चौकार ठोकून लंकेचा हा अष्टपैलू खेळाडू पंधराव्या षटकाच्या ठोक्यावर कुंबळेचा एक चेंडू आपल्याच बॅटने आपल्या यष्टीवर ओढून घेत त्रिफळाचित झाला. त्याने चौदा चौकारांच्या सहाय्याने केवळ ४७ चेंडूंत ६६ धावा काढल्या होत्या आणि लंकेला सुस्थितीत आणले होते.(८५-४). यावेळी त्यांची धावगती होती षटकामागे ५.७ धावा. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या अर्जुना रणतुंगा आणि महानामा यांनी धावांचा वेग षटकामागे ५ पेक्षा जास्त चालू ठेवला होता. दरम्यान १०१ चेंडूंत ५८ धावा काढून महानामा त्याच्या पायांत येणार्या वांबांमुळे जखमी म्हणून तंबूत परतला होता. रणतुंगा, महानामा आणि हशन तिलकरत्ने यांनी समंजसपणे आणि संयमाने फलंदाजी करून जलदपणे धावा जमवल्या. ५० षटके संपली तेंव्हां श्रीलंकेच्या संघाची धावसंख्या २५१ धावावर पोचली.
श्रीलंकेने भारतापुढे २५२ धावांचे लक्ष्य ठेवले. अत्यंत वेगाने चेंडू वळू देणार्या येथील खेळपट्टीवर ही धावसंख्या चांगली होती. पण भारताकडे असलेल्या दिग्गज फलंदाजांच्या मानाने ही धावसंख्या पार करणे अशक्यप्राय नव्हते. आणि सुरुवातही तशी चांगली झाली. भारतीय संघाच्या केवळ ८ धावा झालेल्या असताना सिद्धू ३ धावांवर चामिंडा वासच्या चेंडूवर जयसूर्याच्या हाती झेल देऊन बाद झाला. पण सचिन आणि संजय मांजरेकर यांची जोडी जमली व त्यांनी धावसंख्या ९८वर नेली. यावेळी सचिनने ९ चौकारांच्या सहाय्याने ८८ चेंडूत ६५ धावा केल्या होत्या (धावगती-स्ट्राइक रेट-७४). संजयच्याही २५ धावा झाल्या होत्या. त्यावेळी जयसूर्याचा एक चेंडू मारण्याच्या प्रयत्नात सचिन क्रीझ सोडून बाहेर आला व त्याचा फटका हुकला. यष्टीरक्षक कालूवितरणाने सफाईदारपणे बेल्स उडवल्या व सचिन यष्टीचित झाला (९८-२).
भारताच्या इतिश्रीची अथश्री त्या पाठोपाठ केवळ सात चेंडूंनंतर अझारुद्दीन गोलंदाज धर्मसेनाच्या हातात झेल देऊन भोपळाही न फोडता बाद झाला (९९-३). हे दोन दिग्गज फलंदाज पाठोपाठ बाद झाल्याने ’ईडन गार्डन’वरील एक लाख प्रेक्षकांत स्मशानशांतता पसरली. पण भारतीय फलंदाज एका पाठोपाठ बाद होतच गेले. प्रथम २५ धावांवर खेळत असलेला संजय जयसूर्याच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला (१०१-४). त्यानंतर श्रीनाथ धावबाद झाला (११०-५) व पाठोपाठ अजय जडेजा जयसूर्याच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला (११५-६). नयन मोंगियाने ८ चेंडूत १ धाव काढून डिसिल्व्हाच्या चेंडूवर जयसूर्याच्या हातात झेल दिला (१२०-७) आणि त्याच धावसंख्येवर भोपळाही न फोडता कपूरचा मुरलीधरनच्या चेंडूवर उडालेला झेल सीमेवर उभ्या असलेल्या डिसिल्व्हाने पकडला. जसे भारतीय फलंदाजीचे पानीपत होत गेले तसे प्रेक्षकांच्या संतापाने रौद्र स्वरूप धारण केले आणि कपूरचा झेल पकडला गेल्यावर प्रेक्षकांचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि दंगलीला सुरुवात झाली. रागाने भडकलेल्या कलकत्त्याच्या मैदानावरील पेक्षकांनी फेकलेल्या पाण्याच्या बाटल्यांनी मैदानाची सीमेलगतची जागा भरून टाकली व खेळ पुढे चालू ठेवणे अशक्य करून टाकले. त्याचवेळी स्टेडियममधील बसायच्या खुर्च्यांना आगी लावण्यात आल्या. या परिस्थितीत खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा झाल्याने सामन्याचे प्रमुख पंच क्लाईव्ह लॉइड यांनी सामना १५ मिनिटांसाठी स्थगित करून दोन्ही संघांच्या खेळाडूंना मैदानातून तंबूंत आणले व शांतता पुनर्प्रस्थापित करण्याची विनंती बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अधिकार्यांकडे केली. पण या दंगली दिलेल्या पंधरा मिनिटांत आटोक्यात आल्या नाहींत. त्यामुळे लॉईड यांनी शेवटी हा सामना दंगलीची परिस्थिती आटोक्यात न आल्याने लंकेला ’Default’ म्हणून बहाल केला. दंगलीमुळे सामना अर्ध्यावरच थांबविण्यात आला! भारताच्या घसरगुंडीमुळे संतप्त झालेल्या प्रेक्षकांनी दंगल सुरू केली भारताच्या घसरगुंडीमुळे संतप्त झालेल्या प्रेक्षकांनी दंगल सुरू केली पोलीस पहार्यात श्रीलंकेचे खेळाडू पोलीस पहार्यात श्रीलंकेचे खेळाडू फलंदाजी: श्रीलंका एकूण २५१/८ ५० षटकात फलंदाजी: भारत एकूण १२०/८ ३४.१ षटकात गोलंदाजी भारत: |
Comments
अरविंद डिसिल्वा आणि रॉय डायस
अरविंदाची ती सुप्रसिद्ध खेळी खाली दिलेल्या पहिल्या दुव्यावर बघता येईल. यापेक्षाही कलात्मक आणि थरारक खेळी रॉय डायसने केली होती तीही कसोटी सामन्यात. १२ चौकारांसह ५०, १५ चौकारांसह ६३ - त्याही केवळ ३५ मिनिटांमध्ये. दुर्दैवाने डायस ९७ वर बाद झाला नाहीतर कसोटीमधले सर्वात जलद शतक झाले असते. ती खेळी दूरदर्शनवर बघतानाचा थरार आज २८-२९ वर्षांनंतरही ताजा आहे. ती खेळी जालावर नाही, पण खालच्या दुसर्या दुव्यावर त्याची एक खेळी आहे, त्यावरून त्याच्या शैलीची थोडीशी कल्पना येईल.
अरविंद डिसिल्वा ६६
रॉय डायस ७७
लिंक पाठविल्याबद्दल आभारी आहे!
'गोरे'साहेब, 'काळें'चा नमस्कार!
ही लिंक पाहून पुन्हा प्रतिसाद देईनच, पण लिंक पाठविल्याबद्दल आभारी आहे!
दुलीप मेंडिस हाही असाच एक तडाखेबाज लंकाई खेळाडू होता!
___________
जकार्तावाले काळे
विनोद कांबळी
चेतन शर्मा हा त्याच्या हॅटट्रिक पेक्षा जावेद मियांदाद ने मारलेल्या षटकारासाठी जास्त लक्षात राहिला आहे. तसेच विनोद कांबळीविषयी म्हणता येईल. रणजीतील पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या चेडूवर त्याने षटकार मारला होता. शाळेत असताना सचिनबरोबर ६४४ धावांची चिरस्मरणीय भागीदारी केली होती. त्याचे कसोटी पदार्पण सचिन नंतर ३ वर्षांनी झाले, पण पहिल्या ७ कसोटींमध्ये त्याने २ द्विशतके आणि २ शतके झळकावली होती. शेन वॉर्नला सचिनची स्वप्ने पडण्याच्या कितीतरी आधी विनोदने त्याला एका षटकात २२ धावांना टाकला होता. पण,
जागतिक स्तरावरील गुअण्वत्ता अंगी बाळगणार्या खेळाडूने कसे वागू नये याचा परिपूर्ण परिपाठ म्हणजे विनोद कांबळी. बेशिस्तीने त्याच्या करियरचा बळी घेतला. २३ वर्षांचा असताना १९९५ साली तो शेवटची कसोटी खेळला. पण तोपर्यंत तो मैदान गाजवत होता.
९५ ला विनोदच्या एक्झिटने सौरव गांगूलीला कसोटी संघात प्रवेश मिळाला, असे मला वाटते.
||वाछितो विजयी होईबा||
गुणवत्तेला साधनेची जोड न मिळाल्यास काय होते याचे उदाहरण?
कांबळीच्या वैयक्तिक आयुष्यात असलेल्या अडचणीमुळे असे झाले काय हे मला माहीत नाहीं, पण वाचलेल्या माहितीवरून बोलायचे झाल्यास असे म्हणता येईल कीं गुणवत्तेला साधनेची जोड न मिळाल्यास काय होते याचे विनोद कांबळी हे उत्तम उदाहरण आहे. एक अतीशय गुणी क्रिकेटपटू त्याच्या पूर्ण ताकतीपर्यंत पोचू शकला नाहीं.
या पार्श्वभूमीवर सचिनचे यश मनाला अधीकच स्पर्शून जाते. आपले विक्रम, आपले कौशल्य व आपले सातत्य हे सर्व असूनही त्याने आजवर आपल्या मनाचा तोल ढळू दिलेला नाहीं आणि यामुळे त्याची थोरवी अधीकच खुलून दिसते. वर त्याची नम्रता आणि त्याचा प्रसन्न स्वभाव पाहिल्यावर असे वाटते कीं देवाने ही 'वामनमूर्ती' घडविताना नक्कीच खूप श्रम घेतले आहेत.
___________
जकार्तावाले काळे
सहमत आहे
विनोदने इंग्लंडविरुद्ध दोन द्विशतकेही ठोकली होती..
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
झिंबाब्वे
इंग्लंडविरुद्ध १ आणि झिंबाब्वेविरुद्ध १ द्विशतक होते.
||वाछितो विजयी होईबा||
होय
हो. बरोबर..एकदम जवळपास होती त्यामुळे गलतीसे मिष्टेक झाली.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
विनोद कसोटीत पदार्पणाचा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर होता
तो वॉली हॅमंड नावाच्या इंग्लिश फलंदाजाचा कसोटीत पदार्पणाचा विश्व-विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर होता आणि मग त्याच्या कारकीर्दीचा असा अचानक अस्त झाला.
___________
जकार्तावाले काळे
वॉली हॅमंड
जगात फक्त ४ महान क्रिकेटर्स होऊन गेले आहेत असे (बाहेरच्या जगाकडे दूषित नजरेने बघणार्या) अँग्लो-ऑस्ट्रेलियन लोकांना वाटते. त्यातील हे एक. इतर ३ म्हणजे डब्ल्यू जी ग्रेस, जॅक हॉब्ज आणि अर्थातच डॉन ब्रॅडमन.
||वाछितो विजयी होईबा||
जशी सचिनची बॅट बोलते तसेच.....
तुषार-जी,
जॅक हॉब्ज आणि ग्रेस यांच्याबद्दल माहिती नाहीं पण जशी सचिनची बॅट बोलते तसेच ब्रॅडमन आणि हॅमंड यांच्याबद्दल त्यांचे आकडेच बोलतात. त्यात वर्णभेदाचा भाग अजीबात नाहीं!
___________
जकार्तावाले काळे
वर्णभेद
अहो, वर्णभेद ते करतात, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे लोक. या दोन देशांबाहेर कोणी (महान जाऊद्या) चांगले खेळाडू आहेत हेच ते कबूल करत नाहीत.
||वाछितो विजयी होईबा||
ब्रॅडमन आणि हॅमंड यांच्या थोरवीत वर्णभेदाचा भाग नाहीं
अर्थातच वर्णभेद गोरे लोकच करतात. पण ब्रॅडमन आणि हॅमंड यांच्या थोरवीत वर्णभेदाचा भाग नाहीं एवढेच मला म्हणायचे होते.
आणि आज हेच गोरे लोक सचिनला "Greatest batsman ever" म्हणू लागले आहेत हेही विसरू नये!
___________
जकार्तावाले काळे
मस्त.
जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
किंचित वाईट वाटले.
सचिन बाद झाल्यावर इतरांनी हजेरीसाठी रांगा लावण्याची ही "थोर परंपरा" आज १६ वर्षांनीही अव्याहत सुरू आहे, हे कालचा भारत-द. अफ्रिका सामन्याने सिद्ध झाले. एकूण आपण भारतीय लोक फारच 'परंपराप्रिय' आहोत, हे खरेच ! :)
सचिन, वीरू आणि जहीर खान सोडल्यास आपले बाकीचे 'वीर' यथातथाच!
ज्ञानेश-जी,
अगदी खरे आहे. काल इतिहासाची पुनरावृत्ती झाली! सचिन, वीरू आणि जहीर खान सोडल्यास आपले बाकीचे 'वीर' यथातथाच खेळतात. युवराज तर आजकाल गोलंदाज जास्त तर फलंदाज क्वचित्! ५ डावात एकदा बरा खेळून आपली जागा 'पक्की' करतो.
धोनी पूर्वी काय झंजावाती फलंदाजी करायचा, पण आजकाल त्याला जणू ग्रहणच लागले आहे. पण यष्टीरक्षक म्हणून मात्र आजही सर्वोत्तम!
जहीर खानने मात्र ग्रेम स्मिथला आपले पक्के 'गिर्हाईक' बनविले आहे यात शंका नाहीं.
___________
जकार्तावाले काळे