आसाराम बापू - एक कल्ट

आसाराम बापू हे एक गंभीर प्रकरण आहे. ते आध्यात्मिक, व्यावहारिक, व्यावसायिक किंवा भोंदू किती ? ते स्वत:ला आणि काही अंशी इतर त्यांना हिंदू धर्माचे रक्षक, प्रसारक मानतात. एकंदरीतच त्यांच्या सत्संगातून, प्रवचनातून आध्यात्मिक खोली किंवा अध्यात्मावर अभ्यासपूर्ण विवेचन दिसत नाही. त्याच्या विरोधात अनेक घटना गेल्या काही वर्षात समोर आलेल्या आहेत. आसाराम बापुंचा समुदाय हा कल्ट या प्रकारात मोडतो का ? उपक्रम सदस्यांपैकी कोणी त्याचे अनुयायी आहेत का ? असल्यास जरुर कळवा ? मला त्यांना अनेक प्रश्न समक्ष भेटून विचारयचे आहेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

आहेत ना!

उपक्रम सदस्यांपैकी कोणी त्याचे अनुयायी आहेत का ?

हो आहेत ना! रिटे आणि यना. ;-) स्वारी! रिटे, यना आणि इतर सर्वांनी हलकेच घ्या.

असो. उपक्रमावर आसारामबापूच कशाला इतर कोणा बाबा-बुवांचे अनुयायी नसावेत असे वाटते. कल्टवर दिलेला दुवा चांगला आहे. अजून विस्तारीत करता येईल. बाबाबुवांच्या आणि बापूंच्या चर्चा उपक्रमींना आवडतात असे वाटते.

कशाला?

कशाला चौकशा?
गप पडा.

अण्णा

वाचनीय संदर्भ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.महेंद्र यांनी प्रश्न विचारले आहेत त्यांची माझ्या समजुतीप्रमाणे उत्तरे:
*प्रश्नः-आसाराम बापू हे आध्यात्मिक, व्यावहारिक, व्यावसायिक किंवा भोंदू किती ?
उत्तरः--आध्यात्मिक अत्यल्पप्रमाणात; व्यावहारिक,व्यावसाईक मोठ्या प्रमाणात;
भोंदू १००%
प्रश्नः--आसाराम बापूंचा समुदाय हा कल्ट या प्रकारात मोडतो का ?
उत्तरः--(तुम्ही दिलेला संदर्भ धागा वाचून) हो.
प्रश्नः--उपक्रम सदस्यांपैकी कोणी त्याचे अनुयायी आहेत का ?
उत्तरः--कल्पना नाही.
..
श्री.महेंद्र यांनी संदर्भ दिलेला श्री.विजय कुलकर्णी यांचा लेख अभ्यासपूर्ण आणि वाचनीय आहे.

चीड येत नाही का?

बाबाबुवांच्या आणि बापूंच्या चर्चा उपक्रमींना आवडतात असे वाटते.

मॅडम हा मनोरंजनाचा किंवा आवडीनिवडीचा विषय नव्हे. लाखो लोकांना नाडणारे हे महाभोंदू आणि त्यांचे कारनामे पाहून चीड येत नाही का तुम्हाला?

चीड? नाही बा!

मॅडम हा मनोरंजनाचा किंवा आवडीनिवडीचा विषय नव्हे. लाखो लोकांना नाडणारे हे महाभोंदू आणि त्यांचे कारनामे पाहून चीड येत नाही का तुम्हाला?

चीड का यावी? आसारामबापू किंवा इतर कोणी बुवाबाबा माझ्या कुटुंबातील लोकांना नाडत नाहीत किंवा माझे कुटुंबीय त्यांच्याकडे जात नाहीत. या लेखानुसार हे विश्वचि माझे घर। असे म्हणणे म्हणजे 'तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे' असे आहे तेव्हा मला जगाच्या किंवा लाखो लोकांच्या चिंतेने चीड का बरे यावी? तसेही ही काही उपक्रमावरली बाबा-बुवांची पहिली चर्चा नाही. अशा चर्चा दर महिन्या-दोन महिन्यांनी उपक्रमावर येत असतात.

चीड येण्यालायक जगात काय कमी विषय आहेत - म्याडमसमोर झुकणारे एअर-इंड्याचे जुने मानचिन्ह पगडीधारी महा"राजा", राजा शब्द उच्चारला की आठवणारे ए. राजा, दिल्लीत त्या मुलीला गोळी घालून मारताना काही लोक तमाशा बघण्यात दंग होते, नेदरलँडसमोर आपली टीम ढेपाळते. बरे ते जाऊ द्या! भरभक्कम टॅक्स देऊन आमच्या इथल्या रस्त्यांवर इतके खड्डे झाले आहेत की टायर पंक्चर होऊन फटका बसेल का ही रोज चिंता पडलेली आहे. चीड येतेच. आज कारमध्ये गॅस भरला ३.४५/ गॅ. च्या भावाने. निसर्ग तरी कसला बदमाश... जरा तापमान वर जात होतं तर आज पुन्हा स्नो होणार असं भाकित आहे. बरं स्नो होईल असेही नाही कारण हवामानखाते निसर्गापेक्षा लहरी असते म्हणे.

आता सांगा किती आणि कुठे कुठे चिडत राहायचं? चिडण्याचे दुष्परिणाम असतात ना! विज्ञान चीडप्रतिबंधक लस काढेल ना तेव्हा मनमोकळे चिडेन हं मी सर्वांवर! ;-) तोपर्यंत चिडून, उगीच रक्तदाब वगैरे मागे लागेल आणि मग उर्वरित आयुष्य गोळ्या खात जगावे या भीतीत राहून कशाला जगायचे?

पुढला मुद्दा आवडनिवडीचा, मागे एकदा बापूंच्या चर्चेत रिटेने विचारले होते "येणार का कोणी स्टींग ऑपरेशनसाठी माझ्याबरोबर?" एक पठ्ठा पुढे आला नाही उपक्रमावरला. तेव्हा या बाबाबुवांच्या चर्चा भरल्यापोटी, सुपारी-मुखवास चघळत करण्यासाठीच येतात इथे. जसे दुपारच्या वेळात काही गृहिणी सास-बहु मालिका पाहून टिपे ढाळतात तसाच बुवा-बाबांच्या चर्चा हा उपक्रमींच्या टैमपासाचा विषय आहे.

अंजन

जसे दुपारच्या वेळात काही गृहिणी सास-बहु मालिका पाहून टिपे ढाळतात तसाच बुवा-बाबांच्या चर्चा हा उपक्रमींच्या टैमपासाचा विषय आहे.

अतिशय झणझणीत अंजन घातलेत. सगळ्या उपक्रमाविषयीच आता मळभ दाटून येते आहे......

?

समजले नाही? काय भोंदूपण आहे त्यांच्यात? मी त्यांची अनुयायी नाही.
पण जरा शोध घेतला तर काही गोष्टी सापडल्या जसे - या संत विभूतींवर काही आरोप झाले पण ते खोटे होते हे सिद्ध झाले.
उदा.
तांत्रीक सुखरामने सांगितले की हा अघोरी आश्रम आहे. पण हा आरोप खोटा होता. आणि हा माणूस फालतू असून त्याने अनेकांवर असे वाटेल ते आरोप केले आहेत. एका जिल्हाधिकार्‍यांवरही त्याने बेसलेस आरोप केले होते. खोटे आरोप केले म्हणून हा माणूस आता गजाआड आहे.
स्टिंग ऑपरेशन - स्टिंग ऑपरेशन करणार्‍या लोकांचे खरे स्वरूप उघड झाले आहे. त्यांनी सनसनसाठी बातम्यांसाठी हे केले होते हे ही कबूल केले आहे.
भुखंड प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे. पण कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. सिद्ध होई पर्यंत त्यांना दोषी कसे मानता येईल?
बालमृत्यु - यातून सी आय डी ने त्यांना एप्रिल २०१० मध्येच दोषमुक्त केले आहे.
ही सर्व माहिती Asaram Bapu विकीपिडीयावर आहे.

आसाराम बापूंचा आश्रम गोरगरीबांना अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण अशी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे असे त्यांच्या आश्रमातील काही लोकांशी बोलल्यावर जाणवले. शिवाय भारतीय औषधांवर तेथे काम सुरु आहे असेही समजले. आश्रमात पूर्वग्रह बाजूला ठेऊन एकदा भेट द्या. न पटल्यास परत जायची सक्ती थोडीच असते? हवी असलेली माहिती फर्स्त हँड मिळेल.
माझा स्वतःचा कोणत्याही चेनलवर विश्वास उरलेला नाही. काहीही दाखवतात हे लोक.
शंका असल्यास जाऊन पाहा. आम्हालाही सांगा. येथे पत्ते आहेत - http://www.ashram.org/AboutAshram/WorldWideAshrams/MainAshramWesternIndi...

स्वतःला काहीही माहिती नसतांना कुणावरही आरोप करायला कसे जमते?

- शिवा

:)

स्लीपर सेल ऍक्टिवेट झालेले बघणे मजेशीर असते.

आरोप :)

@शिवा -

स्वतःला काहीही माहिती नसतांना कुणावरही आरोप करायला कसे जमते?

हा प्रश्न विचारू नये. ते सर्वांना जमतेच. दुसर्‍यावर स्वत:च्या भावना लादून तो असाच आहे किंवा ती अशीच आहे हे म्हणणे अगदी सोपे असते, त्यासाठी पुरावे लागत नाहीत. (याचा अर्थ मी बापूंची समर्थक आहे असा घेऊ नये, मला हे बापू काळे का गोरे, तेही माहिती नाही).

@महेंद्र -
कल्टबद्दल बोलण्यात विशेष अर्थ नाही. कल्ट असणे हे आपण होऊन फारसे वाईट नसावे.
तेव्हा आसारामबापू कल्ट आहे, म्हणून जाऊ नका, असे म्हणण्यापेक्षा लोक तेथे का जातात - त्यांच्या नक्की कोणत्या गरजा या आश्रमांमध्ये भागतात ज्या बाहेर भागत नाहीत - ह्या गरजा वाईटच असतील असेही म्हणण्याचे कारण नाही - हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आसारामबापू ही व्यक्ती कशी आहे हे माहिती नाही. लोकांच्या डोक्यात, हृदयात कसलीतरी तृष्णा असते. त्या तृष्णेला शांत करायला काही ना काही लागते. कधीतरी तृष्णा एवढी मोठी असते की ती शांत करायला कसलीतरी व्यसनेच लागतात. तेव्हा असे अनेक बापू गेले तरी कोण ना कोणीतरी त्यांची जागा घ्यायला येणारच. हे एकेका बापूंच्या मागे लागण्यापेक्षा ही व्यसने कशी काबूत आणावीत हा प्रश्न असला पाहिजे. व्यसनांवर उपाय म्हणजे व्यसने बंद करायला लावणे, त्याचे साईड इफेक्टस झेलता यावे याची तयारी ठेवणे आणि काही चांगल्या कामात मन लावणे*. व्यसनी लोकांचा तिरस्कार करून हे काम यशस्वी होणार नाही. व्यसनी लोक व्यसने का करतात याचा खुलासा इथले काही लोक असा काहीसा करताना दिसतात की लोकांना बुद्धी नसते, किंवा असते ती लहानपणापासून भरवलेल्या देवाच्या कल्पनांनी भ्रष्ट झालेली असते, मंद झालेली असते. पण याहून वेगळी कारणे असू शकतात असे वाटते. लोकांना पर्याय नसतात असे वाटते. त्यांना अशा ठिकाणी असे सपोर्ट ग्रूप मिळत असावेत जे एरवी मिळत नसावेत. जे लोक व्यसनी लोकांना या व्यसनांपासून मुक्ततेसाठी जास्तीचे पर्याय देणार नाहीत, सपोर्ट देणार नाहीत, त्यांचे या विरुद्ध बोलणे नुसतेच बोलणे ठरेल.

*उपक्रमावर लिहीणे, मिपावर लिहीणे हेही माझ्यासाठी एक व्यसनच. ते कमी करण्याची इच्छा आहे!:)

शंका

कल्ट असणे हे आपण होऊन फारसे वाईट नसावे.

ह्या गरजा वाईटच असतील असेही म्हणण्याचे कारण नाही

व्यसन या शब्दाच्या व्याख्येतच वाईटपणा अध्याहृत असतो असे वाटते.

व्यसनी लोक व्यसने का करतात याचा खुलासा इथले काही लोक असा काहीसा करताना दिसतात की लोकांना बुद्धी नसते, किंवा असते ती लहानपणापासून भरवलेल्या देवाच्या कल्पनांनी भ्रष्ट झालेली असते, मंद झालेली असते. पण याहून वेगळी कारणे असू शकतात असे वाटते. लोकांना पर्याय नसतात असे वाटते. त्यांना अशा ठिकाणी असे सपोर्ट ग्रूप मिळत असावेत जे एरवी मिळत नसावेत.

काहींना कोणत्याही आधाराची आवश्यकता नसते, त्यांच्यापेक्षा या लोकांना मंदबुद्धीचे ठरविले तर त्यात चूक ते काय?
--
संस्थळांवर आल्यामुळे काही नुकसान (उदा. नोकरीधंद्याकडे दुर्लक्ष किंवा संस्थळांवर शक्य असलेली फसवणूक) होत नसेल तर त्याला व्यसन म्हणू नये असे मला वाटते.
डार्क मॅटर यांनी काही काळापूर्वी उल्लेख केला होता की इतरांनी माती खाल्ली तरी आम्हाला आनंदच होतो. या आनंदप्राप्तीस क्रौर्य म्हणता येईल, त्यासाठी उपक्रमवर येणार्‍यांना स्वार्थी, लोभी, इ. दूषणे द्यायची तर द्यावी परंतु त्यालासुद्धा व्यसन म्हणू नये असेही मला वाटते.

व्यसन

व्यसन या शब्दाच्या व्याख्येतच वाईटपणा अध्याहृत असतो असे वाटते.

जरी बर्‍याचदा वाईटपणा अध्याहृत असला तरी समानशीले व्यसनेषु सख्यम् वगैरे आपण ऐकतोच. ते वाईट अर्थाने असते असे नाही. व्यसन याचा एक अर्थ Devoted attachment or intent application to. असाही आहे.

काहींना कोणत्याही आधाराची आवश्यकता नसते, त्यांच्यापेक्षा या लोकांना मंदबुद्धीचे ठरविले तर त्यात चूक ते काय?
:) खरडीतून.

**
व्यसन याचा एक अर्थ डिवोटेड अटॅचमेंट असा असला तर आहेच ना? संकेतस्थळांवर येऊन लिहीण्याची ही खाज नसती तर कशाला प्रतिसाद दिला असता हा?

आणखी काही मुद्दे आणि प्रश्न

१. जरा ही लिंक पहा - http://www.youtube.com/watch?v=GNoyfFCzLQo हे कशाचे लक्षण आहे ?
२. आसाराम बापूचा मुलगा नारायण साई ने दुसरा स्वतंत्र आश्रम का सुरू केला ?
३. बापूच्या मुलीचा काडीमोड का झाला ?
४. हा लेखही पहा - http://www.scribd.com/doc/4856611/shaitan-bana-asaram-bapu-tricks-to-bra...
५. त्यांच्या सुरतमधील आश्रमावर बुल्डोझर का फिरवण्यात आला ?
६. पुण्याच्या केळगाव आळंदी येथील आश्रमातर्फे जमीन खरेदी करुन सोसायटी स्थापन करण्यासंदर्भात घेतलेली रु. ७०,००० प्रत्येकी, त्याचे गेल्या ८/१० वर्षात काय झाले. लोकांना त्याची जमिन किंवा पैसे काहीच परत मिळाले नाही. हा कसला प्रकार म्हणायचा ?
७. आश्रमातील दोन वाघेला नामक मुलांचा संशयास्पद म्रुत्यू झाला, त्याच्या चौकशी संदर्भातील केस न्यायालयात असताना, ते न्यायालयात का हजर होत नाहीत? हा पळपुटेपणा कशासाठी ?
८. आसाराम बापूंनी नार्को टेस्ट का नाकारली? ज्याला कर नाही त्याला डर कशाला ?
९. एकुणच हे बाबा बुवा काश्मिर सारख्या गंभीर आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवण्यासाठी आपली अध्यात्म शक्ती का वापरत नाहीत? लोकांच्या वैयक्तीक प्रश्नातच फक्त ते का लक्ष घालतात?
१०. पुण्यात (केळगाव, आळंदी ) झालेल्या त्याच्या "सत्संगात" आलेला पाऊस लगेच थांबला. तो ही आपणच थांबवला हे सांगायला ते विसरले नाहीत. ते जगद्नियंते आहेत का?
११. बापुच्या आश्रमाबाहेर कंडोमची पाकिटे कशी सापडतात?
१२. चमत्काराने निर्माण केलेल्या वस्तू या हातात मावण्या इतक्याच कश्या असतात?

जरा आपली सदसद विवेक बुद्धी जागी ठेवली. तर्क संगत विचार केला आणि आपली मते निसर्ग नियमांबरोबर ताडून पाहिली की मग हा साधू खरा की भोदू हे ओळखायला वेळ लागणार नाही.

महेंद्र

बापुच्या आश्रमाची वेबसाईट

आसाराम बापूच्या आश्रमाच्या वेबसाईट चा वर उल्लेख झाला. ही वेबसाईट अमेरिकेतुन चालते. आपण त्याचे DNS record तपासू शकता. आणि त्यांच्या संस्थेचा उल्लेख Incorporation असा करण्यात आला आहे.

हा एक संदर्भ पहा. http://www.youtube.com/watch?v=Vmz6lnx5bHI

महेंद्र

आसाराम बापू .. अगाध लीला..

विठ्ठल् विठ्ठल विठ्ठला.. हरि ॐ विठ्ठला...

हे कधी 'त्या' भेसूर आवाजात ऐकलं आहे का?

?

 
^ वर