वेळ झाली!

मित्र हो, उपक्रमाच्या सुरुवातीच्या दिवसांची ही कथा आहे. मी नवीनच येथे दाखल झालो होतो. या पूर्वी माझा बाप मनोगतावर वास्तव्याला होता. पण तेथल्या दंडेलीचे वातावरण पाहून तो येथे दाखल झाला नि सोबत मलाही जन्माला घातले. उपक्रमावर मी येताच नावाप्रमाणे दंगा सुरू केला. जन्मतः असलेल्या खोचक, भोचक आणि हलकट स्वभावामुळे अनेकांचा आवडता आणि अनेकांचा नावडता बनलो. माझ्या प्रदीर्घ खरडवहीत तुम्ही ते वाचू शकता. युयुत्सु यांच्याशी मात्र तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना, असे झाले होते. प्रियाली मात्र मी कोण हे शोधण्यात दंग झाली होती.

तरी नवीन सदस्यांना लेखनाचे प्रोत्साहन देणे त्यांच्यावर कुणी शुद्धलेखन विषयक चिखलफेक केली तर त्याचे परस्पर प्रत्युत्तर देणे वगैरे कामे मी आपलीच मानू लागलो. मला वाटते की, नवीन सदस्याला स्थळाचा अंदाज नसतो कंपू बाजी माहिती नसते. मराठीच्या आवडी पोटी हे स्थळ सापडलेले असते. अशा वेळी सदस्याला स्थिरस्थावर व्हायला काही काळ द्यायला हवा. असो,

दरम्यान या स्वभावाची नेमकी रचना कशी असावी या बद्दल चिंतन सातत्याने सुरू होते. त्यासाठी चक्क कागदावर माझे व्यक्तीचित्र लिहूनच काढण्यात आले. माझे वय, टक्कल, माझी 'ही', माझी व्यायामशाळा, माझे विचार, हिंदू कडवटपणा, स्पष्टवक्तेपणा, दिलदारी, माणुसकीवर, भविष्याच्या अभ्यासावर असलेली नितांत श्रद्धा, देवभोळेपणा, ख्रिस्तीकरणाप्रति असलेली भीतीची भावना आदी बाबींना स्थान दिले गेले. त्यांचा तिरसटपणा, एककल्ली विचार करण्याची प्रवृत्ती हे सगळे त्यात गोवण्याचे पक्के केले. त्या प्रकारचे वाचन सुरू केले. त्यासाठी अशा प्रकारच्या निरनिराळ्या लोकांना भेटायचा, त्यांच्याशी चर्चा करण्याचा सपाटाच लावला. वेगवेगळ्या नोटस काढल्या गेल्या. गुंडोपंत कसे दिसतात यासाठी त्यांचे एक रेखाचित्रही तयार केले गेले. यातून हे व्यक्तीमत्व उभे केले गेले. 'मी एक अतिशय सुमार बुद्धीमत्तेचा सामान्य इसम आहे' ही पंचलाईन ठरली. हे सर्व बर्‍यापैकी 'बापाच्या विचारांच्या, अनुभवांच्या आणि वाचनाच्या पलीकडचे' होते.

एकदा स्वभाव निश्चिती झाल्यावर चर्चा आणि लेखांवर तशा वादग्रस्त प्रतिक्रिया येणे हे साहजिकच झाले. त्यातून अनेकदा वादंग उभे राहू लागले. संपादनाची कात्री पार तलवारीत परावर्तीत व्हायची वेळ आली. शिवाय काहीही झाले तरी अतिशय सुमार बुद्धीमत्तेचा सामन्य इसम आहे या भूमिकेमुळे अनेकांना वाद कसा करावा हेच समजेनासे होत असे. वादविवादात अनेक सदस्यांना आंतरजालीय आत्महत्यांतून त्यांनी वाचवले. तरीही त्यातल्या वादामुळे लेखच अप्रकाशित व्हायला लागल्यावर मग गुंडोपंतांची अनुदिनी उभी राहिली. त्याला तसेच नाव दिले - पुष्कळसे वादग्रस्त नि थोडेसे बिघडलेले डोके. मग तात्याने मिपा काढण्याची टूम काढली. त्यात त्याने निरनिराळे आयडी घेऊन धूम उडवली. त्यातल्या पोष्टमन प्रकरणाच्या वेळी मी आवाहन केले - झाले ते पुरे! आता मराठीला हवे तसे स्थळ मिळाले आहे आता सुरुच होऊन जा देत जलसा! पण तात्याच तो! तो काय ऐकणार माझे? त्याचे उद्देश निराळेच होते. असो. त्यामुळे मिपावरून परत उपक्रमवर येऊन वस्ती केली.

येथे मला पिडता येतील असे माझे मित्र प्रकाशराव, यनावाला आदी महापुरुष आहेत. त्यांच्याशी चर्चा करून की बोर्ड झिजले पण गुंडोपंत आणि ते ही आपापल्या जागेवर ठाम राहिले. पण एकुण मजा आली. दिलीप बिरुटे सर, सहजराव आदी मित्रमंडळी मिळत गेली. एकुण व्यक्तीमत्व खुलत गेले. मात्र योग्य वेळी गुंडोपंत म्हणजे कोण याचा खुलासा काही सदस्यांना करून देण्यात आला. कारण त्यात लपवण्यासारखे काही नव्हते. रिकामटेकडे सारख्या सदस्यांनीही याचा अंदाज घेतला आणि त्याची मजा लुटली! काही काळा नंतर असेही लक्षात आले की अनेक सदस्य गुंडोपंतांचे विचार आवडतात असे म्हणत आहेत. आता मात्र लोच्या झाला. कारण तोवर हे व्यक्तीमत्व आपल्या ताब्यात आहे असे वाटणार्‍या बापावर या व्यक्तीमत्त्वानेच अंमल गाजवू लागले. ज्योतिषाच्या विरोधात असलेला बाप आता त्यावरच्या वाचनानंतर त्याला 'तसा' विरोध करेनासा झाला. या व्यक्तीरेखेचे परिणाम बापावरच होऊ लागले!

असो, काळ मोठा मजेत गेला.
नीलकांतच्या आगमना नंतर मिपावर येणे सुरू केले. त्यासाठी मला सहजरावांनी उद्युक्त केले हे नमूद केलेच पाहिजे. मिपावर वावरण्यात एक मस्त मोकळेपण आहे मजा आहे, हे निश्चित!

गेल्या काही वर्षात मराठी आंतरजालाचे स्वरूप फार बदलले आहे. नवनवीन सदस्य येथे येत आहेत. त्यांचे सशक्त लेखन पाहिले की मराठी लेखनाला उर्जीतावस्था येते आहे असेही कधीकधी वाटते.

पण प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीला शेवट असतोच. सारे प्रवासी घडीचे हे खरेच. आता असे वाटू लागले की 'पुरे आता'! जे रंगवले आणि रंगले तेव्हढे चित्र पुरे झाले. एक दिवस 'संपवण्याच्या' उद्देशाने अनुदिनी ही उडवून टाकली.
पण सहजरावांनी आग्रह केला की, 'पंत अखेरचा निरोप घ्यायला नक्की या' म्हणून आज आलो.

जाता जाता दोन गोष्टी - पहिली म्हणजे, आपले विचार आपल्याला लाख प्यारे असतात. पण फक्त तेच सत्य असतात असे मात्र मानू नका! दुसरी गोष्ट - आपल्या घरीही निवृत्तीला आलेली मंडळी असतील. त्यांच्याशी दोन घटका बसून बोला. त्यांचे चार शब्द ऐका. ही मंडळी तुमच्यापासून कधी दूर जातील हे सांगता येत नाही. त्यांना वेळ द्या. महत्त्वाचे निर्णय शक्य असल्यास त्यांना सांगा.

या माझ्या वास्तव्यात मी जे काही कुणाला लागट बोललो असेन हलकट छद्मीपणाने वागलो असेन, त्याबद्दल मला माफ करावे. माझ्या व्यक्तीमत्वावर, बिन्धास्त लेखनावर आणि प्रतिक्रियांवरही मनापासून प्रेम करणार्‍या सदस्यांचे कसे आभार मानावेत हे कळत नाही! मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. तुम्हा सगळ्यांच्या वेळोवेळी मिळालेल्या प्रोत्साहनाने येथेवर आलो. हे यश तुम्हा मायबाप वाचकांचेच आहे!
तरी आजवर जे झाले ते पुरे करावे आणि आंतरजालीय समाधी घ्यावी हीच इच्छा!

सर्वांना माझा नमस्कार, आता आ़ज्ञा द्यावी ही नम्र विनंती!

आपला
अतिशय सुमार बुद्धीमत्तेचा सामान्य इसम
गुंडोपंत

Comments

पटायला लागले आहे.

गुंडोपंतांनी उपक्रम जागता, हलता, बोलता, ठेवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.

प्रतिसाद पाहता ''गुंडोपंतांनी उपक्रम जागता, हलता, बोलता, ठेवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता'' हे पटायला लागले आहे.
कमीत कमी शंभर तरी प्रतिसाद झाले पाहिजेत.

बाकी, चालू द्या...!

-दिलीप बिरुटे
[गुंडोपंताचा फ्यान]

शंभर तरी प्रतिसाद

कमीत कमी शंभर तरी प्रतिसाद झाले पाहिजेत.

तरी म्हंटलं 'ऍक्सिस ऑफ इविल' मधला तिसरा ऍक्सिस कुठे आहे. :) (ह.घ्या.)
असो, अहो बिरुटे, किती प्रतिसाद आले त्यावरुन गुणवत्ता ओळखणे इज सो नाइंटींथ सेंच्युरी!!

काही मजकूर संपादित.

:)

कमीत कमी शंभर तरी प्रतिसाद झाले पाहिजेत.

नाहीतर संस्थळ अप्रगल्भ ठरून पंतांच्या पिंडाला कावळा शिवणार नाही.

नवी संकेतस्थळे

आता येथून पुढे गुंडोपंतांनी नव्या संकेतस्थळांवर वास्तव्य करण्याचे कॉन्ट्रॅक्ट घ्यावे. तिथले ट्रॅकर हलत राहण्यास त्यांची मदत होईल अशी आशा वाटते. ;-)

सल्ला

बापाच्या आगेमागेच आयडी घेऊ नयेत म्हणजे मिळवली! अन्यथा संशयाला बळकटी मिळते!

कारण?

गुंडोपंत तुम्ही निरोप घेता आहात याचा विषाद वाटतो. असो. तुम्हाला निर्णयस्वातंत्र्य आहेच. स्वतःच्या मस्तीत जगण्याचे भाग्य लाभलेले खुप कमी जण या जगात असतील. बाकी ही आपली मस्ती चांगली की वाईट यावर चर्वितचर्वण हे चालायचेच. बाकी तुम्हाला हा प्रश्न विचारत नाही पण मीच विचार करतो आहे की कारण काय असावे बुआ या सगळ्यामागे.

 
^ वर