मेरे अपने!

गेली अनेक वर्षे पांडुरंग माने त्या शहरातील अग्निशामक दळात नोकरी करत होता. (त्या शहरात फक्त एकच फायर फायटिंग स्टेशन होते.) त्याला कशाचीही भीती वाटत नव्हती. अपघात - आपत्तींच्या प्रसंगी निधड्या छातीने, कुठेही न डगमडता तो लोकांचे प्राण वाचवत होता. कुठलीही आपत्ती असो हा बहाद्दूर आघाडीवर. काहीतरी शक्कल लढवून जास्तीत जास्त अपघातग्रस्तांचे प्राण वाचवत होता. म्हणूनच इतर अनेक शौर्यपदकं व बक्षीसांबरोबर अत्यंत मानाचे समजलेले 'जीवरक्षक' ही पदवी त्याला शासनाकडून मिळाली होती.

त्या दिवशी तो नेहमीसारखा ड्यूटीवर होता. अग्नीशामक दळाच्या दोन गाड्यांपैकी एकच गाडी नीट होती. दुसरी गाडी दुरुस्तीसाठी पाठविली होती. दुरुस्त होऊन ती केव्हा येईल याचा काही नेम नव्हता. त्याचे एक - दोन सहकारी गप्पा मारत वेळ घालवत होते. तितक्यात फोनची घंटी वाजली. शहराच्या जवळ पासच्या एका दगडाच्या खाणीत दरड कोसळल्यामुळे 12 मजूर अडकून पडले होते. त्यांना त्वरित बाहेर न काढल्यास सर्वच्या सर्व जण दगड-मातीच्या ढिगार्‍याखाली जीव गुदमरून मेले असते. यासाठी त्वरित कारवाईची गरज होती. मानेसुद्धा प्रसंगाचे गांभीर्य ओळखून सर्व तयारीनिशी बाहेर पडत होता. तितक्यात अजून एकदा फोन खणाणला. हा फोन मानेच्या शेजार्‍याचा होता. शॉर्ट सर्कीटमुळे त्याच्या राहत्या घराला आग लागली होती. घरातल्या एका खोलीत त्याची बायको व आठ वर्षाचा मुलगा आगीत अडकले होते. शेजार्‍या-पाजार्‍यांनी प्रयत्नाची शिकस्त करून त्या दोघांना आगीच्या फुफाट्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले परंतु आग पसरतच होती व जीवाच्या आकांताने अडकलेले दोघे ओरडत होते. त्याचे हे घर नेमके दगडाच्या खाणीच्या विरुद्ध टोकाला होते. दगडाच्या खाणीतील लोकांना वाचविण्यासाठी त्याला कुठलाही पर्यायी मार्ग सुचत नव्हता. तसेच बायको-मुलाला वाचवण्यासाठी अग्नीशामक दळाची दुसरी गाडी उपलब्ध नव्हती. (लांबच्या शहरातून गाडी मागवल्यास वेळेवर येण्याची शक्यता फारच कमी) प्रत्येक क्षण मोलाचा होता. बायको-मुलगा की बारा जण.....! विचार करण्यासाठीसुद्धा वेळ नव्हता. बायको व मुलगा म्हणजे त्याला जीव की प्राण. भावनेच्या आहारी जावून कर्तव्यात हयगय केल्यास हकनाक बारा जण जीवाला मुकले असते. बायको-मुलाचा जीव की या बारा मजूरांचा...? पहिल्यांदा दप्तरी (अजून) नोंद (न) झालेल्या प्रसंगातील बारा जणांना वाचविणे की स्वत:च्या बायको मुलाला वाचविणे... अशा पेचप्रसंगी पांडुरंग मानेला प्रथम कुठे जावे हे माहित होते. परंतु तेथेच का याचे स्पष्टीकरण त्याला देता येत नव्हते.

स्पष्टीकरणासाठी आपण काही मदत करू शकाल का?

----- ------ -----

निव्वळ नैतिकतेच्या दृष्टिकोनातून विचार करत असल्यास कायद्याप्रमाणे नीतीच्या दरबारातसुद्धा सर्व व्यक्ती समान याच सूत्राचे (तंतोतंत) पालन करणे इष्ट ठरेल. जगातल्या प्रत्येक व्यक्तीची गणना एक म्हणूनच करावे व कुठलीही व्यक्तीची गणना - मग त्या व्यक्तीचे वय, जात, धर्म, भाषा, लिंग, स्वभाव, वर्तन, सामाजिक स्तर, भावनिक संबंध, नाते संबंध इ.इ काहीही असू दे - एक या संख्येपेक्षा कमी वा जास्त असूच शकणार नाही, हे लक्षात ठेवावे. परंतु या सूत्राचे तंतोतंत पालन करण्याचे ठरविल्यास आपले कुटुंबीय वा जवळचे मित्र-मैत्रिणी यांच्याबद्दलच्या आपुलकीला व त्यांच्यासाठीच्या आपल्या विशेष जवाबदारीला काही अर्थच उरणार नाही. मात्र जगरहाटीने (व उत्क्रांतीनेसुद्धा!) सर्व पालकांनी इतर कुठल्याही मुला-मुलींपेक्षा आपल्या स्वत:च्या मुला-मुलींचे हित जपावे हीच शिकवण दिली आहे व आपण ती पाळतच आहोत.

अशा प्रकारे एखादे विधान करत असताना थोडीशी घाई होत आहे असे वाटते. आई-वडीलांची आपल्या मुला-बाळाविषयी विशेष जवाबदारी आहे हे मान्य. त्यांना आपापल्या अपत्यांची चांगल्या तर्‍हेने काळजी घ्यावी, जोपासना करावी, चांगले जेवण द्यावे, पोटबर जेवू घालावे व तसे करताना इतर परक्या मुलांच्या कुपोषणाची काळजी करत बसू नये, हेही मान्य. परंतु याचा अर्थ आपली मुलं - बाळं इतर मुला-मुलींपेक्षा उच्च पातळीवरचे आहेत असे समजावे का?

उदाहरणासाठी एक हायपॉथेटिकल केस म्हणून एका नामांकित शाळेतील प्रवेशासंबंधी चर्चा करता येईल. या शाळेतील प्रवेशासाठी सर्व जण उत्सुक आहेत. या शैक्षणिक वर्षासाठी सर्व जागा भरलेले असून फक्त एकच जागा आज रिकामी आहे. या एका रिकाम्या जागेसाठी दोन विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आहे. दोघेही एकाच रिकाम्या जागेसाठी प्रयत्न करत असल्यास स्वाभाविकपणे आपल्याच मुलाला प्रवेश मिळावा म्हणून आई-वडील जिद्दीने प्रयत्न करणार यात संशय नसावे. त्यासाठी आपलाच पाल्य कसा योग्य आहे हे बिंबवण्यासाठी दोघांचेही पालक शर्थीचे प्रयत्न करणार. परंतु प्रवेश प्रक्रिया न्याय्य असण्यासाठी विद्यार्थ्याच्या हिताची काळजी घेत असतानाच त्यांच्यातील गुणवत्तेलासुद्धा पूर्णपणे वाव देणे न्यायोचित व योग्य ठरेल. शिक्षणाच्या या मूळ तत्वाला बाधा आणण्याचा प्रयत्न दोघांपैकी एखाद्या पालकांने केल्यास वा करत असल्यास तो अक्षम्य गुन्हा ठरेल. स्वत:च्या पाल्याची विशेष काळजी घेण्यासाठी काही अनुचित प्रकार करणे हे नीतीमत्तेचे उल्लंघन ठरेल. असे कुणी केल्यास इतर पाल्याच्या हिताला आपण कमी लेखतो असा अर्थ सूचित होऊ शकेल.

तात्विकदृष्ट्या या सर्व गोष्टी मान्य असल्या तरी प्रत्यक्ष व्यवहारात याचे पालन करणे कदापि शक्य होणार नाही. इतर हजारो मुलं अर्धपोटी वा उपाशी असलेले प्रत्यक्ष बघत असताना आपल्या मुलांना महागातली महाग (लेगोची) खेळणी आणून त्या उपाशी मुलांसमोर खेळवणे योग्य ठरेल का? आपल्याला कायदे - नियम, आपले हक्क इत्यादींचे ज्ञान असल्यामुळे सार्वजनिक सोई सुविधांचा लाभ उठवत असताना ज्यांना या सोई-सुविधांची अत्यंत गरज आहे परंतु त्यांना या गोष्टी अजिबात माहित नाहीत याची पण आपल्याला काळजी करायला नको का? दिवसभर काबाड कष्ट करून पोट भरत असलेल्या पालकांना आपल्या मुला-बाळांचे गृहपाठ घेण्याइतकी सवड नाही किंवा आवड नाही अशा वेळी आपल्या पाल्यांच्या गृहपाठाबरोबर अशा मुलांच्यासाठी काही व्यवस्था करणे (वा स्वत: त्यांचा गृहपाठ घेणे) हे आपले कर्तव्य नव्हे का?

अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं शोधणे जिकिरीचे असते. ज्यांना फक्त आपण, आपली मुलं-बाळं, आपले कुटुंब याव्यतिरिक्त दुसरे काही दिसत नाही, त्यांना असल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचे वाटत नाही.

परंतु पांडुरंग मानेपुढील पेचप्रसंग कसे सोडवता येईल? त्यासाठी पांडुरंग मानेला खालील प्रश्नाचे उत्तर प्रथम शोधावे लागेल:
माझ्या कुटुंबियांपेक्षा इतरांच्या जीवांची काळजी घेणे (या प्रसंगी) न्यायोचित (वा उचित) ठरेल का?

लेखनविषय: दुवे:

Comments

याबाबतचा एक महत्त्वाचा मानला गेलेला विचार

http://en.wikipedia.org/wiki/Maslow%27s_hierarchy_of_needs

याबाबतचा एक महत्त्वाचा मानला गेलेला विचार याबाबतचा एक महत्त्वाचा मानला गेलेला विचार याबाबतचा एक महत्त्वाचा मानला गेलेला विचार याबाबतचा एक महत्त्वाचा मानला गेलेला विचार याबाबतचा एक महत्त्वाचा मानला गेलेला विचार याबाबतचा एक महत्त्वाचा मानला गेलेला विचार याबाबतचा एक महत्त्वाचा मानला गेलेला विचार याबाबतचा एक महत्त्वाचा मानला गेलेला विचार याबाबतचा एक महत्त्वाचा मानला गेलेला विचार याबाबतचा एक महत्त्वाचा मानला गेलेला विचार याबाबतचा एक महत्त्वाचा मानला गेलेला विचार

स्वार्थ

पुढे अ, ब, क अशी स्पष्टीकरणे दिली आहेत, आपणास कोणते योग्य वाटते ते निवडा. निवडा मात्र नक्की.

अ. स्वार्थ
जर त्याने १२ लोकांना वाचविण्याचा प्रयत्न केला तर -
१. पांडुरंगची 'जीवरक्षक' हि सामाजिक छबी जपण्यासाठी त्याला १२ लोकांचे प्राण वाचविणे गरजेचे आहे.
२. १२ लोक आपल्या पक्षपातीपणामुळे मेले ह्या अपराधीपणाच्या बोचणीपासून वाचण्यासाठी देखील त्यांना वाचविणे गरजेचे आहे.
३. २ लोकांना वाचाविण्यापेक्षा अधिक लोकांना वाचविले तर कौतुक अधिक होईल हा स्वार्थी विचार.

जर त्याने बायको मुलांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला तर -
१. वयक्तिक स्वार्थ.

ब. बायको मुलांना वाचविणे जास्त उचित ठरेल -
१. कारण मग खाणीत १२+- मजुरांचा मृत्यू झाल्यामुळे खाणीची सुरक्षितता यंत्रणा कशी योग्य नाही हे जाहीर होईल व त्यानिमित्ताने तसे प्रयत्न होऊन पुढील अपघात रोखता येतील.
२. तसेच २ अग्निशामक गाड्या एका शहरासाठी कमी आहेत ह्याची समाज प्रतिनिधीना जाणीव होईल व त्यानिमित्ताने गाड्यांची संख्या वाढविली जाईल.

क. स्वार्थ + समाजहित
१. अग्निशमन गाडी खाणीकडे सहकाऱ्यांबरोबर पाठवून स्वतः बायको मुलास वाचविण्यास तो जाऊ शकतो, त्यामध्ये मजुरांना मरू दिल्याचा अपराधीपणा कमी होईल, व बायको मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे समाधान असू शकते.
२. असे करताना जर त्यास बायको मुलांसह मृत्यू आल्यास कोणताच त्रास राहणार नाही व मरणोपरांत जीवरक्षक हि उपाधी कायम राहील.

थोडे गंभीर पणे -
१.

इतर हजारो मुलं अर्धपोटी वा उपाशी असलेले प्रत्यक्ष बघत असताना आपल्या मुलांना महागातली महाग (लेगोची) खेळणी आणून त्या उपाशी मुलांसमोर खेळवणे योग्य ठरेल का?

स्वस्तातील खेळणी आणल्यास कमी टोचणी लागेल काय?

२.

आपल्याला कायदे - नियम, आपले हक्क इत्यादींचे ज्ञान असल्यामुळे सार्वजनिक सोई सुविधांचा लाभ उठवत असताना ज्यांना या सोई-सुविधांची अत्यंत गरज आहे परंतु त्यांना या गोष्टी अजिबात माहित नाहीत याची पण आपल्याला काळजी करायला नको का?

करायला हवी खरे, पण अश्याच लोकांसाठी आरक्षण पद्धत लागू केली नव्हती काय? त्याचा फायदा ज्यांना व्हायचा त्यांना सोडून नको त्यांना झाला/होतोय. तरीदेखील काळजी/कृती करणे गरजेचे आहे ह्यास सहमत.

३.

दिवसभर काबाड कष्ट करून पोट भरत असलेल्या पालकांना आपल्या मुला-बाळांचे गृहपाठ घेण्याइतकी सवड नाही किंवा आवड नाही अशा वेळी आपल्या पाल्यांच्या गृहपाठाबरोबर अशा मुलांच्यासाठी काही व्यवस्था करणे (वा स्वत: त्यांचा गृहपाठ घेणे) हे आपले कर्तव्य नव्हे का?

नाही, ह्या कारणासाठी अभ्यास घेतल्यास त्याचा फायदा होणार नाही, त्या मुलांना शैक्षणिक मदत होईल, त्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल ह्याच विचारातून व्यवस्था केल्यास त्याचा फायदा होईल अन्यथा उपकाराची भावना डोक्यात राहील.

The only sensible way to live in this world is without rules, and tonight, you're gonna break your one rule! - जोकर

!

The only sensible way to live in this world is without rules, and tonight, you're gonna break your one rule! - जोकर

याच चित्रपटाचे स्मरण झाले :)
क्ष्

उत्तम प्रतिसाद !

उत्तम प्रतिसाद ! उत्तम प्रतिसाद !

३ रा पर्याय निवडण्यास हरकत नसावी.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

विवेकक्रीडा

यना वालांची तर्कक्रीडा असते तर नानावटींची विवेकक्रीडा
ए कोण रे तिकडे क्रीडा शब्द मुद्दामुन कीडा असा वाचतोय.
प्रकाश घाटपांडे

विवेक क्रीडेच्या आणखी प्रकारासांठी

विवेक क्रीडेच्या आणखी काही प्रकारांसाठी व आपल्या विवेकी विचारांच्या आणि संवेदनशीलतेच्या चाचणीसाठी कृपया येथे क्लिक् करावे.

एक पर्याय

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
इथे"अग्निशमन गाडी खाणीकडे सहकाऱ्यांबरोबर पाठवून स्वतः बायको मुलास वाचविण्यास तो जाऊ शकतो, त्यामध्ये मजुरांना मरू दिल्याचा अपराधीपणा कमी होईल, व बायको मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे समाधान असू शकते."
हा श्री.आजूनकोणमी यांनी सुचविलेला एक पर्याय मला योग्य वाटतो.
..
श्री.प्रकाश घाटपांडे यांनी सुचलेला "विवेकक्रीडा" हा शब्द अगदी समर्पक आहे.

सहमत

इथे"अग्निशमन गाडी खाणीकडे सहकाऱ्यांबरोबर पाठवून स्वतः बायको मुलास वाचविण्यास तो जाऊ शकतो, त्यामध्ये मजुरांना मरू दिल्याचा अपराधीपणा कमी होईल, व बायको मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे समाधान असू शकते."

पर्याय चांगला आहे. या पर्यायात कोणीही मरणार नाही असेही होऊ शकते. आणि कोणी एक मेले तरी टोचणी लागणार नाही.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

जे पहिले आले तेच स्विकारणे...!

(उर्वरीत भाग पहायचा व वाचायचा कंटाळा आला म्हणून...) लेखातील अर्धाच भाग वाचलेला आहे. त्यावर आधारीत उत्तर देत आहे.

पांडुरंग माने त्या शहरातील अग्निशामक दळात नोकरी करत होता. तो ज्या दिवशी ड्यूटीवर होता. त्यादिवशी त्याक्शणी जे काम औपचारीक म्हणून समोर येईल तेच काम त्यास करणे भाग आहे तेच त्याने करावे. कारण त्या कामावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो. वर दिलेल्या उदाहरणातून, ज्या कामाची बातमी व त्यायोगे निर्धारीत कर्म म्हणून पहिले आले होते ते दगडाच्या खाणीत दरड कोसळल्यामुळे 12 मजूर अडकून पडले होते. तिथे जाणे योग्य आहे. दुसर्‍या ठिकाणी जाणे हे त्याच्यासाठी जिवितास धोकादायक वाटते.
आधार विचार :अग्निशामक दलाचे काम लोकांचे जीव वाचवणे आहे, कर्मचार्‍यांच्या शेजार्‍यांना मदत करणे नाही.

शेजारी?

अग्निशामक दलाचे काम लोकांचे जीव वाचवणे आहे, कर्मचार्‍यांच्या शेजार्‍यांना मदत करणे नाही

पांडुरंग मान्यांच्या शेजार्‍यांचा जीव धोक्यात नसून त्यांची स्वतःचीच बायका पोरे मरणाच्या संकटात सापडली आहेत. आणि समजा शेजारी असले, तरी, त्यांचाही जीवच वाचवायचा आहे. उंचावरच्या फळीवरचा डबा काढून द्यायला बोलावलेले नाही.

असो. असेही लेख पूर्ण न वाचल्याची कबूली आपण दिली आहेच. लेखात स्वारस्य नसताना प्रतिक्रिया द्यावीशी वाटली याची मौज वाटते.

लेखकांनी उल्लेख केला आहे की पांडुरंग मान्यांना काय करायचे हे माहीत होते, पण का करायचे हे माहीत नव्हते. उत्तराची उत्सुकता आहे.

माझ्या मते जीव एक काय आणि दोन काय आणि बारा काय, त्यांच्या मोलाची तुलना करणे योग्य नाही. परंतु, मान्यांसाठी स्वतःच्या बायका पोरांच्या जिवाचे मोल (तुलनेने) इतर जिवांपेक्षा अधिक असेल, तर त्यांना याबाबत दोष देता येणार नाही.

भावनेच्या आहारी जावून कर्तव्यात हयगय केल्यास हकनाक बारा जण जीवाला मुकले असते. बायको-मुलाचा जीव की या बारा मजूरांचा...?

बायका पोरांचा जीव वाचवायला जाणे याला भावनेच्या भरात वाहून जाणे म्हणता येईल काय? त्यांचा जीव वाचवणे कर्तव्य नाही का? दगडाच्या खाणीत जायला साथीदार आहेतच.

असेही, नैतिकतेच्या आणि कर्तव्याच्या गप्पा दुसर्‍यांच्या संदर्भात नेहेमीच मारता येतात. परदु:ख शीतलम् आणि काय!

सरकार

व्यक्तिनिरपेक्ष नैतिकता?

नैतिकतेची चर्चा करताना सहसा कोणी उत्क्रांतीवादाविषयी बोलत नाही, पण ज्या प्रक्रियेने आपल्या नैतिकतेच्या ऊर्मी घडायला मदत झाली त्या प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून विचार करणं उपयुक्त ठरतं. किन सिलेक्शन हा दुवा पहावा. नानावटींच्या लेखांमध्ये येणाऱ्या काळ्या पांढऱ्या निवाड्यांप्रमाणेच इथेही काहीसा 'आपण व इतर' अशी निवड दिसते. आजूनकोणमींनी बिनगंभीरपणे दिलेल्या उपायांप्रमाणे अधलं मधलं काही नाही. ही मांडणी काहीशी पेडॅंटिक (प्रतिशब्द?) वाटते. बहुतेक वेळा 'आपण स्वतः, आपले जवळचे नातेवाईक, आपले लांबचे नातेवाईक, आपल्यासारखे (जमात, जात वा वर्णाचे) व इतर' अशी टप्प्याटप्प्यांची जवळिकीची भावना असते.

अमेरिकन न्यायालयात हा खटला झाला (१२ माणसांना वाचवण्याऐवजी आपल्या बायकोमुलाला वाचवण्याबद्दल) तर हंग ज्यूरी मिळवण्यास काहीच अडचण पडणार नाही. न्यायालयं इतरत्रही असतात - समाजामध्ये, वर्तमानपत्रांतल्या मथळ्यांमध्ये, फोटोतून बघणाऱ्या पत्नी व मुलीच्या डोळ्यांमध्ये... यापैकी कुठची शिक्षा अधिक भयंकर वाटते ते प्रत्येक जण स्वतःचं स्वतः ठरवतो वा ठरवावं. याला व्यक्तिनिरपेक्ष - सॅलडचा फोर्क उजव्या बाजूलाच असला पाहिजे वगैरे एटिकेट्ससारखं - नैतिक उत्तर कसं देणार?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

उतरंड

टप्प्याटप्प्यांच्या जवळिकीच्या नियमानुसार स्वतःच्या मुलांना वाचविण्यासाठी अधिक तीव्र उर्मी वाटेल ना? तीनपेक्षा अधिक अंतराच्या नातेवाईकांमध्ये आणि अपरिचित व्यक्तींमध्ये फारसा जनुकीय भेद नसतो असे वाचल्याचे स्मरते. शिवाय, जनुकीय हिशोबातून पत्नी आणि मजूर हे दोन्हीही परकेच आहेत.
जनुकीय उर्मी (अपील टू नेचर) हे कृतींचे समर्थन होऊ शकत नाही, नैतिकतेचा पायासुद्धा होऊ शकत नाही. मानव हे जनुकांचे पूर्ण गुलाम नाहीत. ऍस्पार्टेम, संततीनियमन, दत्तकविधान, धर्मनिष्ठा, राष्ट्रव्रत, इ. अनेक उदाहरणांमधून दिसते की मेंदू जनुकांची पर्वा करीत नाही.

न्यायालयं इतरत्रही असतात - समाजामध्ये, वर्तमानपत्रांतल्या मथळ्यांमध्ये, फोटोतून बघणाऱ्या पत्नी व मुलीच्या डोळ्यांमध्ये... यापैकी कुठची शिक्षा अधिक भयंकर वाटते ते प्रत्येक जण स्वतःचं स्वतः ठरवतो वा ठरवावं. याला व्यक्तिनिरपेक्ष - सॅलडचा फोर्क उजव्या बाजूलाच असला पाहिजे वगैरे एटिकेट्ससारखं - नैतिक उत्तर कसं देणार?

सहमत.
प्रस्तुत उदाहरणात माहिती हवी आहे की अग्निशामक दलाच्या सेवाशर्तींमध्ये अशा परिस्थितींचा विचार करण्यात आला आहे की नाही? एखाद्या अधिकार्‍याने असा काही निर्णय घेतल्यास त्याला (आणि त्याच्या कुटुंबियांना, उदा., "मेरा बाप चोर है") किती शिक्षा करण्याची प्रथा आहे ते समजल्यास अधिक स्पष्ट भाकित करता येईल.

नजदिकी फायदा देखनेसे पहले दूरका नुकसान देखना चाहिये?

जनुकीय उर्मी (अपील टू नेचर) हे कृतींचे समर्थन होऊ शकत नाही, नैतिकतेचा पायासुद्धा होऊ शकत नाही. मानव हे जनुकांचे पूर्ण गुलाम नाहीत. ऍस्पार्टेम, संततीनियमन, दत्तकविधान, धर्मनिष्ठा, राष्ट्रव्रत, इ. अनेक उदाहरणांमधून दिसते की मेंदू जनुकांची पर्वा करीत नाही.

सहमत तरीदेखील - मेंदूचा विकास, वैचारिक प्रगती कदाचित जनुकीय उर्मीच्या बाबतीत जवळच्या (जनुकीय)फायद्यापेक्षा दूरच्या (जनुकीय)नुकसानाची जास्त चिंता करण्यास कारणीभूत होत असेल?

शक्य

ऍस्पार्टेमच्या बाबतीत तसे असले तरी इतर उदाहरणांमध्ये मात्र, जनुकांचा सर्वकालीन तोटा करणार्‍या कृती केल्या जातात.

पाया?

जनुकीय उर्मी (अपील टू नेचर) हे कृतींचे समर्थन होऊ शकत नाही, नैतिकतेचा पायासुद्धा होऊ शकत नाही.

पण नैतिकतेचा विचार करणारा मेंदू उत्क्रांतीतून घडला आहे. त्यामुळे नैतिकता ही पूर्ण पोकळीतही राहू शकत नाही. नैतिकतेचा पाया नक्की कुठून घ्यायचा? स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरेसारख्या शब्दांतून? ते नक्की आले कुठून? आणि ते चांगले म्हणजे नक्की काय?

मानव हे जनुकांचे पूर्ण गुलाम नाहीत. ऍस्पार्टेम, संततीनियमन, दत्तकविधान, धर्मनिष्ठा, राष्ट्रव्रत, इ. अनेक उदाहरणांमधून दिसते की मेंदू जनुकांची पर्वा करीत नाही.

जनुकीय ऊर्मींचा विचार करणं म्हणजे गुलाम होणं नव्हे. आपण हसतो, रडतो ते जनुकीय ऊर्मींमधून. ते काय आपण जनुकांची पर्वा वाटते म्हणून करतो का? आपण विरुद्ध आपली जनुकं असा लढा नाहीये इथे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

गेम थिअरी

सुवर्णमध्य हा नियम हाच पाया आहे. उर्मी जनुकीय आहे की मेंदूतून आहे ते तपासणे गैरलागू आहे.

जनुकीय ऊर्मींचा विचार करणं म्हणजे गुलाम होणं नव्हे.

म्हणूनच, जनुकांची ढाल करून तिच्यामागे लपणे अनुमत नाही असे मत मी मांडतो आहे. कृतींची जवाबदारी मेंदूची आहे. टप्प्याटप्प्यांनी कमी होणारी जनुकीय उर्मी असणे हा मेंदूचा बचाव अग्राह्य आहे.
पत्नीला वाचविण्यात जनुकीय स्वार्थही नाही.

आपण हसतो, रडतो ते जनुकीय ऊर्मींमधून. ते काय आपण जनुकांची पर्वा वाटते म्हणून करतो का?

जनुकांचे अंशतः गुलाम असतो म्हणून!

आपण विरुद्ध आपली जनुकं असा लढा नाहीये इथे.

जनुके आणि मेंदूचे स्वार्थ एकाच दिशेने असतात त्या प्रसंगांमध्ये नीतिक्रीडा करण्यासारखे काही रोचक नसते. 'जनुकीय स्वार्थापेक्षा मेंदूची इच्छा वेगळी आहे' असे धागाप्रस्तावकानेच सांगितलेले आहे. त्याला नाकारणे हा क्रीडेचा नियमभंग ठरेल.

अमेरिकन न्यायालयात हा खटला झाला (१२ माणसांना वाचवण्याऐवजी आपल्या बायकोमुलाला वाचवण्याबद्दल) तर हंग ज्यूरी मिळवण्यास काहीच अडचण पडणार नाही.

म्हणूनच ज्यूरी पद्धत त्याज्य आहे.

ठाम उत्तर शक्य.

ही मांडणी काहीशी पेडॅंटिक (प्रतिशब्द?) वाटते.

नक्कीच, तेच प्रयोजन होते. प्रतिशब्द मला देखील ठाऊक नाही.

बायको व मुलगा म्हणजे त्याला जीव की प्राण.

हे विधान ध्यानात घेतल्यास आपण म्हणता ती नैसर्गिक निवड/कीन सिलेक्शन नक्कीच लागू पडेल. ते विधान नसते तर थोडी शंका घेता आली असती तरी नैसर्गिक निवड होण्याची शक्यता अधिकच आहे हे मान्य.

मी दिलेले पर्याय हे वास्तविक पाहता पर्याय नसून घेतलेल्या निर्णयाचे स्पष्टीकरण आहे, त्यातील तिसरे स्पष्टीकरण साधारणपणे सर्वजण निवडतील. पण इथे कोणीही पांडुरंग(पिडीत ह्या अर्थी) नाही त्यामुळे पर्याय निवड हि "विचारातून" होते, पण पांडुरंगची निवड "भावनेतूनच" होणार हे नक्की. पण जर त्याने तो निर्णय घेतला आहे तर त्याला स्पष्टीकरण देखील माहित आहे, तसे असता श्री नानावटी ह्यांचा प्रश्न उपस्थितच झाला नसता, पण त्याने भावनेतून घेतलेल्या निर्णायचे "नैतिक" स्पष्टीकरण दिल्यास "टोचणी" कमी होऊ शकते म्हणून स्पष्टीकरण क्र.३ हे अपील होते.

तरीदेखील ह्याचे एक ठाम उत्तर देता येतेच कारण इथे तौलनिक डिग्री ऑफ इन्क्लुसिव्नेस नक्कीच बायको मुलांकडे झुकणारी आहे.

हं

हे सर्वस्वी पांडुरंग मानेची बायको कशी आहे ह्यावर अवलंबून आहे. पण मुलालाही वाचवायचे आहे नाही का? कठीण आहे. असो.
बाकी आजूनकोणमी ह्यांचे उत्तर तसे पटण्यासारखे आहे. आणि प्रकाश घाटपांडे ह्यांच्याशी सहमत आहे.

"कह देना श्यामसे के छेनू आया था |
साथ में पिसतौल भी ले आया था"

काय केले पांडुरंग माने याने?

बायको-मुलाचा जीव की या बारा मजूरांचा...? पहिल्यांदा दप्तरी (अजून) नोंद (न) झालेल्या प्रसंगातील बारा जणांना वाचविणे की स्वत:च्या बायको मुलाला वाचविणे... अशा पेचप्रसंगी पांडुरंग मानेला प्रथम कुठे जावे हे माहित होते. परंतु तेथेच का याचे स्पष्टीकरण त्याला देता येत नव्हते.

पांडुरंग माने याला काय माहीत होते, ते या नीतिक्रीडेत सांगितलेले नाही :-(
त्यामुळे त्याला स्पष्टीकरण शोधण्यात मदत करू शकत नाही. मी एका बाजूने स्पष्टीकरण दिले, आणि पांडुरंग माने याचे ज्ञान "दुसर्‍या ठिकाणे जावे" असे असले, तर! माझे सगळे स्पष्टीकरण जाईल केरात!

येथे एक बातमी (अग्निशामकाच्या कुटुंबीयांचा होरपळून मृत्यू)...
येथे आणखी एक बातमी (फी भरली नाही म्हणून अग्निशामकांनी घर जळू दिले)...

 
^ वर