दख्खनच्या पठारावर -4

हंपीच्या राज निवासाचे भग्न अवशेष काल बघितल्यापासून एक प्रश्न माझ्या मनात येतो आहे. काल मी राज निवास बघितला, राण्यांचे जलक्रीडा केंद्र बघितले, परंतु राण्यांचे निवासस्थान वगैरे कोठेच दिसले नाही. याचे कारण आज मला समजते आहे. प्रत्यक्षात राण्यांचे निवासस्थान अगदी निराळ्याच ठिकाणी आहे व राज निवासापासून ते बर्‍याच अंतरावर आहे. हे निवासस्थान बघायलाच मी आता निघालो आहे. या निवासस्थानाला ‘जनाना एनक्लोजर‘ (Zenana Enclosure) असे म्हटले जाते. राज निवासाप्रमाणेच या परिसराभोवतीही भक्कम तटबंदी आहे. एका ठिकाणी हा तट तुटलेला असल्याने ही भिंत किती भरभक्कम बांधलेली होती याची चांगलीच कल्पना येते आहे.
jenana enclosure protection wall
जनाना एनक्लोजरची मजबूत दगडी भिंत

या जनानखान्यात एकदा एखादी स्त्री गेली की तिला परत बाहेरची हवा लागणे शक्यच नव्हते. या बद्दलची एक मोठी रोचक गोष्ट मी वाचली आहे. ‘ विजयनगरचे शत्रू असलेल्या बहमनी राज्यातल्या मुदगल या गावातल्या एका सोनाराला प्रयाल नावाची एक कन्या होती. ही मुलगी अत्यंत सुंदर असून संभाषण, संगीत व इतर कलांमध्ये ती अतिशय प्रवीण होती. तिची ख्याती विजयनगरचा राजा पहिला देवराय याच्या कानापर्यंत पोचली. राजाने एका ब्राम्हणाला काहीही थापाथापी करून तिला विजयनगरला घेऊन येण्याची आज्ञा केली व गळ्याभोवती घट्ट बसणारा एक अलंकार तिच्यासाठी पाठवला. परंतु विजयनगरला जाणे म्हणजे तुरूंगात जाण्यासारखे आहे व परत आई-वडीलांची भेट होणार नाही हे त्या चतुर मुलीने जाणले व जाण्यास नकार दिला. यामुळे क्रुद्ध झालेल्या देवरायाने 30000 सैनिकांसह मुदगलकडे कूच केले. ही बातमी समजताच ही मुलगी आपल्या आई-वडीलांबरोबर जंगलात पळून गेली. विजयनगरच्या सैन्याने या भागात येऊन प्रचंड नासधूस केली व रिकाम्या हाताने ते परत गेले. या आक्रमणाची बातमी बहमनी सुलतानाला जेंव्हा कळली तेंव्हा तो प्रचंड सैन्य घेऊन विजयनगरवर चालून आला. देवरायाने त्याच्याशी तह करून त्याला 10 लक्ष होन, 5 मण मोती,50 हत्ती, 2000 स्त्री, पुरुष गुलाम सुलतानाला दिले व आपल्या मुलीचे सुलतानाशी लग्न करून दिले.

विजयनगरचा जनानखाना बघताना ही गोष्ट मला वारंवार आठवते आहे. हा जनानखाना, त्यात राहणार्‍या स्त्रियांना एखाद्या सोन्याच्या पिंजर्‍याप्रमाणे वाटत असणार यात शंकाच नाही. बाहेरची संरक्षक भिंत ओलांडून आत गेले की एक मोठे विस्तृत आवार दिसते आहे. साधारण मध्यभागी अंदाजे 150 फूट लांब व 90 फूट रूद असे राणी महालाचे जोते दिसते आहे. हे जोते तीन स्तरांवर आहे व प्रत्येक स्तरावर ‘महानवमी डिब्बा‘ या राजनिवासातील चौथर्‍यासारखेच पण अतिशय नाजूक डिझाइनचे असे नक्षीकाम केलेले आहे. या जोत्यावर, चंदनी लाकूड वापरून बांधलेला महाल होता असे म्हटले जाते. या महालाच्या समोर एका उथळ अशा तलावाच्या( सध्या कोरडा) मध्यभागी बांधलेला व नाजूक नक्षीकाम केलेला एक चौथरा दिसतो आहे. या चौथर्‍यावर जलमहाल ही इमारत होती. पाण्याच्या तलावाच्या मध्यभागी असल्याने, उन्हाळ्याच्या दिवसात ही इमारत थंड रहात असे. जनानखान्याच्या वापरासाठी एक मोठा तलावही याच आवारात दिसतो. त्याशिवाय एकही खिडकी नसलेली एक इमारत दिसते आहे. ही इमारत धनदौलत, दागदागिने, ठेवण्यासाठी वापरली जात होती. या धनकोषाच्या इमारतीशिवाय, या परिसरात अजुनही उभी असलेली एकमेव इमारत म्हणजे कमल महाल(Lotus Palace) किंवा चित्रांगणी महाल. विटांचे बांधकाम व त्यावर चुन्याचे प्लॅस्टर अशी बांधणी असलेली ही दुमजली इमारत, काय कारणासाठी वापरली जात होती? हे सांगणे कठिण आहे. परंतु सर्वसामान्य समजुतीप्रमाणे राज घराण्यातील स्त्रिया या महालात भेटत असत किंवा स्त्रियांचे कार्यक्रम येथे होत असत. या इमारतीचा एकूण आकार हा अर्धविकसित कमल पुष्पासारखा आहे असे म्हटले जाते. त्यामुळे याला कमल महाल बहुदा म्हणत असावेत. त्याच प्रमाणे आतल्या घुमटावर कमळाच्या कळ्यांचे डिझाइन आहे.इमारतीच्या चारी बाजूंना मोठमोठ्या कमानी आहेत व त्यावर पडदे सोडण्याची सोय केलेली दिसते आहे. वरच्या मजल्यावर सर्व बाजूंना बाल्कनी दिसत आहेता. या कमानींवर सुंदर नक्षीकाम केलेले दिसते. हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही बांधकाम पद्धतींचा या इमारतीत मिलाफ झालेला दिसतो आहे. कमानी इस्लामिक पद्धतीच्या आहेत. कदाचित या मुळेच ही इमारत आक्रमकांच्या हल्ल्यातून वाचली असावी.
Lotus mahal
दुमजली कमल महाल
Beauty in symmetry lotus mahal
कमल महालाच्या क्मानी व त्यावरील कोरीव काम Stunningly beautiful
Observation tower jenana enclosure
जनाना एनक्लोजरचा गार्ड टॉवर, यात स्त्री किंवा तृतिय पंथी सैनिक पहारा देत असत.

जनानखान्याच्या साधारण इशान्येला हत्तींचे तबेले आहेत. राण्यांच्या उपयोगासाठी विजयनगरच्या 500 हत्तींपैकी 12 हती ठेवलेले असत. हे हत्ती या तबेल्यात बांधलेले असत. हत्तीच्या पायांना साखळदंडांनी न बांधता वर छतात बसवलेल्या एका हूक मधे साखळी अडकवून ती हत्तीच्या छातीभोवती अडकवलेली असे. या हत्तीचे माहूत व इतर कर्मचारी यांच्यासाठी बांधलेली इमारत जवळच आहे. या इमारतीचे जोते एवढे उंच आहे की हत्तीवर बसण्यासाठी याचा उपयोग केला जात असे.
elephant stables
हत्ती तबेला
Lonely guard house far away
जनाना एनक्लोजर मधून दिसणारा दूरवरचा एक एकाकी गार्ड टॉवर

जनानखान्याचा फेरफटका संपवून मी आता परत एकदा उत्तरेच्या दिशेने निघालो आहे. हंपीमधल्या भग्न अवशेषांमधले सर्वोत्कृष्ट म्हणून जे गणले जाते त्या विठ्ठल मंदिराकडे माझी बस निघाली आहे. बस स्थानक या मंदिरापासून बरेच दूर आहे. आता मोठी पायपीट करावी लागणार असे मनात येत असतानाच एक मोठी छानदार व बॅटरीवर चालणारी मिनीबस नजरेसमोर येते. बस व वाहने यांच्या डिझेल व पेट्रोल धुरामुळे या मंदिराच्या अवशेषांवर दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून ही बस तुम्हाला विठ्ठल मंदिर परिसरापर्यंत घेऊन जाते. मिनीबस प्रथम एका मोठ्या दगडी फ्रेमपाशी उभी राहते. ही फ्रेम म्हणजे राजाची तुला करण्यासाठी उभारलेला एक दगडी सांगाडा आहे. यावर एक तराजू बांधून राजा एका पारड्यात बसत असे व दुसर्‍या पारड्यात धन संपत्ती टाकून दोन्ही पारडी एका रेषेत आली की ती धन संपत्ती गोरगरिबांना दान केली जात असे.
battery operated bus
विठ्ठल मंदिरात जाण्यासाठीची बॅटरीवर चालणारी मिनीबस
King;s balance
राज तुला

विठ्ठल मंदिरापाशी थांबण्याआधी आमची मिनी बस मला तुंगभद्रा नदीच्या काठाशी घेऊन जाते. या ठिकाणापासून नदीचे पात्र खरोखरच अतिशय नयनमनोहर दिसते आहे. निळेशार आकाश, त्याच्या खाली दगडधोंड्यांनी आच्छादित टेकड्या व समोर आकाशासारखीच निळीशार तुंगभद्रा नदी हा सर्व देखावा नयनांचे पारणे फेडणारा वाटतो आहे. नदीच्या काठालगत पुरंदरदास या महान कवीचा आश्रम होता. त्याचे अवशेष फक्त आता दिसत आहेत. नदी ओलांडण्यासाठी येथे मोठ्या विणलेल्या गोल आकाराच्या टोपल्या वापरल्या जातात. वेळेअभावी त्यांच्यातून सफर करण्याची माझी इच्छा काही फलद्रूप होऊ शकत नाहीये. नदीच्या पात्राच्या समोर असलेल्या टेकडीचे नाव अंजनेय टेकडी असे आहे. त्यावर अंजनेय किंवा मारुतीचे पांढरे शुभ्र मंदिर उन्हात नुसते चमकते आहे.
Tungbhadra with Anjaneya hill

तुंगभद्रा नदीचे पात्र, मागे अंजनेय टेकडी

Anjaneya hill and temple
फुल झूम करून काढलेले अंजनेय टेकडीवरच्या अंजनेय मंदिराचे छायाचित्र

या परिसरात असलेल्या व दगडधोंड्यांनी वेष्टित असलेल्या सर्वच टेकड्यांना मोठी काव्यात्मक नावे आहेत. गंधमादन, मातंग, हेमकूट, मलयवंत आणि ऋषिमुख अशी नावे वाचल्यावर मला कालिदासाच्या किंवा भवभूतीच्या कालात आपण गेलो आहोत असे वाटू लागले आहे.
gopura viththal mandir
विठ्ठल मंदिराच्या गोपुरावरची अप्रतिम शिल्पकला
viththal mandir court yard
विठ्ठल मंदिराचा परिसर (कोर्ट यार्ड)

आता मिनीबस विठ्ठल मंदिराकडे निघाली आहे. मंदिराच्या बाहेर बस थांबते व मी उतरतो व गोपुराच्या दिशेने चालू लागतो. मंदिराच्या प्रवेशद्वारातून मागे वळून बघितल्यावर हंपी बाजार किंवा कृष्ण बाजार सारखी दुकाने येथे दिसत आहेत. दुकाने आणि मध्यभागचा रस्ता यामधे पाणी साठवण्यासाठी लांबलचक अशी कुंडे आहेत. या ठिकाणी विजयनगरचा गुरे बाजार भरत असे. अरबी घोडे, बैल, गायी वगैरे प्राणी या ठिकाणी दूर दूर ठिकाणांवरून विक्रीसाठी येत असत. मी परत मंदिराकडे वळतो. गोपुराची बरीच पडझड झालेली दिसते आहे परंतु शिल्लक भागावर अजुनही अप्रतिम शिल्पकाम दिसते आहे. प्रवेशद्वार ओलांडून मी मंदिर परिसरात प्रवेश करतो. एक अतिशय भव्य आणि मनात ठसणारे दृश्य नजरेसमोर उलगडत आहे. प्रवेशद्वाराच्या अगदी समोर, एका रेषेत, ध्वजपीठ, ज्योतीपीठ व बलिपीठ अशी नावे असलेले चौथरे उभे आहेत. या चौथर्‍यांच्या मागे एक मोठे तुळशी वृंदावन दिसते आहे व त्याच्या मागे हंपीचा जगप्रसिद्ध पाषाण रथ दिसतो आहे. या पाषाण रथाच्या मागे मंदिराचा महामंडप दिसतो आहे. महा मंडपाच्या दोन्ही अंगांना नक्षीदार खांबांचा वापर केलेले चार उघडे मंडप आहेत. महामंडपाच्या उजव्या हाताला पाकगृह मंडप व त्याच्या मागे भजनगृह मंडप दिसतो आहे तर महामंडपाच्या डाव्या हाताला लग्नविधीसाठी उभारलेला कल्याणमंडप आहे. या कल्याण मंडपाच्या पुढे कृष्णदेवराय या राजाने बांधलेला नृत्यमंडप आहे. या मंडपात कृष्णदेवरायची धाकटी राणी चिन्नादेवी ही नृत्य करत असे. हे नृत्य राजा व राजघराण्यातील इतर काही थोडे लोकच बघू शकत असत. त्यामुळे या मंडपाला चारी बाजूंनी पडदे लावण्याची सोय आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते की ही राणी दसर्‍याच्या दिवशी कृष्ण मंदिर, विरूपाक्ष मंदिर व विठ्ठल मंदिर या तिन्ही ठिकाणी नृत्य करत असे.
tulasi vr
तुळशी वृंदावन
Viththal charriot
परंतु यासम हा, पाषाण रथ

मी आता मंदिर परिसरात शिरलो आहे. नजरेसमोर प्रथम येतो आहे पाषाण रथ. प्रत्यक्षात हा रथ म्हणजे अनेक दगडी भाग वापरून बनवलेले एक शिल्प आहे मात्र या भागांमधले सांधे इतक्या बेमालूमपणे लपविलेले आहेत की हा रथ एका दगडातून कोरून काढला आहे असे वाटते. . हा रथ म्हणजे गरूडाचे मंदिर होते व म्हणून तो विठ्ठलाच्या समोर स्थापन केलेला आहे. रथाच्या तीन बाजूंना पुराणात वर्णन केलेल्या लढायांची चित्रे व इतर नक्षीकाम वापरून अप्रतिम कलाकुसर केलेली आहे. चौथ्या बाजूला प्रवेशद्वार व आत शिरण्यासाठी बनवलेली दगडी शिडी आहे. रथाची सर्व चाके दगडी आसावर बसवलेली आहेत व ती पूर्वी फिरू शकत होती. या चाकावर फुलांच्या आकाराची नक्षी दिसते आहे. रथाच्या खालच्या भागावर मूळ रंगकाम अजून दिसतेआहे. हा रथ व मंदिर पूर्वी संपूर्णपणे रंगवलेले असे. हा रथ ओढण्यासाठी मुळात दोन घोड्यांची शिल्पे दाखवलेली होती. ती नष्ट झाल्याने तेथे दोन हत्तींची शिल्पे ठेवलेली दिसतात. मात्र मूळ घोड्यांच्या शिल्पातले पाय व शेपट्या अजून दिसत आहेत.
Viththal mandir musical hall
महामंडपातील दक्षिण कक्ष
Musical pillars
नाद निर्मिती करणारे स्तंभ
Sculpture on pillar at entrance to kalyanmandap
नृत्य कक्षातील एक स्तंभ

मंदिराचा महामंडप हा चार कक्षांचा मिळून बनलेला आहे. समोरच्या बाजूने प्रवेश करण्यासाठी असलेल्या पायर्‍यांच्या दोन्ही बाजूंना हत्ती शिल्पे आहेत तर पूर्व , पश्चिम बाजूंच्या पायर्‍यांजवळ ‘यालिस‘ या काल्पनिक सिंहाची शिल्पे आहेत. महामंडपाच्या सर्व बाजूंनी अतिशय सुंदर अशी शिल्पे कोरलेली आहेत. यात अगदी खालच्या बाजूला असलेली अश्व व त्यांचे अश्वशिक्षक यांची शिल्पे तर अप्रतिमच म्हणता येतील. महामंडपाच्या सर्व कक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या कक्षांमधील अत्यंत सुंदर कोरीवकाम केलेले स्तंभ आहेत. प्रवेश द्वाराजवळ दोन्ही बाजूंना जे स्तंभ आहेत त्यांच्यावर आघात केला तर सा रे ग म असे स्वर निघतात. त्याच प्रमाणे निरनिराळ्या स्तंभांच्यावर निरनिराळ्या वाद्यांमधून निघणारे सूर निघतात असे सांगितले जाते. मंदिराचे मोडतोड होऊ नये म्हणून या स्तंभांच्यावर आघात करण्यास आता बंदी घालण्यात आलेली आहे. पूर्वेकडच्या कक्षाला संगीत कक्ष असे नाव आहे. या कक्षाच्या बाजूंना वादक आणि वाद्ये यांचीच शिल्पे आहेत. दक्षिणेकडच्या कक्षात ‘यालिस‘ सिहाचीच शिल्पे आहेत तर उत्तरेकडच्या कक्षात नृसिंहाबद्दलची शिल्पे आहेत. पश्चिमेचा कक्ष इस्लामिक आक्रमकांच्या हल्ल्यात बहुदा नष्ट झाला असावा. याच्या पुढे गाभारा आहे. गाभार्‍यातल्या मूर्ती नष्ट झालेल्या आहेत. गाभार्‍याच्या बाहेरील बाजूस कमल पुष्पाची अनेक सुंदर शिल्पे दिसतात.
Balustrade
प्रवेश पायर्‍यांच्या बाजूचे ‘यालिस’ या काल्पनिक सिंहाचे शिल्प
Carvings on pedestal
मंदिराच्या जोत्यावर असलेले अश्व व अश्वशिक्षक यांच्या शिल्पांचे पॅनेल
Viththal mandir sanctum
विठ्ठल मंदिराचा रिक्त गाभारा

विठ्ठल मंदिराबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. इथल्या मूर्तीच पंढरपूरला नेल्या आहेत वगैरे. खरे खोटे विठोबाच जाणे. विठ्ठल मंदिराला भेट देताना ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी माझ्या ओठावर सारखी येते आहे. त्या ओवीमधल्या एका ओळीत शब्द आहेत. “कानडा वो विठ्ठलु, कर्नाटकु” या ओवीवरून काही मंडळी विठ्ठल कर्नाटकातून आला असला पाहिजे असा अर्थ काढतात. मात्र या ओवीचा खरा अर्थ काही निराळाच आहे. कानडा हा शब्द अगम्य, अनाकलनीय या अर्थाने व कर्नाटकु हा शब्द नाटक्या, लाघवी या अर्थाने वापरला आहे असे अनेक तज्ञांनी सांगितलेले आहे. तरीही कर्नाटकातल्या या मंदिरात गेल्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी कोणत्याही अर्थाने ही ओवी लिहिली असली तरी विठ्ठल आणि कर्नाट्क यांचे खास नाते आहे हे मनाला सारखे जाणवते आहे. विठ्ठल मंदिर बघितल्यावर माझा हंपीचा फेरफटका पूर्ण झाल्यासारखा वाटतो आहे. हे मंदिर खरोखरच अद्वितिय आहे यात शंकाच नाही.
viththal temple dancers hall pillar support
मंदिराच्या पूर्व प्रवेश पायर्‍यांजवळील स्तंभांवरचे एक शिल्प
Viththal mandir
विठ्ठल मंदिराजवळचा फुललेला फ्रॅन्जिपनी वृक्ष

विजयनगरचा रामराजा व बहमनी साम्राज्याच्या उत्तराधिकारी असलेल्या निजामशाही, आदिलशाही, बरीदशाही, व इमादशाही या चारी राज्यांच्या संयुक्त सेना, यांच्यामधे बनीहट्टी येथे 23 जानेवारी 1564 रोजी शेवटची लढाई झाली. विजापूरची प्रसिद्ध मलिक-ए-मैदान तोफ फक्त एकदाच म्हणजे या लढाईत वापरली गेली. या लढाईत रामराजा मारला गेला व विजयनगरच्या सेनेचा संपूर्ण पराभव होऊन विजयनगरचे साम्राज्य बुडाले. यानंतर 6 महिने शत्रू सैनिकांनी विजयनगरचा विध्वंस करून या सुंदर राजधानीचे भग्न अवशेषात रूपांतर केले. मात्र विजय नगरचे साम्राज्य बुडाले असले तरी या साम्राज्याने दख्खन व दक्षिण भारत यांचे इस्लामीकरण होण्याची प्रक्रिया थांबवली ती थांबलीच. या कालानंतर थोड्या दशकांनीच दख्खनमधे एका नव्या शक्तीचा उगम झाला. ती शक्ती होती शहाजी महाराज भोंसले. बरीदशाही, इमादशाही व निजामशाही हळूहळू नष्ट झाल्या व दख्खनचे पुढचे राजकारण आदिलशाही, भोंसले कुल व उत्तरेचे मुघल यांच्या भोवतीच फिरत राहिले.

दख्खनच्या भटकंतीमधे आता मला जायचे आहे विजयनगरच्या कालाच्या हजार वर्षे मागे. या कालात येथे राज्य करत असलेल्या चालुक्य राजघराण्याच्या खाणाखुणा शोधायला.

10 फेब्रुवारी 2011

लेखनविषय: दुवे:

Comments

मिलाफ

सुरेख चित्रे आणि मालिका.

हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही बांधकाम पद्धतींचा या इमारतीत मिलाफ झालेला दिसतो आहे.
इतर इमारतींत असा मिलाफ का दिसत नाही? कमल महाल ह्या इमारतीत हा मिलाफ झाल्याचे कारण काय असावे?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विठोबा रखुमाई

लेख नेहमी प्रमाणे वाचनीय आणि प्रेक्षणीय झाला. या भागात कधीतरी जाऊन यायचे हे आता ठरवले.

विठोबा मंदिरातील रिकामे दोन चौथरे पाहून 'वामांगी रखुमाई' ही नामदेवांची (?) युगे अठ्ठावीस मधली ओळ आठवली. पंढरपुरात रखुमाई विठ्ठलाशेजारी नाही (थोडी दूर वेगळ्या मंदिरात आहे असे ऐकतो.) मूर्ती तिथली इकडे आली (आली की नाही, केव्हा कशी) इतका महत्वाचा इतिहास आपल्याला नक्की सांगता येऊ नये याचे नवल वाटले. जाता जाता विकी वरची नोंद वाचली. पंढरपूरचे मंदिर चौदाव्या शतकातले असू शकते असे लिहिले आहे.

प्रमोद

विठ्ठल मूर्ती

हंपीची विठ्ठल मूर्ती पंढरपूरला नेली असेल यावर माझा तरी विश्वास बसत नाही. 1565 नंतर या मंदिरातील पूजा अर्चा बंद पडली. पंढरपूरचे मंदिर कधी बांधले याची काहीच माहिती नाही. जर ते चौदाव्या शतकातले असले तर हंपीची मूर्ती तेथे जाणे कठिण आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हंपीचा जो विध्वंस केला गेला तो धार्मिक कारणासाठी केला गेला नाही. तो धन संपत्तीची लूटमार करण्यासाठी केला गेला. हंपीच्या अनेक देवळांच्यात अजूनही मूर्ती आहेतच. बहुतेक ठिकाणी समोर असलेले देवाचे वाहन( उंदिर, नंदी, गरूड वगैरे) नष्ट झाल्याने पूजा बंद पडली. पूजा बंद झाल्यावर विठ्ठलाची हंपीमधली मूर्ती चोरीला गेली असण्याचीही शक्यता आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

काळ?

प्रत्येक इमारतीच्या काळाबद्दल काही माहिती मिळाली का? कमल महाल आणि वर दिलेले हत्तीखानेही मुस्लिम प्रभावाचे दिसत आहेत.
कमल महालाची इमारत फारच सुंदर आहे. आर्किटेक्टचे कौतुक वाटते. पण ही इमारत नंतरच्या काळातील असावी. विजयनगराची कोणी राणी मुस्लिम होती का? किंवा राजस्थान वगैरेकडची?

लेख आवडला. हंपीला जाण्याची इच्छा तीव्र आहे, पण कधी जाईन कल्पना नाही. घरच्यांना तरी जाता येईल. येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सोयी आहेत का? केवळ हंपी करायचे असले तर कोठे रहावे असेही काही मार्गदर्शन केल्यास बरे होईल.

हेच

पण ही इमारत नंतरच्या काळातील असावी.

हेच मलाही वाटते आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कमल महाल

कमल महाल कोणत्या राजाने बांधला किंवा तो कशासाठी बांधला याची काहीच माहिती मिळाली नाही. काही लोकांच्या मताने तो महाल राजा व वरिष्ठ अधिकारी यांच्या चर्चेसाठी वापरला जात होता. तर काहींच्या मते राण्या या महालात एकत्र येऊन सण समारंभ साजरे करत असत. उशीरात उशीरा म्हणजे 1530 सालापर्यंत(कृष्णदेवराय राजाच्या कारकिर्दीत) तरी हा महाल नक्कीच बांधला गेला होता.
हंपीला जाण्यासाठी सर्वात जवळ असलेले शहर म्हणजे होसपेट. हे शहर मुंबई-बेंगलुरु रेल्वेमार्गावर आहे. त्यामुळे येथे या दोन्ही ठिकाणांहून जाणे सोईस्कर पडते. होसपेट मधे बरीच हॉटेल्स आहेत. त्यातले कृष्णा पॅलेस सर्वोत्तम समजले जाते. आम्ही सिद्धार्थ रेसिडे न्सी नावाच्या हॉटेलात उतरलो होतो. हॉटेल ठीक होते.
होसपेटहून हंपीला जाण्यासाठी बसेस आहेत किंवा दिवसभरासाठी टॅक्सी पण मिळतात. ज्येष्ठ नागरिकांना टॅक्सीचा पर्याय सर्वात उत्तम आहे कारण हंपी बघताना बरेच चालावे लागते. सप्टेंबर ते जानेवारी हा काल सर्वात उत्तम आहे. नंतर फार कडक ऊन असते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

कृष्णदेवरायच्या काळातल्याच

चंद्रशेखर ह्यांनी खाली लिहिल्याप्रमाणे ह्या इमारती कृष्णदेवरायच्या काळातल्या आहेत.

The Lotus Mahal, its configuration resembling the spread parts of the lotus, is a two-storied pavillion with twenty-four square pillars on the ground floor carrying recessed and floriated arches -- a happy blend of Islamic and Hindu motifs.

In the zenana enclosure, the watchtower, the Queen's palace, the women guards' quarters, and the elephant stables are all excellent examples of the adaptation and blending of Islamic motifs and Hindu elements. They speak volumes about the catholic outlook of the Vijayanagar emperors, particularly Krishnadeva Raya.
कंबलूर शिवराममूर्ती ह्यांच्या आर्ट ऑफ़ इंड्या ह्या ग्रंथातून.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"

ताजमहाल की कमलमहाल? ;-)

असे तर नाही की जसे तेजोमहालयचे ताजमहाल झाले तसे मुस्लिम इमारतीची तोडफोड करून कृष्णदेवरायाने कमलमहाल तर नाही केले? ;-) ह. घ्या.

छान लेख

छान लेख, फोटो विशेष छान. ४ पैकी हा भाग जास्त आवडला. चाफ्याचे झाड असलेला फोटो सुंदर.

जनाना एन्क्लोजर मधील 'जनाना' हा शब्द (बहुदा उर्दू) आणि कमळ महालाची मुस्लीम स्थापत्य शैली ह्यांचा काही संबंध असू शकेल.

जनाना एनक्लोजर

जनाना एनक्लोजर हा शब्द प्रयोग विजय नगर कालातला असेल असे वाटत नाही.
चन्द्रशेखर

नक्कीच

:) नक्कीच, पण जनानखाना म्हणत असतिल असे मला वाटले म्हणून मी तसे म्ह्णालो. पण बहदा तसे नसावे.

लेख आवडला

हा लेख त्यातील वर्णनामुळे विशेष आवडला. हंपीबाबत विस्तृत इतिहास वाचायला मिळत नसल्याने कमल महालासारख्या इमारतींचे कोडे सुटत नाही परंतु एखाद्या कुशल इस्लामी स्थापत्त्यकाराला या इमारतीच्या निर्मितीसाठी पाचारणे केले गेले असावे अशी साधी शक्यताही वर्तवता येईल.

विजय नगरचे साम्राज्य बुडाले असले तरी या साम्राज्याने दख्खन व दक्षिण भारत यांचे इस्लामीकरण होण्याची प्रक्रिया थांबवली ती थांबलीच.

हे का झाले असावे? याची काही विशेष कारणे आहेत का?

माझ्या मते

हे तेवढे खरे नसावे. हैद्राबाद, गोवळकोंडा, विजापूर येथे सगळीकडे मुस्लिम राज्यकर्ते होते, तेव्हा धर्मांतर जबरदस्तीने किंवा चरितार्थाला सोपे/आवश्यक म्हणून होत असेलच.

पण बहामनी आणि कुतुबशाही ही तत्कालिन साम्राज्ये 'शिया' मुस्लिम राज्यकर्त्यांची होती. सुन्नी वंशांच्या राज्यकर्त्यांनी (जसे औरंगजेब) धर्मांधता अधिक प्रमाणात दाखवलेली असू शकते (हा फक्त कयास आहे).

होत होतेच

बजाजी निंबाळकरांचे धर्मांतर अदिलशहामुळे झाले होते ना?

इस्लामीकरणाची प्रक्रिया थांबण्याची कारणे.

महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाने महाराष्ट्राचा इतिहास प्रसिद्ध केलेला आहे. या इतिहासापैकी मध्ययुगीन कालखंडाच्या ग्रंथाचे संपादन श्री. गो. त्र्यं कुलकर्णी यांनी केलेले आहे. या खंडाच्या सुरवातीस एक विस्तृत प्रस्तावना श्री. कुलकर्णी यांनी लिहिली आहे. या प्रस्तावनेत दख्खनमधे इस्लामीकरणाची प्रक्रिया का थांबली असावी याचे सुंदर विश्लेषण केलेले आहे. श्री. कुलकर्णी याची काही कारणे देतात.

1.दख्खनमधल्या सुलतानांनी बहुसंख्य हिंदू जनतेवर शरियतचे कायदे लागू न करता त्यांना धर्मस्वातंत्र्य दिले होते.
2. राज्यकारभारात हिंदूंना महत्वाची स्थाने दिली गेली.
3. या सुलतानांच्या सैन्यात अनेक हिंदू सरदार मोठ्या हुद्द्यावर होते. त्यांच्या हाताखालचे सैन्य बहुतांशी हिंदू होते. शहाजी भोंसले हे याचे एक प्रमुख उदाहरण आहे.
अशा परिस्थितीत या सुलतानांना मोठ्या प्रमाणात इस्लामीकरणाचा प्रयत्न करून जनतेचा रोष ओढवून घेणे परवडण्यासारखे नसावे. याला एक संमातर असणारी माहिती नुकतीच माझ्या वाचनात आली. 1857 च्या आधीच्या कालात ख्रिस्ती धर्माचा प्रचार व जुलमाने धर्मांतर याचे बरेच प्रकार मोठ्या प्रमाणात हिंदूस्थानात चालू झाले होते व इस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी याकडे पूर्ण काणाडोळा करत होते.
हे युद्ध झाल्यावर इंग्रज सरकारला या जुलमी धर्मांतरातला धोका लक्षात आला व व्हिक्टोरिया राणीच्या जाहीरनाम्यात सर्व जनतेला असे अभिवचन दिले गेले की त्यांची धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखण्यात ये ईल व कोणाचेही धर्मांतर जुलमाने करण्यात येणार नाही.
अशाच काहीसा प्रकार दख्खनच्या सुलतानांच्या बाबतीत झाला असावा व त्यांनी लोकांचा असंतोष ओढवून घेण्यापेक्षा त्यांच्या धर्माच्या बाबतीत पडू नये असे ठरवले असावे.
मी वर म्हटल्याप्रमाणे विजयनगरच्या विध्वंसात सुद्धा धार्मिक स्थळे नष्ट करणे हा हेतू नसून जास्तीत जास्त लूटमार करणे हाच हेतू होता.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सुंदर लेखमालिका

आता मी संगणकासमोर बसलेलो आहे. लेख वाचून मनात खूप आनंद भरला आहे. विठ्ठलाचा रिकामा गाभारा पाहून माझे मन माढ्याच्या विठ्ठलाभोवती पिंगा घालत आहे. महाराष्ट्रात पंढरपूरची विठ्ठलमूर्ती हलवून दुसरीकडे नेण्याचे प्रसंग सुलतानी काळात अनेकदा झाल्याचे वाचले आहे. विजयनगरच्या राजाने पंढरपूरहून विठ्ठलाची मूर्ती स्वतःच्या राजधानीत नेल्याची आणि भानूदासांनी ती मूर्ती परत आणल्याची गोष्टीची आठवण होत आहे. पैठण येथील एकनाथांच्या वाड्यात देवघरात जी मूर्ती आहे तिचे नाव 'विजय विठ्ठल' आहे त्याची ही आठवण होत आहे. वाड्यात विठ्ठलाची मूर्तीच्या फोटो काढा म्हणना-या उपक्रमी ’सहज’ यांचीही प्रतिसादाच्या निमित्ताने आता आठवण येत आहे. विजयनगरहून महाराष्ट्रात इतकी मोठी मूर्ती पिशवीत की काय बसावी म्हणून विठ्ठल लहान झाला त्या आठवणींनी एक विठ्ठलभक्त म्हणून देव महाराष्ट्रात येण्यासाठी किती उतावीळ होता त्या आठवणीने आनंदाला पारावर आता राहिलेला नाही. विजयनगरला विठठल पंढरपूरहून नव्हे तर वेंकटरीहून आला असे रा.चि.ढे-यांचे म्हणने आहे. रिक्त गाभा-यातील विठ्ठल कुठे गेला त्याबद्दल काही आख्यायिका वाचायला मिळाल्या असत्या तर खूप आनंद झाला असता असे लेखन वाचतांना वाटत आहे. लेख मालिका खूप आवडत आहे. आता मी मिसळपावकडे चाललो आहे.

-दिलीप बिरुटे

ग्रंथनिर्मिती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.चन्द्रशेखर यांचे शिल्पपर्यटनाविषयींचे सर्व लेख अत्युत्कृष्ट आहेत.त्यांनी काढलेले शिल्पांचे फोटो अगदी स्वच्छ आणि सुस्पष्ट आहेत.त्यामुळे प्रत्येक शिल्पचित्र पाहाता पाहाता किती वेळ गेला त्याचे भान राहात नाही.त्यांची वर्णनशैलीही वाचनीय आहे.
मला असे सुचवावेसे वाटते की श्री.चन्द्रशेखर यांनी हे सर्व लेख एखाद्या प्रकाशन संस्थेला दाखवावे.यांतून चांगल्या प्रकारची ग्रंथनिर्मिती होऊ शकते.शिल्पचित्रे सुंदरच आहेत.प्रत्येक शिल्पाविषयी मोजक्या शब्दांत रसग्रहणात्मक लेखन (शिल्पशैली, त्यात नेमके काय पाहावे,आस्वाद कसा घ्यावा इ.) कुणा तज्ञाकडून करून घेतले तर पुस्तकाचा स्तर अधिक उंचावेल.माझ्यामते सुंदर गुळगुळीत आर्ट पेपरवर मुद्रित केलेल्या दोन उत्कृष्ट पुस्तकांची मराठी ग्रंथसंपदेत भर पडू शकेल.
श्री.चन्द्रशेखर यांनी या संदर्भात काय विचार केला आहे नकळे.

सहमत

सुंदरच आहे लेखमालिका.

 
^ वर