अमेरिका एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र आहे काय?

अमेरिका एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र आहे काय?
अमेरिका एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र आहे काय?
अलीकडील घटना पहाता अमेरिका भारताशी मैत्री करू इच्छिते आहे असे चित्र दिसत आहे. क्लिंटन यांच्या कारकीर्दीत याला सुरुवात झाली होती पण त्यांच्या कारकीर्दीत ’नारळ फोडण्या’पलीकडे फारशी प्रगती झाली नव्हती. धाकल्या बुश यांच्या कारकीर्दीत कांहींसा वेग आला व अणू ऊर्जा करार होण्यात त्याची परिणती झाली.
आता ओबामांच्या कारकीर्दीत मैत्री वाढण्याच्या दिशेने खूपच नवी-नवी चिन्हे दिसत आहेत. मनमोहन सिंग यांच्या अमेरिका भेटीत त्यांना शाही मेजवानी दिली गेली. राष्ट्रपती म्हणून 'व्हाईट हाऊस’मधली ही पहिलीच शाही मेजवानी होती आणि ती भारताच्या पंतप्रधानांना दिली गेली हा केवळ योगायोग म्हणता येणार नाहीं. मग ओबामा इथे आले, भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत कायमच्या सदस्यत्वाबद्दल त्यांनी पाठिंबा दिला, अनेक व्यापारी करार झाले, लष्करी करारही झाले किंवा होऊ घातले आहेत. थोडक्यात अमेरिका भारताबरोबरचे मैत्रीचे संबंध वाढवायला उत्सुक दिसते आहे.
एका एकी ’सर्वात मोठी लोकशाही’चे पडघम वाजत असले तरी आपण स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच सर्वात मोठी लोकशाही राबवत आहोत व ते अमेरिकेला माहीत नव्हते असे मुळीच नाहीं! मग विचार येतो कीं ही मैत्री खर्‍याखुर्‍या हृदयपरिवर्तनातून होत आहे कीं एक अजस्त्र बाजारपेठ काबीज करून त्याद्वारे व्यापारवृद्धी साधण्यासाठी होत आहे कीं चीनशी भिडवण्यासाठी त्यांना आपण एक प्यादे हवे आहे म्हणून होत आहे?
पण त्या आधी अमेरिका एक मित्रराष्ट्र म्हणून विश्वासार्ह आहे का याबद्दल विचार करणे आवश्यक आहे.
१९६५ सालापासून-जेंव्हा भारत-पाकिस्तान युद्ध झाले तेंव्हापासून मी राजकारणासारख्या विषयावरील वाचन करू लागलो. युद्ध दोन-अडीच आठवड्यातच आटोपले. ’युद्धस्य कथाः रम्याः’ या उक्तीनुसार वृत्तपत्रातील राजकीय बातम्या वाचायला पहिल्यांदा सुरुवात झाली (तो पर्यंत फक्त क्रिकेटच्या बातम्याच वाचायचो!). तेंव्हापासून ही संवय जणू जन्माचीच लागली व ती संवय आजतागायत लागलेलीच आहे.
तेंव्हांपासून मी अमेरिका टाकत असलेली पावलेही पहात आलो आहे. त्यावेळी मी काम करत असलेल्या कंपनीने कळव्याला एक नवीन प्रकल्प सुरू केला होता. माझी नेमणूक त्या विभागात (Project) झाली होती. युद्ध सुरू झाल्याबरोबर आमच्यासारख्या 'ब्रम्हचार्‍यां'ना प्रकल्पाच्या जागेवर रहायला जायचा प्रस्ताव मांडला गेला. रहायची आणि जेवण्या-खाण्याची सोय आणि दिमतीला एक 'जीप' अशी आमची बडदास्त कंपनीने ठेवली होती. आम्ही गेलो आणि रात्री-अपरात्री गस्त-बिस्त घालू लागलो. गोप बहादुर नावाचा एक पहारेकरी नेहमी झोपलेला आढळून् यायचा म्हणून त्याचे ’झोपबहादुर’ असे पुनर्नामकरणही आम्ही केले!
त्या युद्धादरम्यान लक्षात आले कीं पाकिस्तानने जरी स्वतःला अमेरिकेच्या गोठ्यात बांधून घेतले असले तरी त्यांना अमेरिकेचा पाठिंबा मनापासून मिळत नसावा! अमेरिकेचे पाकिस्तानला दिलेले समर्थन कांहींसे बिचकत-बिचकतच वाटायचे! अमेरिकेकडून मिळालेली शस्त्रे केवळ साम्यवादाविरुद्धच्या लढाईसाठी पाकिस्तानला दिली गेली होती आणि ती भारताविरुद्ध वापरायला बंदी हे त्यातलेच एक कलम होते तर पाकिस्तानला शस्त्रे फक्त भारतावर चाल करण्यासाठी हवी होती! त्यामुळे इथे "परस्पर हितसंबंधांतील संघर्ष" (conflict of interest) स्पष्ट दिसत होता. त्यात दोघांची कोंडी व्हायची.
६५च्या युद्धात आपल्या हवाई दलाने आपल्या नॅट (चिलट, मच्छर) नावाच्या चिमुरड्या लढाऊ विमानांच्या सहाय्याने पाकिस्तानकडील जास्त प्रगत ’सेबर जेट’ विमानांना जोरदार टक्कर दिली (खरे तर आपण त्या विमानांची बेइज्जतीच केली.) कीलर बंधुद्वय त्यायोगे नावाजले व त्यांना खूप पदकेही मिळाली. अमेरिकेच्या "पॅटन" रडगाड्याची इज्जतही भारताच्या चिलखती तुकडीने मातीला मिळविली. ले. क. तारापोर यांच्या नेतृत्वाखाली भारताने चिलखती रणगाड्यांचे युद्ध जिंकले व या पराक्रमासाठी त्यांना (मरणोत्तर) परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मानही देण्यात आला होता. त्यांच्या शौर्यामुळे पॅटन रणगाडे आज भारताच्या कित्येक शहरांतील उद्यानांमध्ये पारितोषिकांसारखे (trophy) अभिमानाने ठेवले गेले आहेत.
अमेरिकेच्या अशा वागण्याने पाकिस्तानचे त्यावेळचे परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुत्तो संतापले होते व १९६५ च्या पराजयानंतर आणि ताश्कंदच्या मानहानीकारक करारानंतर त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांच्यावर टीका करत परराष्ट्रमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पुढे ते स्वत:च आधी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष व नंतर पंतप्रधान झाले. भारताने अण्वस्त्राची पहिली चांचणी केली त्यानंतर भुत्तोंनी अमेरिकेडून अण्वस्त्रविरोधी ’छत्र’ मिळविण्याचे खूप प्रयत्न केले पण अमेरिकेने दाद दिली नाहीं. त्यामुळे त्यांनी अमेरिका हे एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र नाहीं असा निष्कर्ष काढून पाकिस्तानचे चीनबरोबरचे संबंध घनिष्ट करायला सुरुवात केली. पुढे पाकिस्तानला अण्वस्त्रधारी बनविण्यात अमेरिकेइतकीच चीनचीही मदत झाली.[१]
अमेरिकेचे धोरण असे दिसते कीं जे हुकूमशहा ताटाखालच्या मांजरासारखे त्यांच्या तालावर नाचतील त्यांना 'बक्कळ' आर्थिक आणि लष्करी मदत द्यायची आणि असे हुकूमशहा आपल्या जनतेवर करीत असलेल्या अन्यायाकडे दुर्लक्ष करायचे. पण अशा अन्यायामुळे संतापलेली जनता जेंव्हां बंड करून तख्तापालट करायला उठाव करायची तेंव्हां आपण लोकशाही राष्ट्र असल्याचा आव आणून आपल्याच मित्राला (’पित्त्या’ला) उपदेशामृत पाजत पाजत High & Dry सोडून द्यायचे व नव्या राज्यकर्त्याशी जुळते कां हे पहायचे!
बांगलादेशच्या युद्धातही पाकिस्तानला अमेरिकेच्या अवसानघातकी धोरणाचा प्रत्यय आला होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी पाकिस्तानचा दारुण पराभव होणार हे दिसत असतानासुद्धा आपले सातवे आरमार बंगालच्या उपसागरात पाठवायच्या निर्णयाला खूपच उशीर केला. पूर्व पाकिस्तानविरुद्धची मोहीम इतक्या झपाट्याने संपुष्टात आली कीं त्या आरमाराला एक तोफही डागण्याची संधी मिळाली नाहीं. अमेरिकेने केलेला हा विश्वासघात सर्वांनी पाहिला!
१९७१ ते १९७८ पर्यंतच्या काळात अनेक घडामोडी झाल्या. त्यात भुत्तोंना दिलेली फाशी ही एक महत्वाची घटना होती. आले. त्यावेळी अमेरिकेने भुत्तोंना वाचवायचे जे प्रयत्न केले तेही थातुर-मातुरच (half-hearted) होते. झिया नवे राष्ट्राध्यक्ष झाले तरी अमेरिकेने त्यांना जवळ-जवळ वाळीतच टाकले होते. पण अफगाणिस्तानवर सोवियेत संघराज्याचे आक्रमण झाल्यावर मात्र परिस्थिती बदलली. अमेरिकेला जणू एकाएकी पाकिस्तानची आठवण झाली. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष कार्टर यांनी परत पाकिस्तानला थोडी-फार शस्त्रे देण्याचे अमीष दाखवून पुन्हा युद्धात ओढण्याचा प्रयत्न केला पण झिया वाटले होते त्यापेक्षा धूर्त निघाले. त्यांनी अमेरिकेला ठणकावून सांगितले कीं अमेरिकेने "आपण विश्वासू मित्रराष्ट्र आहोत" हे आधी सिद्ध करावे, तरच ते पुढे चर्चा करतील.[१] कार्टर यांनी पाकिस्तानला देऊ केलेल्या मदतीचे वर्णन "peanuts" या उपरोधी शब्दात करून त्यांनी कार्टरना भेटण्यासाठी "व्हाईट हाऊस"ला जाण्याबद्दल अनुत्साह दाखविला. तोपर्यंत कार्टर निवडणूक हरणार असे वारेही जोरदारपणे वहात होते.
रेगन आल्यावर मात्र चित्र पालटले व रेगननी त्यांना "तुम्ही सोवियेत संघराज्याचा समाचार घ्या आम्ही तुमच्या अणूबॉंब बनविण्याच्या पयत्नांकडे पाहून न पाहिल्यासारखे करू" असे वचन दिले. या युद्धात बिन लादेन अमेरिकेच्या बाजूने लढले. रेगन यांची कारकीर्द संपता संपता दोन मोठ्या गोष्टी घडल्या. पहिली होती पाकिस्तान अण्वस्त्रधारी झाल्याची आणि दुसरी होती सोवियेत संघराज्याचे सैन्य परत गेल्याबरोबर अमेरिकेन (थोरल्या बुशसाहेबांच्या कारकीर्दीत) पाकिस्तानबरोबरचे संबंध जवळ-जवळ तोडून टाकले. अमेरिकेची पाकिस्तानला पुन्हा वार्‍यावर सोडण्याची ही कृती तशी त्यांच्या नेहमीच्या "कामापुरता मामा" या धोरणाला धरूनच होती व त्यामुळे ओसामा बिन लादेन संतापले व अमेरिकेचे कट्टर शत्रू बनले. त्यातूनच अल कायदा ही संघटना अस्तित्वात आली. आज अमेरिका या दोन्ही घटनांवरून नक्कीच पस्तावत असेल!
पण या आधी अमेरिकेने असेच इराणच्या शहालाही वार्‍यावर सोडले होते. इराणचे शहा अमेरिकेचे खंदे पुरस्कर्ते होते. शहांनी जी मनमानी इराणमध्ये केली ती कांहीं प्रमाणात तरी अमेरिकेच्या समर्थनाच्या बळावरच होती. पण या मनमानीमुळे त्यांची लोकप्रियता घटल्यावर अमेरिकेने त्यांच्याशी इतकी जेवढ्यास तेवढी वर्तणूक केली कीं त्याला तोडच नाहीं. एक तर त्यांना अमेरिकेने भरीव मदत केली नाहीं व त्याचा परिणाम म्हणून शेवटी त्यांना जेंव्हां देश सोदायला लागला तेंव्हां त्यांना अमेरिकेने राजनैतिक आश्रयही दिला नाहीं कारण अमेरिकेच्या मुत्साद्द्यांना इराणच्या सरकारने ओलीस म्हणून धरून ठेवले होते. एके काळचा अमेरिकेचा खंदा पुरस्कर्ता असलेल्या आणि मयूर सिंहासनावर बसणार्‍या या सम्राटाने शेवटी एकाद्या निर्वासितासारखा एका देशातून दुसर्‍या देशात फिरत-फिरत इजिप्तमध्ये देह ठेवला. त्यांना शेवटी कर्करोगाने गाठले होते.
असाच प्रसंग नंतर अमेरिकेने मार्कोस या फिलिपाइन्सच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांवरसुद्धा आणला. त्यांची सद्दी संपल्याबरोबर अमेरिकेने त्यांनाही आधी मनीलातून उचलून अमेरिकेला आणले. पण नंतर मात्र त्यांना एकाद्या चिरगुटासारखे फेकून दिले व तेही असेच निर्वासितासारखे अमेरिकेत शहरा-शहरातून हिंडत शेवटी हवाई बेटावर कालवश झाले.
इंडोनेशियाच्या सुहार्तोंच्या बाबतीतही कांहींसे असेच झाले. साम्यवादाचे कट्टर विरोधक म्हणून एकेकाळी अमेरिकेच्या गळ्यातला ताईत असलेले हे लाडके राष्ट्राध्यक्ष त्याची सद्दी संपल्यावर अमेरिकेने वार्‍यावरच सोडले. फरक इतकाच कीं ते त्याच्या स्वतःच्या देशात लोकप्रिय होते आणि त्यांची शक्ती केवळ सिंहासनावर अवलंबून नव्हती. त्यामुळे ते जकार्तातच राहिले व वार्धक्याने दोन-एक वर्षांपूर्वी निवर्तले. पण अमेरिकेने त्यांनाही हवे तेंव्हा आणि हवे तितके समर्थन दिले नाहीं हे नक्कीच.
अमेरिकेच्या अवसानघातकी धोरणाचा फटका मुशर्रफ यांना व बेनझीरबाईंनाही बसला. एके काळी मुशर्रफना अमेरिकेने अस्पृश्यासारखेच वागविले . इतके कीं एका पत्रकार परिषदेत धाकल्या बुशसाहेबांना त्यांचे नांवही आठवले नाहीं.[१] पण ९/११च्या हल्ल्यानंतर मात्र ते रातो-रात War on terror मधले बुशसाहेबांचे लाडके मित्रच बनले! पण त्यांची उपयुक्तता संपल्याबरोबर त्यांच्यामागेही अमेरिकेने लोकशाही आणण्याचा तगादा लावला. त्यांच्यावर बेनझीर अक्षरशः लादली. पण तिची हत्त्या झाल्यावर जेंव्हां निवडणुकीत मुशर्रफ यांचे पानीपत झाले तेंव्हां मुशर्रफनाही वार्‍यावर सोडले. आता (सत्तेवरून हाकलल्या गेलेल्या पाकिस्तानच्या इतर प्रधानमंत्र्यांप्रमाणे (राष्ट्राध्यक्षांप्रमाणे) मुशर्रफसाहेब सध्या लंडनमध्ये स्वघोषित हद्दपारीची मजा लुटत आहेत.)
अगदी अलीकडील उदाहरण म्हणजे इजिप्तच्या मुबारक यांचे. अन्वर सादात यांच्या नेतृत्वाखाली इस्रायलला मान्यता देणारे इजिप्त हे मध्यपूर्वेतील पहिले राष्ट्र होते. सादात यांची हत्त्या झाल्यावर इजिप्तच्या 'योम कुपुर' युद्धात हवाई दलात खूप पराक्रम गाजविलेले आणि सुप्रसिद्ध फायटर पायलट असलेले मुबारक त्यांच्या जागी आले. आजवर इस्रायलशी मैत्रीचा करार केलेले व न लढणारेही इजिप्त हे पहिले राष्ट्र होते. अमेरिकेने आर्थिक व लष्करी मदतीचा इजिप्तमध्ये ओघ चालू ठेवला होता. पण मुबारक यांची लोकप्रियता घटल्याबरोबर अमेरिकेने त्यांनाही राजकीय सुधारणा करण्याचे बोधामृत पाजण्यास सुरुवात केली. नव्या राजवटीलाही अमेरिकेचा जो संदेश गेला त्यात पूर्वीचे सर्व करार (म्हणजे इस्रायल बरोबरचा मैत्रीचा करार) नव्या सरकारने बदलू नयेत अशी अटही घातली. आता तर मुबारकही गादीवरून दूर फेकले गेले.
सध्या अमेरिकेने तेच टुमणे बहारीनच्या राजांच्यामागे लावले आहे. येमेनमध्येही तेच होईल अशी लक्षणे दिसत आहेत. मग शेवटी अमेरिकेशी मैत्रीचा करार कोण करेल?
उत्तर आहे कीं गमतीने अमेरिकेचेच ५१वे व ५२वे राज्य समजण्यात येणारी इंग्लंड आणि इस्रायल हीच ती दोन राष्ट्रे होत!
मैत्रीचा हात पुढे करण्याच्या आधी या सर्व इतिहासाचा भारत सरकारने विचार करावा. मैत्री जरूर करावी पण अमेरिका हे राष्ट्र "न इनकी दोस्ती अच्छी ना इनकी दुष्मनी अच्छी" या वर्गात मोडते. तेंव्हा हस्तांदोलन जरूर करावे पण हस्तांदोलन करून हात मागे घेतल्यावर प्रत्येक वेळी आपली पाची बोटे जागेवर आहेत ना याची पक्की खात्री करून घ्यावी!
दोस्ती करावी पण डोळे उघडे ठेवून!
______________________
टीप:
[१] याबद्दल अधीक माहिती माझ्या "न्यूक्लियर डिसेप्शन" या पुस्तकाच्या संक्षिप्त केलेल्या मराठी अनुवादावर आधारित ई-सकाळवरील मालिकेत वाचायला मिळेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

वाळवंटी खेळ मांडियेला

चांगला लेख; आवडला. अमेरिका मित्रराष्ट्र म्हणून भारताने विचार करण्याप्रमाणेच अमेरिकन नागरिक आपल्या राष्ट्राचा कसा विचार करतात असा कधी तरी प्रश्न पडतो. अफगाणिस्तानातून फौजा हळू हळू बाहेर काढण्याच्या बातम्या/ वायदे सुरु असताना माझ्या एका सहकारणीच्या मुलाचे आणि जावयाचे पोस्टींग अफगाणिस्तानात याच महिन्यात झाले आणि तेथे दररोज उतरणार्‍या अमेरिकन सैन्याची संख्या वाढते आहे असे कळते. असो.

लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीत आलेल्या वाळवंटी खेळ मांडियेला या लेखाशी सुधीर काळेंचा लेख मिळताजुळता वाटला.

'वाळवंटी खेळ मांडियेला' हा लेख मी अद्याप वाचलेला नाहीं

प्रियालीताई,
'वाळवंटी खेळ मांडियेला' हा लेख मी अद्याप वाचलेला नाहीं. आज संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर नक्कीच वाचेन. (इंडोनेशियात आता उजाडते आहे.....)
जर माझ्या लेखातील विचारांचे त्या लेखातील विचारांशी साम्य असेल तर तो एक योगायोगच आहे.
___________
जकार्तावाले काळे

आपल्या प्रतिसादामुळे एरवी मी न वाचलेला छान लेख वाचायला मिळाला!

"वाळवंटी खेळ..." लेख वाचला. या लेखात जास्त करून इजिप्तचा इतिहास आहे तर माझ्या लेखात अमेरिकेने अनेक देशांशी केलेले 'खेळ' आहेत.
माझा लेख वाचताना त्या लेखाची आठवण होणे स्वाभाविक आहे (कारण मूळ मुद्दा तोच आहे), पण त्या पलीकडे फारसे साम्य मला तरी दिसले नाहीं.
पण आपल्या प्रतिसादामुळे एरवी मी न वाचलेला एक चांगला लेख वाचायला मिळाला. त्यासाठी आपले मनापासून आभार.
___________
जकार्तावाले काळे

गैरसमज नसावा

माझा लेख वाचताना त्या लेखाची आठवण होणे स्वाभाविक आहे (कारण मूळ मुद्दा तोच आहे), पण त्या पलीकडे फारसे साम्य मला तरी दिसले नाहीं.

हेच सांगायचे होते. तुम्ही त्या लेखातले मुद्दे उचलले वगैरे असे आडूनसुद्धा म्हणायचे नव्हते. गैरसमज नसावा.

मी लोकरंग पुरवणीतला हा लेख रविवारीच वाचला होता आणि त्यानंतर १-२ दिवसांतच आपला लेख वाचला. त्यामुळे वाचताना 'अरे हे काय असे होते आहे? रिपिट केल्यासारखे?' असा प्रश्न डोक्यात आला आणि लोकरंगातील तो लेखही सुधीर काळ्यांचाच नाही ना हे जाऊन चेक केले. :-)

पण आपल्या प्रतिसादामुळे एरवी मी न वाचलेला एक चांगला लेख वाचायला मिळाला. त्यासाठी आपले मनापासून आभार.

धन्यवाद. मलाही दोन्ही लेख आवडले.

गैरसमज अजीबात नाहीं! धन्यवाद....

गैरसमज अजीबात नाहीं! धन्यवाद....
___________
जकार्तावाले काळे

धन्यवाद

चांगली माहिती.
सहमत.

राष्ट्रातील मैत्री

दोन राष्ट्रात मैत्री असू शकते का? (मैत्रीत आपला नजिकचा स्वार्थ नसताना मदत करण्याची वृत्ती असते.)
दोन व्यक्तित जेव्हा जवळचे संबंध असतात तेव्हा त्याची दोन रूपे असतात एक तर मैत्री नाहीतर दुष्मनी. (भावाभावात बंधुभाव आणि भाऊबंदकी). या उलट ज्यांचे संबंध कमी असतात त्यांच्यासाठी ते कामापुरते, लेन-देन चे (विन -विन) वा आपापल्या फायद्यापुरते असतात. अशा संबंधात मैत्री नसते तर ती वारंवार केलेली तडजोड असते. परिस्थितीनुसार केलेली हातमिळवणी असते.

राष्ट्रा-राष्ट्रात नेहमीचे मैत्रीचे संबंध (राजकीय) असू शकतात का? का ते केवळ तडजोडीचे संबंध असतात? माझ्या मते मैत्री असू शकते. पण ती लोकांच्या पातळीवर जास्त असावी लागते तेव्हा तिची परिणीति राजकीय मैत्रीत (दुष्मनीतही) होऊ शकते. भारताची अशी मैत्री (खरेतर दुष्मनी) ही उपखंडातील राष्ट्रांमधे होऊ शकते. वा अमेरिकेची इंग्लंडशी (थोड्या प्रमाणात इस्राईल शी) वा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा वगैरे.

याशिवाय राष्ट्र आणि व्यक्ति (अमेरिका-लादेन, अमेरिका-इराणचा शाह) यांची मैत्री असणे तर याहून दुरापास्त वाटते.

तुम्ही जो प्रश्न अमेरिका म्हणून विचारला तो प्रश्न भारत म्हणून विचारला तर याहून वेगळे उत्तर येणार नाही असे वाटते. (अगदी जवळचे उदाहरण घ्यायचे झाले तर सुकार्णो पदच्युत झाल्यानंतर भारताने त्यांच्याबद्दलच्या मैत्रीचे काय केले? )

खरा प्रश्न आज आपल्याला अमेरिकन मैत्रीचा (हा शब्द तात्कालिक अर्थाने वापरला आहे.) काही फायदा आहे का? अमेरिकेला तो आहे तसाच भारताला आहे हे असे पर्यंत ही मैत्री टिकणार. त्यात विश्वासार्हता कवडीमोलाची आहे.

मैत्री जरूर करावी पण अमेरिका हे राष्ट्र "न इनकी दोस्ती अच्छी ना इनकी दुष्मनी अच्छी" या वर्गात मोडते. तेंव्हा हस्तांदोलन जरूर करावे पण हस्तांदोलन करून हात मागे घेतल्यावर प्रत्येक वेळी आपली पाची बोटे जागेवर आहेत ना याची पक्की खात्री करून घ्यावी!
दोस्ती करावी पण डोळे उघडे ठेवून!

या मुद्याशी पूर्णपणे सहमत.

प्रमोद

सुकार्नो हे भारताच्या आधाराने इंडोनेशियाचे अध्यक्ष झाले नव्हते

सुकार्नो हे भारताच्या आधाराने इंडोनेशियाचे अध्यक्ष झाले नव्हते त्यामुळे ही तूलना इथे लागू होत नाहीं.
पण बरेचसे लष्करशहा अमेरिकेच्या मदतीवरच जिवंत होते आणि अमेरिकेला मदत करत होते. अशांच्या बाबतीतच कामापुरता मामा असे म्हणता येईल.
___________
जकार्तावाले काळे

सुकार्नो -पटनाईक-नेहरु

तुमचे म्हणणे फक्त टेक्निकली बरोबर आहे. बिजू पटनाईक यांनी इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष मदत केली होती. त्यावेळी ते नेहरुंचे सहकारी म्हणून वावरले. यासाठी त्यांना इंडोनेशियन सरकारने त्यांचा सर्वोच्च पुरस्कार 'भुमीपुत्र' ही दिला.
हा दुवा बघता येईल.

नेमके कुठले राष्ट्रप्रमुख अमेरिकेच्या प्रत्यक्ष सहभागाने आले? (अप्रत्यक्ष सहभाग हा तुम्ही बाद ठरवता आहात म्हणून ही विचारणा). पटकन आठवतील अशी नावे आढळली नाहीत.

प्रमोद

त्यांना सत्तेवर बसून रहाण्यासाठी कुणीही मदत केली नाहीं

मी कोण कुणामुळे सत्तेवर आला याबद्दल बोलत नव्हतो तर सत्तेवर आलेल्या सत्ताधीशाला खुर्चीवर वर्षांनुवर्षे बसण्यात मदत केलेल्यांबद्द॑ल मी बोलत होतो व त्यात मुबारक, मुशर्रफ, झिया, मार्कोस, सुहार्तो, शहा वगैरे जवळ-जवळ सगळेच हुकूमशाह येतात.
सुकार्नो हे नेहरूसारखे इंडोनेशियन जनतेच्या गळ्यातले ताईत होते व त्यांना सत्तेवर बसून रहाण्यासाठी कुणीही मदत केली नाहीं
___________
जकार्तावाले काळे

राष्ट्राला

राष्ट्राला कोणीच नेहमीचा मित्र व नेहमीचा शत्रु नसतो (कोणी सांगावे उद्या पाकिस्तान कोलमडून पडेल व आपण एक होऊ - जर्मनीचे झाले तसे). आपल्या राष्ट्राचे हित कशात आहे त्यावरुन आपण ठरवायचे कोणते राष्ट्र वैचारिक दृष्टिने आपल्याला जेवळचे आहे. परराष्ट्र धोरण व नेहमीच्या माणसातल्या मैत्रीची रुपरेशा वेगळी असावी.

आपला लेख (नेहमी प्रमाणेच) आवडला. विचार प्रवर्तक आहे.

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

चांगला लेख.

माहितीपूर्ण, आणि पटण्याजोगा.

शंका- अमेरिकेची पाकिस्तानला पुन्हा वार्‍यावर सोडण्याची ही कृती तशी त्यांच्या नेहमीच्या "कामापुरता मामा" या धोरणाला धरूनच होती व त्यामुळे ओसामा बिन लादेन संतापले व अमेरिकेचे कट्टर शत्रू बनले.

अमेरिका-ओसामा संबंध बिघडण्यामागे हे (आणि इतकेच) कारण आहे का? बहुधा नसावे, असे वाटते.

माझ्या वाचनानुसार हेच महत्वाचे कारण होते.

माझ्या वाचनानुसार हेच महत्वाचे कारण होते. इतर कारणे असतील पण हे महत्वाचे कारण मानले जाते.
___________
जकार्तावाले काळे

वाचनीय लेख

अमेरिकेच्या परराष्ट्रधोरण भारताच्या परराष्ट्र खात्यालाही समजत असेलच की. पण संबंध ठेवायचे म्हणजे देवाणघेवाण आली. ही देवाणघेवाण करताना आपली झोळी भलतीच रिकामी राहू नये याची खात्री करणे स्वाभाविक आहे. उद्या साम्यवादी पक्षाच्या हाती बहुमताने सत्त्ता आली तरीही भारताचे अमेरिका आणि पाकिस्तानशी असलेले संबंध फार बदलणार नाहीत.

अमेरिकेच्या बदलत्या धोरणाचा आढावा घेताना जुनी उदाहरणे दिली आहेत. त्यांचा उपयोग सावध राहण्यासाठी होऊ शकतो. परंतु निर्णय घ्यावेच लागतात अशा वेळी सद्य परिस्थितीत अमेरिकेकडून आपला काय फायदा-तोटा होणार आहे हे लक्षात घेणे जास्त महत्त्वाचे आहे.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

शेवटची दोन वाक्ये "एक्झिक्यूटिव समरी"च आहेत

तुम्ही म्हणताय् तोच उद्देश होता! शेवटची दोन वाक्ये "executive summary"च आहेत व त्यातच सार्‍या लेखाचे सार एकवटले आहे! मैत्रीचा हात पुढे करण्याच्या आधी या सर्व इतिहासाचा भारत सरकारने विचार करावा. मैत्री जरूर करावी पण अमेरिका हे राष्ट्र "न इनकी दोस्ती अच्छी ना इनकी दुष्मनी अच्छी" या वर्गात मोडते. तेंव्हा हस्तांदोलन जरूर करावे पण हस्तांदोलन करून हात मागे घेतल्यावर प्रत्येक वेळी आपली पाची बोटे जागेवर आहेत ना याची पक्की खात्री करून घ्यावी!
दोस्ती करावी पण डोळे उघडे ठेवून!

___________
जकार्तावाले काळे

काल ’ई-सकाळ’वर माझ्या या लेखाची सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली

काल ’ई-सकाळ’वर माझ्या या लेखाची सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. त्यात 'उपक्रम'करांप्रमाणेच, 'मिसळपाव', 'मी मराठी' आणि 'मायबोली' येथील वाचकांनी मांडलेले मुद्दे वापरून ई-सकाळवरचा लेख कांहींसा 'सजवला'ही आहे. आता सकाळच्या व्यापक वाचकवर्गाच्या प्रतिक्रियांची वाट पहात आहे.
(http://www.esakal.com/esakal/20110301/5186804575064434366.htm)
धन्यवाद.
___________
जकार्तावाले काळे

ही पद्धत रुढ व्ह्यायला हवी.

अभिनंदन!

आधी आपला लेख चर्चा-संकेत स्थळांवर प्रकाशित करून त्याबाबतची मतं जाणून त्या लेखात योग्य ती सुधारणा करून मग तो वृत्तपत्रांना द्यावा, ही अशी पद्धत रुढ व्ह्यायला हवी. असे होण्याने त्या लेखाचा दर्जा त्याच्या मुळ स्वरूपापेक्शा नक्कीच सुधारू शकतो.

धन्यवाद

धन्यवाद!
___________
जकार्तावाले काळे

 
^ वर