वारंवार आणि अवेळी ’गुदमरणारा' दक्षिण आफ्रिकेचा संघ

वारंवार आणि अवेळी ’गुदमरण्या’साठी प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ
क्रिकेट विश्वचषक स्पर्धा १९९९-उपांत्य फेरीचा सामना (एकदिवसीय सामना क्र. १४८३)
स्थानः बर्मिंगहॅममधील ’एजबॅस्टन’ मैदान
बरोबरीत सुटलेला पहिला कसोटी सामना होता रिची बेनो आणि फ्रँक वॉरेल यांच्या संघातला. डिसेंबर १९६० साली ऑस्ट्रेलियात हा सामना खेळला गेला तेंव्हां मी पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत (COEP) होतो आणि हॉस्टेलमध्ये रहात होतो. सगळे विद्यार्थी रेडियोच्या भोवती गर्दी करून बसलेले. अगदी चिकटून बसलेल्यांनाच कांहीं तरी ऐकू यायचे. रेडियो "बाबा आदम"च्या काळातला होता आणि प्रक्षेपणही Short Wave वर असल्यामुळे स्टेशन अस्थिर होते आणि सारखे जात-येत होते. त्यात सामना संपला तेंव्हां कॉमेंट्री सांगणाराच इतका उत्तेजित होऊन ओरडत होता कीं तो काय बोलत होता तेही समजत नव्हते. चित्रवाणी भारतात तरी अजून यायची होती. थोडा आरडा-ओरडा ओसरल्यावर कळले कीं सामना बरोबरीत सुटला आहे. असं होऊ शकतं? कुणाचा विश्वासच बसेना, कारण बरोबरीत संपलेला हा पहिलाच कसोटी सामना होता. (असाच आणखी एक कसोटी सामना नंतरच्या काळात बरोबरीने सुटला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला हा सामना चेन्नाईच्या चेपॉक मैदानावर १८ ते २२ सप्टेंबर १९८६ दरम्यान खेळला गेला होता.)
१९९९ साली एकदिवशीय विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना झाला तोपर्यंत सामने चित्रवाणीवर पहाण्याची सोय झाली होती. त्यांचे चलच्चित्रणही खूप सुधारले होते. त्यामुळे बरोबरीत सुटलेल्या या उपांत्य फेरीच्या सामन्याच्याबाबतीत मात्र काय झाले ते सामना संपता क्षणी कळले होते! तरी पण बरोबरीत सुटलेल्या सामन्यानंतरची अविश्वासाची भावना मात्र तशीच (जुनीच) होती.[१]
या सामन्यातही यशाचे पारडे सारखे एका बाजूकडून दुसर्‍या बाजूकडे झुकत होते! दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया फक्त २१३ धावाच करू शकली होती आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांच्या २१३ ची धावसंख्या ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता. आधी खूप मागे राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला क्लुसेनरने १६ चेंडूत ३१ धावा करून विजयाच्या उंबरठ्यावर आणून उभे केले होते.
शेवटच्या षटकातले चार चेंडू झाले होते, दोन उरले होते आणि दक्षिण आफ्रिकेची शेवटची जोडी खेळत होती. दक्षिण आफ्रिकेला या दोन चेंडूत एक धाव हवीच होती, बरोबरी चालणार नव्हती कारण त्या आधीच्या Super-Six मधील ऑस्ट्रेलियाच्या सरस प्रदर्शनामुळे बरोबरी झाल्यास ऑस्ट्रेलियाला पुढे चाल मिळाली असती. या उलट ऑस्ट्रेलियाला बरोबरीही चालणार होती. म्हणजे त्या दोन चेंडूत एकही धाव दक्षिण आफ्रिकेला काढू द्यायची नव्हती.
सामन्याचे प्रमुख आकडे
ऑस्ट्रेलिया
फलंदाज धावा/चेंडू/धावगती

गिलख्रिस्ट २०/३९/५१
मार्क वॉ ०/४/०
पाँटिंग ३७/४८/७७
लेमन १/४/२५
स्टीव वॉ ५६/७६/७४
बेव्हन ६५/१०१/६४
टिम मूडी ०/३०
शेन वॉर्न १८/२४/७५
रायफेल ०/२/०
फ्लेमिंग ०/२//०
मॅग्रा ०/१/० (नाबाद )
इतर १६
एकूण २१३
६८ धावांवर ४ बळी पडल्यानंतर बेव्हन आणि स्टीव वॉने ९० धावांची भागीदारी केली पण १५८ वर स्टीव वॉ आणि पाठोपाठ मूडी बाद झाले. बेव्हनने एकाकी किल्ला लढवला व तो शेवटी दहावा बाद झाला.
गोलंदाजी: शॉन पोलॉकने ३६ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले तर अ‍ॅलन डोनाल्डने ४ बळी घेतले.
दक्षिण आफ्रिका
फलंदाज धावा/चेंडू/धावगती
कर्स्टन १८/४२/४३
गिब्ब्ज ३०/३६/८३
कलिनन ६/३०/२०
क्रोन्ये ०/२/०
कॅलिस ५३/९२/५८
र्‍होड्स ४३/५५/७८
पोलॉक २०/१४/१४२
क्लुसेनर ३१/१६/१९३ (नाबाद)
बाउचर ५/१०/५०
एल्सवर्थ १/१/१००
डोनाल्ड ०/०/-
इतर ६
एकूण २१३
गोलंदाजी: वॉर्नने चार बळी घेतले, मॅग्रा, फ्लेमिंग आणि रायफेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला तर ३ खेळाडू धावबाद झाले.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची सुरुवात बरी होती. ४८ धावांच्या सुरुवातीनंतर मात्र ६१ धावा होईपर्यंत त्यांचे चार फलंदाज-कर्स्टन, गिब्ब्ज, कलिनन आणि कप्तान क्रोन्ये-बाद झाले होते. त्यानंतर कॅलिस आणि जाँटी र्‍होड्स यांनी डाव सावरला. र्‍होड्स १४५ वर तर कॅलिस १७५ वर बाद झाला. त्यानंतर मात्र एकट्या क्लुसेनरने किल्ला लढवत पोलॉक, बाऊचर यांच्या बरोबर भरभर धावा काढत २१३ पर्यंत धावसंख्या आणली. दोन चेंडूत एक धाव हवी असताना पाचव्या चेंडूवर क्लुसेनरने मारलेल्या फटक्यावर एक अशक्य धाव घेण्याचा कांहींसा अनावश्यक प्रयत्न करताना अ‍ॅलन डोनाल्ड धावबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत जायचा मार्ग मोकळा केला.
सामना बरोबरीत संपल्याचे सगळ्यात जास्त आश्चर्य ऑस्ट्रेलियन खेळाडूंना झाले होते. त्यांचे खेळाडू मिड ऑन आणि मिड विकेटच्या भागात एकमेकांना विळखा घालून आपला आनंद साजरा करत होते. तो सामना जवळ-जवळ जिंकत आणलेल्या क्लुसेनरच्या चेहर्‍यावर राग, आश्चर्य आणि निराशा या सर्व भावनांचे मिश्रण दिसत होते आणि डोनाल्डच्या चेहेर्‍यावर तर "पृथ्वी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर किती बरे होईल" असे भाव दिसत होते.
अ‍ॅलन डोनाल्ड आजही म्हणतो तो कधी-कधी रात्री दचकून उठतो आणि असा मूर्खपणा आपल्या हातून कसा झाला याबद्दल हळहळ करत रहातो.
२४ चेंडूत १८ धावा करणारा आणि चार बळी घेणारा शेन वॉर्न सामनावीर निवडला गेला. ऑस्ट्रेलियाने पुढे पाकिस्तानला ८ विकेट्सने सहज हरवून विश्वचषक जिंकला.
[१] एकदिवशीय विश्वचषक स्पर्धेत बरोबरीत सुटलेला हा दुसरा सामना होता! त्या आधी १९९१ डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 'वा़का' मैदानावर भारत आणि वेस्ट इंडीजमधला बरोबरीत संपलेला सामना विश्वचषक स्पर्धेतला पहिला होता आणि त्यानंतर ३ मार्च २००३ चा श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका (या सामन्यात हिशोब करण्याची चूक केल्यामुळे पोलॉकला कप्तानपदावरून दूर करण्यात आले होते) आणि १५ मार्च २००७ चा वेस्ट इंडीजमध्ये आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे यांच्यातला बरोबरीत सुटलेला सामना चौथा असा सामना होता!
ऋणनिर्देश: माझे सहकारी श्री. नाफडे यांचे आकडे आणि इतर माहितीबद्दल आभार

लेखनविषय: दुवे:

Comments

चोकर्स

दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे आयत्या वेळी होणारे पतन पाहून नवल वाटते. दडपणाचा सामना करता न येणे हे यामागचे कारण असावे काय? (सेक्सप्रमाणे) क्रिकेट हाही 'माईंडगेम' आहे हे अशावेळी पटते.

सन्जोप राव
ऑल प्रतिसाद आर इक्वल, बट सम प्रतिसाद आर मोर इक्वल दॅन अदर्स.

+१

गावसकर म्हणतात त्यानुसार "क्रिकेट हा दोन कानांच्या मध्ये खेळण्याचा खेळ आहे."

नितिन थत्ते

ही व्याख्या नव्याने कळली!

हाहाहा!
ही व्याख्या नव्याने कळली! धन्यवाद.....
___________
जकार्तावाले काळे

 
^ वर