झापड,झडप,झोप इ.

नजीकच्या एका चर्चाप्रस्तावाच्या प्रतिसादांत 'वॉल्व्' या इंग्लिश् शब्दासाठी 'झापड','झापडद्वार' असे शब्द वापरलेले पाहिले. तिथेच प्रतिसाद टाकला होता,पण पाठवताना तांत्रिक चूक झाल्यामुळे म्हणा अथवा अवांतर वाटल्यामुळे संपादित झाल्या कारणाने म्हणा तो उमटला नाही. म्हणून वेगळा प्रस्ताव टाकीत आहे.
सध्या 'झापड' अथवा 'झापडद्वार' या शब्दांऐवजी 'झडप' हा शब्द अधिक वापरला जातो.शब्दकोश पाहिलेले नाहीत तेव्हा अमुकच शब्द बरोबर असा दावा नाही. पण वाचताना हे दोन शब्द खटकले एव्हढे निश्चित.घोड्याच्या डोळ्यांना बांधली जातात त्याला सर्वसाधारणपणे झापडे म्हणतात.अर्थात घोड्याचा दृष्टिप्रवाह उलट्या बाजूला वळू नये म्हणून ती बांधली जातात म्हणजे इथेही झडप शब्दाशी कार्य आणि अर्थसाधर्म्य आहेच. 'डुलकी लागली ' किंवा झोप आली या अर्थानेही 'डोळ्यांवर झापड आली' असा शब्दप्रयोग होतो. इथे 'दृष्टी सीमित अथवा धूसर झाली' असाही मूळ अर्थ असणे शक्य आहे.'झोप' आणि 'झापड' यांच्यातले ध्वनिसाधर्म्य लक्षात घेण्यासारखे आहे. झोप हा शब्द संस्कृत 'स्वप्'वरून आला असावा. झडप हे एक विशिष्ट प्रकारचे झाकणच. 'झाकण' या शब्दासाठी 'ढाकण','ढापण' असे शब्द बोलीभाषांतून आढळतात.घोड्याच्या झापडांना 'ढापण' किंवा 'ढापण्या' असेही म्हटले जाते.'ढापण्या' हा शब्द 'चष्मा' या शब्दासाठीही कुत्सितार्थाने वापरला जातो. कित्येक वेळा तर लाफा,थप्पड,या अर्थीसुद्धा झापड शब्द वापरलेला ऐकला आहे पण तेव्हा त्या शब्दाचा उच्चार 'झ्यापड'(हिंदीतला नुक्ताविरहित 'झ', 'झलक' मधला) असा केलेला होता. 'झडप' या शब्दाचा 'झडप घालणे' या वाक्प्रचारातल्या अर्थाप्रमाणेही उपयोग होतो.
'झडप' हा शब्द 'झापड' वरूनच आला असावा का किंवा वाइसे वर्सा?

लेखनविषय: दुवे:

Comments

शब्द

>>नजीकच्या एका चर्चाप्रस्तावाच्या प्रतिसादांत 'वॉल्व्' या इंग्लिश् शब्दासाठी 'झापड','झापडद्वार' असे शब्द वापरलेले पाहिले.

तो शब्द वॉल्व साठी नसून लूवर साठी होता असे वाटते. बाकी चालू द्या.

नितिन थत्ते

कुतूहल आहे

मलाही कुतूहल आहे.

(त्या चर्चाप्रसंगात "शटर*" साठी प्रतिशब्द हवा होता, "व्हॅल्व्ह"/"व्हॉल्व्ह" साठी नव्हे. "व्हॅल्व्ह"करिता मी बहुधा "वाल" हा सायकल चालवायला शिकताना कळलेला शब्द वापरला असता. "शटर" = व्युत्पत्तीजन्य अर्थ "बंद करणारा" ही साधारणपणे एक छोटी फळी, किंवा अनेक फळ्या-पट्ट्यांची रांग असते. बिजागरीसारख्या कुठल्या पद्धतीने छिद्रावर बसवलेली असते. फळ्या-पट्ट्या उघडून-झापून छिद्राची उघडबंद करता येते.)

*हे लूव्हरचे शटर होते, बरोबर.

शटर

शटर, ब्लाइंड्स वगैरेसाठी प्रतिशब्द वापरले आहेत. वॉल्वसाठी नाहीत हे वरील प्रतिसादांत आलेले आहेच.

पण पाठवताना तांत्रिक चूक झाल्यामुळे म्हणा अथवा अवांतर वाटल्यामुळे संपादित झाल्या कारणाने म्हणा तो उमटला नाही. म्हणून वेगळा प्रस्ताव टाकीत आहे.

तो प्रतिसाद तेथेच आहे. त्याला आलेले उपप्रतिसादही तेथेच आहेत. पान दोनवर दिसून येतात/ येतील.

होय.

होय . तो आणि त्यावरचे प्रतिसाद आता पाहिले. प्रतिसाद लिहिता लिहिता ते पान अदृश्य(एक्स्पायर्)झाल्यामुळे प्रतिसाद पुन्हा सुपूर्त करेपर्यंत मधे खूप प्रतिसाद आले .माझ्या प्रतिसादाचा क्रमांक खाली गेला. तेव्ह्ढ्या खोलवर स्क्रोल करण्याचे लक्षात आले नाही. आळशीपणा आणि निष्काळजीपणाबद्दल क्षमस्व. पुनरावृत्ती होत असल्याने हा प्रस्ताव उडवून लावावा अशी सं.मं. स विनंती.

 
^ वर