पृथ्वीच एखाद्या मोठ्या ग्रहाचे उपग्रह असल्यास....

पृथ्वी: एक उपग्रह
या पूर्वीच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राविषयी काही तरी लिहून कल्पनाविलासात रमण्याऐवजी 'अवतार' या अलीकडे भरपूर गाजलेल्या इंग्रजी चित्रपटात दाखविल्याप्रमाणे पांडोरासारखा, जीवश्रृष्टी असलेली पृथ्वीसुद्धा एखाद्या मोठ्या ग्रहाचा उपग्रह असता तर काय स्थिती झाली असती? नेप्च्यून या ग्रहाचा एखादा काल्पनिक क्लोन - नेप्च्यून 2 - सौरमालेत फिरत असून आपली पृथ्वी या ग्रहाभोवती फिरत असल्यास काय होऊ शकेल याचा अंदाज करणे मनोरंजक ठरेल. (मुळात नेप्च्यून 2 या ग्रहाच्या अस्तित्वामुळे सौरमालिकेवर काय परिणाम होतील, हा एक वेगळाच चर्चेचा विषय असेल.)

पृथ्वीवरील जैविकस्थिती व त्यासाठीचे तापमान हवे असल्यास ही जोडी - हा काल्पनिक नेप्च्यून 2 व त्याचा उपग्रह पृथ्वी - सूर्यापासून पृथ्वी ज्या अंतरावर आहे (1.476x10^8कि.मी) त्याच अंतरावरून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणे अनिवार्य ठरेल. नेप्च्यून 2 व पृथ्वीचा अक्ष सौरमालिकेच्या प्रतलास (plane) लंबकोन करून परिवलन करावे लागेल. सुरुवातीच्या काही कोटी कोटी वर्षानंतर पृथ्वी परिभ्रमण कक्षाशी synchronise होत नेप्च्यून 2 ग्रहाकडे आपली एक बाजू दाखवत स्थिर होईल. या ग्रहाच्या मध्यापासून पृथ्वीचा भ्रमणकक्ष 300000 कि.मी अंतरावर असल्यास परिभ्रमणास लागणार्‍या अवधीच्या दिवसात 100 तास असतील. पृथ्वीवरून नेप्च्यून 2 चे दृश्य अत्यंत प्रेक्षणीय, आकाशाच्या 9 अंश व्यापणारा व आपल्या येथील चंद्रापेक्षा 18 पटीने कोनीय आकार असलेला असा दिसेल.

तुम्ही जर नेप्च्यून 2 च्या समोर दिसणार्‍या प्रदेशात राहत असल्यास हा ग्रह तुमच्या डोक्यावर दिसू लागेल. सूर्योदयाच्या वेळी याचा अर्धा भाग उजळून निघेल. दुपारच्या दोन वाजेपर्यंत याची (चंद्र)कोर होत होत सूर्याला पूर्णपणे झाकून टाकेल व काळसर निळ्या आकाशात या वेळी तारे चमकू लागतील. रात्र सरता सरता नेप्च्यून 2 चा (चंद्र)कोर हळू हळू वाढत जात रात्री 12 वाजता नेप्च्यून 2 दिसू लागेल व त्याचे तेज आपण पाहत असलेल्या चंद्राच्या तेजापेक्षा 2800 पट जास्त असेल. या बाजूची मध्यरात्रसुद्धा मध्यान्हापेक्षा जास्त प्रखर असेल. कोमिन्सच्या मते दिवसाचे दोन कालावधी असतील. नेप्च्यून 2 च्या विरुद्ध बाजूला (कुणी राहत असल्यास!) राहणार्‍या प्राण्यांचे जैविक घड्याळ वेगळे असेल.

दिवस व रात्रीच्या या भल्या मोठ्या कालावधीमुळे पृथ्वीच्या तापमानातही फरक पडेल. आपण आता अनुभवत असलेल्या तापमानापेक्षा दुपटीने तापमानात चढ उतार होत राहतील. त्यानुसार प्राणीवंशाला उत्क्रांत व्हावे लागेल. नेप्च्यून 2 चे गुरुत्व एखाद्या चुंबकाप्रमाणे अवकाशातील धूमकेतू व उल्का यांना आकर्षित करेल. यांच्या सततच्या मार्‍यामुळे पृथ्वी कायमच संकटात असेल. नेप्च्यून 2 अवकाशातील धूळीकणांनासुद्धा आकर्षित करत असल्यामुळेसुद्धा पृथ्वीला धोका निर्माण होईल.

पृथ्वीच्या स्थितीगतीत बदल
पृथ्वीला दोन उपग्रहाची व्यवस्था करणे किंवा पृथ्वीच एक उपग्रह असे समजून सूर्याऐवजी एखाद्या काल्पनिक ग्रहाभोवती फिरावयास लावणे यांच्यापेक्षा पृथ्वीच्याच स्थितीगतीत काही बदल केल्यास काय होऊ शकेल? उदाहरणार्थ, पृथ्वीच्या कवचाची जाडी दुप्पट केल्यास काय होईल? आताच्या पृथ्वीच्या पृष्ठभागाची जाडी भूप्रदेशात 40 कि.मी व सागरीय भागात 7 कि.मी एवढी आहे. ही सरासरी जाडी 100 कि.मी झाल्यास काय होऊ शकेल? पृथ्वीच्या नवनिर्मितीच्या काळात, जेव्हा पृथ्वीवर पाणी नव्हते तेव्हा अशी स्थिती होती. बर्फाळ धूमकेतू व अशनींनी आपल्या पृथ्वीवर पाणी आणून ओतले. या पाण्यामुळे पृथ्वीचे कवच, प्रावरण व एकूण शिलावरण लवचिक होत गेले. या लवचिकतेमुळे पृथ्वीच्या गर्भातून वर उसळणार्‍या तप्त लावारसाच्या blobs ना अटकाव करणे शक्य झाले. शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीकवचाचे चलनवलन सुरक्षित होण्यासाठी पाणी वंगणासारखे (lubricant) काम करते.

बर्फाळ धूमकेतू पृथ्वीवर उशिरा पोचले असते तर पृथ्वीचे कवच आणखी टणक झाले असते. कारण पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडणार्‍या शिलारसाचे गोळे पृष्ठभागावरील शिलावरणाच्या खाली साठत गेले असते. काही लाख वर्षानंतर यामुळे उष्णतेत वाढ होत गेली असती. व वाढलेल्या उष्णतेमुळे शिलावरणाला कुठेतरी तडा गेला असता व ते वितळले असते. ही उष्णता बाहेर फेकली गेली असती. यामुळे पुन्हा एकदा कवचाच्या जाडीत वाढ झाली असती. अशा प्रकारे काही लाख वर्षे वितळण्याचे, घट्ट होण्याचे व पुन्हा वितळण्याचे चक्र अव्याहतपणे चालूच राहिले असते. या प्रक्रियेत काही विषारी वायूसुद्धा बाहेर पडून पृथ्वीवरील दृश्य स्वरूपात फार मोठा बदल झाला असता. गुरू ग्रहावरील पृष्ठभागाप्रमाणे आपल्या पृथ्वीवरील हजारो - लाखो चौ. कि.मीचा प्रदेश वसतीयोग्य राहिली नसती. गुरूग्रहावर, पृथ्वीतील गर्भात असल्याप्रमाणे टेक्टॉनिक प्लेट्स नसल्यामुळे, तिचा पृष्ठभाग काही काळ वितळतो व आणखी काही काळात घट्ट होत असतो. म्हणूनच गुरूग्रहाच्या पृष्ठभागावर आपल्याला एकही खड्डा दिसत नाही. वसतीयोग्य प्रदेशात राहणार्‍यांना आपल्या पायाखालची जमीन केव्हाही सरकण्याची शक्यता आहे याची धास्ती असल्यास तेथे वसती असणार नाही. पूर्ण पृष्ठभागाचा अंदाजच येत नसल्यास संपूर्ण प्राणीजात निर्वंश होईल.

पृश्वीचे फिरण्याचे थांबणे
पुन्हा एकदा आपण वेल्सच्या कथेतील पृथ्वीलाच फिरण्यापासून थांबविण्याच्या स्थितीचा विचार केल्यास काय होईल? पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेल्या सर्वच्या सर्व वस्तू प्रती ताशी 1667 किं. मी वेगाने अवकाशात फेकल्या जातील. (पृ्थ्वीचा विषुववृत्तापाशी फिरण्याचा वेग प्रती ताशी1667 कि. मी आहे.) पृष्ठभागाला समांतर रेषेत दूर फेकल्या जाणार्‍या या वस्तूंना पकडून ठेवू शकणारे बळच नसल्यामुळे पृथ्वीवरील इमारती, झाडे - झुडपे, उन्मळून पडू लागतील, जमीनदोस्त होतील. माणसांसकट सर्व प्राणी पृथ्वीपासून 11 कि.मी उंच उडतील व ताशी 1000 कि.मी वेगाने खाली येऊन आपटतील. समुद्राचे पाणी भूप्रदेशावर पसरेल. अशा संकटामुळे एकही प्राणी जिवंत राहू शकणार नाही.

पृथ्वीचे फिरणे काही क्षणात थांबण्याऐवजी 20-30 वर्षाचा काळ लागत असल्यास त्याचा फार मोठा परिणाम महासागरावर होईल. पृथ्वी भ्रमणाच्या केंद्रोत्सारक (centrifugal) परिणामामुळे घनस्वरूपातील या पृथ्वीला विषुववृत्तापाशी फुगवटा आहे. त्यामुळे विषुववृत्ताच्या जवळील महासागरांनासुद्धा 8 कि.मी उंचीचा फुगवटा आपोआपच मिळाला आहे. पृथ्वीने फिरणे थांबविल्यास विषुववृत्तापाशी साठलेले पाणी दोन्ही धृवाकडे सरकू लागेल. कारण पृष्ठभागाचे गुरुत्व पृथ्वीच्या मध्यापेक्षा धृवप्रदेशापाशी तुलनेने जास्त आहे. (g increases from 9.780 m·s−2 at the equator to 9.832 m·s−2 at the poles.) खरे पाहता पृथ्वीचा कोनीय संवेग अर्ध्यावर आल्यावरसुद्धा महासागराचे दोन भाग होतील. दक्षिण व उत्तर धृवापासून 30 अंशावर महासागरांचा किनारा दिसू लागेल. या दोन्ही किनार्‍यामधल्या भागात भूप्रदेश तयार होतील व त्या भूप्रदेशात अधेमधे 10 कि.मी उंच असलेले पर्वतं तयार होतील. उत्तरेतील महासागर कॅनडा, युरोप व रशिया या देशांच्या भूप्रदेशाला गिळून टाकेल.

या परिस्थितीत माणसं जिवंत राहतील का याबद्दल शंका आहेत. कृषीयोग्य जमीन कमी कमी होत जाईल. विषुववृत्ताजवळील प्रदेशात वातावरण व हवामानातील बदलामुळे माणूस प्राणी तेथे जिवंत राहण्याची शक्यता कमी असेल. उरलेल्या मानवजातीची दोन गटात विभागणी होऊन एक गट उत्तरेच्या सागरी किनार्‍याजवळील व दुसरा गट दक्षिणेच्या सागरी किनार्‍याजवळील भूप्रदेशात राहू लागतील. या दोन्हीमधील भला मोठा भूप्रदेश निर्मनुष्य असेल. सहा-सहा महिन्याचे उन्हाळा व हिवाळा असतील. उन्हाळ्यात लाही लाही करणारे ऊन व हिवाळ्यात गोठवून टाकणारी थंडी असेल. सूर्योदयाला सुरू होणारा उन्हाळा सूर्यास्तानंतर हिवाळा आणू शकेल. कदाचित उन्हाळा व हिवाळ्याच्या सीमारेषेवर प्राणीजात स्थलांतरित होत राहतील व या वातावरणाशी जुळवूनही घेईल.

पृथ्वीचे अशा प्रकारे 20-30 वर्षात वा क्षणभरात फिरण्याचे थांबणे वास्तवात कधीच शक्य होणार नाही. तरीसुद्धा पृथ्वीच्या परिवलनाचा वेग हळू हळी कमी होत आहे, हे मात्र आपण नाकारू शकत नाही. लाखो-करोडो वर्षानंतर पृथ्वीचा दिवस वर्षाएवढा होईलही. त्यापूर्वी किती extinction होतील याचे आपण कल्पनाही करू शकणार नाही, हे मात्र निश्चित! कदाचित यासाठी वेल्सच्या टाइम मशीनमधून भविष्यात प्रवास करून परत यावे लागेल!

संदर्भ
New Scientist 22 Jan 2011 (page 38-41)

लेखनविषय: दुवे:

Comments

काकूला मीशा असत्या तर ....

तीला काका म्हटले असते............ लहान पणी ऐकलेला एक वाक्यप्रचार आठवला :)

 
^ वर