स्मार्ट होम.
चित्रा ह्यांनी 'अमेरिकन घरे' व 'हिवाळ्यात घरांची निगा कशी राखणार' हे लेख लिहिले आहेत त्यातूनच घरांशी निगडीत असा हा लेख लिहिण्याचा प्रयत्न.
स्मार्ट होम मध्ये घरातील सर्व/बहुतांशी उपकरणे मध्यवर्ती नियमन प्रणालीस जोडलेली असतात, हि प्रणाली वापरण्यासाठी संगणक अथवा तत्सम डिसप्लेतंत्र उपलब्ध असते. हे काम प्रथम-दर्शनी खूपच खर्चिक असते/वाटते. पण एकदा ह्या उपकरणांचे जाळे तयार झाले तर संगणकावरून/आंतरजालावरून/भ्रमणध्वनी वरून त्यांचे नियमन(चालू/बंद) करणे सोपे होते. वयक्तिक पातळीवर हि प्रणाली वापरणे खर्चिक ठरू शकते, पण अमेरिका तसेच युरोपात पुढील २ वर्षात स्मार्ट मीटर्स लावले जाण्याची शक्यता आहे, हे स्मार्ट मीटर लावणाऱ्या कंपन्या अश्या प्रकारच्या स्मार्ट होम प्रणालीसाठी ग्राहकास मदत करतील. गुगल ने पावरमीटर नावाची स्मार्ट होम नियमन प्रणाली विकसित केली असून वीज उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांशी भागीदारी करून त्यांच्या ग्राहकांना हि प्रणाली मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपले घर/मीटर ह्या क्षेत्रात येत असल्यास काही काळातच आपल्याला ह्या प्रणालीचा वापर करता येईल(कोणी तसा केला असल्यास त्यांचा अनुभव जाणून घेण्यास उत्सुक).
ह्या स्मार्ट होमचा मोठा फायदा म्हणजे उपकरण पातळीवर उर्जा-नियमन होय, अमुक एक उपकरण गरजेपेक्षा जास्त वीज खात असेल तर ते बदलून अथवा बंद करून बचत केली जाऊ शकते. तसेच सुटीवर जाताना अमुक एक उपकरण बंद करावायचे विसरल्यास आंतरजालावरून ते बंद करता येऊ शकते, किंवा गरजेप्रमाणे चालू बंद करता येऊ शकते.
गुगल खाली दाखविल्याप्रमाणे आपल्या उर्जा वापराचे चित्र दाखवितो, हि व अश्या इतर सुविधा विजेची व वीजबिलाची बचत करण्यास मदत करू शकतात.
ह्या स्मार्ट प्रणालीचे दुष्परिणाम देखील आहेतच, जसे आपल्या घरातील उपकरणांची इत्यंभूत माहिती ह्या कंपन्यांना कळू शकते व तिचा वापर/गैरवापर केला जाऊ शकतो. तसेच सदोष प्रणालीमुळे भ्रमणध्वनी सेवेमध्ये जसे आपणास काही त्रुटी जाणवतात तश्याच त्या इथे देखील जाणवू शकतात. एकूणच परावलंबित्व अधिक वाढू शकते.
हॉलंड मधील एका व्यक्तीने आपले पूर्ण घर स्वतः ऑटोमेट केले आहे, घरातील वजन करण्याच्या यंत्रापासून ते पडदे/दरवाजे/दिवे/हिटिंग/सफाई यंत्र/सुरक्षितता कॅमेरे वगैरे उपकरणे ऑटोमेट केली आहेत. व ह्या उपकरणांमधून मिळणाऱ्या माहितीचे संकलन येथे केले आहे. फारच रोचक असा प्रयोग आहे.
हीच स्मार्ट होम पद्धत स्मार्ट ग्रीड पातळीवर राबविल्यास त्यातून होणारे फायदे खूपच जास्त असू शकतात, ह्यामध्ये पूर्ण वीज वापर क्षेत्राचे एका जागेवरून नियमन करणे सोपे होऊ शकते. ह्यामध्ये सर्व वीज -मीटर्स ठराविक संदेशवहन प्रणाली(३जि, जीएसएम, पीएलसी, सीडीएमए) मार्फत नियमित केले जाऊ शकतात. (स्मार्ट ग्रीड बद्दल पुढे कधी लेखात अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करीन, तूर्तास ज्ञानाभावी एवढेच)
अशी काही व्यवस्था भारतात राबवली गेल्यास उर्जा बचत होण्यास मोलाची मदत होईल, निदान औद्योगिक/लहान व्यवसाय व शहरी विकसित भागात राबविल्यास काही फायदा होऊ शकेल. महानगरपालिकेने हि व्यवस्था राबविल्यास किमान रस्त्यावर भर-दिवसा चालू असणारे दिवे बंद करणे सोपे होऊ शकते तसेच वीज वितरण मंडळास औद्योगिक वीजचोरीस प्रतिबंध करता येऊ शकतो.
स्मार्ट होम अथवा ग्रीड ऑटोमेशन हि संकल्पना नवीन नाही पण ह्या लेखाद्वारे थोडी ओळख सर्वाना करून द्यावी म्हणून हा प्रयत्न. उपक्रमिंकडे अधिक माहिती असल्यास जाणून घेण्यास उत्सुक.
व्याकरणातील/माहितीतील चुका कृपया व्यनिने अथवा खरडीने दाखवून द्याव्यात जेणेकरून सुधारणा करता येईल.
Comments
राखीव प्रतिसाद.
<<राखीव प्रतिसाद.>>
भारतातील प्रयत्न
अशी काही व्यवस्था भारतात राबवली गेल्यास उर्जा बचत होण्यास मोलाची मदत होईल, निदान औद्योगिक/लहान व्यवसाय व शहरी विकसित भागात राबविल्यास काही फायदा होऊ शकेल. महानगरपालिकेने हि व्यवस्था राबविल्यास किमान रस्त्यावर भर-दिवसा चालू असणारे दिवे बंद करणे सोपे होऊ शकते तसेच वीज वितरण मंडळास औद्योगिक वीजचोरीस प्रतिबंध करता येऊ शकतो.
भारतात होत असलेल्या या विषयीच्या प्रयत्नाबद्दलचा हा लेख
अभिनंदन
आपला हा उपक्रमावरचा पहिला लेख आहे, छान प्रयत्न आणि छान माहिती.
हॉलंडंमधल्या त्या व्यक्तीचे कौतूक! मस्तच प्रणाली वापरली आहे त्याने.
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
लेख आवडला
स्मार्ट होम प्रणालीबद्दल लेख आवडला.
साधकबाधक मुद्दे विचार करण्यासारखे आहेत.