तुलना - तैलरंगातील चित्र व मूळ छायाचित्र
जवळपास दोन वर्षांपूर्वी येथील सदस्य कोलबेर यांनी छायाचित्र-टीकेअंतर्गत मिसिसिपी नदीवरील पुलाचे एक छायाचित्र टाकले होते (दुवा - http://mr.upakram.org/node/2062). ते चित्र मला आवडले होते आणि मी त्याचे तैलरंगात चित्र करायचे ठरवले होते ते नुकतेच करून पूर्ण झाले. (कोलबेर यांची पूर्वपरवानगी घेतली होती.)
मूळ छायाचित्र आणि मी केलेले चित्र असे तुलनात्मक अभ्यासासाठी म्हणून इथे देत आहे. चित्र रंगवताना मी अर्थातच काही सूट घेतली आहे. रंगच्छटेमध्ये थोडा फरक, मूळ चित्रातील एखादी गोष्ट गाळणे वगैरे.
माझ्याकडील डिजिटल क्यामेरा (सोनी सायबर-शॉट ४.१ मेगॅपिक्सेल्स) फारसा चांगला नाही. त्यामुळे मूळ चित्रातील रंग हे इथे दिसणार्या चित्रातील रंगांपेक्षा थोडे वेगळे दिसत आहेत.
मी केलेले तैलरंगातील चित्र -
तैलरंगातील चित्र |
कोलबेरपंतांनी काढलेले मूळ छायाचित्र (मूळ छायाचित्रातील माझ्या चित्रात न घेतलेला उजवीकडचा भाग क्रॉप केला आहे) -
मूळ छायाचित्र |
Comments
अप्रतिम
तैलरंगातले चित्रही अप्रतिम आहे. तैलरंगातले आकाश आणि छायाचित्रातला पुलापासून खालचा भाग जास्त उठून दिसतो.
कोणत्या मुद्द्यांवर तुलना अपेक्षित आहे समजले नाही.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
चित्र आवडले
तैलरंगातील चित्रात चित्रकाराचे कसब दिसले. अगदी छान चित्र. पुलाला उठाव चांगला आला आहे (विशेषतः उजवीकडचा भाग). झाडात काढलेली बारिबारिक पाने मेहनत दर्शवतात. पण त्याच बरोबर कृत्रिमता आणतात. मुख्य दर्शनी भागातील दगड छान वठले आहेत. चित्राला चांगल्याप्रकारची खोली आली आहे. मूळ चित्र आणि त्याचे छायाचित्र याच्यात भरपूर फरक असतो. त्यामुळे सर्व सौंदर्यगुणांचे आकलन होत नाही.
चित्राची तांत्रिक बाजू, तयार करताना आलेले विचार सांगितले असते तर अधिक बहार आली असती. काढलेले चित्र केवढे आहे? ते मोठे असेल तर त्यातील पुलाचा विषय जास्त भावू शकतो. (सध्याच्या छायाचित्राच्या आकलनात दगडांचा विषय जास्त भावतो.)
चित्रात मेहनत आणि मुळाबरहुकुम काढणे ओतप्रोत भरले आहे. जी सूट घेतली आहे त्यामुळे एखाद्या गोष्टीस फार उठाव येणे फारसे घडले नाही. (कदाचित मूळ चित्रात ते घडले असेल.)
अशी चित्रे काढणे हा माझा पिंड नाही. (त्यातील मुख्यदोष म्हणजे एवढे कसब माझ्या कडे नाही आणि दुसरे म्हणजे एवढी मेहनत घेतली जात नाही.) अशा पद्धतीचे चित्र काढणार्या मित्रात मी वावरत असल्याने काही विचार सुचतात. (जो विचार काही प्रमाणात छायाचित्रकार करतो.) एक म्हणजे पुलाला उठाव देण्यासाठी काय करायला हवे? छायाचित्रातीले पुलाचे रंग आणि बारिक बारिक रंग छटा उठावदार दिसतात. तैलचित्रात हे करणे कठीण जाते (चित्राचा आकार मोठा नसेल तर). त्या ऐवजी काय करता येईल याचा विचार झाला असता. मूळ चित्रात नसलेली गोष्ट इथे दाखवावी का हा प्रश्न डोक्यात आला असता. कुठेतरी एखादी फिगर वा झाड वाढवली असती का? चित्र बघून यावर फार काही सुचत नाही. (कदाचित दगडाच्या दूरच्या भागात एखादा मासे मारणारा, नदीत एखादी बोट पुलाकडे वा खालून जाणारी) तुमच्या चित्रातील या गुणांबद्दल तुमचे विचार ऐकायला आवडतील.
प्रमोद
छान
चित्र छान आहे इतकेच कळले.
छायाचित्रापेक्षा चित्रात फोकल लेंथ कमी वाटते (जवळचे दगड अधिक मोठे केल्यामुळे, शिवाय, (डेप्थ ऑफ) फोकस कमी असल्यामुळे?). त्यामुळे चित्रातील दगड अंगावर येतात असे वाटते आहे.
सहमत
चित्र छान आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
+१
त्रुटी काढायला मला तरी काही जागा सापडली नाही :) मस्त चित्र . बाकी इतर महान चित्रकारांनी आपल्या चित्रावर मतप्रदर्शन् केलंच् आहे , तेंव्हा आम्ही पामर् काय् बोलणार् ?
अजुन येऊन द्या :)
- टारझन
तैलचित्र छानच आहे
याबद्दल अधिक माहिती मिळाली तर हवी आहे. उदाहरणार्थ, तैलचित्रात आकाशाचा निळा रंग अधिक उजळ घेतलेला आहे. ही सूट घेण्यामागे काही विशेष विचार होता काय? हा रंग उजळ घेतल्यामुळे पुलावरचे शोभिवंत दिवे आणि काळवंडणारे आकाश यांच्यात जो छटाविरोध (कॉन्ट्रास्ट) प्रकाशचित्रात आहे, त्यापेक्षा कमी छटाविरोध तैलचित्रात दिसतो आहे. यामुळे तैलचित्र अधिक प्रभावी होईल, असा विचार करून आकाश उजलले आहे काय?
कोलबेर यांच्या चित्रात कथानक मंतरलेल्या प्रकाशात न्हायलेल्या दगडांपासून पुलावरच्या दीपमाळेकडे C-आकाराच्या रेषेतून जाते, आणि पुलावरून पलीकडच्या किनार्यावरील क्षितिजाकडे नेते (माझ्यासाठी). तैलचित्रातले कथानक मंतरलेल्या प्रकाशात न्हायलेल्या दगडांपासून उंच झाडाकडे कलाटणी मारून कथानक जाते (माझ्यासाठी). झाडाकडे असे लक्ष वेधावे, हा तुमचा हेतू होता काय?
- - -
तैलचित्र छानच आहे - प्रकाशचित्राच्या शेजारी ठेवून बघता दोहोंमधले साम्य अवाक् करणारे आहे.
मूळ चित्रच भारी
तैलरंगातील चित्रात आपण केलेल्या बदलाचा प्रयत्न स्तुत्य असला तरी मला तुमचं लम्बर एकचं चित्र कै भावलं नै. आता रंगछटेच्या कारणामुळे म्हणा की अन्य काही कारण असेल मला पहिल्या चित्रात खूप कोरडेपणा वाटतो. ते चित्र निर्जीव झालं आहे. मूळ चित्र पाहिल्यावर मन कसं गच्च भरुन आल्यासारखं वाटतं. आणि आपण बदल केलेल्या छायाचित्रात मला काही दगडांच्या,झाडांच्या आणि त्या पुलाच्याही वेदना दिसतात. मूळ छायाचित्रातील झाडांचे रंग, दगडाचे रंग आणि पाण्यावरील तो लाल पिवळा रंग डोळ्यांच्या माध्यमातून मनात उतरतो. आपण बदल केलेल्या चित्रात तसं काही होत नाही. आपण केलेला उत्तम बदल म्हणाल तर झाडाचं जे गच्चपण आहे ते आपण रंगसंगतीमधुन मोकळं केलं आहे. झाडांच्या फांद्या मोकळ्या आणि बोलक्या झाल्या आहेत. असो, माझा प्रतिसाद अधिक ललित होत चालला आहे म्हणून आवरते घेतो. आपलं छायाचित्र पाहून मला माझ्या प्रा.म्हारोळकर सरांच्या कवितेची आठवण होते. कविता आवडली तर दाद द्यायची हं.
आभाळाचा रंग कोणता
निळा जांभळा आणि पारवा
डोळ्यात तुझ्या हसतो
माघा मधला थंड गारवा
रंगात दंग आकाश
आकाशात रंग तरंग
झिरझिरणार्या थंडीत
तुझा माझा देह अभंग.
व्हेलेंटाईन डे च्या सर्वांना शुभेच्छा. :)
-दिलीप बिरुटे
स्तुत्य प्रयत्न
अतिशय प्रयत्नपूर्वक काढलेले तैलचित्र आहे यात शंकाच नाही.
साम्य ८०% हून अधिक आहे.
तरीही मूळ चित्रातील संधीप्रकाश तैलचित्रात जसाच्या तसा उतरवता आला असता तर बरे झाले असते.
वर धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे आकाशाचा उजळपणा चित्रातील एकाकीपणाचा सूर कमी करतो.
तसेच झाडांच्या बुंध्यांवर आणि काही प्रमाणात झाडोर्यावर पडलेली सांजेची आभा तैलचित्रात दिसत नाही.
तुलना न केल्यास तैलचित्र उत्तम आहे असे म्हणतो.
अभिनंदन
तैलचित्र चांगलेच आहे. अभिनंदन. तुमचे चित्र उजळ असल्याने मूळ प्रकाशचित्रातली हवीहवीशी उदासी गेली आहे. एकंदर प्रमोद सहस्रबुद्धे, धनंजय आणि विसुनानांशी सहमत.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सुंदर
तैलचित्र सुंदर आहे. चित्रकलेबद्दल फार जाण नसल्याने प्रतिसाद देण्यात मजा नाही. पण, सर्वात आवडले ते म्हणजे उपक्रमावरच्या एका समुदायात एका कलाकाराने दाखवलेल्या कलेचा अविष्कार पाहून दुसर्या एका वेगळ्या क्षेत्रातल्या कलाकाराला आपली कला दाखवण्याची उर्मी आली आणि त्या कलाकाराने आठवणीने त्याचे छायाचित्र सुद्धा येथे टाकले. कोलबेर आणि तुम्ही दोघांनाही सलाम. :)
सुरेख
वरदा, चित्र खूप आवडले. तुलना वगैरेबाबत काही सुचवणी करण्याइतपत मला पेंटिंगमधलं कळत नाही परंतु चित्राकडे बघून प्रसन्न वाटावे इतके सुरेख तर आहेच.
चित्र आवडले
चित्र आवडले. त्यावर समीक्षात्मक काही लिहावेसे वाटत नाही. चित्र आवडले, इतकेच.
सन्जोप राव
ऑल प्रतिसाद आर इक्वल, बट सम प्रतिसाद आर मोर इक्वल दॅन अदर्स.
अप्रतिम
चित्र फारंच छान जमलं आहे. तैल चित्राच्या माध्यमातून प्रकाश दाखवणे आणि छायाचित्राच्या माध्यमातून दाखवणे ह्या दोन्ही फार वेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या मते तैल चित्रात ते उत्तम साधले आहे.
जबरदस्त
काय जबरदस्त तेलचित्र आहे! खूप आवडले. झाडांच्या वर आभाळ वाढवल्यामुळे अधिक प्रपोर्शनेट वाटले.
थोडे हलके -
चित्रातील दगडांजवळील दोन वाळक्या काटक्या चित्रकाराने गाळल्या आहेत. तसेच पहील्या रांगेतील दगडांमागील गवतही वाळलेले दाखवले आहे. मुळचि्त्रात गवत हिरवेगार आहे. मला असे वाटते की, असे करण्यामागील मिमांसा अशी असावी- चित्रकाराला वाटले असावे की, टोकदार काटक्या व समांतर वाळके केलेले गवत ह्यातून प्रेमीकेच्या मनातील उदासी जास्त अभिव्यक्त होते. त्यामुळे काटक्या काढून टाकल्या. तसेच प्रेमीका समोरील दृश्यातील दूरवरील दिवे तिच्या मनातील अंधूक आशेशी कंपेअर करत आहे. त्यातील आशा ही, ऊर्जा आहे व ती उष्ण असल्यामुळे गवत वाळून गेले असावे.
अभार
सर्व प्रतिसादकर्त्यांचे मन:पूर्वक आभार.
मी घेतलेल्या सुटींमध्ये आकाशाच्या रंगच्छटेमधला फरक ह्यात केवळ जाणीवपूर्वक केलेला बदलच आहे असे नाही तर काही त्रुटीही आहे. अर्थात माझ्या तैलचित्राचा फोटो फार ब्राईट दिसत आहे तो माझ्या क्यामेरामुळे. मूळ तैलचित्रात आकाशातील मधला भाग वर दिसत आहे तेवढा ब्राईट नाही, मात्र तो मूळ चित्रापेक्षा ब्राईट आहे. पुलामागचा आकाशाचा पट्टा थोडा गदड असायला हवा होता. तसा तो नसल्यामुळे दिवेलागणी होण्यापूर्वीच पुलावरचे दिवे लावले आहेत असे वाटते आहे आणि ती चित्रातली त्रुटी आहे. त्यामुळे गहिरेपणा, एकाकीपणा वगैरे कमी होतो हे खरेच.
चित्रात घेतलेली दुसरी सूट म्हणजे पाण्यात दिसणारे गवत वा बारीक काड्यांसारखी दिसणारी खोडे चित्रात घेतलेली नाहीत. अगदी बारीक रेषा तैलरंगामध्ये काढणे मला अवघड जाते.
मी ह्याआधी केलेल्या चित्रांमध्ये कधी दिवे आणि त्यांच्या पाण्यातल्या प्रतिबिंबांचा समावेश नव्हता. (तशी माझ्या नावावर फार चित्रे जमा नाहीत. मी तैलचित्र करण्याचे कोणतेही प्रशिक्षणही घेतलेले नाही. मी शिकाऊ आणि हौशी आहे. त्यामुळे स्व-शिकाऊ आणि हौशीपणामुळे येणारे दोष माझ्या चित्रांतही आढळतील.) त्यामुळे दिवे आणि प्रतिबिंबे मला चांगली दाखवता येतील का हे पाहाणे हा ह्या चित्रामागचा मुख्य उद्देश होता. शिवाय मूळ चित्राच्या जास्तीतजास्त जवळ जाणारे चित्र करणे हा उद्देश माझ्या प्रत्येकच चित्रामागे असतो.
प्रमोद सहस्त्रबुद्धेंनी म्हटल्याप्रमाणे झाडाची बारीकबारीक पाने चित्रात कृत्रिमता आणतात. ते खरेच आहे. मात्र मूळ चित्राबरहुकूम चित्र काढताना मला तरी ह्या चित्रासाठी तशी बारीक पाने दाखवण्यापलिकडे दुसरा उपाय सुचला नाही. कदाचित अधिक सफाईने ही पाने काढली असती तर कृत्रिमता थोड्या प्रमाणात टळू शकली असती का?
तसेच झाडांच्या बुंध्यांवर आणि काही प्रमाणात झाडोर्यावर पडलेली सांजेची आभा तैलचित्रात दिसत नाही. ही चित्रातील आणखी एक त्रुटी मान्य आहे.
वॉटरकलर
- मुळात चित्र अगदी हुबेहूब छायाचित्राप्रमाणेच (प्रत्यक्ष देखाव्याप्रमाणेच) असावे असे नाही. प्रेक्षकाच्या मनात देखाव्याचे योग्य असे प्रतिबिंब उमटले की चित्र जमले.
म्हणजे भावना पोचवणे हे चित्राचे मूळ काम.
-असे चित्र पाहून मुळीच वाटत नाही. हे चित्रकाराचे यश आहे.
-हेच चित्र जलरंगात केल्यास ही कृत्रिमता आपसुकच निघून जाईल.
वॉटरकलर हे माध्यम जास्त बारीक काम न करता अपेक्षित परिणाम साधण्यासाठी उत्तम आहे. हेच चित्र जलरंगात करून पहा आणि आम्हालाही दाखवा ही विनंती.
उत्तम
उत्तम प्रयत्न. चित्र आवडले.
ऑइल पेंटींग पाहीले आता हेच चित्र वॉटर कलरमधे कसे दिसेल तेही बघायला आवडेल.
फारच छान
गीम्प/फोटोशॉप किंवा तत्सम तंत्र वापरून मूळ छायाचित्राचे तैलचित्र काढले आहे असे वाटते, एवढे ते चांगले आले आहे. फारच छान.
पण तरीदेखील आकाशाचा भाग जास्त असल्याने चित्रातील भाव काहीसे कमी वाटतात, किंवा पोकळी हा भाव ठळकपणे जाणवून देणारे असे ते चित्र असे म्हणण्यास हरकत नाही.