दख्खनच्या पठारावर -1
एखाद्या लहान पोराच्या हातातल्या खेळण्यातून निघावे तसले आवाज करत आमची बस रस्त्याने खडखडत, धडधडत धावते आहे. बसणार्या प्रत्येक धक्क्याबरोबर, बसखालच्या स्प्रिंगा किरकिर, चिरचिर करत राहतात. रस्त्यावरच्या खड्यांबद्दलची आपली तक्रारच त्या स्प्रिंगा सांगत आहेत असे मला सारखे वाटत राहते. माझ्या डाव्या बाजूच्या खिडक्यांवरचे जाड पडदे, उन्हाची तिरीप आत येऊ नये म्हणून पूर्ण सरकवलेले असले तरी मधूनच, बसची चाके एखाद्या मोठ्या खड्यातून गेली की क्षणभर का होईना, एवढे वेडेवाकडे हलतात की कोठून तरी उन्हाची तिरीप आत येतेच. हे ऊन माझ्या उघड्या हातांच्यावर अगदी क्षणभर जरी पडले तरी हात भाजल्यासारखे होते आहे. खरे तर बाहेरची हवा तशी थंडच आहे. गरमी तर अजिबातच जाणवत नाहीये. पण हेही तितकेच खरे आहे की ऊन मात्र अतिशय कड्क व भाजणारे आहे . उजव्या बाजूच्या खिडक्यांच्यातून एखादा दृष्टीक्षेप जरी बाहेर टाकला तरी सतत, ऊस, ज्वारी व कापसाची शेते नजरेसमोर येत आहेत. मी क्षणभर डोळे मिटतो पण मला जाणवते की आमची बस एकदम डावीकडे वळून थांबते आहे. मी खिडकीतून बाहेर एक नजर टाकतो. समोरची पाटी सांगते आहे की मी हंपीला पोचलो आहे. म्हणजे माझी दख्खनच्या पठारावरची भटकंती आता सुरूच झाली आहे.
Rocky Mountain
मी खाली उतरतो व समोर बघतच रहातो. आजूबाजूला असणारी व आतापर्यंत मला सतत साथ देणारी ऊस, कापूस व ज्वारीची शेती मधे कोठेतरी लुप्तच झाली आहे. समोर, बाजूला, सगळीकडे आता दिसत आहेत फक्त दगड आणि मोठमोठे धोंडे. या दगडधोंड्यांच्या ढिगार्यांनी, समोर लांबवर दिसणार्या टेकड्या, दर्या, सर्व काही, जणू व्यापूनच टाकले आहे. इतक्या विविध आकारांचे, व्याप्तीचे दगडधोंडे एकाच ठिकाणी मी पूर्वी कधी बघितलेलेच नाहीत. महाराष्ट्रात सगळीकडे काळ्या बॅसॅल्ट दगडाचे खडक दिसतात. येथे दिसणारे दगड मात्र ग्रॅनाईट, सॅन्डस्टोन या प्रकारातले आहेत. लहान, मोठे, विशाल, अतिविशाल, सर्व प्रकारचे दगड येथे विखुरलेले आहेत व गुण्यागोविंदाने नांदत आहेत. एकमेकाच्या अंगाखांद्यावर ते इतक्या विचित्र रित्या रेललेले किंवा पहुडलेले आहेत की हे सगळे कसे घडले असावे याची कल्पना करणेही अशक्य वाटते. कधी तरी अनेक कोटी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या महा उद्रेकामधे लाव्हा रस आकाशात उंचीवर फेकला गेला व परत खाली येताना त्याचे घनीकरण होऊन तो या दगड धोंड्यांच्या स्वरूपात खाली पडून विखरला असावा एवढेच स्पष्टीकरण मला सुचते आहे.
मला नेहमी वाटते की जगाच्या कोणत्याही कानाकोपर्यात गेले तरी मनुष्य स्वभाव तोच रहात असल्याने, कोणत्याही देशाचा, प्रांताचा किंवा भागाचा इतिहास हा खूपसा त्या भागाच्या भूगोलाशी निगडित असतो. चीनचे उदाहरण घेतले तर चीनमधे वायव्येकडून म्हणजे मध्य एशिया मधल्या स्टेपी भागातून होणार्या टोळीवाल्यांच्या हल्ल्यांमुळे चीनचा इतिहास बदलूनच गेला. भारतामधे सुद्धा काही फारसे वेगळे घडले नाही. भारताचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास तर फक्त वायव्येकडून होणार्या आक्रमणांशीच निगडित आहे. असे म्हणता येईल. भारतीय द्वीपकल्पाच्या भौगोलिक रचनेत चार विभागांची कल्पना करता येते. सर्वात उत्तरेकडचा म्हणजे हिमालयाचा परिसर, उत्तरेकडचाच पण सिंधू आणि गंगा या नद्यांच्या खोर्यांमधला सपाट व सुपीक प्रदेश, गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या खोर्यांचा व त्यांच्या मधला दख्ख्ननचा पठारी प्रदेश व त्याच्या दक्षिणेला असलेला विषुव वृत्तिय हवामान असलेला दक्षिण भारत असे हे चार विभाग होतात. यापैकी हिमालयाचा परिसर, निर्जन व मनुष्यवस्तीला फारसा लायक नसल्याने येथे एक कश्मिर खोरे सोडले तर फारशी वस्ती झाली नाही व फारशी आक्रमणेही झाली नाहीत. सर्वात जास्त परकीय आक्रमणे झाली ती सिंधू व गंगा नद्यांच्या खोर्यातल्या प्रदेशात. भारताचा इतिहास या विभागातल्या परकीय आक्रमणांशी एवढा निगडित आहे की दक्षिणेला असलेल्या गोदावरी-कृष्णा खोर्यातल्या प्रदेशाच्या इतिहासाकडे फारसे कोणाचे लक्षच जात नाही. इतिहास सांगतो की या भागावर सुद्धा सतत परकीय आक्रमणे होतच राहिली. परंतु या प्रदेशाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे अगदी सोळाव्या शतकापर्यंत शक्तीमान अशा स्थानिक सत्ता उदयास येत राहिल्या व त्यांनी आपली साम्राज्ये येथे स्थापली. या साम्राज्यांनी परकीय व इस्लाम धर्मीयांच्या आक्रमणांना प्रभावी उत्तर दिले. दख्खनच्या पठारावर संपूर्ण परकीय किंवा इस्लामी राजवट, सोळाव्या शतकापर्यंत यामुळे कधीच प्रस्थापित होऊ शकली नाही. परिणामी दक्षिणेकडे असलेली दक्षिण भारतातील राज्ये इस्लामी आक्रमणांपासून पूर्णपणे संरक्षित राहिली. तिथे भारतीय हिंदू संस्कृती जोपासली गेली व वर्धित होत गेली. दख्खनच्या पठारी प्रदेशामधल्या राजांनी भारताच्या इस्लामीकरणाची प्रक्रिया अडवली व त्यामुळे ती थांबलीच असे म्हणणे पूर्ण शक्य आहे.
या दख्खनच्या पठारावर उदयास आलेले सर्वात जुने साम्राज्य आंध्र राजघराण्यातल्या गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शालीवाहन या राजाने इ.स.78 च्या सुमारास प्रस्थापित केले होते. या कालात या राज्याच्या पश्चिमेला असलेल्या म्हणजे मालवा, गुजरात व काठियावाड या भागात शक, पहेलवी व यवन (ग्रीक) या परकीयांच्या राजवटी होत्या. शालीवहनाने या सर्व परकीय शक्तींचा पराभव करून आपले दख्खनचे साम्राज्य प्रस्थापित केले होते व संपूर्ण दख्खनचे पठार एका अंमलाखाली आणले होते. यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट व यादव या कुलातील राजांनी या प्रदेशावर राज्य केले. इ.स.1294 मधे अल्लाउद्दिन खिलजीने यादवांचा पराभव केला व इस्लामी राजवट प्रथम दख्खनच्या पठारावर आली. 1347 मधे दख्खनमधे बहमनी साम्राज्य प्रस्थापित झाले व दख्खनचे पठार पूर्णपणे इस्लामी राजवटीच्या अंमलाखाली जाणार अशी चिन्हे दिसू लागली.
मात्र याच काळात म्हणजे इ.स.1336 मधे संगमा या राज कुलातील हरीहर व बुक्का यांनी विजयनगरच्या स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना केली व दख्खनच्या पठारावर संपूर्ण इस्लामी राजवट येण्याची प्रक्रिया सुमारे 200 वर्षे अतिशय प्रभावीपणे थांबवली गेली. विजयनगरची स्थापना व इ.स. 1565मधे पाच इस्लामिक राजवटींनी मिळून केलेला विजयनगरच्या सैन्याचा पराभव या घटनांना त्यामुळेच अतिशय ऐतिहासिक महत्व आहे.
दख्खनच्या पठारावर उदयास आलेल्या या साम्राज्यांच्या खाणाखुणा अजुनही ठिकठिकाणी सापडतात. महाराष्ट्रामधे सुद्धा अजिंठा, वेरूळ, किंवा दौलताबादचा किल्ला ही ठिकाणे या इतिहासाची साक्षीदार आहेतच. परंतु या इतिहासाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा भाग कुठला असेल तर तो म्हणजे कर्नाटक राज्यातले उत्तरेचे गदग, बागलकोट व विजापूर हे जिल्हे. दख्खनी साम्राज़्यांच्या वैभवाच्या खाणाखुणा शोधायच्या असल्या तर येथेच यायला हवे. यामुळेच माझी दख्खनच्या पठाराची भटकंती मी हंपी पासून सुरू करतो आहे.
विजयनगरचे साम्राज्य दोनशे वर्षांपेक्षा अधिक काल अस्तित्वात होते. या कालात हे राज्य अतिशय वैभवसंपन्न म्हणून गणले जात असे. इ.स.1565 मधे हंपीच्या सैन्याचा पराभव झाल्यावर, शत्रू सैन्याने या सुंदर शहराचा संपूर्णपणे विध्वंस व विनाश केला होता. सुमारे सहा महिने चाललेल्या या विद्ध्वंसानंतर आता हंपी मधे फक्त भग्न अवशेष तेवढे उरले आहेत. तरीही मूळच्या संपन्नतेच्या खुणा हंपीमधे पावला पावलावर दिसत रहातात. हंपी शहर 26 वर्ग किलोमीटर एवढ्या विस्तृत आवारात विखुरलेले असले तरी सर्वात महत्वाचे भग्नावशेष तीन ठिकाणीच आणि एकमेकाच्या जवळ जवळ आहेत त्यामुळे पायी फिरून ते बघणे सहज शक्य आहे.
मी आता बसमधून उतरून उत्तरेला असलेल्या देवळांच्या विभागाकडे निघालो आहे. मला समोर दोन तीन छोट्या इमारती दिसत आहेत. इमारतींची रचना मोठी रोचक वाटते आहे. दगडी चौथर्यावर सर्व बाजूंना दगडी खांब उभारलेले आहेत व त्या खांबांच्यावर मोठमोठ्या दगडी स्लॅब्ज आडव्या टाकून छप्पर बनवलेले आहे. हंपी मधल्या ज्या इमारती अजून उभ्या आहेत त्या सर्वांची रचना अशीच आहे. पलीकडे जरा उंचीवर असाच एक उघडा कक्ष दिसतो. त्यात काहीतरी मूर्ती दिसते आहे. जवळ जाऊन बघितल्यावर लक्षात येते आहे की ही मूर्ती गणेशाची आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे कोणत्याही कार्याची सुरवात गणेशपूजनाने केली तर कार्यसिद्धी होण्यास अडचण येत नाही. माझ्या हंपीमधल्या फेरफटक्याला गणेशापासूनच सुरूवात होते आहे.
सासिवेकालु गणेश
या गणेश मूर्तीचे नाव आहे ससिवेकालू गणेश (Sasivekalu Ganesha) एका अखंड ग्रॅनाइट शिलेमधून बनवलेली ही मूर्ती 8 फूट तरी उंच आहे. ससिवेकालू म्हणजे मोहरी. या गणपतीचे पोट एखाद्या मोहरीच्या दाण्यासारखे असल्याने या मूर्तीला हे नाव पडले असावे असे सांगितले जाते. गणेशमूर्तीच्या पोटाभोवती एक नाग बांधलेला दिसतो. या गणपतीने अतिभोजन केल्याने आपले पोट फुटणार असे त्याला वाटू लागले व म्हणून हा नाग त्याने पोटावर बांधून ठेवला आहे असे म्हटले जाते.
पोटावर बांधलेला नाग
बाजूने दिसणारी गणेशमूर्ती
मागील बाजूने दिसणारी मूर्ती. पार्वतीच्या मांडीवर विराजमान बालक गणेश
मी मूर्तीच्या भोवती एक प्रदक्षिणा घालतो. गणपतीच्या हातात एक काठी व गुरांच्या मानेभोवती टाकण्याचा एक फास दिसतो आहे. मूर्तीच्या मागच्या बाजूने ही मूर्ती एखाद्या बसलेल्या स्त्रीच्या मूर्तीसारखी दिसते आहे. केसांचा बांधलेला अंबाडा वगैरे स्पष्ट कळतो आहे. कोणत्याही आईला तिचा मुलगा वयाने, कीर्तिने किंवा शरीराने कितीही मोठा झालेला असला तरी एक बालकच वाटत असतो हे चिरंतन सत्य मूर्तिकार येथे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मागच्या बाजूने दिसणारी ही स्त्री म्हणजे पार्वती व ती एवढ्या अगडबंब गणपतीला स्वत:च्या मांडीवरच घेऊन बसली आहे असे दृष्य मागील बाजूने दिसते आहे. मूर्तिकाराच्या कल्पनाविलासाला दाद देतच मी तेथून पुढे निघतो.
31 जानेवारी 2011
Comments
भारी आयडिया
भारी आयडिया! यामुळेच गणपती बुद्धीचे दैवत मानले जात असावे.
प्रकाश घाटपांडे
श्रीगणेशा
लेखाचा श्रीगणेशा तर उत्तमच झाला, पुढले भागही रोचक असतील याबाबत शंका नाही. वाचण्यास उत्सुक आहे.
दख्खनचे पठार
पुढील प्रवासवर्णनाची वाट पाहतो आहे. लेख आवडला.
फक्त दख्खनचे पठार हा उल्लेख खटकला. सर्वसाधारणणे तापी नदीच्या दक्षिणेस (वा सातपुडा/विंध्याच्या दक्षिणेस) दख्खनचे पठार मानले जाते.
हंपीला कुठून गेलात? सोयीचे मुख्य गाव कुठले?
प्रमोद
पठार
पठार हा शब्द मी इंग्रजी शब्द Plateau या इंग्रजी शब्दाच्या अर्थाने वापरला आहे. गोदावरी आणि कृष्णा या नद्यांच्या मधला भाग हा सिंधू-गंगा नद्यांच्या खोर्यांपेक्षा भौगोलिक रित्या निराळा आहे असे मला वाटते म्हणून त्याचे वर्णन करण्यासाठी मी हा शब्द वापरला आहे. दुसरा कुठला जास्त समर्पक शब्द सुचवला गेला तर पुढच्या भागात मी तो वापरू शकेन. हंपी जवळचे मोठे शहर म्हणजे होसपेट. होसपेट ला स्टेशन आहे व तेथे थेट जाणे शक्य आहे. परंतु मी हुबळीवरून गेलो होतो.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
चांगले वर्णन
वर्णन आणि टिपण्णी चांगली आहे परंतु चालू वर्तमानकाळ अजूनही
रुचत नाहीरुचत नाही आहे.ग्रॅनाईट, सँडस्टोन, असे सगळे एकत्र आहेत म्हणजे नक्कीच पाण्यामुळे असे जमले असावेत. दख्खनचा लावा हळूहळू वाहत राहिला, कधी उद्रेक झाला नाही असे वाचल्याचे स्मरते. असा उद्रेक झाल्यावर वर उडलेला लावा खाली येईपर्यंत गोठणारही नाही.
पाण्याचा प्रवाह
पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून येऊन अशा रितीने विशाल पाषाण एकत्र जमा होणे हे फक्त समुद्र तळावर् संभवनीय होईल असे वाटते. आफ्रिकेतील सहारा वाळवंट किंवा उत्तर अमेरिकेतील लुइझियाना राज्याच्या उत्तरेला असणारा मध्यवर्ती भाग हा कधी काली समुद्र तळ होता हे येथे सापडणार्या जीवाश्मांवरून दिसून येते. त्या पद्धतीचा कोणताही पुरावा दख्खनच्या पठारावर सापडत नाही. त्यामुळे हे पाषाण ज्वालामुखी उद्रेकामुळेच असे पडलेले असावे असे वाटते. कदाचित स्फोटाबरोबर हे दगड धोंडे ही वर फेकले जाऊन नंतर खाली या पद्धतीने पडले असावेत.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.