थोर स्वतंत्रता सेनानी - राणी गाईदिन्ल्यू

आपल्या भारतियांना आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठि लढलेल्या स्वांतंत्र्ययोध्यांबद्दल बर्‍यापैकी माहिती असते. परंतु आपल्याच देशातील पण ईशान्य भारतातील स्वतंत्रता सेनानी याबद्दल माहिती अजिबातच नसते. यांची ओळख करुन देण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

राणी माँ म्हणून प्रख्यात असलेल्या नागालैंडच्या स्वातंत्र्य सेनानी राणी गाईदिन्ल्यू (Gaidinliu) यांचा जन्म मणिपूर राज्यातील तमेंगलाँग जिल्ह्यातील Lungakao या गावी २६ जानेवारी १९१५ रोजी झाला. त्यांच्या अंगी असलेली देशभक्तीची भावना, धार्मिक श्रध्दा आणि परंपरेविषयीचा आदर यामुळे त्या क्रांतीकारक Haipou Jadonang यांच्या संपर्कात आल्या. परंतु विधिलिखीत काही वेगळेच होते. एका खुनाच्या प्रकरणात Jadonang यांना मुद्दाम अडकवून ब्रिटीशांनी त्यांना इंफाळच्या कारागृहात २९ ऑगष्ट १९३१ रोजी फाशी दिली. राणी गाईदिन्ल्यू यांना पकडण्यासाठी ब्रिटीशांमार्फत मोठे बक्षीस जाहीर झालेले असूनही राणीने धाडस दाखवून Jadonang यांची मृत्यूपूर्वी भेट घेतली.

राणीच्या मनातील ब्रिटीशांविरुध्दच्या भावनेला या प्रसंगाने अधिकच धार आली. जवळपास पाचशे तरुणांना एकत्र करुन त्यांना राणीने लष्करी शिक्षण दिले. १९३२ मध्ये राणीचे सैन्य आणी ब्रिटीश यांच्यात तुंबळ युध्द झाले. मोठ्या संख्येने ब्रिटीश सैनिक या लढाईत मारले गेले. राणीचे अनेक सैनिकही धारातीर्थी पडले. त्यांची स्मृती म्हणून पुढे Hungrum, जिल्हा उत्तर कछार, आसाम या गावी हुतात्मा स्मारक उभारले गेले.

चवताळलेल्या ब्रिटिशांनी राणीला जिवंत वा मृत पकडून देणार्‍यास रु.५०० चे (१९३२ च्या काळातले पाचशे रुपये) बक्षीस जाहीर केले. मणिपूरमधील झिलीयाँगराँगचा परिसर , नागा टेकड्या आणि आसाम मध्ये खबर्‍यांचे जाळे पसरवले गेले. सर्व बाजूंनी घेरल्या गेलेल्या राणीने ब्रिटीशांविरुध्द आघाडी उघडली. शेवटी वासुदेव बळवंताच्या बाबतीत झाले तेच राणीच्या बाबतीत झाले. पहाटेच्या वेळी Poilwa(puloma), आताच्या Nagaland गावात १७/१०/१९३२ म्हणजे वयाच्या १७ व्या वर्षी झालेल्या धुमश्चकीत राणी पकडली गेली. १९३४ ते १९४८ अशी चौदा वर्षे ब्रिटीशांच्या कैदेत काढल्यानंतर स्वातंत्र्यप्राप्ती बरोबर म्हणजे १९४८ साली राणीची शिलाँग तुरुंगातुन मक्तता करण्यात आली.

हरक्का नागांचा परंपरागत वेष, दागदागिने, लोकसंगीत, लोक नृत्य , यांचे जतन व संवर्धन यासाठी राणीने ठिकठिकाणी प्रशिक्षण केंन्द्रे उघडली. कारक हराक्का समाजाच्या परंपरा व संस्कृती भारतीय संस्कृतीशी मिळतीजुळती आहे असे तिचे ठाम मत होते. आध्यात्मिक वृत्ती अंगी असल्यामुळे अनेक भक्तिपर व देशभक्तीपर कविता तिने रचल्या. त्यांना चाली लावून विविध प्रसंगी त्या म्हटल्या जातील याकडे लक्ष दिले. समाजाशी अशी नाळ जुळल्यामुळे 'राणी माँ' च्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येत लोक एकत्र येत. नागालैंड ख्रिस्ती बनवण्याचे मनसुबे रचणार्‍या चर्चच्या डोळ्यात राणी माँ चे संस्कृती जपण्याचे कार्य खुपू लागले . चर्च ने राणीविरुध्द अपप्रचाराची मोहिम उघडली. परंतु भारतीय जनतेने मात्र राणीला आदर आणी सन्मानच दिला. २९/२/१९९३ रोजी तिच्या गावात झालेल्या अंतिम सोहळ्यात राज्याचे सर्व नेते आवर्जुन उपस्थित होते.

राणी ला मिळालेले सन्मान - (१) स्वतंत्रता सेनानी ताम्रपट - १९७२ इंदिरा गांधी यांचे हस्ते (२) पद्मभुषण - १९८२ राष्ट्रपति संजीव रेड्डी यांच्या हस्ते. (३) विवेकानंद सेवा सन्मान - १९८३ बडा बझार पुस्तकालय, कोलकता.

साभार - ईशान्य वार्ता - जानेवारी २०११.

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगली माहिती

चांगली माहिती. या आधी अर्थातच माहित नव्हती.

राणीची माहिती विकीवरही सापडली

डौट

ते पान विकिपीडियाच्या तत्त्वांनुसार नाही, झैरात वाटते. त्या पानावरील संदर्भदुवे तुटलेले आहेत. ते पान आणि प्रस्तुत धागा हे एकाच संदर्भग्रंथावरून लिहिल्यासारखे वाटतात.
Haipou Jadonang यांच्याविषयीही गूगलून फारसे काही विश्वासार्ह सापडले नाही. ते दोन्ही स्वातंत्र्यसैनिक असतीलही, परंतु ख्रिश्चन धर्माचा उल्लेख आणि धागालेखकाचा इतिहास पहाता काहीतरी गडबडीची शंका आहे.

डौटाचे निरसन

ते पान विकिपीडियाच्या तत्त्वांनुसार नाही, झैरात वाटते. त्या पानावरील संदर्भदुवे तुटलेले आहेत. ते पान आणि प्रस्तुत धागा हे एकाच संदर्भग्रंथावरून लिहिल्यासारखे वाटतात.

शक्य आहे. विकीने तशी सूचना चिकटवली आहेच.

ते दोन्ही स्वातंत्र्यसैनिक असतीलही, परंतु ख्रिश्चन धर्माचा उल्लेख आणि धागालेखकाचा इतिहास पहाता काहीतरी गडबडीची शंका आहे.

राणीसारखी व्यक्ती इतिहासात असायला हरकत नाही. कल्याणकरांचा लेख ही फक्त सुरुवात आहे. त्यातून काय उचलायचे हे उपक्रमी जाणून आहेत. बाकी राहिला 'प्रचार आणि प्रसार' त्यातून कोणती ऐतिहासिक व्यक्ती सुटली आहे?

१८५७च्या बंडाला स्वातंत्र्य लढा वगैरे म्हटले जातेच ना.

दुर्दैव

आपल्या भारतियांना आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठि लढलेल्या स्वांतंत्र्ययोध्यांबद्दल बर्‍यापैकी माहिती असते. परंतु आपल्याच देशातील पण ईशान्य भारतातील स्वतंत्रता सेनानी याबद्दल माहिती अजिबातच नसते

नो डोनटस् फॉर अस. पाठ्यपुस्तकातून इतिहास शिकणे आणि अर्धवट शिकणे यात काहीच फरक राहिला नाही.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

 
^ वर